मीना कश्यप शाहशांता शेळके या कवयित्री म्हणून आपल्या सर्वांच्या माहितीच्या आहेतच. गीतकार म्हणूनही त्यांचे मोठे नाव झाले. रेशीमरेघा हे त्यांनी रचलेल्या गीतांचे पुस्तक. मुख्यतः त्यांनी चित्रपट आणि नाटक यासाठी गीते लिहिली आहेत.
प्रस्तावनेत शांताबाई म्हणतात, गीते लिहिणे त्यांना अतिशय आकर्षक वाटत गेले आणि म्हणून केवळ चित्रपट आणि नाटकांसाठीच नाही, तर स्वानंदासाठीही, त्या गीतं लिहित राहिल्या. चालीवर गीते लिहिणे त्यांना आव्हानात्मक वाटायचे, बंधनकारक नाही. पुढे बंगाली, गुजराती अशा काही गीतांच्या चाली आवडल्या, तर त्या, त्या चालींवरही छंद म्हणून गीते लिहू लागल्या. त्यांच्या गीतांमध्ये लावण्या, गवळणी, नृत्यगीते आणि युगुलगीते (त्यांनी द्वंद्वगीते हा शब्द वापरला आहे, जो मला आवडत नाही) जास्त आहेत. ह्या पुस्तकात त्यांचे संकलन आढळून येतं.
पुस्तकातील काही गीतांपेक्षा मला त्यांची प्रस्तावनाच जास्त आवडली. आपल्या गीतांबद्दल त्यांनी हळुवार होत लिहिलं आहे. प्रत्येक गाणं ध्वनिमुद्रीत होतानाचे क्षण त्यांना आठवतात. आणि ही गीतं प्रसिद्ध होण्यासाठी संगीतकार, गायक यांचा हातभार नक्कीच आहे याची त्या आठवण काढतात. गीतांचा अर्थ रसिकांपर्यंत पूर्णपणे पोहोचवण्यासाठी गायक-गायिकांचा खूपच मोठा वाटा आहे, त्यांच्याबद्दल त्या अपार कृतज्ञता व्यक्त करतात. हे पुस्तक त्यांनी लावणेसम्राज्ञी यमुनाबाईंना अर्पित केलेले आहे.
त्यान्नी लिहिलेल्या "रेशमाच्या रेघांनी" या सर्वात जास्त प्रसिद्ध पावलेल्या लावणीच्या नावावर ह्या पुस्तकाचे नाव आधारित आहे.
अनेक प्रसिद्ध गाणी या गीत संग्रहात आढळतात. रेशमाच्या रेघांनी, काय बाई सांगू, मनाच्या धुंदीत लहरीत, हे श्यामसुंदर, राजसा, शालू हिरवा पाच नि मरवा, चाल तुरू तुरू, मनाच्या धुंदीत लहरीत येना आणि अशी अनेक.
शांताबाईंचं काव्य सामर्थ्य ह्या लावण्या/गीतांमध्ये देखील दिसून येतं... कळ्या आजच्या, शिळ्या उद्याला, ओठांशी न्याल का, आल्यावर जवळ मला घ्याल का.... अशी अनेक उदाहरणं! पुस्तकातील बहुतेक गाणी ही लावण्यांच्या स्वरूपातली आहेत. त्यामुळे त्याच त्याच भावना सारख्या सारख्या आढळून येतात. बोलावणे किंवा नको जाऊ म्हणणे, भेटी (गिफ्ट्स) घेणे, वाट पाहणे, विरह, सौंदर्याचे वर्णन, शृंगाराचे वर्णन, म्हणजे तुम्हाला काय मिळू शकेल याची कल्पना गीतातून देणे (उदा. कंबरपट्टा रेखून दावी, देहाचा आकार!!) अशा प्रकारचे विषय पुन्हा पुन्हा येत राहतात, पण (शांताबाई बीइंग शांताबाई) कुठेच तोचतोचपणा कंटाळवाणा होत नाही (वाचकाने जरा रोमँटिकपणा दाखवून वाचली ही गीतं तर फारच बहार!)
शांताबाई नथ फारच आवडते असं दिसतं... नथ सर्जाची नाकी घालता हसेल डावा गाल किंवा सलगी करते नथ ओठांशी, तो तुमचा अधिकार अशा प्रकारे ती खुलून देखील दिसते ह्या गीतांमधे!!
