Sagar Shindeओसामा तिचा दिर होता ...
वाचावं असं पुस्तक ...
ओसामा बिन लादेन च संपूर्ण कुटुंब कसं होतं .आणि ते किती मोठं होतं.
लेखिका त्याच्या मोठ्या भावाच्या प्रेमात कशी पडते व लग्न करून सौदी त जाते . तिथं तिने काढलेल्या आयुष्याची कहाणी .
९/११ नंतर तिच्या बदलेल्या आयुष्याची गोष्ट तिच्या शब्दात...
जरुर वाचा
DAINIK SAKAL 26-08-2007ओसामाच्या वहिनीची आत्मकथा...
शेख महंमद बिन लादेन हा एक जबरदस्त इसम होता. एकेकाळी अरबस्तानचाच भाग असलेल्या पण आता येमेन किंवा यमन या नावाने ओळखल्या जाणाऱ्या देशातला शेख महमंद बिन लादेन नावाचा एक सामान्य कामगार १९३० साली सौदी अरेबियात आला. आपल्या अंगच्या गुणांनी तो लवकरच एक नामांकित बांधकाम कंत्राटदार म्हणजे बिल्डर झाला. ही १९४०च्या दशकातली कथा आहे. त्यावेळी बिल्डर या पदवीभोवती सत्ता, संपत्ती अगर बदमाषी असं कोणतंच वलय नव्हतं. त्या काळात दर्जेदार बांधकाम करून शेख महंमद हे सुलतान अब्दुल अजीझ यांचे आवडते बनले.
१९६७ साली शेख महमंद बिन लादेन विमान अपघातात मृत्यू पावले. त्यावेळी त्यांच्या जनानखान्यात बावीस बायका आणि चोपन्न मुलं एवढा प्रचंड कुटुंब संभार जमा झालेला होता. या चोपन्नातलाच एक म्हणजे सध्याचा जागतिक खलनायक ओसामा बिन लादेन.
प्रस्तुत ‘साम्राज्य बुरख्यामागचे’ या आत्मवृत्ताची लेखिका कारमेन ही ओसामाचा थोरला सावत्र भाऊ येस्लाम याची बायको. कारमेनची आई इराणी मुसलमान, तर बाप स्विस खिश्चन. त्यामुळे तिचा जन्म, बालपण जिनिव्हात स्वित्झर्लंडमध्ये गेले. त्यांच्या घरात सुट्टीच्या दिवसांत भाडेकरू म्हणून राहायला आलेल्या येस्लाम बिन लादेनच्या प्रेमात पडून ती सासुरवाशीण म्हणून सौदी अरेबियात राहायला आली. कुठे पृथ्वीवरचा स्वर्ग मानला जाणारा निसर्गसुंदर स्वित्झर्लंड नि कुठे अरबस्तानच रखरखीत वाळवंट.
पण कारमेनला लागोपाठ तीन मुलीच झाल्या. त्यामुळे येस्लामचं नि तिचं फाटलं केवळ येस्लामच्या प्रेमाखातर अरबी वाळवंट नि त्यापेक्षाही दु:सह असा इस्लामी कर्मठपणा सहन करणाऱ्या कारमेनला हे सगळं असह्य झालं. ती येस्लामपासून वेगळी झाली आणि आपल्या तीन मुलींसह जिनिव्हात राहू लागली. पण आपलं बिन लादेन हे अडनाव मात्र तिने कायम ठेवले.
परिणामी ११ सप्टेंबर २००१ च्या भयानक घटनेनंतर आख्ख्या युरोपच्या टेलिफोन डिरेक्टरीत बिन लादेन हे आडनाव लावणारं एकच घर दिसू लागलं. कारमेन बिन लादेन, जिनिव्हा, स्वित्झर्लंड!
त्यामुळे कारमेन व तिच्या मुलींना असह्य मनस्ताप सोसावा लागला. मग कारमेनने वृत्तपत्रं, दुरदर्शन यांना मुलाखती देऊन आपली कहाणी सविस्तर सांगितली. ती कहाणी म्हणजेच प्रस्तुत पुस्तक.
आजच्या अत्याधुनिक समजल्या जाणाऱ्या जगातही मुसलमान स्त्रियांना किती भयंकर जाच धर्माच्या नावावर केला जातो हे मुद्दाम वाचावं असं उतरलं आहे. विशेषत; हिंदू धर्मातल्या कर्मठपणावर येता-जाता तोंडसुख घेणाऱ्या कथित निधर्मवाद्यांनी आणि फाजील स्त्रीमुक्तीवाल्यांनी तर इस्लामी स्त्रियांची ही घुसमट अवश्य वाचावी.
