- Aparna D P
अतुल कहाते लिखित वॉरन बफे यांच्यावरच हे पुस्तक नुकतंच वाचनात आलं , खरंतर वॉरन बफे या जगातील श्रीमंत माणसाबद्दल खोल माहिती जाणून घेण्याची मला नक्कीच अतिशय उत्सुकता होती. बऱ्याच प्रसार माध्यमांमधून त्यांच्याबद्दलचे लेख ,डॉक्यूमेंट्री ऐकून त्यांच्याबद्दल आपल्याला बरीच माहिती आहे असं वाटत असताना हे पुस्तक हातात पडलं आणि अतुल कहाते यांच्या सोप्या ओघवत्या मराठी लेखन शैलीतून अवतरलेले वॉरन बफे वाचून अवाक व्हायला झालं इतकंच खरं.
गुंतवणुकीच्या क्षेत्रात उत्तुंग यशस्वी असलेल्या या व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्यातील काही नाट्यमय घडामोडी वाचायला नक्कीच आवडतात.
अर्थशास्त्र , गुंतवणूक ,शेअर बाजार या विषयी कणभर ज्ञान आणि कधी आवड नसणाऱ्याला या क्षेत्रात उत्तुंग यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या बफे यांचा प्रवास खिळवून ठेवणारा आहे हे लेखकाचे यश मी मानते.
खरंतर बफे हे अनाकलनीय व्यक्तिमत्व मी म्हणेन
सतत आकड्यांच्या जंजाळात स्वतःला गुंतवून ठेवणारे बफे, आयुष्यात भावनांना महत्व नसणारे बफे, कर्करोगग्रस्त पत्नीची काळजी घेणारे बफे आणि पैसा कमवण्यासाठी आयुष्यभर धडपडणारी ही व्यक्ती त्या पैशाचा कधीही उपभोग न घेणारी व्यक्ती. हे वॉरन यांच्या स्वभावातील विरोधाभास म्हणता येतील पण गुंतवणूक तज्ञ आणि माणूस म्हणून बफे कडून आपण बरंच काही शिकू शकतो असं लेखकाने प्रास्तविकात म्हंटल आहे हे अगदीच मान्य!
अर्थशास्त्र माहिती आणि तंत्रज्ञानाचा गाढा अभ्यास असणाऱ्या अतुल कहाते यांच्या अभ्यासपूर्ण ओघवत्या लेखन शैलीतील वॉरन बफे नव्याने उमगतात.
अतुल कहाते यांनी अशाप्रकारची बरीच अभ्यासपूर्ण माहितीपूर्ण पुस्तकं काही स्वलिखित तर काही अनुवादित स्वरूपात आपल्याला मराठीत उपलब्ध करून दिली आहेत त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार!!
आजच्या चंगळवादी तरुणाईला पैसा खर्च करताना गुंतुवणुकीची जवाबदारी आणि धाडस शिकवणारे वॉरन बफे यांचं हे चरित्र नक्की वाचावे ही मी विनंती करेन.
©अपर्णा…(ADP)
- Kotwal Bhushan
काही दिवसांपूर्वीच आपले "वाॅरन बफे" हे पुस्तक वाचले . वाचून अत्यानंद झाला . तसा मी एकवीस वर्षाचा Science background चा विद्यार्थी ; पण वेळ उपलब्ध असल्यामुळे शेअर मार्केट जाणून घेण्याची इच्छा निर्माण झाली आणि पुस्तकांचा शोध सुरू झाला. त्यातच माझ्या एका मित्राने आपले पुस्तक वाचण्याचा सल्ला दिला . पुस्तक आवडण्याचे कारण असे की हा सर्व भाग Commerce आणि Economics चा आहे आणि हे दोघे खूप अवघड असतात , याची मला कल्पना देखील आहे . एवढे अवघड विषय मला कोणी मराठी भाषेत इतक्या सोप्या भाषेत समजावू शकतो यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही , खरोखरच आपल्या लिखाण कौशल्याला आणि बुद्धिमत्तेला दाद द्यायला पाहिजे . शेअर मार्केट आणि सन्माननीय वॉरन बफे यांचे जीवन चरित्र सोप्या भाषेत लिहिल्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो आणि भविष्यात अशीच पुस्तक लिहून मराठी माणसांचा उत्साह वाढवा . आपल्या पुढील प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा !
आपला नम्र
कोतवाल भूषण
- Pratik Deshmukh
I have Warren Buffett`s biography written by Atul Kahate. I have liked it very much and got very inspired to invest in stock market(long term)
- Nilesh Shinde
वाँरेन बफे एक सामान्य पेपर टाकणारा मुलगा
वयाच्या 11 व्या वर्षी पासून गुंतवणूक क्षेत्रात आला
आणि आज वयाच्या नव्वदीत तो अमेरिकेतील नव्हे तर
जगातील सर्वात श्रीमंत गुंतवणूकदार आहे.
आज त्याच्याकडे संपत्ती 6.4 लाख करोड रूपये आणि
त्यातही कितीतरी कंपन्याची मालकी त्याच्याकडे आहे.
त्याच्या बर्कशायर हँथवे हया गुंतवणूक कंपनीचा एक शेअर
2.16 करोड रूपयाला आहे यावरून कळते की त्याच्या गुंतवणूक पद्धतीवर गुंतवणूकदारांचा किती ठाम विश्वास आहे.
