Darshana Chaphekar
कला आणि कलाकार यामधील अनाकलनीय नात्याचा परखड शोध... डॉ. एस.एल.भैरप्पा यांच्या प्रतिभासंपन्न नजरेतून !
Priyanka Deshpande#मंद्र
-एस. एल. भैरप्पा.
मी वाचलेलं एस. एल. यांचं पहिलं पुस्तक. खरं तर लायब्ररी मधून एस. एल. याचं असल्यामुळे, translated आणि मेहता पब्लिकेशन हे वाचून आणल. पहिली 2 3 पानं आणि मलपृष्ठ वाचलं की विषय काय आहे हे लगेच समजते.
कलाकार म्हटल की त्याचा स्वच्छंदी स्वभाव आलाच. नैतिकतेच्या चौकटीतून बाहेर पडल्यावरच कलाकार त्या कलेतील सर्वोत्कृष्ट होऊ शकतो का? आणि हे सगळं मर्जीने की मनाविरुद्ध? की एक गोष्ट मिळवताना काहीतरी देऊन ती मिळवली पाहिजे हा शुद्ध व्यवहार?
एक गायक जो गुरूला दिलेला शब्द पाळत फक्त देवालयात स्वर साधना करतो. त्याचा शिष्य जो त्याच्या वेळचा सर्वोत्कृष्ट गायक बनतो पण नैतिकतेची चौकट सोडून वागतो. आणि एक शिष्या जीला स्वरज्ञानासाठी आपल सर्वस्व द्यावं लागत पण अंतिम टप्प्यावर गुरूकडून डावलली जाऊन स्वतः स्वरसाधना करून सर्वोत्कृष्ट होते. पुस्तकाचा विषय एकाच वर्तुळात असला तरीही नंतर काय होणार ही उत्सुकता आणि मधू या शिष्येच नंतर काय झालं हे कळण्यासाठी ही कादंबरी वाचली च पाहिजे.
एकूणच कलाकार आणि त्याच जीवन हेच या कादंबरी मध्ये आहे.
Jaideep Shindeमंद्र - एका मनस्वी गायकाची कहाणी
ऐस एल भैरपा हे कन्नड साहित्यातील अत्यन्त अग्रगण्य नाव, या सिद्धहस्त लेखकाचं हे पुस्तक. शास्त्रीय संगीत शिकण्यासाठी एक मुलगा घराबाहेर पडतो , अनेक मान अपमान पचवून अनेक गुरूंच्या पायाशी डोकं ठेवतो पण खरा सांगीतिक गुरू मिळायला अनेक वर्षे जातात , पण राजेसाहेबांच्या रूपाने शेवटी त्या मुलाला म्हणजेच मोहनलालला शास्त्रीय संगीतातला मोठा गुरू मिळतो आणि त्याची गायकी बदलते , कुठल्याही घराण्याला बांधील अशी त्याची गायकी राहत नाही आणि सगळ्यातल चांगलं घेणारा हा गायक भारतातला सगळ्यात मोठा गायक होऊन जातो , पण राजे साहेबांच्याकडे शिक्षण घेत असताना त्याला कामभावना छळायला लागते आणि त्यातून त्याच्या आयुष्यात पहिली स्त्री येते ती म्हणजे चून्नी , आणि तिथून तपुढे त्याच्या आयुष्यात येणाऱ्या स्त्रिया म्हणजे मधू, मनोहारी, रामकुमारी, चंपा आणि मग ही कथा फक्त मोहनलाल ची राहत नाही तर हि या स्त्री पात्रांचीही हऊन जाते, मोहनलाल वर नाही त्याच्या कलेला समर्पण करणाऱ्या या स्त्रिया , त्यांचं भाव विश्व भैरप्पानी फारच सुक्ष्म पद्धतींनी उलगुडून दाखवलं आहे . नात्यामध्ये होणारी फसगत त्यातून येणारं दुःख ,होणारे वाद अनेकदा त्यातून होणारं कलेचं सर्जन ,त्यातून मिळणारी अनुभूती आपल्या कमालीच्या शैलीने भैरप्पानी मांडली आहे . कलाकाराचं वयक्तिक आयुष्य खूप मोठ्या विवंचना , राग , मोह, द्वेष यांनी भरलेलं असतं ,कदाचित ते चांगला मनूष्य या चौकटीत बसत नसेल पण म्हणून त्याची कला दुय्यम दर्जाची ठरत नाही.