अनेकविध लावण्या आहेत ह्या पुस्तकात. पाडव्याची, रंगपंचमीची, श्रावणाची, अशा विविध दिवसांच्या लावण्या तर हिरव्या रंगाची लावणी देखील आहे. पाडव्याची लावणी म्हणजे पाडव्याला शालू मागते आहे, कारण ती रात्री एकांतात उभारणार आहे. 🙂 "मी सुंदर आहे तर आता मी काय करू?" अशी तक्रारही दिसून येते. "माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा" सांगणारीला स्वतःच्या सौंदर्याची पुरेपूर जाणीव आहे आणि त्यापेक्षाही, फक्त शारीरिक सौंदर्यावर विसंबून न राहता, त्याबरोबर तोरा दाखवत भुरळ पाडणे ह्यात ती माहीर आहे. पण त्याचबरोबर ती धोक्याची सूचना पण देते आहे...
घटकाभर संग बसून घालवा वेळ,
जमल्यास मनांचा जमून येईल मेळ,
नाहीतर यायचा अंगाशी हा खेळ,
पाय टाकण्याआधी इथे, विचार पुरता करा,
माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा!!
एका लावणीत एका पुरुषाने फसवलंय अशा स्त्रीचे रूप आहे. जत्रेत एक जण भेटला आणि त्याने आपल्याशी फ्लर्ट केलं, जत्रा उलगडल्यावर दुसऱ्या दिवशी मात्र तो डोळ्याला डोळा भिडवत नाही, तोंड चुकवून पुढे जातो, ह्याची तक्रार ह्या लावणीत येते. किती विविधता!
अशा लावणी कलाकाराच्या आयुष्याचं विदारक दृश्य देखील शांताबाईंनी दाखवले आहे. तिथे येणारा आज एक, तर उद्या दुसराही असू शकेल किंवा तिथे असणारी आज एक, तर उद्या दुसरीही असू शकेल. हे सांगून त्या म्हणतात...
प्रीतीचे नीतीचे व्यर्थ सांगणे,
भुकेल्या देहाचे सारे मागणे,
जन्माच्या नात्याचे फुका बहाणे,
कुणाला सतत इथे राहणे?
इथल्या महाली घडीची वस्ती,
सुखाचे हिंदोळे आभाळी चढती,
घडीत वरती घडीत खालती
ऐन विशीतल्या स्त्रीचं सौंदर्याचं अत्युत्तम वर्णन एका गीतात केलं आहे. अनेक गीतांमध्ये पुरुषांनी स्त्रीच्या देहाचे आणि मनाचे केलेले वर्णन दिसून येते. त्यातही नुसता देहच नाही तर स्त्रीचा तोरा (attitude) देखील पुरुषाला कशी भुरळ पाडतो हे दिसतच.
"ही चाल तुरुतुरु" आपल्या सगळ्यांच्या आवडीचे आणि माहितीचे आहे. असंच "मनाच्या धुंदीत लहरीत ये ना" हे देखील. गीतांमध्ये श्रावण, पाऊस, विरह, वाट बघणे हे सर्व हमखास येतं.
एक गीत आहे "लहरी सजण कुणी दावा" - मीना खडीकर यांचे संगीत, उषा मंगेशकर यांचा आवाज. हे गीत मला ना वाचायला आवडलं ना ऐकायला आवडलं 🫣
श्रीकृष्ण राधेच्या कथा तर आपण गवळणींमधे अनेक वेळा ऐकल्या आहेत. कृष्णाची धून ऐकल्यानंतर अगदी काहीही न सुचता तशीच्या तशी निघालेली राधा! त्यातही तिच्या शृंगारचं वर्णन येतंच. सजण्याची आवड असलेल्या स्त्रीचे वर्णन अतिशय खुबीने शांताबाईंनी केले आहे. मला स्वतःला नटण्या मुरडण्याची अतिशय हौस असल्यामुळे हे सगळं वर्णन वाचून, "हे पुस्तक आपण आधी का नाही वाचलं" याचं दुःख मात्र झालं.
ही उदाहरणं बघा ना... माथ्यावर मोतियाची जाळी, भांगेत मोती सर, चंद्रकोर भाळी, कानात झुमके, केसांमध्ये वेल, नाकात नथ, नथित हिरे, बिल्वदळे, वज्रटिक, `बोलताना पाठीवर जिचे रेशमाचे गोंडे खालीवर होतील अशी` पाच पदरी मोहन माळ!! दंडात वाकी रुताव्या, शिंदेशाही तोडे असावेत आणि पायी सांध्यात सोनसळी, गळ्यात तन्मणी, कमरेला कंबरपट्टा, पायी पैंजण....
