Shrikant AdhavDEVDAS by Sarat Chandra Chattopadhyay
देवदास’ शरदबाबूंच्या लेखणीतून साकारलेली एक अजरामर प्रेमकहाणी. ही त्यांची (१८७६-१९३८) लहान, पण गाजलेली कांदबरी.ह्या लहानशा कादंबरीतही शरदबाबूंची बहुतेक सर्व लेखन-वैशिष्ट्ये उतरलेली दिसतात. ह्यातील व्यक्तिरेखांना शरदबाबूंच्या प्रतिभेचा परीसस्पर्श झाल्यामुळे त्या विलक्षण असूनही जिवंत वाटतात. प्रेम-असूया, त्याग-लोभ, माणुसकी-अमानुषता, समंजसपणा-बेजबाबदारपणा, सेवापरायणता-आपमतलबीपणा, औदार्य-कृपणता, निरागसता-धूर्तपणा ह्या परस्पर-विरोधी भावनांबरोबरच ममता, वात्सल्य ह्या भावनांची मनोहर गुंफण ह्या कथानकात दिसून येते. वरवर अतिशय साधे वाटणारे पण बरंच काही सांगून जाणारे संवाद हे ह्या कादंबरीचं बलस्थान आहे. त्या विशिष्ट काळातील समाज हा पाश्र्वभूमी म्हणून आला असला तरी आपल्या सहजसुंदर लेखनशैलीनं शरदबाबू त्याचे सम्यक दर्शन घडवतात. शरदबाबूंची प्रासादिक भाषा थेट रसिक मनालाच हात घालते. ह्यामुळेच ही प्रेमकहाणी फक्त शोकांतिकाच न ठरता त्याही पलीकडे जाऊन पोहोचते. म्हणून आजही ती मनाला आकर्षित करते.अजरामर साहित्यकृती... दुसरं महायुद्ध हा आधुनिक जगाच्या जीवनातला एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. दुसऱ्या महायुद्धानंतर जुनं जग कोसळून पडलं आणि एक नवीन जग अस्तित्वात आलं, असं समजतात. जीवनाच्या हरेक क्षेत्रात नवी व्यवस्था, नवी मूल्यं उदयाला आली. शरच्ंद्र चट्टोपाध्याय किंवा चटर्जी हे १८७६ साली म्हणजे एकोणिसाव्या शतकात जन्मले आणि १९३८ साली म्हणजे दुसऱ्या महायुद्धापूर्वी मरण पावले. म्हणजे वास्तविक ते दोनदा कालबाह्य ठरायला हवे होते. पण तसं घडलेलं दिसत नाही. वास्तविक शरदबाबू हे बंगाली लेखक. इतर प्रांतातल्या लोकांना त्यांची माहिती असण्याचं कारण नाही. परंतु जवळपास सर्व हिंदुस्थानी भाषांमध्ये शरदबाबूंच्या कादंबऱ्या भाषांतरीत झालेल्या आहेत. एवढंच नव्हे, तर आजही नव्या लेखकांना त्यांची भाषांतरं करावीशी वाटतात नि प्रकाशकांना ती पुस्तकं छापावीशी वाटतात. याचं कारण एवढंच की; काळ कितीही बदलला तरी मानवी भावभावना चिरंतर असतात. त्या भावना जो जाणू शकतो. समर्थ शब्दांमध्ये पकडून अक्षरबद्ध करू शकतो, त्याचं साहित्य स्थळकाळाच्या बंधनांपलिकडे पोचून पिढ्यान् पिढ्यांच्या काळाजाला स्पर्श करू शकतं. देवदास’ ही शरदबाबूंच्या लेखनप्रवासातली सुरुवाती-सुरुवातीची कादंबरी. तिचा एकूण आटोप अगदी छोटा आहे. कथानक तसं म्हटलं तर अगदी साधं, गुंतागुंत नाही, व्यक्तिरेखाही पुष्कळ नाहीत, झपाटेबंद घटना नाहीत आणि तरीही ती कथा वाचकाला सुन्न करून टाकते. ‘देवदास’ हा बंगाली जमीनदाराचा मुलगा. तो आणि पार्वती लहानपणापासून एकत्र वाढलेले. पार्वतीचं घराणं आपल्या तोलाचं नाही म्हणून देवदासचे आई-वडील हे स्थळ नाकारतात. अत्यंत श्रीमंत आणि उच्चशिक्षित असूनही देवदासची आईवडिलांविरुद्ध बंड करण्याची हिंमत होत नाही. पार्वती एका श्रीमंत बिजवराची घरधनीण बनून निघून जाते. आतल्या आत घुसमटणारा, स्वत:च्या मनोदौर्बल्यावर स्वत:च जळफळणारा देवदास दारू पिऊन हृदयाची आग गमवू पाहतो. गाणारणींच्या माड्या चढतो. स्वत:च्या पायांनी तो विनाशाकडे चालत जातो. कर्त्या