धवल रामतीर्थकरजंगल म्हणजे काय? जंगली प्राण्यांचे, मांसभक्षी प्राण्यांचे घर.
वाळवंट म्हणजे काय? सताड मोकळा, अत्यंत कोरडा, पाण्याचे दुर्भिक्ष असलेला प्रदेश
अवलिया म्हणजे कोण? मार्क आणि डेलिया ओवेन्स जे आफ्रिकेतल्या कालाहारी वाळवंटात, तुटपुंजी मदतीने जंगली प्राण्यांच्या सहवासात राहिले
हे पुस्तक नाही तर एक प्रवास आहे, ओवेन्स दाम्पत्यासह. कालाहारी वाळवंटात जिथे मैलोंमैल नुसती सताड बोडकी जमीन पसरलेली असते, जिथली नदी वर्षातील फक्त दोन महिने वाहते, जिथले प्राणीही हा मनुष्य कोणता प्राणी आहे याबद्दल अनभिज्ञ असतात अशा ठिकाणी मार्क आणि डेलिया प्राण्यांचा अभ्यास करण्यासाठी जाण्याचे नाही तर राहण्याचे ठरवतात.
एके दिवशी हे प्राण्यांच्या अभ्यासाने हपापलेले दाम्पत्य १२० मैल लांब वसलेल्या मॉन खेड्यातून एक जुनी लॅन्ड रोव्हर गाडी विकत घेतात, त्यात काही कॅन पाणी भरतात, काही दिवस पुरेल एवढे अन्न कोंबतात आणि रस्ता नसलेल्या कालाहारी वाळवंटात आपले नशीब अजमावायला निघतात. आता वाळवंट म्हटलं की पहिली गोष्ट जी डोक्यात येते ते आहे पाणी. हे पाणी जपण्यासाठी, साठवण्यासाठी हे जोडपे काय काय उद्योग करतात ते वाचून आपण जे बादलीभर पाणी अनायासपणे वापरतो त्याबद्दल अचंबा वाटल्याशिवाय राहवत नाही. एका ठिकाणी तर मार्क नमूद करतो की पाण्याचा उत्तम आणि कमीतकमी वापर कसा ते करायचे. (पानाचा फोटो जोडला आहे). मी सांगण्यापेक्षा ज्यांनी अनुभवले आहे त्यांच्याकडून ऐकलेलेच बरे. आता हे पाणी यात फक्त मार्क आणि डेलिया साठी नव्हते. तर यांच्या बाभळीच्या झाडाखाली वसलेल्या कॅम्प वर येणाऱ्या असंख्य पक्षी,रात्री येणारे कोल्हे, तरस आणि सिंह हेही वाटकरी असत.
जसे पाणी तसेच अन्न. मॉन खेड्यातून आणलेले अन्न कमीतकमी खाऊन जास्तीत जास्त दिवस कसे टिकवायचे याकडे दोघांचा कल. तपासाची मार्क ताजे मास जमिनीखाली गाडून ठेवायचा ज्यामुळे ते फ्रिज शिवाय जास्त वेळ टिकेल.आता गंमत अशी की यांची कॅम्प ज्या ठिकाणी असते तो बाभळीच्या झाडांचा समूह सोडून चोहीकडे मोकळी जमीन, वाळवंट पसरलेला. त्यामुळे सावलीसाठी पक्षी, प्राणी याच झाडाखाली येणार, म्हणजे यांच्या कॅम्प मध्येच.
हळूहळू प्राण्यांना तंबू, माणसे बघून सवय होते आणि चक्क सिंह, तरस आणि कोल्हे यांच्या अन्नाचा चट्टामट्टा करतात किंवा नासधूस करून आरामात निघून जातात. पण मार्क आणि डेलिया फक्त निरीक्षण आणि नोंदी करत राहतात आणि त्या प्राण्यांबरोबर या वाळवंटात एकजीव होऊन जातात. इथून पुढे सुरु होते त्यांची रात्र रात्र जागून प्राण्यांच्या मागावर जाणे, त्यांचे राहणे, वागणे, खाणे, कुटुंब पद्धती, एकमेकातील नाती यांचा अभ्यास करणे आणि नोंदी करणे.
