Prasad Natuमला आठवते आहे, 2011-14 या काळांत आम्ही कोल्हापूरला होतो,तेव्हाची गोष्ट. मी बँक ऑफ इंडियाच्या कोल्हापूर मुख्य शाखेला वरिष्ठ प्रबंधक (कर्ज विभाग) होतो. “हॉटेल कृष्णा” चे प्रपोजल आमच्या कडे आले होते. त्या निमित्ताने स्वामीकार रणजीत देसाई ह्यांचे मेव्हणे श्री.उदयसिंह शिंदे आणि त्यांचे सुपुत्र श्री. सिद्धार्थ शिंदे ह्यांचा परिचय झाला.आपले समूहाचे कर्ताधर्ता श्री. कृष्णा दिवटे सर ह्यांचा कोल्हापूर मधे कुणाशी परिचय नसेल अशी व्यक्ति भिंग घेऊन शोधावी लागेल.एक दिवस ते मला म्हणाले, स्वामीकार रणजीत देसाई यांचे गांव कोवाडला चलता का.शनिवारी,संध्याकाळी कार्यक्रम आहे.रणजीत देसाई यांची पुण्यतिथि होती. प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे देखिल येणार आहेत.त्यांचा कार्यक्रम देखील होईल.साहित्य आणि संगीत असा दुर्मिळ योग एकत्र येणं हे मोठ्या भाग्याचे.मी लगेच जाऊया म्हटले.त्या प्रमाणे साधारणतः संध्याकाळी 4.00 कडे मी,माझी पत्नी सौ भावना आणि श्री दिवटे सर आणि सौ. वहिनी असे चौघे आम्ही गेलो.तिथे बऱ्याच नवीन गोष्टी समजल्या.जसे रणजीत देसाई आणि प्रसिद्ध गायक वसंतराव देशपांडे ह्यांची घट्ट मैत्री होती.दरवर्षी कोवाड येथे त्यांचे येऊन रहाणे हे कळले.रणजीत देसाई ह्यांचे घर बघायले मिळाले,ज्याचे स्मारकांत रूपांतर झाले,त्यांचे साहित्य,त्यांचे हस्त-लिखित,राहुल देशपांडे यांच्याशी झालेली वैयक्तिक ओळख.हे सारे कधी विसरता येणार नाही.श्री.शिंदे ह्यांनी मला साहित्याची आवड म्हणून स्वामीकारांची 2-3 पुस्तके मला भेट म्हणून दिली.त्यातले एक पुस्तक म्हणजेच “बारी”.रणजीत देसाई ह्यांची पहिली कादंबरी.कथाकार म्हणून सुरुवात केलेल्या देसाई यांची ही पहिली कादंबरी. ह्या कादंबरीस प्रसिद्ध साहित्यिक श्री.वि.स.खांडेकर ह्यांची प्रस्तावना लाभली आहे.
रणजीत देसाई ह्यांनी कादंबरीचा विषय त्यांच्या दृढ परिचयात असलेला भूभाग निवडला.कोल्हापूर ते बेळगाव रस्त्यावर सुतगट्टी नावाचे गांव लागते.तिथून 15-20 किमी आंत काकती नावाचे गावं लागते.ह्या गावापर्यंत अगदी गहिऱ्या जंगलाने वेढलेली वाट ही सुतगट्टीची बारी म्हणून ओळखली जाते.त्या जंगलात गुजराण करणाऱ्या बेरड जमातीची ही कथा आहे.ही कादंबरी लिहिण्यासाठी त्यांनी ह्या भागात राहणाऱ्या बेरड जमातीचे जीवन अगदी जवळून पूर्ण सहानुभूतीने पाहिले.ही कादंबरी वाचतांना हे पदोपदी लक्षात येतं की शहरातल्या आलीशान बंगल्यात बसून चितारलेले हे ग्रामीण जीवन नाही.त्यातील प्रत्येक प्रसंगात जिवंतपणा आढळतो. कारण रणजीत देसाईनी जवळपास 3-4 वर्ष ह्या भागात राहून त्या जीवनाचा जवळून अभ्यास केला. आपल्या समोरच सारे घडते आहे असे वाटू लागते.मला आठवते आहे की ही कादंबरी मी जेंव्हा पहिल्यांदा वाचली.त्यातील पात्रांची निवड,त्यांचे स्वभाव दर्शन, निसर्ग चित्रण, तेथील समस्या आणि स्वातंत्र्यानंतर बदलत चाललेले जीवनमान.हयात कुठेही काल्पनिकपणा वाटत नाही. वि.स.खांडेकर ह्यांनी लिहिलेली प्रस्तावना त्यांच्या साहित्यिक विद्वतेचा परिचय करून देणारी आहे.सर्वसाधारणपणे आपण पुस्तक चाळतो तेंव्हा आपण प्रस्तावनेकडे दुर्लक्ष करतो.पण मित्रांनो, प्रस्तावना देखील अवश्य वाचा.ही कादंबरी तेग्या ह्या नायकाच्या अगदी तरुण वयापासून ते म्हातारपणा पर्यन्तची कहाणी आहे.पण ही कहाणी केवळ तेग्याची नसून त्याच्या भोवती फिरणाऱ्या आणि गुंफलेल्या बेरड जमातीची कथा आहे. रणजीत देसाई यांची ही पहिली कादंबरी आहे हे कुठेच जाणवत नाही.
