- Gaurav Pawar
ऍडम मी नुकतंच वाचला , फार सुरेख आहे . सुरुवातीला एखाद्या किशोरवयीन मुलाच्या नुसत्या कल्पकतेचा किंवा आंबट शौक वाटणारे पण नंतर नंतर नायकाच्या वयानुसार गंभीर होत जाणार किंवा आयुष्याचं वास्तव अस काही दाखवते की काय सांगू.
रत्नाकर मतकरीयांची मी बऱ्याच गूढकथा वाचल्या त्यामुळे वाचकाला जे अपेक्षित असेल त्याच्या अगदी विपरीत अस काही लिहितात याचीच मला फार आवड आहे.
या पुस्तकाने कळत नकळत मला self-pity बद्दलची जान करून दिली, तसेच बऱ्याच गोष्टींची जान करून दिली. हे पुस्तक खरंच वाचण्याजोेग आहे. आशा आहे आपणाला ही हे आवडेल..
- Aalesh Shende
मतकरींची `अडम` वाचली... अत्यंत उत्तम अशी कादंबरी आपण याआधी कशी वाचली नाही.. अस साहजिकच वाटल.
या कादंबरीला अश्लील म्हटले जाते, पण जे काही लिहलय ते वास्तव आहे... वरदा अन त्याचं जीवन... वासना... शरीर... मन...
इतके अप्रतिम लिहिले गेलेय कि काय सांगावे ....
"ज्या क्षणी पुरुषाला त्याच्या शरीराचा धिक्कार कारणांनी स्री भेटते त्या क्षणी त्याच नियमित भूक मागणारे शरीर अन मोहवश होऊ नकोस अस म्हणणारे मन यांच्यात संघर्ष सुरु होतो"
"स्मशानातसुद्धा मैत्रीच एखाद ठिकाण हवे ना?"
असे पानोपानी भेटणारी वाक्य... पुस्तकाला दूर करू देत नाही...
पण शेवटी श्यामीचे काय झालं? असे काही प्रश्न राहतात ते राहतातच...
- Atharva Sangita Rajendra Khamkar
पुस्तकाचे नाव : अॅडम
लेखक : रत्नाकर मतकरी
आजवर मानवी जीवनातल्या पैलूंचा वर बरीच पुस्तकं लिहिली गेली. पण लैंगिकतेविषयी भाष्य करणारी पुस्तकं कमीच ! अॅडम त्यापैकीच एक . रत्नाकर मतकरी यांच्या दमदार लेखणीतून सत्यात आलेलं हे एक धाडस...
या कादंबरीचे नाव बायबल मधील एक दंतकथेवरुन देण्यात आलं आहे. अॅडम , जो की परमेश्वराने निर्माण केलेला पहिला पुरुष होता त्याने देवाच्या बागेतील फळं खाल्लं आणि तो , मानवजात आणि भूमी शापित झाली अशी ती दंतकथा.. परमेश्वराने बजावून सुद्धा त्याच्या पत्नीच्या सांगण्यावरून त्याने ते फळ खाल्ले आणि जीवनात दुःख घेऊन आला अशी काहीशी ती दंतकथा.. या नावाचा वापर का केला हे तुम्हाला ही कादंबरी वाचल्यावर कळेलच..
ही कादंबरी म्हणजे प्रत्येक पुरुषाची कहाणी आहे. न कळत्या वयात लैंगिकतेविषयी , स्त्रिदेहाविषयी असणारी ओढ , त्या प्रश्नांची योग्य उत्तर न मिळाल्याने झालेली घुसमट , पुढे आयुष्यात बघाव्या लागणाऱ्या स्त्रीस्वाभवाच्या छटा हे सारं काही या कादंबरीमध्ये व्यवस्थित विस्तृत केलं आहे..
