Rakesh Sawale"वंशवृक्ष"
धार्मिक पातळीवरील नात्यांची गुंतागुंत...!!
एस्. एल. भैरप्पा यांची वाचलेली तिसरी कादंबरी.
(पर्व आणि आवरण नंतरची)
सुरवात काहीशी संथ वाटू शकते.. पात्र परीचयाची ती गरज आहे हे नंतर कळतं...
पण जेव्हा आपण सगळ्यांना ओळखायला लागतो तेंव्हा हीच गोष्ट इतकी जबरदस्त पकड घेते की आपण त्या त्या व्यक्ती प्रमाणे विचार करायाला लागतो...
गोष्ट तशी साधी आहे...
श्रीनीवास श्रोत्री.. नेहमी धर्माप्रमाणे वागणारे कथेच्या केंद्रस्थानी आहेत. गृहस्थाश्रमाचा मुळ उद्देश हा फक्त "वंशवृद्धी" च आहे, असं मानणारे. त्यांच्या कुटुंबात होणाऱ्या... चढ उतारात आपण पण नकळत ओढले जातो.
आणि शेवट नेहमी सारखा अर्धवट सोडल्यासारखा... मन सुन्न करणारा...
जर भैरप्पांच्या लेखणीचे चाहते असाल तर जरूर वाचा...!!
PRANAV PATILएस.एल.भैरप्पा ज्यांच्या लेखनाच्या प्रेमात पडल्या सारखं सध्या मला झालं आहे. आवरण आणि धर्मश्री नंतर वंशवृक्ष ही त्यांची अतिशय गाजलेली कादंबरी जीच्या वर पुढे चित्रपटही निघाला ज्यात गिरीश कर्नाड यांनी राज या मध्यवर्ती कथानकाची भूमिका चित्रपटात बजावली आहे. तशी ती भूमिका त्यांना व कथानकाला साजेशीच होती त्यामुळे कादंबरीत जेव्हा जेव्हा राज चा उल्लेख येतो तेव्हा समोर गिरीश कर्नाडच दिसतात.
कादंबरीचा मध्यवर्ती विषय आहे वंश आणि त्या वंश वृध्दीसाठी आसूसलेली दोन कुटुंब आणि दोन वंशाचे दिवे ज्यात एक जण वडीलांच्या तर एक जण आईच्या प्रेमासाठी मुकलेला आहे.
कथा सुरु होते सदाशिवराव आणि श्रीनिवास क्षोत्रींच्या कथानकां पासून श्रीनिवास क्षोत्रींचा तरुण मुलगा नदीत वाहून गेलेला आहे ज्यामुळे घरात एक तरुण पत्नी एका लहन मुलाची आई असून विधवा झालेली आहे. संस्कृतचे पंडीत असणार्या श्रीनिवास यांच्याकडे म्हैसूरचे प्रसिध्द इतिहासाचे अध्यापक सदाशिव राव आलेले असतात ज्यांना भारताचा बृहृत इतिहास पाच खंडात लिहायचा आहे त्यातला एक खंड लिहून झालेला असतो जो ते दाखवायला आणि मार्गदर्शन घ्यायला श्रीनिवास शास्त्रींकडे आलेले असतात. सतत संशोधनात असल्यामुळे सदाशिवरावांचे आपली बायको नागलक्ष्मी हिच्याकडे कायम दूर्लक्ष असते. तर लहान भाऊ राज नुकताच लंडन वरुन म्हैसूरला घरी आलेला असतो. राज प्राध्यापक म्हणून कॉलेज मधे त्याच्या नाटक मंडळामुळे प्रसिध्द असतो पुढे या सगळ्यांच्या आयुष्यात एक वादळ येतं श्रीनिवास शास्त्रींची विधवा सून कॉलेज शिकायला म्हैसूरला येते आणि राज आणि तीचं प्रेम एकमेकांवर बसतं , इकडे सदाशिवराव श्रीलंकन संशोधिका करुणा रत्नेमुळे हिच्यामुळे प्राभावित होऊन तिच्याशी दुसरं लग्न करतात .या नंतर असणारी कथा ही खरचं वाचायलाच हवी .या कादंबरीचा शेवट ज्या प्रकारे भैरप्पांनी केलाय त्याला तोड नाही. वंशवृक्ष वाढवण्यासाठी झालेली फसवणूक, काहींची तगमग याचं दुःख हे सर्वांनाच गुरफटून टाकतं ज्यात कात्ययनी ,करुणारत्ने यांची झालेली परवड तर नागलक्ष्मीचं टाकलेली बायको म्हणून झालेली कुचंबणा, सनातन विचारांचे श्रीनिवास,बायकोच्या सुखासाठी आसुसलेला आणि सगळ्याःची काळजी घेणारा राजा, संशोधनात गुरफटलेले सदाशिवराव ही पात्रे रंगवताना सर्वांचे भावतरंग ,विचार , समांतर चाललेली कथानके म्हणजे चित्रपटाचे उत्कृष्ट पटकथा आपण वाचतोय असंच वाटत राहतं.