हळू हळू त्यांना अर्थसहाय्य मिळू लागते. परिसराचा नीट अभ्यास करण्यासाठी ते एक छोटे विमान खरेदी करतात आणि मग त्यांच्या अभ्यासाला खरी दिशा मिळते. कारण सिंह, तरस यांची हद्द अनेक मैल पसरलेली असते. अनेक वेळा दाट झाडीत जिथे गाडी पोहोचू शकत नाही अशा ठिकाणे ते राहणे पसंद करतात. अशा वेळी हवेतून निरीक्षण केल्याने त्यांना प्राण्याची अचूक जागा समजू लागली आणि अभ्यास अजून खोल जाऊ लागला.
प्राण्यांना त्यांची सवय होऊ लागते. धडधडत्या हृदयाने सिंहापासून १० फूट बसून मार्क आणि डेलिया त्यांचे निरीक्षण करतात. एकदा तर एक तरस जवळ येऊन डेलियाच्या केसांचा वास घेऊन जातो. एक सिंह मार्कच्या बुटपाशी येतो आणि चामड्याचा वास घेऊन तो न खाताच निघून जातो. असे अनेक रोमहर्षक दोघांसाठी रोजचेच असतात.
हळू हळू जग बदलू लागते, शिकारी मार्क आणि डेलिया च्या ओळखीच्या सिंहाची हत्या करतात. हेही ते दोघात सहन करतात आणि आपले काम चालूच ठेवतात. त्यांच्या अकल्पनीय जगात जर डोकावून पाहायची, कालाहारी वाळवंटात राहण्याची, हिंस्त्र प्राण्यांबरोबर जगण्याची इच्छा असेल तर कालाहारीला जावे, म्हणजेच हे पुस्तक नक्की वाचावे!
मोईन के काही दिवसांपासून मी `मार्क नि डेलिया`या जोडप्यासोबत कालाहारी वाळवंटात वास्तव्य करत होतो.`अशा ठिकाणी आम्ही राहत होतो जिथे कोणीही मानव कधीही गेलेला नव्हता,तिथे ना कोणते रस्ते होते, ना कोणी माणसे.`हजारो चौरस मैलांच्या परिसरात पाण्याचा कोणताही स्रोत नव्हतं..`हा जोडपं आपला प्राणीशास्त्राचा अभ्यास करत होता नि मी त्यांना फक्त बघत अन् अनुभवतं होतो.`हा `कालाहारी`चा प्रवास खूप काही शिकवणारा नि समृद्ध करणारा होता.
या प्रवासात ब्राउन हायना,कोल्हे,सिंह नि इत्यादी विविध प्राण्यांशी ओळख अन् मैत्री झाली,`त्यांच्याबद्दल मार्क नि डेलियांकडून महत्वपूर्ण अशी माहिती मिळाली.जी फारच रोचक नि हटके होती.`या जोडप्याच्या आयुष्यात पावलोपावली येणारी वेगवेगळी संकटे व त्यांनी या संकटावर केलेली यशस्वी मात हे सर्व जणू डोळ्यांनी बघताना,अनुभवताना मी पूर्णपणे यातच गुंतून गेलो होतो..!
आता हा प्रवास मी कशाप्रकारे करून आलो ?तर मी हा प्रवास `मार्क&डेलिया ओवेन्स लिखित (Cry Of The Kalahari) म्हणजेच `साद घालतो कालाहारी`या 416 पृष्ठसंख्या असलेल्या पुस्तकातून करून आलो...!
`प्राणीशास्त्राचा` अभ्यास नि संशोधन करण्यासाठी आफ्रिकेतील `कालाहारी वाळवंटात`गेलेल्या एका अमेरिकेन जोडप्याने त्यांच अनुभवकथन या अप्रतिम पुस्तकातून वाचकांसमोर आणलं आहे.`आंतराष्ट्रीय स्तरावरील सर्वोच्च खपाच्या या इंग्रजी पुस्तकाचे मराठी अनुवाद`मंदार गोडबोले`यांनी केले असून जे खूपच वाचनीय व उत्तम झाले आहे.`हा अनुवाद वाचताना आपण काही अनुवादित वाचतोय असं अजिबात वाटतं नाही.
