- DAINIK LOKMAT 06-07-2003
कल्पना चावलाच्या जिद्दीची कहाणी...
पहिली भारतीय अंतराळवीर स्त्री म्हणून कल्पना चावला हिचा सर्वच भारतीयांना अतिशय अभिमान वाटतो. १ फेब्रुवारी २००३ रोजी कोलंबिया यान पृथ्वीकडे येत असताना अपघात झाला आणि कल्पनासह सर्व अंतराळयात्री ठार झाले. जमिनीपासून सुमारे साठ किलोमीटर उंचीवर असताना ही दुर्घटना घडली. त्याची प्रत्येक भारतीयाला हळहळ वाटली. चावला हिच्या व्यक्तिमत्त्वाने भारावून जाऊन लेखिका माधुरी शानभाग यांनी तिची जीवनकहाणी ‘स्वप्नातून सत्याकडे’ या छोटखानी पुस्तकात शब्दबद्ध केली. अगदी अल्प कालावधीत त्यांनी इंटरनेट वृत्तपत्रे, साप्ताहिकांतून आलेले तपशील यांच्या आधारे ६० पानांचे हे पुस्तक ‘कर्नाल ते केप कॅनव्हेरोल’, ‘निळ्या नभाच्या पलीकडे’ आणि ‘त्यानंतर...’ अशा तीन प्रकरणात विभागले आहे.
“स्वप्नाकडून सत्याकडे जाणारा मार्ग अस्तित्वात आहे. फक्त तो शोधायची दृष्टी आणि धैर्य, तुमच्या अंगी असायला हवे,” असे २५ जानेवारी २००३ रोजी कोलंबिया अवकाशयानातून पाठविलेल्या संदेशात कल्पनाने म्हटले होते; आणि “अवकाशात प्रचंड वेगाने त्या पोकळीत फिरण्यामधली रोमांचकता मला पुन:पुन्हा अनुभवाविशी वाटते. मृत्यू सतत आपल्या आसपास घोटाळत असतो; पण तो सर्वत्र आहे आणि धोका पत्करणे, हा आमच्या कामाचा एक भाग आहे. कोणत्याही आनंदाची किंमत कशा ना कोणत्या रूपात द्यावीच लागते,” असे एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत तिने म्हटले होते. तिच्या अंगी असलेली धीरोदत्त वृत्ती यातून दिसून येते; पण तिच्या मृत्यूबद्दल हळहळही वाटतेच.
कर्नाल येथे पंजाबी कटुंबात जन्मलेल्या कल्पनाला बालपणपासूनच विज्ञानाची आवड होती. टागोर बालनिकेतन शाळेत हुशार विद्यार्थिनीमध्ये तिची गणना होत असे. तिचा मोठा भाऊ कर्नालच्या फ्लइंग क्लबमध्ये जात असे, त्यामुळे कल्पनालाही आपण वैमानिक व्हावे, असे वाटे. त्यानुसार पंजाब अभियांत्रिकी महाविद्यालयात तिने मिळविलेला प्रवेश, त्यानंतर उच्च शिक्षणासाठी तिने टेक्सास विद्यापीठात मिळवलेला प्रवेश... जीन पियरे या फ्रेंच तरुणाकडून अमेरिकेत तिने विमान चालवण्याचे प्रशिक्षण घेतले. १९८४ मध्ये त्याच्याशीच लग्न केले. १९८८ मध्ये डॉक्टरेट पूर्ण करून ‘नासा’मध्ये संशोधन विभागात तिला नोकरी मिळाली, येथपर्यंतचा प्रवास पहिल्या प्रकरणात आला आहे. त्यानंतर नासातील प्रशिक्षण, पहिली कोलंबिया मोहीम यांची तांत्रिक माहिती वगैरे सर्व तपशील दुसऱ्या प्रकरणात येतात. हे सर्व तपशील लेखिकेने संकलित करून नेटकेपणाने मांडले आहेत. त्यातून कल्पनाची बुद्धीची झोप, जिद्द, चिकाटी यांचे दर्शन घडते. पुढील भागात १६ जानेवारी २००३ला कोलंबिया अवकाशात झेपावले; पण त्याआधी तिला करावी लागलेली तयारी, या मोहिमेत नेमून दिलेले, सुरळीतपणे तिने पार पाडलेले प्रयोग या सर्वांची माहिती दिली आहे. आणि शेवटी ती दुर्घटना. पहिल्या भारतीय अवकाशयात्रीला आपण मुकलो. भारतालाच नव्हे, तर साऱ्या जगाला तिचा अभिमान वाटावा आणि येणाऱ्या पुढच्या पिढ्यांनाही. विज्ञाननिष्ठ पिढीची विज्ञाननिष्ठ पिढींच्या निर्मितीसाठी ती सतत स्फूर्ती देत राहील. असा आशावादहही व्यक्त केला आहे. तिसऱ्या प्रकरणात कल्पनाचा मृत्यू ही क्षणिक लाट न ठरता स्त्रियांना आणि पुरुषांनाही डोळसपणे आजूबाजूला पाहायला लावावे. कल्पनाचे आयुष्य, तिची धडपड, चिकाटी नव्या पिढीपर्यंत पोहोचायला हवी. समाजाला विज्ञानभिमुख करण्यासाठी कल्पना चावला ही प्रवृत्ती लोकांसमोर विशेषत: नव्या पिढीसमोर सतत राहायला हवी, हेच तिच उचित स्मारक ठरेल, असा आशावाद लेखिकेने व्यक्त केला आहे. प्रत्येक घर या पुस्तकाचे स्वागत व्हायला हवे. अत्यंत आटोपशीर असे चरित्र लिहून लेखिकेने चरित्रांच्या पुस्तकात भर घातली आहे.