त्याच्या यशाची सूत्र आणि गुंतवणूक पद्धत हया पुस्तकात
सांगितली आहेत
त्याच्या व्हँल्यू इन्व्हेस्टींग सूत्रांची माळ गुंफण्याचा प्रयत्न म्हणजे हे पुस्तक
गुंतवणूकपूर्व सल्ले :
श्रीमंतीचे प्रदर्शन करण्यापेक्षा खरेखुरे श्रीमंत व्हा
आपण कितीही महाग कपडे घेतले,गाडी घेतली तरीही आपण कुणाही श्रीमंतापेक्षा गरिबच वाटणार
कारण हया तुलनेच्या खेळाला अंत नाही
त्यामुळे फक्त गरजांवर खर्च करा अनावश्यक वायफळ खर्च टाळून पैसे वाचवा...आणि आर्थिक असहाय्यतेला नाही म्हणा.....
ज्याचा वाचवलेला पैसा घरात आहे त्यांनी तो बँकेत साठवा
आणि ज्यांचा साठलेला पैसा खात्यात कुजत पडलाय
त्यांनी तो तसाच ठेवण्यापेक्षा गुंतवा.
छोट्या छोट्या गोष्टीत बेपर्वा माणसे मोठमोठ्या गोष्टीमध्ये बेफिकीर आणि बेशिस्त असू शकतात
आणि लोक जितकी बेपर्वाईने वागतील तितकेच आपण स्वतः जबाबदारीने वागले पाहिजे.
माणूस अनुकरणशील प्राणी आहे पण म्हणून इतरांच्या चुकांचे अनुकरण करणे हे पण चुकीचेच होईल
गुंतवणूकदार होण्यापूर्वी :
आपल्या कुटुंबाचा आयुर्विमा ,आरोग्य विमा (क्रिटिकल इलनेस सह) काढलेला असावा
सहा महिन्यांचे उत्पन्न Emergency फंड म्हणून वेगळ्या बँक अकाउंट वर FD सारख्या सुरक्षित पर्यायात गुंतवावेत
जेणेकरुन अडचणीच्या वेळी ते कामाला येतील आणि आपली गुंतवणूक दीर्घकालीन ठेवण्याचे उद्दिष्ट साध्य होईल.
गुंतवणूकदार झाल्यानंतर :
ज्याला वेळेचा आणि ज्ञानाचा अभाव आहे आणि पैशाची सुरक्षितता जास्त महत्त्वाची वाटते त्यांनी कमी नफा असले तरी बाँड किंवा FD मध्ये पैसे गुंतवणूक करावी.
ज्यांची थोडीफार रिस्क घ्यायची तयारी असेल त्यांनी म्युच्युअल फंडात दीर्घकालीन गुंतवणूक करावी
ज्यांना शेअरबाजाराचे जुजबी ज्ञान आहे त्यांनी इंडेक्स फंडात पैसे गुंतवावेत ज्यात सेन्सेक्स निफ्टी लिस्टेड कंपन्याचे शेअर्सच्या प्रमाणानुसार गुंतवणूक केली जाते
ज्यांना अकाउंटसचे आणि शेअर बाजार कसा चालतो याचे मूलभूत ज्ञान आहे त्यांनी इक्विटी शेअर्स मधे गुंतवणूक करावी.
तसेच शेअर बाजारात यशस्वी होण्यासाठी अतिबुद्धिवान किंवा गणितज्ञ असण्याची कुठलीही गरज नाही ब्ल्यूचिप कंपन्यात गुंतवणूक करूनही उत्तम परतावा मिळवता येतो.
Profit loss, Financial Statement विश्लेषण करता येणे पुरेसे आहे. पण तेवढ्यासाठी पण आपण कुणावर तरी विसंबून राहत असू तर एवढेच लक्षात ठेवा
"जो दुसऱ्या वर विसंबला त्याचा कार्यभार संपला"
शेअर बाजार खूप अवघड क्लिष्ट आहे असा काही तज्ञ आणि ट्रेनिंग सेंटरने त्यांच्या स्वतःच्या पोटापाण्यासाठी निर्माण केलेला भ्रम आहे
आणि टीव्ही ,न्यूजपेपर , मासिक यांनी तो भ्रम आणखी जास्त बळकट केला आहे. त्यामुळे माणसाने स्वतःचा नजरिया बदलावा
गुंतवणूक कशी करावी:
दरमहा गुंतवणूकीसाठी रक्कम बाजूला काढायची सवय लावावी
गुंतवणूक करण्यासाठी बाजूला काढलेली रक्कम ही आयुष्यभर फक्त गुंतवणूकीसाठीच वापरावी.
शक्यतो लवकरात लवकर गुंतवणुकीला सुरुवात करावी
जेणेकरून चक्रवाढीचा फायदा आपल्याला भेटेल.
ज्या कंपन्या सातत्याने उत्तम नफा कमावतात. अश्या केवळ 8-10 कंपन्यात दीर्घकाळ म्हणजेच दहा आणि त्यापेक्षा जास्त वर्षासाठी गुंतवणूक करावी आणि निश्चिंत राहावे
हयात काहीच थ्रिल नाही म्हणून इन्स्टंट पैसा कमवायच्या
(Trading , FO, Commodity )मागे धावू नये.
