मानसी सरोज "दिवसा ती काहीही करत नसली, तरी रात्रीच्या वेळी त्यांना उजाडते.त्यांचे पाय उलटे असतात म्हणे" अशी भुतांच्या बाबतीत आपल्या मनाची समज आहे आणि नेमका त्याचा ठाव घेत द. मा.मिरासदार यांनी `भुताचा जन्म` हे पुस्तक लिहिलं आहे. विनोदी धाटणीतील मेहता प्रकाशनाचे हे १२६ पानांचे पुस्तक वाचताना आपण प्रत्यक्ष ते प्रसंग अनुभवत आहोत असे वाटते.
`भुताचा जन्म` हा कथासंग्रह आपल्याला गावात घडलेल्या काही घटनांची आठवण करून देतो.त्यांनी वापरलेली गावरान भाषा वाचकाला खिळवून ठेवते. प्रत्येक कथेतून एक वेगळं व्यक्तिचित्रण अभ्यासायला मिळतं. संवादातून काढलेले विनोदी चिमटे एकटेपणातही खो- खो हसायला लावतात. गंमत म्हणजे आपण इतके हसतो की समोरची व्यक्ती आपल्याला नक्कीच विचारते की " इतकं हसण्यासारखे काय आहे?" आणि आपण पूर्ण कथा सांगत सुटतो. हा लेखकाच्या लेखनशैलीचा विजय आहे.
गावातील चालीरीती, परंपरा, पोशाख आणि भाकडकथा यांचे संमिश्र स्वरूप म्हणजे `भुताचा जन्म`. नाव जरी असे असले तरी प्रत्यक्ष भुताची एकच कथा आहे आणि बाकीच्या कथा ह्या त्या कथेतील ठराविक पात्राच्या वागणुकीला `भूत` म्हणून नोंदवतात असे मला वाटते.
भुताचा जन्म कसा झाला यावरचा शोध, `भवानीचा पक्षकार` मधील मेहनती वकील `नाना`, भीमु बुरुडचा कोंबड्या विकण्याचा पराक्रम, नदीकाठी बाईच्या प्रेतावर झालेला काथ्याकूट, मारुतीचा कंटाळा,तात्याने विंचवाच्या मदतीने शिकलेली पंचाक्षरी,मैनाबाई स्वयंपाकीणीला नवऱ्याने हाल करूनही गेलेले दिवस, बाबू न्हाव्याचे " जावू दे कोर्टात" सांगून पैसे कमावणे, सोळा आण्याचे वतनदार चतुर अण्णासाहेब, बंड्याच्या तपकिरीचा शाळेतला उपद्व्याप आणि महाद्याने तालुक्यावर पाठवलेला निरोप अशा अकरा कथांचा हा संग्रह वाचताना वाचकाला खिळवून ठेवतो. एका खेपेतच पूर्ण संग्रह वाचला जातो.
प्रत्येक कथेत शेवटच्या परिच्छेदात धक्का तंत्र वापरले आहे.त्यामुळे एखादी कथा सोडली तर बाकी कथांचा शेवट पटकन लक्षात येत नाही. अंदाज लावला तरीही तसा शेवट होत नाही यात लेखकाचा वाचनाचा दांडगा अनुभव जाणवतो. संवादात वापरलेल्या गावाकडील भाषेमुळे कथा आपलीशी वाटते. दीर्घकाळ धाटणीतल्या लघुकथांचा बाज राखुनही विनोदाची फोडणी जबरदस्त आहे. विनोदी संस्कृतीची जपणूक करणारा हा कथासंग्रह प्रत्येकाच्या संग्रही नक्कीच असायला हवा... कारण मिरासदारांनी विनोदाचे बाळकडू इतरांपेक्षा जरा जास्तच प्यायलेले वाटते!
Ganesh Mallesheपुस्तक - भुताचा जन्म
लेखक - द.मा.मिरासदार
प्रकाशक - मेहता पब्लिशिंग हाऊस.