-डॉ. मंदा खांडगे
- MAHARASHTRA SAHITYA PATRIKA JAN - FEB 2006
धगधगते अग्निकुंड ...
अंगावर शहारे आणणारी कल्पना चावलाची उत्कंठावर्धक कहाणी. २१व्या शतकाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या तरुणाईला प्रेरणादायी ठरेल असे माधुरी शानभाग यांचे हे पुस्तक. आपल्या अंतरातला स्फुलिंग पेटता ठेवून त्यावर जगणाऱ्या राखेला प्रयत्नवादाच्या आणि बुद्धिवादाच्या फुंकरीने उडवून लावणाऱ्या कल्पनाच्या व्यथांची ही कथा! कुणाचाही आदर्श समोर नसताना, किरण बेदीचा दुर्दम्य आशावाद, इंदिरेची झळाळणारी जिद्द, जे. डी. ची ईर्षा यांचा एकेक प्रकाश कण वेचून कल्पना त्याचा धु्रवतारा बनवते.
स्वप्नाकडून सत्याकडे कल्पनाने जी खडतर वाटचाल केली त्याचे उत्कंठावर्धक चित्रण लेखिकेने केले आहे. तिच्या वृत्तीचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवावा, असे हजारो पालक आपल्या पाल्यांला यापुढे सांगतील. येणाऱ्या पिढ्यांपुढे एक आदर्श ‘रोल मॉडेल’ म्हणून स्वत:ला सिद्ध करणाऱ्या कल्पनाचे हे धगधगते अग्निकुंड! तिच्यापासून स्फूर्ती घेऊन विज्ञाननिष्ठ पिढी निर्माण होईल, असा विश्वास वाटतो.
कल्पनाच्या व्यक्तिमत्त्वाचा पाया जरी भारतात घातला गेला तरी तिचे कर्तृत्व फुलले ते अमेरिकेत. कल्पनासारखे भारतीय जेव्हा परदेशी जाऊन उज्ज्वल यश मिळवितात, तेव्हा आपण ते भारतीय असल्याचा अभिमान व्यक्त करतो. कल्पनाने जो विज्ञानवाद जोपासला, प्रयत्नवाद आणि परिश्रमाची वाट धरली ती प्रसिद्धी व पैसा देणारी नव्हती. तेव्हा कल्पनाचा मृत्यू ही क्षणिक लाट न ठरता स्त्री-पुरुषांनी डोळसपणे आजूबाजूला पाहावे. गल्लीबोळात नवी देवळे उभी राहण्यापेक्षा अभ्यासमंडळे आणि प्रयोगशाळा उभ्या राहाव्यात.
१९४७च्या भारत-पाक आणि नंतर फाळणीपासून ते २००३ माधुरी शानभाग यांनी कर्नल ते केपकॅनव्होराल या भागात कल्पनाच्या जन्मापासून ते नासाच्या कॅलिफोर्नियातील अमेन्स रीसर्च सेंटरमध्ये संशोधक म्हणून काम करताना कल्पनाने घेतलेल्या गरुडभरारीचे त्रोटक पण अचूक चित्रण केले आहे. ‘वैâसी’ या नावाने अमेरिकेत ओळखली जाणारी, निळ्या नभाच्या पलीकडे झेपावणारी ‘आय अॅम कल्पना चावला फ्रॉम कर्नाल इंडिया’ म्हणत भारताविषयी सार्थ अभिमान बाळगणारी आणि १९९७ या दिवशी ‘कोलंबिया’मधून अवकाशात झेप घेणारी ‘पहिली भारतीय अंतराळ स्त्री’ म्हणून लेखिकेने कल्पनाची करून दिलेली ओळख उल्लेखनीय आहे.
