Vijay Bhadaneमी वाचलेले पुस्तक
नोबेल ललना
लेखिका :-- मीरा सिरसमकर
प्रकाशक:--मेहता पब्लि.हाउस.पुणे
★★★★★★
तेजशलाका नोबेल ललना
ग्रंथ संपदा भरपूर असलेल्या वाचनालयात एखादे जुने पुस्तक अचानक हाती पडते मात्र ते वाचनात आल्यावर काहीतरी वेगळे व सकस वाचल्याचा आनंद प्राप्त होतो.किस्त्रीम मासिकाच्या उपसंपादिका,लेखिका,कवयित्रीं,गणित,विज्ञान विषयतज्ञ श्रीमती मीरा सिरसमकर यांनी लिहिलेले व नोव्हेम्बर 2008 साली प्रकाशित झालेले " नोबेल ललना " हे अद्वितीय पुस्तक मला असाच वाचनानंद देउन गेले.
जगदमान्य अशी ओळख असलेला अग्रमानांकित,सर्वश्रेष्ठ व सर्वोच्च असा नोबेल पुरस्कार विविध क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याने प्राप्त झालेल्या जगातील 36 मान्यवर स्रियांवरील " नोबेल ललना" लेखिका मीरा सिरसमकर अतिशय परिश्रमपूर्वक लिहिला.सुरुवातीला 2006 पासून 2008 पर्यंत लेखिकेने स्त्री मासिकात लेखमाला या स्वरूपात काही नोबेल विजेत्या स्रियांची माहिती प्रसिद्ध केली.परंतु मेरी पीएर क्यूरी, त्यांची कन्या आयरिन क्यूरी,पर्ल बक,मदर तेरेसा या ज्ञात अशा मोजक्या नोबेल पारितोषिक विजेत्या व्यतिरिक्त उर्वरित सर्वच नोबेल विजेत्या स्रियांचे कार्यकर्तुत्व मराठी जनतेला ज्ञात व्हावे म्हणून लेखिकेने हे पुस्तक लिहिण्याचे ठरविले.त्यात अनेकांचे प्रोत्साहन,सहकार्य लाभले.लेखन करताना पाश्चिमात्य संदर्भ ग्रंथ वापरावे लागले.अहोरात्र वाचन,लेखन करत असताना इंटरनेटवरून माहिती गोळा करण्यात लेखिका व्यस्त होती.पाश्चिमात्य देशातील 1950 पूर्वीच्या सामाजिक,राजकीय संदर्भाचा अभ्यासमय उल्लेख या पुस्तकात आहे.त्या कालखंडात विविध क्षेत्रात अफाट कार्यकर्तुत्व केलेल्या या कर्तबगार महिलांच्या ज्ञानमय माहितीपट पुस्तकात शब्दबद्ध झाला आहे. आपल्या कार्यक्षेत्रात स्वतःला झोकून देऊन,प्रतिकुलतेवर मात,करून,अविरत मेहनत घेउन आपले स्वप्न साकारणाऱ्या,ध्येय साध्य करणाऱ्या व त्यातून जगाचे कल्याण साधणाऱ्या या जिद्दी, बुद्धिवादी वीरांगनाचे कार्य इतके अमोल आहे की अनेकांना त्यापासून कृतीशीलतेची प्रेरणा,स्फूर्ती मिळावी.