कधी कधी पुस्तकांचा पण कंटाळा येतो. तुम्ही कितीही पुस्तकप्रेमी असाल तरी एखाद्या वेळी हातात पुस्तक असलं तरी वाचायची इच्छा होत नाही. एखादी आवडती कादंबरी वाचण्यासाठी म्हणून घ्यावी आणि सुरू न करताच परत ठेऊन द्यावी, एखादं कवितेचं पुस्तक हातात घ्यावं पण काही ओळी वाचून पुस्तक मिटून टाकावं, एखादे ऐतिहासिक पुस्तक वाचायला घ्यावे पण त्या पुस्तकाची जाडी पाहूनच घाबरून जावं! असं बऱ्याच वेळेला बऱ्याच जणांना होतं. काहीतरी वाचायचं आहे ही भावना मनात खेळत असते पण काय वाचावं हे सुचत नाही. अशा वेळेस काय करावं?
उत्तर सोपं आहे, अशा वेळेस सरळ सरळ द.मा.मिरासदार यांच्या कथा वाचायला घ्याव्या. द.मा.मिरासदार आणि त्यांचे जोडीदार म्हणून आपण ज्यांना ओळखतो असे शंकर पाटील आणि व्यंकटेश माडगूळकर यांचा पिंडच वेगळा. यांचा कथासंग्रह म्हणजे विनोदाने भरलेला पेटारा असतो.
याच पेठऱ्यातील एक अप्रतिम पुस्तक म्हणजे "भुताचा जन्म". पुस्तकाच्या शीर्षकावरून जरी या पुस्तकात भयकथा असतील असं वाटतं असेल तर तसं अजिबात नाही. द.मा.मिरासदारांच्या इतर कथांप्रमाणेच हे पुस्तक विनोदाने भरलेले आहे. गावाकडील कथा, त्या कथा लिखाणाची शैली आणि त्यातील अस्सल ग्रामीण बोली याचं रसायन म्हणजे हा ११ कथांचा कथासंग्रह....
खेडेगावातील निरनिराळ्या व्यक्ती आणि त्यांच्या वागण्यातील गमती जमती आपल्याला या ११ कथांमध्ये अनुभवायला मिळतात. `भुताचा जन्म` या पहिल्या कथा मध्ये गुंडगुळ्याच्या माळावर नाक मुठीत धरून इच्छा नसताना तिथे भूत कसा जन्माला आला हे वाचून हसून हसून पोट दुखल्या शिवाय राहत नाही. अनेक ठिकाणी अनेक भुतं अशीच जन्माला येत असतील असा विचार मनाला स्पर्श करून जातो.
`भिमुच्या कोंबड्या` या कथेत अडमाप वागणुकीचा महा इब्लिस असणाऱ्या भिमुच्या कोंबड्या विकण्याचं कौशल्य पाहून त्याचं कौतुक वाटतं. आपण पण भिमु प्रमाणे कोंबड्यांचा धंदा करावा आणि चिकार पैसा कमवावा असं थोड्या वेळासाठी मला वाटून गेलं.
`कंटाळा` ही कथा वाचून तुम्हाला कंटाळा तर मुळीच येणार नाही पण या कथेतील मारुती चव्हाणाचा कंटाळा आणि आळस पाहून तुम्ही तुमच्या कपाळाला हात लावाल हे नक्कीच.मारुतीराव हे आजच्या काळात देशासाठीच नव्हे तर जगासाठी आदर्श आहेत. कारण त्यांच्या प्रमाणेच कंटाळा करून दिवसरात्र घरात बसून राहण्याची गरज आज देशाला आहे😂.
`पंचाक्षरी` या कथेत तात्या गुरव या बुटक्या माणसाची भूत पळवण्याची अद्भुत कला वाचल्या नंतर तुमच्या अंगात कधी भूत येणार नाही, आणि चुकून समजा एखादा भूत आलाच तरी तात्या गुरवाचा जप केल्यावर ते पळून जाईल. `तात्यांचा मंतिरच त्येवडा पावरफुल हाय`!
