- Raviraj Nagawade
बकसची आणि माझी ओळख इथं झाली.
एकदा असाच ऐन उन्हाचा चालून आलो आणि मुलाणकीत करंज्याच्या सावलीत बसलो. दमलो होतो. घामानं थबथबलो होतो.रानात उभं पीक नव्हतं.त्यामुळे आजुबाजुला कोणी नव्हतं.गार सावलीत जरा बरं वाटलं.वाळूत कलंडून इकडं -तिकडं पाहू लागलो.
तेवढ्यात पलीकडची डगर उतरून बकस आला.माझ्या रोखानंच आला.फाटक्या अंगलटीचा बकस पायांतली सहा आणेवाली टायरांची पायताणं ओढत आला आणि फार दिवसांची ओळख असल्यासारखा हसून बोलला," बसला सावलीत?दमला असाल उन्हात.लई लागलं का ऊन?लई न्हाई तरी थोंड लागायचं."
_ आणि गुडघ्यावर फाटलेला मुसलमानी चोळणा वर सरकावून खाली वाळूत बसला.
माणदेशी माणसं,हा व्यंकटेश माडगूळकरांचा पहिला कथासंग्रह.
धर्मा रामोशी,झेल्या,रामा मैलकुली,नामा मास्तर,मुलाण्याचा बकस,बन्याबापू, कोंडिबा गायकवाड,शिदा चांभार,शिवा माळी,तांबोळ्याची खाला,रघू कारकून,बाबाखान दरवेशी,गणा महार,माझा बाप,बिटाकाका, गण्या भपट्या.
२८ ऑगस्ट तात्यांचा स्मरणदिवस.भावपूर्ण संस्मरण...
- Rahul Patil
"माणदेशी माणसं"
आज रविवार, त्यात लॉकडाऊन मग अधाशासारखं एका दिवसात "माणदेशी माणसं" संपवलं, आता इथली जाणती सवरती वाचकमंडळी म्हणतील की असं हावरटासारखं वाचणं चांगलं नव्हे, पण माफ करा काही पुस्तकं प्रेयसीच्या पत्रासारखी असतात, ती एका दमातच वाचायची नाहीतर त्यातली "मजा" समजत नाही.
माडगूळकरांचं एक मास्टरपीस म्हणावं असं पुस्तक,
माडगूळकरांच्या लेखनशैली बाबत अगदी प्रथमदर्शनी जाणवणारी गोष्ट म्हणजे "भाषा" आणि कथेचा प्रवाह.
पात्रागाणिक बदलत जाणारा गावबोलीचा ठसका किंवा पात्राच्या भावनेवर हिंदोळणारी लय दोन्ही तितकेच सहज.
आणि सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे माडगूळकरांची संपूर्ण कथा एक बाजूला आणि त्या कथेच्या शेवटी असणारं एक वाक्य एका बाजूला, चर्रर्रकन काळजाचा वेध घेणारं, संपूर्ण कथेत चेहऱ्यावर अलगद स्मित येत असताना सपकन तलवार चालावी आणि घाव पडावा असा शेवट आणि त्या शेवटच्या वाक्यात जीवनच सार सांगून जाण्याचं कसब फक्त माडगूळकरांचं.
"माणदेशी माणसं" वाचतांना अजून एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते ती म्हणजे स्पष्ट पण हळुवारपणे मांडलेली खेडेगावातील कर्मव्यवस्था ("जातीव्यवस्था" म्हणालो तर बिघडायचं एखादं), आणि त्या कर्मव्यवस्थेवर आधारित वर्षानुवर्षे चालत आलेली त्या गावाची स्वतंत्र अशी अर्थव्यवस्था. कर्म-अर्थ असं गणित वर्षानुवर्षे चालवत चालवत गावं आता बदलली हे सुद्धा पुसटसं सांगून जातात ह्या कथा, आता चांगलं वाईट ह्या फंदात न पडता माडगूळकरांनी फक्त सत्यकथन केलंय, बाकी वाचकांनी आपली सद्सद्विवेक की काय ती बुद्धी वापरात ठेवावी.
