- Trupti Kulkarni
शोभा डे लिखित, अपर्णा वेलणकर अनुवादित ‘स्पीडपोस्ट’ या मेहता पब्लिशिंग हाऊस
(पुणे) यांनी प्रकाशित केलेल्या या पुस्तकातल्या ‘पेज थ्री आई’ या पात्राला ‘प्रणव कुलकर्णी’ यांनी लिहिलेले पत्र.
_________________
झगमगत्या दुनियेतून मुलांच्या भावविश्वात अलगद उतरता येणाऱ्या पेज थ्री पण तितक्याच हळव्या आईस,
तब्बल सहा मुलांचं नेटानं संगोपन करताना वेगवेगळ्या टप्प्यांवर पत्ररूपानं त्यांच्यासमोर तू अनुभवांची शिदोरी खुली केलीस. ही पत्रं तुला प्रकाशित का करावीशी वाटली माहीत नाही; पण ती केलीस हे उत्तम झालं.
कसंय, अडनेडी वयातल्या प्रत्येकालाच कधीतरी वाटतं की `आई आपल्याला पुरेसा वेळच देत नाही आणि आपल्यावर तिचं मुळी थोडंफारही प्रेम नाहीये. इतरांच्या आया बघा.` तुलनेचं हे वादळ आई आणि मुलाच्या नात्यात आलं की जहाजावर कितीही रसद असली तरी आपल्याला सुखी ठेवण्यासाठी झटणाऱ्या फूटभर अंतरावरल्या चेहऱ्यावरच्या गाजदार लाटाही मग, मन ओळखेनासं होतं. नात्यांमधले अडथळे असो वा नातं सुशेगात वल्हवणारी वल्ही, दुनियेत सगळीकडे थोड्याफार प्रमाणात सारखीच असतात; पण बंडखोर वयात हे सांगणार तरी कोण आणि कसं?
तू लिहिलेली पत्रं केवळ तुझ्या सहा मुलांपुरती मर्यादित न राहता कितीतरी टीनएजर्सच्या मनांचा अचूक ठाव घेतात ती तू हे सांगतेस म्हणूनच. सतत चेहऱ्यावर मेकअपची मागणी करणारं जग, लेखिका म्हणून सगळी व्यवधानं विसरून वाचकांना आवडणाऱ्याच साच्यात शाई ओतायला सांगणारा कागद, वैवाहिक आयुष्याच्या स्वतःच्या म्हणून असलेल्या स्वतंत्र अपेक्षा आणि या सगळ्याला पुरून उरत मुलांना पत्रांतून आयुष्य उत्फुल्लपणे जगायला शिकवणारी तू. आमच्या आया पेज थ्री कल्चरच्या नसतीलही, स्वतःच्या मनातलं कागदावर मुक्तपणे लिहिणं त्यांना कदाचित कॉलेजनंतर जबाबदाऱ्यांच्या धबडग्यात जमलंही नसेल, पण म्हणून त्यांनी आमच्यासाठी आयुष्यासोबत केलेल्या तडजोडीचं महत्त्व थोडीच कमी होतं?
`स्पीडपोस्ट` वाचताना प्रत्येकजण आईसोबतच्या आपल्या नात्याचे अर्थ पानापानांवरच्या अवकाशात शोधत राहतो. प्रत्यक्ष ओळीं इतकंच बिटविन दि लाईन्स लिहिणाऱ्या तुझ्या लेखणीचं हे खरं यश. मुलांपाशी व्यक्त होताना तू इतका कमालीचा मोकळेपणा कसा राखू शकतेस याचं कॉलेजात हे पुस्तक वाचल्यावर प्रचंड आश्चर्य वाटलेलं (पुढं `स्पाउज`सारख्या पुस्तकांतून मात्र तुझ्या जगण्याची फिलॉसॉफी गवसली). जे विषय बोलताना आम्हीही संकोचतो तेसुद्धा तू किती सुंदरपणे हाताळले आहेत. जबाबदारीपूर्ण जगण्यासाठी मुलांची मानसिक बैठक घडवताना कुठलाच विषय तू गौण मानला नाहीस. जगण्याबद्दल तू आमच्या भाषेत बोललीस आणि कितीतरी गुंते झरझर सुटले.
स्वतःच्याच विश्वात मुलं हरवलेली असताना आई म्हणून खंबीर स्टँड मांडलास आणि जाणवू देत नसली तरी आईचंही स्वतंत्र आयुष्य असतं हे मान्य करायला शिकवलंस तू आणि हेही शिकवलंस की स्वतंत्र आयुष्य असूनसुद्धा मुलंच तिच्या आयुष्याचा ड्रायव्हिंग फोर्स असतात.
