PurvaNice
Pankaj Kharade, Vachanveda Group` मन में हैं विश्वास ` नंतर विश्वास नांगरे सरांचे पुढील पुस्तक म्हणजे ` कर हर मैदान फतेह` .
विद्यार्थ्यांना आणि नवयुवक यांना अतिशय मार्गदर्शन पर असे हे पुस्तक विद्यार्थ्यांनी तर नक्की वाचावेच पण पालकांनीही ते जरूर वाचायला हवे .
सरांचे मन में हैं विश्वास हे पुस्तक आणि त्याविषयी माहिती मी या ग्रूपवर शेअर केली होती त्याविषयी अनेक उलट सुलट किंवा नकारात्मक आणि विरोधी कमेंट काही वाचकांच्या आल्या होत्या . नांगरे पाटील यांनी या पुस्तकात स्वतःची आत्मप्रौढी वगैरे मिरवली आहे असा काहीसा त्यांचा स्वर होता. हे त्यांचे आत्मचरित्र आहे , आणि त्यात त्यांनी केलेले संघर्ष आणि त्यांच्या अथक परिश्रमातून त्यांना मिळालेले यश त्यांच्याच भाषेत सांगायचं झालं तर पोल वॉल्ट सारखी उंच उडी त्यांनी मारली आणि त्याचे वर्णन केले तर ती आत्मप्रौढी होऊ शकत नाही. एखाद्या लेखकाने स्वतःच्या गरिबीचे आत्मकथन केले की आपल्याला त्यांच्याविषयी सहानुभूती वाटते पण जर तशाच एखाद्या लेखकाने स्वतःच्या संघर्षाचे आणि मिळालेल्या यशाचे वर वर्णन केले की ती आत्मप्रौढी होते काय? ..
असो या गोष्टीवर अनेक वादविवाद असू शकतात पण आधीचे पुस्तक हे खूप सकारात्मक ऊर्जा देणारे होते विषेतः कॉलेज आणि काहीतरी बनू इच्छिणाऱ्या युवकांसाठी . यूपीएससी झाल्यानंतरचा विश्वास सरांचा पुढील प्रवास हा तितकाच प्रेरक आणि मार्गदर्शन पर आहे .
फक्त विद्यार्थीच नाही तर प्रत्येक पालक , नागरिक ,महिला आणि अबालवृद्ध यांना मार्गदर्शन करणारे उद्बोधक नियम आणि कायदे सरांनी अनेक उदाहरणे , अनेक थोर व्यक्तींची सुभाषिते आणि विचार मांडून पटवून दिले आहेत .
शरीर आणि मन निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी कोणते व्यायाम किंवा योग करावे , महिलांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी काय करावे किंवा काय करू नये, लहान मुलांच्या हाती मोबाईल देताना पालकांची कोणती कर्तव्ये आहेत . किंवा डिजिटल बँकिंग वापरताना कोणती खबरदारी घ्यावी . अगदी आपले डिजिटल पासवर्ड कसे असावे आणि कधी बदलावे या विषयी अगदी कळकळीने विश्वास सर व्यक्त झाले आहेत . विपरीत परिस्थिती कशी हाताळावी , आलेल्या संकटसमयी त्याला धैर्याने कसे सामोरे जायला हवे , सर्व काही असताना डिप्रेशन का येते आणि त्यातून कसे सावरावे हे सर सांगूच शकतात कारण जिया खान किंवा सुशांत राजपूत सारखी अनेक प्रकरणे त्यांनी हाताळली आहेत .
वर्दीच्या आतला प्रत्येक पोलिस हा एक नागरिक असतो आणि प्रत्येक नागरिक हा बिन वर्दीचा पोलिस असतो . किती अर्थपूर्ण आहे हे विधान . अशा अनेक गोष्टी आणि प्रसंग वाचताना खूप आत्मविश्वास निर्माण होतो .
म्हणून प्रत्येकाने हे पुस्तक जरूर वाचावयास हवे असे मला वाटते.🙏
DAINIK LOKMAT 04-07-2021प्रेरक स्वानुभव...
‘मन में है विश्वास’ या आत्मकथनाच्या अभूतपूर्व यशानंतर प्रसिद्ध आयपीएस अधिकारी आणि मुंबईचे विद्यमान पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचे ‘कर हर मैदान फतेह’ हा आत्मकथनाचा दुसरा भाग ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’ने प्रकाशित केला आहे. ‘मन में है विश्वास’मध्ये नांगरे पाटील यांनी त्यांचा सुरुवातीचा संघर्षाचा कालखंड मांडला आहे. त्यांची आयपीएसमधील निवड हा त्यातील सर्वोच्च बिंदू होता. ‘कर हर मैदान फतेह’ या दुसऱ्या भागात त्यांनी आयपीएस निवडीनंतर कुंभार मातीला आकार देतो, तसे एका युवकाचे एक अधिकाऱ्यात रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला शब्दबद्ध केले आहे. समाजाला भेडसावणाऱ्या समस्या या पुस्तकातून नांगरे पाटील यांनी युवावर्गाला समजेल, अशा सोप्या शब्दांत सांगितल्या आहेत. सायबर गुन्हे, पोलीस प्रणाली, व्यसनाधीनता, सार्वजनिक जीवनात सुरक्षितता, वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाचे व्यवस्थापन, वेळेचे व कामाचे नियोजन या विषयांना नांगरे पाटील यांनी त्यांच्या अनुभवांच्या आधारे रंजक बनवण्याचा प्रयत्न केला आहे. हे पुस्तक त्यांच्या अनुभवांची, प्रशिक्षणाची व कर्तव्यांची सरमिसळ आहे. ज्याला जे पाहिजे, ते त्यातून निवडून घेऊन ते आपापल्या व्यक्तित्वाशी सांगड घालू शकतील, अशी या पुस्तकाची मांडणी आहे.
Meenakshi Sonawaneकर हर मैदान फतेह.
विश्वास नांगरे पाटील
(मेहता पब्लिशिंग हाऊस)
जानेवारी महिन्यात `चला हवा येऊ द्या` कार्यक्रमात `कर हर मैदान फतेह` पुस्तक प्रकाशित झाल्याचं समजलं......,
`मन मै है विश्वास` आत्मकथनामध्ये सुरवातीचा संघर्ष वाचला होता, आता उत्सुकता होती ती कर हर मैदान फतेहची......
तरुण वयातील प्रचंड ऊर्जा, उत्साह आणि ताकदीला सकारात्मक दिशा दाखवणारा मार्गदर्शक म्हणजे कर हर मैदान फतेह.
कोकरूड सारख्या छोट्याशा खेडेगावातील कोकरू...... आय. पी. एस. अधिकारी म्हणून निवड झाल्यानंतर कुंभार मातीला आकार देतो तसे एका युवकाचे एका अधिकाऱ्यांमध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न आहे.
एकाच वेळी आय पी एस ,उपजिल्हाधिकारीआणि विक्रीकर निरीक्षक या पदावर निवड झालेला आणि कोणतीही शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक पार्श्वभूमी नसलेला ग्रामीण भागातील तरुण. प्रवेशावेळची घुसमट, त्यातलं द्वंद्व आणि कमान हाती घेतली की सुरू होणारं भन्नाट जीवन. शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक अंगाची जाणीवपूर्वक केलेली मशागत आणि त्यातून रोज नव्याने घडणारा `विश्वास`.