कादंबरी वाचतांना लक्षात येते की,कोल्हापूर ते बेळगाव रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या वाहतुकीवर रात्रीच्या वेळेस दरोडा घालून आणि जंगलातून लाकडे तोडून ती विकणारी,आणि त्यावर गुजराण करणारी ही बेरड जमात.स्वातंत्र्य मिळण्याच्या आधी पासून ते स्वातंत्रोत्तर काळात ह्या जमातीच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनावर झालेल्या बदलांचे खूप सुरेख वर्णन ह्या कादंबरीत चितारले आहे.तेग्या हा गावचा नाईक असतो आणि ही वाटमारी किंवा दरोडे त्याच्या नेतृत्वाखाली घातले जातात.गावात ह्या तेग्याचा मोठा दरारा.कादंबरीच्या सुरुवातीलाच असे दाखविले आहे की,तेग्या जंगलातून वस्तीच्या रोखाने परतत असतांना,त्याला नदीच्या पाण्यात काही खळबळत असल्याची चाहूल लागते.त्याला वाटते कुणी तरी जंगली जनावर असावे.म्हणून तो शिकारीच्या उद्देश्याने तिकडे वळतो.तर नदीच्या काठाला एक व्यक्ति उभी असल्याचे त्याला दिसते.ती व्यक्ति त्याच्या भात्यातले मासे आपल्या स्वतःच्या घोंगडीच्या खोळीत टाकताना दिसते.तो त्या व्यक्तीस तसे करण्यापासून आडवायला जातो.तर त्याच्या लक्षात येत की,ती व्यक्ति म्हणजे एक स्त्री आहे.ती 15-16 वर्षाची एक तरुणी असते.ती सहजासहजी त्याचे मासे परत देत नाही.तिच्याशी झटापट करताना,त्या तरुणीच्या लक्षांत येते की,तेग्याची फरशी (हल्ला करण्यासाठीचे शस्त्र) ही झाडांत अडकली आहे.ती शिताफीने ती फरशी मिळविते आणि तेग्यावर उगारते.मी चेन्नटी गावच्या कल्लूची नात आहे अशी आपली ओळख देत, ती त्याची फरशी नदीत फेकून दिसेनाशी होते.
तेग्या काही काळ तसाच उभा रहातो.तो बेरवाडीचा नायक असतो,म्होरक्या असतो.त्याला एका तरुणीने फसवावे आणि डोळ्या समोर त्याची फरशी घेऊन जावे.हे त्याला फारसं रुचत नाही.तो बेरडवाडीत येतो.तिथे तो त्याचा मामा मल्ला सोबत रहात असतो.घरी पोहोचल्यावर त्याचा मामा फरशी बद्धल विचारतो.(ती त्याच्या वडिलांकडून आलेली वारसाने फरशी असते) तो खोटच सांगतो की चंद्रोजीस दिली.ते मामाला पटत नाही. तेग्या विचार करीत असतो की,आई गेल्यावर गेल्या काही वर्षात घरात कुणी बाई माणूस नाही.तो मामाला म्हणतो त्याला लग्न करायचे आहे.तो घडलेली सगळी हकीकत त्याला सांगतो आणि चेन्नटी गावची कल्लूची नात आहे. तिच्या बाबत काही माहिती आहे का विचारतो.मामा त्याला तिच्याशी लग्न करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करतो.कारण तिच्या भांडकुदळ स्वभावाची मामाला कल्पना असते.पण तेग्या हट्ट धरून असतो की तरी त्याला तिच्याशीच लग्न करायचे आहे.ते दोघे चेन्नटीला जातात.कल्लूला मागणी घालतात.कल्लू तेग्याच्या वडिलांचा खास मित्र असतो.कल्लू लग्नाला तयार देखिल होतो.पण त्याची नात,नागी तिचं नांव असते,ती त्याला विरोध करते.ते दोघेही कल्लूला खूप खूप बोलून निघून जातात.कल्लू त्यांचा गावाच्या वेशी पर्यन्त पाठलाग करतो आणि म्हणतो की तुम्ही तिला रात्री पळवून घेऊन जा.कारण ती तशी तयार होणार नाही.माझी काही तक्रार नाही.दोघांना ते पटते.ते दोघे आणि चंद्रोजी असे तिघेही तिला चेन्नटीला जाऊन पळवून घेऊन येतात.दुसऱ्या दिवशी सकाळी ती घरात दिसत नाही तेव्हा ती पळून गेली असे वाटते.कारण ती घरांत कुठेच नसते.तेग्या आणि मल्ला शोधाशोध करू लागतात.तेग्या आणि मल्ला चेन्नटीला जाऊन कल्लूला विचारतात की तिथे आली कां,पण ती तिथे नसते. तेग्या घरी येतो तर ती घरांत असते.ती त्याला स्वयंपाक करण्यासाठी लाकडे आणायला गेली होती असे सांगते.शेवटी ते दोघे एकमेकांना स्वीकारतात.
