- Devdutt Kamat
तसलिमा नासरिन या बांगलादेशीय लेखिकेनं शब्दांत बांधलेलं हे तिचं लहानपण आहे. बांगलादेशात मुक्तिवाहिनीनं स्वातंत्र्यासाठी जो निर्वाणीचा लढा दिला, त्यावेळी तसलिमाचं वय होतं फक्त नऊ वर्षांचं; पण त्याही वेळी ती आताएवढीच चिंतनशील आणि संवेदनशील होती. तिची दृष्टी अतिशय तीक्ष्ण आणि शोधक होती. तिची स्मरणशक्ती तल्लख होती. स्वतंत्र प्रज्ञा असलेल्या बुद्धिवादी वडिलांचं स्खलन, ममताळू आणि धार्मिक आईचं धर्माच्या सोपानावरून हळूहळू अंधाNया खाईत उतरणं, दादाचं प्रेम, प्रौढ नातेवाइकाकडून तिचा झालेला लैंगिक छळ व त्यामुळं वाटणारी लाज आणि अपमान, धर्म आणि शास्त्र यांच्या नावांवर पीर अमीरुल्लाहांनी चालवलेला अत्याचार याचं तिनं धीट आणि थेट चित्रण या आत्मपर आणि कथात्म लेखनात केलं आहे. या अतिशय संवेदनशील आणि बंडखोर लेखिकेची आम्ही आतापर्यंत लज्जा (कादंबरी), फेरा (कादंबरी), निर्बाचित कलाम (लेखसंग्रह), निर्बाचित कविता (काव्य), नष्ट मेयेर नष्ट गद्य (लेखसंग्रह) अशी वेगवेगळ्या साहित्यप्रकारांतील पाच पुस्तकं प्रसिद्ध केली आहेत. यांतून तिचं समग्र व्यक्तिमत्त्व प्रक्षेपित झालं आहे. या नव्या पुस्तकातील तिनं निवेदन केलेली एकही घटना खोटी नाही. कुठलंही पात्र काल्पनिक नाही. असं प्रामाणिक, स्पष्ट आत्मवृत्त बंगालीत अजून कोणी लिहिलेलं नाही. धारदारतेजस्वी भाषा, जिवंत व्यक्तिचित्रण आणि लेखणीच्या जादूच्या स्पर्शानं गद्याला आलेलं काव्याचं सौंदर्य ह्यांमुळं ह्या आत्मचरित्राचं वाचन हा वाचकाच्या दृष्टीनं एक आश्चर्यकारक अनुभव ठरणार आहे.
- MANTHAN
‘आमार मेयेबेला’ हे तसलिमा नासरिन या प्रसिद्ध स्त्रीवादी लेखिकेचं आत्मचरित्र आहे. परंपरा अन् प्रथांना आव्हान देण्याचा तसलिमाचा स्वभाव आता वाचनविश्वाला चांगला परिचित झाला आहे. ‘कुवारपण’ सांगतांना देखील ती आपल्या स्वभावगुणाला जागली आहे. तसलिमाचं लिखाण वाचलं म्हणजे हटकून असं वाटतं की, कोणत्याही अतिरेकी प्रवृत्तीचा सूड उगविला जाण्याची एक विशिष्ट वेळ असते. मुस्लीम सनातनवाद अन् बुरख्याला सुद्धा अशा तऱ्हेनं ‘तसलिमा’ च्याच लेखणीतून जबाब मिळावा हा अजब न्याय म्हटला पाहिजे.
तसलिमा आपलं कुवारपण... बालपणापासून तारुण्याकडे नेणारी अवस्था विदीत करते... पण हळुवारपणे नव्हे... तर आक्रमकतेने सांगते... तिच्या निवेदनात भोवतालची सगळ्या प्रकारची, स्वभावाची पात्र येतात... रुढ चालीरिती... अंधश्रद्धा, समज अपसमज, वातावरण... सगळंच चित्रण येतं... पण हळुवारपणे नव्हे तर अक्षरश: येऊन आदळतं. कारण या अनुभवांच्या प्रगटीकरणात अस्सलता आहे. कुणाला त्यात अतिशयोक्ती वाटली तर तो दोष लेखिको नव्हे तर तिच्या वाट्याला आलेल्या परिस्थितीचा आहे. पुरुषप्रधान समाज व्यवस्थेचा आहे. स्त्रीयांच शोषण हाच स्थायीभाव असलेल्या समाजाच्या मनोवृत्तीचा आहे.
- Archana, Mumbai
I have read your autobiography part I and II recently. Since then, I have become your fan and waiting for Marathi translation of your other books and next parts of your autobiography. I am a women of your age, but surely I had much more freedom. I can understand it now. You are a very strong woman, fighting for your principles and I take this opportunity to salute you. I also hope that one day you will surely be in your priya matrubhumi
- DAINIK TARUN BHARAT 02-06-2002
यथासांग व प्रभावी अनुवाद...