हाव भीती आणि मूर्खपणा हे माणसाचे अवगुण असतात त्यामुळे आपल्या अवगुणांवर मात करायची आणि दुसऱ्याच्या हयाच अवगुणांचा फायदा घ्यायचा
तसाच मत्सर हा ही माणसाचा मोठा दुर्गुण आहे जो माणसाला कायम असमाधानी बनवतो. त्यावर मात करा
आपल्याला कळत नसलेल्या व्यवसायात गुंतवणूक करू नये.
लक्षात ठेवा इथे सबुरीने वागणा-या माणसाला सतत कार्यरत माणसे संपत्ती मिळवून देतात.
जे सेक्टर कायम चालतात आणि भविष्यात ज्यांची मागणी राहील
अशा सेक्टर टाँप कंपन्याची गुंतवणुकीसाठी निवड करावी.
गुंतवणूक करताना Lumpsum रक्कम एकदाच गुंतवू शकता ते पण ज्यावेळी मार्केट करेक्शन मोड वर असेल किंवा ज्यावेळी मार्केट भयभीत असेल आणि डिस्काउंटचे बोर्ड झळकत असतील
किंवा गुंतवणूकीसाठी SIP पद्धतीचा वापर करू शकता ज्यात महिन्याच्या ठराविक तारखेला ठराविक रक्कम ठराविक शेअर्स खरेदीसाठी वापरली जाते.
लक्षात ठेवा गुंतवणूक विषयीचे अज्ञान आणि कर्ज एकत्रितपणे माणसाला डुबवू शकतात त्यामुळे कर्ज काढून गुंतवणूक करू नये
गुंतवणूकीचे निर्णय विचारपूर्वक सर्व पर्याय पडताळून, योग्य सल्लागारांच्या मार्गदर्शनाने करावी.
कारण अविचाराने केलेली खरेदी आपल्याला निश्चिंत झोप देऊ शकत नाही.
सल्लागार निवडताना खूप काळजीपूर्वक निवडावा जो स्वतःच्या कमिशन साठी काम न करता आपल्या हिताला प्राधान्य देईल आणि जेणेकरुन आपले कुठेही नुकसान होणार नाही.
आपले वर्तन हे गुंतवणूकदारापेक्षा उद्योजकाप्रमाणे हवे
वायफळ खर्च टाळणारा ,नियमांचे पालन करणारा,यशाने हुरळून न जाणारा आणि अपयशाने खचूनही न जाता ध्येयाकडे सतत मार्गक्रमण करणारा उद्योजक व्हावे
शेअर मार्केट मध्ये भाकिते करणारे कायम तोंडावर पडतात
100% खात्रीशीर भाकीत कुणीच मांडू शकत नाही.
भाकीत मांडणारे कदाचित आपल्या उतावीळपणाचा फायदा घ्यायला टपले असतीलही
भविष्यातील निरनिराळ्या शक्यताविषयी कुठलेच अंदाज बांधू नये आणि त्यावर आधारित गुंतवणूक ही नकोच. उदा. EV, AI
सार्वमत हे आपल्या विचारांना पर्याय ठरत नाही त्यामुळे सगळेजण एखादा शेअर्स विकताना दिसतात म्हणून आपणही तसेच करू नये.
इतर लोकांची मतानुसार नव्हे तर आपल्या उद्दिष्टानुसार आणि आपल्या अभ्यासानुसार शेअर्स बाबत आपले वर्तन असावे
त्यामुळे एकदा गुंतवणूक केली तीन वर्षानंतरच पोर्टफोलिओत डोकवायचे, त्यातही सर्व गोष्टी योग्य असतील तर गुंतवणूक दीर्घकाळ तशीच ठेवावी.
इथेच रंकाचा राव आणि रावाचा रंक होतो
त्यामुळे फूकटचा माज बाळगू नका
शेअर मार्केट पेक्षा कुणीही मोठे नाही
शेअर्सची किंमत ही कामगिरीनुसार बदलते
ट्रेडिंग मुळे वाढलेली किंमत कधीही खालीही येऊ शकते
बाजारात अधूनमधून वेगवेगळ्या बूम येतात ,पण लक्षात ठेवा हे जास्त काळ टिकत नाही
त्यामुळे दीर्घकाळ टिकणार्या कंपन्या निवडा.
खराब कंपनीचे (Fraud Case) व्यवस्थापन बदलले तरीसुद्धा तिच्याकडे दुर्लक्ष करा.
तेजीच्या काळात सगळ्या चांगल्या वाईट कंपन्या तरून जातात
कंपनी आणि शेअरहोल्डरची खरी कसोटी बाजार भीतीच्या सावटाखाली असताना लागते.
शेअर्स खरेदीचे निर्णय घेण्यापूर्वी कंपनीच्या कामगिरीचा विचार करा. नुसत्या कोरड्या आकडेवारीने किंवा अपूर्ण माहितीने फक्त दिखाव्याला भुलून गुंतवणूक करु नये.
ज्या उद्योगांना सतत भांडवलाची आणि कर्जाची गरज लागते अश्या उद्योगातून परतावा नेहमी कमी मिळतो.
तसेच काही क्षेत्राला वारंवार अडचणी (कच्च्या माल तुटवडा,आर्थिक घोटाळे ) येतात त्या कंपन्या गुंतवून पडू नका.
