- Adv Ninad Koche
जरुर वाचा
1970 च्या दशकात रशियन फौजानी अफगाणिस्तानावर कब्जा केल्या नंतर आमिरच्या कुटुंबाला अमेरिकेत परगंदा व्हावं लागतं.
पण अमेरिकेत गेल्यानंतरही आमिरच्या मनात एक जाणीव सतत जागृत असते ती म्हणजे एक ना एक दिवस, कधीतरी त्याला जरूर पारतावं लागणार आहे. नव्या जगातलं त्याचं समृद्ध आयुष्यही त्याला कधीच देऊ शकणार नाही अशा गोष्टीसाठी
ती म्हणजे प्रायश्चित
- Teja Kulkarni
खालीद हुसैनी, एक आफ्रिकन अमेरिकन डॉक्टर कम लेखक. त्यांचे हे पहिले पुस्तक. हे बाजारात आले 2003 मध्ये आणि मेहता प्रकाशनमुळे मराठी वाचकांच्या हाती पडले 2007 मध्ये.
माझ्या हाती यायला मात्र मागचा आठवडा उजाडला.
लेखक स्वतः अफगाणिस्तान मध्ये जन्मले आहेत पण तसे नशीबवान निघाले. वडिलांची अफगाणिस्तान राजदरबारी चांगली नोकरी असल्याने, तिथे यादवी सुरू होण्यापूर्वीच हे हुसैनी कुटुंब आधी पॅरिस अन मग अमेरिकेला गेले.
खालिद हुसैनी तिथेच शिकून पेशाने डॉक्टर झाले खरे पण त्यांच्यातील संवेदनशील लेखकाला काही ते थोपवू शकले नाहीत.
`द काईट रनर` म्हणजे काटलेला पतंग पकडण्यासाठी धावणारा, म्हणजे कादंबरीचा छुपा नायक.
तसे कथा बीज अगदी छोटे आहे, लहानपणी स्वत:च्या भेकडपणामुळे तोंड न देऊ शकलेल्या चुकीचे दडपण आणि गिल्ट मनात बाळगून मोठ्या होणाऱ्या नायकाची ही कथा आहे. वास्तविक पाहता, जे घडलं किंवा घडतं, ते लहानपणी, ज्यावेळी फारसं तसेही काही हातात नसतं पण तरी ही आपण चुकीचे वागलो ही मानसिक काच एकही दिवस पाठ सोडू देत नाही. या गिल्ट ची जबाबदारी कशी उतरते, उतरते का हे वाचायलाच पाहिजे.
पण वाचण्यासाठी पेशन्स हवा. खालिद हुसैनी खूप चिवट स्मरणशक्तीवाले आणि सुक्ष्मनिरीक्षक असले पाहिजेत. कारण कादंबरी एक गोष्ट न राहता रोजनिशी बनून जाते. इतके बारीक बारीक डाव्या उजव्या बाजूचे, जागांचे, घराचे बाजारपेठेचे वर्णन केले आहे की क्षणभर वाटले मी जरी अफगाणिस्तान मध्ये, काबुल मधल्या वझीर अकबर खान या भागात गेले तर नायकाचे घर मला देखील सहज सापडेल.
दिवसागणिक कथा पुढे सरकते, पण अत्यन्त धीम्या गतीने, अर्थात पुढे काय होणार याची उत्सुकता लावूनच.
पण प्रश्न असा पडतो की खरंच आपण किती वेळा असे आपल्या अजाणतेपणी केलेल्या चुकांचे पातक माथी घेऊन फिरत असतो? तेंव्हा वाटलेली, असलेली, झालेली गँभिर चूक आपण आता ईतक्या गंभीरपणे घेतो का? प्रायश्चित्त घेण्यासाठी तळमळतो का? उलटपक्षी तेंव्हा तर मी लहानच होतो, तेंव्हा कुठं काय कळत होतं आणि मुख्य म्हणजे मी थोडाच जाणूनबुजून केलंय, अशी पांघरुणे घालून विषय बंद करून टाकतो.