मूळचे मराठी, पण आता न्यूझिलंडवासी झालेल्या अविनाश दर्प यांनी केलेला मराठी अनुवाद फार कृत्रिम झाला आहे. बाकी मुद्रण, मांडणी, मुखपृष्ठ इत्यादी तांत्रिक बाबी ठिक.
MAHARASHTRA TIMES 09-04-2007सांस्कृतिक तुलना हा या पुस्तकाचा गुण आहे. दोन संस्कृतीत वाढलेली कारमेन सौदी चालीरीतींबाबत डोळसपणे लिहिते. तिचं लेखन युरोपीय नजरेनं बघितल्यामुळॆ काहीसं एकारलेलं वाटलं तरी ते अतिरेकी नाही. सौदी अरेबियातलं ८०च्या दशकातलं स्थित्यंतर तिनं अतिशय उत्तम पद्धतीनं टिपलं आहे. सौदी मधला वाढता धार्मिक कडवेपणा, मुतावांचं वर्चस्व, इराणच्या क्रांतीचे परिणाम, मक्केतलं ‘टेक ओव्हर’ नाट्य आणि बिन लादेन कुटुंबाचे संबंध, ओसामाचे वाढते प्रस्थ या साऱ्याबद्दल कारमेन शांतपणे लिहिते. अजून खोलात जाऊन, अधिक तीव्र समीक्षा करणे तिला शक्य होते कदाचित, परंतु ‘समीक्षा’ हा या कथनाचा हेतू नाही.
अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्यानंतर ‘९/११ नंतरची पुस्तके’ हा एक प्रकारच (जाँ, geme) बनून गेला. मध्यपूर्वेचे राजकारण, दहशतवाद, अफगाणिस्तान या विषयांवरची अनेक पुस्तके ९/११ नंतर बाजारात आली. कारमेन बिन लादेनचे ‘साम्राज्य बुरख्यामागचे’ हे पुस्तकही याच पठडीतले. महत्त्वाचे पुस्तक आहे.
अविनाश दर्प यांनी ‘द व्हेल्ड किंगडमचे’ अतिशय ओघवते भाषांतर ‘साम्राज्य बुरख्यामागचे’ या नावाने केले आहे. कारमेन बिन लादेन ही ओसामाच्या भावाची बायको. सौदी साम्राज्याची तिला झालेली ओळख तिनं या आत्मचरित्रात्मक कथनाद्वारे मांडली आहे. श्री. दर्प यांनी प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे वस्तुनिष्ठता आणि संयमित साधी भाषा हे या पुस्तकाचे गुणविशेष आहेत.
९/११ ची घटना जग बदलवणारी होती. अमेरिकेच्या अभेद्य साम्राज्याला मुस्लिम दहशतवादाचे प्रचंड हादरा दिला. वर्ल्ड ट्रेड सेंटरवरच्या दुर्दैवी हल्ल्यानंतर जागतिक राजकारणातील अनेक समीकरणे बदलली. कारमेन या स्विस बाईचे आणि वफा, नाजिया आणि नूर या तिच्या तीन मुलींचे आयुष्यही अनपेक्षितरीत्या बदलले. महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांचे आडनाव होते ‘बिन लादेन’ ओसामाशी असलेल्या नात्याचा परिणाम म्हणून संशयाच्या सुया त्यांच्याकडेही वळल्या.
पाश्चिमात्त्य संस्कृतीत वाढलेल्या अनेकांनी अफगाणिस्तान किंवा मध्यपूर्वेतील सांस्कृतिक/राजकीय जीवनाबद्दल लिहिताना-एक प्रकारचा अतिरेकी स्वर आभ्वला आहे. कारमेनचे आत्मकथन त्यामानाने सरळ आहे. शॉकिंग नाही. पण त्या सरळपणामुळेच ते काहीसे नमककम झाले आहे. शिवाय मी ‘बिन लादेन’ असले ती मी वेगळी, पाश्चिमात्त्य मूल्ये मानणारी ‘गुड गर्ल’ आहे, या धर्तीचा कारमेनचा स्वर आहे.
कारमेन ही पर्शियन आई आणि स्विस वडील असलेली मुलगी, कारमेन घरातली सगळ्यात मोठी. तिला तीन धाकट्या बहिणी. कारमेनची आई बंडखोर, परंतु बंडखोरीतल्या अपयशामुळे सत्याला सामोरं जायला काहिशी बिचकणारी. कारमेन वाढली ती अशा काहीशा सांस्कृतिक आणि सामाजिक अनिश्चिततेच्या वातावरणात. ना धड पर्शियन ना पूर्णत: स्विस असं तिचं लहानपण. कारमेनच्या लिखाणात एक प्रकारची तटस्थता आणि आत्मकेंद्री भाबडेपणाचं मिश्रण दिसतं. त्याची मुळं कदाचित या लहानपणाच्या संदर्भांमध्ये रुजलेली असावीत.