नफा जरूर कमावयचा पण त्यासाठी अनाठायी धोका पत्करून आपली रात्रीची झोप मात्र गमवायची नाही
घिसाडघाईने चुकीचे गुंतवणूक निर्णय घेउन अडचणीत स्वतःला पाडू नका
शेअर्स विक्रीचे निर्णय घेण्यापूर्वी कंपनीचे भवितव्य आणि कामगिरी याचाच विचार करा. शेअर्स चे भाव कोसळले म्हणून विकू नका. तसेच दीर्घकाळ आपल्या जवळ शेअर्स बाळगले म्हणून घसरणीमुळे नुकसानही सहन करु नका
शेअर बाजारात काय किंवा एकूणच काय ह्रदयापेक्षा मनाला आणि भावनेपेक्षा व्यवहाराला जास्त महत्त्व द्या. कारण बाजार पैशापेक्षा मानसिकतेवर चालतो.
Comments
- Dr Ketan Talmale
Though I`m doctor by profession but I have interest to invest my money in stocks and while in searching for knowledge I came to look in this book. I read this book on The greatest investor of all time Warren Buffett and his biography was amazing that broaden my thoughts and knowledge. So their impact forced me to write this mail right now....
- VENKATESHWARA DEEPAK SUTAR
नमस्कार, मी वेंकटेश्वरा दिपक सुतार पुण्यातून लिहीत आहे. याच वर्षी मी यांत्रिक अभियांत्रिकेचा अभ्यासक्रम पूर्ण केला असून एक कुतूहल म्हणून अर्थशास्त्र आणि आर्थिक बाजारपेठा या विषयांबद्दल जाणून घेण्याचा प्रयन्त करत असतो.
मला पहिल्या पासून अर्थशास्त्रात रस आहे. पण माझ्या शिक्षणाचा मार्ग या विषया पासून काहीसा वेगळा होता. दुर्दैवाने या वर्षी काही अवांछित घटना घडल्या ज्याचा नकारात्मक प्रभाव प्रत्येकाच्या जीवनशैली वरती झाला, त्याच बरोबर स्वतःला वेळ द्यायला मना प्रमाणे वाचायला, ऐकायला, पाहायला किंवा आपले काही छंद असतील ते जोपासायला मात्र नक्कीच वेळ मिळाला असे मला वाटते. माझ्या वडिलांना वाचनाची प्रचंड आवडत असल्याने घरात विविध विषयांवरती शेकडो किंवा त्याहुन हि अधिक पुस्तक आहेत. मी देखील त्यातली काही वाचली आहेत. या लॉकडाउन च्या काळात मी पण पुन्हा मला रस असणाऱ्या विषयाच्या पुस्तकांचा शोध घेत होतो. काही होती पण ती विकत घेता येतील किंवा कोणी देईल अशी तेव्हा परिस्थितीच नव्हती म्हणून जे घरात उपलब्ध होते तेच वाचायला सुरवात केली. ते पुस्तक होते `वॉरन बफे` अर्थातच तुम्ही लिहिलेले. मुखपृष्ठा वरची हि ओळ, "पैशांवर जीवापाड प्रेम करून सुद्धा पैशांची अजिबात आसक्ती न बाळगणारा जगावेगळा माणूस" वाचून संभ्रम झाला. पण जस जसे वाचत गेलो तस तसे त्या वाक्याचा अर्थ अन महत्व समजू लागले. तुम्ही केलेले वर्णन अगदी सोपे आणि प्रत्येक वयातील व्यक्तीला सहज समजेल असे आहे, त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. तुमचे लेखन अगदी प्रभावी आणि स्पष्ट आहे ज्यात वास्तव अगदी विलक्षण पद्धतीने समोर येते.
खरंच हे पुस्तक वाचल्या नंतर आमच्या सारख्या तरुणांना पैसे आणि त्याचे मनुष्य जीवना मधले महत्व या बद्दल ज्या थोड्या नकारात्मक आणि चूकीच्या धारणा आहेत त्यांना सुधारण्याची संधी मिळते. मी तर नक्कीच स्वतःला भाग्यवान समजतो कि हि संधी तुमच्या कुशल लिखाणातून मला मिळाली. मी माझ्या जवळच्या मित्रांना आणि नातेवाईकांना देखील हे पुस्तक आवर्जून वाचण्याचा नक्कीच आग्रह करतो. त्याच बरोबर `सकाळ` मधील `सप्तरंग` मधले तुमचे लेख हि मी आवर्जून वाचत असतो.
तुमचे पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार.
आपला विश्वासू,
वेंकटेश्वरा दिपक सुतार
- Amol Palkar
आजचा दिवस बफे मय आहे कारण आजच एकाच बैठकीत अतुल कहाते लिखित वॉरन बफे हे पुस्तक वाचून पूर्ण केले.
आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये अर्थसाक्षरतेचा खूप मोठा अभाव आहे. mutual fund, share market या सारख्या संकल्पना ची म्हणावी तेवढी जागृकता समाजामध्ये नाही. उलट असलं तर संशयाचं वातावरण आहे .भारतीय शेअर मार्केट मध्ये फक्त लोकसंख्येच्या तीन टक्के लोक आहेत याउलट अमेरिकेमध्ये हेच प्रमाण पन्नास टक्के आहे .
आज सुद्धा भारतीय बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणावर परकीय गुंतवणूकदार गुंतवणूक करत आहे. गेल्याच महिन्यात चीनने भारतीय बाजारात एचडीएफसी मध्ये एक टक्का गुंतवणूक केली त्यानंतर आपल्या सरकारने परकीय गुंतवणुकी संबंधी काही नियमांमध्ये फेरबदल केले.