मानवी मनाचा खूप सूक्ष्म विचार मांडला गेला आहे. भैरप्पांची काठ , पर्व , वंशवृक्ष इत्यादी पुस्तके आहेत त्याबद्दल विस्ताराने लिहिनच . हा अप्रतिमअनुवाद उमा कुलकर्णी यांनी केला आहे . मानवी मनाचे पदर ज्यांना हळूवार पणे उलगडून समजून घ्यायचे असतील त्यांनी हे पुस्तक जरूर वाचावे .
Neha Joshiमंद्र मधे स्वतः गायक नसूनही गाण्यातले जे काही बारकावे भैरप्पानीं दिले आहेत, त्यातून त्यांचा अभ्यास किती दांडगा आहे, तेच दिसून येतं. मला मंद्र आवडली नाही ती त्यातील नायक मोहनलाल मुळे. पूर्ण कादंबरीमध्ये त्याने आपल्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक स्त्रीचा एक भोगवस्तू म्हणून कसा वापर करून घेतला, ते वाचून मला उबग आला. अर्थात, हा राग त्या नायकाबद्दल आहे, पण एकूणच कादंबरी आणि लेखकांनी मनावर एक वेगळी छाप सोडली, हे नक्की! तुम्ही पर्व पण वाचून बघा, उत्तम कादंबरी आहे
Smita Chinnurkar Ligadeकाही महिन्यांपूर्वी मी एस एल भैरप्पा यांची मंद्र ही कादंबरी वाचली होती . ह्या पुस्तकावर माझे मत व्यक्त करण्यासाठी शब्द कमी पडतील कारण त्या पुस्तकाची उंची तेवढी प्रचंड आहे . लेखक स्वतः गायक नसूनही गाण्यातील अतिशय सूक्ष्म बारकावे पुस्तकात मांडले आहेत . गुरू-शिष्याचे नाते कसे नसावे ह्यावरही हे पुस्तक भाष्य करते .
DAINIK TARUN BHARAT 01-07-2007मोहनलाल या असामान्य गायकाची संगीत या ललित कलाक्षेत्रात वावरणाऱ्या आणि संगीत या एकमेव जगात रममाण होणाऱ्या एका कलावंताची ही कहाणी आहे. गंगाकाठी आरत्या, पदे, अभंग आळवून स्वत:चा चरितार्थ चालवणारा दहा अकरा वर्षांचा मोहन त्याची आई धुणीभांडी करून जगणारी स्त्री. मोहनचा आवाज गोड. ऐकणाऱ्याचं मन भुलवणारा. मोहनचं चांगलं होतं. गंगामैय्याच्या कृपेने त्याला काही कमी नव्हतं. त्याचं आयुष्य याच मार्गाने सुखाने गेले असते. एक दिवस गुरूकुल आश्रम चालवणाऱ्या बाबा ओंकारबाबा उर्फ बाबाजीचं त्याच्याकडे लक्ष वेधलं गेलं. त्यांनी त्या मुलाला हाताशी धरायचं ठरवलं. त्याच्या आईच्या अनुज्ञेने बाबाजींनी या मुलाला आपल्याबरोबर नेलं. इथून त्यांची संगीत साधना सुरू झाली. हरिद्वारला मोहनलाल पाच वर्षे होतो. मात्र हे अध्यात्मसंगीत होते. एक दिवस बाबाजींकडे पंडित रामनारायण रोहिला हे गायक आले आणि मोहनलालला बाबाजी त्याला लौकिक संगीत म्हणत ते ऐकायला मिळाले. रामनारायणांचा गंडा बांधण्यासाठी मोहनलाल त्यांच्याकडे पळून जातो. पण रामनारायण त्याला अप्राप्य ठरतात. तो रोहिलांकडे जेमतेम दीड-दोन वर्षं असतो खरा. पण गुरूकडून त्याला फार काही मिळत नाही.
