Sainath Chawaliश्री राजेंद्र आकलेकर लिखित कहाणी पहिल्या आगीनगाडीची हे पुस्तक आज वाचून झालं.भारतामध्ये 16 एप्रिल 1853 रोजी 3:30वाजता बोरीबन्दर ते ठाणे या मार्गावर पहिली रेल्वे धावली.धावण्यापूर्वी ही रेल्वे भारतात सुरू करण्यासाठीचा लढा,चळवळ यातील अधिकारी लोकांनी केलेलं प्रामाणिक काम माणसाच्या , वाचकाच्या मनाला क्षणभर विचार करायला लावत.जेम्स बर्कले ने पहिला वहिला भारतातील रेल्वे मार्ग बांधला हे आजच्या पिढीतील क्वचित लोकांना माहिती असेल.लंडनच्या किंग्ज कॉलेजमधून त्यांनी आपलं अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केलं.रॉबर्ट स्टीफन्सन यांच्याशी बर्कले यांची आयुष्यभर मैत्री राहिली.रॉबर्ट स्टीफन्सन हे जॉर्ज स्टीफन्सन यांचे पुत्र होते.(ज्यांनी वाफेच्या इंजिनवर चालणारी पहिली रेल्वे उभारली होती.)
बर्कले साहेब 7 फेब्रुवारी1850 ला भारतात पोहचले आणि 16 एप्रिल 1853 ला रेल्वे धावली.म्हणजे अवघ्या 3 वर्षात हे सर्व काम त्यांनी केले.रेल्वे सुरू करण्याचा ब्रिटिशांचा उद्देश जरी स्वार्थी असला तरी आपल्याकडे त्यांनी सुरू करण्यापूर्वी रेल्वे नव्हती आणि त्यांनी जर आणलीच नसती तर सुरू झाली असती की नाही हा गंभीर प्रश्न आहे आणि त्याच उत्तर नकारार्थीच असेल.
ही आहे भारतातील पहिल्या रेल्वेमार्गाची कथा! आपला प्रवास
मुंबईच्या दक्षिण टोकापासून म्हणजेच व्हिक्टोरिया टर्मिनसपासून सुरू होईल. या मूळ रेल्वेमार्गावर पडलेल्या अवशेषांकडे बघत,त्यांचा अर्थ लावत, त्यांची नोंद घेत तो उत्तर दिशेकडे कूच करेल. या अवशेषांपैकी काही अवशेष खूप महत्त्वाचे आहेत, काही अस्ताव्यस्त पडलेले आहेत, काही तर अगदीच क्षुल्लक आहेत; पण देशातील पहिल्यावहिल्या रेल्वेमार्गाच्या विकासाची गोष्ट सांगण्यासाठी ते अजूनही आपला श्वास टिकवून आहेत. त्या काळातल्या तंत्रज्ञानाबद्दल ते माहिती देतात. तसंच हे शहर कसं वाढलं, याचीही गोष्ट सांगतात. नेमक्या याच गोष्टीसाठी GIPR म्हणजे मध्य रेल्वे आणि BB&CI म्हणजे पश्चिम रेल्वे यांची रचना कशी झाली, हे इत्थंभूत सांगण्याचा प्रयत्न या पुस्तकामध्ये केला आहे.
या संशोधनसाठी लेखकाने व्हिक्टोरिया टर्मिनस ते ठाणे
यादरम्यान अनेकदा रेल्वेने प्रवास केला. अनेक गोष्टी
धुंडाळण्यासाठी रेल्वेमार्गाच्या कडेने चालतचालत अभ्यास झाला. अर्थात त्यासाठी स्थानिक रेल्वे प्रशासनाची वेळोवेळी रीतसर परवानगी घेतली होती. भूतकाळातली रेल्वे, तिचे रूळ आणि त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या गोष्टींचं कौतुक करताना आपण हे विसरता कामा नये की, मुंबईची ही रेल्वे किंवा भारतीय रेल्वे नेहमीच भविष्याकडे पाहत आली आहे.
