- डाॅ. बि.एन.जाजू, पुणे.
परवाच जी. बी. देशमुखांच
"अ-अमिताभचा " हे पुस्तक वाचून झालं. खूप छान लिहिलंय त्यांनी. प्रत्येक चित्रपटाचा बारकाईनं केलेला अभ्यास, त्यातील प्रसंगांचं आणि अमिताभच्या अभिनयाचं समृद्ध भाषेत केलेलं लेखन आणि लिखाणाचा ओघ (flow) सर्वच अप्रतिम.
- अर्चना चौधरी, पुणे.
लेखक आणि माझ्यात एक दिर्घ जनरेशन गॅप आहे.
त्यांनी १९८५ मध्ये कामाला सुरवात केली आणि मी तेव्हा जन्माला आले.
पण अमिताभचे चित्रपट बघत मोठे झालो आम्ही... त्याची क्रेज वगैरे समजण्याच वय होतं, नव्हतं माहिती नाही, पण....दो और दो पांच, शोले, चुपके चूपके, शान, अमर अकबर अँथनी आजही मनाला आनंद देतात.
चिनी कम, पिकू, उंचाई, गुडबाय बघताना त्यांचा स्तर अजूनही जाणवतो.. त्यांना कोरोना झाल्याचं कळताच प्रार्थनेसाठी हात जोडले गेले होते...
पण तुमच्या पुस्तकातून जो अमिताभ भेटत आहे तो कोणीतरी वेगळाच वाटला. पुस्तकातलं एक प्रकरण वाचायचं आणि तो चित्रपट बघायचा असा सपाटा लावला आहे... सध्या माझी यु-ट्युब टाईम लाईन अमिताभ समर्पित झाली आहे.
तुम्ही सांगितलेल्या जागा परत एकदा बघितल्या जातात.
जुने चित्रपट बघताना लॉजिक थोड मागे टाकावं लागत.
पण लार्जर दॅन लाईफ आनंद, ती क्रेज परत एकदा अनुभवायचा प्रयत्न करते आहे.
पुस्तकांसाठी खूप खूप धन्यवाद.
- धिरज देशमुख, अमरावती.
`अ-अमिताभचा` हे पुस्तक मी दोन दिवसांपूर्वीच, वनिता समाज, राजकमल चौक, अमरावती येथून घेतले. जसे कोल्हापूर येथील "बच्चन वेडे कोल्हापुरी" तसेच आम्ही सुद्धा "बच्चन वेडे अमरावतीकर" मी फक्त पुस्तकांविषयीची प्राथमिक प्रस्तावना-रुपी लेखन-प्रपंच आणि आनंद, अभिमान व नमक-हराम, असा पान क्र. 12 पर्यंतचा प्रवास केला. एवढ्यावरच मला हा अभिप्राय दिल्यावाचून चैन पडणार नव्हती, म्हणून वही आणि पेन कधी हाती आले मलाच माझे कळले नाही. लैखकाप्रमाणेच आमच्या सुद्धा प्राथमिक जीवनातील किशोरवयीन ग्रंथी श्री. बच्चन साहेबांच्या सिनेमा-वरच पोसल्या गेल्यात.... सदरील पुस्तकामध्ये, वाचकाला सत्तरीच्या दशकातील अमिताभजींच्या आठवणीत खोलवर नेऊन ठेवणारी लेखकाची शब्द-रचना कमालीची आहे. ह्या पुस्तकामुळे (हो मी या पुस्तकांमुळेच म्हणेल) बच्चन साहेबांच्या सिनेमाचा पुन्हा एकदा आमच्या ड्राइंग हॉल ला तो दमदार आवाज निनांदवावा...या पेक्षा दुसरं काय हवंय. हा अनुभवरुपी ठेवा, लेखकाने आम्हा वाचकांपुढे ठेवल्या-बद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत.
मी पुन्हा एकदा लेखकाच्या नवीन आणि स्तुत्य उपक्रमास भरभरून शुभेच्छा देतो.
- बाळकृष्ण गावडे.
एखाद्या रहस्य कथे प्रमाणे सलगपणे हे पुस्तक वाचणे शक्यच नाही! एक लेख वाचला कि गेलो फ्लॅश बॅक मधे, बाहेर पडायला जरा वेळ लागतो, पुन्हा परत तेच.
पुस्तकाच्या शिर्षका वरूनच आशय आपल्या लक्षात येतो व कुठेही निराशा होत नाही. आकर्षक मुखपृष्ठ, उत्कृष्ट मांडणी, व आटोपशीर लेखन यामुळे पुस्तक अत्यंत वाचनीय झाले आहे.
लेखक महानायकाच्या प्रेमात असल्याचे पानोपानी जाणवते व लेखकाने ते लपवले किंवा त्याचा इन्कार देखील केलेला नाही. पण हे प्रेम आंधळं नाही, अमिताभ का आवडतो याचे असंख्य दाखलेच दिले आहेत. माझ्यासारख्या अमिताभ प्रेमी ला तर ही लेखमाला आवडणारच पण चुकून एखाद्या अभाग्याला या महानायका विषयी जास्त माहिती नसेल तर हे पुस्तक वाचल्यावर आपण कोणत्या आनंदाला आजवर मुकलो याची जाणीव होऊन नक्कीच नशिबाला दोष देईल.
