- Siddharth More
या पुस्तका बद्दल जास्त काही बोलू शकत नाही एवढच म्हणू शकतो कि नाटकी सेंक्यूलर माणसांच्या तोंडावर सणसणीत चपराक.
- Hrushikesh Honrav
दोन दिवसांपूर्वीच "लज्जा" कादंबरी वाचून पूर्ण केली.
तस्लिमा नासरीन यांची लेखनशैली ही अत्यंत ज्वलंत आहे हे मला "फेरा" वाचल्यावर कळालच होत, पण त्या धार्मिक कट्टरवाद तसेच मुलतत्ववाद्यांची रक्तपिपासू वृत्ती या विषयावर पण एवढ्या प्रखरपणे कोरड ओढतील हे "लज्जा" वाचल्यासच कळत.
कादंबरीचे मुख्य पात्र आहे. -दत्त कुटुंबीय. मूळचे बांग्लादेशचे रहिवासी असणारे हे कुटुंब. सुधामयबाबू, किरणमयी यांची दोन मुलं सुरंजन आणि माया. बांगलादेशात हिंदू ह्या अल्पसंख्याक जमातीवर समाजातील बहुसंख्याक जमातीकडून छळ केला जातो असतो. पण दत्त कुटुंबीय ह्या सर्व संकटांना, छळाना तोंड देत आपल्या मातृभूमीतच राहणं पसंद करतात. सुधामयबाबू हे नास्तिक... देशप्रेम व आदर्शवादान भारलेलं व्यक्तिमत्त्व.
परंतु...
६ डिसेंबर १९९२ रोजी भारतात बाबरी मशिदीचा विनाश केला, आणि पडसाद साऱ्या जगभर पसरले. पण या कृत्याची दखल शेजारी राष्ट्र बांगलादेशाने मात्र फार तीव्रतेने घेतली. हिंदूंचा छळ करायला अजून एक निमित्त भेटलं.
अत्यंत प्रखर वास्तववादावर आधारित अशी ही कादंबरी ९०च्या दशकातील अमानुष छळ आणि आधुनिक काळातील हिंसाचाराच प्रत्ययकारी चित्रण करते.
कादंबरीतील काही आवडते वाक्य...👇
सुरंजनच्या मनात एक मूक प्रश्न घर करून राहिला होता. पहाट व्हायला आली होती. खिडकीच्या फटीतून सूर्याचे किरण आत येत होते. सुधामयबाबू म्हणाले, "चल, आपण इथून निघून जाऊ या." सुरंजनला आश्चर्य लपवता येईना. तो म्हणाला, " आपण कुठं जायचं, बाबा ? " सुधामयबाबू म्हणाले, " भारतात. " -आणि लज्जेने त्यांचा आवाज चिरकला होता. पण त्यांनी अखेर ते शब्द उच्चारले होते, जिवाच्या कराराने ते बाहेर पडले होते.
आपण इथून निघून जाऊ, अस म्हणायला त्यांनी स्वतःला भाग पाडल होत आणि त्याशिवाय दुसरा ईलाज नाही, हेही त्यांना कळून चुकलं होत, कारण त्यांनी आपल्या मनात उभा केलेला प्रचंड पर्वत दिवसेंदिवस खचत चालला होता.
#लज्जा 😐
- Ganesh Dhure
हृदय पिळवटून टाकणारी आहे.
- Kanchan Kathe
डोकं आणि मन दोन्ही सुन्न करणारी कादंबरी..... २० वर्षां पूर्वी वाचली
- Anjali Mahajan
अप्रतिम माणसातल्या मलेल्या माणुसकिच दर्शन
- ZEE MARATHI DISHA 15 JUNE - 21 JUNE, 2019
६ डिसेंबर १९९२ रोजी, अयोध्येतील बाबरी मशीद उद्ध्वस्त झाली. दूरदर्शनवर सीएनएनतर्फे सर्व तपशीलवार हे दृश्य दाखवण्यात आलं. १६व्या शतकातील या धर्मस्थळाचं उच्चाटन हा भारतातील आणि भारताबाहेरील मुसलमानांना फार मोठा धक्का होता. याची प्रतिक्रिया बांगलादेशात फार मोठ्या प्रमाणात उमटली. जातीय दंगली सुरू झाल्या. मूलतत्त्ववादाचा आणि जातीयवादाचा तिटकारा असलेल्या तसलीमा नसरीन या लेखिकेनं याच सुमारास ‘लज्जा’ हे पुस्तक केवळ सात दिवसांत लिहिलं. बांगलादेशातील हिंदूंना सहन करावा लागलेला छळ हा या पुस्तकाचा विषय आहे.