"शालू हिरवा, पाच नि मरवा, वेणी तीपेडी घाला" हे गीत तर फारच प्रसिद्ध झाले.
शृंगार आणि सौंदर्य यांचे वर्णन या सगळ्या गीतांमध्ये अगदी खुलून आलेलं आहे. आणि प्रेम! त्याविषयी किती लिहावं आणि कशाप्रकारे लिहावं असा मोठाच प्रश्न पडला आहे.
तरीही एका स्त्रीच्या मनाने वाचलेल्या ह्या चार ओळी लिहीतेच...
काय वाजले प्रिय ते पाऊल,
तो तर वारा तिची न चाहूल,
भास हो फसवा वरचेवरी,
शोधितो राधेला श्रीहरी!!
DAINIK SAKAL 17-11-2002शांताबार्इंच्या गीताचे संकलन रेशीम रेघा...
कवयित्री शांता शेळके यांनी मनाशी संवाद साधणारी तरल कविता लिहून एक वेगळे नाव महाराष्टभर मिळविले आहे. गेल्या चार दशकांपासून सातत्याने कवितालेखन करणाऱ्या शांताबार्इंनी नाटक व चित्रपटांसाठी गाणी आणि लावण्याही लिहिल्या आहेत. ‘रेशमाच्या रेघांनी लाल काळ्या धाग्यांनी...’ या लावणीने तर एकेकाळी सर्वत्र चांगलाच कहर माजविला होता. त्यांची काही गीते ध्वनिमुद्रिका व ध्वनिफितीतून रसिकापर्यंत पोहोचली आहेत पण या सर्व गीतांचे एकत्रित संकलन ‘रेशीम रेघा’ या पुस्तकाद्वारे मेहता पब्लिशिंगने केले आहे.
लावण्या, गौळणी, द्वंद्वगीते आदी प्रकारची ७९ गीते या पुस्तकात संकलित केली आहेत. गीतांचे वैविध्य शांताबार्इंनी किती आकर्षकपणे हाताळले आहे, याचा प्रत्यंतर हे पुस्तक वाचताना येतो. उत्तम निर्मितीक्षमता असणाऱ्या शांताबाईचे हे संकलनाचे पुस्तक मराठी गीतांची आवड असणाऱ्या सर्वांनाच अत्यंत उपयुक्त असेच झाले आहे.
‘काय, बाई सांगू? कसं गं सांगू? मलाच माझी वाटे लाज, काहीतरी होऊन गेलंय आज’, ‘हिची चाल तुरुमुरु, उडती केस भुरुभुरु’, ‘मनाच्या धुंदीत लहरीत येना सखे ग साजणी’, ‘रेशमाच्या रेघांनी लाल काळ्या धाग्यांनी’ या व इतर गाजलेल्या गीतांचा समावेश असणाऱ्या या पुस्तकात शांताबार्इंचा एक वेगळाच पैलू एकत्रितपणे मराठी वाचकांना उपलब्ध झाला आहे.
याशिवाय चित्रपट आणि नाटकांसाठी मागणीनुसार लिहिलेली काही गीते या पुस्तकात असली तरी त्यांना एक वेगळे परिमाण लाभले आहे. त्यातील बहुतेक गाण्यांच्या चाली परिचित असल्यामुळे ही गीते एखाद्या कार्यक्रमात बसवायची असली तर त्यांचा शोध घेणे अवघड होते पण या पुस्तकाच्या माध्यमातून ही अडचण दूर झाली आहे. ‘माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा’, ‘रात सारी तुम्हा संगती जागते’, ‘रातीची झोप मज येईना’, ‘साज मी फुलांचा केला’, ‘कशी गौळण राधा बावरली’ ही व इतर गीतेही संकलन असणारे हे पुस्तक नवीन गायकांना उपयुक्त आहे.
