Gopal Khatokarडोंगरी ते दुबई :
मुंबईतील गुन्हेगारी जगतावरील महत्वाचे पुस्तक मुख्यत्वेकरून कुप्रसिद्ध गुन्हेगारी जगतातील " डॉन " समजल्या जाणाऱ्या दाऊद इब्राहिम (कासकर) ची गुन्हेगारी विश्वातील वाटचाल यात अधोरेखित केले आहे. यातून निर्माण झालेल्या टोळ्या व त्यांच्यातील टोळीयुद्ध मोडीत काढण्यासाठी मुंबई के पोलिसांनी केलेले प्रयत्न व केलेली एन्काऊंटरस.
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी म्हणून पूर्वीपासूनच प्रसिद्ध असून सर्वाधिक रोजगार देणार, स्वप्नपूर्ती करणारे शहर म्हणून नावाजलेलं होते व आजही आहे. या ठिकाणचा समुद्र किनारा, माझगाव डॉक येथील मोठे आयात बंदर व त्यामुळे संपूर्ण जगातून येथे होणारी आयात-निर्यात त्यातून मिळणारे मोठे उत्पन्न, गिरणी कारखान्याची निर्मिती यामुळे रोजगाराला मिळालेली चालना या कारणामुळे देशातील उत्तरे व दक्षिणेकडून कामाच्या शोधात आलेल्या कामगारांचा लोंढा. नंतर गिरणी कामगार संपामुळे वाढलेली तरुण बेरोजगारी. मुंबईतील उच्चभ्रू वर्ग त्यांचं अलिशान राहणीमान मुंबईतील झगमगाट याला मोहुन अनेक तरुण झटपट श्रीमंत होण्यासाठी गुन्हेगारी जगताकडे त्यांचं झालेलं स्थलांतर तस्करी, मटका,जुगार, दारूचे गुत्ते, लुटालूट, खंडणी, खून इत्यादी मार्गे मुंबईत सुर झालेली गुन्ह्यांची सुरुवात. यातून निर्माण झालेल्या गुंडांच्या टोळ्या, त्यानंतर ची रक्तरंजित टोळीयुद्ध, दाऊदची " डी " कंपनी अरुण गवळीची "BRA" कंपनी. दाऊद ची अंडरवर्ल्डमधील वाटचाल त्याला येऊन मिळालेले गुंड व त्यांच्या टोळ्या, इलेक्ट्रॉनिक वस्तू व सोन्याची त्याने केलेली तस्करी. नंतर दाऊदचे दुबई मध्ये झालेले पलायन, दाऊद या गुंड, तस्कराचे नंतर झालेले जागतिक हिटलिस्ट वरील दहशत वाद्यात रूपांतर. दाऊद चे बॉलीवूड व क्रिकेट जगताशी सोबत असलेले संबंध.यातून निर्माण झालेली दाऊदची प्रेमप्रकरणे इत्यादी.
हुसेन झैदी यांचे लिखाण शैली ही वाचकाला खिळवून ठेवते. त्यांनी अनेक वर्ष क्राईम रिपोर्टर म्हणून विविध वृत्तपत्रात केलेलं काम. गुन्हेगारी जगतातील बारकावे यांचे त्यांनी केलेले वर्णन या पुस्तकाला एक उंचीवर नेऊन ठेवत. याच बरोबर. एक शहर म्हणून मुंबईची झालेली डेव्हलपमेंट, बांधकामे, तेथील निर्माण झालेली उपनगरे, रोजगार निर्मिती या निमित्ताने आलेले लोक व शहराची भरभराट याचा पूर्ण लेखाजोखा यातून मिळतो. अंडरवर्ल्ड ( छुपे जगत) ची वास्तविक प्रकारची माहिती, त्यांच्याशी असलेले राजकारणी, बॉलीवूड क्षेत्राचे, पोलिसी संबंध सामान्य वाचकाला नक्कीच हेलावून टाकते.