आपल्या लेखनामुळे बांगला देशातच नव्हे तर इतरत्रही खळबळ उडविणाऱ्या तसलिमा नसरिन यांचे हे पुस्तक. बालपण ते वयात येण्यापर्यंतच्या काळातल्या बऱ्या-वाईट आठवणी म्हणजेच आमार मेयेबेला.
आपल्या बालपणातील आठवणीमध्ये आपले घर, घरातील माणसे, आई वडील, भाऊ-बहिणी तसेच जवळचे नातेवाईक यांच्या विषयीचे चांगले-वाईट अनुभव लेखिकेने मांडले आहेत. देखणे, शिक्षणाला महत्त्व देणारे डॉक्टर असलेले तरीही अहंकारी विषयासक्त आणि आपल्या मुलांना शिकवून मोठे करण्याचे स्वप्न बाळगणारे वडील, कुरूप, साधी, शिक्षणाबद्दल नावड दर्शवणारी, धर्मवेडी आणि नवऱ्याबद्दल सतत संशय बाळगणारी आई, प्रेमळ मोठा भाऊ, बंडखोर धाकटा भाऊ व लहान बहीण यांचे सांगोपांग वर्णन लेखिकेने केले आहे.
तसलिमाच्या तेरा, चौदा वर्षापर्यंतच्या काळात तिच्या स्वातंत्र्यावर तिच्या मनाविरुद्ध वागण्याची केलेली सक्ती, बंधने, त्यामुळे येणारे अस्वस्थपणे, वैफल्यग्रस्त, धर्मवेड्या आईने तिच्यावर केलेली धार्मिक सक्ती, वडिलांकडून शिकण्यासाठी होणारे प्रयत्न, न ऐकल्यास आई वडिलांकडून मिळणारा मार यामुळे तिचे बालपण भयग्रस्त आणि असुरक्षित झाले.
धर्म, परंपरा याविषयी पडणारे प्रश्न पण त्याची न मिळणारी उत्तरे, विचारल्यास मार व धमकी यामुळेही तिच्या बालमनावर परिणाम होत होता. याशिवाय जवळच्या नातेवाईक व्यक्तीकडून तिच्यावर झालेला शारीरिक, लैंगिक छळ तो सांगू बोलू न शकल्याने झालेली मानसिकता कुचंबणा याचे लेखिकेने केलेले स्पष्ट व धीट निवेदन यात चित्रित झाले आहे.
या पुस्तकातील सर्व पात्रे व घटना सत्य असल्याने व जे जसे आहे तसे, विनासंकोच लिहिल्याने आजच्या बंडखोर, वादग्रस्त, वादळी व्यक्तिमत्त्वाच्या लेखिकेचे मूळ या आठवणीत सापडते.
तसलिमाचे असुरक्षित, अस्थिर, बालपणच तिच्या या पुस्तकामुळे आपल्यापुढे उलगडत जाते व तिच्या ओघवती स्पष्ट, सरळ भाषेमुळे आपणही तो काळ तिच्याबरोबर अनुभवतो. मृणालिनी गडकरी यांनी बंगाली भाषेतील अनुवाद मराठीत अगदी यथातथ्य व प्रभावी भाषेत केला आहे.
-सौ. शशिकला प्रभावळकर
- DAINIK SAMANA 25-3
तत्कालीन स्त्रीचे प्रातिनिधिक चित्रण...
‘तस्लिमा नसरीन’ ही बांगलादेशाची गाजलेली लेखिका. ढाक्याच्या वर्तमानपत्रातून व मासिकांतून स्त्रियांच्या प्रश्नाबाबत सुरुवातीला स्तंभलेखन करणारी. पण त्याचबरोबर कवयित्री, कादंबरीकार म्हणूनही आज सर्व जगाला सुपरिचित आहे. ‘लज्जा’ ही तिची कादंबरी अनेक दृष्टीने गाजली.
‘आमार मेयेबेला’ या तस्लिमाच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद मृणालिनी गडकरी यांनी केला आहे. ‘आमार मेयेबेला’ हे आत्मचरित्रात्मक पुस्तक आहे. मुलगीपणाचा काल असे अनुवादक मृणालिनी गडकरी यांनी सुरुवातीला मनोगतात नमूद केले आहे. मुखपृष्ठावर ‘आमार मेयेबेला’ या नावाखाली कंसात ‘माझं कुंवारपण’ असे छापले आहे. या पुस्तकात लेखिकेने आपला तेरा-चौदा वर्षांतला काळ चितारला आहे.
त्या काळातील आठवणी, घटना, प्रसंग व्यक्ती त्या व्यक्तींचे एकमेकातील नातेसंबंध, तत्कालीन समाज, समाजातील चालीरिती, धर्मांधता,अंधश्रद्धा शिक्षणपद्धती, स्त्रियावर होणारे अत्याचार या साऱ्यांचा आढावा लेखिका स्वत:च्या जडण-घडणीच्या चित्रणात सहजपणे घेऊन जाते.
