Mayur Waghद गॉड ऑफ स्मॉल थिंग्स चा मराठी अनुवाद वाचून पूर्ण झाला. खरोखरच अपर्णा वेलणकर यांनी अनुवाद उत्कृष्टपणे केला आहे. मूळ इंग्रजी कादंबरी रटाळ वाटते, परंतु अनुवाद वाचताना खूपच इंटरेस्ट आला, कदाचित मराठी मातृभाषा असल्याने अस वाटत असेल, पण अनुवाद निश्चितपणे मूळ भाषेपेक्षा भारी आहे.
Manasi Lad- Gudhateहे पुस्तक वयाच्या आणि परिपक्वतेच्या ज्या पडावावर माझ्या हाती आले ते सारे अत्यंत योग्यरित्या जुळून आलेले योग असावेत. या पुस्तकाने मला काय दिलं ते शब्दांत सांगून समजणं अशक्य आहे. अरुंधती रॉयने जे लिहून ठेवलंय ते अचाट आहेच.... पण अपर्णा वेलणकर ने लिहिलेला अनुवाद वाचून मला अनुवाद वाचण्याविषयी सकारात्मकता निर्माण झाली. आधी एकदा लहानपणी हे पुस्तक जे मी वाचता वाचता अर्धवट सोडले होते... अर्थातच डोक्यावरून गेल्यामुळे. त्याच सुमारास या पुस्तकाला बुकर पुरस्कार मिळालेला होता. त्यामुळे भविष्यात कधीतरी हे पुस्तक पुन्हा वाचायला घ्यायचे अशी नोंद मेंदूत तेंव्हाच झालेली असावी. आणि पुन्हा हे पुस्तक हाती आलं तेंव्हा असं लक्षात आलं की हे पूर्ण वाचल्याशिवाय मी स्वत: पूर्ण होऊच शकत नाही...!
अनेकांना हे पुस्तक दुर्बोध वाटू शकते. काहिंनी तर ’किळसवाणे’ किंवा ’ओंगळ’ अशीही प्रतिक्रीया दिली. पण मला हे पुस्तक एका वेगळ्याच पातळीवर अत्यंत भावले. त्यात ओंगळ असे काहीही नाही! आणि तसेही ओंगळ काही असलेच तर ते आपले माणूस म्हणून दैनंदिन जगणे हेच! त्या जगण्याचेच अस्सल शुद्ध प्रामाणिक स्वरूपात वर्णन असलेली ही कादंबरी खरंतर आपल्याला आपलेच अंतरंग त्यातल्या जाणिवा - उणिवांनिशी उघड करून दाखवते. या पुस्तकाच प्रत्येक वाचकाला अत्यंत मुलभूत आणि प्रामाणिक स्वरूपात स्वत:ला पाहता, ओळखताच नव्हे तर सामोरेही जाता येईल (नव्हे जावेच लागेल) अशी एक विलक्षण सोय नकळतपणे लेखिकेने करून ठेवलेली आहे! हे सामोरे जाणे सुखावह नक्कीच नसते नाही का? मग असल्या वर्मी घाव घालणार्या लेखनाला शेवटपर्यंत भिडणे एक असह्य अनुभव होऊन बसतो! असह्य... वेदनामय.... पण प्रामाणिक! आणि खरं सांगायचं तर... आवश्यक!
संपूर्ण कादंबरीभर परसलेलं सतत पार्श्वभूमीला भळभळणारं एक दु:ख आहे! बर्फाच्या टणक लादीखालून संथ मूक वाहणार्या थंडगार पण जिवंत नदिसारखं ते एकसूरी वाहत राहतं. दिसत नाही तरी जाणवत राहतं. मध्येच प्रकट होतं मध्येच अदृष्य होतं... पण ते असतंच. सतत. कादंबरीच्या पहील्या पानापासून ते अखेरच्या शब्दापर्यंत ते दुःख आपला पाठलाग करत रहातं, प्रचंड अस्वस्थ करतं. अगदी आनंदाच्या प्रसंगांचं वर्णन करतानाही लेखिकेनं हे दुःखाचं भान हरवू दिलेलं नाही.