पुरुषाने वेळेवर निर्णय न घेणं आणि त्यामुळे अटळ विनाश ओढवून घेणं ही देवदास या व्यक्तीचीच नव्हे तर तत्कालीन संपूर्ण समाजाचीच शोकांतिका होती. किंबहुंना आजही आहे. आमच्या समाजाचे, आमच्या राष्ट्राचे बहुसंख्य प्रश्न याच निर्णय क्षमतेच्या अभावातून निर्माण झालेले आहेत. त्यांच सगळ्यात चिघळतं उदाहरण म्हणजे कश्मीर प्रश्न. वास्तविक मद्यासक्ती आणि नायकिणं माडी म्हणजे हल्लीच्या ललित लेखक घबाडच. पण व्यसनी बनलेल्या देवदासच चित्रण करताना किंवा माडी थाटून बसलेली चंद्रमुखी रंगवताना शरदबाबूंची लेखणी रेसभरही तोल सोडत नाही. शरदबाबूचा देवदास हा क्षणभरही एखादा बेवडा भाव नाही वा चंद्रमुखी ही कुणी कसबीण वाटत नाही. या दोन्ही व्यक्तिरेखा सतत विलक्षण वजनदारपणेच व्यक्त होतात. तर शरदबाबूंचं वैशिष्ट्य, हेच तर यांचं लेखणीचं सामर्थ्य. प्रस्तुत ‘देवदास’ची नवी आवृत्ती मे प्रकाशनाने प्रसिद्ध केली आहे. अनुवाद केला आहे मृणालिनी गडकरी यांनी. देवदास चित्रपटातील देवदास कादंबरीला मागणी येणार आणि मामा वरेरकरांनी केलेल्या भाषांतराची आवृत्ती दुरुस्ती झाल्यामुळे नवी आवृत्ती चांगली खपणं असा अचूक व्यावसायिक अंदाज बांधून पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. अर्थात त्या वावगं काहीच नाही. एक दर्जेदार साहित्यकृती वाचकांना उपलब्ध करून देण्याचं महत्त्वाचं काम त्यातून घडलं आहे.चित्रपटाच्या निमित्तानेच हे पुस्तक निघालं आहे. तेव्हा एकंदर विषयाच्या समजुतीस त्याबद्दलही दोन शब्द नमूद करायला हवेत. ‘देवदास’ वर प्रथम बंगाली चित्रपट निघाला. मूळ कादंबरीशी जास्तीत जास्त इनाम राहिला असल्यामुळेच खूप चालला. मग न्यू थिएटर्स कोलकत्याच्या प्रखात कंपनीने सैगलला नवा बनवून त्यावर हिंदी चित्रपट काढला मूळ कथेत काही बदल असूनही उत्तम दिग्दर्शन, संयत अभिनेता आणि सैगलची गाणी यांमुळे हा चित्रपट खूप गाजला. मग बिमल रॉयने दिलीपकुमारला घेऊन पुन्हा देवदास काढला तो साफ पडला. त्या सचिनदेव बर्मनचं संगीत गाजलं, पण ..... शरदबाबूंच्या खानदानी नायकाला रस्त्यावर बेवड्याची कळा आणली. संजय भन्साळी .... शाहरुख खान यांनी मिळून त्या बिचाऱ्या देवदास किती दीनवाणा बनवून टाकलाय याची तुलना करून पाहण्यासाठी मूळ देवदास वाचायलाच हवा. मृणालिनी गडकरी यांचं मराठी भाषांतर ... मेहतांची निर्मिती सुबक. चंद्रमोहन कुलकर्णी रेखाचित्रं आणि मुखपृष्ठ आकर्षक.
DAINIK SAKAL 17-11-2002‘देवदास’चा सरस अनुवाद...
प्रसिद्ध बंगाली लेखक शरदचंद्र चट्टोपाध्याय यांनी त्यांच्या आरंभ काळातील लेखन प्रक्रियेत ‘देवदास’ ही कादंबरी लिहिली. (सुमारे शंभर वर्षांपूर्वी) ती कादंबरी निव्वळ बंगाली वाचकांपुरतीच मर्यादित न राहता इतर भाषांतील रसिकांच्याही पसंतीस उतरली.
‘देवदास’ या छोट्याशा कादंबरीचे अनेक अनुवाद प्रकाशित झाले. मराठी रसिकांनी तिचे मनापासून स्वागत केले. ‘देवदास’ कादंबरी चित्रपट रूपातूनही अनेकदा भेटली. रसिकांनी तिचेही अगदी मनापासून स्वागत केले. शरदबाबूंनी रेखाटलेल्या हळुवार प्रेमकथेला वेगवेगळी परिमाणे लाभली. कथेचा मूळ आत्माच सशक्त असल्याने कादंबरीचा गाभाच रसिकांसमोर येत राहिला. देवदासची प्रीती म्हणूनच कुठे तरी प्रत्येकालाच भावली.