Shekar Gawaleपुस्तक जरा वेगळ्या विषयावरचं आहे.पण मुंबईतल्या माफियांचा साठ वर्षांचा इतिहास झैदींनी चांगल्या प्रकारे मांडलाय.वाचतांना मन भुतकाळात जातं एवढं मात्र नक्की..!!जरूर वाचा,पण शेवटी व्यक्ती तितक्या प्रकृती.कोणाला आवडेल,कोणाला नाही...
" पसंद अपनी अपनी "
Ranjeet Waghmareतस्करी, गोळीबार, खंडणी, एन्काऊंटर आणि बरंच काही...
--------
मुंबईच्या डोंगरी भागातील एका पोलीस कॉन्स्टेबलचा मुलगा, पोलिसांचा वापर करून मुंबईत दादागिरी करतो. मुंबई पोलिसांच्या सहकार्याने कैक दोन नंबर धंदे, अनेक वस्तूंची तस्करी करतो. मुंबई पोलिसांकरवी (एन्काऊंटर च्या माध्यमातून) विरोधकांना संपवतो. पुढे मुंबईत बॉम्बस्फोट अन मुंबईतून दुबईला पलायन, पाकिस्तानात आश्रय आणि शेवटी मुंबई पोलीसच त्याच्या मागावर. असा थक्क करणारा प्रवास म्हणजे लेखक एस. हुसैन झैदी यांचं `डोंगरी टू दुबई` हे दाऊद वरील पुस्तक.
या पुस्तकामध्ये `दाऊद`ला डॉन करण्यापर्यंत छोटा राजन, छोटा शकील व त्याचे मित्र, मद्रासी गुंडांच्या व पठाणांच्या टोळ्या, दाऊद-गवळी यांच्या गॅंग मधील टोकाची दुश्मनी, हाजी मस्तानची दहशत, 1960 साली दारूच्या धंद्यातून वर्षाला 12 कोटी रुपये कमावणारा वरदराजन, तर बाबू रेशीम, रमा नाईक आणि अरुण गवळी यांची BRA ही टोळी. मन्या सुर्वे, करीम लाला अशा अनेक गुंडांच्या टोळ्यांमध्ये कधी दोस्ती तर जास्त करून दुश्मनी. विरोधकांवर गोळीबार, खून हे नित्याचेच. `खून का बदला खून` हे सूत्र ठरलेले. कहर म्हणजे भर दिवसा हायकोर्ट व तुरुंगात जाऊन विरोधकांवर गोळीबार करून बदला घेणे. तर वेळप्रसंगी स्वतःचा बचाव करण्यासाठी काही गुंडांचे देशो-देशी पलायन. खंडणीसाठी उद्योजक, बिल्डर, बॉलिवूडकरांना धमक्या, अपहरण. वेळप्रसंगी खून हे या जगातील उठाठेवी. या सर्वांचा निपटारा व परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून एखाद्या गुंडाचा नियोजित पद्धतीने एन्काऊंटर करणे (थोडक्यात पोलिसांकडूनही खुनच) असे हे `याच जगातील वेगळे जग` `डोंगरी ते दुबई` या पुस्तकात डोकावल्यास समजू शकते. एका वेगळ्या व फिल्मी स्टाईल परंतु सत्य अशा जगाचा प्रत्यय आपणास या पुस्तकातून येतो. सर्वकाही ईथे सांगणे योग्य नाही, बाकी वाचनाची आवड असणाऱ्यांनी हे पुस्तक नक्की वाचून बघावे.
Vaibhav Kumbharमुंबई मिरोर ,इंडियन एकस्प्रेस अशा कित्येक नामवंत वृत्तपत्रांमध्ये काम केलेल्या एका पत्रकाराने लिहिलेले हे पुस्तक मुंबईच्या टोळीयुद्धाची कथा सांगते. १९५०-६० च्या दशकातील करीम लाला, हाजी मस्तान, वरद राजन यांच्यापासून सुरू होऊन २००९ - १० पर्यंत च्या गुन्हेगारी जगतातील घटना हे पुस्तक अत्यंत उत्कंठावर्धक पद्ध्तीने रंगवते.. पुस्तकातील बहुतांश भाग हा दाउद इब्राहिम वर केंद्रित आहे. पुस्तकामध्ये कुठेही लेखकाने कोणत्याही गुन्हेगाराचे उदात्तीकरण केल्यासारखे जाणवत नाही हे विशेष. भारताच्या आर्थिक राजधानी ची दुसरी रक्तरंजित काळी बाजू जाणून घेण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचावे.
