- Harshda Maheshwari
नक्की वाचा विषेशतः महिला वर्गानी..
- Yashashri Rahalkar
वाचलय... काही दिवस अत्यंत अस्वस्थपणा वाटत होता वाचून पार हादरले होते मी .... प्रत्येक स्त्री ने जरूर वाचावे ....
हे पुस्तक वाचले की आपल्या धर्माची, देशाची आणि स्वातंत्र्याची खरी किंमत कळते .
- Sandip R Chavan
चीड,राग,संताप आणणारी सत्य घटनेवर आधारित कादंबरी......
एखादा मनुष्य(?) किती हैवान होऊ शकतो? सैतान कोणाला म्हणतात? या प्रशांची उत्तरे पाकिस्तानातील एक धर्मगुरू ‘पीरसाई’ याच्याबद्दल वाचल्यावर मिळतात.
ही कादंबरी एका हिर नावाच्या सुंदर तरुणीची करुण कहाणी आहे. तिच्या स्वप्नांचा चुराडा होऊन तिला किती अनन्वित अत्याचाराला बळी पडावं लागते हे वाचल्यावर मनाचा थरकाप उडतो. धर्माच्या नावाखाली किती निचपणा केला जातो हे या कादंबरीत समजते.
पाकिस्तान सारख्या धर्मांध राष्ट्रात धर्मगुरूविरुद्ध एखादं पुस्तक लिहणे व धर्माच्या नावाने कोणते काळे धंदे होतात हे जगापुढे आणण्याचे धाडस तेहमिना दुर्रानी यांनी केले त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे एवढे थोडेच आहे.
भारती पांडे यांनी केलेला अतिशय उत्तम असा अनुवाद वाचकास जागच्याजागी खिळवून ठेवतो.
पुस्तकाच्या सुरवातीला पुस्तकाबद्दल थोड्यात माहिती आहे ती खालीलप्रमाणे:-
ही कादंबरी दक्षिण पाकिस्तानमध्ये घडते. एका सत्य घटनेतून स्फुरलेली ही कादंबरी पराकोटीच्या दुष्टत्वाचे कठोर दर्शन घडवते. रक्तपिपासू धर्मनेत्यांनी भ्रष्ट केलेल्या इस्लामचे स्वरूप कोणतीही लपवाछपवी न करता वाचकांपुढे ठेवण्याचे धाडसाचे काम ही कादंबरी करते. हीर नावाच्या एका सुंदर तरुणीची करुण कहाणी लेखिकेने अत्यंत उत्कटतेने, प्रभावशाली भाषेत सांगितली आहे. वयाच्या केवळ पंधराव्या वर्षी या अलौकिक सुंदरीचा विवाह तिच्याहून अठरा वर्षांनी मोठ्या असलेल्या पीरसाई या धर्मगुरुशी होतो. हीरवर अनन्वित अत्याचार करत पीरसाईने हीरला अध:पतनाच्या अंतहीन खाईत नेऊन ठेवले आहे. परंतु ज्या भयंकर दुःस्वप्नामध्ये हीर कैद झालेली आहे, ते दुःस्वप्न तिचे एकटीचे नाही; पीरसाईशी, धर्माशी एकनिष्ठ असणाऱ्या त्या साऱ्या जमातीचेच ते दुर्दैव आहे. पीरच्या हवेलीमध्ये रोज दिवस-रात्र वर्णन करता येणार नाहीत, अशी भयंकर क्रूर कृत्ये केली जातात - हे सारे अल्लाच्या नावाने केले जाते. तिच्या धन्याने निर्माण केलेल्या या रौरवामध्ये ओढली गेल्यावर हीरची आत्मप्रतिष्ठा, तिचे स्वातंत्र्य तर नष्ट होतेच, परंतु तिच्यामधील उपजत माणुसकीही संपून जाते....अखेर एका भयंकर निर्णयाने हीरला आपले अस्तित्व गवसते. एक संतप्त आणि धाडसी कादंबरी. या कादंबरीने उपखंडातील आघाडीच्या साहित्यिकांमध्ये तेहमिना दुर्रानी यांची प्रस्थापना केली आहे. या कादंबरीचे मुखपृष्ठ तेहमिना दुर्रानी यांचेच आहे. ‘अ मिरर टू द ब्लाईंड’ हे अब्दुल सत्तार एढी यांचे चरित्र हे दुर्रानी यांचे दुसरे पुस्तक. ‘ब्लास्फेमी’ ही त्यांची पहिली कादंबरी. तेहमिना दुर्रानी पाकिस्तानामध्ये लाहोर येथे राहतात.
- Archana Chinchanikar
सुन्न करणारे पुस्तक
- DAINIK TARUN BHARAT 07-04-2002
इस्लाम धर्मांधतेचा बुरखाफाड!...