ईस्था आणि राहेल - दोन जुळी भावंड. त्यांची आई... त्यांचं आयुष्य... त्यांचं भावविश्व.... आणि ’डिंग’! निव्वळ मुर्तिमंत नैराश्याची, माणसाच्या चिरकाळ निरंतर दुःखाची, आणि अस्तित्त्वाच्या अस्वस्थ करून सोडणार्या निरुत्तर प्रश्नांची गोष्ट आहे ’गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’. माणूस म्हणून जगताना स्वत:च्या अश्या भक्कम संवेदना बाळगून असण्यार्या प्रत्येकाला चिरस्मरणीय अनुभूती देऊन जाणारी ही कादंबरी आहे यात शंकाच नाही!
आणि अनुवादही आश्चर्य़ वाटावे इतका सुरेख अप्रतिम केलेला आहे. वाचताना कुठेही रसभंग होत नाही. दुःखाची ठसठशीत जाणिव अनुवादातही व्यवस्थित जपली गेली आहे. उत्कृष्ठ अनुवाद कसा असावा याचे मुर्तिमंत उदाहरण!
Narendra Sonajeमराठी भाषेचे वेगळेच अनुवादित सौंदर्य
D.Nitinअपर्णा वेलणकर मॅडमनी मराठीत ट्रान्सलेट करताना सगळे शब्द उत्तम वापरलेत..
अगदी वेलुथा ला शेवट पोलीसांनी दिलेल्या शिव्या सुद्धा शब्द बदल न करता मांडल्यात !
बाकी ह्या गोष्टीची १५० पान काय वाचतोय कळत नाय..पण लेखिकेच अलंकारिक वर्णन पुस्तक खाली ठेवु देत नाय..
राहेल -ईस्थापन,अम्मु,बेबी कोचम्मा,चाको,कॉम्रेड पिल्लई ,वेलुथा हिच महत्त्वाची पात्र..
१५० पानानंतर स्टोरीचा एंड जाणुन घ्यायची ईच्छा होते..
पुर्ण पुस्तक वाचल्यानंतर समजेल की ह्या पुस्तकानी अवॉर्ड का जिंकला होता ते..
जोपर्यंत मी अॅना कॅरेनिना आणि नॉट विदाउट माय डॉटर पुर्ण वाचत नाही तोपर्यंत हेच माझ आवडत पुस्तक राहील..
बाकी एक गोष्ट खात्रीनी सांगतो..द.गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज वाचल तर ते नक्कीच तुमच फेवरेट असेल..
NEWSPAPER REVIEWपहिल्याच कादंबरीने केलेला विश्वसंचार...
अरुंधती रॉयने केवळ भारतीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय वाड्मयीन क्षेत्रात मोठीच खळबळ उडवून दिली, यात शंका नाही.
पहिल्याच कादंबरीने तिला दहा लाख डॉलर- साडेतीन कोटी रुपये मानधनापोटी मिळवून दिले. एवढी मोठी रक्कम यापूर्वी कोणाही कादंबरीकाराला मिळालेली नव्हती. प्रथम प्रकाशनाच्या वेळीच कादंबरी अनेक देशांत व अनेक भाषांत होण्याबाबतही तिने विक्रम प्रस्थापित केला. सहा महिन्यांत तिच्या दहा लाखांवर प्रती खपल्या. भारतातही हार्डकव्हरमध्ये सहा आवृत्त्या निघाल्या. बेस्टसेलर यादीत सतत नाव झळकत राहिले आणि या सगळ्यावर कळस चढविला तो इंग्लंडमधल्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा बुकर पुरस्काराने! १९८१ मध्ये सलमान रश्दी याला हा पुरस्कार `मिडनाईटस् चिल्ड्रेन` कादंबरीला मिळाला होता. त्यानंतर सोळा वर्षांनी हा सन्मान पुन्हा भारताला लाभला.