Kiran Borkarडोंगरी ते दुबई ...एस. हुसेन झैदी
अनुवाद..........अशोक पाध्ये
मेहता पब्लिकेशन
मागील साठ वर्षातील मुंबईतील गुन्हेगार आणि त्यांच्या टोळ्यांचा इतिहास यात मांडला गेला आहे . अगदी मुंबईचा पहिला दादा कोण यापासून सुरवात झालीय . पण यातील खरा नायक आहे तो दाऊद इब्राहिम . संपूर्ण पुस्तक त्याच्या भोवती फिरते . त्याचा उदय आणि त्याच्या आधीची परिस्थिती याची लेखकाने सुरेख माहिती दिली आहे . हाजी मस्तान,वरदाराजन आणि कारीमलाला यांचा उदय आणि अस्त. त्याचवेळी दाऊदचा उदय कसा झाला याची सुरेख माहिती आहे . माया डोळस आणि मन्या सुर्वे यांचे इंनकॉन्टर तसेच बाबू रेशीम याची हत्या, जे.जे. हॉस्पिटलमधील हत्याकांड यांचे वर्णन अंगावर काटा आणते . हे पुस्तक म्हणजे मुंबईतील गुन्हेगारीचा अधिकृत इतिहासच आहे
Vilas Jadhav मी वाचले आहे मज्जेदार आहे
Narendra Gandhi सुंदर माहितीपूर्ण
Deepak Shinde वाचून खूप साऱ्या गोष्टींचा उलगडा होतो..
Abhay Abhang मी वाचले आहे..nice book..
मधुकर धाकराव खूप सुरेखपणे आतील लेखन मांडणी झालेली आहे।.. मी सुक्ष्मपणे वाचलेय्।नी माझ्याकडील ग्रंथ संग्रहालयात त्याचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे।
Chhaya Kulkarni मी नुकतेच वाचले हे पुस्तक. सतत चे खुन रक्तपात सहन होत नाहीत. पण एका वेगळ्या जगाची ओळख होते.
Purva Joshi-khadilkar Chan aahe
Sunetra Dharmadhikari चांगले आहे पुस्तक
किरण माने छान आहे
Mohamad Husain Moosa वाचनीय
Sameer Sathe खूप माहितीपूर्ण पुस्तक आहे
MAHARASHTRA TIMES 20-10-2013नेपोलियन हिल म्हणतो `गरज ही शोधाची जननी असेल, पण ती गुन्हेगारीची जनकही आहे.` मुंबईचं तेच झालं. मुंबईचा विकास झाला आणि सोबत गुन्हेगारीचाही. गुन्ह्याची व्याख्या रात्री-अपरात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वस्तू चाकू, खंजिर दाखवून लुटणे; इथपर्यंतच मर्यादित होती; तेव्हापासून ते आता दिवसाढवळ्या खंडणीसाठी होणारे खून, इथपर्यंतचा प्रवास म्हणजे एस. हुसेन झैदी यांचे `डोंगरी ते दुबई : मुंबईतील माफियांची साठ वर्षे` हे पुस्तक.