लेखक एके ठिकाणी लिहितात की सगळेच चांगले असल्यावर अजून काय चांगले शोधणार? तरीपण आपण निवडलेले सर्वच चित्रपट, त्यातील भूमिका व बारकावे याला तोड नाही.
हृषीदा यांच्या निराळ्या अँग्री यंग मॅन ची तुम्ही ओळख करून दिलीत.
अजून दोन चार `सौदागर` किंवा `मैं आझाद हुं` केले असते तर समांतर सिनेमा वाले उर बडवून घेत बसले असते!
प्रत्येक लेख मुद्द्याला धरून आहे, नेमका आहे, व वेगळा आहे. लेखकाचे निरीक्षण अफलातून आहे, "तो धावला," पण प्रत्येकवेळी निराळा? हे जाणवायला खास नजर लागते, जी लेखकाकडे आहे.
`जंजीर` आणि `खाकी` मधील पोलीस अधिकाऱ्याची तुलना तर लाजवाब!
पा, पिकू, पिंक, चे विश्लेषण अप्रतिम.
आमचे पण वय अमिताभला बघतच वाढले, पडद्यावर इतर कुणाकडे लक्ष देणे शक्यच नव्हते, या गडबडीत कित्येक गोष्टी आमच्या सामान्य नजरेतून निसटल्या ज्या इतक्या वर्षानंतर लेखकाने नजरेत आणून दिल्या.
अमिताभ वर लिहिताना एकूणच सिनेमावर असलेले प्रेम व या विषयातील लेखकाचे ज्ञान नक्कीच दिसून येते.
वन मॅन इंडस्ट्री, शेहेनशाह, स्टार ऑफ द मिलेनियम, आणि अशी अनेक बिरूद सार्थ ठरवताना हा माणूस कुठेही कमी पडत नाही. या महान कलाकारा बद्दल लेखकाच्या पोतडीत अजून बरेच काही असेल जे आम्हाला वाचायला नक्की आवडेल.
.......
- उमेश नेने, मिरज.
नमस्कार साहेब,
आपले अ-अमिताभचा पुस्तक परवा ऑनलाईन मिळाले आणि २ दिवसात वाचून काढले .
पुस्तकाचे कव्हर देखील खूप छान आहे. अमिताभ प्रेमीनी पुस्तकाच्या संग्रहात ठेवण्यासारखे पुस्तक आहे.
पुस्तकामध्ये लेखकाचा परिचय ही मिळाला , लेखक वस्तू व सेवा कर अधीक्षक आहेत तरी सुद्धा या सर्व व्यापातून पुस्तक लिहीतात याचेच कौतुक वाटते .
उमेश नेने
मिरज .
- Sanjeev Pise, Pune.
The book is just wonderful.
I was always of the opinion to convert the articles from Sakal into a book.
All the articles are just superb.
and writing style of the author is out of the box.
- सुरेश पेंडसे, पुणे.
मी पुस्तक विकत घेतले. तत्काळ वाचून काढले. छानच संग्रह आहे.
- दिपक पांडे पुणे ८-९-२०२२
श्री. अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटाचे गाढे अभ्यासक श्री. जी.बी. देशमुख यांचे `अ-अमिताभचा` हे पुस्तक वाचनात आले. अमिताभ बच्चन यांचा निस्सीम चाहता
असल्यामुळे या पुस्तकाचा दहा तासात फडशा पाडला.
या पुस्तकाची वैशिष्ट्ये....
श्री. अमिताभ बच्चन यांच्या उमेदीच्या काळात दिवार, डॉन आणि वयाच्या सत्तरीत आलेले पिकू, बदल, चिनी कम यातील छबींनी साकारलेले मुखपृष्ठ लक्ष वेधून घेते. मुखपृष्ठ डिझाईन करणाऱ्या प्रियांका पाचपांडे यांचे त्रिवार अभिनंदन !
श्री. अमिताभ बच्चन यांच्या गगनभेदी कारकिर्दीचा समर्पक आढावा २०८ पानांमध्ये साकारण्याचे दिव्य आव्हान लेखकाने समर्थपणे पार पाडले आहे. महानायकाच्या निवडक भूमिकांवर टाकलेल्या या प्रकाशझोतामध्ये प्रत्येक भूमिकेतील अमिताभ नव्याने उजळून निघाला आहे. बऱ्याच कालावधीनंतर साहित्यविश्वात अमिताभ बच्चन यांच्यावर आलेले हे पुस्तक बच्चन प्रेमींसाठी पर्वणीच आहे.
प्रत्येक लेखाला दिलेली सरळ, सोपी पण मार्मिक अशी टायटल्स. अलंकारिक, साहित्यिक शब्दांचा लेखनात फारसा वापर न करता लेखाची सोप्या शब्दात केलेली मांडणी हे अजून आगळेवेगळे वैशिष्ट्य.
बासष्ट भूमिकांच्या खुमासदार चर्वणामधील मला आवडलेले सिलसिला या चित्रपटाचे चर्वण आहे. त्याचप्रमाणे खुद्दार या चित्रपटातील निर्जीव टॅक्सीला सुद्धा `टॅक्सी झाली व्यक्तिरेखा` हे धमाल टायटल देऊन टॅक्सीची भूमिका डोळ्यासमोर सजीव होऊन उभी राहते.
प्रत्येक कृतीमागे अनेकांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष असा सहभाग असतो. प्रकाशक मेहता पब्लिशिंग हाऊस व त्यांच्या टीमचे अभिनंदन!