- अश्विनी सुर्वे
#माणदेशी माणसं हा व्यंकटेश माडगूळकरांचा सर्वात पहिला कथासंग्रह. माणदेशातल्या साध्या, सरळ आणि कष्टकरी माणसांची ही शब्दचित्र इतकी हुबेहूब आणि सुंदररित्या रंगवली आहेत, की वाचताना ती आपल्यासमोर उभी राहतात. अगदी आजही.
आता हा ‘झेल्या’च बघा.
‘बटन नसलेल्या कुडत्याला एक हातानं गळ्याशी धरून झेल्या बिथरल्या खोंडासारखा उभा होता. अंगानं किरकोळच. वयानंही फारसा नसावा. तेरा-चौदा एवढा. डोक्याला मळकट अशी पांढरी टोपी. अंगात कसले कसले डाग पडलेलं, मळलेलं, बाहीवर ठिगळ लावलेलं हातमागाच्या कापडाचं कुडतं; त्याला शोभेलशीच तांबड्या रंगाची चौकडी असलेली गादीपाटाची चड्डी! तिचे दोन्ही अंगचे खिसे फुगलेले. त्यांत बहुधा चिंचा भरलेल्या असाव्यात.’
आधीच्या मारकुट्या मास्तरांनी हिरवेनिळे वळ उटेपर्यंत मारल्यामुळे शाळेकडे न फिरकणारा व नवीन मास्तरांच्या प्रेमळ वागणुकीवर खुश होऊन नियमित शाळेत येणारा आणि त्यांना जीव लावणारा झेल्या किती सुंदर रेखाटला आहे.
माडगूळकरांनी फक्त मानवी स्वभाव नाहीतर त्याकाळची सामाजिक परिस्थिती देखील उत्तम प्रकारे रेखाटली आहे. ती वाचताना कधी हसायला येतं, कधी राग येतो; तर कधी अजूनही परिस्थिती बदलली पण प्रवृत्ती तशीच आहे, याचं वाईटंही वाटतं.
या माणदेशी माणसांची भाषा, राहणीमान, परिस्थितीचा बाऊ न करता तिला सामोरं जाणं, प्रामाणिकपणे कष्ट करणं आणि जगण्याची उमेद कायम ठेवणं अशा कितीतरी गोष्टींमुळे या व्यक्तिरेखा इतक्या वर्षानंतरही आपल्याला आकर्षित करतात.
शनिवार रविवार घरी जाऊन आठवड्याभरासाठी भाकरी घेऊन येणाऱ्या ‘नामा’ मास्तराबद्दल लेखक लिहितात, की “खाण्यापिण्याचे हाल होतात म्हणून कुरकुरायला नामा पांढरपेशा थोडीच होता! जेवणाचे जास्त चोचले करायचे त्याला माहित नसावं.”
किंवा एकटीच राहणारी, कुंकू-दातवण विकून जगणारी, कधी पडले तर तांब्याभर पाणी द्यायला कोणी नाही असं सांगणारी तांबोळ्याची ‘खाला’ ही म्हातारी लेखकाला सांगते की, “अरे गोडीगुलाबिने राहावं. चार माणसं आपली करावीत. भलेपणा मिळवावा. दुसरं काय मिळवायचं हतं?”
परिस्थिती चांगली नाही म्हणून सोडून गेलेल्या बायकोबद्दल, “मी न्हाई केली वासपूस! आपल्याजवळ ऱ्हान्याची तिची जर विच्छा न्हाई, तर कशाला जोरा करायचा? जाऊदेल म्हणालो, कुटंबी सुकात असली म्हंजे झालं!” असं बोलणारा आणि शिक्षण नसल्याने आपली ही स्थिती आहे हे जाणून भाच्याला खूप शिकवण्यासाठी कष्ट करणारा रामा मैलकुली.