डॉ. ओंकार सुमंतवाफेच्या इंजिनचा क्रांतिकारक शोधाने समस्त विज्ञान जगताने गरुड भरारी घेतली आणि वेगवेगळे शोध लागायला सुरुवात झाली. पारतंत्र्यात हालपेष्टा भोगणाऱ्या भारताला रेल्वे , पोष्टखात, तरायंत्र, रस्ते , वीज, अशा वेगवेगळ्या माध्यमातून विज्ञानाने आपल्या कवेत घेतलं आणि नवनवीन गोष्टी भारतात यायला सुरुवात झाली. १६ एप्रिल १८५३ रोजी भारतातील पहिली प्रवासी रेल्वे गाडी ३ इंजिन आणि १४ डब्यांसह बोरीबंदर ते ठाणे या ३४ किलोमीटरच्या मार्गावर धावली आणि भारताच्या इतिहासात एक नवीन अध्याय सुवर्ण अक्षरांनी नोंदविला गेला. “ झुक झुक आगिनगाडी धुरांच्या रेषा हवेत काढी “ अशी गाणी म्हणत बालपणापासूनच रेल्वे ह्या गोष्टीच कुतुहुल आपल्या सगळ्यांच्या मनात कायम आहे. या रेल्वे कशा धावल्या , रेल्वे लाईन कुठे टाकल्या, त्या टाकताना आलेल्या अडचणी व त्यावर केलेल्या उपाययोजना अश्या अनेक गोष्टी जर आपल्याला जाणून घ्यायच्या असतील तर हे पुस्तक उत्तम आहे. रेल्वे इंजिन, रेल्वे पूल, भुयारी मार्ग , पादचारी मार्ग, रेल्वे मार्ग, वेगवेगळ्या स्टेशनचा तसेच त्यांच्या नावाचा इतिहास अश्या अनेक गोष्टींचा इतिहास ह्या पुस्तकात दडलेला आहे. जेम्स जॉन बर्कले हा सातासमुद्रा पार भारतात आलेले इंजिनिअर माणूस ह्याने रेल्वेलाइनची सुरुवात केली. असंख्य अडचणीवर मात करुन तसेच कठोर परिश्रम करुन ह्या माणसाने भारतातील पहिला रेल्वे मार्ग प्रस्तावित किंमतीपेक्षा २०% कमी किंमतीत उभा केला तसेच नियोजित वेळेच्या आधी देखील पूर्ण केला. ह्या सगळ्या वृत्तांत प्रस्तुत पुस्तकात लेखकाने दिलेला आहे. भारतात पिकणार कापूस हा आपल्याकडील रेल्वे जाळ विकसित करण्यासाठी कारणीभूत झाला हया विषयीची संपूर्ण माहिती आपल्याला ही पुस्तकात वाचायला मिळते. त्या काळी स्थानिक लोकांना रेल्वे हा चमत्कार होता तर रेल्वे गाडी ही देवतेप्रमाणे होती. कोणत्याही दृश्य शक्तीशिवाय वाफेच्या इंजिनवर सुरु झालेली ही रेल्वे त्या काळी अंधश्रद्धेच्या विळख्यात सापडली आणि तिच्या विषयी अनेक कंड्या पिकल्या. पण सरळ साधा व सोप्या प्रवासाची थोड्या दिवसांनी लोकांना भुरळ पडली आणि अंधश्रद्धा मागे पडल्या. ह्याच वर्णन वाचताना गंमत वाटते. २०१६ साली “ लातूर “ या शहरात उद्भवलेल्या दुष्काळी परिस्थितीसाठी रेल्वेच्या माध्यमातून लातूर शहराची तहान भागवण्यात आलेली होती. ही बातमी आपण वर्तमानपत्रात वाचलेली होती. मुंबई च्या इतिहासात सुद्धा अशाप्रकारे पाणी रेल्वेने पुरवल्याचा उल्लेख आहे. ह्या पुस्तकात त्याच्या विषयी संपूर्ण माहिती वाचायला मिळते . इसवी सन १८५६ साली रेल्वेने एकूण २३ गाड्या पाण्यासाठी सोडल्या होत्या , त्याचा खर्च १०,७०० ₹ इतका आला होता अशी रेल्वे दफ्तरी नोंद देखील आहे. १७० वर्षाच्या रेल्वे चा इतिहास हा या पुस्तकाचा गाभा आहे. १७० वर्षात रेल्वे आणि रेल्वे विभागाने टाकलेली कात ह्याच पूर्ण वर्णन ह्या अनुवादित पुस्तकात आहे. २१ व्या शतकात अंतराळात बागडणारा माणूस परग्रहावरील जीवन, पर्यावरण, वातावरण ह्याचा अभ्यास करताना दिसतो. ह्या सगळ्या मध्ये दळणवळणाचे वेगवेगळे पर्याय आपण सध्या वापरतो आहे. कदाचित रस्ते , विमान, यामध्ये प्रगत देशात रेल्वे हरली असेल किंवा मागे पडली असेल पण अजूनही तग धरून आहे. तर भारता सारख्या विकसनशील देशात आपल्याला प्रगतीच्या वाटेवर नेण्यासाठी रेल्वे खस्ता खात आहे अस मला वाटत. आपल्या बहुरंगी आणि बहुढंगी देशाला जोडण्याच काम तसेच खऱ्या अर्थाने राष्ट्रीय एकात्मता साध्य करण्याचा काम रेल्वेने केलेले आहे, करत आहे आणि तसेच करत राहील. भारतीय रेल्वेच्या जन्माची कहाणी, विकासाचे टप्पे , काळानुसार झालेले बदल ह्या सर्वांचा धावता आराखडा ह्या पुस्तकात घेतलेला आहे.