देखणे, उच्चशिक्षित डॉ. वडील व शिकण्याची इच्छा आणि शिक्षणात गती असूनही शिकायला न मिळालेली वडिलांच्या तुलनेत अगदीच असुंदर आई! अशा विजोड जोडप्याच्या संसारात होणारे आक्रस्ताळी झगडे! वडिलांचा बाहेरख्यालीपणा, त्यामुळे सदोदित आईच्या हृदयात संशयाग्नी पेटलेला! मुलांना शिक्षित करावे, आपल्यासारखे डॉक्टर बनावे यासाठी झटणारे वडील करड्या शिस्तीचे हुकूमशहा होतात तर संसारात असमाधानी असलेली आई खोटे-नाटे बोलून सिनेमाचा छंद जोपसणारी, धर्मांध पीरबाडीवरच्या अमीरुल्लाहाच्या नादी लागणाऱ्याच्या ताफ्यातील एक बनून जाते. संसारातील तिचे लक्ष पुरेच उडते. अशा घरात वाढत असताना, ते बरे-वाईट प्रसंग त्या नासमझ वयात येतात. त्याचे वर्णन प्रामाणिकपणे लेखिकेने केले आहे. लेखिकेला प्रत्येक गोष्ट आपल्या मनाविरुद्ध बळजबरीने करावी लागते. मग तो शाळेचा अभ्यास असो, अगदी जवळच्या नातेवाईकाने केलेला लैंगिक छळ असो, नाही तर सक्तीने पीरबाडीवर जाऊन सवाब (पुण्य) मिळविण्याच्या वेडात अमीलल्लाहाच्या कफ, थुंकीचे सेवन करणाऱ्या बायकांच्या घोळक्यात सामील होण्याची सक्ती असो. शक्य तितक्या निग्रहाने ती काही गोष्टी नाकारते. त्यातूनच तिची खूपशी सहनशील पण बंडखोर वृत्ती फोफावते. दोन पूर्णत: भिन्न व्यक्तिमत्त्वाच्या आई-वडिलांकडून कळत-नकळत संस्कार घडत असतात.
पवित्र दिवशी जन्मलेली तस्लिमा लहानपणापासूनच नाना तार्किक प्रश्न विचारणारी! एरव्ही अल्ला आकाशातून सगळं पाहतो, निवाडे करतो म्हणून नमाज पढा. कयामतीतून सुटका करून घ्या असे सांगणाऱ्या आईने शबबारातच्या दिवशी अल्ला खाली येऊन दुनियेत कोण काय करतेय हे पाहतो, असे सांगताच विचारायची, ‘‘सात आकाशात राहून नाही का अल्लाला पाहता येत? खाली कशाला यावं लागतं?’’ यावर अल्ला अद्वितीय आहे. त्याच्यावर दुसरं कुणी नाही असे उत्तर देणारी आई तिला नानीकडच्या पिंजऱ्यातल्या मैनेसारखी वाटायची. सुरा, निसा, लाहाब... म्हणजे काय ते समजून घेण्यासाठी कुराणाचा अनुवाद वाचणाऱ्या तस्लिमाला अनेक प्रश्न पडायचे. ‘नजर काढणे’, ‘भूतबाधा’ हे प्रकार ती पाहात, ऐकत होती. घरकाम करणारी मोलकरीण मणी म्हणजे हलक्या जातीची, दारी बांधलेला रॉकेट कुत्रा म्हणजे फरिश्ता घरात येण्यातली अडचणच... अशासारखे संस्कार लेखिकेवर घरच्यांच्या वागणुकीतून होत होते. परंतु ते पाहून लेखिका अधिकच बुद्धिप्रामाण्यवादी बनत गेली. तिच्या मनात उच्च-नीचतेच्या कल्पना रुजण्याऐवजी असमानता, अन्यायाचा प्रतिकार करण्याचे बीज रोवले गेले. प्राणिमात्रांबद्दल सहृदयता निर्माण झाली.
छोट्या दादाने हिंदू मुलीशी लग्न केल्यावर घरात झालेला संताप, त्याचे मन वळविण्याचे प्रयत्न, ऐकत नाही असे पाहताच बाबांनी त्याला चाबकाने फोडून काढणे, चार दिवस उपाशी ठेवणे हे सारे अघोरी प्रकार असहाय्यतेने पाहण्याशिवाय लेखिका काहीच करू शकत नव्हती.