स्वीडनमधील स्टॉकहोम येथे 1833 साली दजन्मलेले जगदविख्यात रसायनशास्त्रज्ञ सर आल्फ्रेड नोबेल यांनी वैज्ञानिक संशोधनातून जी संपत्ती कमावली तिचा विनियोग नोबेल पारितोषिकात करण्याचे ठरविले.जगातील जात,धर्म,देश विरहित जे शास्रज्ञ,संशोधक,विचारवंत,साहित्यिक,शांतिदुत हे समस्त मानव जातीच्या विकास व कल्याणस्तव आपल्या क्षेत्रात भरीव कार्य करतील,त्यायोगे मानव जातीचा उद्धार होईल व वैश्विक बंधुभाव,सामंजस्य,शांतता प्रस्थापित होईल त्यांना दरवर्षी 10 डिसेंबर आल्फ्रेड नोबेल यांच्या पुण्यतिथीला हा पुरस्कार प्रदान केला जातो.रसायनशास्त्र,भौतिक शास्त्र,वैद्यकीय, शरीर शास्त्र,साहित्य,शांतता,व अर्थशास्त्र या क्षेत्रात अतुलनीय कार्य केलेल्यांना नोबेल पुरस्कार दिला जातो.2008 पर्यंत जगातील ज्या 36 महिलांना हा नोबेल पुरस्कार प्रदान झाला आहे त्यांची ओळख व त्यांनी केलेले कार्य त्याचा समावेश या पुस्तकात झाला आहे.
विजय रघुनाथ भदाणे
नाशिक
सौ. आभा राजेन्द्र घाणेकर, बुरुमतळीनोबेल ललना हे आपलं पुस्तक वाचून धन्य वाटलं. हे पुस्तक लिहिताना तुम्ही किती वाचलं असेल? अनेक ठिकाणांहून माहिती कशी मिळवली असेल? असे प्रश्न पडले. सह्याद्री वाहिनीवर तुमची मुलाखत पाहिली, ऐकली. हे पुस्तक लिहिण्यासाठी जे कष्ट घेतले ते अनमोल आहेत.
या सगळ्या नोबेल ललनांचं कार्य-कर्तृत्व वाचून, मुख्यत: या पुस्तक लिखाणासाठी आपण घेतलेले कष्ट पाहून मनाला उभारी मिळाली. एक संदर्भ ग्रंथ म्हणून `नोबेल ललना` महत्त्वाचे आहे.
जया साहेबराव वाघमारे, अमरावती`नोबेल ललना` हे स्फूर्ती देणारे मूर्तिमंत असे आदर्श पुस्तक आहे. त्याहीपेक्षा पुस्तकातील शब्दरचना ही थेट हृदयाला स्पर्श करून स्फूर्ती देते. एक जगण्याची जिद्द, आयुष्यात काहीतरी करून दाखविण्याची प्रेरणा यातून मिळते. पुरस्कार प्राप्त स्त्रियांनी जी काही मेहनत घेतली त्याचे इतके सूक्ष्म अध्ययन तुम्ही केलेत, त्याचेच मला आश्चर्य वाटते. ह्या स्त्रियांना इतके जवळून पाहताना मला मी स्त्री असल्याचा अभिमान वाटतो. मला कथा-कादंबऱ्यांपेक्षाही वास्तववादी व सत्य घटनांवरील पुस्तके वाचायला फार आवडते. कल्पनेत रमत बसण्यापेक्षाही वास्तवाचा सामना करायला व वास्तव जाणून घ्यायला मला फार आवडते.
येणाऱ्या अनेक पिढ्यांना तुमच्या पुस्तकाचे वाचन करण्याचे भाग्य लाभो हीच देवा चरणी प्रार्थना करते.
सौ. विनया वाळिंबे, पुणे सौ. मीरा सिरसमकर यांनी नोबेल ललना हे पुस्तक अत्यंत नीटनेटके लिहिले असून आकर्षक आहे.
LOKPRABHA 10-04-2015 प्रेरणादायी नोबेल कथा...