दक्षिण पाकिस्तान, इस्लामी धर्मगुरु पीरसाई. त्याची सुंदर बायको हिर. हिरची बहिण तिला भेटायला येते, सोबत असतो तिचा सहा वर्षांचा पोरगा. हिरला बहिण, भाच्याला बघून आनंद होतो. ती त्यांना भेटते, गप्पा मारते. बहिण परत गेल्यावर पीरसाई हिरला प्रचंड मारतो. तिने धर्म भ्रष्ट केलेला असतो. अल्लाचा अपमान केलेला असतो. कोणता? तर परपुरुषासमोर ती बिना बुरख्याची आलेली असते. परपुरुष कोण? तर तो तिचा सहा वर्षांचा भाच्चा. किती हे धर्माचं स्तोम. बरं हाच पीरसाई पुढे हिरला कॅबरे करायला उद्युक्त करतो. म्हणजे सहा वर्षाच्या भाच्याला परपुरुष समजणारा आणि परपरुषांसमोर कॅबरेही करायला लावणारा कोण तर धर्मगुरुच!
हिर नुकतीच वयात आलेली असताना तिचे एका तरुणावर प्रेम असते, त्याचं नाव रांझा. दोघे प्रेमाचा इजहार करतात आणि त्याला एक दिवस उलटत नाही तोच हिरचा पीरसाई या अठरा वर्षांनी मोठ्या असलेल्या धर्मगुरूशी निकाह जमतो. पीरसाईची धर्मगुरु म्हणून प्रचंड इज्जत असते. त्याचा भक्त वर्ग मोठा असतो. अगदी लँड क्रूझर गाड्या त्याला भक्त गण भेट देत असतात. पीरसाईशी हिरचे लग्न होणे म्हणजे हिर नशीब घेऊनच जन्माला आली असे समजले जाते. पुढे पीरसाई आपल्या या बायकोला गावातल्या रेस्ट हाऊसवर एका मंत्र्यासमोर कॅबरे करायला भाग पाडतो. ती करते कारण प्रचंड दहशत असते. ती एकएक कपडे उतरवते आणि नंतर त्या मंत्र्याकडे बघते. तो असतो, रांझा. हिरच्या तरुणपणी एका दिवसात संपलेल्या प्रेमकहाणीचा नायक. साऱ्या गोष्टी अतिशयोक्त वाटाव्यात अशा. बुरखा ते कॅबरे हा हिरचा प्रवास भयावहच, अन् तेवढाच ‘इस्लाम खतरेमें’चा पर्दाफाश करणारा.
पाकिस्तानातील लाहोरमध्ये राहणाऱ्या तेहमिना दुर्रानी या लेखिकेने हिरची ही कथा ‘ब्लास्फेमी’ नावाने प्रकाशात आणली आहे.
१९९१ मध्ये तेहमिना दुर्रानी यांचं ‘माय फ्युडल लॉर्ड’ हे आत्मकथन प्रसिद्ध झालं आणि पाकिस्तानात खळबळ उडाली. इस्लाम खतरेमें आला होता. बांगला देशातील तसलिमा नसरिन या धाडसी लेखिकेने जेव्हा इस्लाममधील धर्मगुरुंचा बुरख फाडला तेव्हाही तिच्यावर सारे मौलवी चिडले होते. तिला ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. परिणामी ती अज्ञातवासात गेली होती. तेहमिनालाही छळ सहन करावा लागला. मात्र, जगभरात या पुस्तकाचं कौतुक झालं. बावीस भाषात त्याचा अनुवाद झाला. इटलीचा ‘मरिसा बेलासरियो’ हा पुरस्कार तिला मिळाला. मात्र, पाकिस्तानात तिच्यावर संकट होतंच. तरही तेहमिना डगमगली नाही. तिने ‘ब्लास्फेमी’ लिहिलं आणि पुन्हा पाकिस्तान हादरलं. इस्लामच्या नावाखाली धर्मगुरु किती पराकोटीचा दुष्टपणा करतात, धर्माच्या नावाखाली समाजही कसा हे स्विकारतो ते तिने बिनधास्त या पुस्तकात लिहिलं. ‘ब्लास्फेमी’ वाचताना पानापानावर थरथर होते.
पाखंड झुगारणाऱ्या पोटच्या पोराला मारणारा पीरसाई, पोटच्या पोरीचे लैंगिक शोषण करणारा पीरसाई आणि ते शांतपणे बघणारा समाज. वास्तवाशी तारतम्य ठेवून छळाची अतिशयोक्ती कल्पनेत आणायची म्हटली तरी एवढा छळ आपल्या कल्पनेत येवू शकत नाही. पाकिस्तानात तर तो प्रत्यक्षात आहे.