बाबरी मशीद घटनेनं बांगलादेशातील हिंदूंचं आयुष्यच बदलून गेलं. उद्ध्वस्त झालं. अशा परिस्थितीत बांगलादेशातील ढाका येथील डॉ. सुधामय दत्त, त्यांची पत्नी किरणमयी, मुलगा सुरंजन आणि मुलगी माया या चौकोनी घरंदाज आदर्शवादी हिंदू कुटुंबाची, खरं तर त्यांच्या वाताहतीची ही कहाणी.
१९९३ साली मूळ बंगाली भाषेत प्रसिद्ध झालेल्या या कादंबरीच्या जगभरातील अनेक भाषांमध्ये साठहजारांहून अधिक प्रती आणि अनेक आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. परंतु जातीय सलोखा नष्ट होत आहे म्हणून बांगलादेश सरकारनं या पुस्तकावर बंदी घातली आहे. एवढंच नव्हे तर मूलतत्त्ववादी संघटनेतर्फे लेखिकेच्या हत्येसाठी फतवा काढण्यात आला, तरीही न घाबरता लेखिका म्हणते, ‘‘अत्याचार आणि भेदभावाविरुद्ध मी असेच लिहीत राहणार.’’
–मंगला गोखले
- Viresh Swami
बांग्लादेशमधिल हिंदुचि काय परिस्थिति आहे हे दर्शवणार पुस्तक.
पुस्तक वाचल्यावर मन सुन्न होत.
- Gayatri Kulkarni
फार छान आहे...विचार करायला लावणार पुस्तक
- Praful Naik
वाचनीय पुस्तक
- Pushpa Naikwadi
प्रवाहा विरूध्द पोहणे आवघढ व कठीणच नसते तर कधीही आपणास कशाला सामोरे जावे लागेल हे वास्तव सत्य मांडले.Bold व अप्रतिम .
- Bhagyashree Chalke
मन सुन्न करणारी कादंबरी.
- Bhakti Anil Joshi
खुपच सुंदर आहे पुस्तक ......वास्तव्य दर्शन ....
- Mangesh Gawali
" लज्जा " काल हाती घेतले आणि संपविले , पण संपल्या सारखे वाटतच नाही . अतिशय अस्वस्थ करणारी कादंबरी ! मेंदू बधीर करणारी. या पेक्षा जास्त सांगूच शकत नाही . रस असणाऱ्यानी अवश्य वाचावी ,नव्हे प्रत्येकाने वाचललीच पाहिजे .
- Mangesh Gawali
प्रत्येक स्त्रीने तर वाचायलाच हवे.
- DAINIK LOKSATTA 09-10-1984
धार्मिक कटवटपणावर हल्ला करणारी क्रांतिकारक कादंबरी…
‘लज्जा’ ही सध्या गाजत असलेली तस्लिमा नसरीन यांची वास्तवावर आधारलेली कादंबरी. तस्लिमा या कवी म्हणून बांगलादेशात प्रसिद्ध आहेत. १९८६ साली त्यांचा ‘शिकोरे विपुल खुदा’ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आणि प्रतिभाशाली लेखिका म्हणून त्यांचे नाव सर्वतोमुखी झाले. आतापर्यंत त्यांचे सात कवितासंग्रह तर पाच कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या आहेत. ‘लज्जा’ ही सहावी कादंबरी. बांगलादेशातील मुसलमानांनी हिंदूचा केलेला छळ आणि बांगलादेशावर प्रेम करणाऱ्या हिंदूची केलेली कोंडी असा या कादंबरीचा विषय आहे. कादंबरीचा आशय खळबळजनक असल्याने तीवर सतत चर्चा होत आहे. केवळ चर्चेवरच हे प्रकरण थांबले नाही तर जातीय सलोखा बिघडत असल्याचा आरोप लेखिकेवर करण्यात आला आणि मूलतत्त्ववादी व जातीयवादी शक्तींच्या भयाने सरकारने या कादंबरीवर बंदी घातली व तस्लिमा नसरीन यांच्यावर टीका करण्यात आली. कडव्या मुसलमानांनी लेखिकेची हत्या करण्याचा फतवा काढला. अवघ्या बत्तीस वर्षांच्या या प्रतिभावंत लेखिकेवर मोठी आफतच गुदरली आहे. तिच्या बंडखोर वृत्तीचे यथार्थ दर्शन या कादंबरीत घडले आहे.