जगात सर्वोच्च समजले जाणारे नोबेल पुरस्कार १९०१ पासून दिले जातात. २०११ पर्यंत ८२६ व्यक्ती आणि २० संस्थांना हा पुरस्कार मिळाला आहे. मात्र महिलांची संख्या आहे केवळ ४३. महत्वाचे म्हणजे २००० साला पर्यंत केवळ तीसच स्त्रियांना हा पुरस्कार मिळाला होता. पण २०००नंतर हे प्रमाण पुढील ११ वर्षातच वाढले आहे.२००४ साली तीन स्त्रियांना एकाच वेळी हा सन्मान लाभला. तर २००९मध्ये एकदम पाच स्त्रियांना आणि २०११ मध्ये तीन स्त्रियांना नोबेल देण्यात आले.थोडक्यात काय तर नव्या शतकात स्त्रियांना
संधी मिळाल्यावर स्त्रियांच्या कर्तृत्वाने अनेक क्षेत्रात आपली छाप उमटवल्याचेच हे द्योतक म्हणावे लागेल. कर्तबगारीची शिखरे गाठणाऱ्या या स्त्रियांची कहाणी ही सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. विविध संदर्भग्रंथ आणि माध्यमांतून त्यांची माहिती मिळवून त्याची छाननी करून अतिशय सोप्या शब्दात लेखिकेने या साऱ्या कथा नव्या
पिढीसाठी उलगडल्या आहेत.
SAMANA 25-01-2008जागतिक पातळीवर विविध क्षेत्रांत असामान्य कार्य करणाऱ्यांना इ.स. १९०१ पासून ‘नोबेल’ पुरस्कार दिले जातात. अशा सर्वौच्च कीर्तीवंताचे जीवनकार्य मानवाला कमालीचे प्रेरक ठरते. लेखिका मीरा सिरसमकर यांनी या अनुषंगाने नोबेल पुरस्कारप्राप्त ३४ महिलांची यशोगाथा आखीवरेखीव स्वरूपात पण साक्षेपीपणाने कथन केल्याचे जाणवते. नियतकालिकात पूर्वप्रसिद्ध झालेल्या या ‘नोबेल’ मालिकेचे पुस्तकात रूपांतर करताना लेखिकेने पुनर्लेखन करून लेखांना साजिरेगोजिरे असे साक्षेपी स्वरूप दिल्याची ठळक नोंद घेतली पाहिजे. हा पुरस्कार आजतागायत (१९०१ ते २००७) एकूण १०७ वर्षांच्या कालखंडात ७७७ व्यक्ती आणि २० संस्थांनी पटकावला असून त्यामध्ये केवळ ३४ महिलांचा (४.४ टक्के) समावेश असल्याचे लेखिकेचे निरीक्षण पुरेसे बोलके ठरेल. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, वैद्यकीय, साहित्य, अर्थशास्त्र आणि शांतता अशा क्षेत्रांमध्ये अजोड कार्य करून मानवजातीला प्रकाशमान करणाऱ्यांना पुरस्कार देण्याची योजना आल्प्रेâड नोबेल या धनाढ्य वैज्ञानिक दानशूराने अमलात आणली. रसायनशास्त्रज्ञ नोबेल यांनी १८६४ मध्ये ‘डायनामाईट’ नामक स्फोटक तयार केले अशी माहिती या पुस्तकात सापडते. इटलीत या शास्त्रज्ञाचे निधन झाले. त्यांनी ३१ दशलक्ष स्वीडिश क्रोनर एवढी रक्कम या पुरस्कारासाठी ठेवली. वैज्ञानिक, विचारवंत, संशोधक, शांतिदूत, साहित्यिक आणि अर्थतज्ज्ञ यांनी निसर्गातील गूढ उकलून मानवजातींची उन्नती करावी आणि त्यायोगे मानवी जीवन सुखीसंपन्न करावे अशी संकल्पना या पुरस्कारामागे आहे. अर्थतज्ज्ञांना १९६९ पासून हा पुरस्कार दिला जातो आणि हा पुरस्कार मरणोत्तर दिला जात नाही याची दखल लेखिकेने घेतली आहे. नोबेल पुरस्काराचे स्वरूप आणि निवडपद्धती यांचीही माहिती संक्षिप्तपणे दिली आहे. भौतिकशास्त्रज्ञ सर विल्यम्स लॉरेन्स ब्रॅग हे केवळ पंचविसाव्या वर्षी या पुरस्काराचे मानकरी ठरले. फ्रेडरिक सँगेर, जॉन बॅरडिन, लिनस पॉलिंग आणि एकमेव महिला वैज्ञानिक मेरी क्युरी यांना दोन वेळा हा पुरस्कार मिळाला. रविंद्रनाथ टागोर, चंद्रशेखर वेंकटरामन, हरगोविंद खुराणा, मदर तेरेसा, सुब्रह्यण्यम चंद्रशेखर आणि अमत्र्य सेन या सहा हिंदुस्थानीयांनी हा पुरस्कार पटकावला.
