सुनीता गोपाळ कृष्णन - जानेवारी २०२१ आदरणीय
डॉ. अनिल गांधी सर मी श्रीमती सुनीता गोपाळ कृष्णन. `मना सर्जना` हि एका प्रामाणिक तज्ञ सर्जन डॉक्टरांची आत्मकथा आहे. लहानपणी ठरवलेले ध्येय आयुष्याच्या प्रवाहात घेतलेले कष्ट कौतुकास्पद आहेत. गरीब गरजू लोकांविषयी हि तळमळ हि अंडीवाल्यामधून (पांगोळीची सेवा) दिसून येते.
डॉक्टरांचे वाईट अनुभव सातत्याने अनुभवायला येतात, पण तुमच्यासारखे प्रामाणिक डॉक्टर मिळणे हे रुग्णाचे भाग्य मानावे लागेल. हुंड्या बाबतची तुमची ठाम मते किंवा कमाईतील विशिष्ट रक्कम दान करण्याविषयीची तुमची मते खूपच भावतात.
समाजात काजवे असंख्य आढळून येतात` सूर्य मात्र एकच असतो आणि त्या निर्गवी सूर्यासारखे तुमचे हे कार्य दिसून येते.
अशा सर्जनाची समाजाला नितांत आवश्यकता आहे.
D. S Patil, Dharangaonपितृतुल्य आदरणीय डॉ गांधीजी,
सस्नेह चरणस्पर्श....
माझ्या सर्जरी च्या निमित्ताने आपली ओळख झाली आणि एक पुरोगामी विचारसरणी,संस्कारक्षम व्यक्तीमत्वाचा झरा ,आदर्श पिता,डॉक्टर ,
समाज भिमुख व्यक्तिमत्व ची ओळख झाल्याचा आनंद झाला आहे.
कृपया, मी आपणावर स्तुती सुमने उधळत आहे असे समजू नये .
सर्जरी चे निमित्ताने आपल्याशी वेळोवेळी झालेला संवाद आणि मना सर्जना या पुस्तकातून झालेली आपल्या व्यक्तिमत्त्वाची ओळख ... यातून माझ्या भावना प्रकट होत आहेत .
सर,जिद्द चिकाटी आणि ध्येय निश्चित असेल तर कोणत्याही परिस्थितीत यशाचे शिखर गाठता येते शिवाय मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने कसे करावे याचा आदर्श , मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपण आहात.आपल्या वरील संस्कार आणि स्वतहाला असलेल्या जाणिवेतून शिवाय जिज्ञासा ,स्पष्ट ,सत्य जोपासण्याची ऊर्मी असेल तर मदतीचे हात पुढे येतात.हे निश्चितच आहे .माणसाला जिद्द ,मेहनतीची तयारी असेल तर परिस्थिती आडवी येत नाही हा आजच्या तरुणांना आपण आदर्श दिलेला आहे .
यशाचे अतिउच्च शिखर गाठले असताना देखील , " ठेविले अनंत तैसेचि राहावे चित्ती असू द्यावे समाधान "
या उक्ती प्रमाणे आपण जगत आहात.
आपल्यातील सामाजिक कार्याची जाणीव तर अत्यंत प्रेरणादायी आहे फार कमी लोक अशा प्रकारचे समाजकार्य करतात भिल्ल आदिवासी,समाजाच्या नागरिकांची आरोग्य सेवा,शिक्षणासाठी आश्रमशाळा,पिण्याच्या पाण्याची व्यवस्था हे उपक्रम वाखाणण्याजोगी आहेतच आपल्यातील आत्मविश्वास आणि प्रामाणिक कार्यासाठी अनेक हातांनी आपणास सहकार्य केले नव्हे तर अनेकांना आपले कार्यकर्तृत्व बघून सहकार्य करावे असे वाटले ही अभिमानास्पद बाब आहे
आपल्या व्यवसायात आपण निष्णात तर आहातच पण त्या सोबत आपण जोपासलेली सामाजिक बांधिलकी वाचून मनभरून येते अनेकांवर आपण फ्री उपचार केले, शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष आहेत म्हणून शिक्षकांकडून फी न घेणे ,सर्व उपचार फी शिवाय करणे ,, पेशंट ला सर्व प्रकारे सहकार्य,प्रसंगी घरी जावून सर्जरी,एव्हढे धाडस करणारे सर मला वाटते आपणच एकमेव आहात.
