- V. Pawar
खूप छान कादंबरी आहे. अगदी मनाला गुंतवून ठेवणारी. 👌👌
- Ajay Kulkarni
डॅन ब्राउन, एक सर्वोत्कृष्ट व प्रभावशाली अमेरिकन लेखक. त्यांच्या सर्व कादंबऱ्या जगातील बेस्ट सेलर्स म्हणून प्रसिद्ध आहेत. अनेक भाषांमध्ये त्यांचे अनुवाद झालेले आहेत. सर्व पुस्तके एकदा तरी वाचावीत, विचारांना नवीन दिशा मिळेल.
- AKASH JADHAV - INSIDE MARATHI BOOKS
एका जगप्रसिद्ध संग्रहालयात झालेला एक खून आणि त्या खुनाचा छडा लावता लावता कथेचा नायक जगाच्या प्राचीन इतिहासपर्यंत पोचतो. तो रहस्याचं उकल करण्यात यशस्वी होतो का?? नक्की रहस्य काय आहे?? दा विंची आणि या खुनाचा काय संबंध?? मोनालिसाच जगप्रसिद्ध चित्र काय सांगू पाहताय?? हे जाणून घेण्यासाठी किंवा काहीतरी वेगळं म्हणून, द दा विंची कोड हे पुस्तक मराठी वाचकांनी वाचलंच पाहिजे.
डॅन ब्राऊन लिखित द दा विंची कोड हे एक रहस्यमयी थरार प्रकारातील पुस्तक २००३ साली प्रकाशित झालं. अमेरिकेत या पुस्तकाचा विक्रमी खप झाला आहे आणि पुस्तकावर आधारित चित्रपट पण येऊन गेला. कथेचा नायक रॉबर्ट लँग्डन वर वर एकूण ३ पुस्तकं लेखकाने लिहलीत आणि त्यातील दोन पुस्तकांवर चित्रपट आले व रॉबर्ट लँग्डन या व्यक्तीरेखेचा समावेश असलेला एक हॉलिवूड चित्रपट देखील येऊन गेला. यावरून आपल्याला रॉबर्ट लँग्डन हे पात्र लेखकाने किती ताकतीने उभं केलं असेल याची कल्पना येते.
रॉबर्ट लँग्डन हा एक चिन्ह शास्त्रज्ञ आहे. संग्रहालयात झालेल्या खुनाच्या तपासासाठी त्याला पाचारण करण्यात येत. कथेत पुढे सोफी हे पात्र येत जी पोलीस खात्यात चिन्हतज्ञ आहे. तपास पुढे सरकताना जगातील सर्वात मोठं रहस्य उकल होण्याच्या मार्गावर असतं. ख्रिश्चन धर्मासाठी महत्वपूर्ण असणाऱ्या रहस्याबद्दल दा विंची ने त्याच्या चित्रांतून काही संकेत दिले आहेत का यावर रॉबर्ट भाष्य करतो. येशू, होली ग्रेल, किस्टोन, मेरी मॅग्दालिन आणि बरेच संदर्भ आणि दुवे या पुस्तकात वापरले आहेत.
मी वाचलेल्या रहस्य कथांपैकी सर्वोत्कृष्ट, मनाची पकड घेणारी हि कथा आहे. अर्थात पुस्तक वाचताना मला ख्रिश्चन धर्माबद्दल जास्त माहिती नव्हती पण त्याचा कुठेही अडसर आला नाही. कथा तुम्हाला अगदी गुंतवून टाकते. जर तुम्हाला रहस्य कथा आणि मानवी इतिहास आवडत असेल तर यापेक्षा उत्तम पुस्तक शोधून सापडणार नाही.
- Yashwanti Shinde
Atishay sundar... Mi wachley... Goodh aahe...
- Pooja Kuchekar
माझी आवडती कादंबरी आहे ही.
- Arti Palwankar
अप्रतिम पुस्तक ,वाचताना खूप एकाग्रता लागतो.means lot of concentration we need while reading.खूप संदर्भ लक्षात ठेवून वाचावे लागले .माझा अनुभव.
- Pranav Survase
डॅन ब्राऊन यांच्या राॅबर्ट लॅंग्डन या सिरीज मधील एक अद्वितीय कादंबरी. कला क्षेत्रातील एक नामवंत प्राध्यापक कशा प्रकारे अनेक रहस्यांचा उलगडा करतो व त्याचा नाट्यमय प्रवास या कादंबरीत मांडला आहे. अशी खिळवून ठेवणारी कादंबरी नक्की वाचा.