‘कोलंबिया’चे अवकाशात उड्डाण जितके महत्त्वाचे त्यापेक्षा अंतराळ यात्रीचे प्रशिक्षण अधिक महत्त्वाचे आणि धोकादायक असते. त्यांचे उतरणे, अंतराळ यात्रीचे प्रशिक्षण, कोलंबियाचा ताशी २८,००० कि.मी. असलेला वेग, खास पोशाख, उड्डाणाच्या वेळीचा प्रचंड वेग आणि शरीरावर चार गुरुत्वाकर्षणाएवढा असलेला दाब हे सारेच लेखिकेने तरलपणे उभे केले आहे. पुढे यानाची गती २८,००० कि.मी. इतकी झाल्यावर यान आडवे होऊन अवकाशात पृथ्वीभोवती फिरायला सुरुवात होते. पृथ्वीभावेती घिरट्या घालून १६ दिवसांनी ते परतणार होते, परंतु जडत्वाच्या गुणधर्मामुळे फिरणारे यान त्याच गतीने फिरत राहते. लेखिकेचे समाजभान येथे प्रकट झाले असून त्यांनी केलेली सुरक्षा निरीक्षणे हे त्यांचे द्योतक आहे. अंतराळातील वर्णने रोमहर्षक केली असून अविस्मरणीय बनली आहेत. त्यामुळे ही वर्णने वाचकाच्या आंतरमनाचा ठाव घेणारी बनतात.
उड्डाणाची वेळ अमेरिकेत पहाटेची होती. भारतात त्यावेळी रात्र होती. पहिल्या झटक्याला प्रचंड वेगामुळे माणसाच्या रक्तप्रवाहावर परिणाम होतो. त्या वेगाशी जुळवून घेताना रक्तदाबात अनियमित चढउतार होतात त्यासाठी जमिनीवर अशा वेगाचा सराव करावा लागतो. अंतराळवीर जेव्हा जमिनीवर असतात तेव्हा शरीरातील पाणी गुरुत्वाकर्षणामुळे पायाच्या दिशेने वाहते. अवकाशात आल्याबरोबर गुरुत्वाकर्षण नाहीसे होते. त्यामुळे पाणी सर्व शरीरावर साठून सर्वांगावर, विशेषत: चेहऱ्यावर सूज येते.
१९ नोव्हेंबर १९९७ ते ५ डिसेंबर १९९७ असे १६ दिवस कल्पना ‘कोलंबिया’ यानात अंतराळात होती. त्या काळात त्यांनी पृथ्वीभोवती २५२ फेऱ्या मारल्या. ३७६ तास ३४ मिनिटे ती अवकाशात राहिली. सुमारे १ कोटी कि. मी. अंतर त्यांनी काटले. पृथ्वीपासून १५० कि. मी. उंचीवर होते. १६ जानेवारी २००३ साली ‘ए.ऊ.ए.१०७’ या कोलंबियाच्या दुसऱ्या फेरीसाठी तिची निवड होते. तेव्हा परत प्रशिक्षणासाठी नासाच्या वेगवेगळ्या विभागात काम करावे लागते. त्यामुळे पुढे ढकललेली भारत भेट रद्द होते.
कल्पनाला अवकाशात जाण्यासाठी कोणकोणत्या दिव्यांतून जावे लागले याचे तपशीलवार वर्णन लेखिकेने केले आहे. तिला अभिनिवेश किंवा आत्मप्रौढी बिलकुल नव्हती. समोरच्या तरुणींना तिने, ‘आपल्या स्वप्नाचा पाठपुरावा करा, त्यांना कधीही विसरू नका.’ एक दिवस ते सत्यात उतरते. असा संदेश तिने दिला. तिचा हा उपदेश नसून अनुभवाचे बोल वाटावेत असा प्रामाणिकपणा त्यात होता. दुसऱ्या उड्डाणाच्या वेळी या फेरीची ती कमांडर होती. प्रमुख आणि फ्लाईट इंजिनिअरच्या खुर्चीत बसलेली होती.