लाल मुंग्या म्हणजे हिंदू म्हणून त्या वेचून वेचून माराव्या असे समजणारा दादा हिंदू मुलीच्या प्रेमात कसा पडतो हे तिला समजत नाही. तीच हिंदू मुलगी धर्म बदलून मुसलमान झाल्यावर बाबांच्या अपरोक्ष चोरून घरात आलेली आईला चालते हे देखील कोडेच! स्वत:चे नाव नसणारी फुलबहारीची आई, स्वयंपाकात मीठ नाही म्हणून गुरासारखी मार खाणारी व तलाख मिळालेली गेंतूची माँ, आधीच तीन लग्न झालेल्या तोंडाचं बोळकं झालेल्या सत्तरीच्या म्हाताऱ्याशी फुलबहारीचं झालेलं लग्न, लग्नानंतर म्हाताऱ्या नवऱ्याने तिचा तिचा गळा दाबून जीव घेणं... या साऱ्या घटना व स्त्रिया म्हणजे स्त्री अत्याचाराची प्रातिनिधिक रूप तिच्या मनावर कोरली जातात. जवळच्या नात्यातील पुरुषांकडून स्त्रियांचा होणारा लैंगिक छळ ती स्वत: अनुभवते. तसेच आजूबाजूच्या स्त्रिया, मुली यांचाही होताना पाहते. एकंदरीत वाट्याला आलेल्या अनुभवांचे निखळ चित्रण लेखिका करते.
-शैला हळबे
- MADHURA 26-11-2005
तसलिमा नासरिन या बांगलादेशीय लेखिकेचे आत्मचरित्र म्हणजेच ‘अमार मेयेबेला’ अर्थात ‘माझं कुंवारपण’ हे पुस्तक मराठीत अनुवादित केले आहे मृणालिनी गडकरी यांनी. मेहता पब्लिशिंग हाऊसने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.
बंडखोर, स्त्री मुक्तीवादी, अतिशय संवेदनशील लेखिका म्हणून तसलिमा नासरिन यांना ओळखले जाते.
तसलिमाच्या वयाच्या तेरा-चौदा वर्षांपर्यंतच्या काळातील आठवणी बारीक-सारीक तपशिलांसह यात आल्या आहेत.
या काळात तिच्यावर झालेले संस्कार, तिला आलेले चांगले-वाईट अनुभव, मनाविरुद्ध झालेल्या बऱ्याच घटना, तिच्या स्वातंत्र्यावरील बंधने, जवळच्या नात्यातील पुरुषांनी केलेला तिचा शारीरिक छळ, ऋतुप्राप्तीनंतरची मनातील खळबळ, त्यातूनच आपण ‘मुलगा व्हावं’ म्हणून सर्व देवांजवळ केलेली प्रार्थना, मोकळ्या वातावरणात न वाढल्यानं होणारी मानसिक कुचंबणा, मनातील भीती आणि या सर्वांमुळे आपल्याला कुणीही नाही ही झालेली भावना, या सर्व गोष्टींचे परखड निवेदन आपल्याला वाचायला मिळते.
मुलांवर अति महत्त्वांकांक्षेचे ओझे टाकणारे वडील दोन मुलांकडून त्या पूर्ण न झाल्याने आलेली निराशा, त्या पूर्ण होण्यासाठी मुलींवर घातलेली बंधने, अहंकारी, बुद्धिवादी वडील तसेच साधी, कमी शिकल्याचा न्यूनगंड बाळगणारी, नवऱ्याविषयी संशय बाळगणारी, वैफल्यग्रस्त, धर्माच्या आहारी जाऊन भरकटलेली आई यांची व त्यांच्या चार मुलांची ही शोकांतिका आहे.
पुस्तकात आपल्याला धर्मावरील परखड विवेचनही वाचायला मिळते. अंधश्रद्धेच्या आहारी जाणारे लोक, धर्माच्या नावाखाली चाललेले स्त्रियांचे शोषण, गैरप्रकार याचेही अनेक तपशील यात येतात.
या सर्व पार्श्वभूमीवरच या लेखिकेचा बंडखोरीचा पिंड जोपासला आहे, असे दिसते.
मृणालिनी गडकरी यांनी मराठी वाचकांसाठी अतिशय तरल शब्दांत अनुवाद केला आहे. अतिशय अंतर्मुख करणारे, प्रत्येकाने जरूर वाचावे, असे हे पुस्तक आहे.
-प्रा. मंजुषा भोसले, पुणे
- DAINIK LOKSATTA 12-08-2001
दाहक अनुभवांची धीट ओळख...
धीट आणि थेट चित्रणासाठी प्रसिद्ध असलेल्या बांगलादेशीय लेखिका तसलिमा नासरिनचं ‘आमार मेयेबेला’ हे लेखिकेचं कुवारपण सांगणारं आत्मचरित्रात्मक पुस्तक. स्वजन, स्वकीय आणि स्वधर्म यांच्यावर इतक्या धीटपणे आणि स्पष्टपणे लिहिणं ही एक असाधारण गोष्ट आहे. लहानपणी चित्रविचित्र मानसिक कुचंबणेला सामोरं जावं लागलेल्या तसलिमा नासरिनचं लेखन बंडखोर आणि भेदक का होत गेलं, याची चुणूक यातून सापडते.
