Rajesh Malasheगुन्हेगारी जगताबद्दल विषेशतः अंडरवर्ल्ड बद्दल सर्वसामान्य माणसांपासून सगळ्यांनाच भीतीयुक्त कुतूहल असतं. त्यातही मुंबईतले माफिया आणि त्यांचे काळे धंदे यावर विपुल लिखाण झालंय, त्यांच्या व्यक्तिरेखांवर आधारित चित्रपट पण निघालेत(दिवार ,वन्स अपॉन या टाईम इन मुंबई, शूट आउट at वडाळा.. ही काही उदाहरण)
हाजी मस्तान , करीम लाला , वरदराजन मुदलियार यासारख्या नामचीन भाईंपासून सुरू झालेली ही परंपरा आत्ताच्या दाऊद इब्राहिम ते रवी पुजारी पर्यंत अविरत सुरू आहे. यातले सगळे डॉन , माफिया , जास्तकरून पुरुष .. पण या क्षेत्रात एकेकाळी स्त्रियांची पण मक्तेदारी होती किंबहुना मुंबईतील या लेडी डॉन ना मस्तान, करीमलाला , दाऊद सारखे लोक पण वचकून असायचे अस सांगितलं तर कित्येकांना ते खरं वाटणार नाही .
पण ही वस्तुस्थिती होती.
कित्येकदा दोन टोळ्यांमधल्या मांडवली साठी या लेडी डॉन पुढाकार घेऊन यशस्वी तोडगे काढायच्या.
या लेडी माफियांबद्दल माहिती होण्याचं कारण म्हणजे ..
पत्रकार एस. हुसैन झैदी आणि जेन बोर्जेस यांनी लिहिलेलं.. माफिया क्विन्स ऑफ मुंबई ` हे पुस्तक.
उल्का राऊत ` यांनी मराठीत अनुवाद केलाय.
नुकतच वाचनात आलं. अतिशय सुरेख माहिती दिलीय त्यात . कित्येक ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन झैदी आणि बोर्जेस यांनी प्रत्यक्ष अनुभवलेले प्रसंग लिहिलेत यात.
१.चावलवाली ते दारुवाली असा पल्ला गाठणारी
हाजी मस्तान जिला मोठी बहीण मानायचा आणि दाऊद आई मानायचा ती झैनब उर्फ जेनबाई
२.कामाठीपुऱ्याची सम्राज्ञी अस बिरुद प्राप्त होऊनही इमानदारीत धंदा करणारी गंगुबाई कोठेवाली.. ही प्रत्यक्षात एका खानदानी आणि सधन कठियावडी कुटुंबात जन्मलेली होती. वडील प्रतिथयश वकील होते..
पण नशिबाच्या फेऱ्यात सापडली आणि ...
३.पतीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी प्रत्यक्ष दाऊद इब्राहिम बरोबर दोन हात केलेली.. सपना उर्फ अश्रफ
४.मध्य मुंबईत राहून अमली पदार्थाच्या व्यापारात स्वतःच मोठं साम्राज्य असलेली ..ज्योती आदिरामलिंगम,
महालक्ष्मी पापामणी
या तत्कालीन लेडी माफिया.
त्याचबरोबर पतीच्या खांद्याला खांदा लावून अंडरवर्ल्ड मधे दबदबा असणाऱ्या बायका
आशा गवळी..अरुण गवळी ची बायको
नीता नाईक..अश्विन नाईक
सुजाता निकाळजे..राजन निकाळजे उर्फ छोटा राजन
पद्मा पुजारी.. रवी पुजारी
या सगळ्यांबद्दल जाणून घेण्यासाठी ..`माफिया क्विन्स ऑफ मुंबई ` हे पुस्तक मिळालं तर जरूर वाचा.
Ashavajit Narwadeकालच हूस्सैन झैदी आणि जेन बोर्जस लिखित व उल्का राऊत यांनी मराठी मध्ये अनुवादित केलेले #माफियाक्वीनऑफमुंबई हे पुस्तक वाचले.
त्याची समीक्षा इथे मांडतो आहे.