- TEJA KULKARNI
हे पुस्तक आणि त्यावरच सिनेमा खूप चर्चेत होतं तेंव्हाच मी क्रमाने सम्पवल. पुस्तक वाचताना येणारा रोमांच सिनेमा बघताना पण जाणवतो.
- Rajendra Gawade
सुंदर कांदबरी एकदा वाचायला घेतली कि पूर्ण वाचन झाल्याशिवाय राहत _ नाही
- Ravindra Chavan
नवीन वर्षाच्या पुर्वसंध्येला हे पुस्तक वाचून पुर्ण केले.. नवीन वर्षांत तुम्ही नक्की वाचा..
थरारक रहस्यकथा आवडणाऱ्या प्रत्येकाने वाचावी अशी ही कादंबरी आहे.असा कॅनव्हास सध्या तरी वाचनात नाही..
ओपस डाय या कट्टर संघटनेचा अनुयायी सिलास प्रायरी ऑफ सायन च्या प्रत्येक सेनापतींच्या हत्या करत सुटलाय.त्याला किस्टोन हवाय.ज्याच्या मदतीनं 2000 हजार वर्षांपूर्वी च अस रहस्य त्यांना नष्ट करायचंय ज्यामुळे कॅथलिक चर्च चा पायाच
डळमळीत होईल.जाक सॉनिऐ व
लँग्डन यांची पूर्व नियोजित भेट होण्या अगोदरच सॉनिऐ यांची हत्या होते.
जाक सॉनिऐ हे पायरी चे काय सदस्यत्व गृहण करत होते जेणेकरून त्यांची हत्या झाली . मरताना एक संदेश लिहून ठेवतात. यात ते लँग्डन ला शोधा अस सोफी या त्यांच्या नातीला गुप्त संदेश देतात. त्यांना तिलाच तिच्या कुटुंबाच काय गुढ रहस्य सांगायचं
असत.
लँग्डन हा पोलिसांच्या दृष्टीने सॉनिऐ चा खुनी आहे.पण लँग्डन हा चिन्हशास्त्रज्ञान सोफी ला मदत करतो.
त्यांना सापडलेली एक गुढ मास्टर की व नंतर मिळविलेले क्रिपटेक्स.....
टीबिंग हा होली ग्रेल चा इतिहास संशोधक त्यांना चर्च चा सगळं इतिहास समजून सांगतो.
सांगरील कागदपत्रे,
टेम्पलर सरदार त्यांचा इतिहास .
मेरी मॅगडालीन तिची कहाणी हे एक अतिशय स्फोटक येशू ख्रिस्तांबद्दल..
बिशप त्यांचा अनुयायी आणि गुरू याना का इतकी ओढ का होली ग्रेल मध्ये....?
रहस्याचा शोध घेत पॅरिस, ब्रिटन मधला चित्तथरारक प्रवास आपण वाचत वाचत अनुभवतो.
मेरी मॅगडालीन हे तर ख्रिश्चन संस्कृती चे स्फोटक रहस्य व राजवंश त्यांच रक्षक करणारी प्रायरी ऑफ सायन........त्यांची गुपिते.....
.होली ग्रेल ला शोधणारे लोक.......
पोलिसांचा ससेमिरा.......
हा प्रवास कुठं जातो......
होली ग्रेल सापडत का?
सोफी चा पायरी ऑफ
सायन शी काय संबंध आहे.....
अत्यन्त उत्कंठावर्धक अशी कादंबरी वेड लावते.
डॅन ब्राउन यांचं मुळ लेखनच एवढे दमदार असणार पण तोलामोलाचे अजित ठाकुर ह्यांनी पण ओघवत्या शैलीत अनुवाद केला आहे..
सलग बैठकीत वाचायला शक्य नसल तरी कथानक विसरायच्या आधीच परत सुरु करावे अन्यथा वाचनाची मजा निघून जाईल..
काही काही गोष्टी अशा स्फोटक आहेत कि बंदी कशी आली नाही पुस्तकावर अशी शंकाच येते.. असो.. वाचनानंद महत्त्वाचा..
सारांश माझ्या मते लिहीला आहेच पण मलपृष्ठावर असलेली माहिती पण उद्बोधक...
३१/१२/२०१९.
आपलाच RC..
- अमोल पालकर
थरारक रहस्यकथा आवडणाऱ्या प्रत्येकाने वाचावी अशी ही कादंबरी आहे.
कथेचा कॅनव्हास खूप मोठा आहे.