लेखिकेने ‘नोबेल ललनां`ची माहिती जमवताना मेहनत घेतली असून त्यांचा संग्रह करताना सूत्रबद्ध मांडणी केल्याचे जाणवते. ही माहिती केवळ संग्रहित पातळीवरची नाही तर वास्तविक व भावनिक सूत्राचा अवलंब करून ती शब्दाविंâत केली आहे. ‘नोबेल’ महिलांचे बालपण, शिक्षण, संशोधन, जीवनविज्ञान अडथळ्यांची पर्वत मालिका, यशोगाथा, मानवी विश्वाला झालेला लाभ, संबंधित महिलेची प्रतिक्रिया इ.इ.ची नोंद लेखिकेने केली आहे. त्याचबरोबर लेखिकेने त्यासंदर्भात तत्कालीन जनमतांसह स्व-मत यांचे संक्षिप्त स्वरूपात खंडणमंडण केले आहे. परिणामत: ‘इथून तिथून जमवलेली ढोबळ माहिती’ असे साचेबंद स्वरूपाचे हे लेख झालेले नाहीत हे आवर्जून सांगितले पाहिजे. पर्ल बक, नेली सॅक्स, आयरिन क्युरी, लिंडा बक, टॉनी मॉरिसन, मदर तेरेसा, शिरिन इबादी इ. महिलांची माहिती थक्क करणारी आहे.
लेखिकेने विशिष्ट असे भावसूत्र अवलंबिल्यामुळे हे पुस्तक केवळ माहितीपर व मनोरंजक झालेले नाही. नोबेल-महिलांना पूर्वायुष्यात प्रतिकूल परिस्थितीत जीवघेणा संघर्ष करून, बहिष्कृत आयुष्य कंठून आपले संशोधनकार्य तडीस न्यावे लागले. तसेच पुरूषसत्ताक समाजरचनेशी लढा द्यावा लागला याची माहिती थक्क करणारी आहे. स्वयंप्रज्ञा, स्वप्रकाशरूपा अशा या प्रज्ञावंत महिलांची जीवनगाथा प्रेरणादायी ठरावी. शालेय शिक्षणदेखील धडपणे पूर्ण करू न शकलेल्या ११ महिला या ‘नोबेल कशा गाठू शकल्या’ ही अविश्वसनीय पण वास्तव गाथा मूळातूनच वाचावी अशी आहे. शालेय शिक्षण सुद्धा पूर्ण न झालेल्या ११ ‘नोबेल’ महिलांची यशोगाथा मूळातूनच वाचली पाहिजे.
असामान्य प्रतिभेचे वरदान लाभलेल्या या यशवंत महिलांनी केलेला त्याग, त्यांच्या संशोधनाचे लक्षणीय स्वरूप, कथा-कादंबऱ्यांचे अलौकिकत्व, वर्णभेद, दारिद्र्य, लिंगभेद, छळवाद, कौटुंबिक समस्या इ.इ.ची नोंद करताना लेखिकेने काही साहित्यिकांचे-कवितांचे संदर्भ उद्धृत करून संबंधित लेख नेटकेपणाने उंचावले आहेत. शालेय जीवनात आणि व्यावहारिक पातळीवरसुद्धा अत्यंत संग्राह्य, वाचनीय आणि मौलिक ठरावे असे हे पुस्तक आहे, असे माझे प्रांजळ मत आहे. ‘नोबेल’ महिलांची छायाचित्रे, सुबक छपाई, सुखद मुखपृष्ठ आणि सुयोग्य मांडणी ही ठळक वैशिष्ट्ये भावतात.