मुळात क्षमतांचा विकास न्यूनगंडाचा खात्मा करून आत्मविश्वासाच बीज प्रेरणारा हा प्रवास....... आपणास खूप काही शिकवून जातो. या पुस्तकात आपणास लबास्ना,एन पी ए, आऊट डोअर ट्रेनिंग, व्यवस्थापन जीवनाचे व व्यवसायाचे, अडथळे आणि आत्मघात याविषयी सविस्तर वाचायला मिळते.अनुभव आणि प्रसंग अधिक जिवंत वाटण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी सुविचार, श्लोक, उदाहरणे ,कवने दिली आहेत.(अगदी डायरीत नोंद करून ठेवावी अशी) वाचताना मसुरीची थंडी, लबात्स्ना ट्रेनिंग सेंटर, हैदराबाद सेंटर चे चित्र डोळ्यासमोर उभे राहते तसेच पिळदार मिशा, उस्ताद, कुस्तीचा आखाडा, गवळोबाचा डोंगर, कोल्हापुरी तांबडा पांढरा आपल्याला कोल्हापूर फिरवून आणल्याशिवाय राहत नाही.
या पुस्तकामुळे आपणास जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन, प्रचंड इच्छाशक्ती,उत्साह मिळतो.
पुस्तकातील आवडलेला एक उतारा....
`तुम्ही हळूहळू मरता, जेव्हा तुम्ही भटकत नाही,प्रवास करत नाही,वाचन करत नाही,जीवनाचं संगीतच ऐकत नाही, तुम्ही स्वतः च कौतुकच करत नाही,स्वतः च मन मारून तडजोड करत राहता. आयुष्याला सुंदर वळण देण्याचा धोकाच स्वीकारत नाही.स्वतः च्या स्वप्नाच्या मागे धावत नाही आणि त्यांच्या पूर्ततेसाठी झपाटून झोकून देत नाही त्यावेळी तुम्ही हळूहळू मरता. आयुष्यातील प्रत्येक क्षण जगा, प्रत्येक क्षण वेगळा आहे आणि वेगळेपणात आनंद आहे.जीवन किती सुंदर आणि अर्थपूर्ण आहे,त्याचे संदर्भ किती विविध अंगांनी नटलेले आहेत...............( बाकी तुम्ही प्रत्यक्ष वाचा)
प्रत्येकाने आवर्जुन वाचावे असे पुस्तक.
शेवटी
" इन मुटठीयो में चांद तारे भर के
आसामा की हद से गुजर के
हो जा तू भीड से जुदा, भीड से जुदा
रे बंदिया
कर हर मैदान फतेह.........
Ashok Jadhav`मन मे है विश्वास `या विश्वास नांगरे पाटील यांच्या पहिल्याच पुस्तकात त्यांनी त्यांचं बालपण, शिक्षण यांचं सुंदर चिञण रेखाटलेले आहे.खरं तर या पुस्तकातुन त्यांच्या वाचनाच्या व्यासंगाची व सशक्त लेखणीची चुणूक जाणवली.आय.पी.एस.च्या स्वप्नपूर्ती साठी घेतलेली मेहनत,जिद्द, चिकाटी या पुस्तकात छान चितारली आहे.
आय.पी.एस.म्हणून निवड झाल्यानंतर एक सक्षम,कर्तव्यदक्ष अधिकारी बनण्यासाठी खडतर अशा प्रशिक्षणाला सामोरे जाताना आलेले अनुभव व त्यातून घडलेला एक खराखुरा वर्दीतला संवेदनशील अधिकारी याचं सर्वांना प्रेरणा देणारं अनुभवजन्य शब्दांकन म्हणजे "कर हर मैदान फतेह"हे विश्वास नांगरे पाटील यांचं दुसरे वाचनीय पुस्तक.
तुमचे जगातील स्थान नेहमीच बदलत असते.साबण तयार करायला तेल लागते आणि तोच साबण तेलाचे डाग साफ करायला लागतो. स्वतःचे रडगाणे गायचे नाही आणि स्वतःची टिमकी ही वाजवायची नाही.प्रवासात लागणार्या ठेचांनीच शहाणपण येते.अशा कित्येक प्रेरणादायी टिप्स त्यांनी या आत्मकथनातून वाचकांना दिल्या आहेत.
Rajesh Damaleसर, कालच ` कर हर मैदान फतेह ` हे तुमचं पुस्तक वाचून संपवलं.
तत्ववेत्ता,अभ्यासक, वाचकाचा मित्र, मार्गदर्शक आणि गोष्टी वेल्हाळ लेखक अशा आपल्या विविध पैलूंची उत्तम गुंफण आपण पुस्तकात केली आहेत. त्यामुळे पुस्तक वाचकांची घट्ट पकड घेते.
जगण्याची सकारात्मक ऊर्जा देणारं, केवळ तरुणांनाच नाही तर सर्व वाचकांना दिशा देणारं असं हे पुस्तक आहे. देशी विदेशी दाखले दिल्यामुळे विषयाची परिणामकारकता उत्तम साधली गेली आहे.
तुम्ही प्रस्तावनेत पुस्तकासाठी वापरलेला
` मंजिरी ` शब्द अप्रतीम.
त्याच प्रमाणे पोलिसिंग मध्ये केलेला ` समानुभूती ` चा प्रयोग स्तुत्य.
खरंतर प्रत्येक नागरिकानेच नव्हे तर पोलीस खात्यातील प्रत्येक अधिकाऱ्याने, कर्मचाऱ्याने देखील हे पुस्तक वाचलेच पाहिजे. कारण त्यामुळे
ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदानात म्हटल्या प्रमाणे
दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो.. या ओळी प्रत्यक्षात येण्यास मदत होईल.
खरं तर आणखी बरंच काही लिहिण्यासारखे आहे.
पण आता थांबतो.
असे उत्तम पुस्तक आम्हा वाचकांना उपलब्ध करून दिल्या बद्दल सर, आपले मनःपूर्वक आभार...
शुभेच्छा...!
- राजेश दामले
SHEETAL GAIKWADमाननीय श्री विश्वास नांगरे पाटील साहेब यांनी लिहिलेले." कर हर मैदान फतेह "हे अतिशय उत्कृष्ट पुस्तक !!या आधीच आलेले ."मन है विश्वास "आणि त्याची पुढची पायरी म्हणजे "कर हर मैदान फतेह "अगदी पुस्तकाच्या शीर्षकाप्रमाणे प्रत्येक ओळीत प्रत्येक शीर्षकास `जगल` आहे हे पुस्तक !! पुस्तकाची सुरुवातच `जिंकायचंय `अशा शब्दाने सुरु होते.
"सर्वोत्कृष्ट ज्ञानपीठ" म्हणता येईल या पुस्तकास !! पुस्तकाच्या सुरुवातीपासूनच एक सर्वसामान्य युवक जो ध्येय गाठण्यासाठी ध्येयपूर्ती साठी करत असलेली धडपड कळकळ स्वत ला त्या प्रत्येक ढाच्यात साच्यात बसवताना घेतलेली मेहनत अतिशय अप्रतिमरीत्या मांडलेले आहे .
पुस्तक वाचताना प्रत्येक सर्वसामान्य मुलाला माणसाला हे आपलेसे वाटणारे बांधून ठेवणारी ओघवती शैली ,अतिशय उत्कृष्टरीत्या दिलेले समर्पक उदाहरणे जी उदाहरणे त्यांच्या वाचनातून जमा करून टिपून ठेवलेले अशी अप्रतिम प्रसंग !! काही प्रसंगांमध्ये वापरलेल्या ग्रामीण शब्दांचा उत्कृष्ट वापर , महाभारतातील काही प्रसंग श्लोक ,रामायणातील "हनुमान सुरसा" प्रसंग बोधकथा तरूणांना विचार करावयास भाग पाडणारे आहेत.त्याचबरोबर अनेक भारतीय लेखक , परदेशी लेखकांचे उत्कृष्ट बोधकथा , कविता, पत्रे त्यांचे विचार प्रसंग त्यांनी प्रसंगानुरूप त्यांनी घेतलेले निर्णय ,भारतीय सिनेमांमधून दिले गेलेले उत्तम सांघिक उदाहरणे यांचे खूप उत्तम संकलन या पुस्तकात मांडण्यात आलेलं आहे .