निरागस बाल्यावस्थेत असणारी बालसुलभ ओढ तारुण्यात पदार्पण करताना प्रेमात परावर्तित होते आणि विलक्षण तरल प्रेमकहाणी आकाराला येते. शेवट देवदासच्या मृत्यूने होतो; पण तो शेवट नसतोच मुळी. तेथेच त्याग, संवेदनक्षमता, उत्कटता, अनिवार्यता यांची रूपे स्पष्ट होतात.
तारुण्यात पदार्पण केलेला देवदास कोलकत्याला पोहोचता. तेथे त्याला पारूला विसरल्याचा भास होतो, भ्रम होतो; मात्र तेथेच त्याला पारूच्या ओढीतील आर्तता समजते. तिच्याशिवाय आपलं आयुष्य अपूर्ण असल्याची जाणीव होते आणि इकडे पारू विजोड भुवनबाबूचा स्वीकार करून त्याचा संसार सावरायला लागते. लग्न करून ती भुवनच्या घरात जाते खरी; पण तिच्या मनावर मात्र देवदासचे नाव कायमचे कोरले गेलेले आहे. विवाहाचा उपचार सहजपणे स्वीकारून ती जगत आहे. ती जबाबदारी तिने पेलली आहे. तिचा संयम, त्याग थक्क करणारा आहे. नवऱ्याबरोबर खोट्या प्रतिष्ठेची झूल पांघरून, खोट्या कल्पना जपत ती जगत आहे; मात्र स्वत:च्या कोमल भावनाही तिनं त्याच ताकदीने दाबून ठेवलेल्या आहेत. खोट्या प्रतिष्ठेपायी तिची देवदासशी ताटातूट होते; मात्र याला देवदासही तितकाच जबाबदार आहे. तो दुबळ्या स्वभावामुळे निर्णय घेऊ शकत नाही. पारूच्या भावनेतील अस्सलपणा त्याच्यापर्यंत पोहोचत नाही. तसेच त्याला स्वत:चं मनही ओळखता येत नाही. त्याच्यात अहंकार आहे, जमीनदारामध्ये असणारी मग्रुरी त्याच्यात आहे, मात्र परंपरेची चौकट मोडण्याचे धैर्य, बंडखोरपणा त्याच्यात नाही आणि म्हणूनच तो स्वत:ची वंचना करून घेतो आणि व्यसनात स्वत:लाच बुडवून घेऊन आत्मनाश ओढवून घेतो.
चंद्रमुखी पतिता जरूर आहे. पण सवंग नाही. तिच्या स्वच्छ मनात देवदासबद्दल अपार प्रीती आहे आणि म्हणूनच ती पारूचं त्याच्यावरचं प्रेम ओळखू शकलेली आहे. त्या काळातही तिच्यात असणारी अकृत्रिम भावना म्हणूनच वेगळी ठरते. नि:स्वार्थी चंद्रमुखी म्हणूनच लक्ष वेधून घेते. शंभर वर्षांपूर्वीच्या कालखंडातील ती म्हणूनच लक्षात राहते. मुख्य तिन्ही व्यक्तिरेखा वेगवेगळ्या आहेत; मात्र एकमेकांशी अनामिक बंधने बांधलेल्या आहेत, हे जाणवत राहते. साध्या साध्या शब्दांतून त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य उभे केले आहे. हळुवार संवाद मनाला साद घालत राहतात. तुटलेला दाह, फुलणारे मन, जळणारे हृदय, भीषण वास्तवातून आलेली व्याकुळता हे सारे अगदी ओघाने येत राहून मनाची पकड घेत राहते.
मृणालिनी गडकरी यांनी देवदासचा अनुवाद करताना सरळसं अनुवाद केलेला नाही. मूळ कादंबरीचा पोत स्पष्ट करण्यात त्या यशस्वी ठरल्यात भाषेची लय, कथेचा अंत:स्वर, मूळे कथेचा प्रवाह जपताना त्यांनी सरस अनुवाद केला आहे. संवादात असणारा सोपेपणा भिडण्याची वृत्ती जशीच्या तशी ठेवण्यात त्या यशस्वी झाल्यात. त्यामुळे एकाच बैठकीत कादंबरी पूर्ण करण्याची अनावर इच्छा रोखता येत नाही.
-प्रसाद इनामदार
DAINIK SAMANA 16-02-2003अजरामर साहित्यकृती...
दुसरं महायुद्ध हा आधुनिक जगाच्या जीवनातला एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. दुसऱ्या महायुद्धानंतर जुनं जग कोसळून पडलं आणि एक नवीन जग अस्तित्वात आलं, असं समजतात. जीवनाच्या हरेक क्षेत्रात नवी व्यवस्था, नवी मूल्यं उदयाला आली.