ओपस डाय या कट्टर संघटनेचा अनुयायी सिलास प्रायरी ऑफ सायन च्या सेनापतीच्या हत्या करत सुटलाय.त्याला keystone हवाय.ज्याच्या मदतीनं 2000 हजार वर्षांपूर्वी च अस रहस्य त्यांना नष्ट करायचंय ज्यामुळे कॅथलिक चर्च चा पायाच
डळमळीत होईल.जाक सॉनिऐ व
लँग्डन यांची पूर्व नियोजित भेट होण्या अगोदरच सॉनिऐ यांची हत्या होते.
जाक सॉनिऐ हे पायरी चे ग्रँडमास्टर होते . मरताना संदेश लिहून ठेवतात. यात ते लँग्डन ला शोधा अस सोफी या त्यांच्या नातीला गुप्त संदेश देतात. त्यांना तिला तिच्या कुुुटंबा च रहस्य सांगायचं
असत.
लँग्डन हा पोलिसांच्या दृष्टीने सॉनिऐ चा खुनी आहे.पण लँग्डन हा चिन्हशास्त्रज्ञान सोफी ला मदत करतो.
त्यांना सापडलेली चावी नंतर मिळविलेले क्रिपटेक्स.....
टीबिंग हा होली ग्रेल चा इतिहास संशोधक त्यांना चर्च चा सगळं इतिहास समजून सांगतो.
सांगरील कागदपत्रे,
टेम्पलर सरदार त्यांचा इतिहास .
मेरी मॅगडालीन तिची कहाणी.....
बिशप मैनुएल अरिंगारोसा त्यांचा अनुयायी आणि गुरू याना का इतका रस आहे होली ग्रेल मध्ये....?
रहस्याचा शोध घेत पॅरिस, ब्रिटन मधला चित्तथरारक प्रवास आपण वाचत वाचत अनुभवतो.
मेरी मॅगडालीन चा राजवंश त्यांच रक्षक करणारी प्रायरी ऑफ सायन........त्यांची गुपिते.....
.होली ग्रेल ला शोधणारे लोक.......
पोलिसांचा ससेमिरा.......
हा प्रवास कुठं पर्येंत जातो......
होली ग्रेल सापडत का?
सोफी चा पायरी ऑफ
सायन शी काय संबंध आहे.....
अत्यन्त उत्कंठावर्धक अशी कादंबरी वेड लावते.
डॅन ब्राउन यांचं लेखन दैवी आहे आपण
फक्त त्यात चिंब भिजायचं.........
- Amol Palkar
थरारक रहस्यकथा आवडणाऱ्या प्रत्येकाने वाचावी अशी ही कादंबरी आहे.
कथेचा कॅनव्हास खूप मोठा आहे.
ओपस डाय या कट्टर संघटनेचा अनुयायी सिलास प्रायरी ऑफ सायन च्या सेनापतीच्या हत्या करत सुटलाय.त्याला keystone हवाय.ज्याच्या मदतीनं 2000 हजार वर्षांपूर्वी च अस रहस्य त्यांना नष्ट करायचंय ज्यामुळे कॅथलिक चर्च चा पायाच
डळमळीत होईल.जाक सॉनिऐ व
लँग्डन यांची पूर्व नियोजित भेट होण्या अगोदरच सॉनिऐ यांची हत्या होते.
जाक सॉनिऐ हे पायरी चे ग्रँडमास्टर होते . मरताना संदेश लिहून ठेवतात. यात ते लँग्डन ला शोधा अस सोफी या त्यांच्या नातीला गुप्त संदेश देतात. त्यांना तिला तिच्या कुुुटंबा च रहस्य सांगायचं
असत.
लँग्डन हा पोलिसांच्या दृष्टीने सॉनिऐ चा खुनी आहे.पण लँग्डन हा चिन्हशास्त्रज्ञान सोफी ला मदत करतो.
त्यांना सापडलेली चावी नंतर मिळविलेले क्रिपटेक्स.....
टीबिंग हा होली ग्रेल चा इतिहास संशोधक त्यांना चर्च चा सगळं इतिहास समजून सांगतो.
सांगरील कागदपत्रे,
टेम्पलर सरदार त्यांचा इतिहास .
मेरी मॅगडालीन तिची कहाणी.....
बिशप मैनुएल अरिंगारोसा त्यांचा अनुयायी आणि गुरू याना का इतका रस आहे होली ग्रेल मध्ये....?
रहस्याचा शोध घेत पॅरिस, ब्रिटन मधला चित्तथरारक प्रवास आपण वाचत वाचत अनुभवतो.
मेरी मॅगडालीन चा राजवंश त्यांच रक्षक करणारी प्रायरी ऑफ सायन........त्यांची गुपिते.....
.होली ग्रेल ला शोधणारे लोक.......
पोलिसांचा ससेमिरा.......
हा प्रवास कुठं पर्येंत जातो......
होली ग्रेल सापडत का?