रडत कुढत बसण्यापेक्षा `पोल व्हॉल्ट` सारखी आसमान भरारी घेतलीच पाहिजे .`मोठी झेप घ्यायची असते त्यावेळी पाठीमागची पूल पेटवून द्यायचे असतात.` अशी अनेक प्रेरणादायी वाक्य !! पुस्तकातील अष्टांग योग या सत्रातील वय वर्ष आठ ते शहाऐंशीव्या वर्षापर्यंतचे विस्तृत विवेचन माझ्यासारख्या सर्वसामान्य वाचकास हे पुस्तक अनेक अप्रतिम उदाहरणे घोषवाक्य, अभंग, संस्कृत ु श्लोकांचे बोधकथांचा खजिनाच आहे .मानवी शरीराच्या प्रत्येक अवयवाचे कार्य सुद्धा वर्णन केलेले आहे .
आयपीएस चे ट्रेनिंग कालावधीतील काही प्रसंग वाचताना वाटते की आपणच स्वतः हे सगळे ट्रेनिंग अनुभवतो आहोत असा जिवंतपणा प्रत्येक प्रसंगात ओघवत्या शैलीत मांडलेला आहे .त्यांनी आत्तापर्यंत घेतलेले अतिशय चांगले न वाईट अनुभव प्रसंग ,चांगले वाचन आणि त्या चांगल्या वाचनातून टिपून ठेवलेले गोष्टी , प्रसंग,कथा,घडलेल्या प्रसंगातून घेतलेला चांगला व वाईट बोध हे अख्ख्या जगासमोर एका पुस्तकातून ठेवले.`शिवरायांची आठवावे।जीवित्त तृणवत मानावे। इहलोकी परलोकी उरावे कीर्तिरूपी अशी छत्रपती शिवरायांशी स स्तुतिसुमने वाचताना अंगावर रोमांच उभे राहतात. पुस्तक जसे जसे पुढे सरकत जाते तसे तसे त्याच्या कक्षा हा अधिक व्यापक होत गेल्या आहेत.पुस्तकातील काही भावनिक प्रसंग हे आपल्याच आयुष्यातील साधर्म्य असलेले वाटतील असे उत्कृष्टरितीने मांडलेले आहेत.फक्त युवकांसाठीच नाही तर प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाला आजच्या या सायबर युगात ,ऑनलाईन युगात सोशल मीडियाच्या जगात वावरण्यासाठी दिलेले महत्त्वाचे सल्ले, युक्त्या अतिशय अनमोल आहेत .आरोग्यविषयक सवयी कशा असल्या पाहिजेत याचं विवेचन आहे .महिलांना व तरुणींना ओढवलेल्या बिकट प्रसंगांना कशा पध्दतीने तोंड दिले पाहिजे याच्या युक्त्या पण दिलेल्या आहेत .पूर्ण पुस्तकात युवावर्गाला तरूणांना तरूणींना अतिशय जोशपूर्ण असे आव्हाने केलेले आहेत.तरुण वर्गाला, पालकांना ,नोकरदार महिलांना, गृहिणींना सजग राहून कशाप्रकारे वाटचाल केली पाहिजे हया गोष्टी सांगण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला आहे .महिलांना तरूणींना संरक्षणासाठी केलेले कळकळीचे आवाहन व युक्त्या दिलेल्या आहेत .सर्वसामान्य नागरिकांसाठी उपयुक्त असलेल्या प्रत्येक गोष्ट अगदी फेसबुकच्या पासवर्ड कसा असावा यापासून तर सायबर क्राइम कसा होतो ,पालकांनी आपल्या मुलांची प्रायव्हसी जपून त्यांच्याशी संवाद कसा साधावा.या सगळ्या गोष्टींचे उपयुक्त मार्गदर्शन या पुस्तकात केलेलं आहे .
या सगळ्या प्रवासात त्यांना भेटलेले त्यांचे गुरू त्यांचे मित्र ,त्यांचे वरिष्ठअधिकारी , सहप्रवासी ,अर्ध्यावर साथ सोडून गेलेले काही आदर्शवत व्यक्तिमत्त्व व त्यांना या सर्व प्रवासात कुटुंबाकडून मिळालेले प्रेम व साथ !!हेसुद्धा उत्कृष्टरीत्या भावनिकरीत्या नमूद केलेले आहे .
"मन हेेै विश्वास "हे पुस्तक वाचताना एक वडिलांचे स्वप्न पूर्ण करायला निघालेला ध्येयवेडा तरूण .अनेक असाध्य वाटणाऱ्या गोष्टी साध्य करण्यासाठी मनातील विश्वासावर केलेली वाटचाल आणि त्यानंतरच `जिंकायचाच` या या प्रेरणेने सुरू केलेले "कर हर मैदान फतेह "हे अप्रतिम पुस्तक !! पुस्तक वाचताना आई वडिलांचे स्वप्न डोळ्यात घेऊन निघालेला भावनाप्रधान कर्तृत्ववान मुलगा ,कुटुंबवत्सल कुटुंबप्रमुख , पोलिस कुटुंबियांविषयी प्रेम त्यांच्याविषयी असलेल्या अतिशय बारीक सारीक समस्या व त्या सर्व गोष्टींवर लक्ष केंद्रित करून त्या सर्वांसाठी उचललेली पावले !! कर्तव्यावर असताना मराठवाड्यातील आत्महत्या केलेल्या तरुणीचे भावनिक पत्र ! ते पत्र वाचताना वर्दीतील अधिकार्याची भावनिक झालेली घालमेल ! तरुण मंडळी सहजरीत्या आयुष्य संपवण्याचे घेत असलेल्या निर्णयावर केलेले भावनिक आवाहन !!हे सर्व काही या एका पुस्तकात वाचकास अनुभवास येते.सरांचा आजपर्यंतचा प्रवास त्यांनी राबविलेले उपक्रम घेतलेले निर्णय ,युवा पिढीला दिलेली साद
सर्वच खूपच कौतुकास्पद प्रेरणादायी .लबास्ना गेटवर ठेवलेले पहिले पाऊल तरदीक्षांत परेडमध्ये मजबूतपणे आणि सन्मानपूर्वक पडत असलेले पावले !!शपथग्रहण आनंदी झालेल्या आईवडिलांची चेहरे !!सर्वच खूप अतुलनीय ,अभूतपूर्व , कौतुकास्पद !! आणि शेवटी मी भारतमातेचा पुत्र आहे !!
"देहाकडून देवाकडे जाताना मधे देश लागतो "आणि आपण या देशाचे देणे लागतो " .या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ओळींना जगलेलं व्यक्तिमत्त्व !!
कर दिखावो कुछ ऐसा की दुनिया बनना चाहे आप जैसा !!
संजय गोविलकरआदरणीय सर,
‘कर हर मैदान फतेह’ हे पुस्तक जेव्हा प्रत्यक्ष आपल्याकडून आपल्या स्वाक्षरीने हातात पडलं तेव्हा मनस्वी आनंद झाला. आपल्या केबिनबाहेर पडल्या पडल्या ताबडतोब पुस्तक चाळायला सुरुवात केली. पुस्तक उघडलं सुरुवात रीकॅपमध्ये ‘मन में है विश्वास’ या पुस्तकाचा प्रवास आणि आपण यू.पी.एस.सी.च्या चक्रव्यूह भेदण्यासाठी केलेली अथक मेहनत पुन्हा एकदा नजरेसमोरून तरळून गेली. यासाठी ३ वर्षे नरसोबाच्या वाडीला मटन न खाण्याची शपथ ‘दिल को छु गई’.
