- DAINIK TARUN BHARAT 11-07-2004
सुजाण पालकत्वाचा संदेश...
उमलत्या पिढीला योग्य वळण लावणं हे पालकांपुढे मोठे आव्हानच असते. दुर्दैवाने त्याचे शिक्षण शाळा-कॉलेजात वा अन्यत्र क्वचितच मिळते.
‘पालकपण’ अनेकांकडे नैसर्गिकपणे चालत येते. पण ही भूमिका चांगल्या पद्धतीने निभावून नेण्यासाठी पालकांना स्वत:च्या वागण्यात अनेक प्रकारचे बदल करावे लागतात. अनंत पै यांचं How to help your child succeed हे अतिशय उपयुक्त पुस्तक आहे. प्रत्येक पालकानं वाचावं असंच हे पुस्तक आहे. या इंग्रजी पुस्तकाचा वाचनीय अनुवाद केला आहे, प्रशांत तळणीकर यांनी. अनुवादित पुस्तकांबाबत मेहता पब्लिशिंग हाऊसने सातत्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. हे पुस्तक त्यांनीच प्रकाशित केले आहे.
हे छोटेखानी पुस्तक नऊ वेगवेगळ्या शीर्षकांनी विभागलं आहे. पालक म्हणून तुमची काय प्रतिमा आहे? या शीर्षकाने पुस्तक चालू होते. हा पहिला विभाग, विशेष करून त्यात वापरलेली शीर्षके क्लिष्ट वाटतात. तरीपण चिकाटीने ते सर्व वाचा. कारण पुढे त्या शब्दांचा वापर पुस्तकभर केलेला आहे. आत्मसन्मान व आत्मविश्वास या कल्पना पुस्तकात विस्तृतपणे मांडल्या आहेत. त्यांची वाढ कशी करायची याचे स्पष्ट विवेचन केले आहे. अनेक पालकांना मुलांना मोकळीक देणे, स्वातंत्र्य देणे गैर वाटते. तसे केल्यास मुले बिघडतील भीती वाटते. प्रत्यक्षात मुलांना स्वातंत्र्य देणे हे त्यांच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असते. हा मुद्दा लेखकानं उत्तमरीतीने हाताळला आहे.
मुलं अनुकरणप्रिय असतात हे सर्वमान्यच आहे. त्यामुळे पालकांनी स्वत:च्या वागण्यातून त्यांच्यापुढे आदर्श ठेवला पाहिजे. नुसते उपदेशाचे डोस पाजून काही साध्य होणार नाही. मुलांचे म्हणणे सक्रियतेने ऐकणं याबद्दलही अतिशय उपयुक्त विवेचन पुस्तकात आहे. तुमच्या एखाद्या मित्राशी तुम्ही जेवढे आदराने, समजुतीने वागता तसे मुलांशीही वागणे अपेक्षित आहे.
पुस्तकातला अखेरचा भाग आहे ‘इच्छाशक्तीवर.’ हा विभाग जणू या पुस्तकाचा मानबिंदू आहे. अतिशय सोप्या भाषेत लिहिलेला सुंदर उदाहरणांनी नटलेला हा विभाग आहे. इच्छाशक्ती कशी जोपासायची, कशी वाढवायची याबद्दल मुद्देसूद विवेचन आहे. इच्छाशक्तीच्या अभावी आपण आपली दिवसाची कामेसुद्ध नीट करू शकणार नाही. आरोग्य नीट राखू शकणार नाही.
संपूर्ण पुस्तकभर समर्पक, विनोदी शैलीतील चित्रं आहेत, ती बघणं, हे निश्चितच आनंददायी आहे. तसेच लेखकाने स्वत: आयोजित केलेल्या अनेक स्पर्धांनी मुलांनी कसा प्रतिसाद दिला त्याची उदाहरणे पुस्तकात ठायी ठायी लिहिली आहेत. त्यामुळे ‘पालकांना त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यानुसार स्वत:च्या वागण्यात फेरफार करणं हेच या पुस्तकाचं मूळ उद्दिष्ट आहे. तरुण पिढी सक्षम व समतोल बनवायची असेल तर त्यांचे पालकही सक्षम हवेत. सुजाण पालकत्वाचा संदेश देणारं अतिशय उपयुक्त व्यवहार्य पुस्तक असं या पुस्तकाचं वर्णन केल्यास ती अतिशयोक्ती ठरू नये.
- DAINIK TARUN BHARAT 02-08-2004
आजच्या युगात पालकत्व खूप कठीण, गुंतागुंतीचे झालेले आहे. मुलांना कसे वाढवायचे, त्यांचे संगोपन कसे करायचे, याबाबत पालक आजच्यापेक्षा कदाचित खूपच वेगळ्या सामाजिक परिस्थितीत जन्माला आलेले पायंडे व नियम पाळत असतात. आपण कोणत्या प्रकारचे पालक आहोत आणि आपल्याला कोणत्या प्रकारचे पालक व्हायला आवडेल, हे ढोबळमानाने ठरवण्यामध्ये हे पुस्तक पालकांना मदत करते. त्याचबरोबर यातील सूचनांचे व्यवस्थित पालन केल्यास मुलं आक्रमक होण्याची किंवा अमली, मादक पदार्थ सेवनाकडे वळण्याची शक्यता जवळजवळ नाहीच.
