- Anil Udgirkar
खुशवंत सिंगानी प्रथम म्रुत्यु संबंधी आचार्य रजनीश,दलाई लामा आदिंचे विचार नमुद केले आहेत आणि नंतर अनेक व्यक्तिं चा नमुनेदार जीवनपट व त्यांचा अंत या विषयी अतिशय शैलीदार भाषेत विवेचन केलेले.संग्रहणीय पुस्तक!
- राजू गोसावी
"मृत्यूच्या हातात कसलंस फर्मान आहे.
आज त्या यादीत कुणाची नावं आहेत कुणास ठाऊक!"
...मृत्यू...अटळ सत्य...
धडकी भरवणार ,वाईट, खिन्न मानलं जाणार वास्तव.
जीवनातील या मूलभूत वास्तवाकड पाहण्याचे निरनिराळे दृष्टिकोन आढळतात.
कुणी मृत्यू हा शेवट मानत. कुणी नव्या जीवनाचा आरंभ, तर कुणी मृत्यू हा फक्त देहरुपी वस्राचा त्याग मानतात.
कुणाला मृत्यू म्हणजे अस्तित्वशून्यता वाटते;
तर कुणाला अंतिम पूर्णविराम.....
पण देहाची चेतना संपली कि, मनाचीहीं संपते ?
आत्मा म्हणजे काय ? तो कुठं असतो ? जाणीवांच काय होत...
असे कितीतरी प्रश्न अनुत्तरीतच राहतात.
मृत्यू म्हणजे आघात, वियोग, क्लेश, दुःख, रडारडी असा हा विषय गहन गंभिर मानला जातो. मात्र या मृत्यू लेखसंग्रहात बुद्धिप्रामाण्यवादी लेखकाचे मृत्यूविषयक विचार खुसखुशीत शैलीत व रोखठोक बाण्याने प्रकट झाले आहेत.
तसच काही विलक्षण प्रतिभावंतांवर त्यांनी लिहलेल्या मृत्युलेखातून त्या त्या व्यक्तित्वाचे विविधरंगी पदर वाचकाला अस्वस्थ करतात,
हसवतात, डोळे दिपवतात ;
तर कधी अंतर्मुख करतात.
अस हे मनातल्या एका कोपर्यात दडून बसणार
पुस्तक.
- SAPTAHIK SAKAL 03-02-2007
मृत्यू आणि खुशवंतसिंग...
मृत्यू... माझ्या उंबरठ्यांशी’ हे खुशवंतसिंग यांचे अनुवादित पुस्तक वाचताना ‘मृत्यू’ या घटनेकडे पाहण्याचे मराठी साहित्यिकांचे सहजपणे आठवतात. ‘देह मृत्यूचे भातुके’, ‘मरे एक त्याचा दुजा शोक वाहे। अकस्मात तोही पुढे जात आहे’। अशा अनेक अभंग, श्लोक, ओव्यांमधून मराठी संतांनी ‘मृत्यू’या शाश्वत सत्याची जाणीव करून दिलेली आहे. अर्थात यामध्ये देहाची नश्वरता, देहाला दिलेले दुय्यम महत्त्व या गोष्टी आहेतच; पण ‘पाखरा येशील का परतून’ सारख्या कवितेत करुण विलापही जाणवतो. ‘कळा ज्या लागल्या जीवा, मला की ईश्वरा ठाव्या’ सारख्या कवितेतून ‘समुद्री चहूकडे पाणी, पिण्याला थेंबही नाही,’ ही मृत्यूसारख्या घटनेतील एकटेपणा, एकाकी असणे ठळकपणे जाणवते. ‘जन्म म्हणे आला आला। जव्हा आलं बोलावनं। मौत म्हणे गेला गेला।’ बहिणाबाई चौधरींसारखी कवयित्री जन्म-मृत्यूमधली सहजता निखळपणे सांगते. ‘पावले तुझी कातड्याची, मरणमाडी चढायची...’ अशा शब्दांत आरती प्रभू मनुष्याची मृण्मय देहाची जाणीव करून देतात. ही स्वातंत्र्यहीन अवस्था आहे हे सांगताना कवी, ‘मागे फिरू नकोस बाबा। कुठे ठेवशिल दरीत पाय।’ असे म्हणतो. अशा अनेक बाजूंनी मराठी साहित्यात मानवी मृत्यूबद्दलचे चिंतन आणि एकूणच जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आठवतो खुशवंतसिंग यांच्या पुस्तकामुळे.
