- Nitin Marathe
अभिनय व लेखनाची आवड , प्रथमोपचारा चे ज्ञान आणि सामान्य लोकांच्या भले पणावर विश्वास असणारा हा तरुण. प्रस्थापित सत्ते विरूद्ध उठाव करता करता वाईट संगतीमुळे ड्रग च्या नशे चा बळी,त्या मुळे बँका लुटायचे सत्र , घट स्फोट व शेवट तुरुंगात.
पण नंतर हा ऑस्ट्रेलिया मधून तुरुंग फोडून फरार होतो व बनावट पासपोर्ट वर 1982 मध्ये भारतात प्रवेश करतो.
मुंबई मध्ये काही दिवस सामान्य हॉटेल मध्ये राहिल्यावर मराठी मित्राबरोबर जळगाव च्या जवळ मित्रा च्या गावात सहा महिने मुक्काम. या दिवसात मराठी वर शिव्यांच्या बारकाव्या सहित प्रभुत्व.
इथेच मित्रा ची आईने शांताराम असे बारसे करते.
गावाकडून परतल्यावर कुलाब्याच्या झोपडपट्टीत मुक्काम कारण बरोबर आणलेला पैसा खतम. तिथे याच्या लिंडसे या नकली नावाचे " लिन बाबा " असे नामकरण त्याचा मित्र करतो.विदेशी नागरिकांना currency बदलून देणे ,गांजा हशीश पुरवणे असे उद्योग करून गुजराण करू लागतो. या ही दिवसात झोपडपट्टीत प्राथमिक वैद्यकीय सेवे करता दवाखाना चालवतो आणि तेथील स्थानिक लोकांच्या जीवनाशी सर्वर्था ने एकरूप होऊन जीवनाचा आनंद घेत असतो .
या माणसाने मुंबई तील फोर्ट भागातील गल्ली न गल्ली पाया खालून घातली. लिओपोल्ड या इराणी कॅफे / बार मध्ये तासन तास विदेशी मित्रां बरोबर पडीक. मुंबई तील गुन्हेगारी,त्या मध्ये इराणी , अफगाणी , लेबानिस , पाकिस्तानी आणि नायजेरी टोळ्यांचा सहभाग. विदेशी चलन , बनावट पासपोर्ट / विसा , ड्रग राकेट आणि वेश्याव्यवसाय या सर्व गैर धंद्या ची सखोल माहिती. या सर्व गोष्टी वाचून आपण चकित होऊन जातो. आपल्याला मुंबई च्या गुन्हेगारी विश्वाचे नागडे दर्शन होते.
या नंतर त्याचे प्रेमप्रकरण आणि मैत्रिणी करता कुंटन खान्या च्या मॅडम बरोबर पंगा घेतल्या मुळे हा हकनाक आर्थर रोड च्या जेल मध्ये पिचत पडतो. जेल मधले त्याचे अनुभव वाचून अंगावर अक्षरशः शहारे येतात.
local डॉन पैसे देऊन याची सुटका करवतो. नंतर हा त्या डॉन साठी foreign currency आणि बनावट पासपोर्ट च्या धंद्यात काम करू लागतो. आता पैसा त्याच्या पायाशी लोळत असतो.
या पुस्तकात जागोजागी जीवन , मित्र, प्रेम आणि ईश्वरा विषयीचे तत्वज्ञान , भारतीय लोकां चा जगण्यातल्या साध्या साध्या गोष्टीचा आनंद घ्यायची वृत्ती आणि मुंबई तील झोपडपट्टी मधील दादागिरी ते आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी अशा वेगवेगळ्या गोष्टी हातात हात घालून वावरत आहेत. कौतुक याचे वाटते की हा विदेशी माणूस झोपडपट्टी किंवा भारतातली गरिबी याची तक्रार करत नाही तर येथील लोकांच्या जिंदादिली मुळे , आयुष्य जगणं कसे सोपे होते ते सांगतो.
भारतीय लोक दिवस भर हिंदी गाणी गात , चित्रपट बघत , वेग वेगळे सण साजरे करत जीवनाचा उत्सव करतात असे त्याला वाटते. आजही मुंबई ला तो आपले Home town मानतो.