सोफी चा पायरी ऑफ
सायन शी काय संबंध आहे.....
अत्यन्त उत्कंठावर्धक अशी कादंबरी वेड लावते.
डॅन ब्राउन यांचं लेखन दैवी आहे आपण
फक्त त्यात चिंब भिजायचं.........
- NEWSPAPER REVIEW 28-5-2006
दा विंची जेव्हा मराठीत बोलतो!...
रॉबर्ट लॅग्डनला ही भाषा जेवढी अनाकलनीय होती. तेवढीच अनाकलनीय असते कोणतीही परकीय भाषा. परक्या भाषेतील विचार कितीही चांगला असला, तरी तो आपल्या भाषेत येईपर्यंत त्याचा काही उपयोग नसतो. प्रेंâच, रशियन वा पोर्तुगीज भाषेतील साहित्य कितीही सकस असले, तरी मल्याळम्-तामिळ भाषिकाला काही ते वाचता येणार नाही आणि मल्याळम् - तामिळ भाषेतील पुस्तकांचा मराठी माणसाला काही उपयोग नाही. इंग्रजीची स्थिती वेगळी आहे, हे मान्य. मात्र, ती फार वेगळी नाही. जगावर राज्य करणाऱ्या इंग्रजी माणसांनी जगभर त्याची भाषा नेली आणि जागतिकीरणानंतर ती नव्या जगाची बोली झाली. आपल्यासारख्या वसाहतींना तर इंग्रजीची ओळख कितीतरी अगोदर झाली होती. जागतिकीरणाच्या झपाट्यात त्याचा पुरेपूर वापरही आपण करून घेतला. मात्र तरीही इंग्रजी ही काही आमच्या सर्वसामान्य माणसाची भाषा नाही. ती होऊ शकत नाही. होण्याचे कारण नाही. त्यामुळे जगाशी संपर्क ठेवण्यासाठीदेखील आपल्या माणसांची भाषा मराठीच आहे. तीच असायला हवी. केवळ इंग्रजी येत नाही म्हणून ज्ञानाचे दरवाजे बंद होण्याचे कारण नाही. इंगजी ही ज्ञानाची खिडकी आहे, वगैरे गौरवपूर्ण उल्लेख ठीक आहे. मात्र, एखाद्या समूहाने इंग्रजीसारख्या परक्या भाषेवर एवढे अवलंबून राहण्याचे कारण नाही. जगातील ज्ञानाचे वारे माझ्या भाषेतून माझ्यापर्यंत आले पाहिजे. विशेषत: मराठीसारख्या समृद्ध, सक्षम भाषेत संवाद साधणाऱ्या समूहाला तसे वाटण्यात काहीच गैर नाही.
डॅन ब्राऊनची ही कादंबरी मराठीतच काय कोणत्याही भारतीय भाषेत आणणे तसे फार सोपे नाही. कारण या कादंबरीला असणारे संदर्भ अक्षरश: अफाट आहेत. ‘इंटेलिजन्ट थ्रिलर’ किंवा ‘मिक्स ऑफ मर्डर अँड मिथ’ एवढेच तिचे स्वरूप नाही. या कादंबरीत इतिहास आहे, धर्म आहे, संस्कृती आहे, भूगोल आहे, गणित आहे, भाषाविज्ञान आहे, चित्रकला आहे, गुन्हेगारी आहे! मुख्य म्हणजे मराठी माणसाला ठाऊक नसणाऱ्या संस्कृतीविषयी आणि प्रदेशाविषयी ती बोलते. ज्या लूव्हर म्युझियामध्ये क्यरेटरचा खून होतो आणि वाचक एका अद्भुत भुलभुलैय्यात सापडतो, ते संग्रहालय फ्रान्समध्ये, शोधासाठी तिथे दाखल होणारा लँग्डन अमेरिकन आणि ही शोधयात्रा येऊन ठेपते इंग्लंडपर्यंत. अशा तीन देशांशी संबंधित घटना, इंग्रजी, फ्रेंच, लॅटिन, ग्रीक, हिब्रू, इजिप्शियन अशा भाषांमधील गूढ शब्दांचा सुकाळ. शिवाय जी मिथके आहेत, ती खिस्ती धर्माशी संबंधित. त्यामुळे अनुवादासाठी आवाका हवा. लिओनार्दो दा विंचीच्या चित्रांपासून संगणकीय करामतीपर्यंत आणि भाषा विज्ञानापासून सांकेतिक चिन्हांपर्यंत असे बरेच काही कादंबरीच्या पानोपानी खच्चून भरले आहे. हे तपशील तसे कठीण आणि अनोळखी असल्याने मराठी वाचकांसाठी ते देताना कमालीची कसरत करावी लागणार, हे तर स्पष्टच. एवढे सारे करूनही पुन्हा ती कादंबरी कृत्रिम होणार नाही, हे भान बाळगणे सोपे नव्हते.