`स्वयंपाकिणबाईंचा नवरा` या कथेतील स्वयंपाकिण आणि तिच्या आजारी नवऱ्याचे दुःख आणि कष्ट वाचून तुमच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहतील, मात्र ते डोळ्यातील पाणी हसून हसून येईल, दुःखाने नव्हे!
`निरोप` या शेवटच्या कथेत एखादा निरोप किती `अ-चूक` पोहचू शकतो याची अनुभूती येते.
अशा या द.मा.मिरासदार यांच्या लिखाणातील सर्वात उजवी बाजू म्हणजे त्यांचे ग्रामीण भागातील भाषाशैलीवर असलेले प्रभुत्व. महाराष्ट्रातील अनेक खेड्या-पाड्याची भाषा ते खुप सहजतेने लिहतात. ही भाषा वाचणाऱ्याला असंच वाटेल की इतक्या सहजतेने तर त्या खेड्यातील लोकांना पण ही भाषा येत नसेल. याचंच एक छोटंसं उदाहरण म्हणजे `भुताचा जन्म` या कथेतील तुकाराम लांडगे या `भित्र्या-पैलवानाने` त्याच्या गावातील सांगितलेली ही पुढील भुताची गोष्ट -
_________________________________________
"हे सांगताना तुकाराम लटालटा कापू लागला.
“फुडं?”
“फुडं काय? घाम सुटला समद्यांना. नशाच उतरली.”
आता तुकारामाला घाम सुटला होता.
“हं मग?”
“मग ते भूत चढलं की, व्हिरीजवळच्या झाडावर. आन् दिली धाड्दिशी व्हिरीत उडी टाकून, धबेल करून. पुन्ना कायबाय आवाज करीत आलं वरती. पुन्ना चढलं झाडावर आन् पुन्यांदा ठोकली उडी व्हिरीत. रातसार हो धुमाकूळ. झाडावर चढायचं आन् व्हिरीत उडी ठोकायची! दुसरी बात न्हायी. पुन्यांदा झाडावर चढायचं आन् पुन्ना व्हिरीत उडी ठोकायची... ”
“मंग काय झालं?”
“काय व्हायाचं? खाड्दिशी दारु उतरली समद्यांची. फटफटस्तंवर ह्यो दंगा आपला चाललेला. फटफटलं तवा पळत आले गावात. पुन्ना म्हणून कदी रातच्याला भायेर गेले न्हायीत.”
_________________________________________
हाय का न्हाई पाहूणं मजेदार!! अरे, माफ करा मी पण तुकारामाची भाषा बोलायला लागलो. तर आहे की नाही मंडळी ही मजेदार गावरान बोली!
असा हा ११ कथांचा कथासंग्रह तुम्हाला सगळ्या ताण-तणावातून मुक्त करू शकतो अशी शाश्वती मी `सोळा आण्याचे वतनदार` या कथेतील कुलकर्णीने त्यांच्या पाहुण्यांना जशी दिली होती अगदी तशीच तुम्हाला देतो. आता हे कुलकर्णी कोण आणि त्यांनी काय शाश्वती दिली होती हे मला विचारू नका त्यासाठी हे पुस्तक आवर्जून वाचा. प्रत्येक पुस्तकप्रेमीने हा कथासंग्रह नक्की वाचावा!
- गणेश मल्लेशे
DAINIK TARUN BHARAT 27-05-2018भुताचा जन्म आणि इतर कथा...
मराठी साहित्यात विनोदाचं नेमकं स्थान काय?
प्रश्न तसा नाजूक आहे. कारण विविध वाहिन्यावरील विनोदी मालिकाची सध्याची अवस्था पाहता मराठीत दर्जेदार विनोदाचे दुर्भिक्ष आहे, की काय असे वाटून जाते. म्हणूनच... एक गोष्ट ठासून सांगावीशी वाटते, की दर्जेदार आणि निर्विष विनोदाची परंपराच मराठी विनोद साहित्याला लाभली आहे. मराठी साहित्यात विनोदी लेखन विपुल प्रमाणात झाले नसेल कदाचित. परंतु दर्जेदार लेखन मग ते कथा / कादंबरी / नाटक / लेख या कोणत्याही प्रकारात असो, निश्चितच झालेलं आहे.