‘डेथ अॅट माय डोअरस्टेप’ या मूळ खुशवंतसिंगलिखित पुस्तकाचा अनुवाद सुप्रिया वकील यांनी केला आहे. या पुस्तकात ‘मृत्यू आणि मरण’ या पहिल्या भागात मृत्यूसंबंधी दलाई लामा, आचार्य रजनीश यांनी मांडलेले विचार संकलित केले आहेत. भारताचे माजी पंतप्रधान व्ही.पी.सिंग स्वत: कर्करोगाने पीडित आहेत. ‘पाहुणा मृत्यू’ या लेखात व्ही. पी. सिंग यांनी ‘‘दर आठवड्याला मी मृत्युदेवतेला विचारतो: तुझ्यासोबत निघण्याची वेळ झाली का?’’ ती उत्तरते,‘‘नाही, अजून नाही,’’ हे उद्गार व्यक्त केले आहेत. ‘हिट लिस्ट’वर ‘तयार रहा’ यासारख्या लेखांतून मृत्यूकडे पाहण्याची सहज दृष्टी व्यक्त होते. मृतांकडून ‘ज्ञानप्राप्ती’, ‘मृत्यूनंतरचं जीवन’ या लेखांमधून मृत्यूनंतरही ज्ञानप्राप्ती शक्य असल्याची श्रद्धा व्यक्त होते. हा पुन्हा श्रद्धेचा आणि विश्वास-अविश्वासाचा भाग आहे.
पुस्तकाचा दुसरा भाग ‘मृत्यूनंतर’ हा आहे. या भागात झेड.ए.भुट्टो यांची फाशी, त्यापूर्वीच न्यायालयीन खटला, फाशीची शिक्षा निश्चित झाल्यानंतर भुट्टोंच्या मनातील निराशा, घालमेल यांचे चित्रण येते. प्रोतिमा बेदी, ‘नर्गिस दत्त’, ‘चेतन आनंद’ या चंदेरी दुनियेतील कलावंतांच्या मृत्यूसंबंधी लेख आहेत, त ‘फैज अहमद फैज’, ‘अली सरदार जाफरी’, ‘आर. के. नारायण’, ‘मुल्कराज आनंद’ इ. साहित्यिकांवर लिहिले. मृत्यूलेख दुसऱ्या भागात एकत्रित केले आहेत. ‘दादी माँ’, ‘राज विलातील छज्जूराम’ यांनी लेखकाच्या व्यक्तिगत आयुष्यातला काही काळ व्यापला आहे. खुशवंतसिंग यांनी पाळलेला ‘सिम्बा’ हा कुत्रा आणि त्याचा मृत्यू, यांचा समावेशही या लेखांमध्ये झालेला आहे.
दुसऱ्या भागातील कवी-कलावंत, देशी-विदेशी मित्र-परिचित यांचा निकटचा सहावास लेखकाला लाभलेला आहे. त्यामुळे त्यांच्यावर मृत्युलेख लिहित असताना लेखक व्यक्तीचे वैशिष्ट्य, तिच्या व्यक्तीमत्त्वाची भली-बुरी बाजू रोखठोक भाषेत मांडतो. ज्यांच्या सहवासात खुशवंतसिंग यांना वाईट अनुभव आला. त्या व्यक्तीच्या अवगुणांची परखड कबुली त्यांनी दिली आहे. मरण पावलेल्या व्यक्तीबद्दल बोलताना चांगले बोलावे, हा रूढ संकेत लेखकाने झुगारला आहे. यात एका बाजूने त्यांचे माणूसपण दिसते, पण दुसऱ्या बाजूने मरणदारी, मृत्यूनंतरही माणूस क्षमाशील होऊ शकत नाही का, माणसाच्या मनात कडवटपणा कायमच घर करून कसा काय राहतो, असे प्रश्न पुस्तक वाचताना पडतात.