-विलास पगार
DAINIK SAKAL 09-06-2002शांताबाई शेळके या ख्यातकीर्ती प्रतिभावंत कवयित्रीचे नाव मराठीत जसे काव्याच्या प्रांतात अग्रणी आहे तसेच ते ललितलेखनाच्या प्रांतातही आहे. भावगीतांच्या क्षेत्रातसुद्धा बार्इंनी कितीतरी अस्सल गीते मराठी माणसांना अमोल ठेव्यासारखी बहाल केली आहेत. त्यांची बहुसंख्य गीते ही चित्रपट आणि नाटकांसाठी आणि मागणीनुसार आणि प्रसंगाच्या गरजेनुसार लिहिली होती. काही द्वंद्वगीते, लावण्या, गौळणी, नृत्यगीते तर तीस-चाळीस वर्षांपूर्वीची आहेत. तरीही आजसुद्धा त्यांचे वास्तवात साहित्यमूल्य, काव्यमूल्य अबाधित आहे. त्यातलीच काही गाणी ‘रेशीमरेघा’ या काव्यसंग्रहात संकलित आहेत.
काव्यरचनेमागे कलाकुसरीपेक्षा प्रतिभेचा भाग अधिक असतो आणि गीतरचनेत तंत्र आणि कौशल्य अधिक असते, असे म्हटले जाते. शांताबार्इंची रेशीमरेघातील काही गीते या संकेताला अपवाद आहेत. तंत्रकौशल्य आणि प्रतिभा या त्रिवेणी संगमामुळेच ही गीत लक्षणीय आणि स्मरणीय झाली आहेत. उदा. रिमझिम बरसत श्रावण आला, काय बाई सांगू, कसं ग सांगू? का धरिला परदेश, कशी गौळण राधा बावरली, कशी नागीण सळसळती, मनाच्या धुंदीत लहरीत, शालू हिरवा पाचू न मरवा अशी कितीतरी गीते सांगता येतील. या ‘रेशीमरेघा’त एकूण ७९ गीते आहेत. त्यातल्या निम्म्याहून अधिक लावण्याच आहेत. गीतांसाठी बार्इंनी विविध रचनाबंध वापरले आहेत. व्यावसायिकतेला झालेला निर्मितीक्षमतेचा स्पर्श आणि कारागिरीला लाभलेली काव्यगुणांची जोड म्हणजेच या रेशमांच्या रेघांचे कशिदी रूप.
DAINIK SAMANA 04-01-2004साहितच्या क्षेत्रात संवेदनक्षम आणि तरल मानवी भावभावनांचे यथार्थ चित्रण घडवणाऱ्या साहित्यिक कवयित्री शांताबाई शेळके यांच्या ‘रेशीमरेघा’ हा काव्यगीत संग्रह. ७५ गीतांचा हा सुबक, सुरेख संग्रह. पुस्तकाच्या देखण्या मलपृष्ठावर त्यांच्या गीतांवर, ती गीते, लावण्या, गौळणी लिहिण्याच्या अनोख्या पद्धतीविषयी आणि शांताबाई शेळके यांच्या कवयित्री म्हणून असलेल्या अलौकिकत्वाबद्दलही ओझरता तरीही मार्मिक उल्लेख आढळतो तो असा, ‘कवयित्री म्हणून सर्वपरिचित असलेल्या शांताबार्इंनी विपुल गीतलेखनही केले आहे. चित्रपट, नाटके याचप्रमाणे ध्वनिमुद्रिका, ध्वनिफिती अशा माध्यमांतून त्यांची गीते लोकांपर्यंत पोहोचली आणि ती लोकप्रियही झाली. रेशीमरेघा या संकलनात शांताबार्इंनी लिहिलेल्या अनेक लावण्या, गौळणी आहेत. तसेच त्यात काही वेधक द्वंद्वगीतेही आहेत. व्यावसायिकतेला झालेला निर्मितीक्षमतेचा स्पर्श आणि कारागिरीला लाभलेली काव्यगुणांची जोड म्हणजेच या प्रसन्न ‘रेशीमरेघा’. लावणीसम्राज्ञी यमुनाबाई वाईकर आणि त्यांचे कलाकार सहकारी यांना स्नेहादरपूर्वक शांताबार्इंनी रेशीमरेघाची अर्पणपत्रिका सुरुवातीला सादर केलीय. त्यानंतर आपली दोन पानी प्रस्तावना लिहून आपल्या रसिकांशी संवाद साधलाय.