यानात पाण्याने अंघोळ करता येत नाही. कारण पाण्याचा फवारा पडत नाही आणि तांब्या उलटा केला तर पाणीही पडत नाही. ओल्या सुगंधी टॉवेलने अंग पुसणे हीच अंघोळ सर्वांत कठीण काम म्हणजे मलमूत्र विसर्जन. ती एक कसरतच असते. कारण गुरुत्वाकर्षण नसल्याने काहीही खाली पडत नाही. द्रव पदार्थ स्ट्रॉने ओढून प्यावे लागतात.
नियोजित वेळेआधी ६१ मिनिटे कल्पनाने कोलंबियाचा ताशी २८,००० कि.मी. असलेला वेग कमी केला. परतीच्या प्रवासाला सुरुवात झाल्याचा संदेश पृथ्वीवरील नासाच्या नियंत्रण कक्षाला पोचला गती कमी करताना त्याची दिशा बदलून पृथ्वीपासूनची उंची कमी करण्यात आली. तेव्हा साधारण ऑस्ट्रेलियावर कुठेतरी ‘कोलंबिया’ने वातावरण प्रवेश केला. नियोजन वेळेआधी फक्त १६ मिनिटे कोलंबियाचा आणि कक्षाचा संपर्क तुटला. तेव्हा कोलंबिया जमिनीपासून सुमारे ६० कि.मी. अंतरावर होते. लुझियानातील लोकांना स्फोट झाल्याचा मोठा आवाज ऐकू आला आणि श्वास रोखून नियंत्रण कक्षात बसलेल्या नासाच्या वरिष्ठ तंत्रज्ञानां ‘कोलंबिया’ जळून नष्ट झाल्याची बातमी जाहीर करावी लागली. कल्पना जीवनाला पारखी झाली. भारतभेटीचे स्वप्न स्वप्नच राहिले. ‘मरावे परी किर्ती रूपी उरावे’ कल्पनाच्या मृत्यूने हे शब्द खरे करून दाखविले. भव्य यश मिळवून ती परत आली असती तर...!
कल्पना चावलाचे आयुष्य, तिची धडपड, चिकाटी व तिचा प्रयत्नवाद लेखिकेने उत्कटपणे मांडला आहे. समाजाला विज्ञानभिमुख करण्यासाठी कल्पना चावला ही प्रवृत्ती नव्यापिढी समोर ठेवण्याचा लेखिकेचा प्रयत्न स्तुत्य वाटतो.
-प्रा. डॉ. शिवाजीराव पाटील
- DAINIK LOKSATTA 06-04-2003
फ्रॉम द पॉइंट ऑफ नो रिटर्न...
कल्पना चावला हे नाव स्मरताच प्रत्येक भारतीयाच्या मनात दु:खाची एक तरी लकेर चमकून जाते. यापुढेही जात राहील. या दु:खाला सार्थ कौतुकाभिमानाची झालर आहे. केवळ या जगातच नव्हे, तर संपूर्ण विश्वावर तिने आपल्या नावाची मोहर उमटवली. १ फेब्रुवारी २००३ च्या रात्री झालेल्या कोलंबियाच्या अपघातानं सारं विश्चच हळहळलं. पंजाबातल्या एका लहानशा शहरगावात जन्माला आलेल्या या आकाशकन्येची कहाणी माधुरी शानभाग यांनी रोचकपणे मांडली आहे.
फाळणीमुळे विस्थापित व्हावं लागलेल्यांमध्ये चावला कुटुंबही होतं. जगण्यासाठी वाटेत तिथे पाय रोवून उभं राहण्याची जिद्द फाळणीतल्या विस्थापितांनी दाखवलीच. त्याच संस्कारावर आपल्या परिश्रमांचा साज चढवून कल्पनानं थेट अंतराळात पाऊल टाकलं. कल्पनाचं बालपण अन्य कोणत्याही भारतीय मुलीपेक्षा वेगळं नव्हतं. तिच्या वेगाच्या वाऱ्याच्या, साहसाच्या वेडाला (भारतीय संस्कृतीत नेहमी होतो तो) विरोध झालाच. एरोस्पेस इंजिनीयरिंगसारखा अभ्यासक्रम, परगावी आणि पुढे परदेशी शिक्षण या सगळ्यांसाठी तिला घरच्यांच्या मिनतवाऱ्या कराव्या लागल्या. रूढ अर्थानं तिचं कुटुंब आधुनिक जीवनशैली अनुसरणारं नव्हतं. ‘भारतीय स्त्री’ या संकल्पनेमध्ये अनुस्यूत असणारे सारे अडथळे तिला पार करावे लागले. मात्र या अडचणींचा कल्पनाने कधी बाऊ केला नाही. उलट भारतीय असल्याचा, एकत्र कुटुंबपद्धतीचा तिला नासाच्या निवडचाचण्यांमध्ये फायदाच झाला. व्यक्तिस्वातंत्र्याचे अतिरिक्त लाड पुरवण्याची मागणी करणाऱ्यांनी हे ध्यानात घ्यायला हवं. त्यामुळेच कदाचित कल्पनाने भारतीय भूमीशी असलेले संबंध शेवटपर्यंत टिकवून ठेवले होते. त्याच्या मनस्पर्शी कहाण्या या पुस्तकात वाचायला मिळतात.