खुशवंतसिंग ‘द हिंदुस्थान टाइम्स’, ‘द ट्रिब्युन’ सारख्या वृत्तपत्रासाठी लिहिणारे लेखक, भारतीय उच्चायुक्त कार्यालयात जनसंपर्क विभागाचा कार्यभार सांभाळणारी व्यक्ती म्हणून परिचित आहेत. उच्च वर्गातील माणसांचा वावर, त्यांच्या अवतीभवती असल्याच्या खुणा त्यांच्या लेखनातून जाणवतात. उच्च वर्गातील स्त्री-पुरुषसंबंधातील मुक्तपणाची चित्रे ‘मृत्यू... माझ्या उंबरठ्याशी’ या पुस्तकातून आली आहेत. दूरदर्शन, खासगी वाहिन्यांच्या माध्यमातून अहोरात्र पाझरणारी करमणूक या पुस्तकरूपाने का यावी? जागतिकीकरणानंतर सर्वत्र पसरलेल्या सुखवादातून अशा प्रकारचे रंजक चित्र पुस्तकातून आले आहे काय, असे प्रश्न मनात येतात, भीष्म सहानींवरील लेख अपूर्ण वाटतो. याशिवाय दुसऱ्या भागात कलावंतांवरचे मृत्यूलेख, लेखक-कवी, अधिकारी-उच्चपदस्थ व्यक्ती, अशी विभागणी करून लेखांचा क्रम लावला नसल्याचे जाणवते. व्यक्तींवरील मृत्यूलेखांचा एकसंध परिणाम होत नाही. कारण या लेखांचे स्वरूप त्रोटक आहे.
- DAINIK SAKAL 07-01-2007
जगण्याचा संदेश देणारा ‘मृत्यू’...
‘डेथ अॅट माय डोअरस्टेप’ हे खुशवंत सिंग यांचं सुंदर पुस्तक आता मराठी वाचकांनाही वाचायला मिळेल. ‘मृत्यू... माझ्या उंबरठ्याशी’ हा मूळ पुस्तकाची खुमारी कायम ठेवणारा सुरेख अनुवाद सुप्रिया वकील यांनी केला आहे.
या पुस्तकात मृत्यूविषयीच लेखक बोलत राहतो. खुशवंत सिंग यांनी मृत्युलेख अनेक लिहिले; पण पहिला मृत्युलेख ऐन विशीत असताना लिहिला. ‘मृत्यूनंतर’ या दुसऱ्या भागात हे मृत्युलेख समाविष्ट आहेत. तरुण हुकूमशहा संजय गांधी, मार्क्सवादी लक्षाधीश रजनी पटेल, आर. के. नारायण, प्रोतिमा बेदी, भीष्म सहानी, धर्माकुमार, चेतन आनंद यांच्यावरील मृत्युलेख विशेष वाचनीय आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रातील या माणसांची लेखकाने केलेली निरीक्षणे विलक्षण आहेत. त्यातून ती माणसे, त्यांचे कार्य नेमकेपणाने मांडले जाते.
‘मृत्यू आणि मरण’ या शीर्षकाचा पहिला भाग मला विशेष आवडला. दलाई लामांचे मृत्यूविषयक विचार, आचार्य रजनीश यांचे मृत्यूचे भय हे लेख सुन्न करतात. मृत्यूनंतरचे जीवन, मृत्यूचा अनुभव हिटलिस्ट या लेखांमधील अनुभव थरारून सोडतो. हे पुस्तक मृत्यूविषयी आहे, त्यामुळे काही काळ आपण अस्वस्थही होतो. पण वाचून पूर्ण झाल्यानंतर हे पुस्तक जगण्याचाच संदेश देत आहे, असा सुंदर अनुभव येतो.