आपल्या समाजात नेहमीच पुरुषांना कामातूर , लंपट आणि संभोगाला आसुसलेले मानल जात आणि स्त्रियांना विनय आणि शिलाची मूर्ती. पण वास्तवात हे १०० टक्के खरे असेलच असं नाही. आपल्याकडे मुलगा आणि मुलीच्या जडणघडणीमध्ये फरक असतो आणि तोच फरक पुढे पर्यंत कॅरी केला जातो. त्यामुळे कदाचित पुरुष जातीची ही प्रतिभा सगळ्यांना खरी वाटते. पण जर खरंच पुरुषाला स्वतः कडे पाहण्याचा आरसा हवा असेल तर ही कादंबरी योग्य ठरेल.
ही गोष्ट जरी एका नायकाची असली तर त्याच्या आयुष्यात आलेल्या सगळ्या स्त्रिया या कादंबरीत त्यांचं अस्तित्व अधोरेखित करून जातात. त्याच्या आईपासून ते त्याच्या प्रेयसी आणि पत्नी पर्यंत असणाऱ्या त्या नात्यांना लेखकांनी वास्तवतेचे भिंगातून मांडले आहे .
एका पेक्षा जास्त स्त्रियांशी संबंध आला की पुरुषाला चैनी , विलासी किंवा स्त्रीलंपट आहे असा शिक्का मारला जातो प्रत्यक्षात मात्र असे अनेक ` नॉर्मल ` पुरुष आपल्याच आजूबाजूला असतात. आपणच खोट्या सभ्यतेचा मुखवटा पांघरूण मानवी मनाच्या झेपेला चारित्र्यहीन ठरवून मोकळे होतो..
या कादंबरीवर अश्लीलतेचा उघड आविष्कार वगैरे म्हणत टीका झाली आहे. लोकांना सत्य रुचत नाही म्हणतात ना ते खरंच आहे.
खरंच प्रत्येक वेळी स्त्रीवादी लोक पुरुषी मानसिकतेवर आवाज उठवत असतात . किमान पुरुषाची मानसिकता काय असते हे समजून घ्यायचे असेल तर नक्की एकदा तरी ही कादंबरी वाचा 🙏🏻
© अथर्व संगीता राजेंद्र खामकर
- Nana Maske
नुकतेच निधन पावलेले ,,रत्नाकर मतकरी,,यांची,हि कादंबरी आताच वाचून झाल्यावर वाचताना 2दिवस जेवणाची पण आठवण रहात नव्हती ,जबरदस्त विदारक जीवनाच चित्र,,शरीर समाधानापेक्षा मनाचं समाधान किती श्रेष्ठ ठरतं ,वाचल्यावर एक जबरदस्त अनुभव आल्याशिवाय राहत नाही,मिळाली तर जरूर वाचा.
- Annasaheb Barde Patil
कालच वाचून झालं...!
पुस्तक सुरुवातीला थोडं अश्लील वाटलं पण नंतर वाचत गेल्यावर काही गोष्टी खूप समजल्या आणि आवडल्या. यामध्ये कोंदटलेली पुरुषी मानसिकता दाखवली आहे.
पुरुषी मानसिकता आणि त्याबद्दलची न समजावून घेता बनवलेली विकृत धारणा अश्या बऱ्याच गोष्टींचा जबरदस्त उलगडा लेखकांनी केलेला आहे
एकंदरीत यामध्ये काही मर्यादेनंतर पुरुषाने काही गोष्टी का आणि कशा प्रकारे सोडून द्यायला हव्यात की जेणेकरून नंतर स्वतः उध्वस्त होण्यापासून तुम्ही स्वतः लाच रोखू शकता हे सांगण्याचा यामध्ये खूप मोठ्या आशेने लेखकाने प्रयत्न केला आहे.