अजित ठाकूरांनी केलेला अनुवाद वाचल्यानंतर मात्र, त्यांना दाद द्यावीशी वाटली. त्यांनी हे अफलातून काम केले आहे. मराठी अनुवादही मूळ कादंबरीप्रमाणेच वाचून संपविल्याशिवाय हातातून खाली ठेवला जात नाही. डॅन ब्राऊनची क्षमता प्रचंड आहे. त्याने कादंबरीला जो वेग दिला आहे, रहस्यातील आकर्षण कायम ठेवले आहे, त्याला तोड नाही. ही कादंबरी लिहिताना एकच ‘की’ मी मोकळेपणाने वापरली आणि ती म्हणजे ‘डिलीट’ असे तो म्हणतो. म्हणजे त्याने सुमारे बाराशे पाने लिहिली आणि तिच्याहून जास्त पाने उडविली! कादंबरी बांधेसूद करायची, तर त्याला पर्यायही नव्हता. नाहीतर, मूळ रहस्याची जादू ओसरली असती, आशय पातळ झाला असता. अशी बांधेसूद कादंबरी मराठीत तेवढ्याच ताकदीने बांधताना अनुवादकाचा कस लागला असणार. शिवाय, ब्राऊनने शब्दही नेमके वापरले आहेत. आणि अशा शब्दांच्या छाटा मराठीत आणताना अनुवादकाची काहीशी दमछाकही झाली असणार! म्हणजे ‘पासवर्ड’ला मराठी शब्द काय वापरणार? ‘मंत्र’ म्हणावे, तर त्याला वेगळा सांस्कृतिक संदर्भ आहे. ठाकुरांनी वापरलेला ‘परवलीचा शब्द’ हा खरे तर ‘पासवर्ड’ला चपखल पर्याय नाही. पण ही दमछाक स्वाभाविक आहे. शिवाय, या कादंबरीतील लँग्डन, सोफी किंवा सॉनिए ही सगळीच मंडळी भाषा ‘वापरण्यात’ निष्णात. अगदी कोट्या करण्यातही तरबेज. खेड्यात राहणाऱ्या खेडवळ लोकांबद्दल चर्चला एवढी भीती वाटत असे, की त्यातून म्हणजे खलनायक हा शब्द आला, अशासारखा भाषेचा विचार करणारा लँग्डन. मात्र, भाषेच्या या साऱ्या छटा अगदी सहजसोप्या आणि नैसर्गिक पद्धतींनी मराठीत आणल्या गेल्या आहेत. विशेषत: लँग्डनच्या खिशातील चकती साबणाच्या वडीत घुसविण्याचा प्रसंग असो, प्रायरी ऑफ सायन्सचा सोफाने पाहिलेला गुप्त विधी असो किंवा टीबिंग आणि लँग्डन-सोफी यांचे प्रसंग असोत, ही वर्णने चपखलपणे उतरली आहेत. झुरिच बँकेत घडलेले नाट्य तर अगदी मराठीतूनच घडले आहे, असे वाटण्याइतपत जमले आहे! ठाकुरांना फ्रेंच अवगत आहे, याचाही फायदा त्यांना झालाच असणार! चंद्रमोहन कुलकर्णींच्या देखण्या मुखपृष्ठाने पुस्तकाच्या श्रीमंतीत भर घातली, हेही वेगळे सांगायला हवे. मात्र, मूळ कादंबरीतील ‘फॅक्ट’ हे पान समाविष्ट का केले नाही, ते समजत नाही.
इंग्रजी कधीही न वाचणाऱ्या बापड्या मराठी माणसाच्या तोंडावर तो चार-दोन नावे स्मार्टपणे फेकतो आणि त्याच्या वाचनाच्या व माहितीच्या माऱ्याने बिचारा मराठमोळा वाचक खचतो. मराठी पुस्तके व वाचनाला गौण मानणारा हा इंग्रजी समुदाय ‘हॅरी पॉटर’सारखी अतर्किक पुस्तके मात्र झपाटल्यागत वाचून काढतो. इंग्रजी शब्दांना मराठी प्रतिशब्द आठवत नाहीत याचे वाईट वाटण्याऐवजी कौतुक वाटणारी तरुणाई अशी अधांतरी हिंदोळते कारण त्यांना भाषाच नाही. सध्या तरी फक्त बाजाराची स्मार्ट भाषा त्यांना ठाऊक आहे. पण तुमचे अवघे जीवन पोसायला ती समर्थ नाही, हे त्यांच्या गावी नाही.