Madhav JogdandHello Everyone...
एका छान पुस्तकाचा पुस्तक परिचय...
कहाणी पहिल्या आगिनगाडीची...
ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात सात बेटांवर भर घालून तयार झालेलं हे शहर मुंबई.. त्यानंतर 1853 ला इथेच भारतातली पहिली रेल्वे धावली मुंबई म्हणजे तत्कालीन बोरीबंदर ते ठाणे म्हणजेच सालसेत.( साष्टी) . त्या रेल्वेची ही कहाणी....
भारतात रेल्वे यायची हे कसं ठरलं कधी ठरलं त्यानंतर प्रत्यक्ष रेल्वे सुरू व्हायच्या आधी रेल्वे मार्ग कसा बांधला गेला तो बांधताना काय काय अडचणी आल्या... इथपासून ते पहिली रेल्वे कशी धावली याची माहिती आहे.
त्यानंतर बोरीबंदर स्टेशन म्हणजेच आत्ताच CSTM Station हे बांधले जाताना चा इतिहास आणि त्याची माहिती... त्यानंतर लेखक अक्षरशा आपल्याला पुस्तकातूनच रेल्वे रुळावरून मुंबई पासून ते कल्याण पर्यंत घेऊन येतात येताना वाटेत येणार प्रत्येक स्टेशन प्रत्येक रेल्वे मार्ग याची माहिती आणि त्यांचा सुंदर इतिहास सांगतात....
त्यानंतर GIPR म्हणजेच आत्ताची मध्य रेल्वे आणि Harbor Railway. आणि BB &CI म्हणजे आत्ताची पश्चिम रेल्वे यांची अशीच सुंदर माहिती आहे.
त्याचबरोबर बॉम्बे इम्प्रोवमेंट ट्रस्ट बॉम्बे पोर्ट ट्रस्ट यांच्या थोड्या किस्से कहाण्या... मुंबईच्या विकास कसा झाला याचा इतिहास आणि काही कथा या सुद्धा या पुस्तकात आहेत.
मुंबई आणि रेल्वे यांवर ज्यांचे प्रेम आहे आणि ज्यांना जुन्या इतिहासात रस आहे त्यांनी हे पुस्तक नक्की नक्की वाचावं त्यांना खूप आवडेल....
मी हे पुस्तक माझ्या मोबाईल वरील Kindle app वर वाचलं इतक्या छान पुस्तकाची माहिती माझ्या मित्रांना मिळावी म्हणून हि पोस्ट!
Subhash Joshi
जेमतेम सहा महिन्यांपूर्वी प्रकाशित झालेल्या आजच्या पुस्तकालाही ‘मुंबई`चाच संदर्भ आहे. मूळ इंग्रजी पुस्तक आहे Halt Station India, लेखक राजेन्द्र आकलेकर आणि रोहन टिल्लू यांनी मूळ पुस्तकाला न्याय देणारा यथोचित अनुवाद केला आहे.