Niranjan N. Kulkarniएखाद्या पुस्तकाविषयी मनन करण्याची माझी पहिली वेळ नाही, मात्र लिहू वाटण्याची पहिलीच वेळ आहे. S L भैरप्पांची आवरण आणि तडा ही 2 पुस्तके वाचून झाली होती गेल्या काही दिवसात आणि आता चाहूल होती बहुप्रतिक्षित वंशवृक्ष ह्या पुस्तकाची. काही पुस्तके अशी असतात की त्याविषयी चर्चा करण्यापेक्षा मनातल्या मनात त्याविषयी चिंतन करावे आणि त्याचा आस्वाद घ्यावा. अत्तराची कुपी एखाद्या पेटित ठेवल्यानंतर ती संपून गेल्यावरदेखील त्याचा सुवास त्या पेटीत दरवळत राहावा तशी वंशवृक्ष मनात घर करून राहिली.
भैरप्पा यांची पात्र उभी करायची पद्धत इतकी चपखल आहे की तशी हातोटी फार कमी जणांना लाभते. श्रीनिवास श्रोत्री हे धीरोदात्त असं पात्र ह्या कादंबरीभार वावरलंय, सनातन धर्म पद्धती विरुद्ध चिरचेतन चिरनुतन बुद्धिवाद यांच्यातलं द्वंद्व ह्या पुस्तकात रेखाटलं आहे. शेवटी जिंकलं कोण हे दाखवण्याची चूक भैरप्पांनी केली नाही. मंदिरात जाऊन काय मागायचं हा प्रश्न जसा याचकाचा असतो तसं भैरप्पांनी इथे तो वाचकांवर सोडला आहे. ज्याला जे घ्यायचं आहे ते घ्या. उमा कुलकर्णी यांनी ह्या मूळ कन्नड पुस्तकाचा अनुवाद मराठीत केलाय. खरंच हा अनुवाद वाटत नाही हे नक्की.
मी पुस्तक परीक्षण करण्यासाठी ही पोस्ट लिहीत नाही, माझी ती योग्यता नाही. चंदनाच्या झाडाला जर बाभळी चिकटली तर त्या बाभळीलादेखील चंदनाचा वास येतो असं म्हणतात, तशीच काहीशी माझी गत झालीये. म्हणजे इतकं उत्तुंग साहित्य वाचल्यावर माझी ही पोस्ट म्हणजे ती बाभळीच.. कुठल्याही मोहाच्या अथवा कठीण प्रसंगात श्रोत्रीन्नी आपला संयम ढळू दिला नाही, तिरस्कारासारखी नकारात्मक भावना मनात ठेवली नाही, जे होईल ते ब्रम्हउपदेश ह्याप्रमाणे ते पुढे सरकत राहिले. शेवटी ज्या मुळावर वंशवृक्ष उभा होता त्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होतं. पण अशाही परिस्थितीमध्ये श्रोत्री मनाचा संयम ढळू ना देता सर्व मालमत्ता दान करून संन्यस्त होतात. खूप कमी घटना आपल्या जीवनाचा मार्गक्रम ठरवतात, हे पुस्तक त्या दुर्मिळ गोष्टीत येतं.
Snehal Sherkarडॉ. भैरप्पा यांची अतिशय सुंदर आणि वाचनीय कादंबरी आहे.
Smita Pawar Vachla ahe...nice book👌
Nitin Piseअप्रतिम कादंबरी आहे👍👍
ज्ञानेश श्रीनिवास श्रोत्री - व्यासंगी, वेदशास्त्रसंपन्न, श्रीमंत कुटुंबातील अत्यंत साधेपणाने पण धर्माच्या कसोटीवर घासून जीवन उन्नत करणारा पन्नाशीतला मनुष्य. याचा मुलगा नदीच्या पुरात वाहून जातो. बायको भागीरथी, घरी काम करणारी पण घरचीच असणारी लक्ष्मी, सून कात्यायनी आणि नातू चिनी यांना सांभाळण्यासाठी पुन्हा एकदा निवृत्त जीवनातून गृहस्थी जीवनात येतो.
यांचे एक विद्यार्थी असतात - सदाशिवराव. विद्वान! सदाशिवरावांना भारतीय इतिहासावर मोठा ग्रंथ लिहायचा आहे. त्यासाठी ते श्रोत्रींचे मार्गदर्शन घेत असतात. त्यांची एक पत्नी आहे - नागलक्ष्मी, मुलगा पृथ्वी आणि भाऊ राज.