मराठी माणूस चैन मार्केटिंग मध्ये जास्त विचार न करता आपले पैसे गुंतवले आपल्या मित्रांचे नातेवाईक चे पैसे गुंतवले पण स्वतः अभ्यास करून मार्केट मध्ये पैसे नाही गुंतवत. असो
यासाठी स्व अध्ययन महत्वाचे आहे.दुसऱ्यावर न अवलंबून रहाता वेगवेगळे स्त्रोत वापरून माहिती गोळा करणे,संयम यांचा वापर करणे गरजेचे आहे.
शेअर बाजारामधील गुंतवणुकीसाठी बफे यांना पोषक वातावरण होतं, कारण त्यांचे वडीलच शेअर ब्रोकर होते. तरी सुद्धा सुरुवातीपासून पैसे कमवण्याचे वेड त्यांना होते त्यासाठी किराणामालाच्या दुकानात काम करणे, प्रसंगी वर्तमानपत्र टाकाने अशी कामे सुद्धा त्यांनी केली.. याच कामातून अतिशय कमी वयात त्यांनी स्वतःसाठी एक शेत खरेदी केलं होतं.
बफे यांनी नंतरच्या काळात स्वतःची गुंतवणूक कंपनी काढली आणि आपल्या ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर नफा मिळवून दिला. या पुस्तकात आपल्याला त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीची पण ओळख होते.
इतक्या श्रीमंत माणसाची पत्नी एका स्थानिक क्लब मध्ये गायन करायची.इतकं श्रम प्रतिष्ठेच आणि आपल्या छंदाला महत्व देणार उदाहरण आपल्या समोर येत.
बेंजमिन ग्रॅहम हे त्यांचे गुरू होते त्यांच्या विचारांचा प्रभाव होता.त्यांचा एक संदेश खूप छान वाटला" तुम्हाला आवडणाऱ्या क्षेत्रात आवडणाऱ्या माणसांसोबत काम करा".
अशी अनेक वाक्य आपल्याला या पुस्तकात सापडतात. ब फे गुंतवणूक करताना खूप अभ्यास करून निर्णय घेतात पण एकदा निर्णय झाल्यावर मोठी गुंतवणूक करून मोकळे होतात.
मोठ्या प्रमाणावर पैसा कमवल्या नंतरही तेवढ्याच अलिप्तपणे बिल गेट यांच्या सामाजिक कार्यामध्ये अब्जावधी रुपये दान करतात हेच बफे यांचे वेगळेपण आहे.आपल्या मुलांना ते अतिशय साध्या पद्धतीने वाढवतात. आपल्या श्रीमंतीची जाणीव मुलांना होऊ नये याची दक्षता घेतात इतके श्रीमंत होऊन ही आपल्या गरजा मर्यादित ठेवतात .त्यांचे कपडे, ऑफिस, गाडी ,त्यांचे घर अतिशय साधे आहे. वर्षानुवर्ष त्यात काही बदल झालेला नाही
बफे यांच्या कडून ही गुंतवणुकीचा काही चुका झाल्या.विमान कंपनी मधील गुंतवणूक असेल किवा कापड मिल मधील गुंतवणूक इथं त्यांना नुकसान सहन करावं लागलं.त्याची वेळोवेळी ते कबुली देतात.
पुस्तकाचं सार म्हणजे दीर्घ काल गुंतवणूक,योग्य किंमतीला योग्य वेळी करण. त्यांनी काही शेअर कधीच नाही विकणार अशी घोषणा केली आहे.ईतका संयम नक्कीच बफे यांना खास बनवतो.
शेअर मार्केट मधल्या संकल्पना माहीत नसतील तर पुस्तक वाचताना कंटाळवाणे वाटू शकते तरीही एकदा वाचायला हरकत नाही.
अमोल प्रकाश पालकर
- Rupesh Choudhari
साधी राहणी आणि उच्च विचारसरणी
वॉरन बफेट हा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. मला सुद्धा इतर लोकांप्रमाणे या व्यक्तिमत्वाच विलक्षण आकर्षण फार पूर्वीपासूनच होत. पण ते आकर्षण ही व्यक्ती जगातील श्रीमंत व्यक्ती आहे म्हणून कधीच नव्हत, तर कमावलेल्या संपत्तीचा उपभोग न घेता ते दान करण्याच्या त्याच्या वृत्तीच आणि त्याच्या अतिशय साध्या राहणीमानाच होतं. मी वॉरन बफेट यांच्या बऱ्याच मुलाखती आजवर पाहिल्या आहेत तसेच त्यांच्यावरील अनेक लेख सुद्धा वाचले आहेत. पण त्यांचं लहानपण कस होतं, त्यांच्यावर कोणत्या प्रकारचे संस्कार झाले तसेच त्यांचे आतापर्यंतचे खासगी आयुष्य कसे होते याबद्दल वाचण्याची माझी खूप इच्छा होती. सध्याच्या परिस्थितीत वाचनासाठी बऱ्यापैकी वेळ असल्याने मी वॉरन बफेट यांच्यावरील पुस्तकांचा शोध घेऊ लागलो आणि त्या वेळेस अतुल कहाते यांचं हे पुस्तक माझ्या हाती लागलं.
वॉरन बफेट यांच्या खासगी आणि व्यावसायिक जीवनातून आपल्याला शिकण्यासारखं बरच काही आहे. त्यातील मला आवडलेल्या गोष्टी मी इथे नमूद करू इच्छितो.