भारतात आगिनगाडी सुरूं करण्याचा विचार 1840 पासूनच सुरूं झाला होता आणि भारतातलीच नव्हे तर आशियातली पहिली रेल्वे गाडी 16 एप्रिल 1853 रोजी तीन इंजिन्स आणि चौदा डब्यांसह बोरीबंदर ते ठाणे या चौतीस कि.मी.च्या मार्गावर धांवली. अशी रेल्वे सुरूं करण्याच्या संकल्पनेपासून ती प्रत्यक्ष धांवेपर्यंतची सगळी प्रक्रिया अतिशय रोमांचकारक आहे.
या पुस्तकासाठी लेखकाने अक्षरशः हजारो कागदपत्रांचा, संदर्भ पुस्तकांचा, देशभर फिरून दस्तावेजांचा अभ्यास केला आहे आणि या रेल्वे मार्गावरून शेकडों वेळां पायी फिरून अभ्यास केला आहे. हे पुस्तक हलकेफुलके किस्से सांगत नाही तर अनेक संदर्भ आणि पुराव्यांसकट अनेक किचकट ऐतिहासिक तपशील सांगते. त्या निमित्ताने आपल्याला ब्रिटिश राजवटीबद्दलही बरंच कांही वाचायला मिळतं. हे पुस्तक इतक्या क्लिष्ट तपशीलाने भरलं आहे कीं आपण कंटाळून बाजूला ठेवायचा विचार करतो... पण तरीही हे पुस्तक आपल्याला ते बाजूला ठेववत नाही हे विशेष. हे पुस्तक लिहिण्यासाठी लेखकाने आणि अनुवादकाने घेतलेले परिश्रम वाचूनच आपली दमछाक होते, छाती दडपते, तरीही आपण ते वाचून पुरं करतोच.
एक पराकोटीचा रोमहर्षक संदर्भग्रंथ असं मी त्याचं वर्णन करीन.
- सुभाष जोशी, ठाणे
Maharashtra Times Samwad 24-2-2020लोकलशिवाय मुंबईची कल्पनाच करता येत नाही. आज मुंबईची लोकसंख्या १ कोटी ८२ लाख आहे आणि लोकलनं रोज सुमारे ७५ लाख माणसं प्रवास करतात. एवढ्या अवाढव्य प्रमाणात प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या आगगाडीचा जन्म झाला १६ एप्रिल १८५३ रोजी. देशातीलच नव्हे तर, आशिया खंडातील पहिली आगगाडी बोरीबंदर (आताचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) ते ठाणे अशी धावली. तत्पूर्वी १८२५ साली इंग्लंडमध्ये पहिली आगगाडी सुरू झाली, त्यानंतर देशोदेशी आगगाडी सुरू करण्याचे प्रयत्न झाले. अमेरिकेत रेल्वेमार्ग बांधले गेले आणि त्यानंतर तिसरा नंबर भारताचा लागला. तेव्हा आपल्यावर इंग्लंडचं अधिराज्य होतं. हिंदुस्तानातला कच्चा माल इंग्लंडला पाठवणे आणि तिकडचा माल विक्रीसाठी हिंदुस्तानात आणणं, हा रेल्वे बांधण्यामागचा सरकारचा मुख्य हेतू होता. त्यासाठी हिंदुस्तानातील बंदरं अंतर्भागाशी जोडणं आवश्यक होतं. यातून मुंबई, कलकत्ता आणि मद्रास (आता चेन्नई) या बंदरांपासून रेल्वेमार्ग टाकायचं इंग्रज सरकारनं ठरवलं. हिंदुस्तानासारख्या मागास देशात रेल्वे चालवणं फायदेशीर होईल, याचा अनेकांना विश्वास वाटेना आणि सामान्यांना तर बिनबैलाची, बिनघोड्याची गाडी चालेल आणि सामान व माणसं वाहून नेईल असंच वाटेना. याबाबत लोकांना नीट माहिती देण्यासाठी म्हणून तेव्हाच्या टाऊन हॉलमध्ये एक मोठी सार्वजनिक सभा झाली. नाना शंकरशेटांसारख्या समाजधुरिणांची भाषणंही झाली, पण तरीही पुरेसा प्रतिसाद मिळेना. शेवटी सरकारनं कंपनीत पैसा गुंतवणाऱ्या भागीदाराना त्यांच्या गुंतवणकीवर ५% एवढ्या परताव्याची खात्री दिली. म्हणजे कंपनीला तोटा झाला, तरी त्यांना त्यांच्या गुंतवणुकीवर ५% व्याज मिळेल याची खात्री दिली. शिवाय कंपनीला लागणारी सर्व जमीन, म्हणजे रूळ टाकण्यासाठी आणि इमारती, स्थानकं. पूल इ. साठीची सर्व जमीन सरकारनं फुकट देण्याचं कबूल केलं. त्यानंतर मात्र रेल्वेचं काम भराभर होऊ लागलं आणि १६ एप्रिल १८५३ रोजी भारतातील पहिली आगगाडी धावली... भारतीय रेल्वेची अशी विविध स्वरूपाची माहिती `कहाणी पहिल्या आगीनगाडीची` या या राजेंद्र आकलेकर लिखित पुस्तकात वाचायला मिळते. या मूळ इंग्रजी पुस्तकाचा तेवढाच रंजक आणि माहितीपूर्ण अनुवाद रोहन टिल्लू यांनी केला आहे.