कौटुंबिक वातावरणातील असमतोल, अवतीभवतीचं दारिद्र्य, अंधश्रद्धा, धर्मांधता, स्त्रियांवरील अत्याचार, अनष्टि रूढी-प्रथा या भोवऱ्यात लेखिकेचं बालपण गरगरत राहिलं आहे. प्रगल्भ बुद्धीची तसलिमा नासरिन अन्यायाला विरोध करायला लागली व तिच्या समाजात तिला ..... म्हणून रोष ओढवून घ्यावा लागला. अंधश्रद्धा दूर करण्यासाठी आणि जनजागृतीसाठी ती धडपडली. पण ते करताना तिला असह्य अपमान सोसावे लागले. पदोपदी प्रचंड विरोध झाला. स्वत:च्या देशातून परागंदा व्हावं लागलं आणि जेवढा तिला विरोध होत गेला, तेवढी ती अधिक उसळून बेदरकारपणे लिहीत सुटली.
‘लज्जा’, ‘फेरा’, ‘निर्वाचित कलाम’, ‘निर्वाचित कविता’, ‘नष्ट मेयेर नष्ट गद्य’ या पुस्तकानंतरचं हे तिचं नवीन पुस्तक!
तिच्या बालपणाबद्दल (तेही मुस्लिम समाजातील!) वाचताना शहारल्यासारखं होतं. मुलींच्या आयुष्यातला नऊ ते तेरा वयाचा कालखंड हा ‘न समजणं’ आणि ‘काही समजणं’ अशा सीमारेषेवरचा अतिशय महत्त्वाचा असतो. अंधश्रद्धाळू, शंकाग्रस्त आणि भेदरलेल्या आईचा अशा वयातल्या मुलीला आधार तरी कसा वाटावा? आई आणि देखणे वडील, आईची सामान्य बुद्धी आणि वडिलांची तीव्र कुशाग्र बुद्धी आणि दोन्हींकडे स्खलशनील वृत्ती. अशा रस्सीखेच वातावरणात या कुमारवयीन, संवेदनशील मुलीला मानसिक कोंडीत सापडावं लागतं. विरोधाचं बळही आलेलं नसतं.
असं अत्यंत प्रामाणिक, स्पष्ट आत्मवृत्त क्वचितच आढळतं. धारदार, तेजस्वी भाषेचं बळ लेखिकेला लाभलं आहे. काही वेळा काव्यात्मकताही जाणवते. मात्र, काल्पनिक फुलोरा दिसत नाही. वात्सव इतकं भीषण आणि दाहक असू शकतं यावर विश्वास बसणार नाही अशा घटना यात आहेत.
लेखिकेच्या चिंतनशील मनाचा आणि शोधक दृष्टीचा परिचय बालपणापासूनच होतो. लेखिका म्हणून नावारूपाला येत असताना तिच्या भेदक, शहरात्मक बंडखोरीची पूर्वतयारी तिच्या बालपणीच होत होती हे लक्षात येतं. ‘लहानपणी मुलं झाडावर चढायची. आंबे पाडायची. रातांबे, शहाळी काढायची. त्यांच्यासारखं मलाही झाडावर चढावंसं वाटायचं. पण ती म्हणायची, ‘मुलगी झाडावर चढली तर झाड मरतं.’ ते लुंगीचा काच्या मारून हुतूतू खेळायचे. पण मी खेळायला गेले की म्हणायचे, ‘मुलींनी हुतूतू खेळायचा नसतो.’ ही मुलं खांद्यावर पंचा टाकून तळ्यावर मासे पकडायला जायची. मीही त्यांच्या मागे मागे जायला बघायची. ते मागे वळून म्हणत, ‘मुली मासे पकडत नाहीत.’ ‘पतंग उडवत नाहीत.’ मी चिडीला येऊन आक्रमक स्वरात विचारायची, ‘कुणी ठरवलं हे सगळं?’
असे अनेक नकार केवळ मुलगी म्हणून लेखिकेला पचवावे लागले. तार्कीक कारण सापडत नसतानाही ते मुकाट्याने ऐकावे लागले. परंतु मनात कुठेतरी ठिणगी पडत राहायची.
बांगलादेशात मुक्तिवाहिनीने स्वातंत्र्यासाठी जो निर्वाणीचा लढा दिला, त्यावेळी तसलिमाचे वय नऊ वर्षांचे होते. भेदरून गेलेली माणसे आणि चर्चेचे उठणारे मोहोळ ती अनुभवित होती. रेडिओ ऐकायला लोक घरी येत. घरातल्या बायका आतून कान देऊन बाहेरच्या गप्पा ऐकायच्या. बिछान्यावर गाठोड्याप्रमाणे नानी बसून राहायची. भुतांच्या भीतीबरोबरच मिलिटरीच्या भीतीनं तसलिमाच्या मनात घर केले होते.
काही काळनंतर ‘जय बांगला’च्या घोषणा ऐकल्यावर तिला वाटले- ‘याचा अर्थ आता कोणी कोणाच्या घराला आग लावणार नाही. आता कोणी कोणाला गोळी घालून मारणार नाही. कुठेही बॉम्ब पडणार नाही. डोळ्यावर पट्टी बांधून कोणी कोणाला पकडून नेणार नाही. वाऱ्यावर प्रेतांची दुर्गंधी येणार नाही. गिधाडे, आकाशात गर्दी करणार नाहीत.’