पुन्हा पुढे तुम्ही एकटेच लबास्नाला गेला नाही, तर वाचकांना सुद्धा लबास्नाला घेऊन गेलात. उत्तरखंडच्या मसुरीचं दर्शन घडवलंत आणि हे दर्शन घडवता घडवता ज्ञानरूपी पुष्पचा सुगंध दरवळत ठेवलात. विविध थोर संत, तत्त्वज्ञ, लेखक यांचे विचार इतके बेमालूमपणे वाचकांसमोर मांडले आहेत, की आपल्या शब्दातून आमच्यापर्यंत अगदी लीलया पोहोचत होते. पुस्तक वाचताना कुठेही गंभीरपणा येऊ न देता वातावरण हलके-फुलके ठेवत प्रवास पुढे चालू होता आणि त्या प्रवासात आम्ही तुमच्या सोबत प्रवास करत असल्याचा भास होत होता.
पुढे ब्रेक न घेता नॉट नावाची हरिन हॅनसनची फॅन्सी कविता खूप काही शिकवून जाते. लगीनघाईमध्ये तर सारं चित्र डोळ्यांसमोर तरळून गेलं आणि त्याही अवस्थेत पण त्या पलीकडे जाऊन आपण हे सर्व पाहत होतात याची एक वेगळीच अनुभूती मिळाली.
पुढे एम.पी.ए. सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अॅकॅडमीचे दर्शन घडवलं. ट्रेनिंगमध्ये ५४ आठवड्यांचा प्रवासात आम्हाला ही घेऊन गेलात.
आऊटडोअर ट्रेनिंगमध्ये योगा अशा अनेक बाबी वाचताना स्वत: निरोगी मन आणि निरोगी शरीर बनत होतं. यापुढे सहलीला गेल्यावर घोड्यावर बसताना नक्कीच आपली आठवण येणार.
इनडोअर ट्रेनिंगमध्ये तपासाची कौशल्य पुन्हा एकदा शिकायला पाहिजे, असे नकळत वाटून गेलं. सर मी स्वत: शिष्टाचार कटाक्षाने पाळतो, पण ते पाळलेच पाहिजेत.
व्यवस्थापन जीवनाचे आणि व्यवसायाचे यात पोलीस दलातील कठोर कर्तव्य करताना सामाजिक भान ठेवत डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा झाला आणि हे सर्व हाताळताना ‘दंगल से डर नही लगता साहब, एन्क्वायरी से लगता है। असं सांगत.’
माझी संघटना माझे कुटुंब यात ऑगस्ट ऑलमोरेने पोलीसांचं विश्लेषणात यांची अजरामर कविता आणि त्याचा अनुवाद पोलीसांच्या आणि वाचकांच्या हृदयाला स्पर्श करून जातो. अशा या संघटनेचे प्रमुख आमचे नेतृत्व पाहताना आपल्याबद्दल आदरयुक्त दरारा वाढत जातो. सन २०२० या काळातील सर्वांत कठीण वर्ष ‘करोना से डरोना’ मध्ये आणि आपण वैयक्तिक स्तरावर आपल्या दलाची काळजी घेतानाचं चित्र स्पष्ट दिसत होतं. मी स्वत: ही कर्तव्य करताना करोना संपूर्ण परिवारासह पॉझिटिव्ह झालो होतो. तेव्हा याचे महत्त्व आणि आपण केलेले उत्तुंग कर्तव्याचीही जाणीव झाली.
कम्युनिटी पोलिसिंग आणि लीडरशिप हे वाचताना स्मार्ट पोलिसिंग याची उजळणी झाली आणि आपण घेतलेल्या ‘मास्टर्स डिग्री इन पोलीस मॅनेजमेंट’ आणि त्यासोबत संवेदनशील पोलीस अधिकारी याचा प्रत्यय येत होता. मी नुकताच ताडदेव पोलीस ठाणे येथे कर्तव्य करत असताना आवर्जून फिडबॅक फॉर्म पाहायचो. गस्त घालताना क्यु बार कोड ही एक अभिनव संकल्पनेमुळे पोलीस ठाण्याचे सर्व परिसरात घारीसारखी नजर ठेवता येते. नवीन बाबी आल्या, की मनुष्य स्वभावानुसार स्वीकारायला थोडं जड जातं, पण अंतिमता हीत समाजाचे आहे, हे समजलं की हे स्वीकारणं ही सोपं जातं. कायझेन प्रणाली ही तर माझी आवडती प्रणाली. मृत्युशय्येवर असलेल्यांना आपण डायरेक्ट कमिशनर करून टाकलंत.
बालकासोबत बालक, एक कुटुंबवत्सल पिता व फिटनेस प्रेमी अशी अनेक गोष्टी पुस्तकातून पाहावयास मिळाल्या. कोल्हापुरातील पोलीस उद्यान आणि ३०० फुट उंचीचा तिरंगा पाहताना प्रत्येक भारतीयाचं उर अभिमानानं भरून येतं. आणि मी मुळचा कोल्हापूरचा असल्याने स्वत: जाऊन या गोष्टी पाहून आलोय.
अडथळे आणि आत्मघातमध्ये पोलीस दलातील आपल्यासारखेच सर्वांचे आवडते हिमांशु रॉय यांची आठवण जागवलीत. कुब्लर रॉसचा मानसशास्त्रीय सिद्धांत हा सर्वांनी वाचलाच पाहिजे. मोबाइल, नाती आणि मनाचं आरोग्य यात दलाई लामांच्या ओळी आणि नकळत मोबाइल नक्की कसा वापरावा याची माहिती ही समजली. मोबाइलच्या अनुषंगाने आत्मपरीक्षणही करायला भाग पाडलेत.
युवा उर्जा, सुरक्षा आणि विचारांची संसद यात आजच्या युगातील ज्वलंत प्रश्न म्हणजे सायबर गुन्हेगारी यावर छान प्रकाश टाकला आहे. खरंतर यावर बरंच काही लिहिण्यासारखं आहे. नुकताच ‘चला हवा येऊ द्या’ यामध्ये आपणास सहकुटुंब पाहिलं त्यावेळी फोन करायचा मोह आवरत नव्हता. परंतु प्रचलित प्रोटोकॉलमुळे स्वत:ला आवर घातला. सर एवढ्यात लिखाणावर थांबू नका तर दीक्षांत परेड झाल्यावर खरी सुरुवात होते. तशी आपल्याला अजून बरंच लिखाण करायचं आहे. ज्ञानेश्वरांनी जसं सुलभ भाषेत ज्ञानेश्वरी पोहोचवली, तशी आजच्या तरुणांना एका विश्वासाची गरज आहे. ती आपण नक्कीच पूर्ण करत आहात याची मला खात्री आहे. मोबाइलच्या जगात स्पॅन ऑफ अटेन्शन फार कमी होत चाललं आहे आणि अशा वेळी आपण पण अशा पुस्तकाच्या रूपाने त्यांना पुन्हा वाचकांना वाचनाकडे वळवत आहेत ही एक वाचक म्हणून मनस्वी आनंद देणारी बाब आहे.
उपनिषदे संस्कृतमध्ये असून त्यातील तत्त्वज्ञान अभ्यासाला अवघड आहे. भगवतगीतेत ते सुलभपणे सांगितले आहे. ज्ञानेश्वरांनी अनेक उपमा आणि दृष्टांत याचा उपयोग करून सुलभ मराठी भाषेत वाचकांना सांगितले आहे. आपलं पुस्तक वाचताना शेवटच्या प्रकरणातील ज्ञानेश्वरांचे पसायदानाच्या ओळी चपखल बसतात. ‘कर हर मैदान फतेह’ हे एक पुस्तक वाचलं तर शंभर पुस्तक वाचल्याचं समाधान लाभतं. आपण असंच लिहीत राहावं ही सरस्वती मातेकडे प्रार्थना. निरोप घेण्यापूर्वी आपल्या आई-वडिलांना आणि कुटुंबीयांस सस्नेह नमस्कार...