सर्वसामान्य माणसापर्यंत विंची पोहोचल्यावर हेच ‘नवसाहेब’ म्हणतील की ब्राऊन हा तर सामान्य लेखक आहे. कालपरवापर्यंत विंचीवर होणारी यांची भाषणे थांबतील. कारण तो आता सर्वांचा झाला! ब्राऊन हा काही रूढार्थाने अभिजात साहित्यिक नव्हे. हे तर मान्यच आहे. म्हणून काही त्याच्या या भन्नाट कादंबरीला नाके मुरडण्याचे कारण नाही. सर्वांना समजते व आवडते ते हिणकसच असते. असे समजण्याचेही काहीच प्रयोजन नाही. मुख्य म्हणजे, जगात काय गाजते आहे, ते आमच्या मराठी माणसाला समजायलाच हवे. ‘प्रायरी ऑफ सायन’ अथवा ‘होली ग्रेल’ असली नावे तोंडावर फेकून मराठी माणसाची बोलती बंद करणाऱ्या या तथाकथित इंग्रजी वाचकांना पुरून ठरेल, एवढी माहिती त्यासाठी मराठी माणसाकडे असायला हवी, त्यालाही जग समजायला हवे. नवे काही मिळायला हवे. त्याचा तो अधिकार आहे. तो काही सामान्य भाषेचा नव्हे, मराठीचा नागरिक आहे. तो इंग्रजी वाचू लागला, तर आनंदच आहे. पण इंग्रजी वाचत नाही म्हणून त्याचे काही अडता कामा नये. मात्र, आज तरी ते अडते. मराठी माध्यमातून यूपीएससी परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या महत्त्वाकांक्षी तरुणांपासून ते पत्रकारितेची पदवी घेणाऱ्या मराठी मुलांपर्यंत सर्वांना हा अनुभव येतो.
अरे! महाराष्ट्र म्हणजे काही साधे राज्य नाही. जगातील केवळ अकरा देशांची लोकसंख्या महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे. चीन, अमेरिका, रशिया, जपान असे दहा-अकरा देश वगळले, तर महाराष्ट्राएवढी लोकसंख्या कोणत्याही देशाची नाही! एवढा मोठा हा समुदाय. दोन-चार टक्के इंग्रजी वाचणारे-बोलणारे सोडले तर प्रामुख्याने सर्वांची भिस्त मराठीवर. जागतिकीकरण म्हणजे झेरॉक्सीकरण नव्हे. इंग्रजीच्या वळचणीला बसून दिवस काढणे म्हणजेही जागतिकीकरण नव्हे. ही वसाहतवादी मानसिकता काय कामाची?... आमच्या राज्याची साक्षरता आता वाढू लागली आहे. सर्वांसाठी शिक्षण खुले झाले आहे. काल हमाली करणाऱ्या एखाद्या धोंडूचा पोरगाही आता नव्या दिशेने झेपावंत आहे. रांधा-वाढा-उष्टी काढा याच संस्कारात वाढलेली बाईदेखील आता नव्या तेस्विनीच्या रूपात नवे क्षितिज धुंडाळते आहे. नवी स्वप्ने पाहणारे नवे डोळे उदयाला येत आहेत. त्या डोळ्यांना वाचायचे आहे, जग जाणून घ्यायचे आहे. त्यासाठी डॅन ब्राऊनच काय, प्रत्यक्ष दा विंचीलाही मराठीतून बोलायला भाग पाडले पाहिजे!
-संजय आवटे
- DAINIK SAKAL 28-05-2006
चव्वेचाळीस भाषांमधून अनुवाद आणि चार कोटी प्रतींच्या विक्रीचा उच्चांक. एक रहस्यकथा जगभर गाजते आहे. शेकडो लेख या कादंबरीवर लिहिले गेले. पुस्तकेही लिहिली गेली. ही कादंबरी वादग्रस्त ठरली. त्यावरचा चित्रपट वादात सापडला. डॅन ब्राऊन यांनी लिहिलेली ही थरारकथा अजित ठाकूर यांनी आता मराठीत आणली आहे.
ही गूढकथा आहे तरी काय?