आजमितीला मुंबईत १३६ लोकल स्थानकं आहेत आणि त्यावरून रोज २३४० पेक्षा अधिक लोकल गाड्या धावतात. या सगळ्या गाड्यांची आणि स्थानकांची माहिती पुस्तकात देणं शक्य नाही, पण त्यातल्या काही विशेष स्थानकांची आणि त्यांच्या आसपासच्या विशेष जागांची, तिथल्या इतिहासाची माहिती पुस्तकात आवर्जून देण्यात आली आहे. उदा. आजच्या सी.एस.एम.टी.च्या जवळच म्हणजे आधीच्या व्हिक्टोरिया टर्मिनसजवळ, म्हणजेच बोरीबंदरजवळ पूर्वी `फोर्ट जॉर्ज` किल्ला होता. या जॉर्ज किल्ल्यातूनच पहिल्या आगगाडीला तोफांची सलामी दिली गेली होती. आकलेकरांनी मुंबईमधल्या अनेक लोकल स्थानकांची आणि आसपासच्या भागांची अतिशय रंजक महिती पुस्तकात दिलेली आहे. तसंच `इतिहासाच्या पाऊलखुणा` या शीर्षकाखाली त्या भागांची जुनी माहितीसुद्धा दिली आहे. त्यामुळे पुस्तक एखाद्या कथा-कादंबरीसारखं रोचक झालं आहे.
आकलेकर हे खरे रेल्वेप्रेमी आणि मुंबईप्रेमीही आहेत, असं त्यांचं हे पुस्तक वाचल्यावर नक्कीच जाणवतं. आपली पहिली आगगाडी ज्या मार्गानं धावली तो मार्ग प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी ते त्या मार्गानं पायी चालले आहेत. अजूनही ते रेल्वेमार्गानं चालत असतात (अर्थात आवश्यक त्या सर्व परवानग्या काढून). त्यामुळेच मार्गाचं काम सुरू असतानाच्या अडचणी, वेगवेगळ्या स्थानकांचं वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम, आसपासच्या ऐतिहासिक खुणा, काही जुन्या गोष्टी, फार माहीत नसलेल्या भागांची माहिती, असा खूप तपशील या पुस्तकात वाचायला मिळतो.
पुस्तकातील ही सगळी माहिती अतिशय रंजक आहे. मात्र पुस्तकाला सलग कथानक नसल्यामुळे ही माहिती काहीशी विसकळीत वाटते. म्हणजे आगीनगाडीची कथा वाचताना अनेक छोटे छोटे भाग एकामागून एक वाचत जावं लागतं. एका भागाचा पुढच्या भागाशी संबंध असेलच असं नाही. मुंबईतल्या १३६ लोकल स्थानकापैकी एखाद्याची माहिती वाचायची असेल, तर ती कुठे आहे ते आधी शोधून काढावं लागतं. म्हणजे हव्या त्या स्थानकाची, किंवा इतर विशेष काही गोष्टींची माहिती पुस्तकात नेमकी कुठे सापडेल, हे कळण्याचा काही तरी सोपा मार्ग असायला हवा होता. अनुक्रमणिका जर विस्तारानं दिली असती, तर ही अडचण कदाचित दूर होऊ शकली असती. तेढी उणीव सोडली, तर रेल्वेविषयक माहितीचा एक खजिनाच या पुस्तकात दडलेला आहे.