आपल्या पुतण्याला नवीन कोट, खाऊ देण्यासाठी, त्याला एकदा बघण्यासाठी; साठ ते पासष्ट मैलांचे अंतर पायी तुडवून आलेले आणि भेट झाल्यावर पुन्हा आले तसे परत चालत नोकरीवर रुजू होण्यासाठी गेलेल्या बिटाकाकांचं प्रेम पाहून खरंच आश्चर्य वाटतं.
तालुक्यात देवीची साथ आल्यामुळे मुलाला लस टोचण्याचा पत्र पाठवून आग्रह करणारे देशपांडे मास्तर आणि त्यांना ‘मी, माझा बाप, माझा आजा कोणीही टोचून घेतले नाही तरी आमच्यापैकी कुणीही साथीच्या रोगाने मेले नाही. सबब, माझा मुलगाही मरणार नाही. मी त्याचा बाप तो जास्त कसा जगेल हे बघीन. तुम्ही फक्त त्याला चार अक्षरे शिकवण्याचे करा.” असं सांगणारे वडील. या दोघांमध्ये शाळा सुटेल या भीतीने अडकलेला मुलगा आणि “शाळा शिकायची, तर सगळं सोसलं पाहिजे बाबा. मास्तर म्हणतात ते केलं पाहिजे.” असं म्हणत लस टोचायला नेणारी अशिक्षित आई.
वरवर पाहता या व्यक्तिरेखा गरिबीने वेढलेल्या आणि दारिद्र्याने पिचलेल्या वाटतात पण जगण्याचं साधं सोप्प तत्वज्ञान आपल्याला शिकवतात आणि जगण्याची उमेद देतात.
१९४९ साली या पुस्तकाची प्रथम आवृत्ती निघाली. स्वातंत्र्यानंतर मराठी साहित्यात जे अक्षर-ग्रंथ निर्माण झाले, त्यात ‘माणदेशी माणसं’चा समावेश होतो. त्यातील व्यक्तिरेखांतून त्यांनी ग्रामीण माणसाचे जे अस्सल आणि जिवंत दर्शन घडविले, ते तोवरच्या मराठी सहित्याला अनोखे होते. मला तर हे वाचून आश्चर्य वाटलेलं, की हे पुस्तक प्रकाशित झालं तेव्हा माडगूळकर फक्त २१-२२ वर्षांचे होते. तसं कल्पकतेला वयाचं बंधन नसतंच पण व्यंकटेश माडगूळकरांच फारसं शिक्षण नसतानाही त्या वयातील प्रतिभा, कल्पनाशक्ती , निरीक्षणशक्ती खरंच अवाक् करणारीच आहे.
आणि या प्रतिभेतूनच आकाराला आलेल्या या १६ व्यक्तिरेखा. एकदातरी नक्की वाचा त्यांना. त्यांच्या दुःखामुळे थोडंस अस्वस्थ व्हाल. पण कधी निराश असताना त्यातील कोणीतरी एक आठवेल, तुमच्या चांगल्या परिस्थितीची जाण करून देईल आणि पुढे जायला प्रेरणा देईल.
- Abhijeet Sontakke
माणदेशी माणसं - व्यंकटेश माडगूळकर. ग्रामीण साहित्यातील हा अनमोल खजिनाच. सातारा जिल्ह्यातील कायम दुष्काळनं गंजलेला हा माणदेश म्हणजेच माण तालुका अगदी आटपाडी पर्यंतचा हा भाग. पिढ्यानुपिढ्याचा दुष्काळ, पाचवीला पुजलेली गरीबी, अज्ञानता, भोळ्याभाबड्या लोकांची ही कथा. माणदेशातील ही कथा आणि धर्मा रामोशी, झेल्या, बन्याबापू, कोंडिबा गायकवाड, शिदा चांभार, बबाखान दरवेशी, गणा महार, बिटा काका, गण्या भपट्या अशी काही विलक्षण पात्रं मन खिळवून ठेवतात. त्यांची ही करूण कथा मन व्यथित करतं.