DAINIK SAKAL (KOLHAPUR) 09-06-2002शांताबाई शेळके या ख्यातनाम प्रतिभावंत कवियत्रीचे नाव मराठीत जसे काव्याच्या प्रांतात अग्रणी आहे तसेच ते ललितलेखनाच्या प्रांतातही आहे. भावगीतांच्या क्षेत्रातसुद्धा बार्इंनी कितीतरी अस्सल गीते मराठी माणसांना अमोल ठेव्यासारखी बहाल केली आहेत. त्यांची बहुसंख्य गीते ही चित्रपट आणि नाटकांसाठी त्यांनी मागणीनुसार आणि प्रसंगाच्या गरजेनुसार लिहिली होती. काही द्वंद्वगीते, लावण्या, गौळणी, नृत्यगीते तर तीस चाळीस वर्षांपूर्वीची आहेत. तरीही आजसुद्धा त्यांचे वास्तवात साहित्यमूल्य, काव्यमूल्य अबाधित आहे. त्यातलीच काही गाणी रेशीमरेघा’ या काव्यसंग्रहात संकलित आहेत.
काव्यरचनेमागे कलाकुसरीपेक्षा प्रतिभेचा भाग अधिक असतो. आणि गीतरचनेत तंत्र आणि कौशल्य अधिक असते. असे म्हटले जाते. शांताबार्इंची रेशीमरेघातील गीते या संकेताला अपवाद आहेत. तंत्रकौशल्य आणि प्रतिभा या त्रिवेणी संगमामुळेच ही गीते लक्षणीय आणि रमणीय झाली आहेत. उदा. रिमझिम बरसत श्रावण आला, काय बाई सांगू कसं ग सांगू? का धरिला परदेश, कशी गौळण राधा बावरली, कशी नागीण सळसळती, मनाच्या धुंदीत लहरीत, शालू हिरवा पाचून मरवा अशी कितीतरी गीते सांगता येतील. या रेशीमरेघांत एकूण ७९ गीते आहेत. त्यातल्या निम्म्याहून अधिक लावण्याच आहेत. गीतांसाठी बार्इंनी विविध रचनाबंध वापरले आहेत. व्यावसायिकतेला शालेला निर्मितीक्षमतेचा स्पर्श आणि कारागिरीला लाभलेली काव्यगुणांची जोड म्हणजेच या रेशमांच्या रेघांचे कशिदी रूप.
-डॉ. कल्याणी हर्डीकर
DAINIK PUDHARI 17 -02 -2002चित्रपटांसाठी व नाटकांसाठी शांता शेळके यांनी आजवर विपुल गीते लिहिली. या गीतांमध्ये लावण्या, गौळणी, नृत्यगीते, द्वंद्वगीते, यांचे प्रमाण अधिक होते. संगीत दिग्दर्शकाने दिलेली चाल, दिग्दर्शकाने सांगितलेला प्रसंग यांच्या मर्यादा सांभाळून ओठांवर खिळणारी रचना करणे ही एका परीने आव्हानच! आपल्या प्रतिभेची कसरतच! ती कसरत शांताबार्इंना चांगली जमली. गायक-गायिकांनी या गीतरचनांना सुंदर स्वर दिले. रसिकांना मुग्ध केले.
‘रेशीमरेघा’ या काव्यसंग्रहात शांतबार्इंनी लिहिलेल्या लावण्या, गौळणी आणि द्वंद्वगीते यांचा समावेश करण्यात आला आहे. एकूण ७५ रचना यात आहेत.
हिरव्या रंगाचा छंद, राया पुरवा
मला हिरव्या पालखीत मिरवा.
हिरवं लुगडं हिरवी चोळी
हिरवं गोंदण गोऱ्या गाली
हिरवी तीट कुंकवाखाली
घाला केसात हिरवा मरवा
मला हिरव्या पालखीत मिरवा!
असा हिरवा चुडा, हिरवा साज, हिरवी बाग, हिरवी बिछायत, रिवी केळीची पानं अशा हिरवाईत ही हिरवी राणी आपले हिरवे गुपित श्रावण शिरव्यात प्रकट करून हिरव्या पालखीत स्वत:ला मिरवण्याची हौस ती भागवू पाहते.
स्वत:च्या रूपलावण्यावर खूश असलेली, स्वत:च्या वशीकरण कलेवर विश्वास असलेली आणि आपल्या नखऱ्यांनी पुरुषांना पागल करण्यात निष्णात असलेली ही नटरंगी नार शांताबार्इंच्या लावण्यांतून तिचेच वेगवेगळे मूड समोर येतात.