पाकिस्तानातील धर्मगुरुचे हे पाखंड दुर्रानीने धाडसाने बाहेर आणलं आहे. ‘ब्लास्फेमी’ म्हणजे धर्मविरोधी कृत्य. मग ते पीरसाईचं की ते सांगणाऱ्या दुर्रानीचं ते आपणच ठरवायचं.
- DAINIK SAKAL 09-12-2001
संतप्त, धाडसी कादंबरी...
‘ब्लास्फेमी’ म्हणजे पवित्र गोष्टी विषयी निंदात्मक बोलणे Blaspheme ‘ब्लॅ’स्मफमि या इंग्रजी शब्दांचा अर्थ ईश्वराविषयी निंदात्मक बोलणे. इथे ईश्वर म्हणजे धर्मगुरू, ईश्वर व मानवातील दलाल. त्याचे विकृत वागणे व त्या विकृतीला चढवलेला धर्माचा साजबाज व त्या भोवती निर्माण झालेल्या व्यवस्था, पुरुषप्रधान मनोविकृतीतून उदयाला येणाऱ्या नरकाचे चित्रण या कादंबरीत आहे. अध:पतन आणि ऱ्हासाची काळीकुट्ट शोकांतिका कशी घडत जाते याचे प्रभावी चित्रण कादंबरीत केले आहे. विकृत शोषक धर्मसत्ता राबविताना धर्मांधता दहशतवाद, जुलूम, जबरदस्ती अन्याचाचा किती अतिरेक करू शकतो याचे प्रभावी चित्र लेखिकेने धाडसाने उभे केले आहे. म्हणूनच कादंबरी ब्लास्फेमी आहे.
मानव मूल्य व त्यासाठीच्या आध्यात्मिक प्रेरणा याचा कुठलाही पुसटसा स्पर्शसुद्धा कादंबरीला नाही. कादंबरीची नायिका ‘हीर’ ही संपूर्ण आयुष्य या आध्यात्मिक प्रेरणा शोधत राहते. पण धर्म, समाज, कुटुंब, राजकारण, अर्थकारण पुरुष प्रधानता बळकट करणारे आहे आणि हा पुरुष जेव्हा शोषक बनतो तेव्हा स्त्रीला प्राकृतिक जीवनसुद्धा नीट जगता येत नाही. मानवी सहजिवनाची नैसर्गिक मूल्येही चिरडल्या जातात व एक विकृत नरक उदयाला येतो. संपूर्ण समाज ऱ्हासाच्या खाईत लोटला जातो.
या कादंबरीतील सगळी जिवंत पात्रे मृतवत जीवन जगतात. शोषकाच्या छळवादात जीवनाचे सगळे प्राकृतिक नैसर्गिक अंकुल जळून जातात. ‘फुलणे जगणे’ या क्रियाच कादंबरीतून गायब आहेत. अज्ञान धार्मंधता, लाचारी, हुजरेगिरी, भीती, दहशत यातून पराकोटीची असुरक्षीतता आहे. जगण्याची टिकून राहण्याची प्रेरणा क्षीण आहे. ती मृतवत आयुष्यापेक्षाही हीन आहे. बंडखोरी करणारी, सत्याचा शोध घेणारी, अन्याय झुगारणारी माणसे दहशतवादाने मृत्युमुखी पडतात. पराकोटीच्या छळाने हलाहल होऊन मरतात. तोती काळी, छोटासाई अन्याय झुगारून देताना मरतात व भुताखेताच्या रूपाने कादंबरीत वावरतात. नायिकेच्या आध्यात्मिक प्रेरणा, मानसिक भ्रमाच्या रूपाने या भुताखेतामधून कादंबरीत प्रकट होतात जीवनाची ही उद्ध्वस्त भयावहता वाचकाच्या मनाला पछाडून सोडते.
विकृत लैंगिकता शोषण जेव्हा धर्म अर्थ, समाज कुटुंब व्यवस्थेत रुजवले जाते तेव्हा किती विकृत स्तराला समाज जातो याचे लख्ख चित्रण कादंबरीत आहे. अतिरेकी भैतिकवाद इस्लामिक धर्मांध दहशतवाद मानवी जिवनाचा कसा विकृत नरक बनवतो याचे उद्ध्वस्त विदारक चित्रण संपूर्ण कादंबरीभर आहे. कादंबरी पराकोटीच्या दृष्टत्वाचे दर्शन घडवते.
कादंबरीची लेखिका आहे - तेहमिना दुर्रानी. मराठी अनुवादक आहे भारती पांडे. या संतप्त आणि धाडसी कादंबरीने तेहमिना दुर्रानी यांची भारतीय उपखंडातील आघाडीच्या साहित्यिकामध्ये नोंद झाली आहे.