बाबरी मशिदीचा विदध्वंस झाला आणि जगातल्या मुसलमानांनी आपला संताप व्यक्त केला, त्याचाच एक भाग म्हणून बांगलादेशातील मुसलमानांनी तेथल्या अल्पसंख्याक हिंदूचा अनन्वित छळ केला, त्याचे विदारक सत्य दर्शन या कादंबरीत झाल आहे. माणूस ज्या देशात राहतो तो देश त्याचा असतो, तिथल्या जमिनीवर, निसर्गावर, माणसांवर तो प्रेम करीत असतो. पण देशापेक्षा जेव्हा धर्म श्रेष्ठ मानला जातो, त्यावेळी माणसांच्या देशप्रेमाची व्याख्या बदलली जाते. धर्म आणि जात या बाबी व्यक्तीपुरत्या मर्यादित असतात, शिवाय त्या घरापुरत्या सीमित असतात. पण मनुष्य धार्मिक अधिक असतो याचे स्पष्ट उदाहरण म्हणजे डिसेंबर १९९२ मध्ये जगात उसळलेले हिंदू-मुसलमानांचे धार्मिक दंगे, वास्तविक पाहता बाबरी मशीद भारतात, ती भारतातल्या मूलतत्त्ववाद्यांनी नष्ट केली. या प्रकरणाचे पडसाद जगातल्या मुस्लिम देशातही उमटले. कारण नसताना बांगलादेशातील हिंदू मंदिरे उदध्वस्त केली. हिंदूवर अत्याचार केले. भारतातल्या हिंदूनी मुसलमानांच्या अस्मितेवर घाला घातला असा समज करून घेऊन बांगलादेशीय हिंदूवर तिथल्या कर्मठ मुस्लीम माणसांनी हल्ले केले. अनेकांची घरे जाळली, दुकाने फोडली. अनेक वर्षे शेजारीशेजारी राहणाऱ्या हिंदू-मुस्लीम कुटुंबामध्ये नाहक वितुष्ट आणले आणि दोन कुटुंबामधला स्नेहभाव नष्ट होऊन वैरभाव वाढला. दोन समाज एकमेकांविरुद्ध शस्त्रे परजीत उभे ठाकले. या परिस्थितीचे चिंतन या कादंबरीत आहे. अनेकांना अंतर्मूख होऊन विचार करायला लावणारी ही कादंबरी आहे.
बांगलादेशाच्या स्वातंत्र्यलढ्यात राष्ट्रप्रेमाने लढलेले सुधामयबाबू, त्यांचा मुलगा सुरंजन, त्यांची कन्या माया (निलोजना), त्यांची पत्नी किरणमयी अशा चारणांच्या कुटुंबावर कोसळलेल्या संकटाची ही कथा आहे. बांगलादेशात उसळलेल्या दंगलीत बरेवाईट होण्याच्या आधीच दुसरीकडे निघून जावे असे मायाला वाटत होते. पण बांगलादेशात घडलेली १९५२ची भाषिक चळवळ, १९५४ची युनायटेड फ्रंटची निवडणूक, १९६२ची शैक्षणिक चळवळ, १९६६ची सहा कलमी चळवळ, आगरताळा कटाविरुद्ध निषेधाचा लढा, १९७१ सालचे बांगलादेशाच्या स्वातंत्र्याचे आंदोलन या सर्व राष्ट्रीय चळवळीत सुधामय स्वत: सहभागी झाले होते. हिंदू असूनही मुस्लिमांबरोबर खांद्याला खांदा लावून लढले. राष्ट्राविरोधी शक्तीविरुद्ध आंदोलन केले, ते या राष्ट्रावर त्यांची निष्ठा होती म्हणून. अनेक मुस्लिम माणसांशी, कलाकरांशी, कुटुंबाशी त्यांचे घरोब्याचेच संबंध होते. ‘‘ही आपल्या वाडवडिलांची जमीन आहे, हिचा कधी त्याग नाही करायचा.’’ अशी भूमिका सुधामयची होती, पण नाईलाज झाला म्हणून ज्या मालमत्तेची किंमत दहा लाख टका आली असती ती मालमत्ता व घर त्यांना भयापोटी केवळ दोन लाख टका किंमतीला विकावे लागले होते. घर सोडताना प्रत्येकालाच वेदना होणे साहजिकच होते. ‘‘या धर्मांध लोकांना चाबकानं फोडून काढलं पाहिजे. हे ढोंगी धर्ममार्तंड सगळे तोतया आहेत, धर्मांच्या नावाने भडकावणारे.’’ असा विचार सुरंजनाच्या मनात सतत येत असे. लुन्कर, कैसर, अख्तारुज्जमनसारखे मुसलमान पुरोगामी आणि अल्पसंख्याक हिंदूच्या बाजूचे होते. ते सुरंजन-सुधामयच्या कुटुंबाशी स्नेहाने वागत असत, पण हिंदूंना वाचविणे त्यांनाही शक्य झाले नाही. अनेक वर्षांची मैत्री धार्मिक तेढीमुळे भंग पावली होती.