आपण सर्वांनी यापूर्वी दाऊद इब्राहिम करीम लाला हाजी मस्तान वरदराजन यासारख्या मुंबईतील माफियावर नियतकालिक वर्तमानपत्र अश्या माध्यमामधून अभ्यासपूर्ण लिखान वाचलेली आहेत. अनेक चित्रपटही याच्यावर चित्रपट काढत असतात ते ही आपण पाहिलेले आहेत . त्यामुळे यांच्या जीवनातील तपशील त्याचे व्यवसाय याबद्दल आपल्याला माहिती आहेच .परंतु काही स्त्रिया देखील मुंबईच्या गुन्हेगारी विश्वाचा हिस्सा आहेत ही गोष्ट आपल्याला फारशी माहिती नसावीत. मुंबई underworld च्या भाई दादा लोकांच्या खांद्याला खांदा लाऊन तर कधी त्यांना मार्गदर्शन करून आणि पडद्यामागून सूत्र हलुन ज्या स्त्रियांनी अंडरवर्ल्डचे काळे धंदे चालवण्यास मदत केली . अश्या आख्यायिका बनलेल्या स्त्रियांच्या जीवनकहाण्या या पुस्तकात दिलेल्या आहे. मुंबईच्या अंडरवर्ल्डची यापूर्वी कधीच उजेडात न आलेली बाजू अत्यंत चित्तवेधक शैलीत आणि सखोल अभ्यास करून या पुस्तकात लेखकांनी मांडलेली आहे.
त्यातील काही स्त्रियांचा इथे थोडक्यात उल्लेख देतो
#जेनाबाईदारूवाली
जेनाबाई दारूवाली ही देशातील पहिली महिला डॉन होती. तसेच ती गांधीजी ची समर्थक होती अनेक स्वतंत्र चळवळीत तिने भाग घेतला होता.
त्यानंतर तिने धान्याचा काळाबाजार आणि बेकायदा दारूचा धंदा असा आपला व्यवसाय वाढविला . या स्त्रीची मुंबई च्या अंडरवर्ल्ड वर तिची पकड होती ती हाजीमस्तान ते दाऊद यांपर्यंतच्या दादा लोकांना सल्ले द्यायची तसेच पोलीसाची खबरी म्हणून देखील काम करायची . दादा लोक ही तिचा आदर करायचे हाजी मस्तान तिला बहीण मानायचा तर दाऊद तिला मावशी .
तिच्या मुलाची एका गँगवार मध्ये हत्या झाल्यानंतर ती व्यथित झाली यानंतर तिने अंडरवर्ल्ड ला रामराम ठोकला त्यानंतर थोड्याच दिवसात आजारपणात तिचा म्रुत्यु झाला .
#गंगूबाई काठीयावाड
गंगूबाई हिला लग्नाच्या आमिषाने फसवून मुंबईच्या वैश्या वस्तीत विकले होते त्यानंतर तिने तेच आयुष्य स्वीकारले . त्यानंतर वैश्यावस्ती बंद करायच्या सरकारी फर्मानाने ति वैश्याव्यवसाय करणाऱ्या महीलाची नेता बनली एवढंच़ नव्हे तर तिने पंडित जवाहरलाल नेहरूना देखील राखी बांधली होती आज मुंबई च्या वैश्यावस्तीत प्रत्येक घरात तिचा फोटो आहे तिला तिथे देवाचा दर्जा भेटतो .
यासारख्या अनेक स्त्रियांच्या रंजक कथा यात दिल्या आहे मी खात्रीने सांगतोय एकदा तुम्ही पुस्तक वाचायला घेतले तर संपेपर्यंत खाली ठेवणार नाही .
DAINIK KESARIमुंबई ‘अंडरवर्ल्ड’ मधील स्त्रियांच्या सत्यकथा...