पुस्तकात बरीच छायाचित्रंही आहेत. मात्र त्यांपैकी बरीच काळपट आहेत. जुन्या छायाचित्रण तंत्रामुळे कदाचित तसं झालं असावं. परंतु काही चित्रं बरीच सुस्पष्ट आहेत. मुखपृष्ठावरील गाडीचं छायाचित्रही आकर्षक आहे आणि नावाला अगदी शोभेसं आहे. मुंबई बेटांचा आणि मुंबईतल्या रेल्वेचाही नकाशा पुस्तकात आहे. एकंदरीत रेल्वेप्रेमींनी जरूर संग्रही ठेवावं असं हे पुस्तक आहे!
Shubhada Gogteआज मुंबईची लोकसंख्या १कोटी ८२ लाख आहे. त्यापैकी अनेकांना रोज कुठेतरी जायचं असतं. शाळेला, कामाला, देवाला, कोणाला तरी भेटायला, लांबच्या-जवळच्या प्रवासाला आणि मुंबई बघायला सुद्धा! या पैकी कोणी चालत जातं,कोणी बसनं जातं, कोणी मोटरनं जातं, कोणी विमानानं तर कोणी जहाजानंसुद्धा प्रवास करतं पण यातले बहुसंख्य लोक आगगाडीनं प्रवास करतात. रोज ठराविक ठिकाणी कामाला जाणारी बहुसंख्य सामान्य माणसं तर मुंबईच्या लोकल गाडीनं,ठराविक वेळेला असणाऱ्या ठराविक लोकलनं प्रवास करतात. एव्हढंच काय, त्यांचे डबे आणि ड्ब्यातले सहप्रवासी सुद्धा ठरलेले असतात.
या लोकलगाडीला मुंबईची Lifeline ,जीवनवाहिनी असं म्हणतात.
लोकलशिवाय मुंबईची कल्पनाच करता येत नाही. कारण लोकलनं रोज मुंबईतली सुमारे ७५ लाख माणसे प्रवास करतात.
एव्हढ्या अवाढव्य प्रमाणात प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या आगगाडीचा जन्म झाला 16 एप्रिल १८५३ रोजी. देशातलीच नव्हे तर आशिया खंडातली पहिली आगगाडी बोरीबंदर (आताचं छ्त्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ) ते ठाणे अशी धावली आणि. ही देशातलीच नव्हे तर सर्व आशियातली पहिली गाडी ठरली. यापूर्वी १८२५ साली इंग्लंडमधे प्रथम आगगाडी सुरू झाली आणि त्यानंतर देशोदेशी आगगाडी सुरू करण्याचे प्रयत्न सुरू झाले. अमेरिकेत रेल्वेमार्ग बांधले गेले आणि त्यानंतर तिसरा नंबर भारताचा लागला.
आगगाडी आली तेव्हांपासून जीवनाचा वेग वाढला. जेटयुग म्हणतात त्याला खरी सुरवात तेव्हांच झाली.
तेव्हां आपल्यावर इंग्लंडचं आधिराज्य होतं. हिंदुस्तानातला कच्चा माल इंग्लंडला पाठवणे आणि तिकडचा माल विक्रीसाठी हिंदुस्तानात आणणे हा रेल्वे बांधण्या मागचा सरकारचा मुख्य हेतु होता. त्यासाठी हिंदुस्तानातील बंदरं अंतर्भागाशी जोडणं आवश्यक होतं. त्यासाठी मुंबई, कलकत्ता आणि मद्रास (आता चेन्नई) या बंदरांपासून रेल्वेमार्ग टाकायचं इंग्रज सरकारनं ठरवलं. ह्या साठी खाजगी रेल्वे कंपन्यांनी पुढे यावं असा सरकारचा प्रयत्न होता. ईस्ट ईंडीया रेल्वे कंपनी, ग्रेट ईंडियन पेनिन्शुला रेल्वे आणि साउथ इंडियन रेल्वे कंपनी अशा कंपन्या स्थापनही झाल्या. पण त्यांना पुरेसं भांडवल मिळेना. हिंदुस्तानासारख्या मागास देशात रेल्वे चालवणं फायदेशीर होईल याचा अनेकांना विश्वास वाटेना आणि सामान्यांना तर बिन-बैलाची, बिन घोड्याची गाडी चालेल आणि सामान व माणसं वाहून नेईल असंच वाटेना. याबाबत लोकांना नीट माहिती देण्यासाठी म्हणून तेव्हांच्या टाऊन ‘होलमध्ये एक मोठी सार्वजनिक सभा झाली. नाना शंकरशेटांसारख्या समाजधुरीणांची भाषणंही झाली पण तरीही पुरेसा प्रतिसाद मिळेना.