शेवटी तो डॉन च्या आग्रहा मुळे अफगाणिस्तान मध्ये तेथील युद्धात भाग घेण्यास जातो. हा सर्व भाग अविश्र्वनिय आहे.
शेवटी ही एक कादंबरी आहे पण यातील बराचसा भाग लेखकाने अनुभवला आहे.
आपल्याच मुंबई ची आणि तेथल्या रगेल आणि रंगेल जनतेची ग्रेग आपल्याला वेगळीच ओळख करून देतो.
आणि सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे ...
मराठी वर प्रेम करणाऱ्या ग्रेग ने मराठी अनुवाद केलेली प्रकरण ऐकून हे भाषांतर आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट भाषांतर आहे अशी अपर्णा वेलणकर यांना पावती दिली. कारण ही कादंबरी 38 भाषांमध्ये translate झाली आहे.
अपर्णा ताईंचे कौतुक जेवढे करावे तेवढे थोडेच , कारण आपण अस्सल भारतीय गोष्ट वाचतोय असे वाटते.
- Swamish Naik
हे पुस्तक काही वर्ष आधी वाचाय चा योग्य आला ... खूप पाने आहेत आधी तर उचलू कि नाही असा झाला ... पण लेखकांची अक्खी दुनिया भावली आहे खिळली आहे ... काय ते लिखाण काय ती पात्र वाह !
- Shriprasad Kulkarni
लॉकडाउन च्या पार्श्वभूमीवर पुण्यावरून गावाकडे निघत असताना माहीत होतं की हा मोठ्ठा टप्पा, त्यात घरातून काम (वर्क फ्रॉम होम) त्यात आमच्या सिटीबँकेच्या च्या रामनवमी, पाडवा, महावीरजयंती या आणि अश्या बऱ्याच सणांच्या सुट्ट्यामुळे महिनाभरात जवळपास फक्त 10-12 दिवस ऑफिस. घराबाहेर कोरोना. त्यात वडील मोबाईल मध्ये जास्त डोकं घालू देत नाहीत. ☺️ तर घरात हा इतका वेळ घालवायचा तर पुस्तकच पाहिजे, तेही तितक्याच तोलामोलाचं. खिळवून ठेवणारं. मागे जवळपास सहा महिन्यांपूर्वी अविनाश धर्माधिकारी सरांनी "शांताराम" च्या अपर्णा वेलणकर यांनी केलेल्या मराठी अनुवादाचा उल्लेख केला होता. सरांनी सांगितलं म्हणून मागवलं पुस्तक. पुस्तक 1400 पानांचं, म्हणून वाचायची ताकत झाली नाही कधी.फक्त घरातल्या बुक शेल्फ ची शोभा वाढवत होतं. पण या अश्या मोकळ्या आणि निवांत वेळेसाठी पुस्तक कोणतं घ्यायचं, लागलीच "शांताराम" डोक्यात आलं,म्हणून गावाकडे निघताना उचललं आणि टाकलं गाडीत. तर "शांताराम" लिहिलंय ग्रेगरी डेव्हिड रोबर्ट्स यांनी. हो लेखक विदेशी आहे, ऑस्ट्रेलिया चा. मागे पाचएक वर्षाखाली शांताराम ची मूळ इंग्रजी आवृत्ती वाचलीय. त्यावेळेस उद्देश होता इंग्रजी वाचुन इंग्रजी सुधारण्याचा. खरंच फरक पडला. एकाच पुस्तकात थरार आहे, रोमान्स आहे, साहस- ऍडव्हेंचर तर आहेच सोबत आहे तत्वज्ञान तेही तुम्हा आम्हाला रुचेल आवडेल पटेल अश्या भाषेत. त्यामुळे पुस्तकाचा जॉनर- शैली सांगणं अवघड.