पुस्तकातील हे उतारे त्यावेळी उद्भवलेली परिस्थिती दर्शवतात. निषिद्ध गोष्टी करण्यात तसलिमाला हुरूप यायचा. दणकावून विरोध करण्यासाठी तिचे मन बंड करू लागायचे. परंतु शराफमामाने तिच्याशी केलेल्या अतिप्रसंगाने ती गोठून गेल्यासारखी झाली. वडील बुद्धिमान डॉक्टर होते. पण संसारात एकनिष्ठ नव्हते. त्यावरून त्यांची व आईची खूप वादावादी व्हायची. या सततच्या भांडणांचा ताण तसलिमाच्या बालमनावर पडू लागला. अमान काकाकडूनही तिला लैंगिक छळणुकीचा अनुभव आल्यावर ती गप्प गप्प राहायला लागली. तिचे ओठ जणू अदृश्य धाग्याने शिवून टाकले होते. अंगाचा थरकाप उडवणारे हे प्रसंग लिहिताना मात्र लेखिकेने लेखणीला जराही अडवले नाही. लेखिका म्हणते, ‘त्यावेळी माझ्यात दोन ‘मी’ होत्या. एक सगळ्यांना जमवून ‘चोर-शिपाई’, ‘गोल्लाछूट’, ‘गोलापपद्म’ खेळणारी आणि दुसरी उदास होऊन तळ्याच्या काठावर, रेल्वे-लाईनच्या कडेला किंवा घराच्या पायऱ्यांवर बसून राहणारी. हजारो लोकांमध्येही एकटी. या एकाकी मुलीत आणि इतरांच्यात करोडो मैलांचे अंतर पडले होते. त्यामुळे ती कोणालाही शिवू शकत नव्हती. आपल्या आईलासुद्धा! हात पुढे करून कोणाला शिवाचा प्रयत्न केला, तर हातात यायचा भरभरून रितेपणा. अशा अगतिक अवस्थेत लेखिकेचे बालपण कसे एकाकी, असहाय गुदमरलेपण झेलत होते, त्याचे कित्येक प्रसंग चित्रदर्शी शैलीत मांडले आहेत. पुढे भयंकर स्फोट होण्यापूर्वीची ही घातक शांतता होती.
तिला जबरदस्तीने ‘कुराण शरीफ’ वाचायला सांगितले जायचे. जे समजत नाही, जे पटत नाही, ते करण्यासाठी इतरांचा अट्टाहास का, असा प्रश्न तिच्या बालबुद्धीला पडत असे. ‘ओठ पिळले तर अजूनही दूध बाहेर येईल. पण उद्धटपणे बोलायला शिकलीय. तुमच्यावर सैतान स्वार झालाय. तो तुम्हाला अल्लाचं नाव घेऊ देत नाही,’ असे म्हणत आई अमीरुल्लाह पीराच्या सेवेत स्वत:ला झोकून द्यायची.
आईचे नादावून पीरबाडीला जाणे, अंधश्रद्धाळू बनणे आणि संसार सोडून पीरबाडीला धंदेबाजाच्या तावडीत सापडणे लेखिकेला बालवयातही खटकत होते. पण ती त्यावेळी असहाय होती. मात्र, आईने मारून पाठ लाल केली तरी बुरखा घालायचा नाही म्हणजे नाही, हा लेखिकेचा ठाम निग्रह होता. या जगात मुलगी म्हणून जन्माला येण्यापेक्षा मेलेले फार चांगले, असेही तिला वाटायचे.
‘‘मी आकाशाकडे पाहत राहीन. मला मग रडू येईल आणि मी कविता लिहीन. मी या समाजाचा, जगाचा तिरस्कार करेन. माझ्या अदृश्य कैदेची घृणा येईल मला. माझ्या हाता-पायातल्या बेड्यांची जाणीव होईल मला...’’
या तळमळीच्या उद्गारांतून लेखिकेचे फाटलेले काळीज मनाला दुखरी जाणीव देत तिच्यावर झालेल्या अनन्वित छळांची कहाणी सांगत राहते. तिचा दादा म्हणायचा, ‘‘कविता हृदयातून वाचली पाहिजे, तरच ते कवितावाचन!’’ दादामुळे तिची कवितेशी ओळख वाढली. तिच्या कवितांच्या वहीवर मुलींच्या उड्या पडत. दादाबरोबर ती कथांचीही चर्चा करायची. दादाबरोबर बुद्धिबळाचा डाव मांडायची. दादा हा तिचा खराखुरा मित्र बनला. चित्र काढणे, संगीत ऐकणे– हा या मनस्वी मुलीला जणू नाद लागला आणि या कलामाध्यमातून ती आपल्या दुखऱ्या जखमांवर फुंकर घालू लागली.