`द काईट रनर` च्या निमित्ताने पुन्हा एकदा बालपणात डोकावून पाहिलं, कादंबरीमध्ये घडलेल्या एवढी गँभिर घटना नाहीच पण तेंव्हा गँभिर वाटलेली काही भांडणं, आरोप प्रत्यारोप आठवलेच. किती फालतू होते ते रुसवे फुगवे, ते तोडून टाकणं, अबोले धरणं...
काय असेल ते असो, या पुस्तकाच्या निमित्ताने एक सच्चा मनाचे दर्शन होते हे मात्र खरे...
बघा वाचून एकदा.
- Anil Udgirkar
ही कथा आमीर,हसन,सोहराब,सोराया व ईतर पात्रांची आहेच त्याच बरोबर अफगाणीस्थान च्या दुर्दशेची आहे.तालीबान चा उदय आणि त्यांच्या बेबंदशाही मुळे परदेशातील अफगाणांची दारूण मनोवस्था !
- SAMPADA PUJARI / 8.5.2020
The kite runner वाचले.अफगाणिस्तान आणी तलिबान या संदर्भातील हे आठवे पुस्तक.प्रत्तेक पान उलटताना आता याना काय फेस करावे लागेल म्हणून चिंता वाटणारे पुस्तक.आणी आपण किती सेफ आहोत भारतामधे याची जाणिव होत रहाते
- Suhas Birhade
१९७० च्या दशकातील अफगाणिस्तानमधील आमिर आणि हसन या दोन मित्रांची ही कथा. त्यावेळी आफगाणिस्तान सुंदर, सुजलाम होतं. सोव्हिएत रशियनच्या अतिक्रमणाला नुकतीच सुरवात झाली तो हा काळ होता. आमिर हा सुन्नी जातीतला आणि श्रीमंत. तर हसन शियापंथातला म्हणजे दुय्यम समजल्या जाणाऱ्या हजारा जातीतला. हसन हा आमिरच्या नोकराचा मुलगा. पण दोघांची अतूट मैत्री. एकत्र बागडणं, खेळणं.. दोघांचे रम्य बालपण सुरू असताना एक घटना घडते जी हसन आणि आमीरचं आयुष्य बदलवून टाकते. नात्यात दूरावा निर्माण होतो. हसन आमिरपासून दूर जातो. मग आमिरही वडिलांसह अमेरिकेत स्थायिक होतो.
काळ बदलतो. आमिर अमेरिकेत स्थिरावून लग्न करतो. पण बालपणीच्या रम्य दिवसांनी, हसनच्या आठवणींने व्याकूळ होतो. या काळात तालीबान्यांची राक्षसी राजवट अफगाणिस्तानात थैमान घालत असते. हसनचा शोध घेताना भूतकाळात डोकावताना आमिरला अनेक कटू सत्याला सामोरं जावं लागतं. आजवरच्या हतबलपणाच्या प्राय़श्चितासाठी आणि हसनबरोबरच्या मैत्रीला जागण्याचा, मैत्रीला न्याय देण्याचा निर्णय़ आमिर घेतो. जीव धोक्यात घालून काबूलला येतो आणि आपलं ध्येय पुर्ण करायचा प्रयत्न करतो. अनेक नाट्यमय घडामोडी घडतात.
``काईट रनर`` ही खालीद हुसेनी यांची बेस्ट सेलर कांदबरी. याच नावाने आलेल्या सिनेमाने अनेक पुरस्कार आणि नामांकने (Nominations) पटकावले. अनेक भाषांमध्ये ही कांदबरी अनुवादीत झालीय.
कादंबरीत तालिबानी राजवट, विषारी वंशवाद आणि उध्दवस्त अफगाणिस्तान उलगडतो. उत्तम आणि वास्वदर्शी कथानक असले तरी कांदबरी अतिशय पाल्हाळ लावणारी आहे. विनाकारण अनेकदा रटाळ झाली आहे. पण नंतर ती वेग घेते. कादंबरी मानवी भाव भावनांना हात घालते.
- Sangeeta Deshmukh-Deshpande
मी कालच `द काइट रनर` हे पुस्तक वाचून संपवलं.लेखक खालिद हुसैनी , अनुवाद वैजयंती पेंडसे.अफगाणिस्तानची पार्श्र्वभूमी, तालिबानी राजवटीपूर्वीची व नंतरची.एका १२ वर्षाच्या मुलाची भावनिक, मानसिक घालमेल, दोन लहानग्यांच्या मैत्रीची ही कादंबरी गुंतवून ठेवते अखेरपर्यंत...