- Rupali Pandit
Khup chhan vyaktichitrane ahet.20 varsh zaliy wachun pan hi patre man at ghar Karun ahet.Zelya tar gavagavat sapdel.kharech harawlit hi manse rahilit fakt pustakatach
- Deepak Bhor
खूप सुंदर पुस्तक..
- Tanaji Ingale
वाचनीय पुस्तक
- Sandip R Chavan
ज्येष्ठ ग्रामीण कथाकार, कादंबरीकार #व्यंकटेश_दिगंबर_माडगूळकर यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील माडगूळ येथे झाला. त्यांची ‘बनगरवाडी’ ही कादंबरी काही दिवसांपूर्वी मी वाचली होती. त्यावेळी त्यांचे #माणदेशी_माणसं हे १९४०/५० च्या दशकातल्या ग्रामीण कथांचे पुस्तक वाचायचे असे ठरवले होते. आज ते वाचून पूर्ण झाले.
माणगंगा नदीच्या काठाला असलेल्या सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांतील परिसराला माणदेश म्हणून ओळखले जाते. कायम दुष्काळ असणाऱ्या या भागात माडगूळकरांचे बालपण गेले. त्यांना त्यांच्या लहानपणापासून भेटलेली, त्यांच्या मनात घर करून राहिलेली काही माणसं त्यांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी ‘मौज’ साप्ताहिक मध्ये कथा म्हणून लिहण्यासाठी कागदावर उतरून काढली. नंतर १९४९ मध्ये या सर्व कथांचे मिळून ‘मानदेशी माणसं’ हे पुस्तक प्रकाशित झाले.
स्वातंत्र्यपूर्व आणि संस्थान काळातील मानदेशातील खेड्याचे समाज-जीवण कसे होते. याचबरोबर तेथील बलुतेदार पद्धती, तेथील गरिबी, बोलीभाषा, सामाजिक- शैक्षणिक परिस्थिती, वाहतुकीच्या आणि जीवनावश्यक साधनांची असणारी कमतरता, आजूबाजूच्या परिसराचे-घरांचे- माणसांचे त्यांनी केलेले निरीक्षण पुस्तकात वाचावयास मिळते. त्यांच्या लिखाणाची शैली आपल्याला पुस्तकातून त्या काळात घेऊन जाते. आणि या कथा आपल्यासमोरच घडत आहेत असं जाणवू लागतं.
सगळीकडे असतात तशी प्रेमळ आणि तरेवाईक माणसं माडगूळकरांनाही भेटली. त्याच्या आयुष्यात आली. ही माणसं कशी जगतात, काय विचार करतात, काय भोगतात, या माणसांची जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती, कुठल्याही परिस्थितीत पाय रोवून आला तो दिवस सुख-दु:खासह स्वीकारण्याची त्यांची उमेद, चांगल्या-वाईटाबद्दलच त्यांचं वैयक्तिक मतं इत्यादी गोष्टी पुस्तकातून आपल्याला समजतात.
“बकऱ्यावानी पालापाचोळा खाऊन जगायचं आलं कपाळी’’ म्हणणारा ‘धर्मा रामोशी’ आणि धर्मासाठी दिलेलं जुनं धोतर ‘लुगडं’ म्हणून वापरणारी त्याची मुलगी ‘बजा’ पहिल्याच कथेतून गरिबी म्हणजे काय असते याची जाणीव करून देते. ‘‘मास्तर, मी न्हाई जायाचा आता त्या साळंत!’’ अस म्हणत तात्पुरत्या बदलीवर आलेल्या शाळा मास्तरच्या गळ्यात पडून रडणारा लोहाराचा ‘झेल्या’ विद्यार्थी- शिक्षक हे नातं कसं असावं आणि कसं नसावं हे सांगून जातो.