आचार्य अत्रे याचं ‘मोरूची मावशी’ किंवा पु.ल.चे ‘ती फुलराणी’ या नाटकांच्या मध्यवर्ती कल्पना परकीय होत्या. परंतु त्यातला विनोद अस्सल मराठी मातीतला होता. पु.लं.नी ‘ती फुलराणी’ या नाटकात मराठी भाषेचे सौंदर्य रसिकासमोर पेश केले होते. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, चि.वि. जोशी, राम गणेश गडकरी यांनी सुरू केलेली परंपरा आचार्य अत्रे, पु.ल. देशपांडे यांनी पुढे नेली आणि त्यानंतर पर्व सुरू झाले ते द.मा. मिरासदार, वसंत सबनीस आणि शंकर पाटील यांच्या ग्रामीण ढंगातील विनोदाचे. या त्रयीने उभ्या महाराष्ट्राला निव्वळ हसवलेच नाही, तर मराठी विनोदी साहित्याला ग्रामीण ढंगाचे दालन उघडून ते परिपूर्ण केले.
आज विनोद साहित्याचा रथ मंगला गोडबोले, भा.ल. महाबळ, मुकुंद टांकसाळे, सुधीर सुखटणकर, सुभाष सुंठणकर वगैरे मंडळी नेटाने पुढे नेत आहेत. कोणाला ही न दुखावणारा निर्विष दर्जेदार विनोद हेच परंपरागत मराठी विनोदाचे वैशिष्ठ्य असून ते आजदेखील कायम आहे. चिंता एकाच गोष्टीची वाटते की, हे साहित्य माध्यमांकडून दुर्लक्षिले जात आहे. म्हणूनच द.मा. मिरासदार यांच्यासारख्या ज्येष्ठ साहित्यिकाच्या गाजलेल्या विनोदी कथांची आठवण होणे स्वाभाविक आहे.
मिरासदारांच्या व्यंकूची शिकवणी, माझ्या बापाची पेंड, भुताचा जन्म, माझी पहिली चोरी इत्यादी कथा उत्कृष्ट लिखाण आणि सादरीकरण यामुळे वाचकांच्या आणि श्रोत्यांच्या मनात कायमच्या कोरल्या गेल्या. त्यांचे भुताचा जन्म गप्पागोष्टी, गुदगुल्या, मिरासदारी, गप्पांगण, ताजवा, असे २४ कथासंग्रह आहेत. त्यांच्या कथांमध्ये एकाहून एक अस्सल इब्लीस, बेरकी, वाह्यात, टारगट आणि क्वचित भोळसट अशा ग्रामीण व्यक्तिरेखा कथानकाच्या केंद्रस्थानी असतात. या व्यक्तिरेखा श्रोत्यांना खळाळून हसायला लावतात. मिरासदारांच्या कथासंग्रहांतील बहुतेक कथा ग्रामीण जीवनावर आहेत. ग्रामीण जीवनातील विसंगतीचे, विक्षिप्तपणाचे आणि इरसालपणाचे दर्शन घडवून त्यातील विनोद मिरासदारांनी आपल्या कथांतून फुलवला. भुताचा जन्म हा कॉन्टिनेन्टल प्रकाशनाने केलेला कथासंग्रहदेखील त्याच जातकुळीतला आहे.