शेवटी सरकारनं कंपनीत पैसा गुंतवणाऱ्या भागीदारांना त्यांच्या गुंतवणकीवर ५% एवढ्या परताव्याची खात्री दिली. म्हणजे कंपनीला तोटा झाला तरी त्यांना त्यांच्या गुंतवणीकीवर ५% व्याज मिळेल याची खात्री दिली. शिवाय कंपनीला लागणारी सर्व जमीन, म्हणजे रूळ टाकण्यासाठी आणि इमारती, स्थानकं. पूल इ. साठीची सर्व जमीन सरकारनं फुकट देण्याचं कबूल केलं. त्या बद-ल्यात रेल्वेनं सरकारी टपाल फुकट वाहून न्यायचं होतं. आणि सरकारचा एक अधिकारी कंपनीच्या डायरेक्टर बोर्डावर राहणार असंही ठरलं होतं.
त्यानंतर मात्र रेल्वेचं काम भराभर होऊ लागलं आणि १६ एप्रिल १८५३ रोजी भारतातली पहिली आगगाडी धावली. थोड्याच दिवसात बोरीबंदरहून मुंबईच्या अंतर्भागात जाणाऱ्या कमी अंतराच्या गाड्याही सुरू झाल्या.
मुंबईतली लोकल सुरू झाली.
सुरू झाली आणि दिसामाशी वाढू लागली.
१८६७ मध्ये BB&CI कंपनीनं म्हणजे बॉम्बे,बरोडा ॲड सेंट्र्ल इंडीया रेल्वे कंपनीनं चर्चगेटपासूनही लोकल लाइन्स सुरू केल्या.
मुंबईत आज या दोन्ही लोकल लाइन्स सुरू आहेत. सबर्बन लाइन्स - सेंट्रल आणि वेस्टर्न, म्हणून या ओळखल्या जातात. आणि ७०-७५ लाख लोकांना रोज इच्छित स्थळी घेऊन जातात.
देशाच्या इतर भागातही वेगवेगळ्या कंपन्या रूळमार्ग बांधत होत्या. अर्थात ईंग्रज सरकाच्या मदतीनं.
देश स्वतंत्र झाला तेव्हां ५०० च्या आसपास संस्थानं आपल्या देशात होती. काही अगदी लहान होती तर काही मोठी होती. आपापल्या संस्थानाचा म्हणजे आपापल्या राज्याचा कारभार स्वतंत्रपणे चालवत होती, त्यापैकी काही मोठ्या संस्थानांनी स्वत:च्या रेल्वे लाइन्सही सुरू केलेल्या होत्या. उदा.- बडॊद्याची GBSR (गायकवाड्स बडॊदा स्टेट रेल्वे), जयपूरची स्टेट रेल्वे,कच्छ स्टेट रेल्वे इ. अनेक कंपन्यांना असे छोटे मार्ग चालवणं जड जात होतं. मग मोठ्या कंपन्यांनी असे मार्ग आपल्यात सामिल करून घ्यायला सुरवात केली.इंग्रज सरकारनंही अनेक कंपन्यांशी बोलणी करून त्यांना आपल्या रेल्वे-जाळ्यात सामिल करून घेतलं. १९४७ साली देश स्वतंत्र झाला तेव्हां बहुतेक सगळे मार्ग सरकारच्या मालकीचे झालेले होते. जे थोडे शिल्लक होते तेही थोड्याच काळात सरकारी बनले आणि त्या सर्वांची मिळून ’भारतीय रेल्वे’ ही एकच सरकारी रेल्वे संस्था अस्तित्वात आली. Indian Railway आज देशभरातले रेलमार्ग चालवते.