शरच्चंद्र चट्टोपाध्याय किंवा चटर्जी हे १८७६ साली म्हणजे एकोणिसाव्या शतकात जन्मले आणि १९३८ साली म्हणजे दुसऱ्या महायुद्धापूर्वी मरण पावले. म्हणजे वास्तविक ते दोनदा कालबाह्य ठरायला हवे होते.
पण तसं घडलेलं दिसत नाही. वास्तविक शरदबाबू हे बंगाली लेखक. इतर प्रांतातल्या लोकांना त्यांची माहिती असण्याचं कारण नाही. परंतु जवळपास सर्व हिंदुस्थानी भाषांमध्ये शरदबाबूंच्या कादंबऱ्या भाषांतरीत झालेल्या आहेत. एवढंच नव्हे, तर आजही नव्या लेखकांना त्यांची भाषांतरं करावीशी वाटतात नि प्रकाशकांना ती पुस्तकं छापावीशी वाटतात.
याचं कारण एवढंच की; काळ कितीही बदलला तरी मानवी भावभावना चिरंतर असतात. त्या भावना जो जाणू शकतो. समर्थ शब्दांमध्ये पकडून अक्षरबद्ध करू शकतो, त्याचं साहित्य स्थळकाळाच्या बंधनांपलिकडे पोचून पिढ्यान् पिढ्यांच्या काळाजाला स्पर्श करू शकतं.
‘देवदास’ ही शरदबाबूंच्या लेखनप्रवासातली सुरुवाती-सुरुवातीची कादंबरी. तिचा एकूण आटोप अगदी छोटा आहे. कथानक तसं म्हटलं तर अगदी साधं, गुंतागुंत नाही, व्यक्तिरेखाही पुष्कळ नाहीत, झपाटेबंद घटना नाहीत आणि तरीही ती कथा वाचकाला सुन्न करून टाकते.
‘देवदास’ हा बंगाली जमीनदाराचा मुलगा. तो आणि पार्वती लहानपणापासून एकत्र वाढलेले. पार्वतीचं घराणं आपल्या तोलाचं नाही म्हणून देवदासचे आई-वडील हे स्थळ नाकारतात. अत्यंत श्रीमंत आणि उच्चशिक्षित असूनही देवदासची आईवडिलांविरुद्ध बंड करण्याची हिंमत होत नाही. पार्वती एका श्रीमंत बिजवराची घरधनीण बनून निघून जाते. आतल्या आत घुसमटणारा, स्वत:च्या मनोदौर्बल्यावर स्वत:च जळफळणारा देवदास दारू पिऊन हृदयाची आग गमवू पाहतो. गाणारणींच्या माड्या चढतो. स्वत:च्या पायांनी तो विनाशाकडे चालत जातो.
कर्त्या पुरुषाने वेळेवर निर्णय न घेणं आणि त्यामुळे अटळ विनाश ओढवून घेणं ही देवदास या व्यक्तीचीच नव्हे तर तत्कालीन संपूर्ण समाजाचीच शोकांतिका होती. किंबहुंना आजही आहे. आमच्या समाजाचे, आमच्या राष्ट्राचे बहुसंख्य प्रश्न याच निर्णय क्षमतेच्या अभावातून निर्माण झालेले आहेत. त्यांच सगळ्यात चिघळतं उदाहरण म्हणजे कश्मीर प्रश्न.
वास्तविक मद्यासक्ती आणि नायकिणं माडी म्हणजे हल्लीच्या ललित लेखक घबाडच. पण व्यसनी बनलेल्या देवदासच चित्रण करताना किंवा माडी थाटून बसलेली चंद्रमुखी रंगवताना शरदबाबूंची लेखणी रेसभरही तोल सोडत नाही. शरदबाबूचा देवदास हा क्षणभरही एखादा बेवडा भाव नाही वा चंद्रमुखी ही कुणी कसबीण वाटत नाही. या दोन्ही व्यक्तिरेखा सतत विलक्षण वजनदारपणेच व्यक्त होतात. तर शरदबाबूंचं वैशिष्ट्य, हेच तर यांचं लेखणीचं सामर्थ्य.
प्रस्तुत ‘देवदास’ची नवी आवृत्ती मे प्रकाशनाने प्रसिद्ध केली आहे. अनुवाद केला आहे मृणालिनी गडकरी यांनी. देवदास चित्रपटातील देवदास कादंबरीला मागणी येणार आणि मामा वरेरकरांनी केलेल्या भाषांतराची आवृत्ती दुरुस्ती झाल्यामुळे नवी आवृत्ती चांगली खपणं असा अचूक व्यावसायिक अंदाज बांधून पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. अर्थात त्या वावगं काहीच नाही. एक दर्जेदार साहित्यकृती वाचकांना उपलब्ध करून देण्याचं महत्त्वाचं काम त्यातून घडलं आहे.