पस्तिशीतल्या एका भारतीय तरुणीने आंतरराष्ट्रीय साहित्यक्षेत्रात असे दणदणीत पदार्पण करून सर्वांनाच थक्क करून टाकले. परीकथेतल्या सिंड्रेलासारखेच. एका रात्रीत अरुंधती केरळच्या, दिल्लीच्या परिसरातून बाहेर पडून साहित्यक्षेत्रातली सम्राज्ञी होऊन बसली.
प्रत्येक भारतीय लेखकाला अरुधती रॉयच्या यशाने नवा आत्मविश्वास, नवा आत्मसन्मानाचा भाव प्रदान केला. या तिच्या अभूतपूर्व यशामुळे उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होणे अपरिहार्यच आहे.
ही कादंबरी खरोखरच एवढी श्रेष्ठ आहे का? तिच्या `लिटररी एजंट`ने आणि प्रकाशकांनी आधुनिक `मार्केटिंग` तंत्राचा वापर करून या कादंबरीबद्दल हवा निर्माण करून तिचा फायदा घेतला?
आर्किटेक्ट म्हणून पदवीधर झालेल्या अरुंधती रॉयने दूरदर्शनवरील मालिकांच्या पटकथा लिहिल्या. चित्रपट निर्माता प्रदिप किशन हा तिचा पती. त्याच्या चित्रपटांसाठी कथालेखन केले. वडील बंगाली. चहाच्या मळ्यात अधिकारपदावर. आई केरळची. सीरियन ऑर्थोडॉक्स खिश्चन धर्मीय. त्यामुळे प्राथमिक शिक्षण कोट्टायमजवळच्या गावात झालेले. मल्याळी भाषेत. आई-वडिलांनी घटस्फोट घेतल्याने दिल्लीला पुढे उच्च शिक्षणासाठी प्रयाण, तेथेच तिचे वास्तव्य...
अरुंधतीने नंतर एक कादंबरी लिहिण्याचा घाट घातला. आपल्याच जीवनातले, अनुभवातले, अनेकविध प्रसंग या कादंबरीत गुंफले.
राहेल आणि एस्थाप्पन ही जुळी भावंडे.
राहेल मुलगी. एस्था मुलगा. राहेल अठरा मिनिटांनी एस्थापेक्षा मोठी. आई अम्मा.
घटस्फोटानंतर मुलांना घेऊन आई अम्मू कोट्टायमला राहते. अम्मूचा भाऊ चॅको हा एके काळचा ऑक्सफर्डचा ऱ्होड्स स्कॉलर; पण आता घरातला `पॅरेडाइज पिकल` चा लोणच्याचा उत्पादन-वितरणाचा धंदा पाहणारा.
आजोबा पप्पाजी हे जुन्या जमान्यातले. रुबाबदार, कडक, सनातनी, अधिकार गाजविणारे. आपल्या अपूर्ण महत्त्वाकांक्षा पुढच्या पिढीवर लादणारे.
आजोबांची धाकटी बहीण बेबी कोचम्मा. वैफल्यग्रस्त, कडवट, चॅकोचा विवाह तरुणपणी एक इंग्लिश बारमेडशी झालेला होता. आता ती शिक्षिका आहे. तिला एक मुलगी असते. साफी मोल. हा हिंदुस्थानला परतल्यावर मार्गारेट दुसरा विवाह करते; पण तिचा दुसरा नवरा मरतो. तेव्हा चॅको तिला आपल्या मुलीसह केरळमध्ये येण्याचा आग्रह करतो. आपल्या आयेमेनेमच्या प्रशस्त घरात सुटी घालवण्याचे निमंत्रण देतो.