- Sachin Kumbhar
वैवाहिक जीवनात पुरुष शरीरसुख जबरजस्तीने मिळवत असेल तर त्याला बलात्कार ठरवणारे आपण हीच गोष्ट त्याला मिळत नसेल तर वेश्यागमन हा सहज पर्यंत सुचवणारे आपण जेव्हा वरदा हा पर्यंत निवडतो तेव्हा त्याच शरीर त्याला साथ देत नाही हे निव्वळ झिणझिण्या आणणारं ...... तमिळ मधील सुभाषिताने सुरवात झालेली हि कादंबरी पुरुषाला व्यथा असतात हे दृढ करणारी ..... कादंबरीचा नायक वरदा याच्या आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यावर अनेक स्त्रिया येऊनही स्त्रीलंपट वाटत नाही तो त्यामुळेच .... स्त्रीदेहाविषयी चे लहानपणापासूनचे आकर्षण पुढे दहावीत असताना आपल्याच मोलकरणीसोबत होणारी पूर्ती ..... कळत नकळत असमाधानी स्त्रियांकडून वापरले जाणे ..... कॉजेल मध्ये प्रेमात पडल्यावर आधी नकार पचवून मग स्वार्थासाठी लग्न करणारी श्यामला ..... तिच्याकडून मात्र लग्नाच्या पहिल्या रात्रीच अपमानास्पद वागणूक जिच्या वर प्रेम करूनही जिंकू न शकल्याची भावना ..... त्या नंतर उध्वस्त नायक एक्झिक्युटिव्ह पर्यत उच्च पडला पोहोचूनही आपल्या साहेबाची सोय करून निर्विकार राहणार ...... आपल्या पहिल्या प्रियकरासोबत पळून जाऊन नायकाचं जीवन उध्वस्त करणारी श्यामला ..... एका पोलीस इन्स्पेक्टर ने मुलासहित सोडून दिलेली बायको प्रेमा जिला कसलाही विचार न करता दिलेला थारा नवरा मेल्यानंतर तिच्या मुलांच्या शिक्षणाची जबादारी घेतली पुढे त्याच प्रेमाने घरात वाटा मागताच सर्व सोडून जाणारा नायक .... आपल्याच ऑफिस मधील सहकाऱ्यांकडून काही काळासाठी मिळालेलं प्रेम अखेर तिलाही दुरावणं .....हा सारा प्रेम आणी काम यांचा प्रवास केलेला नायक ....
खिळून ठेवण्याचं काम मतकरींनी केलंय .... शारीरिक संबंधाची पुष्कळ वर्णनं येऊनसुद्धा कुठेही अश्लिल न वाटता पुरुषाच्या गरजांवर बोट ठेवणारी तसेच कोणत्याही वाईट मार्गाने न जाता तसाच जगात रहाणं सुचवणारी सोबतच जगण्याचा संघर्ष करणारी कथा जिवंत भासते ..... आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर पुरुषांसाठी सोय आहे आहे असं म्हणून स्त्रियांकडे झुकणारा समाज मग बेगडी वाटू लागतो आणी सुरु होतो नायकासोबत आपलासुद्धा नैतिकतेसोबत झगडा ....
- Santosh Rangapure
अॅडम.... एक अस्वस्थ करणारा विलक्षण अनुभव.... स्त्री पुरुष संबंधां बद्दल इतक्या बेधडकपणे लिहिलेलं हे पुस्तक वाचताना खरंतर आतून हादरायला होतं. आजपर्यंत स्त्री च्या दुःखावर, तिच्यावर होणाऱ्या अत्याचारांवर अनेक पुस्तकं लिहिली आणि वाचली गेली परंतु पुरूषांच्या दृष्टीकोनातून त्यांची व्यथा समजून लिहिले गेलेले पुरूषांना समर्पित केलेलं माझ्या वाचनात आलेलं कदाचित हे पहिलंच पुस्तक....
अॅडम अत्यंत बोल्ड आहे कदापि बर्याच जणांना ते अश्लील सुद्धा वाटेल परंतु विषयाचा गाभा आणि आशय समजून घेतल्यास या गोष्टी गौण वाटतील आणि अॅडम एक वेगळीच अनुभूती देऊन जाईल. अॅडम चा नायक वरदराज याचा जीवनप्रवास प्रत्येक पुरुषाला थोड्याफार प्रमाणात आपलासा वाटेल, लहानपणी स्त्री देहा विषयीचे कुतुहल, ते नीटसे न भागलया मुळे घडणार्या चूका, नंतर खरेखुरे प्रेमात पडणे परंतु पत्नी श्यामला हिने केलेला अनन्वित छळ आणि स्वतःच्या सोयीसाठी त्याचा वापर करून त्याचे जीवन उद्ध्वस्त करणे, नंतर प्रेमा जिला वरद विना अट तिच्या मुलांसह आधार देतो तिचे पुढे जाऊन घरामधे वाटा मागणे आणि ज्या निर्मले कडून अल्पकाळ निस्सीम प्रेम मिळाले तिचे दुरावणे सर्व काही मनाला चटका लावुन जाते.