संजय लक्ष्मण कदम‘कर हर मैदान फतेह’ आत्ताच वाचून संपविले व अंगावरचे शहारे असतानाच आपणांस पत्र लिहायला बसलो. अर्थात पेन्सिलने ओळी व कंस केलेले असल्याने पुढे परत परत वाचनासाठी त्याचा उपयोग होणार आहे.
मला आवडलेली वाक्ये, परिच्छेद व शब्दप्रयोग या सर्वांचा उल्लेख जर येथे केला, तर कित्येक पानांचे पत्र तयार होईल म्हणून तो मोह टाळून पत्र लिहीत आहे.
सुरुवातीलाच दैववादी राहायचे नाही, आव्हाने स्वीकारायची व संकटांना घाबरायचे नाही, असे लिहिल्याप्रमाणे आपण अक्षरश: ताजमहाल हॉटेलमध्ये दहशतवाद्यांना भिडताना तसे दाखवून दिले.
आपण अकादमीतील प्रशिक्षणाचे बारकावे व त्यातून मिळणारे संदेश, अनुभव अशाप्रकारे मांडले आहेत, की अक्षरश: आपण ट्रेनिंग घेताना आम्ही आपल्याला पाहत आहोत, असा वेळोवेळी भास झाला. एवढे हुबेहुब आपण लिखाण केलेत. रात्री पुस्तक वाचल्यावर पुढे काय असणार अशी हुरहुर असायची व लगेच सकाळी उठल्यावर वाचायला सुरुवात करायचो.
शरीरात निर्माण होणारे हार्मोन्स व विविध कोशंट यांनी सोप्या भाषेत केलेली उकल माझ्या सारख्यांना फारच आवडणारी आहे. मोबाइल, नाती आणि मनाचे आरोग्य हा धडा तर अप्रतिमच! परत परत वाचावा व पालकांनी व विद्यार्थ्यांनी अवलंब करावा असा आहे.
आपण राबविलेले अनेक उपक्रम, त्यात युवाऊर्जा, सुरक्षा आणि विचारांची संसद हे प्रकरण तर निव्वळ प्रेक्षणीय आहे.
अखेर आपण मांडलेले ज्ञानदेवांचे पसायदान व छत्रपतींच्या आदर्शासाठी समर्पण सेवा आणि त्याग हे सर्व वाचल्यावर आपल्या व्यक्तिमत्वाची व ध्येयांची ओळख झाली व आपल्या अधिपत्याखाली काम करण्याची संधी हुकली याची खंत वाटली. परंतु आपण कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस सेवेत आम्ही देखील होतो याचा सार्थ अभिमान वाटला.
सर, यापुढे देखील आपणाकडून अशीच साहित्य निर्मिती होवो ही सदिच्छा व्यक्त करतो.
Maharashtra Times Samwad 24-2-2020`एकलव्यां` ना विश्वास देणारे पुस्तक ....एक कर्तव्यदक्ष, धाडसी पोलीस अधिकारी इतकीच विश्वास नांगरे पाटील यांची ओळख मर्यादित नाही. हे नाव विश्वासार्ह `ब्रँड` बनले आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यांर्थ्यांसाठी तर ते जणू दैवतच. बहुसंख्य विद्यार्थी त्यांनाच आदर्श मानून या परीक्षांची तयारी करतात. अशा या `आयपीएस` अधिकाऱ्याची आत्मकथा `मन मै है विश्वास!` या पुस्तकातून पुढे आली होती, त्यातून `आयपीएस` बनण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास सर्वांसमोर आला होता.`कर हर मैदान फतेह` हे पुस्तक या आत्मकथेचा दुसरा टप्पा आहे.यात `आयपीएस` झाल्यानंतरचा त्यांचा आतापर्यंतचा प्रवास उलगडत जातो. `आयपीएस` अधिकारी म्हणून निवड झाल्यानंतर आवश्यक प्रशिक्षण घेऊन `ड्युटी` सांभाळताना सुरुवातीच्या टप्प्यात करावा लागणार संघर्ष आणि उच्चपदस्थ अधिकारी म्हणून नेतृत्व करताना आलेले अनुभव यात वाचायला मिळतात. प्रस्तावनेतच कॉमर्समधील परिभाषांचा वापर करत, ज्ञान व शिक्षणातल्या गुंतवणुकीच्या आधारे जीवनाचा ताळेबंद कसा उत्तम राहील, हे लेखकाने मांडले आहे. आयुष्यातील वेळेचे काटेकोर नियोजन, तीन `एफ` , तीन `एच`, आणि तीन `एस` चे महत्वही त्यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केले आहे. `आयपीएस` पदी निवड झाल्यानंतर या ग्रामीण युवकाला प्रशिक्षणासाठी जावे लागले. सुरुवातीला मसुरी येथील `लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकादमी` त दाखल होताना, तिथली व्यवस्था आणि वातावरण पाहून आलेलं दडपण; त्यावर केलेली मात, त्यानंतर हैद्राबाद येथील `सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी` तील `भारतीय पोलिस सेवेचे ` प्रशिक्षण आणि शेवटी `प्रॅक्टिकल` प्रशिक्षण या सर्वांचे सविस्तर वर्णन आपल्याला वाचता येते. या प्रशिक्षणामुळे लागलेल्या सकारात्मक सवयी; त्यामुळे व्यक्तिमत्वात झालेले रचनात्मक बदल, त्याचा भविष्यातल्या आव्हानांना तोंड देताना झालेला फायदा, या बाबी लेखकाने प्रांजळपणे मांडल्या आहेत. ज्यांना या अकादमीत जाऊन प्रशिक्षण घेता येत नाही, त्यांना हि प्रक्रिया समजावून देण्याचा प्रयत्न नांगरे पाटील यांनी या पुस्तकाद्वारे केला आहे. या प्रशिक्षणात उलगडत गेलेले कायद्याचे स्वरूप, तपासाचे कौशल्य, व्यूहरचना, निरीक्षणक्षमता, पुरावे गोळा करण्याचे कसब, नेतृत्वगुण, काम्युनिटी पोलिसिंग आदींचा उल्लेख पुस्तकात ओघाने येत राहतो. प्रशिक्षणानंतर कायदा आणि सुव्यवस्थेच्या पोलादी चौकटीत शिरतानाचे अनुभव, सेवेदरम्यान रोज नवी आव्हाने, बदलत्या अपेक्षा, गणवेषाचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न, मुथूट दरोडा, चाकण दंगल, डॉल्बीमुक्त गणेशोस्तव अशा काही घटनांचे तपशीलही या पुस्तकात येत जातात. सुभाषिते, वचने, श्लोक, अवतरणे, संदेशांचा वापर केल्याने, हे लेखन अतिशय ओघवत्या शैलीत झाले आहे. विशेष म्हणेज, हे पुस्तक त्यांनी पोलीस दलातील सर्व करोना योद्ध्यांना समर्पित केले आहे. `माझ्यासारख्या तळागाळातल्या, कष्टकऱ्यांच्या, कामगारांच्या घरातल्या अपुऱ्या साधन-सामग्रीनं आणि पराकोटीच्या ध्येयनिष्टेनं कुठल्या तरी कोपऱ्यात ज्ञानसाधना करणाऱ्या अनेक `एकलव्यां` ना दिशा दाखवण्यासाठी मी हा पुस्तक-प्रपंच केला आहे,` असे नांगरे पाटील म्हणतात. एकूणच अशा एकलव्यांना मैदान फतेह` करण्याचा `विश्वास` देणारे हे पुस्तक आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
रुचिरा जोशीमी (रुचिरा जोशी ),एक सामान्य गृहिणी आहे. मी नुकतचं
मा.विश्वास नांगरे पाटील सरांचे, `
"कर हर मैदान फतेह,",हे पुस्तक नुकतचं वाचलं आहे.त्याच्या बद्दलचा `अभिप्राय` मी ह्यासाठी पाठवत आहे ,की मला वाटतं, तो,अभिप्राय निश्चितपणे हे सांगतो,` की,
""मा.विश्वास सरांच्या" बहू आयामी व्यक्तिमत्त्वात, (I.P.S,अधिकारी, उत्तम वक्ता,लेखक,समाजसेवक),त्यांच्या लेखनात,फक्त युवकांनाचं,नव्हे, तर संपूर्ण समाजालाही,प्रेरित करण्याची प्रचंड ताकद आहे.