चित्रपटाच्या निमित्तानेच हे पुस्तक निघालं आहे. तेव्हा एकंदर विषयाच्या समजुतीस त्याबद्दलही दोन शब्द नमूद करायला हवेत. ‘देवदास’ वर प्रथम बंगाली चित्रपट निघाला. मूळ कादंबरीशी जास्तीत जास्त इनाम राहिला असल्यामुळेच खूप चालला. मग न्यू थिएटर्स कोलकत्याच्या प्रखात कंपनीने सैगलला नवा बनवून त्यावर हिंदी चित्रपट काढला मूळ कथेत काही बदल असूनही उत्तम दिग्दर्शन, संयत अभिनेता आणि सैगलची गाणी यांमुळे हा चित्रपट खूप गाजला. मग बिमल रॉयने दिलीपकुमारला घेऊन पुन्हा देवदास काढला तो साफ पडला. त्या सचिनदेव बर्मनचं संगीत गाजलं, पण ..... शरदबाबूंच्या खानदानी नायकाला रस्त्यावर बेवड्याची कळा आणली. संजय भन्साळी .... शाहरुख खान यांनी मिळून त्या बिचाऱ्या देवदास किती दीनवाणा बनवून टाकलाय याची तुलना करून पाहण्यासाठी मूळ देवदास वाचायलाच हवा.
मृणालिनी गडकरी यांचं मराठी भाषांतर ... मेहतांची निर्मिती सुबक. चंद्रमोहन कुलकर्णी रेखाचित्रं आणि मुखपृष्ठ आकर्षक.
-मल्हार कृष्ण गोखले
DAINIK LOKMAT 06-10-2002प्रेम करायलाही हवा असतो एक ‘देवदास’...
खूप गाजावाजा होऊन प्रदर्शित झालेला आणि अगदी काल परवापर्यंत चर्चेत राहिलेला ‘देवदास’ चित्रपट प्रसिद्ध बंगाली लेखक शरदचंद्र चट्टोपाध्याय यांच्या गाजलेल्या ‘देवदास’ या छोटेखानी कादंबरीवरून साकारला. या कादंबरीचा मृणालिनी गडकरी यांनी केलेला हा मराठी अनुवाद चांगला उतरला आहे.
चित्रपटामुळे ‘देवदास’ बाबत लोकांमध्ये जे आकर्षण निर्माण झाले आहे त्याचे औचित्य साधून हा अनुवाद प्रसिद्ध करून मेहता पब्लिशिंग हाऊसने व्यावसायिक कौशल्य तर साधले आहेच, शिवाय चित्रपट पाहिल्यानंतर किंवा चर्चेमुळे म्हणा, मूळ कादंबरी वाचण्याची जिज्ञासा ज्या मराठी वाचकांत निर्माण झाली असेल ती यामुळे पूर्ण होईल.
या अगोदर या कादंबरीचा मराठी अनुवाद मामा वरेरकर यांनी केला होता. १९३०-४० असा तो जुना काळ आहे. त्यांनी केलेल्या अनुवादाचे पुस्तक सध्या सापडत नाही. ते दुर्मिळच आहे. त्यानंतर म्हणजे सुमार ६२ वर्षांच्या काळानंतर हा मराठी अनुवाद प्रसिद्ध होतो आहे.
अत्यंत साध्या, सोप्या, सरळ भाषेची ‘नजाकत’ काय असते याचा अनुभव हा अनुवाद वाचताना लक्षात आल्याशिवाय राहत नाही. भाषेचा डामडौल न मिरवता सहज, उत्स्फूर्त अशी शरदबाबूंची भाषा अनुवादातही कायम ठेवण्यात गडकरी या यशस्वी झालेल्या आहेत. त्या-त्या भाषेचा आपला असा खास जामानिमा असतो. तो तसाच ठेवून अर्थाला आणि वळणाला धक्का न लावता अनुवाद साधणे हे कौशल्यच असते.
‘देवदास’ ही प्रेमकहाणी आहे हे सांगायला नको. प्रेमाच्या अनुषंगाने वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवर जो संघर्ष या कादंबरीमध्ये दाखविला आहे. त्यामधून मानवी परस्पर विरोधी भावनांचे विलोभनीय दर्शन अनुभवायला मिळते. देवदासची दुर्दशा प्रेमभंग झाल्याने झाली. ती तशी होणं किंवा करून घेणं याला जबाबदर कोण या प्रश्नाचे उत्तर व्यक्तीसापेक्ष असू शकेल. मात्र शरदबाबूंनी कादंबरीच्या शेवटी त्यांचं मत सांगून टाकलंय. तेच खरं मनाला चटका लावून जाते.