मुंबईतील गुन्हेगारांची पहिली ज्ञात टोळी म्हणजे अलाहाबाद गँग. नावावरूनच त्यात कुणाचा भरणा होता हे कळते. त्यानंतर तिच्या विरोधात ठाकलेली जॉनी गँग, कानपुरी-रामपुरी गँग. रामपुरी गँगने मुंबईतील गुन्हेगारी जगताला रामपुरी चाकू हे शस्त्र बहाल केले. त्याच काळात क्रॉफर्ड मार्केटच्या शेजारी बेंगालीपुरा भागात एका सायकलच्या दुकानात मस्तान हैदर मिर्झा आपल्या अब्बाजानबरोबर राबत होता. दिवसभर राबूनही वडिलांच्या हातात आठ रूपयेच पडतात, हे तो जाणत होता. त्याचवेळी रस्त्यावरून धावणाऱ्या मोटारींचे त्याला वेध लागले. तसंच गोदीवर काम करताना कस्ट्म्स ड्यूटी चूकवून नफा कमावता येतो, हेही त्याला समजले आणि मग महिन्याच्या १५ रूपये कमाईवर थोडी मलई म्हणून सुरू केलेल्या चोरीला सुनियोजित तस्करीचे रूप आले.
त्याचवेळी व्हिक्टोरिया टर्मिनसवर हमालीचे काम करणारा वरदराजन मुनीस्वामी मुदलियार आपल्या रोजीरोटीसाठी झगडत होता. १९५२ साली मोरारजी देसाई सरकारने दारूबंदी लागू केल्यानंतर हातभट्टीवर दारू निर्माण करण्याचा व्यवसाय वरदराजनने सुरू केला आणि त्यात यशही प्राप्त केले. दक्षिणेतून आलेल्या या वरदराजनने धारावी, शीव-कोळीवाडा, अँटॉप हिल इथे आपले बस्तान बसवले. वरदराजनचा वरदाभाई होत असतानाच, मस्तानही मोठा होत होता. वरदाभाईला `वणक्कम थलैवार` म्हणत आपल्या वाक्चातुर्याने मस्तानने कसे आपल्या बाजूला वळवून घेतले आणि नंतर आपल्या छडीच्या दहशतीमुळे कर्दनकाळ बनलेल्या करीमलाला या पठाणाला सोबत घेऊन त्रयींची ही संघटित गुन्हेगारी मुंबईवर कशी राज्य करू लागली, हा पुस्तकातला वृत्तांत अत्यंत थक्क करणारा. मस्तानच्या दरबारात एका नेकदिल हवालदाराला नेहमी प्रवेश आणि आदर मिळे, तो म्हणजे इब्राहिम कासकर!
काळाची क्रूर थट्टा म्हणजे पोलिसी खात्यात आदराचे-मानाचे स्थान असेलेल्या इब्राहिम कासकर यांच्याच घरात निपजला देशाचा शत्रू नंबर एक - दाऊद इब्राहिम कासकर! एकीकडे मस्तान-वरदाभाई-करीमलाला मुंबईच्या गुन्हेगारी राज्यावर वर्चस्व गाजवत असतानाच बाशूदादा आणि सोळा वर्षीय दाऊद इब्राहिम कासकर यांच्यात खटके उडत होते. दाऊदला स्थानिक राजकारण्याने मार्ग दाखवून यंग पार्टी सुरू करायला लावली आणि संघटितपणा काय चमत्कार दाखवू शकतो, हे दाऊदला कळून चुकले. त्यातच पांढरपेशा जगतात मस्तानचे वाढते वजन पाहून अस्वस्थ झालेल्या दाऊदने त्यालाच डिवचण्याचा चंग बांधला आणि अवघ्या एकोणिसाव्या वर्षी आपल्या साथीदारांच्या साहाय्याने पावणे पाच लाख रूपयांची चोरी केली. पुढे चोरलेली रक्कम ही मस्तानची नव्हती हे उघड झाले, पण तेव्हाच मुंबईच्या गुन्हेगारी जगतावर खऱ्या अर्थाने दाऊदचा उदय झाला. दाऊद डोंगरीमध्ये वर्चस्व सिद्ध करत असताना १९७७ च्या सुमारास अरूण गवळी, बाबू रेशीम आणि रमा नाईक यांची `बी-आर-ए गँग` प्रस्थापित झाली होती. याचवेळी पदवीधर मन्या सुर्वेचा दादागिरीमध्ये झालेला प्रवेश. हिंदू म्हणवल्या जाणाऱ्या गुन्हेगारांची मुस्लिम गँगस्टर्सशी होणारी भांडणे, त्यातून होणारा रक्तपात आणि आपला सरळ संबंध टाळण्यासाठी पोलिसांना पुढे करून रूढ झालेली एन्काऊंटर पद्धत... हा इतिहास पुढे सर्वांनाच माहीत आहे.