हल्लीच्या निराशाजनक वातावरणात, मनाला उभारी, अन अमाप ऊर्जा देणारं ,शक्ति वर्धक," टॉनिक", असचं मी म्हणीन. वाचण्या शिवाय कुणाला पर्यायाचं नाही 🙂👍
कर हर मैदान फतेह ....म्हणजे ....
सरांना उद्देशून....
कर हर मैदान फतेह ....म्हणजे ....
असं वाटतं मारताय तुम्ही मनमोकळ्या गप्पा,
हळू हळू उलगडत मनाचा कप्पा.
बोलता बोलता सहज जाता मोलाचं सांगून,
फिरवून आणता वाचकांना अनुभव विश्वातून.
शब्द बंबाळ नसलं तरी,भाषेवरती, पकड
डोसपाजू नसल्यामुळे,मनास भिडतं अलगद.
स्पष्ट,पारदर्शी ,अन लिहिलय मनापासून,
लिहिताना ठेवलं नाहीत हातचं काही राखून.
दुसर्याप्रति आदर अन समानूभूती असणं,
आपल्या सोबत मागच्यालाही पुढे घेऊन जाणं
यश मिळवूनही सतत जमिनीवर राहाणं,
मुळांशीही महत्वाचं असतं नातं जपणं.
प्रशिक्षणाने तुम्हाला धडेचं असे दिले,
अंगी भिनुन,पदोपदी पुढे कामी आले.
यश अपयशाचा, चालत राहतो खेळ,
झोकून देऊन शिकलात तर बदलू शकता वेळ.
कसोटीचे क्षणं पाहत असती परीक्षा ,
त्यांना कधी म्हणू नये "नियतीची` शिक्षा,
माणसाची तेव्हाच लागते ,`पणासं गुणवत्ता,
समृद्ध करून जाती, त्याला जाता जाता.
ध्येय वेड्या माणसाला का असावा ध्यास,?
निरीक्षण,नियोजन,अन अथक अभ्यास..
आयुष्याला उद्दिष्ट अन असावा एक अर्थ ,
सोन्या सारखा मनुष्यजन्म घालवू नये व्यर्थ .
शरीर आणि मनास सतत पुरवत रहावी ऊर्जा,
विचार आचारांचा मग आपोआप वाढतो दर्जा.
आपल्यातल्या `विद्यार्थ्यांला` जागं ठेवावं,
नवनविन आव्हानांतूंन शिकत कसं रहावं .
आयुष्य हा सण कसा करा वा साजरा
न्यूनगंडचा का? कसा? करावा निचरा.
क्षणोक्षणी जगावं कसं भरभरून,
प्रत्येकाला शिकलं पाहिजे खरचं तुमच्याकडून.
ग्रामीण युवकाचा कसा बनतो अधिकारी,
शून्यातून `तो` कशी घेतो उंच भरारी
तुमची लेखणी युवकांना देते ह्याची स्फूर्ती,
सामान्यांची सुद्धा होऊ शकते स्वप्नपूर्ती.
तुमच्या नावे ओळखल्या जातं आता कोकरूड,
युवकांवर सुद्धा तुम्ही फिरवलयत गारूड.
देशभक्ती वाहते तुमच्या कणांकणांतुन,
म्हणुनच मी आहे तुमची भक्त मनापासून.
मनासाठी सात्त्विक तरी चविष्ट आहार,
अशीच तुमची लेखणी रहावी सदाबहार.
Suraj Guravमा. विश्वास नांगरे पाटील साहेब म्हणजे आमच्या तिघांचे आदर्शवत ठिकाण,आधारस्तंभ.. मी अकरावी-बारावीला असताना साहेबांची 1997ला आयपीएस पदी निवड झाल्यावर चिखली ता.शिराळा येथील काँलेजवर सत्कार आणि मार्गदर्शन झाले. त्यावेळी त्या अनेक युवकांच्या गर्दीत मी ही दाटीवाटीने कुठेतरी खेटून उभा होतो.साहेबांचा प्रत्येक शब्द अंगावर काटा आणत होता.मेंदूला झिणझिण्या आणत होता. आजपर्यंत आपण दिवस वाया तर घालवले नाहीत ना याची जाणीव करून देत होता. शब्द न शब्द कानाने ऐकला आणि तसाच हृदयात साठवला.भाषण खूपच प्रेरणादायी आणि रोमांचक झाले.पोलीस फक्त पिक्चर मध्ये पाहीलेले, पण पीएसआय काय असतो.पी.आय कोण असतो. आय.पी.एस. कसे बनतात. याची जाणीव आयुष्यात पहिल्यांदा झाली.. खंरतर माझे ते अकरावी-बारावीचे वर्ष होते.पण पोलीस आँफीसर होण्याची तयारी सुरू झाली ती संराच्या त्या दिवसाच्या मार्गदर्शनानंतर..व्याख्यानानंतर, राज्यसेवेची तयारी करत असताना कधी कंटाळा आला तर साहेबांचे 28/02/2006 चे भाषण भल्या मोठ्या चायना मोबाईलवर वांरवार पाहायचो.ऐकायचो."खेड्यातील मुले ही रानफुलासारखी असतात.आणि या रानफुलांना जर काळीकसदार जमीन,सुर्य प्रकाश,चांगले खतपाणी मिळाली तर ती अशी रूजतात,अशी फुलतात की पुण्या- मुंबईतील कमळ,गुलाब सुद्धा फिके पडतात" या सरांच्या शब्दांनी न्युनगंड निघून आत्मविश्वास निर्माण झाला होता.आपणही पोलीस आँफीसर होवू शकतो. हे लक्षात आले. त्यानंतर सरांचा स्टिलफ्रेम पुस्तकातील फोटो कट करून त्यांची छोटी फ्रेम बनवून टेबलवर ठेवून बारा बारा चौदा तास अभ्यास करायचो.पोलीस उपनिरीक्षक झालो.डिवायएसपीही झालो.सरांची प्रेरणा आणि शब्दामुळे अधूनमधून ताकद मिळायची. आज तीच फोटोफ्रेम माझा दहावीत असणारा भाचा अदित्य समोर ठेवून अभ्यास करीत आय.पी.एस बनण्याची स्वप्ने पाहत आहे.. एवढी प्रेरणा संराच्या मध्ये आहे.. सरांनी *मन मे है विश्वास* पुस्तक लिहले.. आणि लाखो प्रती रातोरात विकल्या गेल्या..स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या तरुणाईसाठी दासबोध ते बायबलही आहे.. एवढी ऊर्जा,एवढी प्रेरणा ठासून भरली आहे..