खरंच जगाच्या या रहाटी मध्ये पुरुषाला ही एक संवेदनशील आणि तरल मन असते ज्यात प्रेम, समर्पण, त्याग या सर्व भावना असतात कदाचित समाज आणि लेखनकार हे विसरून प्रत्येक वेळी त्यालाच खलनायक बनवत आहे असे मला वाटते. स्त्रियांवर होणार्या अन्याया -अत्याचारांचे चित्रण हा सखोल साहित्याचा केंद्रबिंदू समजला जातो, पण पुरुष वर्गावर देखील इतक्या प्रमाणात नसला तरी अन्याय होतोच मग त्याचे कोणा साहित्यकाराकडून चित्रण होते का? नेमका हाच धागा पकडून मतकरींनी लिहिलेली समस्त पुरुष वर्गाला समर्पित केलेली अॅडम हि कादंबरी अक्षरशः मनाला भावते. आयुष्यभर प्रामाणिक कष्ट करून वरदाला ना व्यावसायिक यश मिळते ना कौटुंबिक सुख, एका परीने जीवन जगण्यासाठी पुरुषाला कराव्या लागणाऱ्या धडपडीवर आणि कराव्या लागणाऱ्या अगणित तडजोडींवर..... एकूण मानवी जगण्यातल्या दुःखावरच ही कादंबरी भाष्य करते.
लिखाणाच्या ओघात काही ठिकाणी कादंबरी खूप लांबली आहे तसेच बरीच अनावश्यक पात्र घुसवली गेली आहेत असे वाचताना नक्कीच जाणवते आणि कादंबरी मधील पात्रांवर आणि घटनांवर वाचकांचे आक्षेप किंवा मतभेद ही असू शकतील परंतु कादंबरीचा आशय लक्षात घेता पुरुषांच्या वेदनेवर फुंकर घालणारी अॅडम नक्कीच वाचनीय....
- Prathamesh Zore
प्रथम काहीशा काम दृष्टीने लिहलेले हे पुस्तक पुढे मात्र आयुष्याचा खूप मोठा धडा शिकवते. ज्यांनी हे पुस्तक वाचले आहे त्यांना नक्कीच कळेल ह्या पुस्तकाच्या विषयाची गरज ह्या आताच्या जगात तर खूपच आहे.
रत्नाकर मतकरी ❤️❤️🙏
- Dipak Bhutekar
अॅडम! "ज्याच्या ढुंगणावर तीळ आहे तो पुरुष आयुष्यात अनेक खुर्च्यांवर बसतो आणि ज्याच्या लिंगावर तीळ आहे तो अनेक स्त्रियांचा उपभोग घेऊ शकतो" या तामिळ म्हणीने कादंबरीची सुरुवात होते व या म्हणीनेच शेवट होतो. `वरदाच्या आयुष्यात नोकरीच्या रूपाने अनेक खुर्च्या येतात तसेच अनेक स्त्रिया देखील येतात` मात्र हे आता वाटतंय तितकं गमतीशीर मुळीच नाही. याउलट ते अतिशय दाहक आणि त्रासदायक आहे. स्त्री पुरुषांमधील आकर्षण म्हणजे नक्की काय? हे लहानपणी कुतुहलाने शोधणाऱ्या वरदाला आयुष्याचे पैलू हळुवार उलगडत जातात. त्याच्या आयुष्यात अनेक स्त्रिया येतात खऱ्या; पण स्वार्थापायी कुणी त्याला शरीर सुखासाठी वापरून सोडतात तर कुणी पैशांसाठी. कुणी लुबाडून निघून जाते, तर कुणी फसवून पळून जाते. वरदा पुन्हा पुन्हा आपलं आयुष्य शून्यातून उभं करण्याचा प्रयत्न करतो, कधी प्रेमाच्या बाबतीत तर कधी पोटापुरत्या पैशांसाठी... त्याचाच हा प्रवास म्हणजे रत्नाकर मतकरी लिखित अॅडम!
