- DAINIK SAKAL (YUVA) 26-05-2001
पर्यावरणाचा वेध...
आज पर्यावरणाचा झपाट्याने ऱ्हास होत चालला आहे. याला अनेकच घटक कारणीभूत आहेत. पण सर्वाधिक कारणं आहेत विसाच्या शतकात लागलेले दोन शोध. पहिला म्हणजे पेट्रोलमध्ये मिळालेलं शिसं आणि दुसरा म्हणजे क्लोरोफ्लुरोकार्बन किंवा सीएफसी वर्गी रसायनं. हे दोन्ही शोध एकाच शास्त्रज्ञाने लावले. त्याचं नाव थॉमस एडिसन मिजली.
मिजीचा बाप थॉमस आल्वा एडिसन या महान शास्त्रज्ञाचा चाहता आणि मित्रही होता. आपल्या मुलाने त्यांच्यासारखंच नामवंत शास्त्रज्ञ व्हावं म्हणून मिजलीने आपल्या मुलाचं नाव थॉमस आल्वा ठेवलं आणि खरोखरचं धाकटा मिजली तसा झालाही.
१८८९ मध्ये जन्मलेला थॉमस आल्वा मिजली ऊर्फ मिज १९११ मध्ये डोमेस्टिक इंजिनिअरिंग कंपनीच्या संशोधन विभागात दाखल झाला. अनेक छोट्यामोठ्या शोधांमधून मिजचं नाव हळूहळू सर्वतोमुखी होत गेलं.
त्याकाळच्या मोटारी पेट्रोलच्या असमतोल ज्वलनामुळे विचित्र आवाज करीत असत. हा दोष दूर करण्यासाठी मिजने तीन वर्षे सतत संशोधन केलं. त्याने पेट्रोलमध्ये तीन हजार वेगवेगळी रसायनं मिसळून पाहिली. अखेर टेट्रॅएथिल लेड. या रसायनामुळे त्याचं काम झालं.
१९२० ते ३० या काळात अमेरिकेत फ्रीज खरेदीची लाट आली. त्या काळच्या फ्रीजमध्ये अमोनिया आणि सल्फर डाय ऑक्साईड हे वायू वापरत असत. बरेचदा हे वायू फ्रीजमधल्या अन्नात मिसळून अन्नाला अतिशय घाणेरडा वास यायचा. मिजने त्या जागी एखादा स्वस्त, बिनविषारी आणि गंधरहित वायू वावरायचं ठरवलं. त्यासाठी त्याने फ्रोरीन, क्लोरीन आणि कार्बन यांची विविध संयुगं तयार करून असंख्य प्रयोग केले. यातूनच सीएफसी, वायूची निर्मिती झाली.
त्याकाळी या दोन शोधांना मानवी औद्योगिक क्रांतीच्या इतिहासात महत्त्वाचं स्थान देण्यात आलं होतं. मिजला भरपूर प्रसिद्धी आणि अफाट संपत्ती मिळाली. आपल्या या शोधांमुळेच भावी काळात पृथ्वीच्या पर्यावरणाचा भयानक ऱ्हास होऊन संपूर्ण मानव जातीला ओझोन छिद्रासारख्या आपत्तीला सामोरे जावं लागेल. याची तेव्हा मिजला सुतराम कल्पना नव्हती.
निरंजन घाटे यांच्या ‘वेध पर्यावरणाचा’ या पुस्तकाच्या एका प्रकरणातली ही माहिती आहे. वाढत्या वैज्ञानिकतेमुळे सुखसोयी वाढतायत, पण प्रदूषणही भयंकर होतंय. निसर्गाने सजीवांच्या संरक्षणासाठी निर्माण केलेलं पर्यावरण उद्ध्वस्त होतंय आणि माणूस कर्करोगासारख्या जीवघेण्या रोगाची शिकार बनतोय.
याची जाणीव झाल्यामुळे पाश्चिमात्त्य जगात आता पर्यावरणवाद हे तत्त्वज्ञान वाढू लागलं आहे. सामान्य माणसाचाही मोठ्या प्रमाणावर या चळवळीला पाठिंबा मिळू लागला आहे. वैज्ञानिक प्रगतीचा पार एका टोकाला जाऊन पोचलेला लंबक आता हळूहळू पुन्हा मध्याकडे येतोय याची सूचक अशी ही चिन्हं आहेत.
‘वेध पर्यावरणाचा’ मध्ये लेखकाने पर्यावरणाचा विनाश आणि त्यांच्या संवर्धनाच्या मोहिमा, उपाय, त्यांचा इतिहास अशा सगळ्याच गोष्टींचा साक्षेपाने घेतलेला वेध वाचकांसमोर मांडला आहे.
- DAINIK SAMANA 08-07
पर्यावरणाच्या अभ्यासाचा डोळस मागोवा...
पर्यावरणविषयक जागृतीसाठी साऱ्या जगभर काही ना काही उपक्रम सुरू असतात. परिषदा, ग्रंथलेखन, व्याख्याने, चित्रफिती प्रदर्शन अशा अनेक माध्यमांतून पर्यावरणवादी आपली मते आग्रहाने मांडत असतात. विकासाच्या प्रक्रियेमध्ये पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून झटणारे व पर्यावरणविषयक ज्ञानाचा धंदा करणारे असे काळे-गोरे दोन्ही पर्यावरणप्रेमी आपल्या आजूबाजूला वावरत असतात. त्यामुळे पर्यावरणप्रेमी म्हटला की एखाद्याला त्यांच्याविषयी प्रेम वाटते. तर कोणाला घृणा वाटते. अशा वातावरणात निसर्ग, पर्यावरण याविषयी सातत्याने चिंतनशील लेखन करणारे निरंजन घाटे यांच्यासारखे विज्ञानवादी आशेच्या किरणाप्रमाणे भासतात.
पर्यावरण, विज्ञान संदर्भात निरंजन घाटे यांनी आतापर्यंत १०० मराठी पुस्तके लिहिली आहेत. हा एक प्रकारचा ग्रंथिक विक्रमच आहे. विज्ञानाची परिभाषा सर्वसामान्यांना समजेल अशा ओघवत्या शैलीत सांगणे हे सोपे काम नाही. निरंजन घाटे यांचे ‘वेध पर्यावरणाचा’ हे पुस्तक अशा सर्व वैशिष्ट्यांसह वाचकांच्या समोर येते.
पर्यावरणाचा अभ्यास परिस्थितीकी शास्त्रज्ञांनी अधिक डोळसपणे केलेला आहे. परिस्थितीकी तज्ज्ञ सर्व प्रकारच्या सजीवांचे परस्परसंबंध तपासून पाहत असतात. एकतर यात विविधता आणि वैचित्र्य असते. याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे हे परस्परसंबंध परिस्थितीच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरू शकतात. परिस्थितीला सध्या जीवविज्ञानाची शाखा मानण्यात येते. दोन किंवा अधिक सजीव जातींचे संबंध या सजीव जातीचे, त्यांच्या परिसरांचे संबंध, प्रदूषणाचा या सजीवांवर होणारा परिणाम, बदल अशा नानाविध विषयांचा अभ्यास परिस्थितीकी शास्त्रज्ञ करतात. माणूस हाही एक सजीव प्राणी असल्याने त्याच्या जीवनावश्यक किंवा इतर क्रियांचाही परिणाम परिस्थितीवर घडून येतो.