तसलिमा नासरिनचं लहानपण चितारलेले हे आत्मवृत्त अतिशय जिवंत आहे. अतिशय जिवंत आहे. दाहक आहे. अनुवादक या नात्याने मृणालिनी गडकरींनी हा दाहक अनुभव आपल्यापुढे ठेवला आहे. तसलिमा नासरिन या लेखिकेच्या जळजळीत आणि प्रगल्भ लेखनाची त्यांनी चांगली ओळख करून दिली आहे.
-शुभा चिटणीस
- MAHARASHTRA TIMES २९-७-
व्यापक आशयाचं आत्मकथन…
तसलिमा नसरिन हे नाव घेतलं की आपल्या डोळ्यासमोर झरकन तरळून जातात ती त्यांची पुस्तकं ‘लज्जा’,‘निर्बाचित कलाम’, ‘निर्बाचित कविता’ अशा पुस्तकांतून आपल्या लक्ष्यवेधी लिखाणातून त्यांनी वाचकांच्या मनात स्थान मिळवलेले आहे. अशा पार्श्वभूमीवर आपण आमार मेयेबेला (माझं कुवारपण) हे त्यांचे अनुवादित आत्मकथन हातात घेतो.
मराठीत आत्मकथन हा प्रकार आता चांगलाच रुळला आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांतील, पेशातील माणसांनी दर्जेदार आत्मकथन केले आहे. तरीही तसलिमा नसरिन याचं हे कथन अनोख ठरतं, याचं कारण म्हणजे यासाठी त्यांनी निवडलेला कालपट होय. एक अजाण मुलगी ते सुजाण तरुणी असा त्यांचा प्रवास आपल्याला या पुस्तकातून दिसतो.
कौमार्य हा माणसाच्या, त्यातही मुलीच्या, आयुष्यातील महत्त्वाचा काळ होय. या काळातले चढउतार, प्रसंग, घटना, आठवणी हे सारे तिच्या आयुष्याची दिशा ठरवतात. त्यातही नासरिन या पारंपरिक मुस्लिम धर्मीय कुटुंबात जन्माला आल्याने हा काळ त्यांचं व्यक्तिमत्त्व घडवण्यात आणखी महत्त्वाचा ठरतो.
या पुस्तकाची सुरुवात होते, ती ‘युद्धाचं वर्ष’ या प्रकरणाने. त्यावेळी बांगला देशात स्वातंत्र्यासाठी युद्ध सुरू झालं होतं. सगळं वातावरण ढवळून निघालं होतं. ‘कोणाच्या कपाळांवर, कोणाच्या नाकाखाली, कोणाच्या अचंब्यानं उघड्या पडलेल्या तोंडात, कोणाच्या गालांवर, कोणाच्या कानांत, कोणाच्या डोक्यांवर जणू काही डोळेच फुटले होते. सगळे डोळे मात्र सताड उघडे’ अशा शब्दांत ते आपल्यापर्यंत परिणाम करत पोचतं. अशी परिणामकारक निवेदनशैली हा नासरिन यांच्या लेखनशैलीचा विशेष मृणालिनी गडकरी यांच्या अनुवादातून आपल्याला भिडतो. पुस्तकाचं शेवटचं प्रकरण आहे ‘युद्धानंतर.’ म्हणजे युद्धाची सुरुवात ते युद्धाचा शेवट असा कालपट आपल्याला दिसतो. देशाच्या सदंर्भात फार मोठा बदलाचा हा काळ आहे. पण केवळ बाह्य परिस्थितीच नव्हे, तर नासरिनचं अंतरंगही या काळात नव्याने आकारलेलं आहे. म्हणजेच या पुस्तकातून एका पातळीवर नासरिनचा प्रवास, तर दुसऱ्या पातळीवर देशाचा प्रवास आपल्याला जाणवतो.
नासरिनच्या या प्रवासातील टप्पे म्हणजे तिची आई, मोठे होणे, संस्कार, प्रेम, धर्म, ऋतूप्राप्ती, कविता आहेत. अशी प्रकरणं यात येतील. माणूस घडताना त्याला सगळ्यात जवळची व्यक्ती म्हणजे आई होय. तिच्यासंबंधी वेगळं प्रकरण आहेच, पण एरवीही ती पुस्तकातून कळत नकळत जाणवत राहते. नासरिनचे वडील डॉक्टर म्हणून नामांकित आहेत. पण एक पिता, त्यातही पती, म्हणून सर्वसामान्यसुद्धा नाहीत. स्वत: नासरिन एकीकडे जिज्ञासू, चिकित्सक आहे आणि दुसरीकडे ती संवेदनशील, हळुवार कविमनाची आहे. अशा वरवर विरोधी वाटणाऱ्या विशेषातून ती उलगडत जाते. धर्म व त्यातही अल्लाची कल्पना आईने समजावताना नासरिनची ही चिकित्सक वृत्ती दिसते. ‘अल्लाने सारं लिहून ठेवलेलं आहे. मग माणसाच्या कर्मामुळे त्यात बदल काय होणार?’ असा परखड प्रश्न ती करते. वेळप्रसंगी आईच्याच नव्हे, तर वडिलांच्याही विरोधात जाते. ऐन दुष्काळाच्या वेळी दारावर आलेल्या विद्यार्थ्याना ती बेधडकपणे वडिलांनी जपून ठेवलेले तांदूळ देते, ते स्वत:मधील सत्ची खात्री असल्यानेच. अशा बंडखोरीच्या मागे नासरिनचं संवेदनशील मन आहे. तशीच नासरिनची तीव्र बुद्धिमत्ता आहे. नासरिनच्या मनाविरुद्ध तिचे वडील शाळा बदलण्याचा निर्णय घेतात. तेव्हा प्रवेश परीक्षेच्या निबंधात चौकट मोडून ती बिनदिक्कतपणे स्वत:चे मनोगत लिहिते आणि दोनशे विद्यार्थ्यातून निवडलेल्या तीस विद्यार्थ्यात तिची निवड होते. या निबंधासाठी तर तिचं खास कौतुक होतं.