देवदासच्या मृत्यूनंतर त्यांनी शेवटी लिहिलंय. ‘‘आता पार्वती कशी आहे? तिचं पुढं काय झालं माहीत नाही. विचारायचीही इच्छा नाही. फक्त देवदासबद्दल खूप वाईट वाटतं तुम्ही कोणीही कथा वाचलीत तर आमच्यासारखं तुम्हालाही दु:ख होईल. जर देवदाससारख्या दुर्दैवी, मद्यासक्त, पाप्याबरोबर तुमची ओळख झाली तर त्याच्यासाठी प्रार्थना करा, त्याच्यासारखं मरण दुसऱ्या कोणाला कधीही येऊ नये, अशी प्रार्थना करा. मरणात हानी काही नाही. पण त्या वेळी एखादा प्रेमळ हात त्याच्या कपाळावर असावा, एखादा ममताळू स्नेहशील चेहरा पाहत-पाहत जीवनाचा अंत व्हावा, कोणाच्यातरी डोळ्यांतील अश्रू पाहता पाहता डोळे मिटावेत.’’
कादंबरीतील कथानकांच्या तोंडून जे संवाद घडतात ते वाचकाला विचार करायला लावतात. तशा प्रकारच्या संवादातूनच कथानक हळू-हळू फुलले आहे. देवदास आणि पारू, देवदास आणि चंद्रमुखी यांच्यातील संवाद त्यापैकीच. चंद्रमुखी आणि देवदास यांची अखेरची भेट होते. त्यावेळचा दोघांमधील संवाद साधा, सरळ वाटला तरी अर्थपूर्णतेमुळे तो वाचकांना निश्चितच भावतो.
चंद्रमुखी थोडी थांबली. मग आवंढा गिळून म्हणाली, ‘‘मी आयुष्याचा बराच काळ प्रीतीचा धंदा करण्यात घालवलाय. पण प्रेम एकदाच केलंय, ते प्रेम फार किमती आहे. ती खूप शिकले. प्रेम वेगळं आणि रुपाचा मोह वेगळा. ह्या दोघांत गोंधळ केला जातो. पुरूषच तो जास्त करतात. रुपाचा मोह तुमच्यापेक्षा आम्हाला कमी असतो. म्हणूनच आम्ही तुमच्यासारख्या मस्तवाल होत नाही. तुम्ही बोलण्यावागण्यातून प्रेम दाखविता. पण आम्ही बोलत नाही. आमच्या मनातलं दु:ख कोणाला दिसत नाही.’’ (पृष्ठ ८५)
ही प्रेमकहाणी असूनही भाषेतील सुसंस्कृतपणा शेवटपर्यंत थोडाही ढळलेली नाही. विसाव्या शतकाच्या आरंभीचा बंगाली ढाच्याचा काळाचा संदर्भ असल्याने त्या काळातील सामाजिक रुपरेषाही ही कादंबरी वाचताना लक्षात येते.
‘देवदास’बद्दलची केवळ जिज्ञासा म्हणूनच नव्हे तर प्रासादिक शैलीतील एका उत्तम साहित्यकृतीचा अनुभव घेण्यासाठी मराठी वाचकांनी हा अनुवाद वाचायलाच हवा.
-प्रसाद शां. पोतदार
DAINIK PUDHARI 08-09-2002कोवळ्या तारुण्यातील भाव भावनांचा सुंदर अविष्कार ‘देवदास’...
शरदचंद्र चट्टोपाध्याय यांनी एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस लिहिलेली ‘देवदास’ ही कादंबरी म्हणजे कोवळ्या तारुण्यातील भाव भावनांचा सुंदर अविष्कार आहे. या कादंबरीवर आधारित दोन चित्रपट निघाले. दोन्हीही खूप गाजले. दुसऱ्या म्हणजे सध्या सुरू असलेल्या ‘देवदास’ साठी तर पन्नास कोटी रुपये करण्यात आले आहेत. मग ही देवदास कादंबरी मूळ आहे तरी कशी? हे जाणून घेण्याची वाचकांची तीव्र इच्छा लक्षात घेऊन, योग्य वेळ साधून अतिशय तत्परतेने या बंगाली कादंबरीचा मराठी अनुवाद ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’ने करवून घेतला. मृणालिनी गडकरी यांनी हा अनुवाद मूळ कादंबरीतील भाव-भावनांच्या बारकाव्यासह अगदी नेमकेपणाने केला आहे. ही अप्रतिम कादंबरी मराठी वाचकांना दिल्याबद्दल सुनिल मेहता यांनी धन्यवाद दिले पाहिजेत. कादंबरीचे मुखपृष्ठ अतिशय आकर्षक आहे. प्रत्येक प्रकरणाला सुरुवातीला दिलेली चित्रे, अतिशय बोलकी आहेत. आमनिर्मिती असलेले हे पुस्तक अधिकच सुंदर झाले आहे.