३ डिसेंबर, १९८४ रोजी भोपाळमधील युनियन कार्बाईड या कारखान्यातील विषारी वायुगळतीने २८०० माणसे मेली. ही अशाप्रकारची जगातील पहिलीच घटना होती. या घटनेने पर्यावरणविषयक अनेक प्रश्न निर्माण झाले. त्यांचा परामर्श घेताना ‘वेध पर्यावरणाचा’मध्ये निरंजन घाटे म्हणतात की, जेव्हा एखादी गोष्ट पर्यावरणाच्या दृष्टीने घातक ठरते तेव्हा तिच्याबदली दुसरी गोष्ट आणली जाते. ती पहिल्या गोष्टीहून अधिक घातक ठरणार नाही किंवा आपल्याच जीवावर उठणार नाही याची काळजी घ्यायला हवी. त्याचप्रमाणे विकसित राष्ट्रांमध्ये जी काळजी, ज्या सावधगिरीच्या उपाययोजना अमलात आणल्या जातात. त्या विकसनशील राष्ट्रांमध्ये, जिथे आर्थिक, सामाजिक व राजकीय परिस्थिती वेगळी असते तिथे उपयोगी पडतीलच असे नाही.
‘वेध पर्यावरणाचा’ या पुस्तकामध्ये पर्यावरणाचा ज्ञात इतिहास, वर्तमान व भविष्याचा आलेख रेखाटण्याचा प्रयत्न निरंजन घाटे यांनी केलेला आहे. पाश्चात्य पर्यावरणाची सुरुवात, परिस्थितीकी अभ्यास, मानवी परिस्थितीकी, आम्ल पर्जन्य, विषवृष्टी, ओझोनचा थर, विसाव्या शतकातील शाप ठरलेला शास्त्रज्ञ, ओझोन विवर व पाश्चात्त्य प्रसारमाध्यमे, ओझोन विवरातले राजकारण, ओझोन विवर व बदनाम ज्वालामुखी, ओझोन विवराच्या सिद्धांताचे विरोधक, सागरी पर्यावरण, विज्ञानकथा आणि पर्यावरण असे सुमारे २६ माहितीपर लेख या पुस्तकात समाविष्ट करण्यात आलेले आहेत.
पर्यावरण अभ्यास हे विज्ञानाचे अंग असल्यामुळे त्यात मांडले गेलेले सिद्धांत प्रगत संशोधनानुसार... काळाच्या ओघात बदलतच राहणार आहेत. या अर्थाने निरंजन घाटे यांनी समकालीन संदर्भ देत पर्यावरणाचा घेतलेला वेध हा ‘शिळा’ ठरू शकतो. पण कालबाह्य होणार नाही. भविष्यातही पर्यावरणाची कालची, आजची व उद्याची स्थिती असा तौलनिक अभ्यास होतच राहणार आहे मराठीमध्ये उत्तम विज्ञानपुस्तके लिहिणाऱ्यांमध्ये घाटे यांचे नाव आघाडीवर आहे. पर्यावरण विषयाचा त्यांनी या पुस्तकाद्वारे घेतलेला वेध त्यांचा हा लौकिक सार्थ ठरवितो.
-समीर परांजपे
- DAINIK TARUN BHARAT 08-12-2002
पर्यावरणाची माहिती देणारा ग्रंथ...
खूप पूर्वीपासून मानवप्राणी जंगलतोड खनिजपदार्थाचा हव्यास या पोटी पर्यावरणाला हानी पोचवत आला आहे, शेतीसाठी जंगल तोडणे, पैसा कमावण्याच्या आशेमुळे प्राण्यांची हत्या करणे यामुळे व अन्य अनेक कारणांमुळे पर्यावरणाला धक्का पोचत आहे. पर्यावरणाच्या हानीला कोणकोणते घटक कारणीभूत असतात. पर्यावरणाचे संतुलन बिघडू नये. म्हणून मानवाने कोणती खबरदारी घ्यायला हवी या विषयी पुस्तकात लेखकाने खूपच परिश्रम घेऊन सर्वसामान्यांना नसणारी माहिती दिली आहे. लेखक हे स्वत: विज्ञान लेखक असल्यामुळे अत्यंत संशोधक वृत्तीने त्यांनी हे लेखन केले आहे, हे पुस्तक वाचताना लक्षात येते. निरनिराळ्या कारखान्यातून बाहेर पडणारे विषारी वायू वातावरणात मिसळल्यामुळे होणारे दुष्परिणाम, वणव्यामुळे अथवा मुद्दाम आगी लावून नष्ट केली गेलेली जंगले, ओझोन विवर, युद्धाचे पर्यावरणावर होणारे परिणाम, आम्ल पर्जन्य, एकविसाव्या शतकातील पर्यावरण याबरोबरच विज्ञानकथा आणि पर्यावरण यावर लेखकाने प्रकाशझोत टाकला आहे. पर्यावरणाची सांगोपांग माहिती देणारा हा ग्रंथ आहे.
- MARMIK
‘मार्मिक’चे लेखक निरंजन घाटे यांना विज्ञानाचा ध्यास इतका मोठा आहे की बोलायची सोय नाही. कित्येक वर्षांपासून त्यांचे विज्ञानाच्या बाबतीत ‘शहाणे करोनि सोडावे सकळ जन’ हे वृत्त चालू आहे. विज्ञानामधले काही त्यांना वर्ज्य नाही. माहीत करून देणे नि माहीत करून देणे एवढेच त्यांना माहीत आहे. त्यांनी विज्ञानाचा अमूक अंगाने परिचय करून दिला नाही, असा दावा करणे कठीण आहे. मराठी पुस्तके खपत नाहीत. त्यातूनही विज्ञानासारख्या रुक्ष विषयाची पुस्तके खपत नाहीत. या प्रवादाला घाटे अपवाद आहेत. त्यांच्या पुस्तकांच्या ३/३, ४/४ आवृत्त्या निघतात. दोन तर नक्कीच निघतात.
१०० पुस्तके झाली तरी त्यांचा विज्ञानाचा पाठलाग चालूच आहे. ‘वेध पर्यावरणाचा’ हे त्यांचे ताजे पुस्तक त्या विषयाचा अनेक अंगोपांगांनी परिचय घडवणारे आहे. पर्यावरण हा विषय तसे पाहिले तर गेल्या तीन-चार दशकांत जास्त वाजायला-गाजायला लागला. चालू शतकाच्या पूर्वार्धात पर्यावरण या नावाचे काही ऐकू येत नव्हते. वनस्पती, प्राणी, यांच्या संहाराबाबत फुटकळ नाराजीचे उल्लेख तसे आढळतात. संत तुकारामांनी ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’ म्हटले आहे तेवढेच त्याचा संबंध अध्यात्माशी होता. तो पर्यावरणाशी लावलेला पाहिला की हसू येते.
अशा या विषयासंबंधीच्या जाणिवा निर्माण कशा झाल्या. विकसत कशा गेल्या. पर्यावरणावर वाईट परिणाम करणारे घटक कोणते, पर्यावरणाच्या खात्याला कारणीभूत कोण, अशा असंख्य विषयांचा परामर्ष या पुस्तकात घेण्यात आला आहे. त्यातला एक मासला.
विसाव्या शतकातला शाप ठरलेला शास्त्रज्ञ
विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात प्रदूषणाने हाहाकार माजवला आहे. या प्रदूषणाची जबाबदारी एका कुठल्या तरी व्यक्तीवर निश्चित करायची झाली तर ते सहज शक्य आहे. याचं कारण आजचे दोन महत्त्वाचे प्रदूषक घटक म्हणजे पेट्रोलमधील शिसे आणि ओझोनचा नाश करणारी सीएफसी वर्गीय रसायने. पेट्रोलमध्ये शिशाचं संयुग मिसळणं आणि सीएफसी या दोन्ही गोष्टींचा शोध एकाच शास्त्रज्ञानं लावला. आपल्या संशोधनाने पुढं एवढा हाहाकार उडेल अशी त्या बिचाऱ्याला कल्पनाही नसेल. या शास्त्रज्ञाचं नाव आहे थॉमस एडिसन मिजली. आज मिजलीला दोषी ठरवणं सोपं आहे. त्या काळात मात्र या दोन शोधांचं स्वागतच झालं होतं. किंबहुंना या दोन शोधांना मानवी औद्योगिक क्रांतीच्या इतिहासात महत्त्वाचं स्थान देण्यात येत होतं.