स्वत:चं आत्मकथन मात्र अतिशय आखीव पद्धतीनं तिनं मांडलं आहे. सुरुवातीला तिनं तीन मुलींना उद्देशून एक पत्र लिहिलंय. सौदी संस्कृतीत या तिन्ही मुलींना कधीच स्वातंत्र्याची चव कळली नसती हे वाटल्यामुळे तिनं सौदी सोडून स्वित्झलँडला परतण्याचा, यास्लेमपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला याचं स्पष्टीकरण मुलींना देत या आत्मकथनाची सुरुवात होते.
जागतिक आणि मध्यपूर्वेच्या राजकारणातील महत्त्वाचे टप्पे आणि कारमेन-यास्लेमचे वैवाहिक आयुष्य समांतर चालू राहते. कारमेनचा नवरा यास्लेम यांचे कुटुंब म्हणजे मोठ्ठा बारदाना. यास्लेमच्या वडिलांना बावीस बायका– त्यातल्या काही लग्नाच्या तर काही धार्मिक तांत्रिक कारणांसाठी तलाक दिलेल्या. त्याल २४ भाऊ आणि ३१ बहिणी. सौदी अरेबियात जेद्दाजवळ ७ किलोमीटर नावाचा जो प्रसिद्ध भाग आहे तिथे बिन लादेन कुटुंबियांचं मोठं कंपाऊंड, यास्लेमची आई पर्शियन! ओसामाची आई पण या बाविसांमधली एक.
निक्सनचा राजीनामा, सौदी राजा फ़ैजलचा खून, अमेरिकेत आल्यावर स्टीव्ह जॉब्सची भेट अशा अनेक राजकीय आणि सामाजिक घटनांबरोबर कारमेन आणि यास्लेमचा संसार विविध टप्पे पार करत राहतो. युरोप, अमेरिका, मध्यपूर्व या तीन प्रदेशातील वेगवेगळे प्रवास आणि सांस्कृतिक वातावरण त्यांच्या संसाराला वळण लावत जाते.
सांस्कृतिक तुलना हा या पुस्तकाचा गुण आहे. दोन संस्कृतीत वाढलेली कारमेन सौदी चालीरितींबाबत डोळसपणे लिहिते. सौदी अरेबियातलं ८० च्या दशकातलं स्थित्यंतर तिनं अतिशय उत्तम पद्धतीनं टिपलं आहे. सौदी मधला वाढता धार्मिक कडवेपणा, मुतावाचं वर्चस्व, इराणच्या क्रांतीचे परिणाम, मक्केतलं ‘टेक ओव्हर’ नाट्य आणि बिन लादेन कुटुंबाचे संबंध, ओसामाचे वाढते प्रस्थ या साऱ्याबद्दल कारमेन शांतपणे लिहिते. अजून खोलात जाऊन, अधिक तीव्र समीक्षा करणे तिला शक्य होते कदाचित, परंतु ‘समीक्षा’ हा या कथनाचा हेतू नाही. कारमेननी स्वत:ची बाजू मांडताना ओघानं या गोष्टी टिपल्या आहेत. तिनं सौदीमधील बायकांबद्दल जे नोंदवलं आहे ते मात्र फार मोलाचं आहे. त्यांची सुबत्तेतील घुसमट, एकटेपणा आणि अनन्वित संपत्ती असूनही होणारी मानसिक उपासमार तिनं संवेदनशील पद्धतीने रंगवली आहे.
कारमेनच्या आत्मकथनात अजून एक नाव सतत येतं– ते तिची अमेरिकन मैत्रिण मेरी मार्था चं. मेरी मार्था कारमेनची रोलमॉडेल. तिचं व्यक्तिमत्त्व कारमेनचवर अतिशय प्रभाव टाकणारं होतं.
कारमेनच्या आत्मकथनात थंड तटस्थपणा आहे, शिवाय राजकीय/धार्मिक इतिहासाबद्दल एक प्रकारची अनास्थाही. काही वेळेला हे निवेदन इतकं सपाट झालं आहे की जे तिच्या आयुष्यात घडलं त्यामध्ये कोणतीही जबाबदारीची भाषा वापरताना कारमेन कधीही दिसत नाही. या साऱ्यामुळेच की काय या कथनाला खोली कमी आहे.
तरीही हे पुस्तक वाचनीय आहे. अविनाश दर्प यांच्याकडून यानंतरही अशा दर्जेदार भाषांतरांची अपेक्षा मराठी वाचकांना वाटत राहील.
-ज्ञानदा देशपांडे
DAINIK LOKSATTA 22-07-2005तिचं नाव कारमेन बिन लादेन...