मला हे पुस्तकं फार आवडलं नि भावून गेलं.`अरण्य,प्राणी, पक्षी नि निसर्गाबद्दल वाचणे मला नेहमीच आवडतं व यामुळेच मला हे पुस्तकं जरा जास्तच आवडलं.`खूपच इंटरेस्टिंग नि माहितीपूर्ण असलेलं हे पुस्तकं वाचकांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवतो.`जणू आजूबाजूला घडतं असलेलं घटनाक्रम आपण स्वतःच्या डोळ्यांनी बघतोय असं आपल्याला वाटतं राहतं.`यांनी वेगवेगळ्या प्राण्यांना दिलेले नाव आपल्या ओठांवर सारखे खेळत असतात.लेखकांनी ज्याप्रकारे आपले अनुभव आपल्यासमोर मांडले आहेत ते वाचतांना आपण पूर्णपणे यात हरवून जातो.आपल्याला आजूबाजूचं भान राहतं नाही एवढं नक्की...!
आपल्याबरोबर एक बदली कपड्याचा जोड आणि एक दुर्बिण वगळता बाकी विशेष काही न घेता हे तरुण अमेरिकन जोडपं,आफ्रिकेचे विमान पकडतात.
``आफ्रिकेतील एखादा मोठा मांसाहारी प्राणी त्यांना अभ्यासायचा होता, तसा अभ्यास करून त्या संशोधनाचा उपयोग, आफ्रिकेतील प्राणिसंवर्धनाचा एखादा कार्यक्रम हाती घेण्यासाठी करायचा त्या दोघांनी निश्चय केला होता. मानवाच्या पदस्पर्शाने प्रदूषित न झालेली एखादी जागा अजूनही शिल्लक आहे, हे आपल्या डोळ्यांनी बघावे, असेही कदाचित त्या दोघांना वाटत होते."
आफ्रिकेत येऊन तिथे एक थर्ड हँड लँड रोव्हर गाडी विकत घेऊन ते कालाहारी वाळवंटात खोलवर मजल मारतात.तिथे ते एकूण सात वर्षे वास्तव्य करतात, अशा ठिकाणी जिथे कोणीही मानव कधीही गेलेला नव्हता, तिथे ना कोणते रस्ते होते, ना कोणी माणसे. हजारो चौरस मैलांच्या परिसरात पाण्याचा कोणताही स्त्रोत नव्हता. या प्रचंड जंगलात ओवेन्स जोडपं आपला प्राणिशास्त्राचा अभ्यास सुरू करतो. त्यांच्या आजूबाजूला जे प्राणी होते त्यांनी कधीही माणूस पाहिला नव्हता. यांच्या सिंहांबरोबरील आणि ब्राऊन हायना, कोल्हे, जिराफ आणि त्यांना भेटलेल्या इतर अनेक प्राण्यांबरोबरचे विविध अनुभव या पुस्तकातून आपल्या समोर येतात.`जे खरंच खूपच रोचक नि वाचनीय आहेत..`
मार्क नि डेलियाने तब्बल सात वर्षे नेमकं काय केलं याबद्दल विस्तुत जाणून घ्यायचं असेल तर हे पुस्तकं आवर्जून वाचा..
Anuradha Pawarकालहारी वाळवंटाच्या अत्यंत दुर्गम भागात ,अतिशय अवघड परिस्थितीत, केवळ विलक्षण प्राणी प्रेमासाठी, दुर्दम्य इच्छाशक्तीने सात वर्ष राहिलेल्या जोडप्याची ही चित्तथरारक कथा आहे. वन्यजीवन ,वन्य प्राणी यांचे लेखकाने केलेले अनुभव वाचताना आपणच कालहारी च्या वाळवंटात अनुभव घेत आहोत असे वाटते . रहस्यकथे पेक्षाही अत्यंत उत्कंठा लावणारे हे पुस्तक आहे.
विनया जंगलेतुमचं "साद घालतो कालाहरी " हे अनुवादित पुस्तक वाचून झालं .पुस्तक अतिशय सुंदर आहे .अनुवादही सरस झाला आहे .
Samir Gadekar
मागच्या आठवड्यात हे पुस्तक वाचुन पुर्ण झाले.
मार्क ओवेन्स आणि डेलिया ओवेन्स या दाम्पत्याने कलहारिच्या जंगलात वन्यजिव अभ्यासासाठि वयाची ७ वर्षे घालवलित. या प्रवासादरम्यान बर्याच चांगल्या वाईट प्रसंगाचा अनुभव त्यांना आला. ते सर्व वाचतांना वाचक त्या वातवरणात रममाण होऊन ऐक वेगळं विश्व अनुभवल्याचा आनंद मिळतो.