काळू हा खबऱ्या असतो.तो वाटमारीसाठी सावज आल्याची खबर देत असतो.एकदा चुकीची खबर आणल्याने तेग्याच्या मालकाच्या,इनामदाराच्या बैलगाड्यावर दरोडा टाकला जातो.त्यात इनामदाराची पत्नी असते.तिला पाहून तेग्या त्यांचा लुटलेला ऐवज परत करतो. इनामदारास न सांगण्याचे वचन घेतो.पण त्यांचा गडी बाळू सावकारास सर्व सांगतो. दसऱ्याला,तेग्या नेहमी प्रमाणे इनामदारास बिदागी मागण्यास जातो.इनामदार त्याला हाकलून देतात.तो माफी मागतो पण इनामदार एका अटीवर तयार होतो.तो म्हणतो सरोळीचा पाटील माझा वैरी आहे,त्याचा काटा काढ.तो तयार नसतो. कारण त्याचा जिगरी मित्र चंद्रोजी,पाटलाकडे कामाला असतो.पण तेग्या शेवटी तयार होतो.तो पाटलाचा खून करतो.इनामदार शब्द फिरवितो.त्याला वाचवत नाही आणि रु.5000/- ही देत नाही.त्याला पोलिस पकडून नेतात.त्याचा मित्र काळू त्याच्या साठी वकील करून त्याची फाशी टाळतो.पण तरी जन्मठेप होतेच.त्याची बायको नागी गर्भार असते.तो तिकडे जेल मधे असतांना,इकडे नागी मुलाला जन्म देते.13 वर्षाने तेग्या सुटून येतो तो पर्यन्त मुलगा ईश्वरा मोठा झालेला असतो. तेग्या घरी येतो.तेव्हा बरेच काही बदललेले असते. तो परत आल्या नंतर काही महिन्यातच नागी जळून मरण पावते. देशाला स्वातंत्र मिळालेले असते.त्यामुळे वाटमारीला आळा बसतो.वन विभागाचे काम सुरू होते. वृक्षतोड ऐवजी वृक्षसंवर्धनावर जोर दिला जातो.तेग्याचा मुलगा गावात एक गुरुजी असतात.त्यांच्या संपर्कात येतो.त्यांचे शिष्यत्व पत्करून त्याचे परंपरागत व्यवसाय बंद करतो.हळूहळू त्या गावातील सर्व परंपरागत व्यवसाय बंद होत जातात.लोक उदरनिर्वाहासाठी गावं सोडून बाहेर गांवी जातात. ह्या कादंबरीचा शेवट हा विशेष असा twist and turn वगैरे असलेला नाही. पण माझी इच्छा आहे की ही कादंबरी तुम्ही जरूर जरूर वाचली पाहिजे ह्या साठी शेवट सांगत नाही. मला खरोखर आश्चर्य वाटते की, ह्या कादंबरीवर आधारित एखादा चित्रपट कसा आला नाही किंवा आला असेल तर मला माहित नाही.मित्रांनी प्रकाश टाकावा.
Preeti Abnaveबारी
लेखक :रणजित देसाई
प्रकाशन :मेहता पब्लिशिंग हाऊस
पृष्ठ संख्या :180
" स्वामी"कार रणजित देसाई यांच्या सुरुवातीच्या पुस्तकांपैकी ही एक अप्रतिम कादंबरी.
कोल्हापूर ते बेळगाव दरम्यानचा जगंलातील दाट झाडींनी वेढलेला रस्ता म्हणजेच बारी ! दरम्यान सुतगट्टी नावाच गाव. बेरड जमातीची वस्ती असलेले. या जमातीचा नायक `देग्या `याचा हा जीवन प्रवास.
तारुण्यातील चिरतरुण उत्साह, कर्तृत्व ते वृद्धपकाळातील हतबल अवस्थेच सुंदर वर्णन येथे वाचावयास मिळते. कथेच्या सुरुवातीचा प्रसंग वाचताना अगदी 60-70 च्या दशकातील मराठी सिनेमातील प्रसंग आठवतात. नायक म्हणून पूर्ण वस्तीची जबाबदारी पेलणं,दिलेल्या शब्द पाळण्यासाठी केलेला त्याग हे वाचताना तत्कालीन ग्रामीण संस्कृती, परंपरा अनुभवायास मिळते.
कथा स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यउत्तर काळातील आहे, स्वातंत्र्यप्राप्ती नंतर समाजात प्रगती होण्या ऐवजी झालेली वाताहत, त्याचा समाज व लोकजीवनावर झालेला परिणाम तितकाच अभ्यासपूर्णरित्या वाचकां समोर मांडला आहे.
लेखक देसाई यांच्या लेखणीतून उतरलेली ही कादंबरी वास्तववादी आहे. "बारी" एक अप्रतिम कलाकृती प्रत्येक वाचनप्रेमीने वाचावी अशी !