आपल्या लहानशा मुलाला एका दिव्यांग मुलाला मदत करावीशी वाटणे, बापाने ती पूर्ण करणे नव्हे तर दिव्यांग मुलाचा संसार थाटणे,त्याला स्वतःच्या पायावर उभे करणे, त्याच्या विवाहाचा स्वागत समारंभ आपल्या घरी आयोजित करणे ही बाब सर्वसामान्य माणसाला शक्य नाही त्यासाठी एका विशेष मनाची,आणि प्रेमाची आवश्यकता असते ती आपल्याकडे आपल्या कुटुंबीयांकडे आहे
सामान्य नागरिक ते थेट अधिकारी,उद्योगपती ,यांच्याशी जुळलेली आपली नाड, प्रामाणिक आणि सेवाभावी वृत्तीचे द्योतक आहे
सर आपल्या या सेवाभावी वृत्तीने अनेक सेवाभावी संस्थांमध्ये आपल्याला काम करण्याची संधी चालून आली आणि आपण निरपेक्ष भावनेने या संधीचे सोने करीत त्या संस्था नावारूपाला आणल्या याचा निश्चितच अभिमान वाटतो.
आपण कुटुंबवत्सल देखील आहात आपल्या दैनंदिन कामकाजातून , व्यवसायाच्या व्यापातून वेळ काढून कुटुंबाकडे ही तेव्हढेच लक्ष दिले यासाठी सौ मावशींचे योगदान देखील मानावे लागेल आपल्या मार्गदर्शन आणि संस्कारातून मुलांनी राष्ट्रीय ,आंतरराष्ट्रीय खेळात प्राविण्य मिळवले सोबतच उच्च शिक्षणापासून देखील मागे राहिले नाहीत आणि आज उच्च पदावर कामकाज करीत आहेत ही आपल्या जाणीवेची आणि संस्काराची देण आहे
सर आपल्या एकूणच यशात आणि उंचावलेल्या प्रगतीच्या आलेखात सौ मावशी चा उल्लेख केला नाही तर अपूर्णता जाणवेल." प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्री चा हात असतो" याची जाणीव देखील झालेली आहे ( मावशी म्हणजे लक्ष्मी ,सरस्वती आणि अन्नपूर्णा आहेत याची जाणीव आपल्या पुस्तकातील विचारातून झालेली आहेच)
आपले मना सर्जना हे पुस्तक आजच्या तरुणाईने वाचले तर निश्चितच प्रेरणा मिळेल आणि वाचकांमध्ये वैचारिक परिवर्तन होईल.
@ आर्थिक नियोजन आणि बचतीचा आपण दिलेला सल्ला मार्गदर्शन अत्यंत मोलाचे आहे.
@ डॉ बाबा मुळे झालेली आपली ओळख चिरकाल स्मरणात राहील सर्जरीच्या निमित्ताने का असेना पण एका प्रेरणादायी व्यक्तीमत्वाची भेट झाल्याचा मनस्वी आनंद आहे. आपण जळगावला आलात तर निश्चित माझ्याकडेही या...धन्यवाद...
सुषमा आत्माराम शार्दुल आदरणीय,
डॉ. अनिल गांधी सर,
सप्रेम नमस्कार
मी सुषमा आत्माराम शार्दुल (लग्नानंतरची झारा इम्तियाझ शेख) सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात इंग्रजी हा विषय शिकवते. २०१५ साली माझ्या प्रेगनन्सीच्या काळात मी बऱ्याच डॉक्टरांची आत्मचरित्रे वाचली. त्यातले आपले आत्मचरित्र `मना सर्जना; मला खूपच आवडले. आपण बरीच पुस्तके वाचतो पण त्यातील ठराविक पुस्तके अशी असतात जी आपल्या मनात कायम घर करून जातात. `मना सर्जना` हे याच प्रकारातील पुस्तक (आत्मचरित्र) आहे.
त्यावेळेस एखाद्या पुस्तकाविषयी लिहिणे मला सुचलेच नाही. म्हणून मागच्या वर्षापासून ही सुरवात केली आहे. पुस्तकाची प्रस्तावना तसेच आपले मनोगत वाचतांना मनाला एक आनंद व स्फूर्ती मिळते. आपल्यातील प्रामाणिकपणा, नीतिमत्ता, गरिबांविषयी असणारे प्रेम, नाविन्यता, जीवनाचे त्रिमिती महत्त्व आणि असे अनेक गूण आपण वाचकापुढे सुंदर पद्धतीने मांडले आहेत. डॉ. ह. वि. सरदेसाई सरांनी प्रस्तावना खूप सुंदर पद्धतीने लिहिलेली आहे.