नागलक्ष्मी साधी गृहिणी आहे. पतीवर प्रेम, निष्ठा आहे पण त्याच्या व्यासंगापासून ती खूप दूर आहे. सदाशिवरावांना अजिंठ्याला एक सिंहली मुलगी भेटते - करुणा रत्ने. करुणा हुशार असते आणि सदाशिवरावांचा विषय - इतिहासाची - विद्यार्थिनी असते. ती त्यांच्या मार्गदर्शनाखाली PhD करायला मैसूरला येते. PhD करताना सदाशिवरावांच्या खंडप्राय ग्रंथाच्या पहिल्या खंडासाठी त्यांना मदत करते. त्यानंतर ती परत जाते पण ते दोघेही एकमेकांशिवाय आपण अपूर्ण आहोत. त्यानंतर करुणा पुन्हा मैसूरला येते. पण यावेळी सदाशिवराव तिला लग्नाची मागणी घालतात. दोघे लग्न करतात पण नागलक्ष्मी आणि करुणा एका घरात राहत नाहीत. सदाशिवरावांची दोन बिऱ्हाडे होतात.
राज इंग्रजीचा प्राध्यापक आणि नाट्यकलेवर प्रेम करणारा आहे. कात्यायनी पतीची ग्रॅज्युएशनची इच्छा पूर्ण करण्यासाठी राजच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेते. राजला ती आवडते आणि कात्यायनीही राजला प्रतिसाद देते. दोघांचे लग्न होते. कात्यायनीला श्रोत्री विरोध करत नाहीत पण एक गोष्ट सांगतात की उन्नतीची एक पायरी चढल्यावर पुन्हा त्याच पायरीवर येणे ही अवनती आहे. लग्न करून मातृत्व मिळाल्यावर पुन्हा लग्न करणे त्यांच्या दृष्टीने एक पायरी खाली येणे आहे. ती जेव्हा तिच्या मुलाला न्यायला येते तेव्हा त्याला न्यायचे की नाही ही गोष्ट ते तिच्या न्यायबुद्धीवर सोडतात आणि कोणतीही बळजबरी करत नाहीत. पण कात्यायनी मुलाला श्रोत्रींंकडेच राहू देते आणि नवा संसार सुरू करते.
श्रोत्री-भागीरथी-लक्ष्मी-चिनी, सदाशिवराव-नागलक्ष्मी-करुणा, राज-कात्यायनी-पृथ्वी यांचा प्रवास सुरु राहतो. सुमारे वीस वर्षांचा प्रवास दाखवलाय. त्यात अनेक वळणे येतात. प्रत्येक परीक्षेच्या प्रसंगी सदाशिवराव-करुणा बुद्धीला, राज-कात्यायनी प्राकृतिक स्वभावाला आणि श्रोत्री धर्माला (कर्तव्याला) प्रमाण मानून निर्णय घेतात.
पुढील कथा तुम्ही प्रत्यक्षच वाचावी!
यातील प्रत्येक परीक्षा ही प्रत्येकासाठी अवघडच असते आणि प्रत्येकजण आपापल्या समजुतीने पुढे जातो. भैरप्पांचे वैशिष्ट्य हे की आपल्याला कुणीच "खल" वाटत नाही. पण सर्वात उठून दिसतात श्रोत्री. ते कधीच कुणावर रागावत नाहीत, त्यांच्या धर्म-कर्तव्याच्या कसोटीवर घासून निर्णय घेतात आणि कात्यायनीला सांगितलं वाक्य - एकदा उन्नतीच्या वरच्या पायरीवर आल्यावर पुन्हा खालच्या पायरीवर कधीच जात नाहीत. त्यांच्या काही गोष्टी आजच्या युगात आपल्याला पटत नाहीत पण काळ आणि धार्मिक बाजू लक्षात घेतली तर निश्चितच आपण श्रोत्रींंपुढे नतमस्तक होतो.
Shashank Gosavi भैरप्पांच्या लेखनाचा चाहता झालोय...
DAINIK SAKAL 06-12-1987धर्म, परंपरा व नवीन जीवन मूल्यांचा प्रवास…
श्रेष्ठ कन्नड लेखक डॉ. एस. एल. भैरप्पा यांची ही दर्जेदार कादंबरी - आजवर त्यांनी १५ कादंबऱ्या, निबंधसंग्रह, दोन समीक्षा-प्रबंध असे विपुल लेखन केले आहे. कर्नाटक साहित्य अकादमीचा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. प्रस्तुत कादंबरीवर चित्रपट निघाला आणि गाजलाही. प्रतिभावंत डॉ. भैरपांचे नाव भारतात सर्वतोमुखी आहे. मराठी अनुवाद आहे. सौ. उमा वि. कुलकर्णी यांचा अनुवाद सुोध, प्रवाही आहे. वाचताना कुठे अडखळल्यासारखे वाटणार नाही. मराठी भाषेचे वाळण अस्खलित राहिले आहे. मराठी भाषेची लकब साधून लेखिकेने आशय सुस्पष्ट केला आहे.