असंख्य टिनएजर्सच्या मनांतलं द्वंद्व शांत करत आयुष्याला स्थिरत्व आणि दिशा देणाऱ्या तुझ्या या दीपस्तंभरूपी `स्पीडपोस्ट`ला म्हणूनच हे प्रतिपत्र.
आयांवर कितीही रुसलो तरी त्यांच्याशी असलेले अतूट बंध जाणणारी
आम्ही मुलं
- DAINIK TARUN BHARAT 20-02-2004
जगण्याचा वेगळा दृष्टिकोन देणारं : स्पीडपोस्ट...
पत्रे ही खरे तर प्रत्येक व्यक्तिच्या जीवनातील अत्यंत खासगी मालमत्ता. खासगी आणि एक वेगळा ‘आपुलकीचा अनुभव देणारी. दुसऱ्याची पत्रे वाचायची नसतात असा संकेत असतानाही जेव्हा दुसरे ती पत्रे स्वत:हून प्रसिद्ध करतात तेव्हा? तेव्हा अशी पत्रे नेहमीच वाचायची असतात. किमान शोभा डे यांनी त्यांच्या सहा मुलांना लिहिलेली ही पत्रे तरी प्रत्येक पालकांनी आणि मुलांनी वाचायला हवीत. पत्रांबाबतचा लोकसंकेत माहीत असूनही ही पत्रे केवळ आपल्याच मुलांसाठी मार्गदर्शक ठरणारी नाहीत तर इतरांनाही त्यातून खूप काही मिळण्यासारखे आहे. हा लेखिकेचा विश्वास सार्थ आहे. अपर्णा वेलणकर यांनी स्पीडपोस्टचा मराठीमधून केलेला अनुवाद तितक्याच मुक्तपणे व्यक्त झाला आहे. बोलीभाषेतील शब्दांमध्येही सेलिब्रेटिज वर्गाचा टच आणि त्यातून मनाचा धांडोळा शोधण्याची सुरेल कसरत या अनुवादामध्ये उमटली आहे. थोडसं लांबण वाटत असलं तरी ते आवश्यकच आहे, याची पुरेपूर जाणीव वाचताना होत राहते.
समाजाच्या अत्यंत उच्चभ्रू वर्गातील एक नामांकित प्रस्थ असलेल्या डे यांच्या जीवनशैलीचा पुस्तकावर प्रभाव असणे स्वाभाविक आहे. पार्टी, शेड्युल्स, देशात आणि परदेशातील असाईनमेंटस अशा बिझी लाईफस्टाईलमध्येही आईच्या मनात आपल्या मुलांविषयी असलेल्या सर्वसामान्य चिंता आणि शंकांपासून त्याही सुटलेल्या नाहीत, याचे सरळसोट चित्रण स्पीडपोस्टमध्ये आहे. त्यातही त्यांची मुले म्हणजे पहिल्या लग्नाची दोन, दुसऱ्या लग्नाची दोन आणि दुसऱ्या पतीची दोन अशी सहाजणं. घरामध्ये गोकुळ असावं असं वाटणाऱ्या या वलयांकित कुटुंबातील प्रश्न चारचौघांसारखेच पण उत्तर मात्र खास शोभा डे स्टाईलची. आपलं आणि आपल्या मुलांच्या आयुष्याची तुलना करताना कुठेही आपण ‘ग्रेट’ असल्याचा ‘फील’ त्या होऊ देत नाहीत हेच त्यांचे ‘ग्रेट’पण सर्वात धाकटी मुलगी आनंदिता रडून विचारते की, आज रात्री तू पार्टीला न जाता माझ्याबरोबर राहू नाही का शकत, तरीही तिचा विरोध पत्करून लेखिकेचं पार्टीला जाणं आणि घरी परत येईपर्यंत मुलीच्या आठवणीने झालेली जिवाची घालमेल या पुस्तकाच्या प्रारंभापासूनच त्यातील आशय मनामध्ये घट्ट बसून जातो. सकाळी आनंदिताने येऊन मारलेली मिठी एखाद्याने थोबाडीत मारण्यापेक्षाही कठोर शिक्षा होती ही लेखिकेची जाणीव स्वत:च्या चुका आणि संवेदनशीलता प्रामाणिकपणे व्यक्त करणारी आहे. स्पीडपोस्टची पकड तेथूनच सुरू होते. रणदीप, राधिका, आदित्य, अवंतिका, अरुंधती, आनंदिनी या आपल्या मुलांना लिहिलेली