नासरिनला या बुद्धिवादाचं बाळकडू जणू वडिलांकडून मिळालेलं आहे. डॉ. रजबअली हे नासरिनचे वडील प्रखर बुद्धिवादी, देखणे आहेत; तर आई ईदुनआरा त्यांच्याशी एकदम विसंगत आहे. ‘चपट्या नाकाच्या काळ्या मुलीचं लग्न एक तरतरीत नाकाच्या गोऱ्या मुलाशी झालं.’ अशा शब्दांत ती विसंगती जाणवून देते. अशा विसंवादी माणसांतील हे लग्न होतं, ते रजबअलींना इदुनआराच्या वडिलांनी दिलेल्या आसऱ्यामुळे, केलेल्या मदतीपोटी. या उपकाराचं ओझं वागवत जगणं डॉ. रजबअलींना असह्य होतं आणि मग रजिया बेगम किंवा अगदी स्वयंपाक करणाऱ्या बार्इंशींही त्यांचं सूत जुळतं. दुसरीकडे आई आणि काका यांच्यात धर्माच्या नावाखाली अनैतिक वर्तन चालतं. आई-वडिलांच्या आचार-विचारातील ही विसंगती नासरिनला चिंतनशील, अंतर्मुख करते. पण तरीही ती स्वत:च्या विचारांशी, तत्त्वांशी ठाम राहते. आई-वडिलांबरोबर भाऊ, काका, काकी, मामा, आजोबा, आजी अशा अनेक जवळच्या नात्यांतील सूक्ष्म पदर उलगडत जाते. या सगळ्या तथाकथित मोठ्या म्हणवणाऱ्या माणसांतील ढोंग, मत्सर, खोटेपणा, नासरिन धिटाईने मांडते.
दुसऱ्या बाजूने घरात काम करणाऱ्या मणीसारख्या स्त्रीशी तिचं मैत्रं जुळतं. स्त्रीच्या शरीरातील हळुवार प्रेममय जागा पहिल्यांदाच तिला जाणवतात. पुढे विद्यामयी स्कूलमध्ये रूनी या मोठ्या मैत्रिणीची तिला ओढ वाटते. अशा हळुवार, तरल नात्याचं वर्णनही तितक्याच हळुवारपणे ती करते. ‘आई-बाबांचा मार खाणारी बाहेरची मी आणि आतली मी. गोल्लातून सुटून प्रेमरसात गटांगळ्या खाणारी. बालपणीच्या गोल्लाछुटच्या खेळातून पुढे झेपावणारी.’ नासरिनच्या मोठे होण्यात असे सुखद संदर्भ आहेत; पण ते क्वचित आहेत. बहुतेक वेळा त्यात दु:ख, वेदना यांचा अनुभव येतो. वडिलांची दंडेशाही, आईचं धर्मवेड, जवळच्या नातेवाईकांकडून झालेला लैंगिक अत्याचार आहे. केवळ नासरिनच नव्हे, तर या पुस्तकातील अनेक स्त्रियांच्या– जशी नासरिनची आई, आत्या, मावशी अशा अनेकजणींच्या– वाट्याला दु:खच आलेलं आहे. त्याला कारणीभूत स्त्रीला दुय्यम मानणारी नव्हे, तिला जणू मनच नाही अशी मानणारी समाजरचना कारणीभूत आहे. साहजिकच अशा स्त्रियांच्या वेदनेचे संदर्भ यात वारंवार येत राहतात. म्हणजे एका बाजूने ही तसलिमा नासरिनची कथा आहे. दुसऱ्या बाजूने ही एका कुटुंबाची व्यथा आहे. तिसऱ्या पातळीवर ही आपल्या संपूर्ण समाजाची कथा आहे. असा व्यापक होत जाणारा आशय हेच या पुस्तकाचे श्रेष्ठव होय.
-मनिषा र. रावराणे