चार अक्षरांचे हे शीर्षक व्यापक अर्थाने योजले आहे. सुरुवातीच्या पिढीने लावलेले वंशाचे रोपटे पिढ्यापिढ्यांतून वाढत जाऊन, संबंधित होऊन त्याचा डेरेदार वृक्ष व्हावा अशी पूर्वजांची इच्छा असते. घरादाराचा आणि वतनाचा वारसा द्यावा त्याप्रमाणे वंशाच्या प्रथा-परंपरा, कुळाचे वळण व कुलाचार एका पिढीने पुढील पिढीस द्यावयाचे असतात. वंशसातत्य टिकावे. टिकवावे हा त्या मागचा हेतू. कादंबरीतील प्रमुख पात्र श्रीनिवास श्रोत्री हे मुलगा अकाली निधन पावल्यावर नातवास विवाहित करून त्यास आपल्या घराण्याचा वारसा अर्पण करीत आहेत. या दृष्टीने वंशवृक्ष हे ‘शीर्षक साभिप्राय वाटते आणि मुखपृष्ठावरील चित्रही सूचक आणि बोलके आहे. उकलेल्या बीजातून उगवलेला एक वृक्ष, मुळ्या खालेवर रुजल्या आहेत आणि पार्श्वभूमीवर आहे एक दुमजली घर, त्या श्रोत्री घराण्याचे द्योतक. माडीवरच्या एका खोलीत असेल धर्म-ग्रंथसंग्रहालय. जीवनाला पायाभूत आधार असतो धर्माचा. त्या धर्माची सूक्ष्मता श्रोत्री तिथे अभ्यासत होते. आपल्या संन्यासपूर्व काळात. तीत त्यांची मनन-चिंतनाची मठी.
वंशवृक्ष ही दोन कुटुंबांची कथा आहे. कथांचे ओघ थोड्याफार फरकाने समांतर वाहताना दिसतात. श्रोत्री कुटुंबातील श्रीनिवास हे सश्रद्ध धर्मपरायण गृहस्थ. आपत्तीच्या वेळी व मोहाच्या क्षणी ही धर्मश्रद्धाच त्यांना मार्गदर्शक होते. तर म्हैसूरचे सदाशिवराव श्रेष्ठ इतिहाससंशोधक श्रीनिवास हे त्यांचे गुरू. दोघांच्या पत्न्या जुन्या वळणाच्या, मुख्यत: घर सांभाळणाऱ्या. सदाशिवरावांची पत्नी नागलक्ष्मी अधिक उजवी वाटते. पती आपल्याशी मिसळत नाही ही तिच्या मनातील खंत. पतीने आपली उपेक्षा केली म्हणून तिनेही त्यांची उपेक्षा केली. रामनामाचा जप हा तिचा विरंगुळा. श्रीनिवास विधुर राहू शकले पण सदाशिवरावांना संशोधन-लेखनात करुणारत्ने. सिंहलीकन्या, ध्येयाशी समसरणारी सहचारिणी हवी वाटली. तो विवाह लोकिक पातळीवरचा नव्हता. दोन्ही कुटुंबात दोन अबोध निरागस मुले आहेत. चिनी आईच्या प्रेमास आसुसलेला तर पृथ्वी पित्याची पाखर हवी असलेला. लक्ष्मी आणि रायप्पा दोन्ही एकनिष्ठ नोकर. श्रोत्रींची विधवा सून कात्यायनी सदाशिवांचे बंधू राज (राजाराम) कडे आकृष्ट झाली. प्रौढ गंभीर हळव्या मनाची लावण्यवती, उमद्या व्यक्तिमत्त्वाकडे ओढली गेली. दोघे एकमेकांस साजेसे तरीही विवाह अयशस्वी झाला. राजने तिच्या पार्श्वभूमीचा विचार केला नाही. श्रोत्री कुळातील धर्मसंस्कारसंपन्न स्त्री वङ्कालेपासारखे संस्कार, शिसपेन्सिलीची अक्षरे रबराने खोडता येतात पण गडद शाईची अक्षरे? तिचे मन दोलायमान झाले. पापाची भावना शेवटी बद्धमूल झाली आणि शेवटी आजारात तिचा दुर्दैवी अंत झाला. श्रीनिवासांचे व्यक्तिमत्त्व उत्तुंग असेलही. सदाशिवराव जागतिक कीर्तीचे संशोधक असूनही राजचे सामान्य व्यक्तिमत्त्व मनावर अधिक ठसते. तो वाचकास आपल्यासारखच, आपल्याबरोबर चालणारा माणूस वाटतो. तो थोरल्या भावाचे मन जाणून घेतो. भावजयीची समजूत घालतो. पुतण्याचे कौतुक करतो अध्यापनात रंगतो, नाटकात जीव ओततो. प्रेयसीला आत्महत्येपासून परावृत्त करतो आणि आजारात तिची जागून शुश्रूषा करतो. हा माणूस सामान्य असून असामान्य झाला आहे.