१. मला वैयक्तिकरित्या नेहमी वाटतं आपल्या शिक्षण पद्धती मध्ये बचत आणि गुंतवणुक हे दोन आयुष्यात सर्वात महत्वाचे असणारे विषय लहानणापासूनच अभ्यासक्रमात आणून विद्यार्थ्यांना त्यांचे बाळकडू पाजले पाहीजेत. ज्या वयात आपल्याला गुंतवणूक या शब्दाचा अर्थ देखील माहीत नसतो अशा ११ वर्षांच्या वयात वॉरन बफेट यांनी स्वतः कमावलेल्या पैशांतून पहिली शेअर्स मधील आपली यशस्वी गुंतवणूक केली. तरी देखील मला गुंतवणूक करण्यासाठी फार उशीर झाला असं वॉरन बफेट म्हणतात.
२. प्रत्येकाला आयुष्यात गुरूची गरज असते. वॉरन बफेट यांच्या आयुष्यात देखील त्यांना अगदी लहान वयातच बेंजामिन ग्रॅहॅम नावाचा गुरु भेटला. ग्रॅहॅम यांच्या "व्हॅल्यू इंव्हेस्टींग" या तत्त्वाचा वापर करूनच वॉरन बफेट यांनी त्यांची आज वरची सगळी गुंतवणूक केली आहे.
३. वाचन हे प्रत्येक माणसाच्या आयुष्यात क्रांती घेऊन येतं याला वॉरन बफेट देखील अपवाद नाहीत. बेंजामिन ग्रॅहॅम यांच्या "Security Analysis" आणि "The Intelligent Investor" या पुस्तकांनी वॉरन बफेट बरेच भारावून गेले होते. कोणत्या शेअर्स मध्ये गुंतवणूक करावी यासाठी आजही वॉरन बफेट सतत वाचन करत असतात. तसेच बफेट यांना मोठमोठ्या व्यक्तींची आत्मचरित्र देखील वाचायला आवडतात. त्यातून मला खूप प्रोत्साहन मिळतं असं ते म्हणतात.
४. बऱ्याच वेळेस पालक आपल्या मुलांसाठी जास्तीत जास्त संपत्ती कमावून त्यांचं भविष्य सुखकर करण्याचा प्रयत्न करतात. पण हे साफ चुकीचं आहे. वॉरन बफेट म्हणतात तुम्ही तुमच्या मुलांना तितकेच पैसे द्या जेणेकरून ते काहीतरी करतील पण एवढे देऊ नका की ते काहीच करणार नाहीत. ( You should provide them enough money that they would feel they could do something but not so much that they could do nothing). त्याचप्रकारे आपण कमावलेली संपत्ती ही समाजाची आहे आणि ती काही काळासाठी समाजाने आपल्याकडे सुपूर्द केलेली असते. ती पिढ्यान् पिढ्या आपल्याकडे न ठेवता पुन्हा समाजाकडे पोहोचवली पाहिजे जेणेकरून समाजाचा फायदा होईल असे बफेट यांचे उच्च विचार आहेत.
५. वॉरन बफेट व्यवसायात यशस्वी ठरत होते, पण त्याचवेळेस कौटुंबिक जीवनात मात्र ते सपशेल अयशस्वी होत होते. वेळ आणि लक्ष न दिल्यामुळे त्यांची पत्नी सुझी त्यांच्यापासून दूर होतं गेली. व्यवसायाबरोबरच कौटुंबिक जीवन देखील तितकच महत्वाचं असतं हे आपल्यासाठी इथे शिकण्यासारखं आहे.
६. बर्कशायर हाथवे हा कापड निर्मिती व्यवसाय बंद करणे असो किंवा बऱ्याच शेअर्स मधील गुंतवणूक काढून घेणे असो असे बरेच कठोर पण व्यावहारिक निर्णय वॉरन बफेट यांनी आपल्या व्यावसायिक जीवनात अनेकदा घेतले. नुकसानीत असलेला व्यवसाय विनाकारण सुरू ठेवण्यातून कोणाचच भलं होतं नसतं हे ते ठामपणे म्हणत असत. यातून व्यवसायात भावना आणून चालत नाहीत आणि निर्णय हे व्यावहारिक स्वरूपाचेच घ्यावे लागतात हे आपल्याला कळून येतं.
७. वॉरन बफेट यांचं मुख्यालय अतिशय साध आणि छोटेखानी असल्याने बरेच जण त्यांना नेहमी या गोष्टीबद्दल हटकत असत. गरजेपुरतेच कर्मचारी असलेली छोटे खानी कंपनी असली की सगळ्याच कर्मचाऱ्यांना आपला वेळ आपल्याच सहकाऱ्यांच व्यवस्थापन करण्यात घालवण्यापेक्षा प्रत्यक्ष व्यवसायामधील कामे करण्यात वापरता येतो असं बफेट यांचं अत्यंत प्रामाणिक मत होतं. बरेच व्यावसायिक इतरांना दाखवण्यासाठी किंवा मोठेपणा मिरवण्यासाठी म्हणून मोठं कार्यालय घेतात आणि लवकरच त्याचा स्थिर खर्च (fixed cost) न परवडल्याने त्यांना व्यवसायामध्ये तोटा सहन करावा लागतो किंवा व्यवसाय बंद करण्याची वेळ येते. हे टाळण्यासाठी आपलं कार्यालय गरजे इतकंच मोठं आणि साधं ठेवाव हा धडा आपल्याला मिळतो.