- DAINIK SAKAL 24-10-2004
यशस्वी पालकत्वाचा मंत्र...
आपले मूल जीवनाच्या सर्व अंगांनी यशस्वी व्हावे, ही प्रत्येक पालकाचीच इच्छा असते; परंतु त्यासाठी स्वत:च्या आचार-विचारांमध्ये काय बदल करायचा, याबद्दल पालक स्वत: फारच गोंधळलेले असतात. तो गोंधळ दूर करण्यासाठी मदत म्हणून ‘आपल्या मुलांच्या यशस्वितेचा कानमंत्र’ अनंत पै यांनी दिला आहे. हल्लीच्या वाढत्या वयातील मुलांना स्वत:चा आत्मसन्मान मोठ्या प्रमाणात असतो. जो जपून, जोपासून, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास कसा निर्माण करावा, स्वायतत्ता देताना स्वातंत्र्यही कसे अबाधित राखावे, पालक-मुलांनी योग्य संपर्कातून समन्वय कसा साधावा, चांगले ऐकणे हा यशस्वी पालकत्वाचा मूलभूत गुण कसा, याची उदबोधक माहिती उदाहरणांसह दिलेली आहे. मूळ पुस्तकाशी साधर्म्य साधण्याच्या प्रयत्नांत अनुवादित पुस्तकाची भाषा काहीशी बोजड झाली आहे. पण तरीही पुस्तक प्रत्येक पालकाने वाचावे असेच आहे.
-केदार टाकळकर
- MAHARASHTRA TIMES 25-7-2004
पालकांना घडविणारे पुस्तक...
मुलांना लैंगिक शिक्षण देण्याची चर्चा करणाऱ्या या काळात पालकांना पालक म्हणून घडविण्यासाठी कोणता अभ्यासक्रम असावा, याबाबत मात्र उदासिनता दिसते. अशा परिस्थितीत पालक म्हणून आपला विकास कसा करावा, याचे शिक्षण देणारे पुस्तक, किशोरांसाठी २५ वर्षे विविध उपक्रम राबविणाऱ्या अंकल पै यांनी लिहिले आहे.
बालकावर संस्कार करताना पालक नेमका कुठे चुकतो, त्याने सुधारण्यासाठी काय करावे, हे त्यात पै यांनी समजूतदार शैलीत सांगितले आहे. वेळोवेळी उदाहरणे आणि दाखले दिल्याने लेखन उत्कंठावर्धक आणि ओघवते झाले आहे. मेहता पब्लिशिंगने मूळ इंग्रजी पुस्तकाचा आणलेला हा मराठी अनुवाद आहे. अनुवादकाने अनेक ठिकाणी शब्दश: भाषांतर केल्यामुळे मराठीत इंग्रजी वाक्यबंध प्रत्ययाला येतो. तो खटकला तरी अनंत पै यांच्या अनुभवातील व्यक्ती आणि प्रसंगांनी लेखनात आलेल्या सच्चेपणामुळे पुस्तक पटकन वाचून होते.
- NEWSPAPER REVIEW
संतुलित संगोपनाचा मंत्र…
आजच्या युगात मुलांच्या संगोपनाच्या जटिल समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न ‘आपल्या मुलांच्या यशस्वितेचा कानमंत्र’ या अनंत पै लिखित पुस्तकात करण्यात आला आहे. भोवतालच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीत पालकांची अपत्यासंबंधीच्या जबाबदारीचे स्वरूपही बदलत चालले असल्याची जाणीव लेखकाने सुरुवातीला करू दिली आहे. मुलांना स्वातंत्र्य देताना, त्यांच्या वाढीला अवकाश पुरवतानाच मुलांमध्ये जबाबदारीची जाणीव रुजवण्याचे मोलाचे काम पालकांना शिताफीने कसे करता येईल, याचा उहापोह या पुस्तकात करण्यात आला आहे. यशस्वीतेचे कानमंत्र देताना स्वातंत्र्य आणि स्वायत्तेतील तफावत, यश म्हणजे नेमके काय आणि यशाच्या मोजमापाचे निकष कोणते, हे अनंत पै यांनी उदाहरणासहित स्पष्ट केले आहे. मुलांशी सातत्याने साधत असलेला संवाद आणि पालकांसाठी सत्रांचे आयोजन यामुळे अनंत पै यांच्या लिखाणाला एकप्रकारे वास्तववादी स्वरूप प्राप्त झाले आहे. मात्र, काही प्रकरणातील भाषेचा बाज तितकासा जमलेला नसल्याने हे पुस्तक अनुवादित असल्याचे प्रत्यंतर जागोजागी येत राहते.
-सुचिता देशपांडे
- DAINIK LOKMAT 17-10-2004
मुलांना कसे वाढवायचे? त्यांचे योग्य पालक कसे व्हायचे? या गोष्टी आजच्या युगात प्रश्न बनले आहेत. त्यामुळे आज पालकत्व खूप गुंतागुंतीचे आणि कठीण झाले आहे. आपण कोणत्या प्रकारचे पालक आहोत आणि आपल्याला कोणत्या प्रकारचे पालक व्हायला आवडेल, हे ठरविण्यासाठीचे योग्य मार्गदर्शन अनंत पै यांनी केलेल्या पुस्तकांचे प्रशांत तळणीकर यांनी केलेला हा अनुवाद.