शहरात असा रक्तपाताला ऊत आला असतानाच उपनगरांमध्ये राजन नायर आणि नंतर छोटा राजन यांची `डी कंपनी`ला साथ मिळाल्याने काट्याने काटा काढणे, सूड घेणे हे शब्द परवलीचे झाले. हे सर्व सुरू असतानाच पोलिसांना अनेक हत्या, खंडणीमध्ये दाऊदचाच हात असल्याचे पुरावे मिळाले. पोलिस सर्व तयारीनिशी मुसाफिरखान्यावर धडकलेसुद्धा. पण काही मिनिटांची हुलकावणी देऊन दाऊद निसटला, तो कायमचाच. ते साल होते १९८६. त्यानंतर दाऊद पुन्हा कधीही देशात आला नाही.
भारताबाहेर गेल्यानंतर छोटा राजन आणि इतर हस्तकांच्या साहाय्याने दाऊद खंडणीखोरी आणि हत्यांचे रक्तरंजित अध्याय लिहू लागला. मग त्या गवळी टोळीशी झालेल्या तुफान चकमकी असोत की माया डोळसला संपवण्यात थेट दुबईहून दाऊदने हलवलेली सूत्रे असोत. मात्र तोपर्यंत अंडरवर्ल्ड केवळ गुंडापर्यंत मर्यादित होतं. मुंबईकरांना त्याची पहिली झळ बसली, ती जग हादरवणाऱ्या १२ मार्च १९९३च्या बॉम्बस्फोटांवेळी. त्यानंतर भारतावर अनेक हल्ले झाले, पण मुंबईला सदोदित असुरक्षिततेच्या खाईत लोटणारा दिवस म्हणून आजही १२ मार्च हीच तारीख डोळ्यांसमोर येते. त्यानंतर मग छोटा राजनचे डी कंपनीतून फुटून निघणे, छोटा शकीलने त्याची जागा घेऊन बॉलिवूडमध्ये आपले स्थान मिळवणे, अबू सालेमचा उदय आणि अस्त हे सगळे ओघाने येते. आज दाऊद किती सुरक्षित आयुष्य जगत आहे, पाकिस्तानमधील सेंट्रल बँकेला त्याने आर्थिक संकटातून कसे वाचवले, भारत, नेपाळ, पाकिस्तान, थायलंड, दक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया, मलेशिया, इंग्लंड, युएई, सिंगापूर, श्रीलंका, जर्मनी, फ्रान्स अनेक देशांत व्यापाराचे जाळे कसे विणले गेले याचा वृत्तांत थक्क करणारा आहे.
हुसेन झैदी मुंबईचा ६० वर्षांचा गुन्हेगारी इतिहास अवघ्या ४२८ पानांत मांडतात. ते करताना कोणी नायक होणार नाही, याचा उत्तम समतोल साधलाय. यात आलेले अनेक उल्लेख आणि प्रसंग गौप्यस्फोट करणारे, तर काही गर्भित इशारा देणारे आहेत.
हुसेन झैदी यांच्या मूळ लेखणीत असलेल्या प्रवाहीपणाला अशोक पाध्येंच्या अनुवादाने कुठेही खीळ बसलेली नाही. इतक्या संवेदनशीलतेने त्यांनी हा अनुवाद केलाय. कमल हासनच्या `नायकन` आणि विनोद खन्ना-फिरोझ खान अभिनित `दयावान`पासून अलीकडच्या `वन्स अपॉन टाइम इन मुंबई`मध्ये या गुन्हेगारी जगताचे चित्रण करण्यात आलेले आहे. पण तीन तासांच्या चिमटीत पकडणे अशक्य असलेला हा विषय झैदी यांनी पुस्तकात आपल्या कल्पनेच्या विशाल कॅनव्हासवर सुरेख रंगवला आहे.