पत्रे म्हणजे स्पीडपोस्ट, मुलांच्या आयुष्यातील अनेक घटनांची साक्षीदार असलेल्या आणि नसलेल्या आईने याबद्दल मुलांशी, मुलांच्या भाषेत, मुलांसाठी आणि स्वत:साठीही केलेला हा लेखनप्रपंच. या घटनांमध्ये मुलांच्या शाळा, त्यांचा पहिला जॉब, इंटरव्ह्यू, मुलींखती शाळेची सहल, मैत्रिणीमध्ये झालेली भांडाभांडी अशा रुटिन घटना तर आहेतच, पण मुलीने पहिल्यांदा आईशिवाय केलेली शॉपिंग, मुलांच्या गर्लफ्रेंडस, प्रेमप्रकरण, त्यांची पहिली घरच्याशिवाय केलेली व्हॅकेशन टूर, चॅटरुममधील गप्पा आणि त्यातून लेखिकेला आलेलं टेन्शन... अशा काही पत्रांमधून आईला वाटणारी काळजी, मुलं आपल्यापासून दूर तर जात नाहीत ना, याची चिंता आणि पुन्हा मुलांकडे आपल्यासाठी पुरेसा वेळ नसला तरी त्यांना आपली आठवण आहे याचा विश्वास, प्रत्येक पत्राच्या शेवटी व्यक्त होताच. स्पीडपोस्टमधील अनेक पत्रं मनाला भिडणारी आहेत. तरीही त्यातील एका पत्राचा इथे उल्लेख करायलाच हवा. घरातला मोठा मुलगा असलेल्या रणदीपला आपल्या कर्तव्याची जाणीव करून देताना, त्याच्या हाती परिवाराची जबाबदारी सोपविताना लेखिकेने त्याच्यावर असलेला विश्वास आणि लहान भावंडांना समजावून घेण्यासाठी त्याला करावी लागणारी कसरत या दोन्हींची सांगड घातली आहे. त्याच्यात आणि त्याच्या सर्वात धाकट्या बहिणींमध्ये असलेले तब्बल सोळा वर्षांचे अंतर तसे प्रचंडच. तरीही तो आपल्या परिवाराला एकसंघ ठेवू शकतो. ही तिची सक्षम जाणीव तिने अतिशय भावस्पर्शीपणे मांडली आहे.
यातील लेखिकेच्या लिखाणाची स्टाईल कोठेही न मारता चपखलपणे अनुवाद करण्याची किमया वेलणकर यांना उत्तम रितीने जमली आहे. सिलेक्टिव्ह मेमरीज या पुस्तकाचा अनुभव त्यांच्याकडे असला तरी स्पीडपोस्टकरता त्यांचे कौतुक करायलाच हवे.
जीवनाचा एक वेगळा दृष्टिकोन ही पत्रे आपल्याला देतात. ज्याला जीवनाच्या आसक्तीचा मनमुराद अनुभव घ्यायचा असेल त्यांनी ही स्पीडपोस्ट वाचायलाच हवीत.
-सुनिता महामुणकर
- DAINIK SAKAL 21-03-2004
आईची मुलांसाठी ‘भेट’...
सध्याच्या जीवघेण्या स्पर्धेच्या युगात आयुष्याला सामोरे जाताना आपली मुले तग धरतील ना, मोहमयी दुनियेत पावलापावलावर दिसणाऱ्या प्रलोभनांना केवळ आधुनिकता आणि खोट्या प्रतिष्ठेसाठी भुलून ती भरकटणार तर नाहीत ना, ही चिंता सध्या प्रत्येक आईलाच भेडसावते. अशाच आधुनिकतेच्या झंझावातात वावरणाऱ्या आल्या सहा मुलांना प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांनी लिहिलेली पत्रे कोणत्याही आईच्या हृदयातील भावनाच बोलून दाखवतात. ई-मेल, एसएमएसच्या सध्याच्या जमान्यात मुलांचा आईवडिलांशी संवादही दुर्मीळ झाला आहे. अशा मुलांना नव्या जगात जगताना, झुंजताना, संकटांमधून वाट शोधताना एक शिदोरी हवी म्हणून लेखिकेने या पत्रांच्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद साधला आहे.