राहेल व एस्थाप्पन नदीत बुडून मरण पावलेल्या साफी मोलच्या अंत्यविधीसाठी आयेमेनेमला येतात. सात वर्षांच्या या जुळया भावंडांच्या दृष्टीतून त्या अंत्यविधीचे कधी गंभीर तर कधी विनोदप्रचुर वर्णन वाचायला मिळते... या मुलांना घेऊन अम्मू पोलीस चौकीवर तक्रार करायला जाते. `मी या मुलीच्या मृत्यूला जबाबदार आहे.` असे म्हणते; पण पोलीस इन्सेक्टर तिला धुडकावून लावतो. `वेश्येची तक्रार आम्ही लिहून घेत नाही,` असे म्हणून तिला चौकीतून घालवून देतो. नंतर एस्थाप्पनला त्याचे वडील कलकत्त्याला नेतात. बोर्डिंग स्कूलमध्ये ठेवतात. राहेल ही मात्र आपल्या आईजवळ कोट्टायमला राहते.
तेवीस वर्षांनी एस्थाप्पन पुन्हा काट्टायमला येतो. त्याचे वडील तेथील नोकरी सोडून ऑस्ट्रेलियात कायम वास्तव्यासाठी जाण्याचे ठरवतात. एस्थाप्पनला बरोबर नेणे त्यांना सोयीचे वाटत नाही, आपल्या परागंदा व परस्थ वडिलांबद्दल या मुलांना विलक्षण ओढ वाटते. त्यांना भेटायची तळमळ असते... अम्मूचाही एकाकीपणा, स्वाभाविक उर्मी... वेलुथा या कनिष्ठ वर्गातल्या हुशार व बलदंड तरुणाचे तिला आकर्षण. त्यातून वेलुथाची झालेली भीषण हत्या इत्यादी या कादंबरीतील प्रसंगांची मालिका ही कालक्रमाने आलेली नाही. भूतकाळातील घटना, चालू घटना यांची सरमिसळ चालू राहते. रचनादृष्ट्या अत्यंत गुंतागुंतीची अशी ही कादंबरी आहे आणि तरीही ती खिळवून ठेवते. वाचत राहावीशी वाटते.
अरुंधती रॉय इंग्लिश भाषा अत्यंत सहजपणे लिहिते. व्याकरणाचे नियम ती धुडकावून लावते. उपपदे, कॅपिटल व स्मॉल लेटर्स, विशेषणे- क्रियाविशेषणे यांची हवी तशी तोडमोड करते. नवी क्रियापदे वापरते, नवे शब्द बनवते. आपण इंग्लिशमध्ये काही लिहितो. व्याकरणदृष्ट्या वाक्य बरोबर आहे की नाही, कर्ता-कर्म-क्रियापद यांचा मेळ बसतो की नाही, कॅपिटल अक्षर कुठे हवे, स्पेलिंगमध्ये तर चूक नाही ना- अशी अपराधी भावना मनात ठेवून फार चिंता करतो. परंतु अरुंधती रॉय इंग्रजी भाषेची, शब्दांची हवी तशी मोडतोड करते. एखादे रबराचे खेळणे हाताळावे तसे इंग्रजी शब्दांना इकडेतिकडे घुमवते. भाषेच्या या लकबींमुळे तिने केलेली वर्णनेही चित्रदर्शी होतात. आणि ही मोडमोड करताना तिला कुठेही अडखळल्यासारखे वाटत नाही. केरळीय इंग्लिश लिहिताना तिला कुठेही संकोच जाणवत नाही. ती उपमा, अलंकार वगैरेही वाटेल तसे वापरते.
It was raining when Rahel came back to Ayemenem. Slanting silver ropes slammed into loose earth, ploughing it up like gunfire. The old house on the hill wore its steep, babled roof pulled over its ears like a low hat. The walls, streaked with moss, had grown soft, and bulged a little with dampness that seeped up from the ground... Hopeful yellow bullfrogs cruised the scummy pond for mates. A drenched mongoose flashed across the leaf-strewn driveway.
असे पावसाळ्याचे वर्णन करताना अरुंधती तेथली वनस्पती, प्राणी, जमीन सर्वांची दखल घेते.
Not old
Not young
But a viable die-able age
अशासारखे खेळ ती लीलया करते.