हावर्ड युनिव्हर्सिटीतील धार्मिक प्रतीकशास्त्राचा प्राध्यापक रॉबर्ट लँग्डन पॅरिसमध्ये व्याख्यान देण्यासाठी आलेला असतो. मध्यरात्री त्याला फोन येतो व पाठोपाठ एक पोलीस अधिकारीही. पॅरिसमधल्या लूव्हर या प्रसिद्ध संग्रहालयाच्या वयस्कर व्यवस्थापकाचा - जॅक्विस सॅनिफ यांचा त्याच रात्री खून झालेला असतो. चित्रकार लिओनार्दो दा विंची याच्या ‘व्हिटुव्हियन मॅन’ या चित्राप्रमाणे त्यांचा नग्न मृतदेह जमिनीवर पसरला होता. त्यांच्या शरीरावर व पार्थिवावर आसापास काही रहस्यमय चिन्हे होती, सांकेतिक भाषेत लिहून ठेवल्यासारखी.
सॉनिफच्या व्यक्तिगत डायरीत रॉबर्ट लँग्डन यांची त्या सायंकाळी भेट ठरल्याचा उल्लेख होता. तिथल्या नोंदीच अशा होत्या, की पोलिसांची संशयी नजर लँग्डनकडे वळली. आता कादंबरी आणखी वेग घेते. लँग्डन पोलिसांपासून दूर पळतो. सांकेतिक चिन्हांचे अर्थ उलगडण्याच्या शास्त्रातील तज्ज्ञ व सॉनिफचीच नात असलेली सोफी नेव्ह्यू हिच्यासह लँग्डन संकेत चिन्हांचे माग काढतो. खुनाचे रहस्य उलगडू पाहतो. त्यांची ही वाट अनेक गूढ धार्मिक संकेत, श्रद्धा, समजुती, पंथांचे विचार, आग्रह, दुराग्रह अशा प्रदेशातून जाते. खुनाचा उद्देश स्पष्ट होत ती खुन्यापाशी पोहोचते.
या साऱ्या प्रवासात शेकडो वर्षे लपवलेली धार्मिक रहस्ये लँग्डन व सोफीच्या हाती येतात. ‘होली ग्रेल’ - पवित्र प्यालाचा शोध, लिओनार्दो दा विंची, याच्या ‘मोनालिसा’ व ‘द लास्ट सपर’ या पेंटिंग्जमागचे अर्थ उलगडायचा प्रयत्न होतो. पोपच्या नेतृत्वाखालील कॅथलिक धर्माधिकाऱ्यांच्या उतरंडीत स्त्रियांना वर्चस्व नाकारण्याच्या उद्देशने मेरी मॅग्डालेनच्या संबंधातली सत्य नाकारण्याचा परंपरागत प्रयत्न, तिच्या वंशाविषयीचे गुपित जपणाऱ्या ‘प्रायरी ऑफ द सायन’ या गुप्त संघटनेची माहिती, या गुप्त धर्ममताला हिंस्रपणे विरोध करणारा ‘ओपस डाय’ पंथ व त्याची गूढ व्यवस्था या साऱ्याचाच लँग्डन व सोफीला उलगडा होतो. ऑर्थर हेलीप्रमाणे एका व्यापक पटातील बारीकसारीक तपशील ही कादंबरी देते. जेफ्री आर्चरच्या कादंबरीसारखी मनाची पकड कायम ठेवते. फ्रेडरिक पोर्सिथच्या थरारक कादंबरीइतकीच ती थरार व रंजन याचा अनुभव देते; पण तरीही ती केवळ गूढरहस्य जपणारी रंजक कादंबरी एवढ्याच पातळीवर राहत नाही. कारण ती केवळ मर्डर मिस्टरी नाही. प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेले एक स्फोटक सत्य पुढे आलेले असते. ही कादंबरी पूर्णत: काल्पनिक नाही. या पुस्तकावर टीका होऊ लागल्यावर बँटम प्रेसने चित्रे-छायाचित्रे असलेली विशेष आवृत्ती प्रसिद्ध केली. या थरार कथेचा आधार ऐतिहासिक पुरावे आहेत हे स्पष्ट केले. मायकेल बेजंट व रिचर्ड ले यांनी संशोधन करून ‘होली ब्लड अॅण्ड द होली ग्रेल’ या पुस्तकात काही माहिती मांडली होती. त्या माहितीचाही डॅन ब्राऊनने सुरेख उपयोग केला आहे. त्यामुळेच थरारप्रधान मनोरंजक कादंबरीच्या पुढे ती जाते. अजित ठाकूर यांनी अनुवादात ही सारी वैशिष्ट्ये जपली आहेत. धर्मशास्त्रातील संकेत किंवा अन्य काही तपशील वर्णनाच्या ओघातच दिला जातो. त्यामुळे वाचनाचा ओघ मंदावत नाही की अडखळत नाही. अशा कादंबरीत आवश्यक असणारा वेग-आवेग अनुवादातही राखण्यात आला आहे. डॅन ब्राऊन यांच्या शैलीचाही अनुवाद करणे ठाकूर यांना जमले आहे. जगभर गाजत असलेली ही रहस्यकथा मराठीतही पूर्ण ताकदीने उतरली आहे.