- DAINIK SAKAL, SAPTARANG 02-12-2007
‘द काइट रनर’ थक्क करणारी कथा...
काहीतरी करण्यासाठी आसुसलेला बारा वर्षांचा आमिर. पतंगांची स्थानिक दंगल (स्पर्धा) जिंकण्याचा निश्चय करतो. त्याचा इमानी दोस्त हसन त्याला मदत करण्याचं वचन देतो आणि पाळतोही! त्या दंगलीच्या दिवशी संध्याकाळी घडलेल्या एका घटनेमुळे या दोन लहानग्या मित्रांचं भावविश्व पार उद्ध्वस्त होऊन जातं... या उद्ध्वस्त विश्वाचा मागोवा घेणारी ही कथा.
रशियन फौजांनी १९७० च्या दशकात अफगाणिस्तानवर कब्जा केला. त्यानंतर बऱ्याच अफगाणी लोकांना परागंदा व्हावं लागलं. कथानायक आमिरच्या कुटुंबालाही देश सोडून अमेरिकेच्या आश्रयाला जाणं भाग पडलं. अमेरिकेत जाऊनही ना आमिर त्याची पाळंमुळं रोवू शकला ना त्याचे वडील. त्यांची तगमग, अस्वस्थता सांगणारी ही कथा.
आपल्या वडिलांच्या नजरेत भरण्याजोगं, त्यांचं कौतुक मिळवण्याजोगं काहीतरी करण्यासाठी आसुसलेला बारा वर्षांचा आमिर, पतंगांची स्थानिक दंगल (स्पर्धा) जिंकण्याचा निश्चय करतो. त्यांचा इमानी दोस्त हसन त्याला मदत करण्याचं वचन देतो आणि पाळतोही! त्या दंगलीच्या दिवशी संध्याकाळी घडलेल्या एका घटनेमुळे या दोन लहानग्या मित्रांचं भावविश्व पार उद्ध्वस्त होऊन जातं... या उद्ध्वस्त विश्वाचा मागोवा घेणारी ही कथा.
अमेरिकेत गेल्यानंतरही आमिरच्या मनात एक जाणिव सतत जागृत असते, ती म्हणजे एक ना एक दिवस, कधीतरी त्याला जरूर परतावं लागणार आहे. नव्या जगातलं त्याचं समृद्ध-सुखवस्तू आयुष्यही त्याला कधीच देऊ शकणार नाही अशा गोष्टीसाठी ती म्हणजे ‘प्रायश्चित’! या प्रायश्चिताची ही कथा.
कादंबरीच्या भाषेत एक कोवळेपणा, सच्चेपणा अहो. स्वत:मधल्या उणिवांवर, कमतरतेवर मात करण्यासाठी धडपडणारा आमिर हा या कथेचा नायक असला, तरी हसनचं अबोल-निष्कपट, सदैव बलिदानाला तयार असलेलं प्रेम आपल्या मनात घर केल्यावाचून राहात नाही. मित्रासाठी काहीही करायला तयार असलेल्या हसनचं वाक्य आपल्या मनात रुंजी घालत राहतं... ‘तुमच्यासाठी हजारो वेळा, आमिरआगा’!
दरशब्दांगणिक नवा अनुभव देणारी, थक्क करून टाकणारी ही कादंबरी ‘द काईट रनर’. खालिद हुसैनी या लेखकाच्या इंग्रजी कादंबरीचा अनुवाद केलाय वैजयंती पेंडसे यांनी. जगभरातल्या उत्तमोत्तम साहित्याचा मराठीत तितकाच समर्थपणे अनुवाद करण्याची परंपरा ‘मेहता प्रकाशन’ने राखली आहे. चंद्रमोहन कुलकर्णी यांनी साकारलेलं मुखपृष्ठही साजेसं. एकूणच, एकीकडे मन समृद्ध करणारी आणि तेव्हाच हादरवून टाकणारी ही कादंबरी आवर्जून ‘वाचलीच पाहिजे’ अशी आहे.