तिचं नाव कारमेन बिन लादेन. या नावामुळेच ११ सप्टेंबच्या अमेरिकेवरील हल्ल्यानंतर तिला आणि तिच्या तीन मुलींना जगणं मुश्किल झालं होतं. ओसामा तिच्या नवऱ्याचा भाऊ. सख्खा की सावत्र निश्चित सांगता येणार नाही, पण वडील एकच. कारमेनचं लग्न बिन लादेन खानदानातल्या येस्लाम लादेनशी झालं. कारमेन राहणारी स्वित्झर्लंडची, वडील स्विस आणि पर्शियन. येस्लामशी लग्न केल्यावर युरोपियन संस्कारात वाढलेली ही मुलगी सौदी अरेबियासारख्या सर्वच बाजूंनी मागासलेल्या देशात राहायला गेली आणि तिच्या आयुष्याला एक वेगळंच वळण लागलं.
येस्लामचे वडील शेख महंमद म्हणजे सौदीमधील अतिधनाढ्य प्रस्थ. एका सर्वसाधारण कामगारापासून आयुष्याची सुरुवात करून सौदीतील सगळ्यात मोठी बांधकाम कंपनी त्यांनी उभारली. त्यांना २२ बायका होत्या आणि ५४ मुलं. या २२ बायकांपैकी मोठ्या बायकोचा मुलगा येस्लाम आणि आणखी एका बायकोचा मुलगा ओसामा. सौदीच्या राजकुटुंबानंतर बिन लादेन कुटुंबाचं नाव घेतलं जायचं. त्यामुळे त्यांचे घर महणजे मोठा राजवाडाच.
१९७४ मध्ये कारमेन आणि येस्लाम यांचं लग्न झालं. परदेशी असूनही कारमेनचं बिन लादेन कुटुंबातील स्वागत मोठ्या उत्साहाने झालं. पण बिन लादेनचा राजवाडा हा स्त्रियांसाठी सोन्याचा पिंजरा होता. त्यांना घराबाहेर पडायची मुभाच नव्हती. घरातही सतत बुरखा घालणं. नवरा; वडील आणि भावाशिवाय इतर पुरषाला तोंड न दाखवणं अशी अगणित बंधनं त्यांच्यावर होती. खरेदीसाठी बाजारात जाता-येत नसे. हवी असणारी वस्तू नोकराला सांगायची. नोकर दुकानात जाऊन वस्तू घेऊन येणार. त्यातली पाहिजे ती वस्तू ठेवायची आणि उरलेल्या वस्तू व पैसे पुन्हा नोकराकडे देऊन त्याला बाजारात धाडायचं अगदी सॅनिटरी पॅड आणायला सुद्धा बायकांना घराबाहेर पडायची मुभा नव्हती. स्त्रियांवर घरातल्या पुरुषांची सर्वस्वी मालकी होती. युरोपच्या बिनधास्त आणि समानतेच्या वातावरणात वाढलेल्या कारमेनसाठी हा मोठाच सांस्कृतिक धक्का होता. एकदा ती येस्लामबरोबर बाहेर जायला निघाली. तेव्हा तिला संपूर्ण चेहरा झाकेल असा बुरखा घालावा लागला. नवरा गाडी चालवत असताना तिने मागच्या सीटवर बसायचं. गाडीला दोन्ही बाजूंनी पडदे. बाजारात जाऊनही तिला गाडीतून उतरता आलंच नाही.
सुरुवातीला कारमेनला तिथल्या स्त्रियांच्या आयुष्याबद्दल काहीच कल्पना नव्हती. पण तिची सासू, नणंदा आणि भावजया याचा दिनक्रम बघून ती हैराण झाली. दिवसभरात पाचवेळा नमाज पडायचं. स्वयंपाकात नोकरांना थोडीफार मदत करायची. मुलांना सांभाळायचं. ज्या बायका जास्तीत जास्त वेळ धार्मिक विधींमध्ये घालवतील त्यांना कुटुंबात अधिक मान असे. पण घराबाहेर जाणं, खरेदीला जाणं, कुराणाशिवाय दुसरं पुस्तक वाचणं या गोष्टींवर बंदी होती. टीव्हीवर फक्त दोनच चॅनेल दिसायचे. एकावर सतत कुराणाचे पठण आणि दुसऱ्यावर सेन्सॉर केलेल्या बातम्या. आयुष्य एखाद्या जखडून ठेवलेल्या कैद्यासारखं असूनही आपल्यावर अन्याय होतोय याची त्यांना जाणीव नव्हती. कधीतरी एखाद्या लग्नासाठी, मक्का यात्रेसाठी घराबाहेर पडता येत असे. पण त्यावेळी घरातला पुरुष किंवा नोकर तरी बरोबर हवाच. कारमेनसारख्या स्वातंत्र्यात वाढलेल्या मुलीला या गोष्टी पचवणं खूपच जड होतं. मग तिने यावर आपल्या परीने उपाय शोधण्याचा प्रयत्न केला. येस्लामबरोबर व्यवसायानिमित्ताने बाहेर जाणं, पुस्तकं वाचणं, सौदीत थोड्याफार प्रमाणात पुरोगामी असणाऱ्या लोकांशी संबंध ठेवणं अशा काही ना काळी हालचाली करत कारमेनने पाच वर्ष सौदीत काढली.