सरांनी दुसरे पुस्तक लिहले..कर मैदान हर फहते...सदाशिव पेठेतील प्रत्येक दुकानात फ्ंट ला पुस्तक पाहून अभिमान तर वाटलाच. पण एका बैठकीत पुस्तकाचा फडशा पाडला.मुखपृष्ठावरचा संराचा फोटो पाहून त्यांनी वयावर मात करून राजबिंडे व्यक्तीमत्व स्वकष्टाने मिळवल्याचे लक्षात येते.हे पुस्तक म्हणजे एक सुंदर शब्दरूपी कुंचला आहे.. त्यातील कितीतरी घटनामध्ये आम्ही सरांच्या सोबत कोल्हापूर मध्ये होतो. फिटनेस संराचा जवळून पाहीला आहे.. त्यासाठीची मेहनत ही प्रचंड आहे.सर टिम कडूनही व्यायाम करुन घेतात. पोलीस फिट असायलाच हवा. निर्भया पथक ही संराची स्वतःची कल्पना आहे.. यामुळे महिला सुरक्षित आणि निर्भय झाल्या.पोलीस ट्रेनिंग आणि आयुष्यातील बदल हे निश्चितच आहे. सरांनी त्याबाबत पुस्तकात खूप सुंदर रितीने विवेचन केले आहे. मन में है विश्वास युवकांच्या मध्ये बारुद भरुन पेटवून देते.तुम्ही कंटाळा करत नाही. परिस्थितीवर मात करून जिकंण्यासाठीच लढता.निश्चितच त्या पुस्तकामधून प्रेरणा घेऊन हजारो विद्यार्थी अधिकारी झाले..कर हर मैदान फतेह हे वेगळे असून सर्वसामान्य युवक न्यूनगंडावर मात करून, आयुष्य सुंदर बनवतोच..पण त्यांच्या स्फूर्ती मुळे नोकरशाहीत आणि त्यांच्या स्वतः मध्ये कसा बदल घडतो. झुंबडीमधून अलग होवून,आव्हानांना सामोरे जात आयुष्य सुंदर तर बनवलेच,चांगल्या सवयी मुळे शरीरालाही घडवले.. आणि यासर्वातून पोलिसिंग मध्ये काही सकारात्मक बदल घडवले. याचा निश्चितच फायदा तरूणाईला होवून प्रंचड आत्मविश्वास निर्माण होईल हे मात्र निश्चितच...
प्रशासनात असलेल्या आणि येवू घातलेल्या सर्वांना कर हर मैदान फतेह निश्चितच मार्गदर्शक आहे..
DAINIK SAKAL 24-01-2021माणूस घडण्याचं बाळकडू!...
प्रशासकीय अधिकाऱ्याचं पुस्तक म्हणजे अधिकारी होण्याचं बाळकडूच असावं, हा सरधोपट सिद्धांत मोडीत काढत मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे यांच्या ‘कर हर मैदान फतेह’ या पुस्तकाचं स्वागत करायला हवं. हे पुस्तक फक्त स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांसाठी नाही. समस्त तरुण वर्ग वाचक म्हणून लेखकानं डोळ्यांसमोर ठेवलाय. त्यामुळं अभ्यास कसा करावा, अशा विषयांऐवजी जीवनकौशल्यांवर भर देत माणूस घडविण्याची प्रक्रिया लेखकाने पुस्तकात वर्णन केली आहे. हे मांडताना पाटील यांनी व्यक्तिगत आयुष्य ते प्रशासकीय अधिकाऱ्याची कर्तव्य पूर्ण करताना त्यांना आलेल्या वेगवेगळ्या अनुभवांचा समावेश पुस्तकात केलाय.
पुस्तकाच्या सुरुवातीच्या भागात पोलीस अधिकाऱ्याच्या कारकिर्दीत मिळणाऱ्या सर्व प्रशिक्षणांचा सविस्तर आढावा आहे. या अनुभवांची रंजक मांडणी वाचकाला खिळवून ठेवते. शिवाय व्यक्ती म्हणून जडणघडण होताना आत्मभान ते समाजभान जागरूक ठेवण्याचे शिक्षण यातून मिळते. कोणतीही नोकरी असो किंवा व्यवसाय, बदलतं तंत्रज्ञान स्वीकारून अद्ययावत राहणं ही काळाची गरज आहे. हे सर्व करत व्यक्तिगत विकासाइतकीच महत्त्वाची असते आपल्या टीमची जडणघडण. पोलीस अधिकाऱ्यांनाही बदलत्या काळात अशा आव्हानांचा सामना करावा लागतो. अशावेळी त्या विभागात सर्वोच्च पदावर असताना लेखकानं आपलं कर्तव्य पार पाडतानाच आपल्या सहकाऱ्यांचं पालकत्व कसं स्वीकारलं, हे शेवटच्या दोन भागात वाचायला मिळते. त्यातही पुस्तकातला उल्लेखनीय किस्सा म्हणजे ‘करोना से डरोना’. करोनाच्या साथीनं जगाला वेठीस धरले. अशावेळी सगळ्यात आधी आणि सर्वांत जास्त काळ रस्त्यांवर कार्यरत असणाऱ्या आपल्या पोलीस दलाची शारीरिक आणि मानसिक काळजी कशी घेतली याबद्दलचे वर्णन वाचनीय आणि प्रेरणादायी आहे.
पोलिसांच्या एकूणच कामकाजात नवीन तंत्रज्ञानाचा अंतर्भाव करून केलेल्या नवनवीन प्रयोगांची माहिती पुस्तकाच्या शेवटच्या टप्प्यात आहे. यात स्मार्ट पोलिसिंगला तंत्रज्ञानाची जोड देऊन अधिक रिस्पॉन्सिव्ह आणि अकाउंटेबल बनविण्यासाठी केलेल्या उपक्रमाची माहिती मिळते. यात सिक्स सिग्मा, कायझेन अशा प्रणालीचा वापर, झिरो पेन्डन्सी, निर्भया पथक अशा उपक्रमांचा समावेश आहे.
पुस्तकाचा शेवट अर्थातच ज्या उद्देशाने पुस्तक लिहिलंय त्यावर होतो. आयुष्याची जडणघडण! यात लेखकाने वर्णन केलेला प्रत्येक प्रसंग अंगावर रोमांच उभे करतो. आयुष्य खडतर असतंच, पण प्रत्येक प्रसंगाला धीराने सामोरं जाणं महत्त्वाचं असं अधोरेखित करणारे हे प्रसंग पुस्तक वाचण्याचा अनुभव समृद्ध करतात.
‘‘विश्वास, आपण लढवय्ये आहोत... ‘‘हाच ‘विश्वास’ विश्वास नांगरे पाटील यांच्या पुस्तकाच्या प्रत्येक पानांतून मिळतो. संपूर्ण पुस्तकांत वेगवेगळ्या संतांची, लेखकांची प्रेरणादायी वचने गुंफली आहेत. प्रत्येकाने आपल्या ठेवणीत ठेवावे आणि नक्की वाचावे असे जगण्याचा धडा देणारे हे पुस्तक आहे.
पुस्तकात काय आहे?
• प्रशासकीय कारकिर्दीतील वेगवेगळ्या प्रशिक्षणांचा अनुभव.
• लबास्ना, इनडोअर – आउटडोअर ट्रेनिंग, एनपीए ट्रेनिंग इथले अनुभव.
• प्रशिक्षणातून जीवनशैली, जीवन व्यवस्थापन आणि जीवन कौशल्ये आत्मसात करण्याचा प्रवास.
• जीवनकौशल्ये अमलात आणताना चाकण दंगल, डॉल्बीशिवाय गणेशोत्सव अशा प्रसगांना अधिकारी म्हणून हाताळण्याचे अनुभव.