कुटुंब, त्यातील व्यक्तींचे परस्परांशी नाते, परंपरा, नीतिमूल्ये यांची चर्चा या पत्रांत आहे. आपल्या संस्कृतीची, कुटुंबव्यवस्थेची मुलांना ओळख करून देत असतानाच आपण ही संस्कृती पुढच्या पिढीकडे संक्रमित करण्यास कमी पडलो, ही खंतही त्यांना आहे. झगमगत्या दुनियेत, प्रसिद्धीच्या वलयात वावरत असताना मुलांच्या बालपणातील काही गोष्टी निसटून गेल्याची जाणीव त्यांना आहे. पण त्याचबरोबर मुलांचे वाढते वय, बदलते भावविश्व, नव्या पिढीला हवेहवेसे वाटणारे स्वतंत्र, मुक्तजीवन, बंडखोर वृत्ती या गोष्टी छोट्या छोट्या प्रसंगांतून त्यांनी जाणल्या आहेत, टिपल्या आहेत. मुलांना त्यांच्या विचारांनी जगू देताना, तरुण वयात त्यांना हवे ते क्षेत्र निवडण्याचे स्वातंत्र्य देत असतानाच बाह्य जगातील प्रलोभनांना, दिखाऊपणाला ती भुलणार नाहीत, याची काळजीही आई या नात्याने पुरेपूर घेतली आहे. त्यासाठी त्यांनी उपदेशाचे डोस पाजलेले नाहीत किंवा आकांडतांडवही केलेले नाही. एखादी गोष्ट पटली नाही किंवा योग्य नाही म्हणून नकार देऊन त्यांनी मुलांना दुखावले नाही. मुलांना त्या गोष्टीचा त्यांनी अनुभव घेऊ दिला. स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाच्या व्यक्ती तुलना व स्पर्धा यांचा स्पर्श न होता एकत्र राहू शकत नाहीत. पण स्पर्धेची क्षणिक भावना जोवर तुमच्या मनाचा पूर्ण कब्जा घेत नाही आणि नात्याच्या मुळावर घाव घालण्याइतकी प्रबळ होत नाही, तोवर तिचे अस्तित्व नाकारण्याची केविलवाणी धडपड करू नका, असे त्या मुलांना बजावतात. त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीला ‘सपोर्ट सिस्टिम’ची गरज असते आणि ती आई, भावंडांच्या आधारानेच भागविली जाते. त्यासाठी कुटुंबातील व्यक्तींचे परस्पर नातेसंबंध दृढ असणे गरजेचे आहे, असेही त्या म्हणतात. आपल्या सहा मुलांचे स्वभाव भिन्न असले, आवडीनिवडी टोकाच्या असल्या तरी प्रेमाच्या धाग्याने त्यांच्यातील नात्याची वीण घट्ट ठेवण्याचा प्रयत्न शोभा डे यांनी जाणीवपूर्वक केल्याचे दिसते.
प्रेमाने ओथंबलेली, मायेने जवळ करणारी, कधी रागावणारी, वास्तवाची जाणीव करून देत चिमटे काढणारी, कधी हसवणारी, तर कधी धारेवर धरणारी ही सुंदर पत्रे कोणत्याही आईला आपलीच वाटतील. आधुनिक जगाला सामोरे जाणाऱ्या नव्या पिढीतील मुलांसाठी ही पत्रे म्हणजे खरोखरच शिदोरी आहे. संदर्भ बदलले तरी कोणत्याही दोन पिढ्यांमधील नातेसंबंध, परस्परांविषयीच्या भावनाच ही पत्रे व्यक्त करतात.
-नयना निर्गुण
- DAINIK SAMANA 04-04-2004
तरुणांपासून प्रौढांपर्यंत साधलेला संवाद...
शोभा डे यांच्या सिलेक्टिव्ह मेमरीज या पुस्तकाचा अनुवाद अपर्णा वेलणकर यांनी केला होता. त्यांनीच शोभा डे यांच्या ‘स्पीड पोस्ट’ या पुस्तकाचाही अनुवाद केला आहे. या पत्ररूपी पुस्तकाचं वेगळेपण यात आहे की मुलांना उद्देशून लिहिलेल्या या पत्रातील संवाद तरुणांपासून प्रौढांपर्यंत साऱ्यांशीच साधतो. खरं म्हणजे ई-मेलच्या जमान्यात पत्रं हा कालबाह्य प्रकार ठरला आहे. तरीही ‘स्पीड पोस्ट’नं आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलंय.