‘अंडरवर्ल्ड’ हे इतके भीषण आणि भयावह असते, की तेथे पुरुष डॉनचाच वावर असू शकतो, असे सामान्य माणसाला वाटले, तर स्वाभाविक आहे; पण आश्चर्य वाटण्याची गोष्ट अशी, की मुंबई माफियात काही स्त्रियांनाही आपला दबदबा निर्माण केला. ‘डोंगरी ते मुंबई’ या गाजलेल्या पुस्तकाचे लेखक एस.हुसैन झैदी यांनी जेन बोर्जस यांच्यासह ‘माफिया क्विन्स ऑफ मुंबई’ या नव्या पुस्तकात अशाच स्त्रियांच्या कहाण्या सांगितल्या आहेत. मूळ इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद उल्का राऊत यांनी केला आहे. लेखकांनी या पुस्तकात सांगितलेल्या कहाण्या धक्कादायक तर आहेतच; पण स्त्रियाही पुरुषांइतक्याच क्रूर, कपटी, खुनशी होऊन अंडरवर्ल्डमध्ये आपले स्थान निर्माण करू शकतात हे भयावह सत्य उलगडणाऱ्याही आहेत.
पुस्तकात अशा आठ स्त्रियांची माहिती आहे. ‘डोंगरीमधली महाधूर्त बाई’ म्हणजे जेनाबाई चौदा वर्षांची असताना तिचा निकाह झाला आणि ती डोंगरीतील चुनावाला बिल्डिंगमध्ये राहायला आली. पुढे १९४७ मध्ये भारताची फाळणी झाली आणि जेनाबाईचा पती दरवेशने पाकिस्तानात जायचे ठरविले, नि याचे कारण असे होते तिने स्वातंत्र्यलढ्यात हिरीरीने भाग घेतला होता; पण हीच जेनाबाई पुढे ‘अंडरवर्ल्ड’शी कशी परिचित नि निगडित झाली, हा सगळा प्रवास लेखकांनी विस्ताराने नि चित्तवेधकपणे कथन केला आहे. सुरुवातीला झटपट पैसा कमविण्यासाठी अन्नधान्याचा काळाबाजार ती करे. मग पैशाचा हव्यास वाढला आणि ती वरदराजन मुदलियासह दारूचा धंदा करू लागली. याच काळात तिची पोलिसांशी जवळीक वाढली नि नंतर याच ‘धंदा’त तिला अटक झाली. सुटकाही झाली; पण सुटकेनंतर एकीकडे ती पोलिसांची खबरेगिरी करी, तर दुसरीकडे पोलिसांना अंधारात ठेवून चोरटा व्यवहारही! अंडरवर्ल्डमध्ये जेनाबाईचा दबादबा वाढू लागला व हाजी मस्तानपासून दाऊदपर्यंत सर्वांनाच जेनाबाईचा आधार वाटू लागला आणि जेनाबाईही धूर्तपणे सगळी कामे करू लागली. वेगवेगळ्या डॉनमध्ये समेट घडविण्यासाठी मध्यस्थीही जेनाबाई करत असे.
अशरफ खान उर्फ सपना हीची दाऊदविरुद्धची सूडकथा अशीच भयानक. तिचा पती मेहमूद खान पोलीस एन्काऊंटरमध्ये ठार झाला; पण हे एन्काउंटर दाऊदने दिलेल्या माहितीवरून झाले असे तिला कळले आणि ती पेटून उठली. तिला कोणी हुसेन उस्तराचे नाव सांगितले. तोही दाऊदचा कट्टर शत्रू मेहमूदला मारणाराही मेलाच पाहिजे या सूडाने पेटलेल्या अशरफने उस्तराकडून शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण घेतले. अगदी नेपाळमध्ये दाऊदकडून होणाऱ्या तस्करीवर हल्ले चढविण्यापर्यंत तिची मजल गेली; पण तिने उस्तराला आपल्या जवळ कधी येऊ दिले नाही. उस्तराला अशरफबद्दल प्रेम वाटू लागले, तो सलगी करू लागला पण असल्या मोहात अशरफ अडकली नाही. ती उस्तराला सोडून गेली. पुढे तिने शारजात जाऊन दाऊदला मारण्याचा कट आखला. अर्थात भडक डोक्याची अशरफ शकलीलच्या इशाऱ्यावरून मारली गेली. एका सुंदरीचा सूडप्रवास हा असा दाऊदला मारण्याच्या उद्दिष्टाने सुरू होऊन अशरफ उर्फ सपनाच्याच अंताने संपला.