Nitesh Patil#बारी - रणजित देसाई
साधे सरळ आयुष्य किती नेटानं जगलो मी
नवी आली क्रांती अन किती फरफटलो मी
बारी ही रणजित देसाई यांची पहिली कादंबरी. वी.स. खांडेकरांनी तिचं प्रास्ताविक लिहिलंय. त्यांच्याच शब्दात म्हणायचं तर... लेखक व त्याच्याशी अपरिचित असलेला वाचक यांच्यात जो अन्तरपाट असतो तो मंगलाष्टके म्हणून दूर करण्याकरिता प्रस्तावनकाराची आवश्यकता असते. आणि ते अगदी सूचक पद्धतीने प्रस्तावनेत मांडले आहे.
कादंबरी बद्दल म्हणायचं झालं तर... एक बेरड समाजातील तेग्या या कादंबरीचा नायक आहे. यंत्रयुगाकडे वाटचाल करतांना, त्याच्या समाजातील, जीवनातील होणाऱ्या बदलाची आणि त्या बदलामुळे शेवटी सर्वस्व हिरावून गाव तरुणमुक्त होते आणि गावात सरतेशेवटी म्हातारेच कुढत राहतात असा केविलवाणी प्रवास, बेरड जमातीचे परंपरागत जीवन, त्या जीवनात होऊ घातलेली स्थित्यंतरे आणि या जमातीच्या भवितव्याची काळजी या कादंबरीत आहे.
आयुष्य संपणार कधीतरी, मी जाणूनच आहे
तूर्त ओझे आठवणींचे फार मज छळते आहे
रानात पलोत्याच्या उजेडात दिसलेली नागी, त्याच्या मनाला भुरळ घालते. लग्नास तयार नसतानाही, तिच्या बाप संमतीने पळवून आणतो आणि लग्न करतो. दरोडा टाकण्याचा परंपरागत धंदा, आणि गावाचा नाईक असलेला तेग्या, एकवार चुकून सावकाराच्या बैलगाडीवरच दरोडा घालतो. ज्याकडे तो इमाने चाकरी करत होता. अर्थात ते कळल्यावर काही नुकसान न करता तो गाड्या सोडतो. पण नियती त्याच्याकडून त्याची खूप मोठी किंमत वसूल करते. सावकार त्याला शपतेत अडकवून, तुला काहीच होणार नाही ह्या शर्तीवर पाटलाचा खून करवतो.
भोळ्या तेग्याचा जीव भांड्यात सापडतो आणि तो खून करतो. त्यात त्याचा मित्र पण ओढला जातो. त्याच्या पच्छात गावाचा नाईक त्याचा मुलगा ईश्वरा असतो. अकरा वर्षे कारावास भोगून येतो तेव्हा गावाचं चित्र पालटलेलं असतं. सावकाराला जाब विचारायला जातो आणि सावकाराची बायको त्याला शपतेत अडकवते. पोराचं लग्न करतो आणि त्याच दिवशी त्याच्या घराला आग लागते आणि नागी त्यात सुनेला वाचवून स्वतः मात्र जळून मरते. जंगलात एक दिवस वणवा लागतो तो युक्तीने सारेजण विझवतात. आणि तेव्हा पासून त्यांच्या आयुष्यात एका तंत्रयुगाची एन्ट्री होते. त्यांचे आयुष्य एक अदृश्य वणव्यात दिवसोदिवस होरपळत जाते. हळूहळू गावाचं गावपण राहत नाही. गावात माणसं राहत नाही. आणि त्यांनी जीवापाड जपलेलं जंगलही बोडकं होऊन जातं.
शब्दाला जागलो मी, काय माझा गुन्हा
काळोखच राहिला, पदरी माझ्या पुन्हा
©___नित (नितेश पाटील)
Manasi Saroj"असंल हतच कुटतरी,पण लगमा कुटं दिसत न्हाई?तुमच्या संगच गेली व्हतं नवं जंगलात?
"व्हय!जंगलात गार्डानं गाठलं अमास्नी!त्येनंच लगमाला ठिवून घेटलं मागं-"
हा एक आणि असे अनेक प्रसंग अगदी मोजक्या शब्दांत तुरुतुरु पळताना बारी ही कादंबरी पूर्ण संपायची प्रचंड ओढ लागते.तेग्या म्हणजे लगमाचा सासरे आणि ईश्वऱ्या म्हणजे तिचा पती...यांचे प्रसंग झटक्यात मनात हजारो विचार आणून ठेवतात.तेग्याच्या आयुष्यात घडलेल्या एकेक प्रसंगाचा ठाव घेता येतो.तेग्याची लगमाला सोडवून आणण्यासाठीची लगबग तीव्र तिखट शब्दांत दिसून येते.तिचं एवढसं लेकरू सिद्दा एक दिवस वाट विसरते आणि घरात सगळेजण त्याच्या शोधात चिंता करत असतात..तिथे त्यांचं भयात जगणं दिसून येतं...