‘स्पीड पोस्ट’मधली सहा मुलांची ममा ही जगातल्या कोणत्याही मातेची प्रतिमा. आपल्या काळजाच्या तुकड्यांवर अपार मायेचा वर्षाव करणारी, प्रेमळ कधी तितकीच कठोर, तर कधी काळजीनं हळवी होणारी आई आपल्याशी जवळीक साधते. २१व्या शतकाच्या उंबरठ्यावरील तरुणाईपुढील आव्हानं, स्पर्धा, बदलती जीवनमूल्यं, अर्थसत्तेचं अनिर्बंध प्राबल्य यामुळे अवघे आयुष्य ढवळून निघत आहे. त्यातच नातेसंबंधांना हादरे बसत आहेत. या साऱ्याला सामोरे जाताना तरुणाई कधी गोंधळलेली, कधी भरकटलेली होऊ शकते. कोवळ्या वयातील त्यांच्या विश्वाशी सुसंवाद साधण्याचा, त्यांचं आधुनिक बदलतं, अपरिहार्य जग समजून घेण्याचा स्तुत्य प्रयत्न या पुस्तकात केला गेलाय. मुलांशी संवाद साधताना कुठेही छडी उगारलेली दिसत नाही. प्रसंगी समज दिली गेली असेल, पण चुकलेलं कोकरू उबदार घरट्याच्या वाटेवर परतेल असा विश्वास यात व्यक्त होतो. त्यांची उच्चभ्रू जीवनशैली, अत्यंत व्यस्त आयुष्य, धावपळ, मन अस्वस्थ करणाऱ्या आयुष्यात घडलेल्या अनेक कडू-गोड घटना त्यातूनही कुटंबाशी असलेलं घट्ट नातं हे ‘घार हिंडते आकाशी चित्त तिचे पिल्लांपाशी’ असंच. कुटुंबात पहिल्या पतीची, दुसऱ्या पतीची मुलं अशी. अपरिपक्व वयातील मुलांशी संवाद, आपुलकी साधणं, सर्वांनाच आपलं घर वाटणं यात ममाची स्त्रीची भूमिका महत्त्वाची. ही कसरत करताना आलेले अनुभव, प्रसंग, मनाची होणारी घालमेल पत्रांतून व्यक्त होत राहते.
पुस्तकातील असंख्य पत्रांत विविध विषयांवर चर्चा आहे. कौटुंबिक चौकट, परस्पर नातेसंबंध, संस्कृती, नीतिमूल्यांचा आग्रह, तर दुसरीकडे आधुनिक जगाचं अनिवार आकर्षण असलेली जीवनशैली पार्ट्या, इंटरनेट चॅटिंग, तासन्तास चालणारे टेलिफोन कॉल्स, स्पर्धा, आव्हानं, प्रलोभनं अशा सर्वस्पर्शी पत्रांचा खजिना मनाला स्पर्शून जातो. या पत्रांचा सूर केवळ उपदेशाचा, काळजीचा आग्रहाचा नाही. लेखिकेनं आपलं मनही अत्यंत दिलदारपणे उलगडलंय. मागे वळून बघताना नकळत आपल्या हातून घडलेल्या चुकांची कबुलीही आहे. आधुनिक जगात वावरताना आपली मुलं विचारपूर्वक निर्णय घेतील. नातेसंबंधांना हादरे बसणार नाहीत, मोठा मुलगा वडीलकीच्या नात्याने कुटुंबाचे बंध सैल होऊ देणार नाही असा सार्थ विश्वास त्या व्यक्त करतात. पत्रातील भाषेचा डौल काही वेळा सेलिब्रिटी टच वाटला तरी तो भावस्पर्शी, हळुवार मनाचा उद्गार आहे हे जाणवतं. काही पत्रांचा शेवट मात्र अगदी काळीज ओतल्यासारखा. ‘सदैव काळजी आणि संशयात बुडालेली तुमची ममा.’ असा आपल्या दोन मुलांना उद्देशून लिहिलेल्या एका पत्रातील हा तुकडा ‘तुम्ही किती बदल्या मिळवता किती पैसा अगर पुरस्कार मिळवता याच्याशी मला देणं-घेणं नाही. तर मग मी चुकूनसुद्धा तुमच्या पायात पाय अडकवायला मध्ये मध्ये येणार नाही. ‘प्रॉमिस!’