असो, "डेव्हिड" कथेचा नायक, स्वतः लेखक - जेमतेम विशीतला. सशस्त्र दरोड्याचा गंभीर आरोपाखाली वीस वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा झालेला, ऑस्ट्रेलियातील तुरुंग फोडून पळाला, ऑस्ट्रेलिया चा "मोस्ट वॉन्टेड मॅन" ज्याचं नाव इंटरपोल च्या यादीतही आहे. न्युजिलँड मार्गे लिंडसे नावाने बनवलेल्या बनावट कागदपत्राद्वारे सत्तरीच्या च्या दशकात मुंबईत येतो. आणि पुस्तकाच्या पहिल्या पानापासून थरारक कहाणी सुरू होते. "लिंडसे" मुंबईत पाऊल टाकतो आणि या शहराच्या प्रेमात पडतो. मुंबईत आल्या आल्या गाईड म्हणून प्रभाकर उर्फ प्रभू त्याला भेटतो, नंतर तो त्याचा एकदम जवळचा मित्रही होतो. प्रभाकर लिंडसे ला "लिन" असं नाव देतो. कार्ला सारखी मैत्रीण भेटते सोबत डीडीयर, उल्ला, मोदेना या पत्रांभोवती कथा फिरत राहते. कार्ला च्या एकतर्फी प्रेमात पडतो. गाईड प्रभूचं काम असतं मुंबई ची ओळख करून देणं, इथली चाल चलन शिकवणं. प्रभुही एकदम हाडाचा गाईड, तो शहरातल्या वैध अवैध गोष्टी कश्या चालतात याची एका पाठोपाठ रोज एका ठिकाणी घेऊन जाऊन माहिती देतो. त्याला मराठी शिकवतो हिंदी सुद्धा. प्रभू लिन ला मुंबई सोडून खरा भारत कसा आहे हे दाखवायला त्याच्या जळगाव जिल्ह्यातल्या त्याच्या गावी घेऊन जातो. लिन च्या नजरेतून गावाची संस्कृती वाचायला मजा येते. लिन साठी भारतीय पद्धतीने तांब्याने बकेटातील पाणी खांद्यावर घेऊन अंघोळ करायचा अनुभव सुद्धा एकदम नवीन असतो. पिके चित्रपटातील परग्रहावरून आलेल्या पिकेप्रमाणे लिनबाबा ची अवस्था असते. परत मुंबई. परत कार्ला, उल्ला, डीडीयर,मोदेना आणि अशी इतर पात्र येत राहतात, आणि पुढे अंडरवर्ल्ड चा थरार, वेश्याव्यवसाय, ड्रग्स हे सर्व चालू असतंच पण मुळात शांताराम मध्ये आहे प्रेम. प्रेम- दोन मित्रातलं, प्रेम- इथल्या लोकांवरचं, प्रेम-मुंबई शहरावरचं, भारतीय संस्कृती वरचं. इथल्या भाषेवरचं. मग त्याला इतकं सगळं इथलं आवडलंय तर लिन परत ऑस्ट्रेलिया जातो का? तो इतक्या मोठ्या बेस्ट सेलर पुस्तकाचा लेखक झाल्यावर त्याला त्याचा देश स्वीकारतो का? की राहतो इथेच आपल्या देशात. यांची उत्कंठा शेवट पर्यंत असतेच पण त्यासोबत आणखीन एक प्रश्न पूर्ण पुस्तक वाचत असताना सतत आपल्या डोक्यात असतो, पुस्तकाचं नाव "शांताराम" कशामुळे? कारण एकही पात्र नाहीये ज्याचं नाव शांताराम आहे. त्याचं उत्तर मिळतं पुस्तकाच्या मध्यात. मराठी अनुवाद माझाही अजून पूर्ण वाचून झाला नाहीये. पण इतकं मात्र नक्की. "शांताराम" हातात घेतला की खाली ठेववत नाही. खिळवून ठवतो.
वाचनीय आणि संग्रहनिय असं पुस्तक.
- Hemant Suryavanshi
ग्रेगरी राॅबर्ट ची "शांताराम" उत्कृष्ट आहे....