‘भुताचा जन्म’ ही या संग्रहातील पहिली कथा. गुंडगुळ्याचा माळ या जागी एका भुताचा जन्म झाला. खरं म्हणजे ही जागा तशी भुताला जन्म घेण्यासाठी सोयीस्कर नाही. इथे पडका वाडा नाही. भले मोठे पिंपळाचे किंवा वडाचे झाड नाही. बाभळीच्या काटेरी जागेवर बसण्याइतकी भुते काही मागासलेली नसतात. जवळपास एखादे स्मशानदेखील नाही. त्यामुळे अशा रुक्ष ठिकाणी जन्म घ्यावा असं कोणत्याही भुताला वाटणार नाही. परंतु जन्म कुठे घ्यायचा हे माणसे असोत अथवा भुते, त्यांच्या हातात थोडेच असतं?... ही तर विधिलिखीत गोष्ट! त्यामुळे नाही नाही म्हणता देखील भुताला या रुक्ष माळ्यावर जन्म घ्यावा लागला, त्याची खुमासदार गोष्ट. चटपटीत संवाद हे या कथेचं बलस्थान. कथेचा शेवट खूप मजेशीर आहे. कथा प्रत्यक्षच वाचायला हवी.
या संग्रहातील दुसरी गोष्ट आहे. ‘भवानीचा पक्षकार’ ही कथा म्हणजे माणसांच्या इरसालपणाचा नमुना आहे. नानाने आपले वकिलीचे दुकान थाटून पुरे सहा महिनेच झाले होते. तालुक्याच्या गावी घरी शेजारीच त्याने त्याचे ऑफिस उघडले होते. हातात कातड्याची बॅग सांभाळीत नाना रोज कोर्टात जाई. संध्याकाळी कोर्ट सुटल्यावरच परत येत असे. कागदाची रीमे, दौत, शाई सर्व तयारी झाली होती. फक्त पक्षकार येणं बाही होतं. एकही खटला त्याच्याकडे चालवायला आलेला नव्हता. नाना वाट पाहत होता पक्षकाराची. नानाला कळत होतं की नव्या वकिलांना धंदा फार अवघड झाला आहे. परंतु यातूनच मार्ग काढला पाहिजे. हळूहळू येईल कोणी तरी, एकदा का पहिले काम मिळाले की ते मन लावून करायचे. जास्तीत जास्त मेहनत घ्यायची. कायद्याचा कीस अन् कीस काढायचा कोर्ट जुने वकील आपले पक्षकार या सगळ्यावर आपली छाप पाडायची. एकदा काम यशस्वी झाले, की निम्मे यश पदरात पडले. हळूहळू अधिक काम मिळेल. कामे वाढत जातील. कामच आपला गुरू होईल. अखेर एक सुदिन उगवतो. नानाकडे पहिला पक्षकार येतो. आणि... पहिले कामच त्याला असा धडा शिकवते, जो धडा कोणत्याही कायद्याच्या पुस्तकात नसतो. वाचकाची करमणूक करीत त्याला अंतर्मुख करणारी कथा प्रचलित न्याय संस्थेवर अचूक बोट ठेवते.
या संग्रहातील तिसरी कथा आहे ‘भीमूच्या कोंबड्या’ या कथेतल्या भीमू हा आडदंड आणि तिरपागड्या डोक्याचा आणि महा इब्लीस माणूस होता. बांबू कापून त्याच्या टोप्या करणे, हा त्याचा खरं तर व्यवसाय, परंतु बांबूच्या टोपल्या करण्यापेक्षा तो कोणाच्या तरी पाठीत घालावा. असे त्याचे स्पष्ट मत होते. घरचा धंदा हा सहसा करीत नसे. केलाच तर तीन चार दिवस उगीच आपली गंमत म्हणून. नंतर त्याला लगेच कंटाळा येई. मग तो पुन्हा त्याचा नेहमीचा उद्योग म्हणजेच देवळाच्या कट्ट्यावर बसून किंवा चावडीवर बसून उचापत्या करण्याचा. ती सुरू करी. एकेदिवशी त्याने तोंडात तंबाखूचा बार भरला आणि इथून पुढे आपण कोंबड्या पाळण्याचा व्यवसाय करणार असल्याचे त्याने आपल्या मित्राला सांगितले. त्यात नफा बराच आहे. मित्राच्या लक्षात येईना, की सगळं सोडून हा कोंबड्यांचा मागे का लागला?... आली लहर आणि केला कहर! सोमा भीमूचं मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करतो. कोंबड्याचं आजारपण, त्यांचे साथीचे रोग त्यात होणारे प्रचंड नुकसान, हे सगळे समजावून सांगतो. पंरतु भिकुचा ‘या धंद्यात नफा खूप आहे.’ हे मत कायम असतं. प्रश्न असा पडतो, की नेमकी काय आहेत, त्याची गणिते?...’ कोंबड्या पालनाच्या व्यवसायातून नफा कमावण्याचे भीमुची उफराटी रीत वाचताना वाचकांच्या चेहऱ्यावर हलकेच स्मित रेषा उमटते. आणि निखळ आनंद देणारी विनोदी कथा वाचल्याचं समाधान त्याला मिळतं.