शेवटी वरदाला एक कळतं, स्त्री पुरुष म्हणजे एकमेकांना सुख देण्यासाठी निसर्गाने घडवलेले दोन जीव, त्यांनी हे शरीर आहे तोवर एकमेकांना आयुष्यभर सुख द्यावं. पण प्रत्यक्षात होतं मात्र या उलटच! हे जीव एकमेकांना सुख देण्याऐवजी देतात काय तर दुःख, अवहेलना, त्रास आणि अपमान!
एकदातरी हे पुस्तक वाचायलाच हवं... ❤️
- Mahesh Hande
अॅडम वाचून मनामध्ये जे विषण्णतेचे ढग निर्माण झालेत ते शब्दबद्ध करणे खरोखरच अवघड आहे.अनेकांनी कादंबरीवर मारलेला अश्लीलतेचा शिक्का मला तेवढा ठळक जाणवला नाही.प्रसंगानुरूप काही वर्णने काहींना नक्कीच बोल्ड वाटू शकतील,पण त्यात कुठेही बीभत्सता नाही.मी kindle वर नॉनस्टॉप वाचलेली ही पहिलीच कादंबरी. अतिशय गुंतनवून ठेवून पुढे काय याचा थोडाही अंदाज आपल्याला येत नाही म्हणूनच अतिशय उत्कंठावर्धक अशी कादंबरी.जास्त काही न लिहता मी हे वाचताना जे काही वेचल ते आपल्यासमोर आहे तसेच देत आहे.मी वेचलेलं वाचून मात्र तुम्हीलाही पुस्तक वाचायचा मोह आवरणे कठीण होईल एवढं मात्र नक्की....
स्वत:च्या मनातल्या इच्छा पुरूषांनी ओळखाव्यात, त्या पुऱ्या कराव्यात आणि वर त्याविषयीची सगळी नैतिक जबाबदारी, प्रसंगी दोषही पुरूषांनीच घ्यावा, ही स्त्रियांची अपेक्षा मला पुढल्या आयुष्यात अनेकदा अनुभवावी लागली.
मन स्वार्थी असतं. हावरट असतं. शरीर गरज असली तरच मागतं. पण मन सांगेल, त्या शरीराला उपाशी ठेव आणि माझे चोचले पुरव! ते सांगेलच.... पण ऐकायचं नाही, नेव्हर स्टार्व्ह युवर बॉडी! शेवटी बॉडीच माणसाच्या उपयोगाची म्हातारपणापर्यंत.
पण सचोटी सोडली, की भ्रष्टाचाराच्या पैशाबरोबर इतरही दुर्गुण येतात.
जी जीवनाचं दर्शन घडवीत नाही आणि जीवनाला उपयोगी पडत नाही, ती कला कुचकामी आहे;
ती कलावंत आहे ना - कलावंत असेच असतात! जी ती गोष्ट मनाला लावून घेणारे! त्या उत्कटतेमुळंच तर त्यांच्या हातून कलानिर्मिती होते.
आयुष्याच्या मागणीचा आपण केलेला अंदाज, त्याप्रमाणे केलेली तयारी आणि प्रत्यक्षात आयुष्यानं केलेली मागणी यांच्यात किती तफावत असते!
अध:पाताचं बीज नकळत येऊन पडत नाही. ते बीज पडल्याचं आपल्याला कळतं; पण तो अध:पात आहे, हे ओळखायला आपण जाणूनबुजून नकार देतो.