फ्रुटी एअर, फॅटली बॅफल्ड, इममॉडेस्ट ग्रीन अशी मजेदार विशेषणे ती वापरते. फरीव्हरिंग, सॉरी फ्लॅपिंग, डलथडिंग अशासारखे शब्द एकत्र आणून त्या वर्णनांना नेमकेपणा आणते; पण त्याबरोबर काहीसे चक्रावूनही सोडते. काळ व स्थळ यांना ही कथावस्तू भेदून जाते.
बुकर प्राइझची घोषणा करताना परीक्षकांच्या वतीने कलेल्या निवेदनात खिळवून ठेवणारी निवेदनशैली (स्पेलबाइंडिंग नॅरेशन) दक्षिण भारताचा इतिहास व परंपरा यांचे सात वर्षे वयाच्या जुळ्या भावंडांच्या परिप्रेक्ष्यातून घडवण्यात आलेले दर्शन, त्या परंपरेतील खोटेपणा व कायदेशीरपणा वगैरेंचा उल्लेख केला गेला आहे.
अनेक नामवंत समीक्षकांनी कादंबरीचा मुक्तकंठाने गौरव केला आहे. वेगवेगळी वैशिष्ट्ये टिपली आहेत. निवेदनशैलीचे तंत्र हे आधुनिकवाद, जादुई वास्तववाद, सिनेमॅटिक, माँटाज या सर्वांना सामावून घेऊन पुढे जाते असे एक समीक्षकाने म्हटले आहे.
नंबुद्रीपाद, कम्युनिस्ट पक्षाचे राजकारण यांचे चित्रण वास्तवापेक्षा वेगळे आहे, असा आक्षेप मार्क्सवादी विचारवंतांनी घेतला आहे. अश्लीलतेवरून पुस्तकावर खटलाही झाला आहे; परंतु ही मतमतांतरे असली तरी कादंबरी जगभर पोचली आहेच.
`दि गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज`चे हे यश म्हणजे गुणवत्ता च लोकप्रियता या दोहोंचा सुरेख संगम आहे. आधुनिक `मार्केर्टिंग`चेही ते यश आहे.
पंकज मिश्रा या हार्पर कॉलिन्स प्रकाशनसंस्थेतील संपादकाने हे हस्तलिखित वाचले. विक्रम सेठ वगैरे लेखकांचा लिटररी एजंट डेव्हिड गॉडविन याच्याकडे ते लंडनला पाठवले. गुरुवारी त्याला ते मिळाले. रविवारी तो सरळ विमानाने दिल्लीला आला. इतका तो या पुस्तकाने भारावून गेला होता. या कादंबरीमुळे तुला दिगंत कीर्ती मिळेल, असे त्याने अरुंधतीला सांगितले. इंग्लंड-अमेरिकेतल्या प्रकाशकांशी संपर्क साधला. हार्पर कॉलिन्सने दहा लाख डॉलर आगाऊ रॉयल्टी देण्याचे मान्य केले. इतर भाषांतील अनुवादक व प्रकाशक यांच्याशी संपर्क साधला. भारतातील हक्क इंडिया इंकच्या तरुण तेजपाल यांजकडे दिले. डेव्हिड गॉडविनसारख्या रत्नपारखी लिटररी एजंटकडे हे हस्तलिखित गेले. त्यामुळे त्याचे सोने झाले.
भारतीय लेखक-प्रकाशकांनीही यापासून काही घडा घ्यायला हवा. विक्रम सेठ, सलमान रश्दी, अमिताव घोष, उपमन्यू चॅटर्जी, भारती मुखर्जी, अनिता देसाई वगैरे भारतीय लेखक आज इंग्लंड-अमेरिकेत गाजत आहेत. परदेशी लेखकांच्या तुलनेत आपण कमी पडत नाही. आत्मविश्वासाने लेखन करायला हवे. आपल्याजवळ सांगण्यासारखे खूप काही आहे. आजवर आपण पाश्चात्य पुस्तकांच्या लेखकांचे आदर्श समोर ठेवून लिहिण्यात मश्गुल होतो. आता आपला आदर्श परदेशातील लेखकांना ठेवण्याचीही कदाचित इच्छा होईल.