- धरित्री जोशी
- DAINIK AIKYA 14-01-2007
‘मृत्यू’ विषयी चिंतन…
‘मृत्यू’ या विषयावर असंख्य लेख, पुस्तके आणि चर्चा झाल्या. या विषयावर लेखन केलेल्या व्यक्ती उंची गाठलेल्या होत्या. त्यांचे या विषयावरील लेखन सर्वसामान्य वाचकांना त्यांच्या आकलनशक्ती बाहेरचे वाटत होते. पण जेव्हा एखादा ज्येष्ठ पत्रकार-लेखक त्यातही खुशवंत सिंगांसारखा ज्याने जीवनाचे सगळे रंग अनुभवले, ज्याने जगभरातील सर्व क्षेत्रातील बहुतेक सर्व मान्यवरांचा स्नेह मिळविला, त्यांच्या जीवनपद्धतीचे निरीक्षण बारकाईने व जो स्वत:च एक चालती बोलती ऐतिहासिक, समाजिक व राजकीय संस्था म्हणून मान्यवर पावला, त्याने या गंभीर विषयावर आपल्या सर्वस्पर्शी अनुभवावर केलेले लेखन वाचकांना आवडेल, इतके साधे, सरळ आणि सोपे आहे.
ते स्वत: कधीच गंभीर प्रवृत्तीचे नसल्याने त्यांनी मृत्यूसारखा गंभीर विषयही आपल्या खास शैलीत मांडला आहे.
मरण कुणालाच चुकलेले नाही. मग त्यासाठी घाबरण्याचे, शोक करण्याचे कारण काय? मृत्यूचे हसत स्वागत करायला प्रत्येकाने सज्ज राहायला हवे, असे त्यांचे सरळ तत्वज्ञान आहे.
हाच मुख्य धागा पकडून त्यांनी या विषयावर लेख लिहिले आहेत. आपण स्वत: मेल्यानंतर काय घडेल, याचे कल्पनाचित्र ‘मृत्यूनंतर’ या लेखात उभे केले आहे. आपण मेल्यानंतर आपल्या मित्रांना, आपल्या चाहत्यांना काय वाटेल, आपल्या पत्नीला काय वाटेल, मित्र व आपला असंख्य चाहतावर्ग आपल्या अंतसंस्काराच्या वेळी उपस्थित राहील, की स्वत:च्या वैयक्तिक कारणांचा आधार घेत उपस्थित राहण्याचे टाळले याचे त्यांनी खुमासदार भाषेत वर्णन केले आहे. त्या काल्पनिक मृत्यूच्या संकल्पनेतून त्यांनी मृत्यू म्हणजे काय, हे सहजगत्या वाचकाला सांगून टाकले आहे. ते म्हणतात, ‘मृत्यू म्हणजे मानवी अस्तित्वाची अखेर आहे, हेच सत्य! मानवी जीवन बुडबुड्यांसारखे क्षणभुंगूर असते. माणूस जुनं वस्त्र फेकून नवं वस्त्र परिधान करतो... तसंच आत्मा ही!’ ‘माझ्या अश्रूंना स्वत:च्याच मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त करायचे होते, पण मोठ्या कष्टानं मी त्यांना रोखले होते पण त्यावेळी मला आनंदही झाला होता, असे जे ते सहज सांगून जातात ते फारच बोलके आहे.
मृत्यू आणि मरण या भाग १ मधील लेखांद्वारे त्यांनी दलाई लामा, आचार्य रजनीश, निवृत्त आयकर आयुक्त एस. प्राशेर, माजी पंतप्रधान विश्वनाथ प्रतापसिंग, प्रोफेसर ए.जे. अय्यर, दिल्ली विद्यापीठातील संस्कृतचे प्रोफेसर डॉ. सत्यव्रत शा़स्त्री यांच्या अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर, तज्ञ आणि उत्तुंग व्यक्तीशी चर्चा करून मृत्यू आणि संबंधित विषयांवरील त्यांचे विचार शब्दबद्ध केले आहेत. त्याचे हे विचार जसेच्या तसेच वाचकांना सांगतील तर खुशवंत सिंग कसले? आणि त्यात त्यांचे वेगळेपण कसे दिसणार? ते जात्याच निर्भिड व स्पष्टवक्ते असल्याने या मान्यवरांचे जे विचार पटले नाहीत, ते आपल्याला मान्य नसल्याचे सांगून टाकले आहे.