महालक्ष्मी पापमणी दहशत अशीच लेखकांनी वर्णन केली आहे. मोनिका बेदी हिचे वडील डॉक्टर. मूळ पंजाबी; पण नंतर नॉर्वेत गेलेली. मग इंग्लंडला सतराव्या वर्षी गेली, ती इंग्लिश वाङ्मयाचा अभ्यास करण्यासाठी, मात्र बॉलिवूडमध्ये जाण्याच्या इच्छेने तिला पछाडले. तेथे जाऊनही, संघर्ष करूनही यश मिळेना. तेथून तिची वाट बदलली, पुढे अबू सालेमशी तिची ओळख झाली आणि एक वेगळाच प्रवास सुरू झाला, ते सारे सविस्तरपणे लेखकांनी वर्णन केले आहे. हिंदू डॉन्सच्या सहधर्मचारिणी हा अशा गवळी, गँगस्टर अश्विन नाईकची पत्नी नीता नाईक, छोटा राजनची पत्नी सुजाता निकाळजे, रवी पुजारीची पत्नी पद्मा यांविषयी लेखकांनी दिलेली माहिती वाचकांना थरारक वाटल्याखेरीज राहणार नाही.
अंडरवर्ल्ड मधील एका वेगळ्या पैलूंवर लेखकांनी प्रस्तुत पुस्तकात प्रकाश टाकला आहे. गुन्हेगारी जगतातील या स्त्रिया केवळ पुरुषांच्या आदेशावर काम करणाऱ्या नव्हत्या व नाहीत. त्यांनी जणू स्वत:चे साम्राज्य अंडरवर्ल्डमध्ये उभे केले. प्रत्यक्ष त्या स्त्रियांची मुलाखत घेऊन लेखकांनी या सत्यकथा लिहिल्या आहेत. या स्त्रियांना अंडरवर्ल्डचा भाग न म्हणता ‘माफिया क्वीन्स’ असे म्हटले आहे, ते काय हे समजण्यासाठी प्रस्तुत पुस्तक अवश्य वाचावयास हवे.
Ashwini Hingeएक नवीनच वेगळीच माहीती मिळते
Mangesh Nimkar गुन्हेजगतातील महिलांची
सफर आहे मोठी रोमांचक,
घडामोडींचे अन्वयार्थही
मांडले नेमके आणि सुचक॥
Kiran Borkar आतापर्यंत आपल्याला मुंबईच्या अंडरवर्डमधील माफिया माहित आहेत. पण या दुनियेत माफिया राण्याहि होत्या याची कितपत आणि कितीजणांना माहिती आहे . या सर्व राण्यांची रंजक माहिती यापुस्तकात आहे .हाजी मस्तान, कारीमलाला, दाऊद याना एकत्र आणणारी जेनाबाई दारूचा बेकायदा धंदा करणारी ,पोलिसांची खबरी ,दाऊद ची मानलेली आई ,तर मस्तानची मानलेली बहीण ,आणि स्वातंत्रलढ्यात भाग घेतलेली जेनाबाई अशी तिची अनेक रूपे ,तर दुसरी कामठीपुऱ्यातली साम्राज्ञी गंगुबाई ,आपल्या प्रियकराचा खून केला म्हणून दाऊदच्या मागे हाथ धुवून लागणारी सपना उर्फ अशरफ ,सायन कोळीवाडा येथे मादक पदार्थांचा व्यवसाय करणारी महालक्ष्मी ,तसेच अरुण गवळीची पत्नी ,छोटा राजनची पत्नी ,नीता नाईक,तसेच अबू सालेमची पत्नी मोनिका बेदी या सर्वांच्या कहाण्या यात आहेत .मुंबईच्या गुन्हेगारीजगात या स्त्रियांचे एक वेगळेच स्थान आहेत . विशाल भारद्वाज यांची प्रस्तावना असलेले हे पुस्तक आपल्याला मुंबईतील काळ्या जगाची अनोखी सफर घडवून आणते .