``अरुंधती रॉयने केरळीय साहित्याचे दालनच आंतरराष्ट्रीय वाचकांपुढे खुले केले आहे. पूर्वी आम्ही युरोपियन आणि लॅटिन अमेरिकन साहित्य केरळमध्ये आयात करीत होतो. त्यांचे अनुकरण करीत होतो. आता आमची संस्कृती, आमचे विचार, आमची वाड्मयीन दृष्टी ही जागतिक वाचकवर्गावर प्रभाव गाजवू लागेल. म्हणून केरळच्या भाग्याच्या दृष्टीने हा मोठा महत्त्वपूर्ण क्षण आहे.`` असे मल्याळी साहित्यिक मोहन वर्मा यांनी म्हटले आहे. इतर भाषकांनाही आपल्या इच्छेने प्रतिनिधित्व करणारे हे विधान वाटायला हरकत नाही. अरुंधती रॉयचे यश तमाम भारतीय लेखकांना नवा आत्मविश्वास देऊ शकेल. नवी अस्मिता देऊ शकेल.
DAINIK LOKMAT 20-10-2002सुन्न करणाऱ्या शोकांतिकेचा समर्थ अनुवाद…
‘बुकर’ या आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित झालेल्या अरुंधती रॉय यांच्या ‘द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’ या प्रसिद्ध कादंबरीचा अनुवाद अपर्णा वेलणकर यांनी केला आहे. अत्यंत तरल, हळवी, काव्यातमक, तर कधी अत्यंत औपरोधिक, अतिवास्तववादी, थेट, तीक्ष्ण व बोचऱ्या भाषाशैलीतील ही गूढगहन कादंबरी इंग्रजीतून मराठीत आणणे अतिशय दुष्कर काम होते. भूतकाळ आणि वर्तमानकाळात कादंबरीचे कथानक सतत लंबकाप्रमाणे हलत राहते. बुद्धी आणि भावनांना एकाचवेळी साद घालणारी ही एक उत्कृष्ट्य आणि असामान्य कादंबरी आहे. विशेषत: तिच्यातील पूर्ण वेगळ्याच, आतापर्यंत कुणीही न वापरलेल्या अनोख्या भाषाशैलीसाठी ही कादंबरी गाजली. या आंतरराष्ट्रीय कीर्ती लाभलेल्या पुस्तकाच्या मराठी अनुवादाला पूर्ण न्याय मिळालेला आहे.
मूळ इंग्रजी कादंबरीतील मजकूर मराठीत आरशातील प्रतिबिंबाप्रमाणे समांतर प्रतिनिर्मित होऊन उतरलेला आहे. कादंबरीतील सौंदर्यमूल्ये व अन्य शैलीमूल्ये बहुतांशी तशीच्या तशी उतरलेली आहेत. कादंबरीतील भूत, भविष्य आणि वर्तमानात संचार करणारी संमिश्र शैली, भारतीय इंग्लिश, मल्याळम, शब्दप्रयोग या गोष्टी लक्ष्यभाषेत उतरलेल्या आहेत. अधिकाधिक प्रामाणिक भाषांतर व्हावे या उद्देशाने कादंबरींचे शीर्षक आणि बहुसंख्य प्रकरणांची इंग्रजी शीर्षके तशीच ठेवलेली दिसतात. इंग्रजी गाण्यांच्या ओळी, काही इंग्रजी शब्दप्रयोग, मल्याळम वाक्प्रचार शैलीला धक्का लागू नये म्हणून तसेच ठेवलेले आहेत. मात्र आवश्यक तेथे कंसात मराठी अनुवाद दिलेला आहे. त्यामुळे हे भाषांतर अधिक प्रामाणिक झालेले आह. अनुवादिकेने जरी प्रस्तावनेत हा अनुवाद कोणत्याच अर्थाने शब्दश: नाही’ असे म्हटले असले, तरी अरुंधती रॉयच मराठीतून वाचल्याचा प्रत्यय वाचकांना येतो आणि नेमकी तीच मूळ कादंबरीतील गहनगूढ, गंभीर, शोकात्म अनुभूती वाचताना प्रतीत होते. मूळ कलाकृतीला धक्का न लावता, तिचा घाट न बदलता अगदी स्वाभाविक वाटेल अशी शब्दयोजना करून हे भाषांतर झालेले आहे. मूळ कादंबरीतील प्रतिमा, प्रतिमाने सामाजिक व सांस्कृतिक संकेत, ध्वनियोजना, शब्दयोजना मराठीत अधिकाधिक समर्थपणे उतरवली गेल्याने हे एक सर्जक भाषांतर झालेले आहे.