कादंबरीच्या शेवटी तेग्या नातवाला जुन्या आठवणींची गोष्ट सांगत होता. त्या बारीतून रात्री जाण्याची कोणाची हिंमत होत नसे इतके वर्चस्व या बेरड जमातीचे त्या वाटेवर होते.पण तरीही कादंबरी संपताना पश्चात्ताप या संपूर्ण कथेत दिसतो.
कादंबरीचा नायक तेग्या हे व्यक्तिचित्रण अतिशय सुंदररित्या लेखकाने रंगवले आहे.लेखकाची पहिली कादंबरी असली तरीही एखाद्या जुन्या सराईत लेखकासारखे लेखन खुलले आहे. हॉलीवूडसारख्या श्रीमंत कथापट लिहीणार्या लेखकालाही कथेची ओढ लागेल इतके सुंदर शाब्दिक वर्णन या कथेत वाचायला मिळते. ही कथा नाहीच..तेग्या, लगमा आणि ईश्वऱ्याच्या रुपात बेरड जमातीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या व्यक्तिरेखांचा हा कोलाज आहे हे नक्कीच!
कथाकार म्हणून साहित्यिक कारकीर्द सुरू करणाऱ्या श्री रणजित देसाई यांची पहिली कादंबरी म्हणजे `बारी` . कथा व कादंबरी हे साहित्यप्रकार मुलत: भिन्न प्रकृती धर्माचे आहेत त्यामुळे या दोन्ही साहित्य प्रकारांवर प्रभुत्व असलेले सव्यसाची ललित लेखक हाताच्या बोटांवर मोजण्याएवढेच आढळतात. श्री रणजीत देसाई त्यांच्यापैकीच एक.
आपल्या दृढ परिचयाचा भौगोलिक भाग त्यांनी या कादंबरी करिता निवडला आहे. कोल्हापूर ते बेळगाव या रस्त्याच्या वाटेवर या नावाचं गाव लागतं तिथून काकती गावापर्यंतची पंधरा-वीस महिलांची अति दाट गहिऱ्या जंगलाने वेढलेली वाट ` सुतगड्डीची बारी` म्हणून ओळखली जाते. भर दुपारी अंधारून यावं असा हा भाग. त्या बारीची,त्या जंगलाच्या आसऱ्याने वाढणाऱ्या बेरड जमातीची ही कथा आहे.
श्री. रणजीत देसाईंच्या रहिवास जन्मापासूनच खेड्यात झालेला आहे. आजही रात्रंदिवस ते यांच लोकांत वावरत आहेत. तिथल्या मातीतच त्यांची कला मूळ धरीत आहे. त्यामुळे ही कादंबरी म्हणजे सुरेख शहरी कुंडीत लावलेले खेडेगावातले फुलझाड नाही. प्रसंगांचा, निसर्गाचा, भावविश्वाचा, भाषाशैलीचा आणि या जीवनावरची जिची छाया पडली आहे त्या समस्येचा अस्सलपणा या कादंबरीत अधिक प्रमाणात आहे. या ग्रामीण जीवनात जी सामाजिक, आर्थिक, राजकीय, यांत्रिक, शैक्षणिक अशी सर्वंकष स्थित्यंतरं होत आहेत, ती सारी कधी विकट हास्य करीत तर कधी कारुण्यानं काजळून जात लेखकापुढे प्रकट होत आहेत. या जीवनाविषयी त्याला आपुलकी आहे, जिव्हाळा आहे, पोटतिडीक आहे, या जीवनाचाच एक लहानसा भाग असलेलं, बेरड जमातीचं परंपरागत जीवन, त्या जीवनात होऊ घातलेली स्थित्यंतरं आणि त्या जमातीच्या भवितव्याविषयीची काळजी या सर्वांतून `बारी` स्फुरली आहे, फुलली आहे.
Tushar Chaudhariकोल्हापूर हून मोटारीने बेळगावला जाताना वाटेवर सुतगट्टी हे गाव लागते.
तेथून काकती गावापर्यंतची पंधरा वीस मैलांची , अगदी दाट गहिऱ्या जंगलाने वेढलेली वाट "बारी" म्हणून ओळखली जाते..
बदलत्या काळाच्या सुसाट वाऱ्याने बेरड जमातीच्या जीवनमानात कमालीचा बदल झाला.
बेरडवाडीच्या चिमुकल्या जगाची सुखदुःखानी भरलेली ही एक सरळ कथा आहे..
त्याच बेरडवाडीतील नायक `तेग्या` अन नायिका `नागी` यांच्या जीवनातील संघर्ष,
तसेच जंगलाच्या आसऱ्यानं वाढणाऱ्या बेरड जमातीची अतिशय उत्तम अशी ही कथा आहे..
काल पुस्तक वाचायला घेतलेलं, आजच वाचून पूर्ण झालं..खुप छान कादंबरी आहे..
कथाकार रणजित देसाई यांची कादंबरी प्रकारातली ही पहिलीच कादंबरी..