घरातल्या आणि देशातल्याही कट्टर वातावरणात दिवस काढणं खूप मुश्किल होतं. पण कारमेनला येस्लामने वेळोवेळी साथ दिली आणि व्यक्तिगतरीत्या तिच्यावर कोणतीही बंधनं लादल नाहीत. कारमेन आणि ओसामाची ओळख एका कौटुंबिक कार्यक्रमामध्ये झाली. पाश्चिमात्त्य शिक्षण घेऊनही तो कट्टर धार्मिक होता. ओसामाच्या कट्टरवादाचं कारमेनने मांडलेलं उदाहरण खूप भयानक आहे. ओसामाचा काही महिन्यांचा मुलगा चमच्याने दूध पीत नव्हता, खूप रडत होता. तेव्हा कारमेनने आपल्या लहान मुलीची दुधाची बाटली त्या मुलाला देऊ केली. पण ओसामाच्या परवानगीशिवाय त्याची बायको मात्र ती घेईना. लहान मुलाचे हाल न बघवल्याने कारमेनने येस्लामकडून ओसामाला निरोप पाठवला. पण दुधाची बाटली ही संकल्पना पाश्चिमात्त्यांकडून आल्याने ओसामाने शेवटपर्यंत आपल्या मुलाला बाटलीतून दूध पाजायची परवानगी दिली नाही.
रशियाने अफगाणिस्तानच्या राजकारणात हस्तक्षेप सुरू केल्यावर आपल्या मुस्लिम बांधवांना वाचवण्यासाठी ओसामा अफगाणिस्तानात गेला. सुरुवातीच्या काळात अफगाणिस्तानी लोकांना, अन्न, वैद्यकीय सेवा पुरवण्याची कामं तो करायचा. त्यामुळे काही काळ तो सौदी अरेबियात हिरो ठरला. पण हळूहळू दहशतवादी कारवायांत त्याचं नाव पुढे येऊ लागल्यावर मात्र सौदीतून त्याला हद्दपार करण्यात आलं. त्यामुळे बिन लादेन कुटुंबाचाच नाही तर त्याच्या बायकोचाही त्याच्याशी फारसा संबंध राहिला नाही.
कट्टर धार्मिक वातावरणातही कारमेन आपल्या दोन मुलींना वाढवत होती. पण त्या मोठ्या होऊ लागल्यावर त्यांना आपण याच वातावरणात वाढवणार का असा प्रश्न तिला भेडसावू लागला. त्यांना शाळेत मिळत होतं फक्त कुरणाचं एकांगी शिक्षण, मुलांपासून लांब राहण्याची ताकीद होती. खेळ नाही की पुस्तकं नाहीत. कारमेनला व्यक्तिस्वातंत्र्याची किंमत माहीत होती. अशा गुलामगिरीत मुलींना वाढवू नये असा विचार वरचेवर तिच्या मनात येत होता. पण त्याच सुमारास येस्लामचा व्यवसाय चांगलाच वाढत होता. त्याला देशात चांगलीच मागणी होती. त्यामुळे हे सगळं सोडून स्वित्झर्लंडला जायचं का, अशी तिच्या मनाची घालमेल सुरू होती.
येस्लामकडे येणाऱ्या पैशाचा ओघ सतत वाढत राहिला आणि त्या पैशाच्या नादात वाहवत जाऊन येस्लाम बदलत चालला. तो आपली तुलना राजघराण्यातल्या लोकांशी करू लागला. त्याचं कुटुंबावरचं लक्ष उडालं. आपल्याला काहीतरी असाध्य आजार झाले आहेत, असं वरचेवर त्याला वाटू लागलं. त्यामुळे तपासणीसाठी अनेकदा तो युरोपमध्ये जात असे. त्याला कसं समजवावं हेच कारमेनला कळेना. त्यांच्यातील दुरावा वाढत चालल्याचं तिला स्पष्ट दिसत होतं. तो सतत काळजीत, चिंतेत आणि आपल्याला झालेल्या काल्पनिक आजारात गुंग असायचा. येस्लामचे काही अनैतिक संबंध पुढे आल्यावर मात्र त्यांच्यातील घटस्फोट निश्चित झाला आणि तिचा व तिच्या तीन मुलींचा बिन लादेन घराण्याशी असलेला संबंध कायमचा तुटला. संबंध उरला तो फक्त बिन लादेन या नावापुरता.