८. डॉटकॉम च्या उदयाच्या वेळेस सर्व गुंतवणूकदार संगणक आणि दूरसंचार या क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक करत असताना बफेट मात्र आपल्या नेहमीच्या शैलीत च इतर कंपन्यांमध्ये गुंतवणूक करत होते. त्याचं म्हणणं एकदम सोपं होतं ज्या क्षेत्रातलं मला कळत नाही त्या क्षेत्रात मी गुंतवणूक करणार नाही. ज्या क्षेत्रातलं आपल्याला ज्ञान नाही त्या क्षेत्रात आपण उतरू नये किंवा त्या क्षेत्राचा पूर्ण अभ्यास करूनच आपण त्या क्षेत्रात उतरावं ही आपल्यासाठी शिकवण आहे.
९. वॉरन बफेट यांचा कडून काही चुकीचे निर्णय देखील घेतले गेले ज्यामुळे त्यांना खूप तोटा देखील सहन करावा लागला. पण त्यामुळे ते तिथेच थांबले नाहीत तर त्या चुकांमधून शिकून ते पुढे जात राहिले.
१०. वॉरन बफेट यांच्या सगळ्याच गुंतवणूक या दीर्घ कालावधीसाठी असतात. या मधून व्यवसाया मध्ये संयम खूप महत्वाचा असतो ही जणू शिकवणच ते आपल्याला देतात.
काही जणांना खेळण्याची आवड असते तर काहींना अभ्यासाची ओढ, काहींना संगीताची गोडी तर काहींना अभिनयाच वेड त्याचप्रमाणे माझ्या मते वॉरन बफेट यांना आपल्या ज्ञानाचा वापर करून पैशांची गुंतवणूक करणे आणि ती वाढत असताना पाहणे यामध्ये आनंद मिळतो. पण त्या पैशांचा उपभोग न घेता त्यातील अधिकाधिक पैसे समाजासाठी दान करणे याला ते आपलं कर्तव्य समजतात. वॉरन बफेट यांच्यामधील कलागुणांमुळे मला वरील शीर्षक "साधी राहणी आणि उच्च विचारसरणी" अगदी योग्य आणि साजेस वाटलं.आपलं आयुष्यातल यश कसं मोजाव याची व्याख्या अतिशय उद्बोधक पणे वॉरन बफेट यांनी सांगितली आहे. त्यानेच मी इथे शेवट करतो -
"आपल्याला ज्या सगळ्या लोकांनी आपल्यावर प्रेम करावं असं वाटतं, त्यापैकी जास्तीत जास्त लोकांनी खरंच आपल्यावर प्रेम केलं तर आपलं आयुष्य यशस्वी समजावं."
अशा या पैशांवर प्रेम करणाऱ्या पण पैशांची अजिबात आसक्ती न बाळगणाऱ्या अवलियाला आणि त्याच्या ज्ञानप्रतिभेला माझा त्रिवार प्रणाम!
अभिप्राय,
रुपेश चौधरी
- Vishal Ugale
मी तुमचं वॉरेन बुफे हे पुस्तक वाचले खूप मस्त लिहले आहे. एवढे चांगले पुस्तक तुम्ही मराठी मध्ये उपलब्ध करून दिले याबद्दल मी तुमचा आभारी आहे
- DEEPAK GAIKWAD
Today I read your BOOK WARREN BUFFET. This book is very good. This book has given me huge knowledge of Share Market as well as Shri. Warren Buffet.
- गणेश बगल २४ june २०१८
आपला पैसा आपल्या साठीच चोवीस तास काम करत असेल तर या पेक्षा काय भारी असणार . शेयर मार्केट कडे आजही जुगार म्हणून पाहिल्या जात पण योग्य अभ्यास केला आणि धीर धरत गुंतवनुक केली तर ५-६ लाखा मागे वर्षाला दोन एक लाख म्हणजे १०-२० हजार रुपये महिना नक्कीच
हे पुस्तक ज्याच्यावर आहे तोहि यातूनच प्रसिद्ध झाला आहे . अच्युत गोडबोले किंवा अतुल कहाते असतील यांची पुस्तक वाचन म्हणजे विकिपीडिया किंवा ७-८ इंग्रजी पुस्तकांच एकत्र अनुवाद केल्या सारख असत . त्यामुळे माहित भर पडण्यासाठी वाचा नक्की आवडले .
वाचायला हरकत नाही
- ROHIT PAWAR
वॉरेन बुफ्फेत्त बुक खूप छान लिहिली आहे .अतिशय कमी शब्दात संपूर्ण त्यांच्या जीवनाची मांडणी केली आहे आणि खास करून त्यांनी दिलेली सोपी आणि स्पस्ट अशी गुंतवणुकीची सूत्रे आपण ह्या पुस्तकात दिलेली आहे.आपले स्टिव्ह जॉब्स सुद्धा फार सुंदर मराठी बुक आहे.आपल्याकडून अजून अश्याच वेगळ्या विषयांची पुस्तके वाचाव्याची आहे .अतिशय कमी शब्दात संपूर्ण त्यांच्या जीवनाची मांडणी केली आहे.आपले स्टिव्ह जॉब्स सुद्धा फार सुंदर मराठी बुक आहे.आपल्याकडून अजून अश्याच वेगळ्या विषयांची पुस्तके वाचाव्याची आहे .मराठी मध्ये स्टॉक मार्केट वर अजूनही माहितीविषयक पुस्तक नाही आहे.तरी आपण मा.अच्युत गोडबोले सरांबरोबर एक मराठी मधले उत्तम स्टॉक मार्केट वर लिहावे अशी नम्र विनंती.