स्पष्ट, रेखीव साकारलेली स्वभावचित्रे हे कादंबरीचे वैशिष्ट्य मानता येईल. कादंबरीचा आशय आहे. धर्मसंकल्पनेचा पण त्या धर्मसंकल्पनेचा पण त्या धर्मसंकल्पनेस कर्मठपणाची चौकट नसावी. ती संकल्पना जीवन-मूल्य-सापेक्ष असावी जीवनमूल्ये बदलत आहेत म्हणून धर्मकल्पनाही परिवर्तनशील हव्यात. लेखकास हेच अभिप्रेत असावे. सनातन धर्मपरंपरा आणि आजची बदलती जीवनमूल्ये यातील संघर्ष हाच कादंबरीचा आत्मा आहे. कौटुंबिक पातळीवर रंगवलेले हे संघर्षचित्र आहे आणि रंगछटा आहेत तृप्ती-अतृप्तीच्या भावकल्लोळाच्या त्यांचे एक प्रभावी चित्रण हेच कलाकौशल्य म्हैसूर, चामुंडी टेकडी. उदकमंडळ वाटेवरच नंजनंगूड येथल कपिला नदी पुराच्या वेळी माणसांचा जीव घेणारी, इतर वेळी जीवांना पोसणारी. हा परिसर म्हणजे कादंबरीच्या भावचित्राचा फलक. सर्व परिसर पात्र जीवनांशी एकरूप झाला आहे. याच कपिलेच्या पुरात कात्यायनीचा प्रथम पती वाहून गेला आणियाच नदीच्या काठी तिचा अंत्यसंस्कार झाला. याच चामंडीवर ती विमनस्क हिंडली आणि ज्येष्ठ पावसात सचैल भिजली. ज्येष्ठ पावसाने कादंबरीची पाने आद्र्र झाली आहेत.
लेखकाची प्रतिभा रंगत प्रतिमा प्रतिकात कादंबरीत ‘मूलतत्त्व’ नाटकाचा प्रसंग आहे. प्रकृती आणि पुरुष ही सृष्टीची दोन मूलगामी तत्त्वे. चिरचेतन, नित्यनूतन प्रकृतीचे प्रतीक आहे. कात्यायनी श्रोत्रींच्या परसात नाजूक जुईची वेल आहे. झाडे वठताच दुसऱ्या वृक्षावर चढू पाहणारी. जुईची वेल म्हणजे कात्यायनी प्रतिमा. संपूर्ण कादंबरीस व्यापून राहिला आहे. हृदय हेलावणारा करुण-रस नंजुडच्या, सदाशिवरावाच्या, कात्यायनीच्या मृत्यूंचे प्रसंग वाचताना अश्रू आवरत नाहीत. पृथ्वी चिनीचे निरागस चेहरे, हरिद्वारला निघालेली श्रोत्रींची पाठमोरी आकृतीही नितांत करुणरम्य दृश्ये. आणि कादंबरीच्या शेवटीशेवटी वंशवृक्षाचा सर्व मोहोरच गळून पडतो. जुन्या बाडांत श्रीनिवासाना एक कागद सापडतो. त्याची लक्ष्मीपाशी चौकशी करता ती सांगते आईने त्यास नियोग पद्धतीने जन्म दिला होता. कंजूस, लोभी पित्याचा एक नियोग पुत्र ऋषींचे कुळ आणि नदीचे मूळ पाहू नये हेच खरे. दैवायत्त कुले जन्म कुलीन जन्म दैवाधीन असेल पण माणसाचे पौरुष, कर्तृत्व तरी स्वाधीन आहे ना? श्रीनिवासांनी स्वत:च्या मनाची जडणघडण स्वत: तयार केली आणि आपल्या नातवाच्या मनाचीही.
वाचताना अपूर्व आनंद देणारी ही एक निश्चित सुंदर कादंबरी आहे. आंतरभाषीय साहित्याची ओळख करून देण्याचा अनुवादिकेचा प्रयत्न स्तुत्य आहे.