प्रस्तुत पुस्तकातील हा संवाद कोणत्याही संवेदनशील जागरूक पालकाच्या व पाल्याच्याही काळजाला हात घालणारा, त्यांचं अंत:करण उलगडून दर्शविणारा एकमेकांवरच्या विश्वासानं, मायेनं एकमेकांशी घट्ट बंध असलेलं हे कुटुंब वर्षाच्या सरत्या रात्री उगवत्या वर्षाच्या स्वागतासाठी एकमेकांसोबत सज्ज असतं. तो क्षण एकमेकांच्या मिठीत पाणावलेल्या नेत्रांनी साजरा होता. वाचकांनाही पत्रांप्रमाणेच हा क्षणही मुठीत धरून ठेवावासा, हृदयात साठवून ठेवावासा वाटतो.
-माधुरी महाशब्दे
- DAINIK LOKMAT 21-03-2004
प्रिय मुलांनो...
मानवी भावभावना आणि विचार यांच्या उत्कट अभिव्यक्तीचे सहजसुंदर माध्यम म्हणजे पत्र. ‘ये हृदयीचेते हृदयी’ पोहोचावं, असं जेव्हा वाटतं तेव्हा पत्राचा आकार आधार घ्यावासा वाटतो. इंग्रजी व मराठी वाङ्मयात अनेक पत्रसंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. प्रामुख्याने इंग्रजीत लिहिणाऱ्या आजच्या आघाडीच्या लेखिका शोभा डे यांच्या ‘स्पीड पोस्ट’ या पत्रसंग्रहाचं स्वरूप बरचंसं वेगळं आहे. वैशिष्ट्यपूर्ण आहे.
एकविसाव्या शतकात कुटुंब व्यवस्थेचे व लग्नसंस्थेचे भवितव्य यावर प्रश्नचिन्हं उमटविणाऱ्या अनेक घटना देशात आणि परदेशात घडत असतात. चार भिंतीत राहणाऱ्या कुटुंबातील सदस्यांत परस्परातील संवाद तुटल्यासारखा झाला आहे. हे जे तुटलेपण (Alienation) तयार होते, त्याने मानवी संबंधातील गुंतागुंत वाढली आहे. जिथे घरपण मिळते, मायेची ऊब अनुभवता येते, काही कमावलं तर पाठीवर कौतुकाची थाप पडते, चुकलं तर कान धरून चुका समजावून सांगितल्या जातात, अशी समजूतदार मनं (understanding Mind) असलेली ऊबदार घरं आज दुर्मिळ होत आहेत. लहानाचं मोठं होताना प्रत्येकालाच झगडावं लागतं. निराशा, अपयश यांनी मन करपून जातात. स्वत:ची ओळख सिद्ध करण्यासाठी संघर्ष करावा लागतो. मनाची घुसमट करणारे अनेक प्रश्न समोरे येतात. अशा वेळी धीर, दिलासा देणारी, पाठीवर हात ठेवून ‘लढ’ म्हणणारी आपली माणसं हवी असतात. अशी माणसं विशेषत: घरातील कर्ती स्त्री आईपणाचं कर्तव्य मनापासून निभावतात तेव्हा त्या घरात नंदनवन फुलतं शोभा डे या अशा गुणवत्तेच्या ‘आई’ आहेत याचा सुखद प्रत्यय ‘स्पीड पोस्ट’मध्ये त्यांनी आपल्या मुलांना लिहिलेल्या पत्रांतून येतो.