गरिबीमुळे हौस-मौज पुरवू न शकलेल्या ‘रामा मैलकुली’ला त्याची बायको सोडून जाते. तरीही “कुटंबी सुकात असली म्हंजे झालं," असं सोडून गेलेल्या बायकोबद्दलचं त्याचं मत त्याच्या निर्मळ मनाचं आणि साधेपनाचं दर्शन घडवते.
‘‘चुलत्यानं डागलंय, खुरपी तापवून डाग दिल्यात. डागल्यावर येड लागलेलं मानूस बरं हुतं. मी काय वेडा हाय का?’’ अशी कैफियत मांडणारा पोरका ‘मुलाण्याचा बकस’ आणि आयुष्याभर फक्त दुःख आणि दुःखच भोगलेल्या ‘बिटाकाका’ची हकीकत वाचून संवेदनशील व्यक्तीच्या डोळ्यात पाणी येते.
प्रेमळ स्वभावाचा, स्वतःचा वाडा जळल्यावर रानात झोपडी बांधून राहनारा, आणि कुणाचेही उपकार न घेणारा ‘बन्याबापू’; जुन्या रूढी आणि गैरसमजाना चिटकून राहिलेला ‘रामू तेली’; साध्या-सरळ मनाचा परंतु चिलमीच्या व्यसनासापाई आयुष्यातून बरबाद झालेला ‘शिवा माळी’; प्रेमळ, कष्टाळू आणि तरीही आयुष्याची शोकांतिका झालेली ‘तांबोळ्याची ‘खाला’; गरिबीमुळे नैराश्याने ग्रासलेला ‘रघु कारकून’; तमशापाई मास्तरकी सोडणारा ‘नामा’ आणि काबाडकष्ट करूनही गावात पोट भरत नाही म्हणून गाव सोडून मुंबईतील तमाशात गेलेला ‘गणा’ ही सगळी चांगल्या स्वभावाची परंतु परिस्थितीने गांजलेली माणसं वेगवेगळ्या कथांमधून आपल्याला भेटतात.
त्याचप्रमाणे गांधीहत्येनंतर उसळलेल्या दंगलीत हात धुऊन घेणारा ‘शिदा चांभार’; शेतीच्या बांधावरून भाऊबंधकी आणि हाणामाऱ्या करणारा ‘कोंडीबा गायकवाड’; बायकोपेक्षा पोट भरणाऱ्या जनावराला (अस्वल) महत्व देणारा ‘बाबाखान दरवेशी’; इत्यादी बेरकी स्वभावाची माणसंही वेगवेगळ्या कथेतून पुस्तकात आपल्याला भेटतात.
गरीब, साधीसुधी, मनमिळाऊ, बेरकी अश्या वेगवेगळ्या स्वभावाची माणसं भेटून झाल्यावर शेवटी कष्टाविना पैसा हवा असणारा ‘गणा भपट्या’ वाचल्यावर मात्र, मनसोक्त हसून पुस्तकाचा शेवट होतो.
अशी ही माणदेशातली वेगवेगळ्या परिस्थितीतली, वेगवेगळ्या स्वभावाची सोळा व्यक्तिचित्रे व्यंकटेश माडगूळकरांनी अत्यंत नैसर्गिक, साध्या पद्धतीने आणि छान शैलीत रंगवली आहेत.
आज सत्तर वर्षांनी बहुतांश खेड्यांमध्ये खूप मोठे अमूलाग्र बदल झालेत. शैक्षणिक सुधारणा झाल्या, रस्ते झाले, कुडा-मेढीच्या घरांची जागा आरसीसी घरांनी घेतली, बलुतेदार पध्दत जवळपास संपली आहे, टीव्ही, मोबाईल, दळवळणाची साधनं घरोघरी पोहचली आहेत. एकंदरीत भौतिक विकास झाला आहे. परंतु या विकासात एकमेकांना धरून राहणारी, एकमेकांचा आदर करणारी, प्रेम-जिव्हाळ्याची माणसं मात्र कायमची हरवली आहेत.