- DAINIK SAMANA 11-06-2006
द दा विंची कोड ही डॅन ब्राऊन यांची कादंबरी त्यांच्या अगाध विद्वत्तेची साक्ष देते. ‘येशू खिस्ताचा मेरी मॅग्डालीनशी विवाह झाला होता. या जोडप्याला एक मुलगी झाली व त्यांचा वंश आजतागायत हयात आहे. यासंबंधीचा पुरावा ‘प्रायरी ऑफ सायन’ या संघटनेने प्राचीन काळापासून लपवून ठेवला आहे. कॅथॅलिक चर्चचे सर्वेसर्वा या पुराव्याच्या मागावर आहेत, तो नाहीसा करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, कारण येशूला त्यांनी देवपद दिले आहे. विवाहासारख्या मानवी घटनांचे चर्चने येशूच्या जीवनातून उच्चाटन केले आहे. हा प्रस्तुत कादंबरीचा आधारभूत विषय ललित लेखनासाठी फारसा सोयिस्कर नाही. अशात ब्राऊनने इतर अनेक पांडित्यपूर्ण माहितीची जोड या विषयाला दिली आहे. क्रिप्टॉलॉजी ऊर्फ सांकेतिक भाषेचे व चिन्हांचे शास्त्र, रोमन लोकांच्या पेगन धर्माचा कॅथॅलिक धर्माने ऱ्हास घडविला तो इतिहास, लिओनार्डो दा विंची या प्रख्यात इटालियन चित्रकार-शिल्पकार-शास्त्रज्ञाच्या चित्रांची आशयघनता, गणित, स्थापत्यशास्त्र, भूगोल वगैरे प्राचीन शास्त्रांची माहिती असे एकापेक्षा एक कठीण विषय ब्राऊनने या कादंबरीत हाताळले आहेत आणि तरीसुद्धा रसहानीचा दोष कोठेही नाही.
हे अल्परिचित प्राचीन युरोपीय विषय मराठी भाषाशैलीच्या माध्यमात उतरवायचे ही एक इक्यूलियन कामगिरीच म्हणायची, परंतु सिद्धहस्त अनुवादकार अजित ठाकूर यांनी हे आव्हान समर्थपणे पेलले आहे. रसाळतेचा भंग नाही, क्लिष्टता नाही, मराठी अनुवादांमध्ये अनेकदा खटकणारा भाषेचा खडबडीतपणाही नाही. नायक रॉबर्ट लँग्डन व नायिका सोफी नेव्ह्यू दोघेही सांकेतिक भाषेचे तज्ज्ञ आहेत. ‘होली ग्रेल’ या टोपणनावाने मेरी मॅग्डालीनचा उल्लेख केला जातो. नायक-नायिका या ‘होली ग्रेलच्या मागावर जातात. त्यासाठी अनेक सांकेतिक शब्दांची व चिन्हांची उकल करतात. त्यांच्या या पांडित्यपूर्ण ‘ट्रेझर हंट’मुळे कादंबरी एकदा हातात धरली की सोडवत नाही. हाच हृदयंगम अनुभव प्रस्तुत अनुवादही देतो.
मेहता पब्लिशिंग हाऊस यांचे प्रकाशनही दिमाखदार आहे. मुखपृष्ठावर लिओनार्डो दा विंचीच्या ‘मोनालिसा’च्या चेहऱ्याबरोबरच ‘द लास्ट सपर’ हे त्याचे चित्र व त्याच्या मिरररायटिंगच्या लेखनाचा काही भाग छापला हे अत्यंत औचित्यपूर्ण आहे. ‘द लास्ट संपर’ हे येशूने आपल्या १२ अनुयायांबरोबर घेतलेल्या अखेरच्या भोजनाचे चित्र आहे. या चित्राची मती गुंगवून टाकणारी उकल प्रस्तुत कादंबरीत आहे.
कादंबरी घराघरात संग्रहणीय असावी अशी आहेच आहे; परंतु भन्नाट व अतर्क्य असे विषयही कादंबरीच्या माध्यमात रसाळ कसे होऊ शकतात याचे हे एक ‘डेडशॉट’ उदाहरण आहे. असे प्रयोग मराठीत आवर्जून व्हायला हवेत. ठाकूर व मेहता या द्वयीने एका उत्तम कादंबरीची भर मराठी साहित्यात घालण्याचे नि:संदिग्ध श्रेय पटकावले आहे.
-इंद्रायणी सावकार