त्यामुळे कथानायक "तेग्या" च्या रूपाने एक मित्र भेटल्याचा आनंदच झाला..😍
Sushant Deshmukhनमस्कार मंडळी, आज परत खूप दिवसांनी पोस्ट टाकतोय. दोनच दिवसांपूर्वी काही पुस्तके खरेदी केली होती रणजीत देसाई ह्यांची. त्यातलं "बारी" ही कादंबरी आज वाचून पूर्ण झाली. बारी ही रणजीत देसाई ह्यांची पहिली कादंबरी. रणजीत देसाई यांच्या ह्या आधी ४ कादंबरी वाचल्या आहेत त्यामुळे "बारी" वाचण्याची खूप इच्छा होती. "बारी" ही एका छोट्याश्या गावाची आणि तिथल्या बेरड लोकांची कथा. त्यांची भाषा, राहणीमान, जीवनाचा संघर्ष, हे अगदी सगळ उत्तम रीतीने मांडले गेले आहे. वाचताना तुम्ही त्या पात्रांमध्ये हरवून जाता. "बारी" वाचून झाली पण एक रुखरुख लावून गेली. खूप कमी लेखक असतात ज्यांच्या लिखणात अशी जादू, ताकद असते. मागच्या वेळेस अशीच रुखरुख "स्वामी" कादंबरी वाचली तेव्हा झाली होती. बेरडवाडीतला "तेग्या" आणि त्याची बायको "नागी" त्यांचा संसार, पुढे येणाऱ्या समस्या हे सगळं काही वाचताना आपण तिथे असल्याचा भास होतो. पण जेव्हा "बारी" संपते तेव्हा एक रुखरुख लागते त्याचा कारण मागे राहिलेला तेग्या आणि त्याच्या डोळ्यांसमोर उभा राहिलेला त्याचा जुना गावं.... सारं कसं अंगावर आल्यासारखं वाटतं. रिकामं घर खायला उठतं तसचं.. जास्त काही सांगणार नाही, एकदा "बारी" वाचून बघावी..
DAINIK TARUN BHARAT 25-04-2004शोषितांचं जीणं...
कथाकार रणजित देसाई यांचं मराठी साहित्यात वेगळं स्थान आहे. सामाजिक संघर्षाचं निरीक्षण, चिंतन देसाई यांच्या कथांतून होत असलेलं जाणवतं.
‘बारी’ ही देसार्इंची पहिली कादंबरी. बदलतं ग्रामीण जीवन हा विषय नवा राहिलेला नाही. तो अनेक लेखकांनी आपापल्या परीने हाताळला आहे. यंत्रयुगाचा अपरिहार्य परिणाम शहरी व ग्रामीण जीवनावर झाला. याच वाटेने जाणारी ‘बारी’ ही कादंबरी वेगळी ठरते. बेरड जमातीचं जीवन चित्रण, त्यांचं मुख्य पिळवणूक असं वरकरणी स्वरूप भासलं तरी वास्तवात इतकाच एकांगीपणा कादंबरीत नाही.
बेरवाडीचा तेग्या हा कादंबरीचा नायक आहे. त्याच्याभोवती गुंफलेली कथा ही तत्कालीन बेरड जमातीची कथा आहे. किंबहुना तळागाळातल्या सर्वच दुर्दैवी, शोषितांची ही कथा आहे. वर्षानुवर्षे चालत आलेल्या चरितार्थाच्या साधनाद्वारे ही जमात पिढ्यान्पिढ्या जगत आलेली आहे. ज्ञानाचा, संस्कृतीचा, नव्या जीवनप्रवाहाचा, देशांतर्गत घडमोडींचा स्पर्शही या जमातीला झाला नाही. या पार्श्वभूमीवर तेग्याचा मुलगा ईश्वरा नव्या वळणावरचा प्रवासी आहे. तेग्याचं जीवन अखेरपर्यंत एकाच दिशेने वाहत राहते. पण ईश्वराच्या जीवनात स्थित्यंतरे येताना दिसतात.