रात शितळली, सुटे गारवा, चांद सरकला खाली
नीज उतरली डोळ्यांवरती, मला जांभई आली
जवळ या हो, जीवलगा, दूर दूर का?
जवळ ये म्हणताच ती खिडकीतून वारा येतो म्हणून पदर लपेटून घेते, शिणलेल्या देहाने जागता जागता नजर खुणांनी हसून विनवते, अजून दूर दूर का हा तिचा सवाल असतो.
सजणा जवळ आला, की ती त्याची मनधारणा करते, आग्रहानं सांगते,
नको फुकाची साखरपेरणी
मला आणा एक हिऱ्याची मोरणी
नव्या नवतीत पहिली वाहिली
पोरपणाची हौस माझी राहिली
एक सोन्याचं कोंदण घडवा
मधि लाखाची हिरकणी जडवा
राघुनाकाचा दिमाख वाढवा.
शांताबार्इंनी या सर्व लावण्यांमधून मराठमोळ्या स्त्रीच्या प्रणभावनेचा जणू उत्फूल्ल भरजरी मीना बाजारच भरवला आहे. लाखलाखच्या दागिन्यांची तिची हौस अपरंपार आहे. पाडव्याला नव्या शालूमध्ये ती सजून पाहते; तर पंचमीला राया रंगात भिजवा मला म्हणून मागे लागते. (नेम धरून पिचकारी उडवा। जीव रंगात माझा बुडवा। ओली कातीव पुतळी घडवा, मोरपिसारा द्या खुला). श्रावणाच्या पहिलया सोमवारी न्हाऊन धुऊन केस बांधून, टिळा लावून, निळा भरजरी शालू आणि हिरवी काचेळी लेऊन, गळ्यात पाचपदरी मोहनमाळ घालून शूचिर्भूत होऊन शिवमंदिरी जाऊन येईपर्यंत घरधन्याला थांबायला सांगते. (लावणी श्रावणाची), पुनव चांदणे प्यालावर ती बासरीच्या सूरावर रास रंगवते तेव्हा कानातले कुंडल, पाठीवरची वेणी वगैरे सारे विसरून ती हरिरूपात अंतर्बाह्य हरवून जाते. (मी पुनव चांदेणे प्याले गं)
लावणी म्हटली की, नाचगाणे आले. पैंजण-घुंगरांची छुमछुम आली. अत्तराचा फाया आला. ढळणारा खट्याळ पदर आला. शराबी पेला आला. त्याचा तरारणारा फेस, धुंद बेभान चढत जाणारी रात आली, सजवलेली सावरीची शेज आली आणि अलगद कुशीतला लाडेलाडे खुशीही आली. नशिल्या डोळ्यात, गुलाबी मस्तीत ज्वानी भराला आली, की अंग अंगाला भिडून विजेची ठिणगी उडणे आले.
‘‘नशील्या डोळ्यांत पाहून घे
गुलाबी मस्तीत नाहून घे.
आली ही ज्वानी भराला
ओठांशी लावून घे!
अरे पाखरू आतुर झालं
त्याला काळजाशी बिलगून घे
धुंद तुफान दाटून आलं
त्याचा इशारा जाणून घे
नशीला डोळ्यांत पाहून घे.’’
शांताबार्इंच्या ‘रेशीमरेघा’मधील या लावण्या व गौळणी म्हणजे एका परीने मराठमोळ्या शृंगार परंपरेचा उन्मुक्त उत्सव आहे. स्त्री रूपलावण्याचा शृंगाराचा जल्लोष आहे. तेथील भरजरी वस्त्रे, मनमोहक आभूषणे, पाडवा-पंचमी-पुनवेचे भावबंध, कृष्ण-गौळणींचे लाडिक लपंडाव, नर्म-भडक प्रणयाचे उघड उघड आवतण, या सर्वांना सामावून घेणाऱ्याया लावण्या म्हणजे आपल्या संपन्न सांस्कृतिक वारशाचे एक हुरहूर लावणारे स्मरणजंनात्मक प्रक्षेपण आहे. शांताबार्इंनी स्त्रीसौंदर्याच्या पारंपारिक कल्पनांना अभिजात अभिमानाने पेश करून मराठमोळ्या अस्मितेचा ध्वज उंच फडकावला आहे.