- महेश मांगले, पुणे
आपल्या ग्रंथांचा मी एक वाचक आहे. सर्वसामान्यपणे वाचक हे लेखकांना पत्र लिहून ग्रंथाबद्दलच्या प्रतिक्रिया कळवतात. मी सुद्धा काही लेखकांना आवर्जून पत्रे लिहिली आहेत. मात्र आपणासारख्या प्रथितयश प्रकाशकाला पत्र लिहिण्याची ही माझी पहिलीच वेळ. त्याला कारणीभूत ठरली ती आपण प्रकाशित केलेली `शांताराम` ही आत्मचरित्रात्मक कादंबरी.
`शांताराम` मी विकत घेतलं त्यावेळी माझ्या मनात धाकधूक होतीच. ते चाळलं त्यावेळी भाषांतर उत्कृष्ट आहे हे जाणवलं होतं, तरीही संपूर्ण ग्रंथ कसा असेल याचं दडपण मनावर होतंच. प्रत्यक्षात शांताराम वाचत गेलो तेव्हा आश्चर्याने थक्क झालो. संपूर्ण ग्रंथ वाचून झाला तेव्हा मराठी साहित्यातलं हे सर्वोत्कृष्ट भाषांतर आहे याबद्दल माझी खात्री पटली. ग्रंथाची निर्मितीमूल्ये उत्कृष्ट आहेत. सवलतीची किंमत सुद्धा अवाजवी नाही. ग्रंथ सर्वांगसुंदर आहे. त्याचा विषय अस्वस्थ करून टाकणारा आहे. त्यातले कित्येक प्रसंग आतड्यांना पीळ पाडणारे आहेत. त्याचं भाषांतर अत्यंत प्रवाही व रसरशीत आहे. चौदाशे पानांचं हे भाषांतर वाचून मला भाषांतरकार अपर्णा वेलणकर यांचा हेवा वाटला. इतक्या प्रदीर्घ भाषांतरात अपर्णातार्इंनी आपली लेखणी सतत प्रवाही ठेवून ग्रंथाची वाचनीयता कुठेही कमी होऊ दिलेली नाही. कुठलेही पान उघडून पाहिलं तरी त्याची वाचनीयता तत्क्षणी जाणवतेच.
- DAINIK DESHDOOT, NASHIK 30-01 -2011
शांतारामचे शांत वादळ…
शांताराम नावाचं एक भलं मोठं पुस्तक हाती लागलं. या पुस्तकाला हातात उचलता येत नाही. शांताराम हे पुस्तक भौतिकदृष्ट्या सुध्दा जड वजनाचे आहे आणि निर्धार-अर्थाने वैचारिक परिपक्वतेनेही चांगलच जड आहे. ते एक व्यक्ती चित्रण तर आहेच परंतु त्याबरोबरचं मुंबईच्या झोपडी जगाचे सर्वांग सुंदर चित्रण आहे. झोपडीचे कसले आलेय वर्णन? झोपडपट्टीच्या विश्वात राहणारी माणसं त्यांचे व्यवसाय, त्यांची माणुसकी, त्यांची कार्यपध्दती त्यांचे रांगडेपण सगळं एका विदेशी व्यक्तीच्या अनुभवातून समोर आले आहे. ग्रेगरी डेव्हिड रॉबर्टस् या ऑस्ट्रेलियातून तुरुंग फोडून आलेल्या एका परदेशी माणसाचे मुंबईतल्या वास्तवाचे हे अनोखे लेखाचित्र आहे. एक परदेशी कैदी मुंबईला येतो काय इथलाच एक होऊन रहातो काय सगळीच विलक्षण कहाणी! या ग्रेगरीला एक मराठमोळी प्रौढा शांताराम हे अनुरुप नाव बहाल करते. प्रभाकर, कादरभाई, रुख्माबाई अबुल्ला, खलिद अन्सारी सगळे आपल्याबरोबर तंतोतंत उभे राहतात. कॉर्ला, लिसा या परदेशी मुलींचे अनुभव, त्यांचे भरकटणे, ग्रेगच्या मदतीने पुन्हा उभे राहणे सगळचं चित्तथरारक आहे. ग्रेगने झोपडपट्टीत चालवलेला दवाखाना वाचतांना या कथेला माणुसकीचा श्वास असल्याचा साक्षात्कार वाचकाला येईल. परिस्थिती म्हणून जरी ग्रेगने दवाखाना चालवायचा ठरवलं तरी त्यात त्याने झोकून दिलेलं सर्वस्व वाचतांना प्रत्येक जण विचार करेल हे