प्रेमात असलेली माणसं जशी सूक्ष्म जिव्हाळ्यानं एकमेकांशी स्मित करतात, कितीही पाहिलं तरी समाधान न झाल्यासारखी संधी मिळेल तेव्हा एकमेकांकडे पाहत राहतात, एकमेकांच्या शरीरावरचा आपला हक्क एखाद्या निसटत्या स्पर्शानंही सिद्ध करतात, जातायेता एकमेकांचा आधार घेतात आणि एक अगदी खाजगी गुपित जगाला कळू न देता एकमेकांतच वाटून घेतात;
एकतर्फी प्रेम हे प्रेम नसून ज्यात रोगीनष्ट होण्याखेरीज दुसरा इलाजच नाही, असा एक लाचारीचा रोग आह
या उलट श्यामलेच्या दृष्टीनं ती माझा बलात्कार सहन करणारी एक दुर्दैवी असहाय भारतीय स्त्री होती आणि मी तिच्या इच्छेविरूद्ध तिचा उपभोग घेणारा असंस्कृत नरपशू- टिपिकल भारतीय नवरा होतो. कुठल्याही स्त्रीचा तिच्या इच्छेविरूद्ध उपभोग घेतला जाणं वाईटच; मग तिच्या अनिच्छेची कारणं कुठलीही असोत. पण त्याच वेळी पुरूषाला त्याच्या इच्छेविरूद्ध उपभोगाशिवाय उपाशी राहावं लागणं, त्यावाचून तडफडावं लागणं हा तरी कुठला न्याय? ज्या सुखावर त्याचा अधिकार आहे, त्या सुखासाठी त्याला बलात्कार करावा लागणं, हाही त्याच्यावर अन्यायच नाही का?
सगळ्या सामान्य गोष्टी एकत्र मिळणं हेच असामान्य आहे.
मूल ही रतिक्रीडेतल्या समाधानाची पुढची पायरी!
ज्या क्षणी पुरूषाला त्याच्या शरीराचा धिक्कार करणारी स्त्री भेटते, त्याच क्षणी त्याचं नियमित भूक लागणारं शरीर आणि मोहवश होऊ नकोस असं बजावणारं मन यांच्यात संघर्ष सुरू होतो.
सांगा ना! दारू पिऊन पुरूष नपुंसक होतात? नाही लिडिया, मी हसून म्हणालो – कधीकधी दारूपेक्षा परिस्थितीच माणसाला अधिक नपुंसक बनवते.
माणूस दोन कारणांनी पितो. एक, खूप कंपनी आहे म्हणून, त्या सगळ्यांच्या आग्रहाखातर. दोन, अजिबात कंपनी नाही म्हणून! भकास एकटेपणा भरून काढण्यासाठी!
जो नवराबायकोंना नुसत्या बिछान्यात सापडत नाही. पण हा आनंद मिळवायला एकमेकांविषयी जी ओढ लागते, ती मात्र बिछान्यात तयार होते. मधुचंद्राच्या रात्री त्यासाठी असतात वासुगी, आयुष्यातल्या संध्या सुखद व्हाव्यात म्हणून!
घर आपल्या कल्पनेत मोठं असतं. प्रत्यक्ष फुटांच्या हिशेबातली जागा कधीच तेवढी मोठी नसते.
जखम झाल्याझाल्या बधिरतेमुळं वेदना होत नाहीत, पण नंतर ती हळूहळू ठणकू लागते;
पलंगाच्या लांबीरूंदीवर आणि गादीच्या मऊपणावर शय्येवरचं समाधान अवलंबून असतं, तर फर्निचर कंपन्यांनी संसारसुख दुकानातच विकायला ठेवलं नसतं का?....
संपूर्ण अवतरणे वाचण्यासाठी आपण माझ्या ब्लॉग ला visit करू शकता,ब्लॉग ची लिंक खाली देत आहे.
- Abhishek Arun Arondekar
Aaj `ADAM` Kadambari Vachun Purna Zaali.
ADAM che First Edition : December 1991 Saali Aale, Aani Ashlilteche Lanchan Je Ekhadya Purushala Sahaj Chitakavle Jaate Tase Hya Kadambari la hee Laavle Gele.....Ekhaada Katt Karun Bahishkrut Kele Gele....