थॉमस एडिसन मिजलीचे आई-वडील नशीब काढायला म्हणून अमेरिकेत आले. ते स्वत: शोध लावून पोट भरणाऱ्या थॉमस अल्वा एडिसनला आपला आदर्श मानीत. आपल्या परसदारी नाना प्रकारचे प्रयोग करून नशीब काढायची मिजलीच्या वडिलांची इच्छा होती. थोरल्या मिजलीच्या नावावर लोखंडी धावेपासून वेगळं काढून हवा भरता येईल अशा रबरी धावेचे आणि त्यावरील आवरणाचे ब्रिटनमधले एकाधिकार होते. आज यांना आपण टायर व ट्यूब म्हणतो. त्यावेळी त्या शोधाला ‘डिटॅचेबल रिम टायर’ म्हणत. अमेरिकेत आल्यावर थोरल्या मिजलीनी आधी आपल्या दैवताचं थॉमस अल्वा एडिसनचं दर्शन घेतलं. त्या दोघांचा चांगलाच परिचय वाढला. या परिचयाच्या सन्मानार्थ मे १९८९ मध्ये जन्मलेल्या ‘मिज’चं नाव थॉमस एडिसन मिजली असं इेवलं मात्र या धाकट्या थॉमस मिजलीला सर्व परिचित ‘मिज’या उपनावानेच हाक मारीत असत.
मिजच्या जन्मानंतर काही दिवसांतच हे कुटुंब ओहायोतल्या कोलंबस नावाच्या गावी राहायला गेलं. इथंच मिज वाढला. तोही वडिलांबरोबर यांत्रिक खटपटीत प्रवीण झाला. त्याने कॉर्नेल विद्यापीठांमध्ये अभियांत्रिकी शाखेत प्रवेश घेतला. त्यावेळी नॅशनल कॅश रजिस्टर कंपनी हुशार विद्यार्थ्याना प्रायोजित करीत असे. मिजला एकट्यालाच ही शिष्यवृत्ती यावर्षी मिळाली होती. यावरून तो इतरांपेक्षा किती बुद्धिमान होता हे स्पष्ट होतं. १९०७ मध्ये नॅशनल कॅश रजिस्टरचं प्रायोजन मिळालेला मिज १९११ मध्ये कंपनीच्या शोध विभागात (आता या विभागाला आर अॅण्ड डी म्हणतात.) दाखल झाला. इथे त्याला पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आलं होतं.
थॉमस एडिसनचं नाव लावणारा मिज प्रसिद्धी तंत्रात एडिसन एवढाच पुढं गेलेला होता. वृत्तपत्र प्रतिनिधींना हव्या त्या बातम्या पुरवून स्वत:ची टिमकी कशी वाजवून घ्यावी हे त्याला चांगलंच कळत होतं. (याला आजकाल पी आर म्हणतात.) अगदी आजकालच्या प्रसिद्धी तंत्राने जे साध्य होणार नाही अशा तर्हेनं प्रसिद्धी मिळविण्यात तो पटाईत होता. एकदा पेट्रोलमध्ये वेगवेगळे पदार्थ मिसळून त्यांचे परिणाम पाहत असताना त्या मिश्रणाचा स्फोट झाला. यामुळे त्याचा चेहरा भाजलाच पण त्याच्या डोळ्यात धातूचे कण गेले. यानंतर एका नेत्रतज्ज्ञाचे त्याच्या डोळ्यात शिरलेले मोठे तुकडे काढले पण सू़क्ष्म तुकडे काढणं त्या काळातल्या उपकरणांनी जमणं शक्यच नव्हतं. ते सूक्ष्म कण डाळ्यात असेपर्यंत त्या डोळ्याचा वापर करणंही अवघड होतं. मग मिजलीनं या प्रकणात स्वत: लक्ष घालायचं ठरवलं. बरेच धातू पाऱ्याला चिकटतात आणि याचा उपयोग मिश्र धातू बनवण्यासाठी केला जातो. याची ‘मिज’ला कल्पना होती. त्याने अतिशय शुद्ध पाऱ्याचे काही थेंब आपल्या डोळ्यात टाकले. त्या पाऱ्याला चिकटून ते धातूचे सूक्ष्म कण बाहेर आले. या सर्व प्रकारात ‘मिज’ला चांगलीच प्रसिद्ध मिळाली.
पेट्रोलचं ज्वलन वठणीवर आणलं.
ही घटना मिज डोमेस्टक इंजिनिअरिंग कंपनीत (डीईसी) ऋजू झाल्यावर घडली. डीईसीचा संस्थापक थॉमस केटरिंग याने मोटारीच्या स्वयंचलियाचा (सेल्फ स्टार्टर) शोध लावून भरपूर पैसे मिळवले होते. या स्वयंचलियाचा शोध लागण्यापूर्वी गाडी लोखंडी दांड्यानं यंत्र गरगर फिरवून चालू करावी लागत असे. स्वयंचलियाचा शोध लागला तरी तत्कालीन मोटारींमध्ये एक दोष उरला होता. या गाड्या पेट्रोलच्या असमतोल ज्वलनामुळे अतिशय विचित्र आवाज करीत असत. याचा तत्कालीन विनादेी चित्रपटात फार मोठ्या प्रमाणावर वापर झाला होता आणि मोटारगाडी हा एक चेष्टेचा विषय बनला होता. जर हा दुष्पपरिणाम नाहीसा केला तर आपण कोट्याधीश बनू याची केटरिंगला खात्री पटत होती. पेट्रोलचं झटकन पेटणं आणि मग असमतोल जळणं यामुळं मोटारीचं यंत्रही लवकर खराब होत असे.
पेट्रोलचं योग्य वेळी आणि सातत्याने एकाच वेगाने ज्वलन घडवू आणण्याची किमया थॉमस एडिसन मिजलीला साध्य करता येईल याची केटरिंगला खात्री वाटत होती. मिजनं या प्रश्नावर तीन वर्षे प्रयोग केले. त्यानं पेट्रोलमध्ये ३ हजार वेगवेगळी रसायनं मिसळून बघितली. केटरिंगनं त्याला धातूची संयुगं वापरून पाहावयास सांगितलं. या प्रयोगात आणखी दोन वर्षे गेल्यावर ‘मिज’ला हवं ते रसायन मिळालं. ते म्हणजे टेट्रॅएथिल लेड. हे झटकन पेट्रोलमध्ये मिसळत होतं. त्याच्या अल्पशा मिश्रणानं पेट्रोल योग्य वेळी पेट घेत होतं. त्याचं ज्वलन एकाच वेगानं होत होतं. यामुळे इंजिनातले आवाज थांबत होते. यामुळे मोटारी कमी इंधनात जास्त अंतर कापत होत्याच; व त्यांच्या यंत्रणाही व्यवस्थित चालून जास्त वेळ टिकत होत्या.