‘देवदास’ची कथा तशी छोटीच आहे. एकाच खेडेगावात शेजारी शेजारी राहत असलेले देवदास आणि पार्वती हे बालपणीचे साथीदार. देवदास पहिल्यापासून विक्षिप्तच वागतो, खोड्या करतो. त्याच्यासाठी पार्वती आंब्याच्या बागेतील बाजूला बांबूच्या वनात येऊन त्याला जेवण पोहचवते. तो तिथं चोरून हुक्का ओढत असतो. एकदा देवदासनं तिला खूप मारलं होतं. देवदासने शाळा सोडल्यावर तीही शाळा सोडते. पारूचं त्याच्यावर अतोनात प्रेम होतं. देवदास शिकायला जाताना ती खूप रडते. त्याच्या पत्रांची ती अगणित वेळा पारायणं करते. देवदास-पारूचे संबंध खटकू लागतात ते देवदासच्या आई-वडिलांना पारूच्या आईचा घोर अपमान करून ते तिला झिडकारतात. पारूची आई पारूच्या लग्नाची तयारी करू लागते तरीही पारू शांतच असते. तिचा देवदासवर प्रचंड विश्वास असतो. म्हणूनच मध्यरात्री त्याला भेटायला ती एकटीच जाते. देवदास कलकत्त्याला जाऊन पार्वतीला पत्र लिहितो. मला माझ्या आई-वडिलांचेच ऐकावे लागेल. तुझं घराणं हलकं आहे. तुमच्यात मुलीचा हुंडा घेतात. मी तुझ्यावर प्रेम केलं असं मला वाटत नाही. या पत्राने तो जणू तिचे संबंधच तोडतो. हे पत्र म्हणजे त्याच्या पुढील शोकांतिकेची नांदी होय. कारण पारू त्याला झिडकारते. म्हणते, ‘‘मी सुंदर आहे. लग्नानंतर श्रीमंतही होईन. तुझ्या आई-वडिलांना मान सनमान आहे माझ्या नाही?’’ पारूची यावेळची करारी व्यक्तिरेखा उत्तम चित्रित केली आहे. पार्वतीचं लग्न प्रौढ वयाच्या, मोठी मुलं असलेल्या भुवन चौधरी या जमीनदाराशी होते. देवदास दारूच्या आहारी जातो. नाचगाणी करणाऱ्या चंद्रमुखीला त्याच्यातला वेगळेपण जाणवतो. ती त्याच्या प्रेमातच पडते. देवदासला व्यसनापासून दूर करण्याचा प्रयत्न पारू व चंद्रमुखी दोघही करतात; पण त्यात अपयश येते. शेवटी पारूच्या दारात येऊन तो बेवारशासारखा मरण पावतो. कथा छोटीच; पण व्यक्तिरेखा उत्तुंग आणि जिवंत आहे. शरदबाबूंच्या प्रतिभेने साकार झाल्याने विलक्षण वाटतात. प्रेम, असुया, त्याग, लोभ, माणुसकी, अमानुषता, समंजसपणा, औदार्य, ममता, धूर्तपणा या भावनांची सुंदर गुंफण या कादंबरीत दिसून येते. संवादात नेमकेपणा आहे. शरदबाबूंची प्रासाविक भाषा प्रभावी ठरते. ती बेजड नाही. व्यक्तिरेखा असतील तशीच त्यांची भाषा आहे. संवाद हे पात्रांची व्यक्तिरेखा पटकन सांगून जातात. ‘मरायचंच ठरवल्यावर विष कडू का गोड असा विचार कोणी करतं का?’ हा संवाद बरंच काही सांगून जातो. शेवटी लेख लिहितो ‘मरणात काही हानी नाही पण त्यावेळी एखादा प्रेमळ हात कपाळावर असावा, कोणाच्या तरी डोळ्यातील अश्रू पाहत मरण यावे’ हे जीवनाचे चिंतन नव्हे काय.’ देवदासचा मृतदेह डोंब नेतो. पशु-पक्षी अर्धवट जळलेल्या देहाचे लचके तोडतात. हे भीषण चित्रण मन हलवून सोडते.
-ज्ञानेश्वर म. कुलकर्णी
DAINIK KESRI, SANGLIएक अजरामर प्रेमकहाणी...
देवदास या चित्रपटाने सध्या उत्पन्नाचे उच्चांक प्रस्थापित करून सर्वांना चकित केले आहे. शरदचंद्र चॅटर्जी यांनी १९१० मध्ये लिहिलेल्या आणि १९१७ मध्ये प्रसिद्ध झालेल्या या कादंबरीवर आजवर वेगवेगळ्या भाषांत आठ चित्रपट निघाले. एकूण देवदासची ही जी लोकप्रियता आहे ती मूह कादंबरीची आवाहकता प्रकट करते, हे मान्य करायलाच हवे.