-वा. ज्यो. देशपांडे
MAHARASHTRA TIMES 31-07-1988वाचनीय भाषांतरित कादंबऱ्या…
सुप्रसिद्ध कन्नड साहित्यिक डॉ. एस. एल. भैरप्पा यांच्या कादंबरीचा ‘वंशवृक्ष’ हा मराठी अनुवाद उमा कुलकर्णी यांनी केला आहे.
पांढरपेशा सुशिक्षित समाजातील सुखदु:खांचे चित्रण या कादंबरीत आहे. कात्यायनी, डॉ. सदाशिवराव, प्रा. राज या मुख्य व्यक्ती महाविद्यालयातील उच्चशिक्षित प्राध्यापक असून करुणा ही सुस्वरूप, सुविद्य तरुणी आहे. या चारही व्यक्ती आधुनिक दृष्टिकोनातून जीवनाकडे पाहतात. त्या केवळ स्वत:च्याच सुखदु:खांचा विचार न करता विद्याव्यासंगात व्यग्र होऊन जातात. विद्याभ्यासारखेच संसारातही दु:खाचे आघात न होता तो आनंदमय व्हावा अशी त्यांची सर्वांची सुखदायी अपेक्षा असते. कादंबरीत त्यांचा अपेक्षाभंग होऊन त्यांच्यावर दुर्दैवाचे आघात होतात असे, निवेदन आलेले आहे. अशा प्रसंगीही विद्यादानाच्या आणि विद्याव्यासंगाच्या त्यांनी अंगिकारलेल्या कार्यात व्यग्र राहण्याची त्यांची जिद्द स्तिमित करणारी आहे.
दुर्दैवाचे फेरे
कादंबरीचा प्रारंभच करुण कात्यायनीवर झालेल्या दुर्दैवाच्या, तिचे जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या आघाताने होतो. कपिला नदीच्या भयानक पुरात तिचा पती नंजुंड श्रोत्री बुडून मरतो. पोरसवदा कात्यायनी विधवा होते. बहरणारे तारुण्य पतिनिधनाच्या अमर्याद दु:खाने करपून जात असताना ती धीटपणाने प्रा. राजशी दुसरे लग्न करते. महाविद्यालयात नाव दाखल करून शिक्षण पूर्ण करते. शासकीय महाविद्यालयात प्राध्यापिकेची नोकरीही धरते. इतके करूनही दुर्दैव तिची पाठ सोडीत नाही. तीन वेळा गर्भपात झाल्याने कात्यायनी घायाळ होते. तशा छिन्नभिन्न अवस्थेतच तिला मृत्यू येतो.
विधवा कात्यायनी राजशी विवाहबद्ध होऊन सधवा बनते तर डॉ. सदाशिवराव पहिली पत्नी हयात असताना सिलोनच्या (आताची श्रीलंका) सुविद्य करुणारत्नेशी दुसरा विवाह करून, तिला कर्नाटकात आणून आपल्या संशोधनकार्यात सहभागी करून घेतात. अविरत श्रम घेऊन केलेले संशोधनकार्य पूर्ण झाल्यावर अकस्मात मृत्यू त्यांना गाठतो. मानवाशी चाललेला नियतीचा हा खेळ अगम्य तर खराच पण असह्यही. विधवा झालेली करुणा विदीर्ण अंत:करणाने मायदेशी परतते.
मार्मिक विचार
पहिला विवाह अयशस्वी आणि दु:खान्त झाला, की स्त्रीपुरुषांचे मन पुनर्विवाहाकडे धाव घेते. पुनर्विवाहात सुख शोधण्यासाठी एकत्र आलेल्या स्त्रीपुरुषांना पुनश्च दु:खाच्या खाईत फेकून नियती मानवी जीवनाशी क्रूर खेळ खेळते. अशा स्वरूपाचा पुनर्विवाहाचा एक प्रकारचा मार्मिक विचार संबंध कादंबरीत अनुस्यूत आहे.
प्रा. राज आणि कात्यायनी तसेच डॉ. सदाशिवराव आणि करुणा यांच्या आयुष्याची वाटचाल समांतर रेषांत जाते. तिचे रेखाटन करण्याची लेखकाची योजना परिणामकारक आहे. दु:खाचा गडद ठसा ही कादंबरी वाचकांच्या मनावर उमटविण्यात नि:संशय समर्थ ठरेल. पुनर्विवाह कात्यायनी या स्त्रीला जसा सुखी करू शकला नाही, तसाच तो डॉ. सदाशिवराव या प्रौढ वयाच्या, सुखशांतीच्या शोधात असणाऱ्या पुरुषाला सुखशांती देऊ शकला नाही. मानव योजतो एक आणि घडते वेगळेच. या चिरंतन सत्याचा प्रत्यय कादंबरी वाचताना ठायी ठायी येतो.