``Kutthlahi Vishay Mulaat Waait Nastoch,
Haatalneetla Apramaneekpana matra Kalakrutila Hinnkass Banavto``..- Matkari
😆😆😆Virodhaabhaas Asa ki Kadambarila Mahatva yeil Mhanun `Pratikul Abhipraay` Lihine hee Band Zaale....😆😆😆
Adamcha Nayak `VARAD`acha Jeevanpravas Thodyaphaar Pharkaane Baryach Purushancha Asto Tasach aahe....
Stree Dehavishayi Kutuhal...
Te Neatse na Bhaagne...
Asamadhani Striyankadun Vaparle Jaane...
Kharekhure Premaat Padne...
Prem Nastanahi Soyisathi Lagn Karne aani Kalantaraane Jeene Uddhvast Hone...
Aani Kshanik Kaalasathi Milalelya Premala Durawane Haa VARADchya premacha Aalekh...
Matkari Adamchya Madhyamatun Aplya manaat, Mendut Anek Bhaavnik Andolann Nirmaan Kartat..
Varadaach Jagan Aapan swataha mhanun Anubhavayla Bhaag Paadtat...
Niti,Tatv,Dharm,Nyay Hya Saarkhya Anek Goshtinncha Baheervakri Aarasa Aplayala Dakhavtaat, aani Hya goshti aapan kiti Soyipramane Phulavun Thevlya aahet hyacha Vichar Karayla Bhaag Paadtat...
Madd, Matsar, Mohh aani Maya Hyanni Jeevan kass Yukt aahe aani Mukt Nahi hyacha Adarshpaatth Mandataat...
Veer, Raudra, Bhayanak, Adbhut, Bibhatsa, Karunn, Hasya, Shant aani Shrungaar He NavRass Ekaachveli Phakt Pouraanik Aani Aeitihaasik Kadambari madhun ch Sapadtat Asa Ajibaat nahi, aani ADAM hyach Uttam Udaaharann aahe...Hya Kadambari madhe He NavRass OatProat Bharle aahet, Sudnya Vachakanna Te Nakkich Jaanvatil...
Me Matkarinchi Anek Pustak Adhaashasarkhi Vaachli aahet, ADAM gele 1.5varsh Saad Ghaalat Hote pan Vel Jamun yet navta aani Qurantine Days aale, 3 Divsanpurvi Suru kelel Vachan aaj Purna Zaal Tari VARAD baddal che prashna kaayam pingaa Ghalaat rahtil, Neesanshay...
Hyacha Sequel yava ase manapasun watate...aso Tyabaddal Shri.Matkari siranshi Bolench ... kadachit nakar ch milel pan Adam Visarli nahi geli aani me tee konalahi Visaru denaar Nahi hyacha Samadhaan me Nakkich Tyanchyaparyant pohochatt Karen...
Khup Khup Aabhar Shri. Ratnakar Matkari.
Nakki Vacha, `ADAM`
- Shrinivas Ranjanikar
एका पुरुषा ची चित्तरकथा,वरद नावाचं पात्र ,त्याच्या आयुष्यात ची आदळआपट वाचाच एकदा.....
- Shrinivas Ranjanikar
एका पुरुषा ची चित्तरकथा,वरद नावाचं पात्र ,त्याच्या आयुष्यात ची आदळआपट वाचाच एकदा.....
- DAINIK TARUN BHARAT 10-02-2019
रत्नाकर मतकरी शोध घेत आहेत. माणसांमधील आदिम प्रवृत्तीचा! ‘अॅड्म आणि इव्ह’ यांच्या न संपणाऱ्या गोष्टींचा. काळानुसार कथानकात बदल होत असला तरी प्रवृत्ती तीच आहे. स्त्रीचा नेमका कोणता गुण पुरुषांना आकर्षित करतो, ज्यासाठी ते शरणागती पत्करतात?... स्त्रीच्या देहाचं आकर्षण, तिच्या विषयी वाटणारी वैषयीक भावना, तिच्यामधले कला गुण की तिची बुद्धिमत्ता?
आपल्या ‘अॅड्म’ या कादंबरीत मराठीतील नामांकित साहित्यिक रत्नाकर मतकरी यांनी या नाजूक विषयावर कुठेही बीभत्स न होता भाष्य केले आहे.