मिजलीने एथिल हुंगलं
या रसायनात तांबडा रंग मिसळून केटरिंगनं ते एथिल या व्यापारी नावानं बाजारात आणलं. सुप्रसिद्ध रसायन निर्मितीतल्या व्यापारी संस्थेने या रसायनाच्या निर्मितीचे हक्क विकत घेतले. छोट्या छोट्या बाटल्यांमधून हे रसायन पेट्रोलपंपांवर ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात येऊ लागलं. ‘मिज’ यांना एथिलायझर्स असे म्हणत असे. या एथिलचा विक्रमी खूप होऊ लागला. एवढ्यात १९२४ मध्ये ‘वेडा वायू’ अशी त्याची हवा झाली. न्यू जर्सीमधील एथिलनिर्मितीच्या कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांना अष्टीभ्रम, वेडेवाकडे भास, खूप भीती आणि आक्रमकता यांचा त्रास होऊ लागला. हे झपाटलेले कामगार पुढे मरण पावले. हा मृत्युही अतिशय क्लेशकारक असे. अमेरिकन वृत्तपत्रांनी झपाटणारा वायू’, ‘वेडा वायू’ असे मथळे देऊन प्रचंड आरडाओरड या कारखान्याविरुद्ध केली. अमेरिकन जनमत एथिलच्या विरोधात गेलं. हे जनमत परत एथिलच्या बाजूने वळविण्यासाठी एखाद्या नाट्यपूर्ण प्रसंगाची आवश्यकता होती.
वृत्तपत्रांमधून प्रथम ही बातमी जाहीर झाली. यानंतर एका आठवड्यानंतर थॉमस मिजलीनी एक वार्ताहर परिषद घेतली. ‘आम्ही सांगूनही या कारखान्यातील कामगारांनी संरक्षक मुखवटे वापरायला नकार दिला होता.’ असं त्यांनी यावेळी जाहीर केलं. त्यांनी बाजारात उपलब्ध असलेल्या एथिलच्या साहाय्याने पत्रकारांसमोर हात आणि चेहरा धुतला. नंतर एक मिनिटभर या एथिलच्या वाफा हुंगल्या. यामुळे जनमानासातील एथिबद्दलची भीती दूर झाली. यानंतर दोन वर्षांत एक अब्ज लिटर एथिलयुक्त पेट्रोलची विक्री झाली.
फ्रिजला नवं जीवदान
याच काळात बाजारात शीतपेट्या उर्फ फ्रिज उपलब्ध होऊ लागले होते. १९२० ते ३०च्या दरम्यान अमेरिकेत फ्रिज खरेदीची लाट आली होती. फ्रिज आणणं हा एक प्रतिष्ठेचा प्रश्न बनला होता. त्या काळात फ्रिजमध्ये अमोनिया आणि सल्फर-डाय-ऑक्साईड हे वायू वापरण्यात येत असतं. हे बरेचदा फ्रिजमधल्या अन्नात मिसळून अन्नास अतिशय वाईट वास यायचा आणि ते अन्न फेकून द्यावं लागत असे.’ रेफ्रिजरेटर बनवणाऱ्या फिजिडेअर या कंपनीनं केटरिंगला विनंती करून हा प्रश्न सोडवण्यासाठी मिजला उसना घेतला. फ्रिजच्या यंत्रणेतून थोड्या प्रमाणात वायू फ्रिजमध्ये निसटणार, हे मान्य करूनही एखादा स्वस्त, बिनविषारी आणि शक्यतो वासरहित वायू शोधून काढायची कामगिरी मिजवर सोपविण्यात आली.
मिजला फ्लोरिन वायूची संयुगं वापरायची अटकळ सुचली. त्यानं फ्लोरिन, क्लोरिन आणि कार्बन यांची विविध संयुगं तयार केली. गिनीपिग आणि नंतर काही स्वयंसेवक यांना ही वायूरूप संयुगं हुंगायला दिली. त्यापैकी कुणालाही इजा झाली नाही हे वायू ज्यांना आज सीएफसी म्हटलं जातं त्या कुटुंबातले हे वायू वापरुन त्याने फ्रिज बनवून बघितले. त्या काळात चाचण्या प्रमाणित करण्यात आलेल्या नव्हत्या. शिवाय हे वायू विषारीही नव्हते आणि निष्क्रिय वाटत होते. त्यामुळे हे वायू शीतीकरणासाठी मोठ्या प्रमाणात वापरण्यात येऊ लागले.
एप्रिल १९३० मध्ये अटलांटा इथं भरलेल्या अमेरिकन केमिकल सोसायटीच्या वार्षिक परिषदेत मिजनं सीएफसीचा शोध अत्यंत नाट्यमयरीत्या जाहीर केला. त्यानं एका ग्लासात द्रव सीएफसी ओतलं. त्या द्रवाच्या वाफा हुंगल्या आणि मग उच्छ्वास टाकताना तोंडासमोर काडी पेटवली. अमोनिया आणि सफर-डाय-ऑक्साईड यांनी घेतलेल्या बळींप्रमाणे आता माणांचे बळी फ्रिज घेऊ शकणार नाहीत, याचं कारण हा नवा पदार्थ, असं त्याने जाहीर केलं. सीएफसी तेव्हा संपूर्ण जीवसृष्टीसच घातक ठरू शकतील याची त्याला कल्पना असणं शक्यच नव्हतं. सीएफसी वापरणाऱ्या रेफ्रिजरेटनी मग जुन्या फ्रिजना नामशेष केलं. १९३०च्या अखेरीस अमेरिकन बाजारात सीएफसी वापरणारे फ्रिजच उपलब्ध होते. फ्रिजिडेर, जनरल मोटर्स आणि द्युपाँ या तीन प्रमुख व्यापारी संस्था एकत्र येऊन आता या नव्या वायूची ‘फ्रिऑन’या नावानं विक्री करू लागल्या. या वायूमुळे द्युपाँची आर्थिक घडी स्थिरावली आणि पुढे ती बहुराष्ट्रीय राक्षसी कंपनी बनली.
सीएफसी एवढे लोकप्रिय व्हायचे कारण म्हणजे त्यांची निर्मिती अगदी स्वस्तात होत होती. फ्रिजबरोबर वातानुकूलन यंत्रणा आणि सौंदर्यप्रसाधनांच्या फवाऱ्यात हे वायू उपयुक्त ठरले होते. याच काळात कीटकनाशक म्हणून डीडीटी पुढं आलं. डीडीटीचा फवारा पिकावर फवारण्यासाठी सीएफसींचा वापर प्लास्टिक फेसाळनिर्मितीत (फोम) आणि इलेक्ट्रॉनिक भाग साफ करण्यासाठी होतो हे लक्षात येताच त्याचं महत्त्व आणखीनचं वाढलं. ‘मानवी कल्याणार्थ रसायनशास्त्र’ (केमिस्ट्री फॉर बेटरमेंट ऑफ मॅनकार्इंड) ही घोषणा जागोजाग द्युपाँ आणि इतर रसायन निर्माते वापरू लागले.
या संशोधनानं थॉमस एडिसन मिजली प्रचंड श्रीमंत बनला. तो आता ओहायोतल्या कोलंबस या त्याच्या गावी एका प्रचंड प्रासादात राहू लागला. त्याच्या या प्रासादाभोवतालच्या बागेस जगातली ‘सर्वांत सुंदर बाग’ असं वाखाणण्यात येऊ लागलं. त्यानं या प्रासादाच्या मागच्या टेकडीत एक बोगदा खणला. तिथून तो या टेकडीच्या मागच्या दरीत जात असे. या दरीत सर्वत्र मेणबत्त्यांच्या आकाराचे विजेचे दिवे लावलेले होते. बॅटमॅनच्या ‘अॅटकेव्ह’ची कल्पना मिजच्या या दरीवरूनच उचलण्यात आली असावी असं म्हणतात.
मिज् आपल्या शास्त्रीय कल्पनांच्या प्रसारार्थ युरोप व अमेरिकेत दौरे काढत असे. मद्यपान करता करता तो पृथ्वीचं वातावरण कसं बदलता येईल यावर जे विचार आपल्या मित्रांना ऐकवत असे तेच विचार थोडे अधिक आकर्षक करून व्याख्यानातून तो विज्ञानाच्या साहाय्याने स्वर्गतुल्य पृथ्वीचं चित्र श्रोत्यांपुढे उभे करण्यासाठी वापरत असे.
दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीस १९४० मध्ये मिजला पोलिओ झाला. ४५ वर्षानंतर संशोधन सोडून शास्त्रज्ञांनी व्यवस्थापनात भाग घ्यावा. हे त्याचे विचार तो चाकाच्या खुर्चीतून लोकांना ऐकवू लागला. अंथरुणातून चाकाच्या खुर्चीत ठेवणारं आणि तिथून परत अंथरुणावर नेणारं एक यंत्र मिजनं तयार केलं. या यंत्राच्या साहाय्यानं नोव्हेंबर १९४४ मध्ये थॉमस एडिसन मिजलीने आत्महत्या केली. ‘तो मानवजातीच्या सुखासाठी झटला’ असे शब्द त्याच्या कबरीवर कोरण्यात आले. पण आज मृत्यूनंतर ५० वर्षांनी त्याच्या शोधांनी मानव जातीवर केवढं संकट आणलंय ते त्याच्या शोधांना बंदी घालण्यासाठी जे आंतरराष्ट्रीय कायदे आणि करार केले जात आहेत त्यावरून लक्षात येतं आणि थॉमस एडिसन मिजलीचं वर्णन जगाला थाप ठरलेला शास्त्रज्ञ, असं करावं लागतं.
- MARATHI VIDNYAN PARISHAD 21-09-2002
प्रसिद्ध विज्ञान लेखक निरंजन घाटे यांनी पुस्तकांचे शतक पूर्ण केले ही नक्कीच अभिनंदनीय बाब आहे. शतक पूर्ण करताना सचिन तेंडुलकरने एक लाजवाब फटका मारावा आणि सगळे प्रेक्षक खूष व्हावेत, तसे निरंजन घाटे यांच्या ह्या शंभराव्या पुस्तकासाठी पर्यावरण हा विषय निवडल्याबद्दल म्हणावेसे वाटते. पर्यावरणवादी आणि पर्यावरणविरोधी दोन्ही बाजू माझेच खरे असे ठामपणे विविध माध्यमांद्वारा मांडत असताना सर्वसामान्य माणूस बुचकळ्यात पडतो. कोणता गट बरोबर? कोणता चूक? याबद्दल त्याच्या मनात संभ्रम पडतो. त्याने पुढे काय करायला हवे? आत्ताच्या त्याच्या वागण्यात कुठे बदल करायला हवा? अशा परिस्थितीत योग्य निर्णय घ्यायला उपयुक्त ठरेल असे पुस्तक म्हणून ‘वेध पर्यावरणाचा’ या पुस्तकांचा उल्लेख करायला हवा.
पर्यावरणवादाची सुरुवात कधी व कुठे झाली, आपल्या भोवतालची परिस्थिती, औद्योगिकीकरण व तंत्रज्ञानातील प्रगती, त्याचे सभोवतालच्या परिस्थितीवर परिणाम अशा वेगवेगळ्या मुद्द्यावर प्रथम या पुस्तकात माहिती दिली आहे. त्यानंतर आम्लपर्जन्य, विषुवृष्टी, ओझोनचा थर, ओझोन विवर, त्याबाबत झालेले उलट-सुलट युक्तिवाद, ज्वालामुखीची बदनामी, हरितगृह परिणाम, सागरी पर्यावरण, वाळवंटातील पर्यावरण, युद्ध आणि त्यामुळे होणारे पर्यावरणाचे नुकसान असा विविध बाजूंनी पर्यावरणाचा सर्वंकष आढावा लेखकाने या पुस्तकाद्वारे एकत्रितरित्या मांडला आहे. पर्यावरणीय संकटाला माणसाची हाव कशी कारणीभूत आहे. माणसाच्या निसर्गातील ढवळाढवळीमुळे त्याचे दुष्परिणाम आपल्या कसे भोगावे लागत आहे, नामशेष होणारे प्राणी पुन्हा वाढवणे हे किती कठीण आहे. याची विस्तृत माहिती या पुस्तक माध्यमातून आपल्यापुढे आली आहे. ह्या सर्वांमध्ये विकसितं देश, त्या देशातील उद्योग-उद्योगपती यांनी पर्यावरणाचे किती नुकसान केले आहे हे आपल्याला समजते. विकसित देशात बंदी घातलेल्या वस्तू, तंत्रज्ञान विकसनशील देशात विकत आहेत. डी. डी. टी. हे कीटकनाशक त्याचे उत्तम उदाहरण म्हणता येईल. पर्यावरणाच्या सर्व पैलूंवर विवेचन करताना लेखकाने त्यामागची वैज्ञानिक माहिती तपशीलाने समजावून दिली आहे. विसाव्या शतकातील प्रदूषणाने जो हाहाकार माजवला आहे त्याला जबाबदार असणारे दोन मुख्य प्रदूषणकारी घटक म्हणजे पेट्रोलमधील शिसे आणि ओझोन विवराला जबाबदार असणारी सी.एफ.सी. वर्गीय रसायने. ह्या दोन्हीचा शोध लावणारा शास्त्रज्ञ थॉमस एडीसन मिजली एका शास्त्रज्ञाच्या शोधाचे योगदान कसे विनाशकारी ठरले हे आपल्याला समजते ते या पुस्तकामुळे त्याच बरोबर एकविसाव्या शतकातील पर्यावरण कसे असावे? गैयावाद हा पर्यावरणाचा नवा विचार काय आहे येथपर्यंत अद्ययावत माहिती देणारे हे पुस्तक सर्वांनी वाचायलाच हवे.
- MAHARASHTRA TIMES 29-09-2002
पर्यावरण-प्रश्नाचा रोचक वेध...
वेध पर्यावरणाचा’ हे प्रसिद्ध विज्ञान कथा-कादंबरी लेखक श्री. निरंजन घाटे यांचे पर्यावरणाच्या संदर्भातील पुस्तक. लेखकाने पर्यावरणाचा विचार करताना या पुस्तकात सजी व निसर्ग यांना मध्यबिंदू मानून पर्यावरणातील अन्य घटकांची सुरेख गुंफण केली आहे. शेवटी निसर्ग म्हणजे तरी काय?
पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांनी युक्त आणि आधुनिक जमान्यात बोलायचे तर प्रदूषणमुक्त (आज तो प्रदूषणमुक्त नाही) आविष्कार म्हणजे निसर्ग! लेखकाचे लिखाण या मुख्य सूत्रापासून कुठेही कधीही सुटलेले नाही. हे या पुस्तकाच्या यशाचे गमक आहे.
या पुस्तकात एकूण २६ प्रकरणे असून, सुरुवातीच्या काही प्रकरणांमध्ये परिस्थितीचे अभ्यासपूर्ण विवेचन करताना पर्यावरणातील भौतिक घटकांचा सजीवांवर परिणाम होत असून, जैविक किंवा भौतिक घटकांमधील एखाद्या गोष्टीत थोडा जरी बदल झाला तरी त्याचा पर्यावरणावर निश्चितच परिणाम (इफेक्ट) होतो हे सोप्या उदाहरणांतून लेखकाने दाखवले आहे. त्या नंतरच्या प्रकरणांत औद्योगिकीकरण व तद्अनुषंगाने येणाऱ्या ओझोन थर, त्यास पडलेले छिद्र आणि ओझोनच्या इतर प्रकरणांमधून शास्त्रीयदृष्ट्या याचे अतिशय मार्मिक विवरण व विवेचन केलं आहे. शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार सन २०३०पर्यंत पृथ्वीचं तापमान तीन अंश सेंटीग्रेडने वाढण्याची शक्यता आहे. शास्त्रीय भाषेतील ‘ग्रीन हाऊस इफेक्ट’ या विषयावरचे स्पष्टीकरण लेखकाने केले आहे. प्रदूषण रोखता आले नाही. त्याचे कोणते गंभीर दुष्पपरिणाम जगाला भोगावे लागतील याचे रोखठोक कथन वरील काही प्रकरणांत केलेले आहे. शेवटच्या काही प्रकरणांमध्ये लेखकाने मानवाला २१व्या शतकात ज्या अनेक संकटांना तोंड द्यावे लागणार आहे. त्यापैकी पर्यावरणावर होणाऱ्या विपरीत गोष्टींची जाणीव करून दिली आहे.