दर नव्वद मिनिटांत एक पृथ्वीप्रदक्षिणा (एक दिवस एक रात्र) घालण्याने उद्भवणारा त्रास, अवकाश मोहिमांची पूर्वतयारी, तत्संबंधी तांत्रिक बाबींची सोप्या शब्दांत माहिती लेखिकेने दिली आहे. कल्पनाने अवकाशातून पाहिलेल्या पृथ्वीचे केलेले वर्णन तिच्या वृत्तीतील लालित्याचा, सौंदर्याच्या ओढीचा पुरावाच आहे. रूक्ष संशोधनाच्या मुखवट्याआडचा कल्पनाचा हसरा चेहरा या पुस्तकानं वाचकांसमोर मांडला आहे.
डॉ. आनंदीबाई जोशी या परदेशात जाऊन डॉक्टर होणाऱ्या पहिल्या भारतीय महिला, डॉ. कमला सोहोनी या पहिल्या भारतीय महिला संशोधक, कल्पना चावला ही पहिली भारतीय अंतराळवीर... ही मालिका ‘पहिली’ या क्रमांकाच्या पुढे नेणं, हेच कल्पनाचं खरं स्मारक ठरणार आहे, हे लेखिकेचं मत वाचकाला अंतर्मुख करतं.
- DAINIK PUDHARI 31-08-2003
आकाशाला गवसणी घालण्याची स्वप्ने पाहणारी आणि ती स्वप्ने सत्यात उतरावित म्हणून जिद्दीने प्रयत्नांची पराकाष्ठा करणारी आदर्श भारतीय अवकाशकन्या कल्पना चावलाची ही जीवनकथा प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक भारतीयास अभिमानस्पद वाटावी अशीच आहे. ‘स्वप्नाकडून सत्याकडे’ ही कल्पना चावलाची कहाणी माधुरी शानभाग यांनी खूप श्रम घेऊन समर्थपणे लिहिली आहे. कल्पनाला दुर्दम्य जीवनेच्छेचा, चिवट वृत्तीने झुंजत राहायचा वारसा तिच्या आई वडिलांकडून मिळाला होता. तिच्या वडिलांची जिद्द थेट तिच्या रक्तात उतरली होती. कल्पना लहानपणापासूनच हूड होती. बाहेरच्या जगात रमणारी होती. ती हट्टी होती, जिद्दी होती. भातुकलीच्या खेळात रमण्यापेक्षा चेहऱ्यावर वाऱ्याचे सपकारे घेत सायकलवरून रपेट मारण्यात तिला आनंद वाटे. शाळेत ती भरतनाट्यम, कराटेही शिकली. खेळात अनेक बक्षिसे तिने मिळविली होती. शाळेत असताना एकदा तिने एक मोठे पोस्टर बनविले होते. त्यात अवकाश यान, विमान, ग्रह-तारे होते. तिचा भाऊ मला पायलट व्हायचे आहे असे म्हणायचा. अवकाशात उडण्याचे बीज तेथेच कल्पनाच्या डोक्यात पेरले गेले. विरोध होत असतानाही तिने चंदीगडच्या पंजाब इंजिनिअरींग कॉलेजात प्रवेश घेतला. तिने हट्टाने ‘एरॉनॉटिक्स’ विषय घेतला होता. मध्यमवर्गीय शीख कुटुंबात राहणाऱ्या कल्पनाची झेप अवकाशाकडे होती. तिने पंजाब विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला. पुढे ती शिकायला अमेरिकेस गेली. १९८८मध्ये आपली डॉक्टरेट पूर्ण झाल्यानंतर तिने अवकाशात जायच्या प्रयत्नांची आखणी करावयास सुरुवात केली. वयाच्या तिशीनंतर कल्पनाने नासाच्या संशोधन विभागातून अवकाशयात्री विभागात प्रवेश मिळविला. पुढे तिची निवड झाली. तिने त्यासाठी अनेक कसोट्या दिल्या. तिने जिद्दीने प्रशिक्षण घेतले आणि कोलंबिया अवकाशयान उड्डाणासाठी सज्ज झाले. कल्पना चावला पहिली भारतीय अवकाश कन्या ठरली. तिने आपल्या पृथ्वीचे, सूर्यमालेचे निरीक्षण केले. नवीन अनुभव घेतले. १९ नोव्हेंबर १९९७ ते ५ डिसेंबर १९९७ या काळात तिच्या