‘अॅड्म’ या कादंबरीचा नायक वरदाचा हा जीवनप्रवास!
निव्वळ लैंगिक भावनांचा विचार केला, तर सुरुवातीचा प्रवास तरी बहुसंख्य पुरुषांचा सारखाच असतो. मुख्य म्हणजे लहानपणी स्त्री देहाविषयी वाटणारं कुतूहल काहीच्या बाबतीत मात्र पौंगंडावस्थेतच असमाधानी स्त्रीकडून वापरलं जाणं नशीबात असता. वरदाच्या बाबतीत नेमकं हेच घडलं. उमलत्या वयात त्याला उफाड्याच्या नवनीतमचे आकर्षण वाटते. ही ओढ अतिशय नैसर्गिक आहे. नवीनतम तिशीची आहे. तिचे लग्न झालेले आहे. तिचा नवरा म्हातारा आहे. ती वरदाकडे घरकामाला असून कामक्रीडेत प्रवीण आहे. ती वरदाला प्रतिसाद देते आणि या खेळाचे शिक्षण देखील. वरदा तिला लग्न करशील का असे विचारतो तेव्हा ती उत्तर देते. ‘कामवालीशी कोणी लग्न करतात का?’ एकुणच अतृप्त स्त्रीच्या कामुकतेचे आणि ती पुरी करण्याकरता साधलेल्या संधीचे वास्तव चित्रण अॅड्म या कादंबरीत रत्नाकर मतकरींनी केले आहे.
एका वेगळ्या आणि महत्त्वाच्या विषयावरील ही कादंबरी मराठी साहित्य विश्वात एक नवा प्रवाह निर्माण करते आहे, हे निश्चित!
– डी. व्ही. कुलकर्णी
- Praful Naik
ऍडम हे पुस्तक जरा हटके आहे, नक्की वाचा.
- Prasad Shetye
Mast aahe
- Pradeep Phadke
जरा शृंगारिक आहे
- Kiran Borkar
अतिशय स्फोटक कादंबरी.मतकरीनी वेगळ्याच विषयाला हाथ घालून ही कादंबरी लिहिली आहे .
- Vinamra Bhabal
मतकरींचं गुढ कथालेखन वाचल्यावर पहिलीच कादंबरी वाचली ती अॅडम. त्यांच्या अजून दोन कादंबऱ्या माहितीहेत. त्याही वाचेन लवकरचं.
अॅडमची प्रस्तावना वाचली आणि मग मात्र कादंबरी वाचल्याशिवाय रहावलं नाही. वाचताना सुरवातीला वाटलं की नायकाचं सेक्सलाईफ प्रकर्षानं मांडणारी कादंबरी आहे की काय. पण फक्त तेवढचं न मांडता नायकाच्या आयुष्याची नोकरी(करिअर) आणि त्यासोबतची घुसमटही खुप प्रकर्षाने मांडलीये.
कादंबरी वाचताना काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या. पहिलं म्हणजे सतत ही कादंबरी अनुवादीत आहे की काय अस वाटतं राहिलं. कारण कानडी संस्कृती इतक्या ताकदीने संबंध कादंबरीत उतरलीये की असं वाटण मला साहजिक वाटतय.
दुसरं अगदी शेवटा शेवटाकडे येता येता अस वाटायला लागलं की खुप गोष्टींचा नायकाच्या आयुष्यातला तोचतोचपणा खुप जास्त जाणवतोय. त्यामुळे थोडसं कंटाळवाण होतय. पण शेवट वाचल्यावर पटलं की ते गरजेचं होतं. पण त्या शेवटल्या भागाकडे ते वाटलं एवढं नक्की
ही कादंबरी सुरवातीपासून तुम्हाला गुंतवून आणि अडकवून ठेवते. कुठेही अश्लिल वाटत नाही. खुप प्रामाणिक वाटते. नायकाचं आयुष्य, त्याचं एकूण यश-अपयश सगळ मनाला भिडतं आणि तितकचं आपण त्या प्रवासाचा भाग होत जातो.
एकदा वाचायला हरकत नाही.