स्वातंत्रप्राप्तीनंतर बांगलादेशाने राज्यघटनेत धर्मनिरपेक्षता मान्य केली होती. पण १९७५ नंतर त्या कलमाचे धिंडवडे निघाले होते. शाळांचे मदरसामध्ये रूपांतर झाले होते, रस्त्यांना असलेली हिंदूची नावे बदलून मुस्लिमांची नावे ठेवण्यात आली होती. देशाला आर्थिक आधर राहिला नव्हता. हा असंतोष हिंदूचा द्वेष करण्यास कारणीभूत ठरला. सुधामय-किरणयीची वयात आलेली मुलगी मायाला मुस्लीम गुंडांनी पळवून नेले होते. सुरंजनसारखा कलावंत, बुद्धिमान अभ्यासू तरुण मुसलमानांच्या छळवादाने विषप्राशन करण्याचा प्रयत्न करीत होता. जोय बांग्ला, बांग्ला जोय अशी गाणी गाणारे कुटुंब वेडेपिसे झाले होते. एक मशीद तोडल्याचा सूड म्हणून हिंदूची जुनी आणि शिल्पांची नमुने असणारी आलिशान मंदिरे नष्ट केली.
धर्म आणि देश या दोन गोष्टींमधून काय पसंत करायचे असा मूलभूत प्रश्न उपस्थित करून या कादंबरीने तत्त्वज्ञानालाच हात घातला आहे. मूलतत्त्ववादी आपल्या कुटुंबांचा छळ करतात. तरीही देशप्रेमाने, आदर्शवादाने भारावलेले हे कुटुंब जातीय सलोखा व्हावा म्हणून प्रयत्न करते. अनेक हिंदू कुटुंबे भयग्रस्त झालेली दिसत होती. भारतात निघून येण्याची त्यांनी तयारी केली होती. सुधामय कुटुंबाला देश सोडून द्यावा असे वाटत नव्हते. पण परिस्थिती विकोपाला गेली, अनेक मुलींवर अत्याचार झालेले पाहिले, अनेक रूपवान मुलींना देहविक्रय करताना पाहिले, हिंदूंची मानखंडना पाहिली आणि अखेर बांगलादेश सोडून भारतात येण्याचा निर्णय घ्यावा लागला. हा प्रकार लज्जास्पद होता. हिंदूंना आणि मुसलमानांनाही लाज आणणारा होता. या अर्थाने ‘लज्जा’ हे नाव लेखिकेने या कादंबरीला दिले आहे. धार्मिक कट्टरवाद व माणुसकी यांचा संघर्ष लेखिकेने प्रभावीपणे चितारला आहे. ह्या कादंबरीत हिंदूंची बाजू घेऊन मुसलमानांवर कठोर टीका केली आहे. त्यांची जुलमी मानसिकता चित्रित करून त्यांचा रोष पत्करला. म्हणूनच मुल्ला-मौल्लवींनी लेखिकेला ठार मारण्याचा फतवा काढला आहे. परंतु धर्मांच्या नावाखाली दुसऱ्याचा छळ करणाऱ्या, एका जातीची हत्या करणाऱ्या व जातीयवाद पसविणाऱ्या शक्तीविरुद्ध लढा पुकारण्याचा लेखिकेचा निश्चय आहे. ‘लज्जा’ ही कादंबरी ही सामुदायिक पराभवाची कथा असल्याचे लेखिकेचे मत सर्वांनाच मान्य होणार आहे.
एक धर्म दुसऱ्या धर्मांशी समांतर असतो. सर्वच धर्मसंस्थापकांनी मानवतेचा संदेश दिला आहे. एक जात दुसऱ्या जातीशी मैत्रीनेच वागली पाहिजे. कुणी कुणाचा द्वेष करू नये. एखाद्याचे नुकसान करण्यासाठी आपली शक्ती खर्ची घालू नये, असेच तत्त्वज्ञान सर्व धर्मात सांगितलेले आहे. मग धर्माच्या नावाखाली जातीच्या अभिमानाने माणसामाणसांमध्ये भिंती घालणे अमानुषपणाचे आहे हे सूत्र प्रकर्षाने या कादंबरीत स्पष्टपणे रेखाटले असल्याने सर्वांनाच विचार करायला लावले आहे. सर्वधर्मीयाचा क्रोध पत्करून धाडसाने सत्याचे दर्शन घडवून लेखिकने एक क्रांतीच केली आहे म्हणूनच ‘लज्जा’ ही क्रांतिकारक कादंबरी आहे असेच म्हणायला हवे.
-राजा जाधव