१) पर्यावरण ही संकल्पना शास्त्रीयदृष्ट्या बहुव्यापक, सर्वसमावेशक व त्यामुळे काहीशी क्लिष्ट होते. लेखकाने मात्र ही सोप्या व ओघवत्या भाषेत मांडल्यामुंळे ही संकल्पना रोचक आकर्षक झाली आहे. २) पर्यावरण हे काळाप्रमाणे आणि ठिकाणानुसार बदलत जाते. याचा वेध घेताना लेखकाने ही जाणी सतत जपली आहे. लेखकाने पुष्टीसाठी दिलेली सजीव प्राणी व वनस्पतींची उदाहरणेही चपखल आहेत. ३) या पुस्तकासाठी वापरलेल्या संदर्भ ग्रंथांची नावे पाहता व अन्य संशोधन पत्रिकांची नावे पाहता लेखकाने संदर्भ निवडताना खूप कष्ट घेतले आहेत व पुस्तकाला अधिकाधिक न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. ४) पुस्तक वाचल्यानंतर असे लक्षात येते की, पर्यावरण-व्यवस्थापन ही काळाची गरज असून, त्याचे नियोजन आपण काळजीपूर्वक करणे अतिशय आवश्यक आहे. नैसर्गिक साधन संपत्तीचे संवर्धन हा आजच्या पर्यावरण-व्यवस्थापनेचा आणि नियोजनाचा प्रमुख उद्देश राहील. असेच लेखकाला सुचवायचे आहे हे स्पष्टपणे दिसून येते. या पुस्तकांत योग्य ठिकाणी काही चित्रे आहेत. मात्र ती रंगीत असती तर व त्यांची संख्या जरा जास्त असती तर अधिक बरे झाले असते.
- DAINIK KESRI 08-07
पर्यावरणाचा सांगोपांग वेध...
पहा सर्वाचाच काळजीचा विषय बनला आहे. प्रामुख्याने मानवी उद्योगांपासून पर्यावरणाचे जे नुकसान होते, त्याने तर कोणीही चिंताक्रांत होईल. पण तरीही पर्यावरणाची जपणूक जशी व्हायला हवी, तशी होतेच असे नाही. त्याबरोबरच हेही खरे, की याबाबतीत होणाऱ्या प्रबोधनामुळे, निदान पर्यावरणाच्या हानीने येणाऱ्या संकटाची जाणी तरी वाढत चालली आहे. मुळातच पर्यावरण हा विषय महत्त्वाचा व व्यापक आहे. या विषयाची सांगोपांग चर्चा करणारे पुस्तक आघाडीचे विज्ञानविषयक लेखक निरंजन घाटे यांनी लिहिले आहे, ते ‘वेध पर्यावरणाचा’ या नावाचे.
निरंजन घाटे सातत्याने विज्ञानविषयक लेखन करीत असतात. विज्ञानातील अद्ययावत माहितीचा शोध घेऊन ते ज्ञान सामान्य माणसापर्यंत अगदी सोप्या भाषेत व सहजशैलीत पोहोचविण्याचा प्रयत्न ते करत असतात. त्यांचे असंख्य लेख व पुस्तके, त्यांच्याया प्रयत्नांची साक्ष देतील. ‘वेध पर्यावरणाचा’ हे त्यांचे शंभरावे पुस्तक आहे, हे येथे आवर्जून नमूद केले पाहिजे.
निसर्ग संरक्षणास भारतात जेवढी मोठी परंपरा आहे, तेवढी ठेवून ज्यांनी निसर्गाला वेठीस धरले, त्यांच्याकडून पर्यावरणाच्या जपणुकीची अपेक्षाहि चुकीची ठरली असती, पण हळूहळू मानवी आर्थिक लोभच एवढा अमर्यादित झाला, की औद्योगिकीकरणानंतर पर्यावरणानाश ही गंभीर बाब बनली. पर्यावरणवाद हा या समस्येच्या गांभीर्याच्या जाणिवेतून जन्माला आला. अशा पाश्चात्त्य पर्यावरणवादाचा वेध घाटे यांनी विस्तृतपणे घेतला आहे. पर्यावरण व सजीवांचा परस्परसंबंध म्हणजे परिस्थिकी (इकॉलॉजी). परिस्थितीकी म्हणजे नेमके काय, हा प्रश्न कोणालाही पडेल. याविषयीही घाटे यांनी विस्तृत विवेचन विविध उदाहरणे, घटना देत केले आहे.
प्रदूषणानेही मोठी समस्या निर्माण केली आहे. हे प्रदूषण निसर्गातील घडामोडींमुळे होते, की मानवी उद्योग त्यास कारणीभूत. यावर तज्ज्ञांचे, अभ्यासकांचे एकमत नव्हते व नाही. विशेषत: ओझोनचा थर हा पृथ्वीचे संरक्षण करतो. त्या थरात विवर निर्माण झाल्याचे जेव्हा निष्पत्तीस आले तेव्हा त्यावर बराच वादंग माजला. हे विवर मानवी उद्योगांमुळे नाही, अशी बाजू मांडणारेही पुढे सरसावले व यास काही रासायनिक उद्योगच कारणीभूत, अशांनीही ठाम मते मांडली. ओझोनविषयीच्या या साऱ्या बाजूंचा वेध घाटे यांनी सात सलग प्रकरणांतून घेतला आहे.
सागर किनाऱ्यावरील पर्यावरण, विषुववृत्तीय पर्जन्यारण्ये, वाळवंटी पर्यावरण याचेही विवेचन घाटे यांनी केले आहे. त्याबरोबरच, ‘युद्ध आणि पर्यावरण’ हे अगदी वेगळ्या पैलूंचा विचार करणारे प्रकरणही आहे. युद्धामुळे पर्यावरणावर कधी विपरीत, तर कधी अनुकूल परिणाम कसा होतो, याची अनेक उदाहरणे यात सापडतील. व्हिएतनाममधील युद्धाने पर्यावरणाची अपरिमित हानी झाली. एवढे प्रचंड नुकसान होऊनही व्हिएतनामी जनतेने स्वप्रयत्नांनी पर्यावरण जपणुकीत यश मिळविले. (पृष्ठ १८४) हे वास्तव आदर्शवतच आहे. दोन कोरियांमधील ‘नो मॅन्स लँड’मुळे सारस पक्ष्यांना ती जागा आपलीशी वाटली व त्या भागात ते अंडी घालू लागले. (पृष्ठ १८२) हे वाचून पक्ष्यांच्या ‘हुशारी’चे कौतुकच वाटेल.
‘विज्ञानकथा आणि पर्यावरण’ ‘बंदिवासातील प्राण्यांचे पुनवर्सन’, लव्हलॉक व गार्गलीरा यांनी मांडलेला पर्यावरणाविषयीचा ‘गैयावादा’चा सिद्धान्त, पर्यावरणवादाची उद्गाती राचेल कार्सन, अशा विविध विषयांचा अंतर्भाव प्रस्तुत पुस्तकात आढळेल या सर्व पुस्तकांचा बोध व सारांश, ‘माणसाची हाव आणि पर्यावरणावर घाव’ नि ‘एकविसाव्या शतकात माणसानं नीट वागायला हवं. मुख्य म्हणजे लोकसंख्येवर कडक नियंत्रण ठेवायला हवं. हळूहळू लोकसंख्या स्थिर करून पुढं ही संख्या कमी करायला हवी. प्रदूषण कमी होईल यासाठी प्रयत्न करायला हवेत, अशा विविध अपेक्षा व्यक्त केल्या आहेत.