कादंबरीचा नायक तेग्या व त्याचे साक्षीदार दरोडे घालून चरितार्थ चालवत असतात. एकदा रात्रीच्या अंधारात चुकीने इनामदाराचं कुटुंब अडवलं जातं. तेग्या आईसाहेबांची माफी मागतो. पण बाळा महार इनामदारांपाशी चुगली करतो आणि कावेबाज इनामदार याचा गैरफायदा घेतात. सरोळीच्या पाटलाचा काटा काढण्याचा आदेश देतात. इथे तेग्या फसतो. कबूल केल्याप्रमाणे तेग्याला वकिलही देत नाहीत व पाच हजारही. अकरा वर्षांनी तेग्या तुरुंगाबाहेर येतो तो मनात सूडाची भावना घेऊनच. पण आईसाहेबांच्या शब्दाखातर तो माघार घेतो. तो पुन्हा उमेदीने पोटापाण्याच्या उद्योगाला लागतो, पण संकटं त्याची पाठ सोडत नाहीत. त्याचं घर आगीत भस्मसात होतं. इतकंच नव्हे तर नागी, त्याची बायकोही त्यात जळून जाते. असहाय्य तेग्या भ्रमिष्टासारखा होतो. दरम्यान त्याचा मुलगा ईश्वर मोठा झालेला असतो. अकरा वर्षांत बरंच काही घडून गेलेलं असतं. ईश्वराचा मार्ग भिन्न झालेला असतो. तो केंद्रावर जात असतो तेथे प्रार्थना, सूतकताई करत असतो. बेरडवाडीची तरुण पिढी, मुलं यांच्यावर केंद्रातील गुरुजींच्या विचारांचा प्रभाव असतो. बेरडवाडीत घडणाऱ्या घटनांत स्वातंत्र्यलढ्याचे, खादीधारीचे टोपीकरांचे तसेच भारताच्या स्वातंत्र्याचे, स्वातंत्र्यदिनाचे उल्लेख येतात. ईश्वरासारख्या तरुणांच्या मनात आशेचे किरण निर्माण होतात. उपेक्षित, शोषित जीवनापासून मुली मिळण्याची, स्वतंत्र, मनाचे जीवन जगण्याची आशा मनात जागी होते. कामधंदे उपलब्ध होतात, मजुरी मिळते. पण दुसरीकडे दारूसारखे व्यसन व धंदा यांनी बेरडांची पोरे बळी पडतात. नव्या कायद्याप्रमाणे जंगलतोडीच्या अपराधाबद्दल बेरडांना जबाबदार धरले जाते. जंगलाच्या गार्डकडून ईश्वराच्या बायकोवर अत्याचार केला जातो. तळागाळातल्या जमातींचे दुर्दैवाचे दशावतार चालूच राहिले होते.
प्रस्तुत कादंबरीत गेल्या अर्ध शतकातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक बदलांचे घडामोडींचे, क्रिया-प्रतिक्रियांचे चित्रण येते. टप्याटप्याने होणारे हे बदल तळागाळापर्यंत उमटणारे त्यांचे पडसाद, बदलाला सामोरं जाताना तेग्याच्या पिढीच्या प्रतिक्रिया यांचं सूक्ष्म चित्रण यात येतं. राजकीय स्थित्यंतर व औद्योगिक संस्कृतीचं वेगवान आक्रमण असा हा संक्रमणाचा काळ. समाजाच्या सर्वच स्तरात महत्त्वाचा होता. बेरड जमातींसारख्याचं परंपरागत जीवन व त्यात होऊ घातलेली स्थित्यंतरं लेखकाने टिपली आहेत. तेग्याच्या नातवाच्या तोंडची वाल्या कोळीची कथा हेच सूचित करते.
-मधुलिका
DAINIK SAKAL (KOLHAPUR) 31-10-2004‘बारी’– एक आनंद प्रत्यय...
‘स्वामी’कार रणजित देसाई यांची पहिली कादंबरी ‘बारी’ १९५९ मध्ये प्रकाशित झाली. तिची तिसरी आवृत्ती मेहता पब्लिशिंग हाऊसतर्फे हल्लीच प्रकाशित झाली आहे. भाऊसाहेब खांडेकरांची प्रस्तावना लाभलेली, ‘बारी’ आज इतक्या वर्षांनंतरही पुनहा वाचताना, एक नवा आनंद देऊन जाते.
बेळगावजवळच्या सुतगट्टी या गावाच्या जवळची पंधरा-वीस मैलांची, अगदी दाट गहिऱ्या जंगलाने वेढलेली वाट सुतगट्टीची बारी म्हणून ओळखली जाते. भर दुपारीही सूर्यकिरण जमिनीवर पोहचू नयेत इतकी घनदाट झाडी येथे होती. या झाडीच्या आसऱ्याने वाढणाऱ्या बेरड जमातीची ही जिवंत, खरीखुरी कहाणी. जंगलावर अपरंपार प्रेम करणारे बेरड, त्यांचे परंपरागत जनजीवन, बदलत्या काळाच्या झपाट्याने त्यात घडत गेलेले बदल आणि बरेच काही हरवले आहे, या जाणिवेपोटी मनाला होणारे डंख असा या कादंबरीचा स्थूल आलेख आहे.
बेरडवाडीचा तेम्या हा कादंबरीचा नायक असला तरी त्याच्या निमित्ताने बेरड जमातीत असणारे जगण्याचे, जीवन पद्धतीचे, समजुतीचे, आनंदाचे, दु:खाचे नीतीमूल्यांचे तपशीलवार संकेत येथे रसदारपणाने व्यक्त होतात. रणजितदादांनी हे सगळे सातावरण जवळून पाहिले. त्याचे सूक्ष्म निरीक्षण केले. त्यावर सखोल चिंतन केले आणि त्यातूनच ‘बारी’चा जन्म झाला.