तरुण वयात प्रेमात पडून कारमेनसारखी स्वातंत्र्यात वाढलेली मुलगी येस्लामबरोबर सौदीत गेली. मनाला न पटणाऱ्या, न आवडणाऱ्या अनेक गोष्टी तिने तात्पुरत्या तरी स्वीकारल्या. सौदीच्या संस्कृतीला स्वत:ला बसवण्याचा प्रयत्न केला. पण आपल्या मुलींनी मात्र याच वातावरणात मोठं व्हावं हे तिला मान्य नव्हतं. त्यांच्या मोकळेपणाने खेळण्या बागडण्याच्या दिवसात त्यांनी बुरख्यात घुसमटावं, पाच वेळा नमाज पडावा हे तिला पटत नव्हतं. या सगळ्या कोंडीला वाट फोडण्याचा तिने अनेकदा प्रयत्न केला. पण येस्लामच्या प्रेमाने तिला अडवून ठेवलं होतं. आजूबाजूच्या बायकांनाही तिने समजवण्याचे अनेक प्रयत्न केले. पण काही उपयोग झाला नाही. बदलत्या काळाबरोबर येस्लामध्येही होणारा बदल तिच्या लक्षात आल्यावर मात्र तिने त्याला कायमचं मोकळं केलं. पण त्या नात्यातही शेवटच्या काळात कटुताच निर्माण झाली.
बिन लादेन घराण्याशी संबंध तुटल्यावरही केवळ नावामुळे ११ सप्टेंबर या दिवसानंतर तिच्या आणि मुलींच्या आयुष्यात मोठी उलथापालथ झाली. ओसामाने केलेले बॉम्ब हल्ले कारमेनला माहीत होते. त्यामुळे अमेरिकेत राहूनही तिच्या मुली मात्र वाचल्या, असे अनेक आरोप तिच्यावर झाले. ‘बिन लादेन’ नावाची ती एकमेव ज्ञात व्यक्ती अमेरिकेत राहत असल्याने माध्यमांनी तिला लक्ष्य बनवले. त्या सगळ्यांना उत्तर देता देता तिला पुन्हा एकदा सौदीतला काळ आठवला आणि त्यातून हे आत्मचरित्र लिहिलं गेलं.
श्रुति गणपत्ये
DAINIK AIKYA 12-07-2009वास्तवतेचा स्पर्श लाभलेले पुस्तक...
अमेरिकेत २००१ सप्टेंबरमध्ये आणि न्यूयॉर्कच्या वर्ड ट्रेड सेंटरवर अतिरेक्यांनी भिषण हल्ला केला आणि तेव्हापासून ९/११ हा दिवस इतिहासाचा एक भाग बनला. त्याचप्रमाणे ओसामा बिन लादेन हा क्रूरकर्माही सातत्याने जगाच्या चर्चेत राहिला. या घटनेला येत्या सप्टेंबर २००९ मध्ये आठ वर्षे पूर्ण होत आहेत आणि तरीही या घटनेच्या स्मृती दिवसेंदिवस अधिक घट्ट होत आहेत. या पार्श्वभूमीवर आठ महिन्यांपूर्वी मुंबईत झालेल्या अतिरेक्यांच्या हल्ल्यामुळे सारे जगच दहशतवादाच्या झपाट्यात सापडल्याचे सत्य प्रतीत होत आहे. या परिस्थितीवर भाष्य करणारी अनेक पुस्तके दरम्यानच्या काळात प्रसिद्ध झाली आहेत, अजून होत आहेत; पण यापैकी एक पुस्तक साऱ्या जगाचं लक्ष वेधून घेणारं ठरलं. हे पुस्तक प्रत्यक्ष या लादेनच्या भावजयीनं लिहिलं आहे, एवढेच त्याचे वैशिष्ट्य नाही तर या दुर्घटनेच्या सूत्रधाराचं आणि एकूणच एका धर्मांध विचाराचं एक वेगळं दर्शन यातून घडतं. ‘द व्हेल्ड किंगडम’ या नावानं कारमेन बिन लादेन हिने या घटनेमागची मानसिकता शोधून काढण्याचा प्रयत्न केला आहे. या पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘साम्राज्य बुरख्यामागचे’ या नावाने प्रसिद्ध झाले आहे.