पर्यावरणासारख्या विस्तृत व महत्त्वाच्या विषयावर अत्यंत सांगोपांग विचार करणारे पुस्तक घाटे यांनी लिहिले आहे. पर्यावरण म्हणजे केवळ पर्यावरणाची जपणूक’ नसून त्याच्याशी अर्थकारण, राजकारण कसे निगडित आहे, हेही वाचकांना व्यक्त होणारा विषय किती बहुअंगी असू शकतो, याची जाणीव या पुस्तकातून होते. पुस्तकाचे मुख्यपृष्ठ वैधक आहे.
- NEWSPAPER REVIEW
पर्यावरणविषयक ज्ञानभांडार…
गेल्या अनेक वर्षापासून निरंजन घाटे हे झपाटल्यागत विज्ञान विषयावर सातत्याने व व्रतस्थपणे लिहित आहेत. तसे त्यांनी क्रिकेटपासून प्रायोगिक नाटकांपर्यंत (‘देवापेक्षा सुखी’, ‘एक दिशाहीन संध्याकाळ’) आणि ‘ऑलिम्पिक स्पर्धा व लिंगचाचण्या’पासून ‘सेक्सायन’ पर्यंत नानाविध विज्ञानोतर विषयांवरही लेखन केले आहे. फिनिक्स, रामचे आगमन, मच्छर, कालयंत्राची करामत, आक्रमण, साक्षात्कार यासारख्या त्यांच्या विज्ञान कादंबऱ्याही प्रकाशित व लोकप्रिय झाल्या आहेत. तथापि भूशास्त्र हा त्यांच्या जिव्हाळ्याचा, ध्यासाचा व अभ्यासाचा खास विषय असल्याने या विषयाच्या विविध अंगोपांगांची, तत्संबंधित शाखोपशाखांची शास्त्रीय माहिती सुबोधपणे ते आपल्या पुस्तकातून देत असतात. भूशास्त्रीय नियतकालिकातून त्यांचे अनेक संशोधनपर लेख प्रसिद्ध झाले असून ‘विज्ञानयुग’ व ‘सृष्टिज्ञान’ या नियतकालिकांच्या लेखन संपादनातही त्यांचा सहभाग असे. ‘वेध पर्यावरणाचा’ हे त्यांचे शंभरावे पुस्तक ! त्यांच्या लेखनाव्याप्तीची, व्यासंगाची व झपाटलेपणाचीही कल्पना यावरून येऊ शकते.
पर्यावरणरक्षक हा सध्याच्या युगाचा परवलीचा शब्द, परंतु पर्यावरणाबद्दल सर्वसामान्यांची कितीशी नेमकी व शास्त्रीय माहिती असते ? निरंजन घाटे यांच्याच ‘वसुंधरा’ या पुस्तकाबद्दल त्यांचे कौतुक करताना पु. ल. देशपांडे कुतूहलदेखील आपल्या मनात नसतं. याविषयीची गोडी लागावी म्हणून तुमचे प्रयत्न महत्त्वाचे. पर्यावरणाविषयीही आज तीच स्थिती आहे. सर्वसामान्यांना एकूण माहिती आहे, पण पुरेशी नाही अशी विज्ञानविषयक शास्त्रीय माहिती सोप्या भाषेत देण्याचा वसाच जणू घाटे यांनी घेतला आहे.
पाश्चात्य पर्यावरणवादाची सुरुवात कधी व कशी झाली याचं विवेचन मनोरंजक व वाचकांनी उत्सुकता वाढविणारं आहे. तसंच सजीव सृष्टी आणि भोवतालची नैर्सिगक परिस्थिती यांच्या अन्योन्य प्रक्रियांचं शास्त्र म्हणजे परिस्थितीकी (इकॉलॉजी) या गहन शास्त्राचाही परिचय सामान्यांनाही समजेल अशा भाषेत घाटे यांनी करून दिला असून या बाबतीतील सर्वसामान्यांच्या उत्तरदायित्वाची जाणीवही करून दिली आहे. प्रदूषणाच्या संदर्भात पाश्चात्य देशातील पर्यावरणवादी चळवळींची माहितीही या पुस्तकातून वाचायला मिळल्यामुळे त्या तुलनेत आपल्या भारतीयांना अजून किती पल्ला गाठायचा आहे हे लक्षात येते.
लेखक म्हणतो, ‘‘पाश्चात्त्य देशांमधून पेट्रोलमध्ये शिश्याची संयुगे मिसळणे जवळजवळ पूर्णपणे बंद झाले आहे. अॅस्बेस्टॉसवर प्रचंड निर्बंध घालण्यात आले आहेत. अणुभट्ट्यांवरील नियंत्रणे प्रचंड प्रमाणात वाढवण्यात आली असून रासायनिक खतांच्या वापराचे प्रमाण खूप कमी करण्यात आले आहे. एवढेच नव्हे, तर अशा तर्हेची खते व कीटकनाशके निर्माणच करण्यात येऊ नयेत या दृष्टीने आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न चालू आहेत. नैर्सिगक ठेवे जपून ठेवण्याची कृती वाढीस लागली आहे. पशू, पक्षी, निसर्ग हा तिकडे राष्ट्रीय ठेवा मानला जातो. तो जतन करण्यासाठी पद्धतशीर प्रयत्न केले जातात...’
पर्यावरणाच्या दृष्टीने मानवी व्यवसायाचे, औद्योगिकरणाचे दुष्परिणाम हे लगेच दृष्टोपत्तीस येत नाहीत. काही वेळा तर ते अपघातानेच उघडकीस येत असतात आणि हे परिणाम अपघात परिणामांसारखं केवळ स्थानिक पातळीवर नुकसान करणारे नसतात, तर संपूर्ण मानवजातीच्या दृष्टीने ते हानिकारक ठरू शकतात. यामध्ये आम्ल पर्जन्य, ओझोन विवर यासारख्या परिणामांचा समावेश असणाऱ्या गोष्टी येतात. आपणास याबद्दल अगदी जुजबी माहिती असते, परंतु या ग्रंथात याविषयी तपशिलवार, अभ्यासपूर्ण शास्त्रीय माहिती वाचावयास मिळते. घाटे यांच्या १९९० साली प्रकाशित झालेल्या ‘पर्यावरण प्रदूषण’ या पुस्तकात धोकादायक अॅल्युमिनियम, आम्ल पर्जन्य, ओझोनचा थर याबद्दलची माहिती आहे, परंतु प्रस्तुत ‘वेध पर्यावरणाचा’ या ग्रंथातील माहिती अधिक विस्तृत व अद्ययावत आहे. ओझोन विवरासंबंधीच्या संशोधनाचा समग्र इतिहासच लेखकाने इथे उद्धृत केला असून त्याविषयी पाश्चात्य प्रसारमाध्यमे कसा अवाजवी रस घेत हेही निदर्शनास आणून त्यांच्या सुप्त हितसंबंधांवरही प्रकाश टाकला आहे.