खरे! मारिझुओच्या प्रेताची कशी विल्हेवाट लावली याचं वर्णन सुन्न करणार आहे. तर कुत्र्यांबरोबरची जीवघेणी लढाई तुमचा श्वास रोखून धरते. ज्या मुंबईबद्दल आपण फक्त सिनेमा - कादंबऱ्यातून ऐकलं पाहिलं आहे ती मुंबई हा माणून वास्तवतेच्या भूमिकेतून जगला त्यालाही मुंबई आवडली. आज इतक्या वर्षानंतर ग्रेग कबूल करतो की घर म्हटल की त्याला मुंबईचं आठवते. भारतातल्या लोकांच्या प्रेमाने आपुलकीने तो माणसात आला. अशी कबुली सुध्दा ग्रेग देतो. विशेष म्हणजे अपर्णा वेलणकरांनी अत्यंत रसाळ-सोप्या परंतु ताकदवान लेखन कौशल्याने या पुस्तकाचा असा अनुवाद केलाय की कथा एखाद्या चलत् चित्रपटाचा कॅनव्हास चित्रीत करते.
- MAHARASHTRA TIMES 14-04-2010
मनास माझ्या कुंपण पडणे...
निमित्त, ग्रेगरी डेव्हिड रॉबर्ट्सच्या ‘शांताराम’ या कादंबरीचा मराठी अनुवाद प्रसिद्ध होणे. लेखक किंवा कवी जे काही लिहितो तो पक्का माल धरला तर त्याच्याकडील कच्चा माल कुठला प्रज्ञा, शब्दप्रतिभा, शब्दसंग्रह, ते जुळवण्याची हातोटी, प्रकटीकरणाचे सामर्थ्य हे तर आलेच, पण त्याचबरोबर सर्वांत महत्त्वाचे म्हणजे अनुभवांचे संचित. अनुभव ग्रहण करण्याचे बळ. अनुभवांना धीटपणे, थेटपणे सामोरे जाण्याची ताकद. अनुभव ही येण्याची गोष्ट आहेच, पण त्याहीपेक्षा ती गोष्ट आहे ‘जाणवण्या’ची. त्यासाठी शरीराची पंचेद्रिये जागी असावी लागतात, जागी ठेवावी लागतात. मन, संवेदना जित्याजागत्या आणि खुल्याही ठेवाव्या लागतात.
ही अवस्था कुठली?
थोडा संदर्भ आणि शब्दपालट मंजूर केला तर, ‘मनास माझ्या कुंपण पडणे अगदी न मला साहे’ अशी ही स्थिती. या लेखास निमित्तमात्र असलेल्या ‘शांताराम’ची अवस्था ही अशी असावी.
शांतारामसारखी प्रज्ञा आपल्याकडे नाही का? त्याच्यासारखी शब्दप्रतिभा आपल्याकडे नाही का शब्द जुळवण्याची हातोटी आपल्याकडे नाही का? शब्द जुळवण्याची हातोटी आपल्याकडे नाही का? प्रकटीकरणाचे सामर्थ्य आपल्याकडील लेखक-कवीमध्ये नाही का तर या प्रश्नांची उत्तरे ‘आहे’ असे मिळणे त्यातील अनेकांबाबत शक्य आहे.
प्रश्न उरतो तो अनुभव ग्रहण करण्याच्या ताकदीचा.
आता अनुभव अनेकदा परिस्थितीजन्य असतात हे खरे. या परिस्थितीत बरेच काही येते. आर्थिक, सामाजिक, राजकीय, भौगोलिक, शैक्षणिक, मानसिक, नैतिक, शारीरिक, समूहमानस... अशा असंख्य गोष्टींची गोळाबेरीज म्हणजे परिस्थिती. म्हणजे अनुभवांचे गणित या गोळाबेरजेवर ठरणार, हे नक्की. अनुभवांचे हे गणित मांडताना बेरीज करायची की वजाबाकी, गुणाकार करायचा की भागाकार हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न, पण ही व्यक्ती जर लेखक किंवा कवी असेल, तर हा व्यक्तिगत प्रश्न न सोडवताच बेफिकिरीने पान उलटून पुढे जाणे अंमळ कठीणच. कारण येथे मागणी बेरजेची आणि गुणाकाराची. अत्यावश्यक तेथे वजाबाकी व भागाकार हवा, हे मान्य; पण मुळात हाताला वळण हवे ते अधिकाचेच चिन्ह गिरवण्याचे.