(परेन शिवराम जांभळे)
SAKAL PUNE 08-02-2009नोबेल ललनांची ओळख…
अमृता रावण
नोबेल... रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, वैद्यकिय, साहित्य, शांतता आणि अर्थशास्त्र या विषयांमध्ये भरीव कामगिरी करणाऱ्यांना दिला जाणारा जगातला सर्वोच्च सन्मान. १९०१ पासून आतापर्यंत हा सन्मान जगातील ७७७ व्यक्ती आणि २० संस्थांना देण्यात आला आहे.
मात्र यामध्ये स्त्रियांची संख्या आहे केवळ ३४. यातील मेरी क्यूरी, मदर तेरेसा, आँग सान स्यू की अशा काही मोजक्या स्त्रिया सोडल्या, तर इतर कोणाबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते. त्यामुळेच वाचकांना या सर्व जणींच्या कार्यकर्तृत्वाची माहिती व्हावी या उद्देशाने माधुरी सिरसमकर यांनी नोबेल पारितोषिक विजेत्या स्त्रियांची माहिती सांगणारी मालिका ‘स्त्री’ मासिकातून प्रसिद्ध केली होती. त्यांचे हे सदर ‘नोबेल ललना’ या पुस्तकाच्या रूपाने मेहता पब्लिकेशन हाऊस ने प्रकाशित केले आहे.
तत्कालिन सामाजिक परिस्थितीशी झगडून, आपल्या विचारांशी ठाम राहून यशाचे शिखर गाठलेल्या या प्रत्येक स्त्रीचे कर्तृत्व अफाट आहे. त्याचा आढावा एकाच पुस्तकातून घेणे ही खरं तर अतिशय कठीण गोष्ट आहे. मात्र माधुरी सिरसमकरांनी तत्कालीन सामाजिक, राजकीय संदर्भासकट या सर्व जणींचे कार्य शब्दबध्द केले आहे.
साधारणपणे १८५० ते १९५० या शतकात जन्मलेल्या या स्त्रिया आहेत. या काळात पाश्चिमात्य देशांतही मुलींना शिक्षणाची फारशी मुभा नव्हती. पुरूषप्रधान समाजव्यवस्थेमुळे स्त्रियांना अनेक संधी नाकारल्या जात होत्या. अशा परिस्थितीत या सर्व स्त्रियांनी जिद्द, इच्छाशक्ती, कामावरील अविचल निष्ठा या गुणांमुळे आपापल्या क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी केली.
वैद्यकीय क्षेत्रात नव्र्ह ग्रोथ पॅâक्टरचा शोध लावणाऱ्या इटलीच्या रीटा लेवीला उच्च शिक्षण घेण्यास तिच्या वडिलांनी विरोध केला होता. कर्करोगावर औषध शोधणाऱ्या डॉ. इलियन गटुर्ड यांनी विद्यापीठाची फी भरण्यासाठी अनेक छोट्या मोठ्या नोकऱ्या केल्या. साहित्यात नोबेल मिळविणाऱ्या अकरा जणींपैकी खूप थोड्या जणींना उच्च शिक्षणाची संधी मिळाली होती. मात्र यातील कोणत्याही अडचणींचा त्यांच्या कामावर परिणाम झाला नाही.
या सगळयाच जणींचा हा जीवनपट एकाच पुस्तकातून मांडण्याचे अवघड काम सिरसमकरांनी केले आहे. काही काही वेळेस मात्र या पुस्तकाचे स्वरूप माहितीवजा झाले आहे. अर्थात ते तसे होणे हे स्वाभाविकही आहे. एक मात्र नक्की, या पुस्तकातून या चौतीस तेजस्विनींशी झालेला अल्प परिचय आपल्याला वाढवावासा वाटतो आणि त्यांच्याविषयी अधिक जाणून घ्यावेसे वाटते, हे या पुस्तकाचे यश आहे.