• करोनाशी पोलीस दलाचा मुकाबला.
• पोलीस विभागाचा अद्ययावत चेहरा – आव्हाने आणि प्रयोग.
- शीतल पवार
शिरीष पोळेकर संवेदना, सहिष्णुता आणि सहवेदना यांची प्रेरणादायी गुंफण - "कर हर मैदान फतेह"
दि. ३० डिसेंबर २०२० रोजी "कर हर मैदान फतेह" हे विश्वास नांगरे पाटील यांचे आत्मकथन पर पुस्तकाची "प्रथम" ऍडव्हान्स बुकिंग करण्याची संधी मला मेहता पब्लिशिंग हाऊस ने दिली आणि या पुस्तकाची प्रथम आवृत्ती दि. ०५ जानेवारी २०२१ रोजी मला समारंभपूर्वक मेहता पब्लिशिंग हाऊस यांनी दिली. लगेचच पुढील दोन दिवसांमध्ये सलग दोन वेळा मी हे पुस्तक वाचले. मा. विश्वास नांगरे पाटील यांचे यापूर्वी प्रकाशित झालेले "मन मी है विश्वास` हे आत्मकथनही मी संपूर्ण वाचले आहे. तसेच YOUTUBE वरती सुद्धा त्यांची अनेक संभाषणे/व्याख्याने मी नेहमी ऐकत असतो.
"कर हर मैदान फतेह" हे त्यांचे नवीन पुस्तक म्हणजे संवेदना, सहिष्णुता आणि सहवेदना यांची प्रेरणादायी गुंफण आहे. एक IPS अधिकारी त्यांच्या कार्यात मग्न असताना संवेदना आणि सहवेदना सातत्यपूर्वक जपत राहतो आणि समाजामध्ये या दोन गोष्टींची फार मोठी गरज असल्याचे त्यांच्या कार्यातून सिद्ध करून दाखवून देतो हे आजच्या युगात खरोखरंच अत्यंत प्रेरणादायक आहे असे मला वाटते.
बीड जिल्ह्यातील एका मुलीच्या सत्काराच्या कार्यक्रमाला आवर्जून श्री. नांगरे पाटील उपस्थित राहिले कारण त्या मुलीने दहावीच्या परिक्षेत ९८.५ टक्के गुण मिळविले होते. त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे हे मार्क त्या मुलीने स्मशानात पेटलेल्या चितेच्या उजेडात अभ्यास करून मिळविले होते.त्या मुलीला कुठलीही भीती न्हवती पण ध्येयाप्रती पेटलेले मन तिला दिशा दाखवत होते, खुनावत होते. त्या मुलीच्या आईला ९८.५ टक्के म्हणजे किती हे सुद्धा नीट कळत न्हवते. तिच्या सत्काराला श्री. विश्वास नांगरे पाटील आवर्जून उपस्थित राहतात आणि श्री. विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते सत्कार स्विकारुन सत्काराला प्रतिक्रिया देताना ती मुलगी म्हणते "मला सुद्धा साहेब हैद्राबादला जायचं आहे. पण मला हैदराबादेत `सैराट` मधल्या परश्या व आर्ची सारखं प्रेम प्रकरण करून पळून जायचं नाही, तर साहेब मला तुमच्यासारखं, सरदार वल्लभभाई पटेल अकादमीमध्ये IPS अधिकारी म्हणून ट्रेनिंग घ्यायला जायचं आहे आणि त्यासाठी पाठीवर शाबासकी राहू दे!" हा प्रसंग असेल. तसेच अत्यंत गरीब कुटुंबातील मुलीने वडिलांच्या अंगावर पडणाऱ्या खर्चाच्या भारातुन सुटका करण्यासाठी आत्महत्येचा अवलंब केलेला प्रसंग असेल, यातून समाजाला आपण काय देणे लागतो का? याबाबत या पुस्तकात प्रभाविपणे प्रभावीपणे मांडलेले विचार आणि यातून आपण समाजाला कोणत्या प्रकारचे मार्गदर्शन करू शकतो यासाठी केलेले प्रेरणादायी लिखाण हे समाजाला नक्कीच मार्गदर्शकआणि प्रेरणादायी ठरेल असे मला वाटते.
या पुस्तकात श्री. विश्वास नांगरे पाटील यांनी आजच्या युगात Work Life Balance कसे सांभाळावे याबाबत व्यक्त केलेलं मत आणि त्यासाठी करावयाचे नियोजन याचे अत्यंत उपयुक्त लेखन केले आहे.
" सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नही , सारी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिये!
मेरे सीने मे नही तो तेरे सीने मे ही सही , हो कही भी आग, लेकिन आग तो जलनी चाहिये!"
" Salute to this Brave Man - IPS Shri Vishwas Nangre Patil "
Mahavir Shah, Puneमा.रा.रा.श्री.विश्र्वास नांगरे पाटील साहेब,(l.P.S.)
सह आयुक्त, मुंबई पोलीस,
स.न.वि.वि.
सर आत्ताच आपले नवे पुस्तक " कर हर मैदान फतेह" वाचुन झाले.
अपेक्षेप्रमाणे हे ही पुस्तकं अतिशय उत्तम झाले आहे ,. कारण ते लिहण्या मागचा आपला हेतु अतिशय उदात्त आहे.
या पुस्तकामुळे युवकांनाच काय पण सर्वच वयोगटातील विचारशिल व्यक्ती ना योग्य / अयोग्य काय करावे, काय करु नये याचे बहुमोल मार्गदर्शन मिळेल.
तसेच M.P.S.C./ U.P.S.C. च्या अभ्यासकांना आपण परीक्षा पास होउ पण नंतर चे ट्रेनिंग झेपेल का याचे प्रामाणिक उत्तर शोधण्यास भाग पाडेल व कदाचित त्यांना वस्तुस्थिती ची जाणिव होऊन त्यांना योग्य निर्णय घेऊन वेळीच त्यांच्या वेळ, पैसे इ.नुकसान व अपेक्षा भंगाचे दु:ख हि टळेल. सध्या या परिक्षेसाठी भाऊगर्दी आहे ती कमी होईल. या विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा फायदा उठवणारा सर्व प्रकारच्या बाजारु व्यक्ती व वृत्ती ना आळा बसेल.
काही अब्ज रुपये व तेव्हढेच मनुष्य तास वाचतील.
या साठी हा महाराष्ट्र आपला कायम ॠणी राहील.
तसेच आपण मोबाईल , इंटरनेट,सोशल मीडिया यांच्या गंभीर धोकादायक स्वरूप पण विस्ताराने उलगडून दाखवले आहे त्या मुळे हे पुस्तक संपूर्ण समाजालाही जागे करणारे आहे .
यामुळे हे पुस्तक प्रत्येक युवक युवती नी तर वाचलेच पाहिजे पण प्रत्येक कुटुंबाने , प्रत्येक व्यक्ती ने वाचुन स्वतः मध्दे आवश्यक त्या सुधारणा केल्या पाहिजेत.
हे पुस्तक " व्यक्तिमत्व विकास " साठी सर्वांगाने उत्कृष्ठ पुस्तक आहे.
आपले अत्यंत अभ्यासपूर्ण संदर्भासह ओघवते सादरीकरण खिळवून ठेवते .
आपल्या तल्लख स्मरणशक्ती चे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
तसेच आपले माता पिता, गुरूजन , दोन्ही अकादमी मधले आपले ट्रेनर्स विषयी आपली कृतज्ञता अभिनंदनीय आहे.
इतके सुरेख पुस्तक सादर केल्या बद्दल आपले व प्रकाशक व संपूर्ण टीम चे खुप खुप आभार.
आपल्या भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा व पुन्हा एकदा खुप खुप धन्यवाद 🙏💐