देवदास ही तशी अवघी शंभर पृष्ठांची छोटीसी कादंबरी आहे. अनेक भारतीय भाषांमध्ये तिचा अनुवाद झाला आहे. आपल्या प्रेयसीशी लग्न करण्याचे धाडस न दाखवता आल्याने इतरत्र सुखाचा शोध घेणारा परंतु मूळच्या प्रेयसीच्या व प्रेमाचा विसर न पडणारा आणि त्याच दु:खात अखेर भग्न मनस्क होऊन शोकांतिक वाटचाल करणारा एक मनस्वी प्रियकर म्हणजे देवदास. अशी त्याची प्रतिमा भारतीय जनमानसात स्थिरावली आहे. मृत्यु समोर येऊन उभा ठाकल्यावर देवदास जीवाच्या आकांताने आपल्या विवाहित प्रेयसीच्या गावी येतो आणि तेथेच एका पारावर त्याला मृत्यू येतो, हा चटका लावणारा शेवट आजही सहृदय वाचक-प्रेक्षकाला सैरभैर करून सोडतो. शरदबाबूंच्या अगदी आरंभीच्या लेखनापैकी ही कादंबरी आहे. परंतु तिच्यातही त्यांच्या जबरदस्त लेखणीची प्रतिभेची ताकद दिसते. आवारा मसीहा या त्यांच्यावरील चरित्रात्मक पुस्तकात देवदासच्या प्रकाशनाची हकीकत देण्यात आली आहे. शरदबाबूंनी आपल्या मित्राला हे हस्तलिखित लिहून झाल्यावर सात वर्षांनी दिले. कोणालाही न दाखवता व जाळून टाकण्यास सांगितले. त्या मित्राने ते वाचले आणि सरळ एका मासिकाच्या संपादकाकडे दिले. क्रमश: चार अंकात त्याने ते छापले. पहिल्या अंकातील आरंभीच्या भागानेच वाचकांना झपाटून टाकले आणि पुढच्या अंकासाठी त्या मासिकाच्या कार्यालयापुढे रांगा लागू लागल्या. देवदास, पार्वती आणि चंद्रमुखी या त्रिकोणात जणू त्यावेळच्या तरुणवर्गाच्या मानसिक कोंडीलाच वाचा फोडली. प्रेमभावना प्रकट करण्यातील त्यावेळच्या संकोच आणि सरंजामी समाज जीवनातील श्रेष्ठ-कनिष्ठपणाच्या कल्पनांचा पगडा यामुळे आपल्या स्वाभाविक ऊर्मीहि दडपण्याचा तो काळ होता आणि त्याचे यथार्थ प्रतिबिंब शरदबाबूंच्या ‘देवदास’ मध्ये जाणवत होते.
शरदबाबूंची वाङ्मयसृष्टि ही शोकाच्या ढगांनी व्यापलेली असली तरी त्यांच्या पात्रांना कधी पराभूत मनोवृत्तीचा स्पर्श होत नाही. ही पात्रे पराभूत होत नाहीत, म्हणूनच ती दु:खी आहेत. ती पराभूत झाली की सुखी होतील. कारण ज्या वेदनांनी ती तडफडत असतात त्या वेदना त्यांच्यावर कुणी लादलेल्या नाहीत. त्यांनीच त्या आवाहन करून बोलावलेल्या आहेत. त्या क्लेशांनी त्यांची दीप्ति वाढते. म्हणून दु:खाविरुद्ध येथे तक्रार नाही. व्यथा लिप्तता निर्माण करीत नाही, तिथे व्यथेला माधुर्य आलेले आहे. शरदबाबूंची कादंबरी जीवनाकडे पाहण्याचे मुल्यच बदलून टाकण्याचा प्रयत्न करणारी कादंबरी आहे. ती दृष्टिकोनच बदलू इच्छिते, असे प्रा. नरहर कुरुंदकर यांनी म्हटले आहे.
पारुचे लग्न होते आणि... चंद्रमुखीकडे देवदास येत-जात राहतो, दारूच्या आहारी जातो, पण तिला हे कळून चुकते की, तो आपल्याकडे पाहत नाही, आपल्यात पार्वतीचेच रूप पाहतो आहे. शुद्धीवर असताना तो कधीही तिचा स्पर्श होऊ देत नाही. देवदासने शेवटी पार्वतीच्या गावी येऊन पारावर बेवारशी म्हणून मरणे ही घटना कोणत्याही सहृदय वाचकाच्या अंत:करणात पीळ पाडणारी आहे आणि शरदबाबू शेवटी म्हणतात, ‘तुम्ही कोणी ही कथा वाचलीत, तर आमच्यासारखं तुम्हालाही दु:ख होईल. देवदासच्या दुर्दैवी, मद्यासक्त पाप्याबरोबर तुमची ओळख झाली, तर त्याच्यासाठी प्रार्थना करा. त्यांच्यासारखं मरण दुसऱ्या कोणाला येऊ नये, अशी प्रार्थना करा. मरणात हानि काही नाही; पण त्यावेळी एखादा प्रेमळ हात त्याच्या कपाळावर असावा, एखादा प्रेमळ चेहरा बघत असावा, कोणाच्या तरी डोळ्यातील आसवे पाहता पाहता डोळे मिटावेत.’
आज नव्वद वर्षांनंतरही वाचक-प्रेक्षकांना देवदासची वेदना अस्वस्थ करू शकते, हे तिच्या विश्वात्मकतेचे गमक आहे.