या पुस्तकाची लेखिका कारमेन ही ओसामाच्या भावाच्या येस्लामच्या प्रेमात पडते आणि त्याच्याशी विवाहबद्ध होते. काही काळ सौदी अरेबियात राहते आणि तिथल्या भयावह जीवनाची साक्षीदार होते. पुढे कुटुंबापासून ती विभक्तही होते; पण ९/११चा प्रसंग घडतो आणि ‘बिन लादेन’ या नावाने दुनिया तिच्याकडे विचित्र नजरेने पाहू लागते. लादेनशी नावाचा का होईना संबंध आल्याने तिच्या आणि तिच्या मुलीकडे वेगळ्या दृष्टीने पाहिले जाते. तिची घटस्फोटाची केस लढविणारा वकीलही आपले वकीलपत्र मागे घेतो. तिच्या शिकणाऱ्या मुलीही लोकांच्या टीकेतून आणि नजरेतून सुटत नाहीत. हे सारे सहन करण्याच्या पलीकडे असतं आणि तरीही आपली बाजू आता सांगितलीच पाहिजे या जाणिवेनं मोठ्या धाडसानं लेखणीच्या साहाय्याने कारमेन जगासमोर आली आहे.
९/११ या प्रकरणापासून या कहाणीची सुरुवात होते आणि ‘निष्कर्ष’ या एकोणीसाव्या प्रकरणाने संपते. खऱ्या अर्थाने लादेन सापडत नाही किंवा संपत नाही आणि अतिरेकी धर्मांधता संपुष्टात येत नाही, तोपर्यंत ती तशीच चालू राहणार, किंबहूना तो इतिहासाचा एक अविभाज्य भाग म्हणून अमर होणार. प्रकरणांच्या प्रारंभी लेखिकेने आपल्या येस्लामपासून झालेल्या वफा, नाजिया आणि नूर या तीन मुलींना एक पत्र लिहिले आहे. ते एकूण या लेखनामागची पार्श्वभूमी आणि प्रेरणा व्यक्त करणारे आहे. ती लिहिते, ‘विचारांचं आणि ते विचार व्यक्त करणाऱ्यांचं स्वातंत्र ही सर्वांत मोठी देणगी आहे. या माझ्या विचारांशी, कल्पनेशी तुम्ही परिचित आहातच. परंतु हे स्वातंत्र्य तुम्ही गृहीत धरून चालता कामा नये, असं मला वाटतं. तुम्हाला ज्याची कल्पना आहे तेच मला परत तुमच्या मनावर ठसवायचं आहे, की ऐश्वर्य सुख देऊ शकतं हे खरं आहे. परंतु सोन्याच्या पिंजऱ्यात सुखं मिळत असतील, तर ती निरर्थक ठरतात. विशेषत तुम्ही स्त्री असलात, तर तुम्हाला हवं ते करता येत नाही किंवा तुम्हाला व्हायचं असेल, तेही तुम्ही होऊ शकत नाही. स्वातंत्र्याची कल्पना मानणाऱ्या एका स्त्रीनं जिथं स्त्रीला मुळीसुद्धा स्वातंत्र्य नाही अशा संस्कृतीच्या देशाच्या वास्तवातून जे भोगले त्यातून हे आलं आहे.
पहिल्या प्रकरणात ‘९/११’ च्या घटनेचं, त्यावरच्या प्रतिक्रियाचं आणि असलेल्या स्त्रीला आणि तिच्या मुलींना ‘लादेन’ असल्यामुळे भोगावे लागलेले अनुभव कथन केल आहेत. पुढे आजोळच्या आठवणीतून या कहाणीला प्रारंभ होतो. कारमेन ही स्वीस वडील आणि पर्शियन आई यांच्यापासून जन्मलेली मुलगी पुढे सौदी अरेबियाच्या प्रचंड श्रीमंत असलेल्या घराण्यातील येस्लाम नावाच्या तरुणाच्या प्रेमात पडते. त्याच्याशी विवाहबद्ध होते, त्याच्या बरोबर त्याच्या देशात राहते, तिला तीन मुली होतात, इस्लाम धर्मातल्या जुनाट आणि पुरुषप्रधान संस्कृतीत तिला राहावं लागतं; पण मुळात पश्चिमी स्वातंत्र्याचं वारं उपभोगलेल्या समाजात तिचं लहानपण आणि समजतं वय गेल्यामुळे या पारतंत्र्यातून सुटकेसाठी तिचा पदर साऱ्या जगात कुप्रसिद्ध ठरलेल्या ‘ओसामा बिन लादेन’च्या घराण्याशी निगडित असल्यामुळे या कहाणीला वेगळा अर्थ मिळाला आहे. येस्लामच्या प्रेमात पडून लादेन कुटुंबात सौदी अरेबियातलं तिचं राहणं, त्या देशातली पुरुषप्रधान संस्कृती आणि तिच्या स्वातंत्र्याचा संपूर्ण झालेला विदारक संकोच, यातून होत गेलेला मानसिक कोंडमारा, लादेन कुटुंबाची वेगळी ओळख अशा पटावरून कहाणी पुढे सरकत राहते. आज एकविसाव्या शतकातही एखाद्या समाजाची वा देशाची मानसिकता मध्यपूर्व काळातही कशी असू शकते याचं मन विदीर्ण करणारं प्रत्यक्षकारी चित्रण आणि त्यातून स्वातंत्र्यासाठी झगडणाऱ्या आणि त्यापोटी आपल्या तीन मुलींचा बळी जाऊ नये यासाठी झगडणारी एक आई, असं एक विलक्षण चित्तथरारक दर्शन या साऱ्या प्रकरणांमधून घडतं.