शोभा राजाध्यक्ष, शोभा किलाचंद आणि शोभा डे असा त्यांचा जीवनप्रवास आहे. या प्रवासात रणदीप, राधिका, आदित्य, अवंतिका, अरुंधती आणि आनंदिता या मुलांची फुलबाग. त्यांच्या जीवनात बहरली आहे. सख्खे-सावत्रपणाच्या सीमारेषा पुसून टाकत, आपल्या मुलांना आईपणाचा निखळ अनुभव देणारी अभिजात भारतीय स्त्री आपल्याला या पत्रातून भेटते. या पत्रांच्या अर्पणपत्रिकेतच, ‘माझ्या मुलांना पत्रे... नव्या जगांत जगताना, वागताना, लढता-झुंजताना, उन्हातान्हात वाट शोधताना हवी असते एक शिदोरी म्हणून...’ अशा नेटक्या शब्दांत लेखिकेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
या संग्रहात एकूण ७५ पत्रं आहेत. ८-९ महिन्यांच्या काळात लिहिलेली. त्यात सर्व मुलांना एकत्र संबोधून लिहिलेली पत्रे सर्वांत जास्त (२७) आहेत. केवळ मुलींशी केलेलं हितगुज ८ पत्रांत येतं. अरुंधती ही लेखिकेची सर्वांत जास्त लाडकी मुलगी असावी. कारण तिला तब्बल दहा पत्रं लिहिली आहेत. कदाचित किशोरावस्थेकडून पौंगडावस्थेकडे जाणारी ही मुलगी असल्यामुळे तिच्याबद्दल आईला जास्त काळजी वाटत असावी! ही सर्व पत्रं म्हणजे एका स्त्रीने आईपण कसं समर्थपणे तोललं याचं हृद्य चित्रण आहे. हा लेखिकेच्या जबाबदार पालकत्वाच्या दिशेने झालेला प्रवास आहे. ही प्रक्रिया व्यक्तिगत पातळीवरून व्यक्तिनिरपेक्ष/वैश्विक पातळीवर केव्हा जाऊन पोहोचते, हे कळतच नाही. जे पालक आहेत किंवा उद्या पालक होणार आहेत त्यांना त्यांच्या पालकत्वाच्या जबाबदारीची कोणताही अभिनिवेश न बाळगता, अगदी नकळत, लेखिकेने करून दिलेली ही ओळख आहे.
ही पत्रं जरी विशिष्ट काळात लिहिली गेली असली तरी येथे दोन पिढ्यांचा त्रिस्तरीय प्रवास पाहायला मिळतो. लेखिकेला आपलं बालपण, आपल्या भावाबहिणींबरोबर, आईवडिलांबरोबर मोठं होणं सारखं आठवत राहतं. सद्यस्थितीत पालकत्व किती थिल्लरपणे, बेजबाबदारपणे निभावलं जातं याचे आजूबाजूला असणाऱ्या उच्चभ्रू कुटुंबातून जे अनुभव येतात त्याचंही वास्तवदर्शन घडतं. आणि या पार्श्वभूमीवर सतत आत्मपरीक्षण करणाऱ्या एका जाणत्या आईची आपल्या मुलांच्या व्यक्तिमत्त्वाला हळूवारपणे आकार देणारी ही पत्रं मनाला भावतात, विचार करायला लावतात.
शोभा डे हे तसं आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता असणारं वलयांकित नाव. आपल्या लेखनातून, कथा-कादंबऱ्यांतून स्त्री पुरुष संबंधाचं बिनधास्तपणे चित्रण करणारी, स्वत:चं स्वतंत्र बंडखोर, स्वच्छंदी व खळाळतं आयुष्य जगणारी, ‘हाय प्रोफाईल’, ‘लोटेस्ट फॅशन स्टेटमेंट’ अशा शब्दात तिची ओळख करून दिली जाते. अशी ग्लॅमरस स्त्री मात्र या पुस्तकात आपल्याला दिसते ती फक्त आई. मुलांना उपदेशाचे डोस न पाजता, त्यांच्याशी संवाद साधत, त्यांना सुंदर जगायला शिकवणारी, मायेची ऊब देता देताच नव्या जगाचं रखरखित वास्तव समजावून सांगणारी. त्यांच्या चुका पोटात घालण्यापूर्वी त्या उघड करून दाखविणारी. जीवनातील काटेरी वास्तवाची, निसरड्या वाटा वळणांची ओळख करून देणारी, वयात येताना ज्या लैंगिक भावभावनांचा, शारीरिक आकर्षणाचा विकास होतो, त्याबद्दल आडपडदा न ठेवता चर्चा करणारी, सामाजिक व राष्ट्रीय कर्तव्यभावना जागविणारी आणि हे सारे विश्वासार्ह वाटावे म्हणून स्वत:च्या जीवनातील त्या-त्या काळातील समांतर कहाणी प्रांजळपणे उघड करणारी अशी ही आई. तिनं लिहिलेली ही पत्रं म्हणजे निखळ वस्तुपाठच.
आपल्या प्रस्तावनेत लेखिकेने ही पत्रं, ‘आमच्या व्यक्तिगत आयुष्यातले नाजूक तपशील उघडपणे सांगणारी आहेत,’ अशी कबुली मुलांची प्रतिक्रिया काय होईल याची लेखिकेला चिंता वाटणे स्वाभाविक आहे. ही पत्रं लिहून ‘माझ्या व्यक्तिगत, कौटुंबिक स्वास्थ्यालाच अक्षरश: पणाला लावणारा एवढा मोठा धोका लेखिकेने धाडसाने पत्करला आहे.