तुमच्यातील प्रामाणिकपणा व निर्मळता वाचकास तुमच्या सुरवातीच्या वाक्यानेच येऊन जाते. ``मी मनापासून लिहिलेली, मनातले सांगणारी `मना सर्जना` ही आत्मकथा वाचकापुढे सादर केली आहे. त्याची सर्जरी ज्याची त्याने करायची आहे. पण निदान मला कळावे ही इच्छा.``
सर, पुस्तकातील हे वाक्य मला लाख मोलाचे वाटले. आपले निर्णय व निश्चय आयुष्य घडविणारे असतात. पैशाने सुखाची सगळी साधनं विकत घेता येतात पण मनाचे सुख-समाधान नाही. प्रामाणिकपणा काय असावा, नितिमत्ता काय असावी किंवा एखाद्या गरजूची सेवा मनापासून कशी करावी या सर्वाचे चित्र पुस्तकातील प्रत्येक पानावर व प्रत्येक ओळीवर आहे.
आजपर्यंत वाचलेल्या अनेक पुस्तकांपैकी हे आत्मचरित्र (मनासर्जना) अफलातून आहे. या चार वर्षांच्या काळात ठराविकच पुस्तकांचे शिर्षक लक्षात राहिले त्यातील एक रेखीव पुस्तक व कायम आठवणीत राहिल असेच हे आत्मचरित्र आहे.
आमच्याकडे एका बक्षिस समारंभास बीआसी चे शास्त्रज्ञ आले होते. विद्यार्थ्यांना मोटिव्हेट करण्यासाठी त्यांनी एक अनमोल वाक्य म्हटले होते, ``जेव्हा आपण एखाद्या अनुभवी माणसाचे पुस्तक वाचतो म्हणजेच आपल्याला त्याचा ५० ते ६० वर्षांचा अनुभव मिळतो.`` मी या वाक्याशी पूर्णपणे सहमत आहे.
इतरांना सर्वतोपरी मदत करणे हे तुमच्या संस्कारातच आहे त्यामुळे तुमच्या संस्काराने तुमची मुले व त्यांची पुढची पिढी त्यावर पाऊल ठेवून पुढे जात आहे.
डॉक्टर म्हणून व्यवसायातील नितीमत्ता किती महत्त्वाची आहे, केवळ पैसा हाच आयुष्याचा भाग नसून माणुसकी किती महत्त्वाची आहे याचे सुंदर उदाहरण म्हणजेच डॉक्टर अनिल गांधी यांचे जीवन असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही.
तुमच्या लिखाणात प्रेम, न्यायबुद्धी, प्रामाणिकपणा हा ओतप्रोत भरलेला आहे. तुमच्या प्रामाणिकपणाबद्दल कितीही वाक्य लिहिली तरी ती कमी पडतील.
व्यवसायापेक्षा आपण माणूसकी कशी जपली पाहिजे हे तुम्ही खरेच उत्तम पद्धतीने तुमच्या अनुभवातून दाखवून दिले आहे.
तुमच्या ८०व्या वाढदिवसाचा फोटो पाहतानां मनात सहज एक प्रश्न निर्माण झाला जर डॉ. अनिल गांधी यांनी लहानपणापासून असा डॉक्टर होण्याचा निग्रह केला नसता तर ही फोटोतील सर्व मंडळी या पदापर्यंत पोहोचली असती का?
एकट्या व्यक्तीच्या बदलाने किती पिढ्या बदलू शकतात याचे जीवंत उदाहरण म्हणजे डॉ. अनिल गांधी हे आहेत. विद्यार्थी दशेत व डॉक्टर झाल्यावरही तुम्ही इतरांना केलेली मदत ही खरेच वाखाणण्यासारखी आहे. तुमचे अर्थाविषयीचे विचार वेगवेगळ्या ट्रस्टसाठी केलेले मोलाचे सहकार्य, त्याग स्वत: एक डॉक्टर असतानासुद्धा, वैद्यकीय क्षेत्रातील नितीमत्ता कशी असली पाहिजे हे आणि असे सगळेच विचार वाचकास एक आदर्श व्यक्ती व विचारसरणी देऊन जातात.