यानाने २५२ पृथ्वी प्रदक्षिणा काढल्या होत्या. तिची मोहीम सफल झाली होती. ती आपल्या जन्मभूमीला कधीच विसरली नव्हती. २००३ साली कोलंबियाच्याच अवकाश यात्रेसाठी तिची फेरनिवड झाली होती. १६ जानेवारी २००३ रोजी तिचे अवकाश यान अवकाशात झेपावले. अवकाश यान परत येताना पृथ्वीच्या वातावरणात घुसल्यानंतर तापमान नियंत्रणाबाहेर गेले. प्रचंड दाब वाढला. कोलंबिया जमिनीपासून केवळ ६० कि.मी. अंतरावर असताना त्याने पेट घेतला. अनेक तर्कविर्तक झाले. हसतमुख कल्पनाची भरारी कायमची विसावली होती. कल्पना चावलाची ही कहानी विद्यार्थ्यांना, स्त्रियांना नक्कीच आदर्श वाटावी अशी आहे. स्वप्नाकडून सत्याकडे जाण्याचा मार्ग खडतर असतो, पण त्यातून यश प्राप्त होते याची साक्ष येथे पटते. अनेक बारकाव्यासह आपल्या समर्थ लेखणीने माधुरी शानभाग यांनी कल्पनाची सत्यकथा सांगितली आहे. अनेक महत्त्वपूर्ण चित्रामुळे पुस्तक समृद्ध झाले आहे.
-ज्ञानेश्वर म. कुलकर्णी
- MAHARASHTRA TIMES 18-05-2003
‘केसी’ची कहाणी...
नासाच्या कोलंबिया यानाने अंतराळात झेप घेतली त्यावेळी अमेरिकेच्या अंतराळ संशोधन प्रकल्पातील एक स्वप्न जसे पूर्ण झाले तशीच ‘केसी’चीही स्वप्नपूर्ती झाली. या क्षणासाठी केसीने किमान तीन दशके वाट पाहिली होती. नासाच्या अंतराळ संशोधन प्रकल्पात संशोधक म्हणून रुजू झालेल्या व सगळे सहकारी केसी नावाने ओळखणाऱ्या या व्यक्तीचे नाव कल्पना चावला.
पहिली भारतीय महिला अंतराळवीर असा गौरव मिळवणाऱ्या कल्पनाचा ‘कोलंबिया’ला झालेला दुर्दैवी अपघातात हृदयद्रावक अंत झाला आणि पंजाबातल्या कर्नाल या छोट्याशा गावामधील या तडफदार, कर्तृत्ववान तरुणीचे नाव इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदले गेले.
लहानपणापासून आकाशात उडण्याचे अशक्य वाटणारे स्वप्न मनात जोपासलेल्या कल्पना चावलाने कठोर परिश्रमांनी प्रत्यक्षात उतरवले. कल्पनाच्या या देदीप्यमान व आश्वासक वाटचालीचे शब्दचित्र रंगवणारे माधुरी शानभाग यांचे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. केवळ अंतराळच नाही तर कोणत्याही क्षेत्रातले असे भव्य स्वप्न उरी बाळगणाऱ्या तरुण पिढीपुढे आदर्शवत ठरवलेल्या कल्पनांची जीवनगाथा सांगणारे माधुरी शानबाग यांचे ‘स्वप्नातून सत्याकडे’ हे पुस्तक अशा स्वप्नाळूंना प्रोत्साहन देणारे आहे.
फाळणीचे भीषण चटके सहन केलेल्या बनारसीलाल चावला यांच्या कुटुंबात जन्मलेल्या कल्पनाच्या यशोगाथेचा तपशील देताना शानभाग यांनी तिच्या मनोवस्थेचे अत्यंत समर्पक चित्रण केले आहे. हे पुस्तक अतिशय कमी वेळात लिहिले गेले आहे. हे स्पष्टच आहे. कारण एक फेब्रुवारी २००३ रोजी कोलंबिया’ला अपघात झाला आणि अवघ्या महिनाभरात हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. कल्पनाच्या बालपणापासूनच्या वाटचालीची माहिती अतिशय सहज सोप्या भाषेत परंतु वाचकाला खिळवून ठेवेल अशा रीतीने शानभाग यांनी दिली आहे.