- Aadesh Kondhare
आपण लिहिलेलं वॉरेन बफे यांचे चरित्र वाचनात आले.
मराठी माणसांसाठी मराठी मधून एका विलक्षण माणसाची कहाणी आपण मराठी वाचकांसाठी उपलब्ध करून दिलीत त्याबद्दल आभार.
हे चरित्र वाचून माझ्या मनामध्ये share मार्केट बद्दल असलेल्या चुकीच्या संकल्पना दूर झाल्या आणि महत्वाचे म्हणजे आपला मराठी माणूस उद्योजकीय क्षेत्रामध्ये मागे का आहे हे जाणवले.....धन्यवाद...आभार....
- NEWSPAPER REVIEW
बफेच्या मनोहारी विधानांची भेट...
लेखक अतुल कहाते आणि मेहता पब्लिशिंग हाऊसने वॉरन बफे या जगप्रसिद्ध गुंतवणूकदारानं मिळवलेल्या अफाट यशाची आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्याची ओळख त्याच्या व्यक्तिचरित्रातून मराठी वाचकांना करुन दिली. बफेच्या चरित्राचे आणखी वेगळे पैलू ‘वॅरन बफेच्या यशाचे 50 मंत्र’ पुस्तकातून वाचकांना उमजतील.
बफेच्या व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वपूर्ण पैलू म्हणजे त्याच्या गुंतवणुकीच्या संदर्भातल्या अत्यंत मार्मिक विधानांचा आणि मार्गदर्शनाचा. कुठल्याही माणसानं अनेक गोष्टी त्यातून शिकाव्यात अशा प्रकारची मनोहारी विधानं त्यांनी केलेली आहेत. एक-दोन वाक्यांमध्ये त्यानं आपल्या गुंतवणुकीच्या यशाचं सार अनेकदा सांगितलं आहे. तसंच सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी शेअर बाजाराचं गूढ सहजपणे उलगडून त्यात मोठी झेप कशी घ्यायची, यासाठीचं मार्गदर्शनही केलं आहे. मुख्य म्हणजे अगदी मजेशीर आणि कुणालाही समजेल अशा भाषेमधल्या दिलखुलास विधानांच्या आधारे त्यानं हे साधलं आहे. त्याचा हा मंत्र या पुस्तकातून वाचकांना आत्मसात करता येईल.
बफेचं प्रत्येक विधान खूप विचारांमधून, अनुभवांमधून आणि यश-अपयश यांच्या हिंदोळ्यांवर तरंगल्यानंतर तयार झालेलं आहे. पण त्याची ही विधान अनेक ठिकाणी विखुरलेली आहेत. त्यांचा एकत्रित संग्रह प्रथमच या पुस्तकात पहायला मिळेल. बफेंच्या अशा विधानांची संख्या तीन आकडी असली तरी त्यामधली नेमकी ५० विधानं निवडण्याचा प्रयत्न इथं केला आहे. विधान गुंतवणुकीशी किंवा एकूणच आयुष्याशी संबंधित असलं पाहिजे, अगदी सर्वसामान्य माणसाशी ते निगडित असलं पाहिजे आणि ते वाचून आपण काहीतरी नवं शिकलो अशी भावना त्याच्या मनात आली पाहिजे, हा हेतू या विधानांच्या निवडीतून स्पष्ट होतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ५० विधानांचा इथं नुसता उल्लेख नाही. प्रत्येक विधानामध्ये दडलेला बफेचा विचार आणि काही वेळा खोडसाळपणा उलगडून दाखवण्याचा प्रयत्न पुस्तकात करण्यात आलेला आहे.
एकूणच वॉरन बफेनं गुंतवणुकीच्या विश्वाला `ग्लॅमर` मिळवून दिलं. ‘गुंतवणूक म्हणजे जुगार नसून, नीट अभ्यास करून शांतपणे दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करणा-या माणसाला शेअर बाजारात यश मिळतंच,’ असा आत्मविश्वास त्यानं दिला आहे. अगदी छोट्या रकमांच्या गुंतवणुकीतूनसुद्धा अवाक करून सोडणारं यश गुंतवणूकदार शेअर बाजारात मिळवू शकतात, हे सत्य भारतीय गुंतवणूकदारांच्या पुरतं पचनी पडलेलं नाही. शेअर बाजार आणि गुंतवणूक यांच्याविषयी गैरसमजच जास्त पसरले आहेत. यामुळे आपण आपलंच किती नुकसान करून घेतो याची कोट्यवधी लोकांना कल्पना नाही. यावरचं उत्तर म्हणजे हे पुस्तक आहे. मेहता पब्लिशिंग हाऊसने नेहमीप्रमाणेच पुस्तकनिर्मितीचा दर्जा उत्तम राखला आहे. त्यामुळे वाचनाचा आनंद आणखी वाढतो.
- RAMESH SHAH
तुमचे वाॅरन बफेवरिल पुस्तक वाचले. अतिशय छान पुस्तक आहे.
- Abhijeet Jadhav
i love this book... i learn many things about life and investments ... Hatts off Warren sir ... and Thanks for Atul kahate and Mehta publication for made this book for marathi people...