मूळ भाषेत लिहिताना जशा सर्जनाच्या तंद्रीत लेखिकेने लिहिलेले आहे त्याप्रमाणे भाषांतरकारही त्याच तंद्रीची सम पकडून उत्कटतेने लिहित गेलेल्या जाणवतात. पण ‘प्रत्यक्षाहुनी प्रतिमा सुंदर’ असे धोरण न अवलंबता अशी मूळ कृती उतरवण्यात अपर्णा वेलणकर यशस्वी झालेल्या आहत. मूळ कृती वाचण्याची प्रेरणा या मराठी भाषांतरातून वाचकांना नक्कीच मिळेल.
केरळमधील आयमेनेम गावांतील एका कुटुंबातील काही पिढ्यांच्या पडझडीची शौकात्म कहाणी हे या कादंबरीचे मुख्य सूत्र, रेव्हरंड इ. जॉन आयपे यांचा मुलगा बेनन जॉय आयपे म्हणजे पाप्पाची, त्याची पत्नी माम्माची, या दांपत्याची दोन मुले अम्मू आणि चाको या व्यक्तिरेखाच्या जगण्याभोवती कथानकाची वीण गुंतलेली आहे. तरुणपणीचे प्रेम अयशस्वी झाल्यावर जन्मभर अविवाहित राहिलेली बेबी कोचम्मा. स्वत:च्या सिरियन खिश्चनपणाची प्रतिष्ठा जपून इतरांना सदैव हीन लेखणारी स्वयंपाकीण कोचू मारिया... माक्र्सवादी विचारांच्या आवरणाआड आपलाबेगडी स्वार्थ जपणारे कॉम्रेड पिल्लई... घटस्फोटित अम्मूशी बेभान शरीरसंग करणारा वेलुथा हा अस्पृश्य तरुण... आणि या साऱ्या भोलकांडत्या वास्तवाचा सामना करता करता स्वत:च्या आयुष्याची उधळ-माधळ करून घेतलेली राहेत आणि इस्था ही दोन मुले...
...अशी खूप माणसे नियतीच्या फटकाऱ्यांनी रक्तबंबाळ झालेली... व्यक्तिगत नातेसंबंधांच्या चिखलात गळ्यापर्यंत रुतलेली नीतिभ्रष्टोचा शिक्का बसलेल्या बेभान शरीरसंगाची जबरदस्त किंमत मोजणारी, तरीही सर्वमान्य संकेत ठोकरून बेडरपणाने जगणारी आणि सामाजिक-राजकीय वास्तवात होरपळून निघणारी? त्याच्या आयुष्याची सुन्न करणारी शोकांतिका हे ‘द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’चे प्राणतत्त्व आहे.