कल्पनाला नेहमीच सहकार्य करणारे तिचे वडिल. तिचा आदर्श असलेला भाऊ संजय. तिचे शाळा-महाविद्यालयातील सोबती, शिक्षक, अमेरिकेत गेल्यानंतरचे खडतर आयुष्य. उच्च शिक्षण, नासात मिळावलेला प्रवेश तेथील अविश्रांत मेहनत, जीन पियरे हॅरिसन ऊर्फ जेपी या अमेरिकन तरुणाशी झालेला परिचय. त्याच्याकडून घेतलेल विमान उडवण्याचे प्रशिक्षण. अंतराळ मोहिमेसाठी झालेली निवड असा कल्पनाचा सगळा प्रवास लेखिकेने या छोट्याशा पुस्तकात उत्तमरित्या समाविष्ट केला आहे.
कल्पनाची ही सगळी वाटचाल सांगितल्यानंतर अखेरच्या प्रकरणात शानभाग यांनी केलेले चिंतन अधिक महत्त्वाचे आहे. कल्पना ही एक इतिहासात जमा झालेली व्यक्ती न राहता विज्ञानवाद, प्रयत्नवाद आणि परिश्रमवादाची प्रवृत्ती म्हणून समाजाच्या स्मरणात राहण्याची गरज लेखिकेने प्रतिपादिली आहे.
स्वप्नाकडून सत्याकडे जाणारी वाट खरोखरच अस्तित्वात कशी आहे हे जाणून घेण्यासाठी हे पुस्तक वाचायलाच हवे.
-तुषार नानल
- DAINIK TARUN BHARAT 25-05-2003
कल्पनाभरारीचा वेध...
स्वप्नातून सत्याकडे... ही माधुरी शानभाग लिखित कल्पना चावलाची कहाणी विलक्षण प्रेरणादायी आहे. जगाच्या नकाशावर तिचे नाव झळकले त्यामागे तिचे अंतराळ-वीरांगना होण्याचे बालपणापासूनचे स्वप्न, त्या स्वप्नपूर्ततेसाठी ध्यास घेऊन अविरत प्रयत्न, कष्ट हे सारे आहे. मुळात भारतात जन्मलेल्या, मध्यमवर्गीय कुटुंबातल्या, पारंपरिक विचारांच्या घरातल्या मुलीने वैमानिक व्हावे, अंतराळात उड्डाण करण्याचे स्वप्न पाहावे हाच चमत्कार. पण वातावरणाला भेदून जाण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती, साहस तिच्या रक्तातच होते. तीव्र बुद्धिमत्तेला परिश्रमांची, निरीक्षणशक्तीची जोड, विनम्र वृत्तीने ज्ञानग्रहण, सूक्ष्म संवेदनशीलता, रसिकता या सगळ्यांचा मिलाफ तिच्यामध्ये असल्यामुळेच एक हसरी, निगर्वी, संयत अभिरुचीसंपन्न व्यक्तिमत्त्वाची कल्पना चावला आयुष्यात मोठे यश संपादन करू शकली. भारतीय स्त्री किती उंच झेप घेऊ शकते याचे लखलखते उदाहरण तिने समस्त स्त्रीवर्गापुढे ठेवले.
या पुस्तकात कल्पनाचे अल्प चरित्र आहे. अवकाश संशोधनाच्या टप्प्यापर्यंत तिचा अभ्यासक्षेत्रातील प्रवास ‘नासा’मध्ये तिने मिळविलेले स्थान याबरोबरच वैज्ञानिक माहितीही थोडक्यात दिलेली आहे. अवकाशमोहिमेची आखणी कशी केली जाते, अवकाशयान कसे असते, तिथे कोणत्या सुविधा असतात, संरक्षणाची व्यवस्था कशी असते, अवकाशयानाच्या वेगाचे परिणाम, गुरुत्वाकर्षण विरहित अवस्थेत नित्य क्रिया पार पाडण्यासाठी दिले जाणारे प्रशिक्षण इ. माहिती वैज्ञानिक कुतूहल जागृत करणारी आहे.