पुस्तक वाचताना अनेक प्रश्न मनांत होते त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे पुस्तकात मिळाली याचे मला समाधान आहे. तुमच्या साहित्य परिचय कोषातून पुस्तकांचे विषय व त्यातील थोडक्यात माहिती वाचल्यावर ती सर्वच पुस्तके माझ्या वाचनाच्या आवडीचीच आहेत.
सर, तुमच्या लिखाणात बोलण्यात प्रचंड नम्रता, प्रेम, प्रामाणिकपणा, आपुलकी ओतप्रोत भरलेली आहे. अजय सरांची खेळातील व अभ्यासातील आवड यामुळे त्यांनी प्रगतीचे उंच शिखर गाठले आहे ही खूप अभिमानाची गोष्ट आहे.
एकदा एका पुस्तकात मित्तल ग्रुप आणि श्री. मित्तल सरांविषयी वाचले होते. ५ ते ६ वर्षांपूर्वी जेव्हा मी पुण्यात आले होते तेव्हा बऱ्याच ठिकाणी त्यांच्या नावाने बोर्ड होते. पण हेच तुमच्या पुस्तकांतून वाचताना थोडा अभिमान वाटला कारण आपल्या ओळखीची व्यक्ती यांसारख्या मोठ्या माणसांच्या परिचयाची आहे. मला अजून दोन गोष्टी आवर्जून नमूद कराव्याशा वाटतील एक म्हणजे मेहता पब्लिशिंग हाऊस आणि दुसऱ्या तुमच्या पत्नी. मेहता सरांचे तुमच्याशी असणारे नाते खूप सुंदर आहे. तुमच्यासारख्या व्यक्तीच्या त्या पत्नी आहेत म्हणून त्या सुंदर आहेत हे म्हणणे चुकीचे आहे कारण तुमचे आयुष्य सुरळीत चालावे यासाठी त्यांनीही अपार कष्ट घेतले आहेत हेही तितकेच खरे हे मान्य करावे लागेल.
श्रद्धा व अंधश्रद्धा याविषयीचे तुमचे विचार १०० टक्के बरोबर आहेत.
पुस्तकात तुम्ही लिहिलेल्या बालपणीच्या आठवणी (गणित विषय) वाचकास त्यांच्या बालपणीची आठवण करून देतील. परंतु पुढच्या आयुष्यात तुमच्या स्वभावाने अनेक मंडळी (गरीब, श्रीमंत(मनाने) नामवंत) तुमच्याशी जोडली गेली हा भाग वेगळा.
शेवटी इतकेच म्हणेन व्यवसायाने जरी आपण मोठे डॉक्टर असाल तरी डॉक्टर कम रायटर ही भूमिका तुम्ही चोख पार पाडली आह़े.
तुम्हाला माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून भरभरून शुभेच्छा. वयाच्या ८०व्या वर्षी जेवढा तजेला आहे हा पुढेही राहील हीच प्रार्थना.
Loksatta 12-6-2010वैद्यकीय व्यवसायात ५० वर्षे पूर्ण केलेले निष्णात सर्जन डॉ. अनिल गांधी यांच्या आयुष्यातील विलक्षण अनुभवांचा समावेश असलेल्या अर्थातच डॉक्टरांच्या प्रांजळ आत्मकथनाचे ‘मना सर्जना’चे प्रकाशन उद्या शनिवार पुण्यात होत आहे. माढा येथे जन्म झालेल्या डॉ. गांधी यांचे पुस्तक केवळ त्यांचे आत्मकथन म्हणून नाही, तर गेल्या ५० वर्षांतील घडामोडींचे व वैद्यकीय क्षेत्रातील बदलाचा नोंद घेणारा दस्तावेज म्हणूनही महत्त्वाचे आहे.
ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादव, डॉक्टरांचे निकटचे मित्र आणि चरित्रलेखिका चित्रलेखा पुरंदरे अशा अनेक मंडळींच्या आग्रहातून डॉक्टर आपले अनुभव शब्दबद्ध करायला तयार झाले. चित्रलेखा पुरंदरे यांनी या पुस्तकाचे शब्दांकन व संपादन केले आहे. मेहता पब्लिशिंग हाऊसच्या वतीने प्रकाशित होत असलेल्या या पुस्तकामुळे डॉक्टरांचा संघर्ष तर वाचकांना समजेलच, त्याचबरोबर डॉक्टर अनेक महत्त्वाच्या घटनांचे साक्षीदार कसे ठरले व आपल्या व्यावसायिक निष्ठांचा विसर पडू न देता अनेक आव्हानांना ते सामोरे कसे गेले हेदेखील लक्षात येईल. पुण्यात अत्यंत गाजलेल्या मंजुश्री सारडा खून प्रकरणाशी डॉ. गांधी यांचा संबंध कसा आला व त्यांनी दिलेल्या साक्षीमुळे सारडा खुनातील आरोपी शरद सारडा याला कशी शिक्षा झाली, या घटनाक्रमाची माहिती मिळते. ब. ना. भिडे यांच्यासारख्या कायदेपंडितासमोर डॉक्टरांनी कशी साक्ष दिली व त्यांच्या प्रश्नांच्या फैरींना कसे उत्तर दिले हे सारे यातून समजते.
प्रत्येक बाब नियोजनबद्ध रीतीने करणे, इंटर्नशिप पुण्याऐवजी औरंगाबादला का केली, त्यातून काय फायदे झाले ते कळते. त्यापेक्षा डॉक्टर किती प्रारंभापासून नियोजन करत होते व शिस्त आणि नियोजनाचा कसा फायदा होतो हेदेखील समजते.
सर्जन म्हणून आलेले अनुभव आणि एक सर्जनशील मनाला आलेल्या अनुभवाच्या सुसंवादाचे रूप म्हणजे हे आत्मकथन आहे. तुमचे पुस्तक वाचून प्रस्तावना लिहायची की नाही असे स्पष्टपणे सांगणाऱ्या डॉ. ह. वि. सरदेसाई यांनी पुस्तक हातात घेतले आणि वाचूनच संपवले, मी प्रस्तावना लिहितो, अशी आशीर्वादात्मक दिलेली दाद, त्याचबरोबर ज्यांनी ज्यांनी हस्तलिखित वाचले त्या सगळ्यांची पसंती, यामुळे हे पुस्तक वेगळे ठरले. एकदा पुस्तक लिहायचे ठरल्यावर डॉक्टरांनी अवघ्या एक वर्षात हे पुस्तक पूर्ण केले आहे. शब्दांकन करणाऱ्या चित्रलेख पुरंदरे यांनी या संदर्भात सांगितले की, डॉक्टरांची स्मरणशक्ती अफाट आहे.
त्यांनी मला इतकी तपशिलवार माहिती दिली, की कुणीही थक्क होईल. मी त्यांच्या पेशंट्सना भेटले, त्यांच्याशी अनेक वेळा चर्चा केली. प्रत्येक वेळी डॉक्टरांचा वेगळा पैलू मला जाणवला. केवळ स्वतःचे कौतुक करण्याचा त्यांचा कुठेही हेतू नाही. जे जसे घडले ते त्यांनी सांगितले. तसेच त्यांचा विविध विषयांचा अभ्यास व त्यांच्या आवडीचे विषय याबद्दलही त्यांनी यात लिहिले आहे. डॉक्टरांनी आदिवासींसाठी ‘आदिशक्ती’ ट्रस्टच्या माध्यमातून काम केले. आदिवासींसाठी आश्रमशाळा उभी करण्याचे ठरवले तेव्हा गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी पन्नास लाख रुपयांची देणगी दिली. डॉक्टरांचे समाजकार्य बघून जगप्रसिद्ध उद्योगपती लक्ष्मीनिवास मित्तल यांनीही या कार्याला कशी मदत केली हे सारे या पुस्तकामुळे समजते. आपल्याकडील सुताराच्या ऑपरेशन व त्याच्या औषधासाठी स्वतःचे दहा हजारांपेक्षा जास्त रक्कम खर्च करणाऱ्या अनिल गांधी यांच्यासारख्या निःस्पृह माणसाचा मित्तल यांच्यासारख्या कुबेराशी स्नेह कसा जुळला व वृद्धिंगत होत गेला हेही या पुस्तकातून कळते. महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचा कारभार, वैद्यकीय क्षेत्रातील अपप्रवृत्ती, मानवी नातेसंबंध अशा विविध विषयांना स्पर्श करणारं अर्धशतकाचं हे आत्मचिंतन केवळ एकाच माणसाचं न राहता गेल्या ५० वर्षांतील समाजजीवनातील बदलाचं सक्षमपणे आणि सजगपणे नोंद घेणारं ‘समाजचित्र’च रेखाटणारं पुस्तक ठरतं हे नक्की!