मोहनलालचे संगीतविषयक जीवन हे कादंबरीचे एक सूत्र आहे. व्यक्ती म्हणून मोहनलाल हे दुसरे सूत्र मनोहारी ही नर्तिका मोहनलालच्या जीवनात येते हे तिसरे संगीताच्या जगातील काही मूलभूत प्रपन आणि चिंतन हे चौथे सूत्र. यांच्या गुंफणीतून आणि Criss-Cross Narration पद्धतीने त्याची झालेली चिरेबंद बांधणी ही आणखी वैशिष्ट्ये.
मंद्र अनेक दृष्टिकोनातून वाचावी लागते. तिचं मूल्यमापन करावं लागतं. ती आनंद देते. वाचकाला बहुश्रुत करते आणि त्याची वाढही करते. अंतर्मुख बनवते.
या उंचीच्या अशा खोलीच्या अशा वाङ्मयीन महत्तेच्या व महात्मतेच्या सखोल कादंबऱ्या फारशा आढळत नाहीत.
सौ. उमा कुलकर्णी यांनी ‘मंद्र’ची अनुवादासाठी निवड करणं हा वाचकांना खरोखर भाग्योदय आहे.
-प्रा. अनंत मनोहर
Daily Sakal 2009डॉ. भैरप्पा यांची ‘मंद्र’ ही कादंबरी कलावंत आणि त्याची नैतिकता या विषयावरचे मंथन वाचकांसमोर आणते. प्रत्येक रसिकाच्या मनातल्या प्रश्नांचाच वेध घेते. – डॉ. अंजली जोशी
डॉ. भैरप्पा हे नाव आता मराठी वाचकांना नवीन राहिलेले नाही. तत्त्वज्ञानासारख्या गंभीर व गूढ विषयाचे अभ्यासक असलेले भैरप्पा आपल्या प्रत्येक कादंबरीतून मात्र प्रत्यक्ष नवीन अनुभव देण्याचा प्रयत्न करताना दिसतात. ‘वंशवृक्ष’पासून आताच्या ‘मंद्र’पर्यंत त्यांनी वेगवेगळे विषय मांडलेले आहेत. ‘धर्मश्री’ जरी त्यांची पहिली कादंबरी असली, तरी वाचकांना ‘वंशवृक्ष’ हीच कादंबरी अधिक जवळची आहे. याच कादंबरीपासून त्यांच्या कादंबरीलेखनाचा एक चढता आलेख वाचकमनात तयार झालेला आहे. फेब्रुवारी २००७ मध्ये आलेली भैरप्पांची ‘मंद्र’ ही कादंबरीदेखील त्यांच्या या आलेखातील एक उच्च बिंदूच आहे, असे म्हणायला हरकत नाही. मराठी वाचकांसाठी हे दालन खुले करून दिल्याबद्दल डॉ. उमा कुलकर्णी या धन्यवादास पात्र ठरतात, हे आरंभीच नमूद करावेसे वाटते.
कुठल्याही विषयाचे तत्त्वज्ञानाच्या अंगाने मूलभूत चिंतन-मनन करणे हे भैरप्पांचे खास वैशिष्ट्य आहे. त्यांच्या जवळजवळ प्रत्येक कादंबरीतून हे त्यांचे वैशिष्ट्य दिसून येते. ‘मंद्र’मधूनही भैरप्पांमधील तत्त्वज्ञ स्पष्टपणे दृष्टीस पडतो. या कादंबरीलेखनात ते स्वत:देखील तावूनसुलाखून निघालेले दिसतात. आतापर्यंत डॉ. भैरप्पा यांनी आपल्या कादंबऱ्यांमध्ये एका चांगल्या रितीने विचारप्रवणता आणलेली आहे. ‘मंद्र’मध्ये केवळ विचारप्रवणता नाही. ही कादंबरी केवळ सांगितिक नाही. केवळ मानवी भावभावना व्यक्त करणारी नाही किंवा केवळ जाणीवनेणिवेच्या पातळीवरचे व्यक्तींचे मानसविश्लेषण करणारीही नाही. ‘मंद्र’मध्ये या सर्वच गोष्टींचे एक सुरेख रसायन सिद्ध झालेले आहे. म्हणून प्रत्येक रसिकावाचकाला या कादंबरीतून नवा अनुभव येतो. त्यामुळे तो स्वत:ही समृद्ध होत जातो. ही कादंबरी वाचकाला कमालीची अंतर्मुख करते. संगीताच्या माध्यमातून अखिल विश्वाचे चिंतन करणारी ही कादंबरी रसिकवाचकाला एक वेगळ्याच अनुभवक्षेत्रात घेऊन जाते. हेच या कादंबरीचे श्रेष्ठत्व आहे.