येस्लामचं चोपन्न भावंडांचं कुटुंब, त्यांची श्रीमंती त्यांचे आणि तिथल्या राजाचे संबंध, एकूणच त्या समाजाची पुराण व जीर्णमतवादी मानसिकता, त्यातूनच ओसामा बिन लादेनचं घडलेलं धर्मांध व्यक्तिमत्व आणि या साऱ्याशी एक स्वातंत्र्यवादी स्त्री देत असलेला झगडा हे सारं एखाद्या कथा-कादंबरीत शोभावं; पण ते प्रत्यक्षात घडलेलं, भोगलेले असावं, त्याचा जिवंत जीवनानुभव या पुस्तकात पानोपानी प्रगटला. वास्तव किती भयानक असतं याचं चित्रण इथे स्पष्टपणे तरीही पुरशा संयमाने लेखिकेने केलेलं आहे. येस्लाम हा हुशार, कर्तबगार तरुण, पण तरीही परंपरेपुढे हतबल झालेला. ओसामा हाही तसाच, पण दुर्विचारांच्या आवर्तात सापडून धर्मांध आणि पराकोटीचा अतिरेकी झालेला, ही सारी वर्णन आणि सौदी अरेबियातील भयानक वास्तव लेखिकेनं इथे रेखाटले आहे. पण तरीही हे लेखन खूपसं संयमी आहे. ओसामा संघटन कुशल होता, कर्तृत्ववानही होता; पण आपले हे सारे गुण त्यानं विधायकतेत वापरलेले असते, तर तो साऱ्या जगाचा लाडका ठरला असता, असंही लेखिकेला वाटतं. लेखिकेनं प्रत्यक्ष सौदी अरेबियात आणि ९/११ च्या घटनेनंतर जे अनुभवलं ते वास्तवतेनं लिहिले आहे. त्यात फारशी कुठे चीड, आगपाखड दिसत नाही. हे पुस्तक हे एक आत्मचरित्रात्मक असले, तरी ज्या घटनेमुळे सारं जग हादरून जातं, त्या घटनेशी दुरान्वयाने का होईना पण संबंधित असलेल्या व्यक्तीचं कथन असल्यामुळे त्याला एक ऐतिहासिकताही लाभली आहे.
लेखिकेची भाषा साधी, सोपी, सहज एखादी कहाणी सांगितल्यासारखी असल्याने आणि मुळातच विषय उत्कंठावर्धक असल्याने वाचक पुस्तकाशी खिळून राहतो. ‘निष्कर्ष’ काढताना लेखिका म्हणते, ‘मी बिन लादेन बरोबर काही वर्षं काढलेली आहेत. सौदी विचारसरणीचा अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे निर्धास्त जगाच्या भविष्याविषयी मला चिंता वाटते. (पृ. १६५) मी हे सत्य उघडपणे आणि धाडसाने जे काही सांगते आहे, त्यामुळे माझ्यावर अनेक वाईट प्रसंग येतील अशी जाणीव लेखिकेला असूनही स्वातंत्र्य एकमेव मूल्यासाठी ती झगडते आहे, त्यामागची मानसिकता, त्याची भयानकता आणि त्यासाठी करीत असलेला संघर्ष तसेच नुकत्याच घडलेल्या इतिहासाचा एक भाग माहिती व्हावा या दृष्टीने हे पुस्तक वाचनीय आहे.
अनुवादक अविनाश दर्प हे परदेशात राहणारे भारतीय मराठी असूनही काही किरकोळ अपवाद वगळता त्यांनी मराठी वाचकांना चांगले भाषांतर देऊन जागतिक महत्त्वाच्या घटनेशी अवगत केले आहे. त्याबद्दल ते कौतुकास पात्र आहेत. मेहता पब्लिशिंग हाऊसची निर्मितीही चांगली आहे.
– मधु नुने, वाई