सामाजिक परिवर्तन हा एक अटळ आणि आवश्यक भाग असतो; पण हे परितर्वन होताना भावनिक, मानसिक होरपळ होत असेल तर ती समजून घेण्यासाठी संवेदनशील मन असावे लागते. रणजितदादांच्या ठिकाणी असणारे भावनाशील मन विविध संवेदनांनी ओसंडून गेल्यामुळेच बरेडवाडीच्या तेग्याचे तारुण्यापासून वृद्धत्वापर्यंतचे जीवन उत्कटपणे समोर आले आहे. बेरडांच्या जीवनात होऊ लागलेले बदल तेग्याला मानवेनासे होतात. ते त्याला आक्रमणासारखे वाटतात. ज्याने गावाचे नाईकपण करायचे त्या ईश्वराच्या पुढाकाराने जंगलतोड सुरू व्हावी, हे त्याच्या मनाला यातनाकारक वाटते. ईश्वरा म्हणजे तेग्याचा मुलगा तेग्याला राखणदाराची नोकरी करण्याविषयी सुचवितो तेव्हा तो ठाम नकार देतो. दारूभट्टी लावली म्हणून ईश्वरावर येऊ पाहणारा आरोप स्वत:वर घेऊन तो तुरुंगात जातो. तुरुंगातून सुटून आल्यावर मुलगा व सून उदरनिर्वाहासाठी खाणीवर जात असल्याचे त्याच्या लक्षात येते. तो घरच्या लोकांना विरोध करतोच, पण जमातीच्या लोकांनाही विरोध करतो. मात्र त्यात त्याला यश येत नाही. दरम्यान, खाणीवर काही मृत्यू घडतात. घराघरांतून रडारड सुरू होते. अखेरी वाघाचे जीवन जगलेला तेग्याचा मुलगा ईश्वरा वनरक्षकाची म्हणजे एका शिपायाची नोकरी स्वीकारतो आणि गांधीवादाची दीक्षाही घेतो. एका ईश्वराचा प्रश्न या नोकरीने सुटला तरी जंगलाच्या आश्रयाने वाढलेल्या तमाम बेरड जमातीचे भवितव्य काय? बेरड जमातीची झालेली शोकांतिकाच ‘बारी’ मध्ये व्यक्त होते.
अस्सल, खरीखुरी माणसे कादंबरीत वावरतात. त्यांची देहयष्टी, रंगरूप, भाषा, सवयी, लकबी, विचारप्रवृत्ती, त्यांचे खास असे वेगळे जग यामुळे वेगळ्या प्रकारचे पण भावभावनांच्या कल्लोळांचे उत्कट जग अनुभवता येते. धाडस आणि प्रामाणिकपणा ही बेरड जातीची वैशिष्ट्ये. जशास तसे रोखठोक वागणे, दिलेला शग्द पाळणे, दुसऱ्याने फसविलेले कळताच त्याला धडा शिकविणे, अशी साढढाळ नीतीसूत्रे येथे आढळतात.
तेग्या आणि मुगी हे परस्परांवर प्रेम करणारे जोडपे. त्यांची सहज, अलवार प्रेमकहाणी, मुलाविषयीचे वात्सल्य, वडिलांविषयीचा आदर, समाजाविषयीचा जिव्हाळा यासारख्या बहुपेडी धाग्यांनी एक परिपूर्ण चित्र विणले जाते. जिवाला जीव देणारे साथीदार, जिवाचा सखा वाटावा असा मित्र, माया उधळणारा मामा, बेरकी इनामदार ही इतर पात्रे आणि गावाची ‘रहाटी हे परितोषिक रसायन यामुळे चित्राला त्रिमिती प्राप्त होते.
बेरडे समाजाची आपल्या अस्तित्वासाठी चाललेली झुंज तर येथे आहेच; पण त्याचबरोब ते जगणं सुंदर व्हावं, किंबहुंना जगण्यावरील प्रेम व्यक्त व्हावं म्हणून चाललेली आनंदमय धडपडही येथे आहे. तमाशा, उत्सव, जत्रा, शिकार, जंगलांचे वणवे, जनावरांची झुंज यासारख्या ग्रामजीवनाला वेटाळून राहिलेल्या, जातिवंत गोष्टींचे लक्ष वेधून घेणारे चित्रण कथाविषयाची रंगत वाढविते. सुतगट्टीचे डोंगर, गर्द झाडी, अरुंद रस्ते, हिंस्त्र प्राणी, वातावरणातील रंगढंग याबरोबरच स्वातंत्र्योत्तर काळातील बदलत गेलेले समाजातील वातावरण, कायदे, सुधारणा, गांधी-विनोबांचे विचार, शिक्षण, नोकरी, दारूबंदी इ. विषयांचे समयोचित भानही कथानकाशी बिलगताना दिसते. जुने धागे हळूहळू निसटावे आणि नवे अपरिचित पण अपरिहार्य नकळत स्वीकारावे लागावे, असे अभिसरण येथे घडते. एक मोठा अवकाश कादंबरीच्या ओंजळीत येतो. त्यातून फेरफटका मारताना जुने जे हरवले, जे मुठीतून निसटले याची हळहळ आणि नवे जे समोर आले त्यातून होणारी त्या समाजाची फरफट यामुळे वाचकाचा जीव व्याकुळ होतो. ही सहवेदनाच दु:खांचा श्वासोच्छवास अनुभवताना आनंद न वाटला तरच नवल. म्हणून इतक्या वर्षानंतरही ‘बारी’ वाचताना एक नवा प्रत्यय येतो.
-मंदा कदम
samidhanice books..