पाचशे बहात्तर पृष्ठांची ही कादंबरी घटनासंवेदनाचा एक विस्तीर्ण पट वाचकांसमोर उभा करते. मोहनलाल नावाचा जागतिक कीर्तीचा गायक हे या कादंबरीचे क्षेत्रफळ म्हणता येईल. या एका व्यक्तींभोवतीने सारी कादंबरी गुंफलेली आहे. त्याच्या आयुष्यात घडलेल्या घटना, त्याच्या जीवनात आलेल्या व्यक्ती, त्याचा कालखंड, त्या कालखंडामध्ये असणारी समाजस्थिती याचे चित्रण ‘मंद्र’मधे केलेले आहे. कला, कलाकार, मानवी जीवन या सगळ्यांचे एकमेंकाशी असणारे अतूट असे बंध निर्माण होत असतात. ते बंध काही वेळेला जाचक होतात, तरीही ते तोडता येत नाहीत. ह्यांचे अतिशय हृद्य व परिणामकारक चित्र भैरप्पांनी मोहनलालच्या व्यक्तिरेखेद्वारे केलेले आहे.
‘मंद्र’साठी भैरप्पांनी ललित कलेतील सर्वश्रेष्ठ अशी संगीतकलेची पार्श्वभूमी हेतुत: योजलेली आहे, असे वाटते. म्हणूनच कादंबरी वाचताना कादंबरीचा नायक मोहनलाल चित्रकार, नृत्यकार, शिल्पकार असता तर कादंबरीच्या आस्वादामध्ये, अनुभवामध्ये काही फरक पडला असता का? असा एक विचार मनात येतो. या संदर्भात एक गोष्ट अशी जाणवते, की डॉ. भैरप्पांनी स्वत: संगीताचे शिक्षण घेतलेले आहे. संगीताचे शास्त्र, कला या दोन्हींची त्यांना उत्तम जाण आहे. त्यांच्या आधीच्या एका कादंबरीत यमन रागासंबंधीचे त्यांनी केलेले विवेचन पाहता आपल्या असे लक्षात येते की, ते स्वत: एक उत्तम संगीतसमीक्षकही आहेत. परंतु, कलाकृतींच्या दृष्टीने विचार केला तरीही ह्या कादंबरीसाठी संगीतकलेचे प्रयोजन यथार्थ होते, असेच म्हणावे लागते. या संदर्भात असे सांगता येईल, की संगीत ही कला निसर्गनिर्मित कला आहे. संगीतकलेतील रागरचना पाहताना याचा आपल्याला प्रत्यय येतो. अर्थात निसर्ग म्हणजेच निर्गुण निराकार ईश्वर. त्याच्या प्रेरणेने जन्मलेले हे संगीत त्यालाच समर्पित करणे, असा उदात्त हेतू संगीतसाधनेमागे असतो. एक विशुद्ध कला म्हणून संगीतकला ही स्वत:च इतकी श्रेष्ठ कला आहे, की तिचा साधासुधा आविष्कारही खोलवर परिणाम करतो. मग एखादा श्रेष्ठ कलाकार जेव्हा ही कला सादर करतो, तेव्हा रसिकांना उच्चप्रतीचाच अनुभव येणारच. संगीताच्या या प्रभावाने स्वत: कलाकार तर घडत जातोच, शिवाय रसिकांनाही तो अभिरूचिसंपन्न करतो. ‘मंद्र’ कादंबरी वाचताना ह्याची आपल्याला प्रचिती येते.