‘पंचाक्षरी’ ही अशीच एक धमाल कथा. विनोदाच्या अंगाने जात, ती माणसांच्या अंधश्रद्धेवर बोट ठेवते. तात्या गुरव या विचंवाचे विष उतरवणाऱ्या माणसाची ही गोष्ट. सारे गाव त्याला तात्या टिनपाट म्हणून ओळखते. हा त्यात्या टिनपाट तसा समज कमी असलेला माणूस. साध्या साध्या गोष्टीचं त्याला नीट आकलन होत नाही. गावात कोणाला विंचू चावला तर तो मंत्र म्हणतो आणि त्या माणसाला हातपाय झाडायला सांगतो. नंतर विष उतरल्याचे स्वत:च जाहीर करतो. खरं म्हणजे दोन तास आराम केला तरी विंचू दंशाचा परिणाम कमी होतो. त्या गावातील विंचू फारसे विषारी नसतात. परंतु विंचू चावला की तात्याला बोलवायचे, हा प्रघात पडलेला असतो. एकेदिवशी मात्र विचित्र प्रसंग घडतो. जवळच्या एका गावात एका धट्ट्याकट्ट्या मुलाला भुताची बाधा होते. आता आली का पंचाईत! बरं भूत उतरवायचं तर मांत्रिक हवा. जवळपास तर तसा मांत्रिक देखील नाही. मग कोणीतरी तात्याचं नाव सुचवतं. हा माणूस मंत्र म्हणतो आणि विंचू उतरवतो, तेव्हा हा भूतदेखील उतरवू शकेल. प्रयत्न करायला काय हरकत आहे. तात्या सुरुवातील घाबरतो. परंतु नंतर आव्हान स्वीकारतो. कथा एक मजेशीर वळण घेते. माणसांच्या प्रवृत्तीवर त्यांच्या अंधश्रद्धांवर अचूक बोट ठेवत, कथा जेव्हा शेवटला येते, तेव्हा वाचक अंतर्मुख होतो.
‘कंटाळा’, ‘आमच्या स्वयंपाकिणीचा नवरा’ हा देखील अशाच मजेशीर कथा या संग्रहात आहेत. द.मा. मिरासदारांच्या कथा नेमक्या आणि प्रवाही आहेत. शहर भपक्यापासून दूर राहणारी ही माणसे कुणाचा द्वेष करीत नाहीत. तसेच कटकारस्थाने देखील करत नाहीत. ती त्यांच्या वाटेला आलेले ग्रामीण जीवन जगत असतात. या त्यांच्या वागण्यातून अगदी सहज नैसर्गिक विनोद जन्माला येतो. हा निर्विष, कुणालाही न दुखावणारा विनोद हीच ‘मिरासदारी’ आहे.
ग्रामीण जीवनातील विसंगती, इरसालपणा आणि त्यातून अभवितपणे होणारी विनोद निर्मिती हे वैशिष्ट्य असलेले द.मा. मिरासदार १९९८ साली परळी येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांच्या विनोदाने मराठी वाचकाला अमाप आनंद दिला, हे निश्चित!
– डी. व्ही. कुलकर्णी