जंगलामधे ऐक तंबु ठोकुन थोडक्या वस्तु घेऊन उदरनिर्वाह करायचा. सिंह आणि कोल्हे यांचा अभ्यास करतांना अनेक थरारक प्रसंगांचा सामना करायचा. कधि सिंह अगदि ४-५ फुटापर्यंत जवळ येउन उभे आहेत तर कधि डेलिया ऐकटि असतांना रात्रि सिंह तंबुला घेराव घालुन धुडघुस घालताहेत. कधि जोराचा पाऊस येऊन सबंध तंबु वाहुन गेलेला आहे तर कधि जिवनावश्यक वस्तुंची निर्माण झालेली कमतरता आहे. अचानकपणे हजर होउन जिवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करणारा मित्रसुध्दा आहे. कोल्ह्यांशी निर्माण झालेलं मैत्रिचं नातं, विविध तर्हेच्या पक्षांनी दैनंदिन जिवणात हस्तक्षेप करुन केलेली करमणुक. या सर्वांमधुन जंगलातिल जिवणाच्या विविध अंगाचे दर्शन घडते तर कधि जवळच्या मित्राचं आणि भावनिक नातं निर्माण झालेल्या ऐखाद्या कोल्ह्याचा वा सिंहाचा म्र्युत्यु हा मनाला चटका लावुन जातो.
ज्यांना जंगल आवडते, जंगलात रहायला आवडते किंवा जंगलाबद्दलचं साहित्य वाचायला आवडते त्या वाचकांसाठि हे पुस्तक ऐक पर्वणीच आहे. मारुति चितमपल्लि यांच्या वाचकवर्गाने तर आवर्जुन वाचावे असे हे पुस्तक Amazon या Portal वर पुस्तक स्वरुपात व Play Book या app वरति online स्वरुपात उपलब्ध आहे.
Vinaya Jangleसन 1974 च्या दरम्यान मार्क आणि डेलिया ओवेन्स हे अमेरिकी दाम्पत्य आपले घर आणि त्यातील वस्तू विकून थोडे पैसे उभे करतात . आफ्रिकेतील कालाहरी वाळवंटात वन्यजीवांच्या संशोधनासाठी जातात .सुरुवातीला पैशाचे फार पाठबळ नसताना आपले वन्यजीवांवरील संशोधन सुरू करतात .वाळवंटातील हा एकाकी भूभाग तोपर्यत मानवी स्पर्शापासून दूर होता .अनंत अडचणी सोसून तेथे सात वर्षे दोघेही राहतात .तेथील सिंह ,ब्राऊन हायना यांच्या सामाजिक जीवनाबद्दल खूप वेगळी माहिती त्यांना मिळते .तेथील प्राणीही त्यांना आपले मानतात .सिंह ,ब्राऊन हायना त्यांच्या अगदी आजूबाजूला वावरत राहतात .पाण्यासाठी हजारोंच्या संख्येने स्थलांतर करणाऱ्या विल्ड बिस्टची कृत्रिम कुंपणाने झालेली परवड त्यांना दिसते .
जगासमोर पोडतिडकीने हे सगळं ते मांडतात .दोघ मिळून ते `Cry of the Kalahari `हे पुस्तक लिहितात .
मंदार गोडबोले यांनी या पुस्तकाचा सहजसुंदर अनुवाद केला आहे .विलक्षण अनुभव देणारे हे पुस्तक आहे .
manish wagh संवर्धनाचे साहसी अनुभवविश्व !
मार्क आणि डेलिया ओवेन्स.... जॉर्जिया विश्वविद्यालयात शिकणारे प्राणीशास्त्रातील दोन पदवीधर अमेरिकन. पी.एचडी.साठी विषय शोधत असतानाच आफ्रिकेतील नाहिशा होणाऱ्या वन्यजीवांबद्दल माहिती मिळते. यासाठी आफ्रिकेच्या नकाशाचा अभ्यास करताना मानवी पदस्पर्शापासून लांब असलेले कालाहारी वाळवंट त्यांना साद घालते.