ते वळण शांतारामच्या हाताला दिसते. येथील मंडळींच्या हातात ते आहे काय
या प्रश्नाचे उत्तर ‘हो’ असे फारच थोड्या मंडळींबाबत शक्य.
शांताराम आणि येथील मंडळी यांच्यात ही तुलना होत आहे काय शक्य आहे. आता हे खरे की, शांतारामचे अनुभवविश्व येथील मंडळींपेक्षा कितीतरी वेगळे. त्याची मनोभूमी येथील मंडळींच्या मनोभूमीपेक्षा निश्चितच निराळी. आयुष्याकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन येथील मंडळींपेक्षा भिन्न. त्याची आयुष्यशैली येथील लोकांपेक्षा अलग. या सगळ्यामुळे तो जे काही लिहिणार ते येथील मंडळींपेक्षा वेगळेच असणार. पण हे तर असणारच. किंबहुना असेच असायला हवे. सगळ्यांचेच शब्द एकसाच्यातील कसे चालतील
मूळ मुद्दा आहे तो स्वतःच्या मनास कुंपण घालण्याचा. कुंपण घालून आतल्या घरात बसून राहणे सोपे आणि सुरक्षेचे. त्याने हातचे आहे ते राखले जाईल कदाचित. अनेक कुंपणवाल्यांनी एकत्र येऊन बेतलेल्या गणिताचे उत्तर पुरस्कारांच्या वा कुठल्यातरी गौरवांच्या स्वरूपात मिळत राहीलही कदाचित. मानाचे दशांश चिन्हही मिरवायला मिळेल कदाचित, पण हाती राखलेल्यात काही भर टाकायची असेल तर कुंपण घालून चालणार कसे? असलेले कुंपण तोडून भिरकावून द्यायला हवे.
आता कुंपण भिरकावयाचे म्हणजे लगेच कृतक-कलंदरासारखे वागायचे असे नाही. त्यातून खरे, अस्सल काही हाती लागणे कठीणच. शिवाय ती फार मोठी आत्मवंचनाही, त्यामुळे त्याच्या वाटेस न गेलेलेच उत्तम. बेभानाचेही भान राखत, भोवतीच्या समष्टीचा सहवेदनेने अदमास घेत, संवेदनशीलतेला धार लावून जगणे म्हणजे कुंपण तोडणे आणि असे जगल्यास ती लिपी शब्दांत उमटणारच. कारण शब्दांतून उमटणारी लिपी कुठल्या परग्रहावरच्या अनुभवांची नसते, ती इथल्या, या जमिनीतल्या अनुभवांची असते.
जमीन समोर अमोज पसरली आहे. सरळवाकड्या, सुख-दुःखाच्या, नीती-अनितीच्या, वास्तव आभासाच्या, निराशा चैतन्याचा असंख्य अनुभवांची बिजे त्यात रुजलेली आहेत. कुंपण तुटू दे... ती हिरवी सरसरून वर येणारच.
अनुभवांचे गणित मांडताना बेरीज करायची की वजाबाकी, गुणाकार करायचा की भागाकार हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न, पण ही व्यक्ती जर लेखक किंवा कवी असेल, तर हा व्यक्तिगत प्रश्न न सोडवताच बेफिकिरीने पान उलटून पुढे जाणे अंमळ कठीणच. कारण येथे मागणी बेरजेची आणि गुणाकाराची. अत्यावश्यक तेथे वजाबाकी व भागाकार हवा, हे मान्य; पण मुळात हाताला वळण हवे ते अधिकाचेच चिन्ह गिरवण्याचे.