KESARI 03-03-2002प्रसिद्ध कवियित्री, गीतकार शांता शेळके यांचा ‘रेशीमरेघा’ हा लावणीसंग्रह (मात्र, यातील सर्वच रचना ‘लावणी’ या काव्यप्रकारात मोडत नाहीत.) म्हणजे जणू भरजारी कल्पनांच्या जरतारी शब्दऐश्वर्याचा काव्यकशीदाच आहे! या संग्रहात लावण्यांबरोबरच गौळणी, नृत्यगीते, द्वंद्वगीते, कोळीगीते अशा स्वरुपाच्या काव्यरचना आहेत. शांताबार्इंनी चित्रपटांसाठी आजवर विपुल गीतरचना / पद्यरचना केली. अर्थातच ती मागणीनुसार, प्रसंगानुसार होती. तशाच रचनांचे हे संकलन आहे. मागणीनुसार लिहिलेल्या असल्या तरी या रचनांना उंची आहे, दर्जा आहे. लावणीसम्राज्ञी यमुनाबाई वाईकर यांना हा संग्रह अर्पण करून शांताबार्इंनी मोठेच औचित्य साधले आहे.
‘रशीमरेघा’मध्ये एकूण पंचाहत्तर रचना आहेत. ‘रेशमाच्या रेघांनी लाल-काळ्या धाग्यांनी कर्नाटकी कशीदा मी काढिला’ या शांताबार्इंच्याच लावणीवरून हे शीर्षक देण्यात आले आहे. यातील अनेक रचना नामवंत गायिकांच्या आवाजात आपल्या कानावरून यापूर्वी अनेकदा गेलेल्या आहेत. शांताबार्इंच्या रेशीमरेघांचा हा शब्दकशीदा उलगडून पाहताना त्यांच्या शब्दकलेचे वैभव दिपवून टाकते. घरातील काही खास कार्यानिमित्त ठेवणीतला शालू अथवा पैठणी बाहेर काढावी आणि तिचा जुनेपणा कालच्या इतकाच ताजा जाणवावा, अशा या साऱ्या ‘ठेवणीतल्या चिजा’ आहेत. या चिजा हव्या तेव्हा काढाव्यात आणि त्यांच्या गर्भरेशमी सूत-पोताचा मनमुराद आनंद घेत तो जुना सुंगध तनामनात उत्फुल्लपणे भरून घ्यावा व स्मरणरंजनात बुडून जावे, असा काहीसा अनुभव या रचना वाचताना येतो.
शांताबार्इंच्या या शाब्दिक रेशीमरेघांची कलाकुसरही इतकी बारीक व नखरेबाज आहे की वाचताना अनेकदा चमकून जावे! लावणी लिहिताना जो स्पष्ट धीटपणा अत्यावश्यक असतो, तो तर या रचनांमधून जाणवतोच; (त्यादृष्टीने ‘भुरळ घालतो मना’ आणि ‘सुखाचे हिंदोळे आभाळी भिडती’ या रचना पाहाव्यात. ‘सुखाचे...’मधील तत्त्वज्ञान तर वस्तुनिष्ठ विचार देणारे आहे.) परंतु सूचकता हे उत्कृष्ट काव्याचे महत्त्वाचे लक्षण मानले जाते, त्याचाही प्रत्यय अनेक रचनांमधून येतो. (‘माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा’, ‘कथा ही पहिल्या प्रीतीची’, ‘पाहुणे तुम्ही मज आवडला’) ‘काय बाई सांगू, कसं गं सांगू मलाच माझी वाटे लाज, काहीतरी होऊन गेलंय आज’ ही नवयुवतीच्या भावना उलगडणारी उषा मंगेशकर यांच्या आवाजातील सुंदर रचनाही येथे वाचायला मिळेल.
‘लावणी पाडव्याची’मधील तरुणी शालू विकत आणण्याची लाडीक मागणी करते. तिला असा शालू हवा आहे-
घडी उकलता सोनसळ्यांचा दिसेल चमकुन रंग
रेशमातुनी खुलेल माझे पिवळे गोरे अंग
दंडावरती जडवुन ऐने चोळि अंजिरी शिवा
मला एक शालू विकत घ्या नवा ।।
अशी हक्काची मागणी करीत ही तरुणी आपल्या राजसाला पाडव्यानिमित्त एकान्तात ओवाळण्याची आस बाळगते. ‘सजण तुम्ही दिलदार’मधील तरुणी सजणाने दिलेल्या लाखाच्या दागिन्यांवर खुश आहे. या लावणीतून जुन्या काळातील दागिण्यांची ओळख सहजच होऊन जाते. देह आणि दागिने यांच्यातील परस्परसंबंध या लावणीतून दिसतील.