संपूर्ण पृथ्वीभोवती काही अंतरावर असणारा ओझोन वायूचा थर म्हणजे पृथ्वीचं संरक्षक कवच असून मानवी चुकांमुळे होणाऱ्या प्रदूषणापायी या थरास विवरे पडल्यास त्यातून थेट येणाऱ्या अतिनील किरणांमुळे त्वचेचा कर्करोग होण्याचा धोका आहे. ओझोनचा थर हे अतिनील किरण व अन्य अपायकारक गोष्टी रोखून धरतो याकडे शास्त्रशुद्ध माहितीच्या आधारे लक्ष वेधण्यात आले आहे. गंमतीची गोष्ट अशी की अतिनील किरणामुळे होणारा त्वचेचा कर्करोगाचा धोका फक्त गौरवर्णियांपुरता मर्यादित असतो. जे मुळात काळे असतात त्यांच्या त्वचेत भरपूर मेलॅनिन असतं अशी मनोरजंक माहिती इथे वाचायला मिळते.
पर्यावरणासंबंधी आपली सर्वसामान्यांची समज किती अपुरी असते याची कल्पना या ग्रंथांवरूनच येऊ शकते. कारण अन्य कितीतरी गोष्टींचा अंतर्भाव पर्यावरणात होत असतो. उदा. हरितगृह परिणाम, विषुववृत्तीय पर्जन्यारण्ये, सागरकिनाऱ्यावरील पर्यावरण, वाळवंटी पर्यावरण अशा सर्वच गोष्टींचा परिचय करून देऊन निरंजन घाटे यांनी समग्र पर्यावरणाचं स्वरूप आणि व्याप्ती यांचा अभ्यासपूर्ण वेध घेतला आहे. त्याचप्रमाणे ‘माणसाची हाव आणि पर्यावरणावर घाव’, ‘युद्ध आणि पर्यावरण’, ‘विज्ञान कथा आणि पर्यावरण’, ‘बंदिवासातील प्राण्यांचे पुनर्वसन’ अशा प्रकरणांतून पर्यावरणावर अनिष्ट परिणाम करणाऱ्या घटकांचाही योग्य समाचार घेतला आहे.
पर्यावरणाचा एक नवा विचार मांडणाऱ्या ‘गैया’ वादाचा परिचय त्यांनी करून दिला असून, ‘एकविसाव्या शतकातील पर्यावरण’ मधून भविष्यकाळातील पर्यावरणावरही तर्कशुद्ध दृष्टिक्षेप टाकला आहे. घाटे यांचे ‘एकविसावे शतक’ नावाचे एक स्वतंत्र पुस्तकही आहे. एकविसाव्या शतकातील पर्यावरणामध्ये त्यांनी दिलेला एक मजेशीर व उद्बोधक माहिती अशी की, मध्य मॅसॅच्युसेटस्मधल्या कोबिन जलाशयातील पाणी इतकं आम्लयुक्त बनलं की पाणी वाहून नेणारे नळ नि इतर साधने त्यात हळुहळू विरघळू लागली. एकूण पृथ्वीवर ज्याकाळी कुठलाही संजीव अस्तित्वात नव्हता इतके मागे जाऊन तिथून आजपर्यंतचे वातावरण व पर्यावरण कसकसे बदलत गेले आणि आपल्या चुका आपण सुधारल्या नाहीत, तर पुढील काळातील पर्यावरण कसे असेल याचा संपूर्ण आढावा या ग्रंथात घेण्यात आला आहे.
मानवाने स्वार्थी व्यापारीवृत्तीपायी केलेल्या चुकांमुळे पर्यावरणाची कोणकोणत्या प्रकारची कदापि भरून न येणारी हानी होत गेली याचे दाखले पुस्तकातून आढळतात. मानवाच्या कल्याणासाठी पर्यावरण असल्याने लेखक विचारतो, ‘‘पर्यावरणाच्या बाबतीत औद्योगिक क्रांतीनंतर अशा अनेक चुका घडल्या आहेत. १८५० च्या सुमारास गिरण्यांच्या धुरामुळे मँचेस्टर इथल्या आणि कारखान्यांच्या धुरामुळे लंडन इथल्या इमारती काळवंडल्याच, पण संगमरवराचे पुतळेही रासायनिक धुपण्यामुळे खराब झाले. त्याचमुळे कोळसा जाळून होणारा धूर हा माणसाबरोबर इमारतींनाही धोका पोहोचवतो हे लक्षात आलं होतं. त्या काळात लंडनमध्ये श्रीमंतापासून गरिबांपर्यंत दर तिसरा माणूस, फुप्फुसाच्या विकारानं आजारी होता. यापासून मानव जातीनं कोणता धडा शिकायचा प्रयत्न केला ?...’’
पर्यावरणाची अलिप्तपणे, निर्विकारपणे माहिती पुरवायची एवढाच केवळ लेखकाचा मर्यादित हेतू नसून, फाजील लोभ, हलगर्जीपणा, पर्यावरणाविषयक ज्ञानाचा अभाव यामुळे होणारे वाढते प्रदूषण, नैर्सिगक साधनसंपत्तीचा अपरिवर्तनीय ऱ्हास यापायी होणाऱ्या नुकसानीची कल्पना देणे, पुढील गंभीर धोक्याची सूचना देऊन माणसाला सजग करणे आणि पर्यावरण हे मूलत: मानवी कल्याणासाठी असून, त्याचं जतन व संरक्षण करण्याची जबाबदारी आपली आहे हे माणसाला पटवून देण्याचा स्तुत्य असा विधायक दृष्टिकोन त्यामागे आहे. म्हणूनच पृथ्वीवरील हवा, पाणी, बर्फ, उष्णता आदींच्या उलथपालथीची शास्त्रीय मीमांसा करून लेखकाने इशारा दिला आहे. ‘‘...त्यामुळे इतके दिवस बर्फ असलेलं पाणी वाहू लागलं. सागराची पातळी वाढते. अशी पातळी वाढली तर बांगलादेश, मालदीव, पॅसिफिकमधील अनेक बेटं, युरोपच्या उत्तरेकडचे बरेच देश यांचं फार मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल. जगातील सर्व महत्त्वाची शहरं सागरकाठी आहेत. त्यांचे बरेच मोठे भाग पाण्याखाली जातील. लाटांच्या मारामुळे किनाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर धूप होईल. एकविसाव्या शतकात हे घडायचं नसेल, तर माणसानं नीट वागायला हवं; मुख्य म्हणजे लोकसंख्येवर कडक नियंत्रण ठेवायला हवं. हळुहळू लोकसंख्या स्थिर करून पुढं ही संख्या कमी करायला हवी. प्रदूषण कमी होईल यासाठी प्रयत्न करायला हवेत...’’
‘सायलेंट स्प्रिंग’ हे विसाव्या शतकातलं एक महत्त्वाचं पुस्तक मानलं जातं. त्याची लेखिका व पर्यावरणवादाची उद्गाती राचेल कार्सन हिचा हृद्य परिचय अखेरच्या प्रकरणात लेखकाने कृतज्ञ भावनेने करून दिला आहे.
हा ग्रंथ लिहिताना संदर्भासाठी १४ इंग्रजी ग्रंथ व ४ इंग्रजी नियतकालिके लेखकाला धुंडाळावी लागली आहेत. लेखकाचा व्यासंग व अभ्यासू वृत्ती याची साक्ष यावरून पटते. या विषयावरील प्रभुत्वामुळे व नि:संदिग्ध, स्पष्ट विचारांमुळे हा क्लिष्ट व गुंतागुंतीचा विषय सुगम करून लिहिणे लेखकाला शक्य झाले आहे.
विज्ञानातील अद्ययावत माहितीचा शोध घेऊन पर्यावरणविषयक हे ज्ञानभांडार मराठीत आणून विज्ञानविषयक मराठी साहित्यात निरंजन घाटे यांनी मोलाची भर घातली आहे. सर्वसामान्यांच्या मनात पर्यावरणाविषयक प्रबोधन व जागृती निर्माण करून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचं लेखकाचं योगदान अत्यंत मोलाचं व अभिनंदनीय आहे.