पण कल्पनासारख्या व्यक्ती आपली वाट आपण शोधतात हेही खरेच. तिच्यापुढे कोणी आदर्श स्त्री नव्हती. भारतरत्न जे.आर.डी. टाटा यांनी भारतात विमान प्रवासाचा पाया घातला. ते तिचे आदर्श होते. राकेश शर्मा ‘सोयुझ’ या अवकाशयानातून अंतराळात जाऊन आलेले तिला ठाऊक होते. तिने स्वत:च्या स्वप्नपूर्तीसाठी स्वत:ला झोकून दिले. भारतीय स्त्रीची ही गगनभरारी खरोखरच अभिमानास्पद आहे. परंतु या पुस्तकाच्या शेवटच्या प्रकरणात नोंदवलेला विचार भारतीयांनी अंतर्मुख व्हावे असाच आहे. कल्पना भारतात राहिली असती तर तिने इतकी प्रगती साधली असती का? लेखिकेने या प्रश्नाचे उत्तर ‘नाही’ असे दिले आहे.
अवकाशातून संदेश पाठविताना तिने म्हटले होते - ‘इथून पृथ्वी फार कोवळी, नाजूक वाटते. वातावरणाचा विरळ पडदा तिने ओढणी ओढावी तसा तलम वाटतो. पृथ्वीचे आणि माझे नाते इथून मला अधिक दृढ झाल्यासारखे वाटते.’ कल्पनाशी भारतीयांचे नाते अधिक दृढ झाले ते तिच्या कर्तृत्वाने! तिची ही प्रेरणादायी कहाणी माधुरी शानभाग यांनी उत्कट पण साध्या, सोप्या, धावत्या शैलीत कथन केली आहे.
तिचे अल्प जीवनचरित्र, तिचे व्यक्तिमत्त्व, तिचे संशाधेन, त्यातील अडचणी, तिला मिळालेला कुटुंबीयांचा, फ्रेंच पतीचा पाठिंबा या सगळ्यांचे चित्र रेखाटलेले आहे. सर्व मराठी वाचकांनी विशेषत: तरुण-तरुणींनी हे पुस्तक अवश्य वाचावे.
अतिशय वेधक, माहितीपर तरीही भावपूर्ण, अंतर्मुख करणारे हे छोटेखाली पुस्तक मेहता पब्लिशिंगने अतिशय तत्परतेने वाचकांच्या हाती दिले आहे. मुखपृष्ठावरील कल्पनाचे हसरे, उमदे छायाचित्र लक्षवेधी आहे. मलपृष्ठ आतील रेखाटनही छान आहेत.
-डॉ. मेधा सिधये
- DAINIK SAMANA (KOLHAPUR) 27-04-2003
एक फेब्रुवारी २००३ रोजी झालेल्या कोलंबिया अवकाशयान दुर्घटनेतील कल्पना चावलाच्या अकाली मृत्यूमुळे पूर्ण हिंदुस्थानला हळहळ वाटली. एखाद्या उल्केप्रमाणे ती क्षणार्धात निखळून पडली. प्रत्येक हिंदूस्थानी व्यक्तीला अभिमान वाटावा अशी कामगिरी तिने केली. या दुर्घटनेनंतर बहुतेक सर्व वृत्तपत्रांमधून तिच्यावर भरपूर माहितीपूर्ण लेख प्रसिद्ध झाले. इंटरनेटवरही भरपूर माहिती उपलब्ध होती. या सर्व माहितीच्या अधारे माधुरी शानभाग यांनी ‘स्वप्नाकडून सत्याकडे...’ हे कल्पनाचे चरित्र लिहिले आहे. ताऱ्यांकडे झेपावताना तिने ‘स्वप्ने पाहा आणि ती सत्यात आणा’ हा संदेश देशवासीयांना दिला होता. तिच्या चरित्राचे शीर्षक या संदेशातूनच घेतले असावे. फाळणीनंतर पाकिस्तानातून हिंदूस्थानात आलेले चावला कुटुंब अतिशय खडतर परिस्थितीत दिल्लीपासून १२५ कि.मी. वरील कर्नाल या गावी स्थायिक झाले. या कुटुंबात १९६१ मध्ये जन्मलेली कल्पना लहानपणापासूनच सर्वसामान्य मुलींपेक्षा वेगळी, धाडसी, जिद्दी होती. आकाशात उडण्याचे स्वप्न ती शाळेपासून पाहत होती. जिद्दीने तिने ते स्वप्न कसे पूर्ण केले याची अनेकांच्या मनात प्रकाशाचे कण पेरणारी ही कहाणी आहे.