‘लावणी हिरव्या रंगाची’ ही तर एक अनोखी रचना म्हणावी लागेल. हिरव्या रंगाचे अनेक विभ्रम या लावणीत आढळतील. उदाहरणार्थ :
हिरव्या रंगाचा छंद, राया, पुरवा
मला हिरव्या पालखीत मिरवा!
अहो, मी तुमची हिरवी राणी
हिरवी चाहुल माझ्या मनी
हिरवं गुपित सांगेन कानी
उरि झरतो श्रावणशिरवा
मला हिरव्या पालखीत मिरवा ।।
अशी ही हिरवी लावणी वेगळ्याच शब्दलालित्याचा अनुभव देते. ‘लावणी पंचमीची’ही अशीच रंगांची मुक्त उधळण करणारी आहे.
या संग्रहात ‘पुनवेचा चंद्रमा आला घरी’, ‘मला आण एक हिऱ्याची मोरणी’, ‘प्राणविसावा, लहरि सजण कुणी गावा’, ‘का धरिला परदेश’, ‘कशि नागीण सळसळली’, ‘मनाच्या धुंदीत लहरीत’, ‘डोळ्यात वाकुन बघतोस काय’, ‘ये ये सजणा ये ना’, ‘हे श्यामसुंदर राजसा’, ‘शालू हिरवा, पाचू नि मरवा’, ‘चांदणं टिपूर’, ‘अशीच अवचित भेटून जा’, ‘पाहुणे, तुम्ही मज आवडला’, ‘रेशमाच्या रेघांनी’, ‘तुझ्या गालात हसतंय काही’, ‘कशि गौळण राधा बावरली’ अशा काही रचना यापूर्वीच रसिकांच्या परिचयाच्या आहेत. त्या आपण आकाशवाणीवरून अनेकदा ऐकलेल्या आहेत. त्या येथे वाचताना पुन:प्रत्ययाचा आनंद देतात.
‘ना दिला डोळ्यास डोळा’, ‘हिंदोळा झुलतो’, ‘रात रंगली रास रंगला’, ‘कदंबतरुतळवटी’ या रचनांना लावण्या म्हण्ता येणार नाही. (लावण्या नसलेल्या अशा इतरही बऱ्याच रचना आहेत) मात्र, त्या निखळ कविता म्हणून लक्षात राहणाऱ्या आहेत. या चारही कवितांमधील शब्दचित्र मनोरम आहे. ‘रेशीमरेघा’मधील काही लावण्या लांबलेल्या व अनावश्यक मोठ्या वाटतात. ‘बाई भलताच झाला प्रकार’, ‘माझ्या डोळ्याला डोळा न देता’ या रचना लावणी म्हणून पाहताना आटोपशीर नाहीत. (लावणीला विशिष्ट वृत्तांचे, तंत्राचे बंधन नसते का?)
चंद्रमोहन कुलकर्णी यांचे मुखपृष्ठ आतील विषयांना साजेसे, नाजूक आणि खूपच छान आहे. ‘पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा’ या ग.दि. माडगूळकर यांच्या लावणीची आठवण देणारे! मात्र आतील चित्रे (कोणी रेखाटली आहेत, त्याचा उल्लेख नाही) मात्र अगदीच सुमार आणि मुखपृष्ठाच्या तुलनेत रसभंग करणारी आहेत. पोरकट आणि बाळबोध अशी ही चित्रे आहेत. काही चित्रे पुन्हा पुन्हा वापरण्यात आली आहेत. किंबहुना कुठल्याच रचनेसमवेत चित्रे नसती तरी काही फरक पडला नसता! असो. रेखाटनांकडे दुर्लक्ष करून आपण आपण शब्द पाहायचे!
पण एकुणच अतिशय साध्या सोप्या शब्दांमधील या ‘रेशीमरेघा’ म्हणजे शब्दांची भरजरी पैठणीच म्हणता येईल. हवी तेव्हा काढून पुन:प्रत्ययाचा आनंद घेण्यासाठी आपल्या संग्रहात ही ‘ठेवणीतील चीज’ असायला हवी!
प्रदिप कुलकर्णी