एके काळी जातीच्या नावाने हाक मारूनही माणसांच्या मनात एकमेकांबद्दल प्रेम होते. आपुलकी होती. आपलेपणा होता. आज जातीपतीची दरी एवढी वाढली आहे की माणसाला माणूस म्हणून जवळ न करता तो आपल्या जातीचा आहे का हे पाहून जवळ करण्याची वृत्ती वाढीस लागली आहे. या बदलेल्या परिस्थितीची तुलना ७०/८० वर्षांपूर्वीच्या परिस्थितीशी करता मनात एक प्रश्न पडल्यावाचून राहत नाही आणि तो म्हणजे... अडाणी,गरीब,सोशीक,निर्मळ मनाची,माणुसकी जपणारी, आपल्या घासातील घास दुसऱ्याला देणारी #माणसं होती तो काळ चांगला ?? की स्वार्थी, निगरगट्ट, भ्रष्टाचारी, स्वतःपुरता विचार करणाऱ्या, माणुसकी हरवलेल्या माणूस नावाच्या #जमातीचा हा काळ चांगला???
- Vishwajeet Shinde
100 वेळा पारायण केलेला पुस्तक
- Parag Jagtap
माणसाच्या स्वभावामध्ये खूप काही दडलेले असते. आपण ते वाचू शकत नाही .माणूस पणा ,वेडसर पणा,चांगले पणा,वाईट पणा, हे सगळ वाचता यावं असे वाटत असेल तर वाचा माणदेशी माणसें ....
प्रत्येक माणसाला योग्य तो न्याय देऊन.त्यांचा अंतरंगाचे सुंदर वर्णन करत ह्या सर्व कथा आपल्या मनाला गुसळून काढतात.
सामान्य जीवनातील न संपणारे दुःख निरागसपणे व्यंकेटश माडगुळकर यांनी लिहली आहे.
माणसे सुखासाठी धडपडतात पण त्या साठी जन्माला आलेली नसतात.जीवणातील कारुण्य माडगूळकर यांनी कलावंताच्या अलिप्त पणे टिपले आहे .त्या मुळे ह्या कथेतील ही माणसे आपल्याला खरच विसरता येत नाही....
- Anand Pawar
अप्रतिम पुस्तक आहे...
- Deepak Gaikwad
Apratim aahe..
- Payal Surpam
व्यंकटेश माडगूळकरांच `माणदेशी माणसं` वाचलं.. बर्याच लोकांना माहिती असावं..
माडगूळकरांच्या अनुभवकथन अन व्यक्तिचित्रणात खुप लवकर हरवायला होतं.. सुंदर शैली, तितक्याच नजाकतीने समोरच्याची लकब, बोली, हेल याच्या वर्णनासोबतच त्या प्रसंगाला असे काही खुलवतात कि मनात चलचित्रपट सुरु होतो..
यातील बरीच प्रकरण इथे तिथे वाचलेली होती यापूर्वी, पण पुस्तक पूर्ण वाचल्याशिवाय हातातून सुटेना.. यामधील `झेल्या` नावाची कथा शाळेत असताना बालभारतीच्या पुस्तकात होती म्हणुन जरा जास्तचं जवळचं वाटलं ते पुस्तक. जुन्या, त्यातही शाळेतल्या त्या दिवसांना जोडणारा धागा मिळाला कि वाचनाला आणखी गती येते तसेच काहीसे झाले...
बर्याच लोकांनी वाचले असेलच पण जर राहिलं असेल तर नक्की वाचावा असा कथासंग्रह..