कादंबरीच्या शेवटी चाळीशीतील राहेल व इंस्था आयोमेनेमला परततात तेव्हा त्यांच्या लहानपणी ‘गॉडस् ओन कंट्री’ असणार केरळ पार हरवून गेलेले दिसते. प्रदूषित झालेले केरळ... श्रीमंत शेतकऱ्यांसाठी धरणे बांधून निरुंद झालेली नदी म्हणजे ‘नासून गेलेल्या त्रासाने वाहणारी जाड पाण्याची एक पातळ चिंधी’ त्या नदीवर उभे राहिलेलं पंचतारांकित हॉटेल, रस्त्यावरून जावे, तर दुतर्फा नवजात श्रीमंतीच्या ताज्या पुटकुळ्यांचा गजबजाट! आखाती देशात नको इतकी घाम गाळून मिळवलेल्या नको इतक्या पैशातून नर्सेस, वायरमन, गवंडी, सुतार आणि बँकेतील कारकुनांनी बांधलेल्या भडक घरांच्या रांगा... केरळला पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी प्रत्येक गोष्टीचे झालेले व्यापारीकरण.. पाश्चात्य पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पंचतारांकित हॉटेलसंस्कृतीचा उदय... ग्रामीण भागावर होणारे त्यांचे आक्रमण आणि हॉटेलमधील पर्यटकांसमोर केरळीयन संस्कृतीचा आविष्कार दाखवण्यासाठी तुकड्या तुकड्यांनी सादर केले जाणारे कथकली नृत्य... असा समकालीन पट या कथानकात उलगडलेला दिसतो.
टीव्ही संस्कृती व विविध चॅनल संस्कृतीचे ग्रामीण भागांवरील आक्रमण, देशोदेशीच्या चॅनल्सवरील अर्धनग्नता व रक्तरंजित हाणामाऱ्या या बेगडी स्वप्नविश्वात रमून जाऊन माणसांची आसपासच्या जगाशी, मातीशी तुटत जाणारी नाळ बेबी कोच्चमा व कोचु मारीयामुळे आपल्याला भयावह, गडदपणे जाणवते.
सामाजिक नीतिमत्ता व कायदा यांचे स्त्री-पुरुषांकरिता असणारे दुटप्पी निकष व त्यात होरपळून गेलेले प्रेमी जीव हा या कादंबरीचा गाभा आहे. आयमेनेमच्या अंधारातच समलिंगी संबंधात जगण्याचा बहाणा शोधणारा कुणी करी सेपु भेटतो. आपल्या मित्र प्रियकरापासून दुरावल्यावर डोक्यात गोळी झाडून आत्महत्या करतो. हे निषीद्ध प्रेमबंधाचे उपकथानक मुख्य कथानकाशी आतून जोडलेले आहे. मनातल्या मनात आक्रोशणारे, छोट्या-छोट्या व्यक्तिगत, दु:खाच्या बोचक्यात घुसमटून तडफडणारे ‘स्मॉल गॉड’ कोंडून ठेवण्याच्या सामाजिक सक्तीवर अरुंधती रॉय यांनी बोचरा हल्ला चढवला आहे.
कादंबरीच्या मराठी अनुवादात फक्त आशयच (कण्टेण्ट) नव्हे तर बऱ्याच अंशी रूपही (फॉर्म) उतरलेले आहे. या पुस्तकात लेखिकेने कलात्मक अलिप्तपणा (आर्टिस्टीक ऑब्जेक्टिव्हिटी) राखण्यासाठी तृतीय पुरुषी एकवचनी कथनशैली वापरला आहे. पण तरीही ठिकठिकाणी अत्यंत तरल व उत्कट संवेदना व भावनांचा आविष्कार तीव्रपणे झालेला आढळतो. पण त्याचबरोबर एखाद्या शल्यचिकित्सकाप्रमाणे थंड, अलिप्त व धारदार सुरीसारख्या शैलीत मानवी संबंधांची चिरफाड लेखिकेने केलेली आहे. ही व्यामिश्र शैली मराठी अनुवादात उतरलेली आहे. वरवर असंबद्ध वाटणाऱ्या कथनशैलीतून उभा राहणारा अत्यंत सुसबद्ध आकृतिबंध अनुवादातही प्रतिबिंबित करणाऱ्या अपर्णा वेलणकर यांचे विशेष अभिनंदन करायला हवे.
-प्रा. लीना पांढरे