घरातील टी.व्ही., रेडिओ, भांडीकुंडी सगळं विकून मिळालेले 1100 डॉलर्स आणि जवळची काही शिल्लक पुंजी घेऊन हे जोडपे जोहान्सबर्गच्या विमानात बसते आणि तिथून कालाहारीच्या वाळवंटात दाखल होते. इथे त्यांच्या सोबत असते एक `थर्ड हँड` लँड रोव्हर गाडी, वन्यजीवांप्रती असलेली प्रचंड ओढ आणि त्यांचा अभ्यास करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती.
कालाहारीच्या मध्य भागात `पसंत` पडलेल्या एका जागेवर ते आपला तंबू बांधतात. ही जागा इतकी दुर्गम होती की, खुरट्या झुडपांच्या जंगलातून, शंभर मैल अंतरावरून रोजच्या वापरायचे पाणी आणावे लागे. बाहेरील जगापासून आता हे जोडपे पूर्णपणे अलिप्त होऊन जगू लागले.
माणसाने कधीच न पाहिलेल्या अशा काही वन्यजीवांशी त्यांची ओळख होते. कधी पावसाळ्यात त्यांच्या तंबूबाहेर दोन-तीन हजार हरणांचा जमाव चरताना दिसे तर कधी सिंहांचे गुरगुरणेच पहाटेचा `अलार्म` असे. डोळे किलकिले करून बघावे तर वाळवंटातल्या या महान शिकाऱ्याची सावली तंबूबाहेर बसलेली दिसे. फक्त कालाहारीमध्येच आढळणारा ब्राऊन हायना (तरसाचा एक प्रकार), जो आजपर्यंत मानवाने कधीच पाहिला नव्हता, यांचा खास मित्रच झाला होता. त्यांच्या तंबूला सावली देणारे झाड एका बिबट्याचे घर होते. हा बिबट्या झाडावर बसला की त्याची शेपटी यांच्या तंबूच्या दाराशी एखाद्या पडद्यासारखी लोंबकाळत असे. आत येता-जाताना ती शेपटी बाजूला करावी लागे.
इथे या जोडप्याला काही आपत्तींशीही सामना करावा लागला होता. कधी पाण्याशिवाय दिवसेंदिवस अडकून पडावे लागले तर कधी प्रचंड वादळाने वाताहात झाली. कधी मैलोन् मैल पसरलेल्या वणव्याचा सामना करत यातून सहीसलामत सुटका करून घ्यावी लागली.
इथले सिंह, हायना, हरिणं आणि इतर वन्यजीव दुष्काळाचा सामना कसा करतात, त्यांची स्थलांतरे, पिलांचे संगोपन हे सगळे मार्क आणि डेलिया यांना इथे बघायला-शिकायला मिळाले. हरणांचे जगातील सर्वात मोठे स्थलांतर त्यांनी अनुभवले. इथल्या जीवविविधतेचा अभ्यास काही महिन्यातच पूर्ण होईल, या आशेवर गेलेले हे दाम्पत्य तब्बल सात वर्षे या वाळवंटात राहिले.
या आणि अशा अनेक चित्तथरारक घटनांनी साकारलेले हे अनुभवविश्व त्यांनी डायरीरूपात लिहून ठेवले होते. त्याचेच पुस्तकरूप म्हणजे `क्राय ऑफ द कालाहारी`! मंदार गोडबोले यांनी ते मराठीत भाषांतरित केले. `साद घालतो कालाहारी` या नावाने ते वाचकांसमोर आणले मेहता पब्लिशिंग हाऊसने.
हे केवळ चरित्र नसून माणसाच्या अविचाराने जैवविविधतेचा कसा नाश होतो याचे स्वानुभवावर आधारलेले समाजप्रबोधन आहे. प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला देण्यात आलेले ज्येष्ठ प्राणी अभ्यासक, साहित्यिकांचे प्रसंगानुरूप `कोट्स` पुस्तकाचे साहित्यिक मूल्य वाढवणारे आहेत. जेन गुडॉल यांनी प्रतिक्रियेत म्हटल्याप्रमाणे, हे पुस्तक प्राण्यांमध्ये आणि खऱ्याखुऱ्या साहसांमध्ये रस असणाऱ्या प्रत्येकाने वाचलेच पाहिजे.