या पत्रांतून लेखिकेच्या मुलांची जी स्वभावचित्रे आपल्यासमोर येतात तीदेखील अतिशय वेधक आहेत. स्वत:चे मार्ग शोधणारे राणा आणि आदित्य हे तरुण आणि कर्तृत्वान मुलगे. स्त्रीत्वाचा परिपूर्ण आविष्कार म्हणून विकसित झालेल्या राधिका आणि अवंतिका, पौंगडावस्थेततील अरुंधती आणि बाल्यावस्थेतून -टीन एज’मध्ये प्रवेश करण्यासाठी आसुसलेली आनंदिता, अशी ही लेखिकेची मुले. ‘टीन एज’, पौंगडावस्था’ व ‘पूर्ण विकसित स्त्री-पुरुष अशा वयोगटात ही भावंडे आहेत. या प्रत्येक वयोगटांची शारीरिक व मानसिक स्थिती वेगळी असल्याने त्यांची मागणीही वेगळी. प्रश्न वेगळे आणि त्यांची गुंतागुंतही वेगळी. या साऱ्याचं प्रतिबिंब या पत्रात उमटतं. या पत्रातून लेखिकेने आपल्या मुलांशी जो संवाद साधला आहे, त्यातील विषयांचे वैविध्य थक्क करून टाकणारे आहे. लैंगिक शिक्षण, अश्लीलतेचे आकर्षण, घरात स्पेस मिळविण्याची प्रत्येकाची धडपड, भिन्नलिंगी मित्रमैत्रिणींच्या सहवासाची ओढ, चंगळवाद, आई सिगारेट ओढते म्हणून आपल्या सिगरेट ओढण्याचे समर्थन, खासगीपणाचा सोस, आयुष्याचा जोडीदार निवडण्यातील थिल्लरपणा यासारख्या गंभीर व गुंतागुंतीच्या समस्यांना लेखिका थेट भिडली आहे. त्याच्या जोडीला मतदानाचा हक्क, सामाजिक उत्तरदायित्व, कारगिल युद्ध सारख्या सामाजिक भान उत्पन्न करणाऱ्या प्रश्नांची दखल लेखिकेने घेतलेली दिसते. (डे कुटुंबियांशी एकरूप झालेला आणि विचित्र आजाराने घेरला जाऊन अकाली मृत्युमुखी पडलेला, त्यांच्या गाडीचा ड्रायव्हर विनायक यालाही या पत्रात ‘स्पेस’ दिली आहे.) या ताज्या, टवटवीत पुस्तकाचा परिचय पूर्ण करण्यापूर्वी त्यातील अनुवादाच्या ओघवत्या व खळाळत्या प्रवाहीपणाची दखल घ्यायला हवी. अपर्णा वेलणकरांनी अतिशय सुंदर आणि सरस असा अनुवाद केलेला दिसतो. त्यांनी लेखिकेच्या ‘सिलेक्टिव्ह मेमरीज्’ या पुस्तकाचा अनुवाद यापूर्वीच केलेला असल्यामुळे त्यांना लेखिकेच्या भाषेचा, शैलीचा, शब्दकलेचा आणि अभिव्यक्तितील बालस्थानांचा चांगलाच परिचय आहे. म्हणून हा अनुवाद अप्रतिम उतरला आहे. जेथे जोरकसपणा हवा तेथे थेट इंग्रजीचाच आधार अनुवादकर्तीने घेतला आहे. अनुवादातील नैसर्गिक खळाळ, औपचारिक व अनौपचारिक अभिव्यक्तीला साजेशी समर्थ शब्दकळा यामुळे ‘स्पीड पोस्ट’ अनुवाद न वाटता थेट मायबोलीत लिहिलेला ग्रंथ वाटतो. हे यश अनुवादाचे व अनुवादाकर्तीचे आहे.
बालमानस, पौंगडावस्थेतील शारीरिक व मानसिक उलघाल, यासारखे नाजूक विषय चार भिंतीच्या आड ‘मानसशास्त्रा’च्या वर्गात शिकवण्यापेक्षा त्यांना थेट जीवनानुभवातून भिडण्याची, शिकण्याची संधी नव्या पिढीला ‘स्पीड पोस्ट’च्या माध्यमातून शोभा डे यांनी दिली, याबद्दल त्यांचे अभिनंदन.
-प्रा. श्यामकांत अत्रे