बहुतेक विचारवंत फक्त शब्दांचे खेळ मांडतात, असे मतही त्यांनी नोंदवले आहे.
मृत्यू अटळ असला तरी लोक मृत्यूबद्दल दु:ख का करतात? त्याचे भय लोकांना का वाटते? लोक प्रार्थना का करतात? याविषयी ते वाचकांना पत्रकाराच्या भूमिकेतून समजावून सांगतात. वयस्कर माणसांची जीवनशैली कशी असावी, याचेही रोखठोक शैलीत मार्गदर्शन करतात. मृत झालेल्या व्यक्तींची थडगी ही ज्ञान मिळविण्याची केंद्रे कशी होऊ शकतात, हे सांगताना त्यांची अभ्यासू वृत्ती कळते. तसेच खलिस्तानी दहशतवाद्यांची धमकी आपल्याला मिळाल्यावर आपण लेखन थांबवले नाही असे सांगून आपण निर्भिड असल्याचा दाखला देत असताना इतर कोणी मान्यवर त्यांचया ‘हिस्टलिस्ट’वर नसल्यामुळे आपला नंबर ते लावणार असल्याबद्दल आणि यामुळे हौताम्याचे प्रभामंडळ मिरविण्याची हौस भागवता येत नसल्याबद्दल ते खंत व्यक्त करतात. त्यामुळे त्यांच्या स्वभावाचे यथार्थ दर्शनच घडते. पुस्तकाच्या दुसऱ्या भागात त्यांनी विविध मान्यवरांवरील मृत्यूलेख लिहिले आहेत.
आपण एरव्ही जे मृत्यूलेख वाचतो ते सर्वसाधारणपणे संबंधित लेखकाला त्या व्यक्तीविषयी असलेल्या त्रोटक माहितीविषयी असतात.
प्रत्येक व्यक्तीला जवळून ओळखत असल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांचा परिचय असल्याने त्यांच्या विरोधकांची राजकीय परिस्थितीची माहिती असल्याने आणि त्यावेळी प्रत्यक्ष तेथे उपस्थित राहिल्याने खुशवंत सिंग यांचे ‘मृत्यूलेख’ त्या व्यक्तीचे जीवनदर्शन घडवतात. मृत्यूलेख कसे लिहावेत याविषयीचे मार्गदर्शनही होते.
त्यांनी विदेशी कवी, लेखक, कवी असदुल्लाह खान गालिब, अल्लामा इक्बाल यांची कवने, संस्कृत वचन यांचा योग्यवेळी आणि योग्य ठिकाणी वापर केला आहे. त्यामुळे त्यांचे प्रचंड वाचन व तल्लख स्मरणशक्ती यांचे दर्शन वाचकांना होते.
या ज्येष्ठ पत्रकाराचे लेख भाषांतरित करणे हे तसे अवघड काम. त्यांची खुमासदार व खुसखुशीत शैली अनुवादातून त्या लेखातील शब्दांच्या बारकाव्यासह उतरली तरच ते अस्सलतेच्या निकषावर उतरते. सुप्रिया वकील यांनी हे शिवधनुष्य अगदी लिलया पेलल्यामुळे खुशवंत सिंगांच्या अनेक वाचकांना ते आवडेल.
पुस्तकाचे मुखपृष्ठ बोलके आहे. ‘मृत्यू... माझ्या उंबरठ्याशी’ हे मृत्यूविषयीचे खुशवंत सिंगांचे मुक्त चिंतन वाचनीय ठरले आहे.
-मधुकर पुरंदरे