- DAINIK PUDHARI 09-12-2001
तेहमिना दुर्रानी यांनी चित्रित केलेली धाडसी कादंबरी ‘ब्लास्फेमी’ मराठी अनुवादरूपात वाचली आणि एक विलक्षण अस्वस्थता मनात व्यापून राहिली. आपण आपल्या अवकाशात पाहिलेले जग, प्रसारमाध्यमांनी रेखाटलेले जग, यातून व्यक्तीची होणारी जगाबद्दलची समजूत आणि प्रत्यक्ष अनुभवलेले दाहक वास्तव यात किती अंतर आहे, याची एक दाहक जाणीव ‘ब्लास्फेमी’ ही कादंबरी करून देते.
या अस्वस्थपणाला आणि त्यातून येणाऱ्या हताशपणाला वर्तमानाचे अस्वस्थ वास्तवही कारण आहे. वर्तमानकाळ हा अवघ्या जागाला हादरवून सोडणारा आहे. महासत्तेला आव्हान देऊन विध्वंस करणारा आहे. धर्माच्या नावाने होणारा माणुसकीचा संहार चकीत करणारा आहे. धर्माचा अर्थ न लागलेली किंवा स्वत:च्या स्वार्थानुसार धर्माचा अर्थ लावणारी धार्मिक नेते मंडळी युवाशक्ती वाममार्गी पैसा मिळवून, मानवतेची मूल्ये पायदळी तुडवित आहेत. माणसांच्या जगण्याला मोल राहिले नाही आणि सुरक्षिततेची खात्री उरली नाही. अस्वस्थ आणि अशाश्वत असा वर्तमान उभा केला आहे. मूलतत्त्ववादी, कडव्या आणि असहिष्णू धर्मांध पिपासूंनी.
धर्म मानवी जीवनाला संस्कृतीची एक चौकट बहाल करतो. धर्माचा अर्थच तो आहे. मात्र, त्याचा अर्थ नीट जाणला नाही, तर धर्म संहारकारी होतो. याचे प्रत्यंतर जगाने अनेकवार घेतलेले आहे आणि आताही घेतो आहे.
अशा पार्श्वभूमीवर ‘ब्लास्फेमी कादंबरी आपल्यापुढे आली आहे. या इंग्रजी शब्दाचा अर्थ आहे `To speak mockingly or disrespectfully of God` अनुवादिकेने शीर्षक ठरले आहे. हे अतिशय समर्पक ठरले आहे. कारण काही शब्दांना दुसऱ्या भाषेत नेमक्या अर्थानिशी पकडता येत नाही. तसेच अनुवादिका भारती पांडे यांच्या अनुवादाचे कौतुक करावे लागेल. अनुवाद करणे म्हणजे, बुद्धिबळाच्या पटावर एका सोंगटीच्या जागी दुसरी सोंगटी ठेवण्यासारखे नाही. मूळ साहित्याशी अनुवादकाची एक तादात्मता असायला लागले. मूळ लेखनातले नेमके भाव पकडून ते दुसऱ्या भाषेत, त्या भाषेच्या रूपवैशिष्ट्यांसह मांडावे लागतात. तरच वाचकांना मूळ लेखन वाचल्याचा आनंदप्रत्यय येऊ शकतो. भारती पांडे यांनी अतिशय तादात्मतेने अनुवाद केला आहे. (अनुवादिकेचे मनोगत ही या गोष्टीची साक्षं देणारे आहे.)
जगात बुरख्यात बंदिस्त असणाऱ्या अनेक शाषित स्त्रिया कादंबरीत दिसतात आणि अस्वस्थ करतात. मा-तारा-अम्मासाई-काळी‘तोती आणि यथिमरी. ‘मालकीण’ बनायला पाहते, तेव्हा पीरसाई तिची हकालपट्टीही निर्दयपणे करतो.
‘हीर’ ही अखेर सूडकरी होते. अज्ञात बुरखाधारी व्यक्तीमार्फत ती पीरसाईचा जीव घेते. कोण असेल ही अज्ञात व्यक्ती! अल्लाच्या दूत म्हणवणाऱ्या सैतानी शक्तीला तिने संपवलेले आहे. हीर त्यानंतर फिरून वेश्येचे रूप घे तिचा उपभोग घेतलेल्या पुरुषांना ती पीरसाईची पत्नी होती हे पटवते. कारण तिला दर्ग्याला, सैतानी शक्तीचा ‘पर्दाकाश’करायचा होता. अल्ला आणि भक्त यांच्यामध्ये दलाल कशाला? हा प्रश्न मांडायचा हाता. खरे पहिले त धर्म कुठलाच वाईट नसतो. धर्म व्यापक असतो. लोक त्याला लहा करीत असतात. या कादंबरीचा मानबिंदू (High Light) आहे कादंबरीचा शेवट. चटका लावणारा आणि दाहक वास्तव सामोरे करणारात्र अशी ही वाचनीय आणि विचारप्रवण करणारी कादंबरी वाचकांनी जरूर अनुभवावी.