Lalit Masikसुप्रसिद्ध सर्जन डॉ. अनिल गांधी यांच्या या क्षेत्रातील अनुभवांची टाकसाळ कशी भरत गेली त्याचे चित्रदर्शी आणि वास्तवस्पर्शी असे नेटके शब्दांकन म्हणजे ‘मना सर्जना’. सुरुवातीपासून म्हणजे अगदी शीर्षकापासूनच त्यात सर्जक दर्शन घडते. चंद्रमोहन कुलकर्णींचे मुखपृष्ठ बोलके आहे. कात्री, काटे, चिमटे, सुई या ‘सर्जरी’च्या साधनांबरोबरीनेच ‘र्ज’ वर उमललेली कळी म्हणजे डॉ. गांधींचे हे आत्मपर लेखन. वा! मनोगतात डॉ. अनिल गांधी म्हणतात, की ही फक्त माझी व्यक्तिरेखा नसून, माझ्या आजूबाजूच्या व्यक्ती, संस्था, वातावरण, परिस्थिती यांचे माझ्या व्यक्तिमत्त्वावर घडलेल्या संस्कारांचे, संक्रमणाचे शब्दांकन आहे...’ पूर्ण पुस्तकातून या वाक्याचा आपल्याला वारंवार प्रत्यय येत राहतो. लहानपणी माळीबुवांचा एक आणा परत न करता आलेल्या डॉक्टरांनी पुढे आपल्या कमाईतून लाखो रुपये समाजकार्यासाठी, संस्थांसाठी खर्च केले; ते याच संस्कारातून. आर्थिक अडथळ्यांची शर्यत जिद्दीने पार करून डॉक्टर झालेल्या जगण्यातल्या खऱ्या सुखा-समाधानाचे ‘अर्थकारण’ जाणले. ‘अडचणींच्या सापळ्यातसुद्धा आभाळाचा निळा तुकडा’ खुणावू लागताच पुढे स्वकर्तुत्वावर अवघे आभाळच कवेत घेणाऱ्या एका सर्जनशील माणसाची ही आत्मगाथा वाचणाऱ्याला विचारांचे संचित देऊन जाते. सहलीचे जमवलेले पाचशे रुपयेच काय; पुढे स्वत:चे आरोग्यधाम थाटल्यावर या लेखकाने ‘परोपकाराय पुण्याय’च आयुष्य वेचले. आपल्या कौशल्याचा ‘धंदा’ न करता ‘पेशा’ केला आणि त्यातून समाजधर्म, स्वधर्म मोठा केला. याविषयीच्या अनेक घटना–प्रसंगांनी ही गाथा परिपूर्ण आहे. अर्थात् घटना–प्रसंग चांगले, वाईट दोन्ही येतात. अगदी मैत्रीला जागणारे मित्र येतात तसे पाठीमागून वार करून घात करणारे स्वार्थी ‘जंतू’ही सविस्तर येतात. त्यामुळे एक जिवंत चलत्पटच समोर उभा ठाकतो. उदा. पेंडसेंना वाचवण्यासाठी ताजं रक्त रोज मिळवून देणारा कर्मचारी ‘मी वेगळं काय केलंय? हे मी करायलाच हवं होतं.’ (पृ. ८३) असे म्हणतो; तर सब–इन्स्पेक्टर सुनेच्या अपघातातही ‘आम्ही पैसे घेणारच’ म्हणत भ्रष्टाचारी रूप दाखवतो. (पृ.९४) जिवंत माणसांचे असे असंख्य नमुने इथे भेटतात; त्यातून घडणारे डॉ. अनिल गांधी, ‘जिवंत सुसंस्कृत माणूस’ म्हणून या कथनात साकारत जातात. बॅडमिंटनमध्ये यशाची शिखरं गाठणं, पांगलोळीतील मुलांसाठी आदिवासी शाळा चालवणं, महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटीतील सहभाग असे न मोजता येणारे पैलू या सुसंस्कृततेला आहेत. त्याने आपण भारावून जातो. ‘देव न मानणारा देवमाणूस’ ही एकेकाळी आगरकरांना दिलेली पदवी नव्याने या लेखकाला आपण मनोमन देऊन टाकतो.
vishwas bidkarbest book.money and detirmination are two different things.dr gandhi had overcame with many difficult things.salute to him.thanks for giving great experience of reading.