तोलामोलाची कथानके
वर म्हटल्याप्रमाणे कादंबरीचे संविधानक दुपदरी आहे. एक पदर राज आणि कात्यायनीचे जीवन, दुसरा पदर सदाशिवराव आणि करुणाचे जीवन, दोन्ही कथानके सारख्या तोलामोलाची आहेत. दोन्ही कथानकांचे धागेदोरे प्राय: कलात्मक रीतीने एकत्र जोडून दाखविले आहेत. ते संथपणे, काहीशा लयबद्धपणे एकमेकांत विणले जातात. त्या लयीत दु:खाची आंदोलने उठतात. परम सुखाची स्पंदने मधूनमधून जाणवतात. पण ती थोडी. दोन्ही कथानके सविस्तर कथन केल्याने निवेदनांची व्याप्ती वाढते, विणकाम थोडेबहुत सैलसर बनते. तथापि, गंभीर स्वरूपाचे दोष या कांदबरीत नाहीत. सरतेशेवटी दोन्ही कथानके परस्परांत विलीन होतात, कादंबरी संपते आणि राज-कात्यायनी व सदाशिवराव-करुणा यांचे जीवनपट मन:चक्षूंसमोर दीर्घकाळ तरळत राहतात.
‘वंशवृक्ष’मध्ये श्रोत्री घराण्याच्या काही पिढ्यांचे ऐश्वर्य आणि औदार्य, अभिमान आणि अस्मिता साकार झाली आहे. एका अर्थी ‘वंशवृक्ष’ हा श्रोत्री घराण्याचा इतिहासही आहे. कर्नाटकमधील नंजनगुडचे श्रोत्री सुयोग्य वारसाच्या अभावी आपल्या अगणित संपत्तीचे दान करून संन्यास घेतात हा कादंबरीचा शेवट प्रारंभीच्या अपरंपार दु:खाच्या गडद पार्श्वभूमीवर काहीसा मनोज्ञ वाटतो. तात्पर्य, श्रोत्री घराण्याचा हा वंशवृक्ष प्रस्तुत लेखकाने प्राय: ताकदीने उभा केला आहे यात संशय नाही.
-कृ. श्री. पेडणेकर
DAINIK TARUN BHARAT 22-11-1987एक सुंदर वाङ्मयकृती ‘वंशवृक्ष’…
वंशवृक्ष या गाजलेल्या कन्नड कादंबरीचा उमा कुलकर्णी यांनी केलेला हा मराठी अनुवाद डॉ. एस. एल. भैरप्पा यांनी लिहिलेल्या प्रस्तुत कादंबरीला कर्नाटक साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला, तसेच या कादंबरीवर तयार केलेल्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार लाभला. आजवर या कादंबरीच्या अनेक आवृत्त्या निघाल्या व संपल्या तरीही तिची लोकप्रियता कायम आहे. प्रस्तुत कादंबरीत सनातन धर्मपरंपरा आणि बदलती जीवनमूल्ये यांच्यातील संघर्षाचे कौटुंबिक पातळीवर उमटणारे भावकल्लोळ प्रभावीपणे रेखाटले आहेत.
नंजनगुंड येथील श्रीनिवास श्रोत्री हे विद्वान गृहस्थ वंशवृक्षाच्या मुळाशी आहेत. मुलगा नजुंड, सून कात्यायनी, पत्नी भागीरथम्मा व नोकराणी लक्ष्मी हा त्यांचा प्रपंच. कपिला नदीच्या पुरात नंजुंड वाहून गेल्यामुळे कात्यायनी विधवा होते. धर्म आणि संस्कृतीचे उपासक श्रोत्री, पुत्रवियोगाचे दु:ख धीरोदात्तपणे पचवितात पण तरुण कात्यायनीला हा आघात पचविणे कठीण होते.
श्रोत्रींकडे सदाशिवराव नावाचे भारतीय कलाकृतीचे थोर अभ्यासक शंका समाधानासाठी असतात. पती वियोगाचे दु:ख विसरण्यासाठी कात्यायनी महाविद्यालयीन शिक्षण घेण्याचे ठरविते. त्याच महाविद्यालयात सदाशिवरावांचा धाकटा भाऊ राज प्राध्यापक असतो. नाटकाच्या निमित्ताने कात्यायनी-राज यांची जवळीक निर्माण होते. याचवेळी संसारात विरक्त असणारे सदाशिवराव ग्रंथपृतींच्या ओढीने आपली विद्यार्थिनी करुणा रत्ना हिच्या प्रेमात पडून विवाहबद्ध होतात. राज-कात्यायनीच्या मनात प्रेमभावना उत्पन्न झाल्यामुळे कात्यायनी संघर्षाच्या भोवऱ्यात सापडते. याच्या निर्णयाची जबाबदारी श्रोत्री कात्यायनीवर सोपवितात. अखेरीस कात्यायनी सासू-सासरे-मुलगा सोडून राजशी लग्न करते.
या दोन्ही लग्नांमुळे सदाशिवरावांची प्रथम पत्नी नागलक्ष्मी व कात्यायनीचा मुलगा चिनी एकाकी पडतात. कात्यायनीला मुलाची आठवण येत असते. परंतु चिनीच्य तिच्या वर्गात विद्यार्थी म्हणून येतो. दुर्दैवाने मूलबाळ न झालेल्या कात्यायनीचे मन चिनीकडे ओढ घेते. इकडे संशोधनाचा प्रचंड ताण पडल्यामुळे सदाशिवरावांची तब्बेत ढासळून त्यांचे निधन होते. तिकडे नंजनगुडला भागीरथम्मांचे निधन झाल्यामुळे श्रोत्री एकटे उरतात.
घरातील जुन्या पुस्तकांमध्ये त्यांना सहजच एक कागद मिळातो. ज्या घराण्याचा अभिमान त्यांना असतो. ज्या वंशाचा वृक्ष वाढावा म्हणून ते तळमळत असता ते श्रोत्री पित्याने आपला भाऊ किट्टप्पाकडून सर्व संपत्ती फसवून घेतलेली असते. त्यांचा जन्म अनैतिक संबंधातून झालेला असतो. हा धक्का जबरदस्त असतो. अस्वस्थ श्रोत्री किट्टप्पांच्या वारसाचा शोध घेऊ लागतात. पण त्यांना यश मिळत नाही. सर्व संपत्ती चिनीच्या हवाली करून श्रोत्री संन्यास घेतात. घराचा त्याग करून जाताना वाटेत ते सदाशिवरावांकडे येतात येथे कात्यायनी अत्यवस्थ असते. कात्यायनीच्या मृत्यूनंतर राजशी बोलताना राज व सदाशिवराव किट्टप्पांची मुले आहेत हे समजते. आपली आई कोण हे चिनीला समजते. कात्यायनीचे अंत्यसंस्कार करण्याची श्रोत्री चिनीला आज्ञा देतात. इथेच कादंबरी संपते.
वाचनीय
कथानकाच्या दृष्टीने बराच मोठा कालखंड कादंबरीत आला आहे. अनेक पात्रे, घटना आणि त्यांचे परस्परसंबंध व त्यांची गुंतगुंत यामुळे कादंबरी रसभरीत झाली आहे. श्रोत्री व सदाशिवरावांच्या कुटुंबातील स्वतंत्र संघर्षाचे उपकथानक यात असून कादंबरीचा अनपेक्षित शेवट वाचकाला धक्का देणारा आहे. नंजनगुड, म्हैसूर, टेकडी इत्यादी परिसरात ही कथा आकार घेते. कर्नाटकातील विशिष्ट जीवनपद्धतीचे दर्शन येथे घडत नसले तरी तिकडील सनातीन वृत्तीचे प्रतिबिंब पडले आहे. भारतीय संस्कृतीचे पाईक श्रोत्री एका बाजूला तर बदलत्या मूल्यांचे आचरण करणारे सदाशिवरावांचे कुटुंब दुसरीकडे अशी कथानकाची रचना आहे.
श्रीनिवास श्रोत्री, कात्यायनी, सदाशिवराव ही पात्रे प्रमुख असली तरी नागलक्ष्मी, चिनी यांचे महत्त्व कमी नाही. श्रोत्रींच्या रुपाने सनातनी वृत्तीचा व नागलक्ष्मीच्या रूपाने पतिव्रतेचा आदर्श लेखकाने उभारला आहे. प्रत्येक व्यक्तीरेखा सामर्थ्यशाली असली तरी तीनही प्रमुख पात्रांच्या मनातील द्वंद्वाचे चित्रण बारकाईने केले आहे. यातील संघर्षात वाचक गुंतत गेल्यामुळे कादंबरी कधी संपते हेच समजत नाही. वाचनीयता हा प्रस्तुत कादंबरीत सर्वांत महत्त्वाचा गुण आहे. कादंबरी वाङ्मयात नवे घडविण्याइतकी ही कादंबरी मोठी नसली तरी वाङ्मयीन प्रवाहातील एक सुंदर वाङ्मयकृती म्हणून तिचे महत्त्व निश्चितच आहे.