“कहाणी पहिल्या आगिनगाडीची “ (Halt Station India – या राजेंद्र आकलेकर यांच्या ईंग्रजी पुस्तकाच्या) आपल्या अनुवादात रोहन टिल्लू यांनी ) पहिल्या आगगाडीची तर माहिती दिलीच आहे. त्या जोडीला मुंबईतल्या उपनगरी रेल्वेची म्हणजे लोकलचही भरपूर माहिती दिली आहे. आजमितीला मुंबईत १३६ लोकल स्थानकं आहेत. आणि त्यांवरून रोज २३४० पेक्षा अधिक लोकल गाड्या धावतात.
या सगळ्या गाड्यांची आणि स्थानकांची माहिती पुस्तकात देणं शक्य नाही पण त्यातल्या काही विशेष स्थानकांची आणि त्यांच्या आसपासच्या विशेष जागांची, तिथल्या इतिहासाची माहिती त्यांनी आवर्जून दिली आहे
उदा. आजच्या सी.एस.म.टी.च्या जवळच म्हणजे आधीच्या व्हिक्टोरिया टर्मिनसजवळ म्हणजेच बोरीबंदरजवळ पूर्वीचा फोर्ट जॉर्ज होता. या जॉर्ज किल्ल्यातूनच पहिल्या आगगाडीला तोफांची सलामी दिली गेली होती.
आकलेकरांनी मुंबईमधल्या अनेक लोकल स्थानकांची आणि आसपासच्या भागांची अतिशय रंजक अशी महिती पुस्तकात दिलेली आहे.आणि ’इतिहासाच्या पाउलखुणा’ या शीर्षकाखाली त्या भागांची जुनी माहितीसुद्धा दिली आहे. त्यामुळे पुस्तक एखाद्या क्था-कादंबरीसारखं रोचक झालं आहे. हाँ मार्ग बांधण्याची कल्पना, तिचा पाठपुरावाअशी रंजक माहिती त्यांनी पुष्कळ दिली आहे.
आकलेकर हे खरे रेल्वेप्रेमी आहेत. आणि मुंबईप्रेमीही आहेत असं त्यांचं हे पुस्तक वाचल्यावर नक्कीच वाटतं. आपली पहिली आगगाडी ज्या मार्गानं धावली तो मार्ग प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी ते त्या मार्गानं पायी चालले आहेत. अजूनही ते रेल्वेमार्गानं चालत असतात. आवश्यक त्या सर्व परवानग्या काढून.
, त्यासाठी निधि उभा करणं, मार्गाचं काम सुरू असतानाच्या अडचणी, वेगवेगळ्य़ा स्थानकांचं वैशिष्ट्यपूर्ण , बांधकाम, आसपासच्या ऐतिहासिक खुणा, काही जुन्या गोष्टी, फार माहीत नसलेल्या भागांची माहिती, अशी खूप माहिती आकलेकरांनी दिली आहे. आणि ती अतिशय रंजक आहे. पण त्याला कथानक नसल्यामुळे ते विस्कळीत आहे. म्हणजे ते वाचताना अनेक छोटे छोटे भाग एकामागून एक वाचत जावं लागतं. एका भागाचा पुढच्या भागाशी संबंध असेलच असं नाही, मुंबईतल्या १३६ लोकल स्थानकांपैकी एखाद्याची माहिती वाचावयाची असली तर ती कुठे आहे ते आधी शोधून काढावं लागतं. समजा, मला “करी रोड” स्टेशनची माहिती हवी असली तर ती कुठे आहे हे आधी शोधून काढायला हवं.ते करताना मूळ विषयातला – करी रॊड मधला रस कमी होऊ शकतो. म्हणजे संपूर्ण पुस्तकात “करी रोड” हे स्थानक कुठे आहे, आहे तरी की नाही हे आधी शोधावं लागतं.
लोकलच्या १३६ स्थानकांपैकी सर्वांची माहिती देणं शक्य नाही हे आपल्याला कळू शकतं .म्हणून हव्या त्या स्थानकाची, किंवा इतर विशेष काही गोष्टींची माहिती पुस्तकात कुठे सापडेल,सापडेल की नाही हे कळण्य़ाचा काहीतरी सोपा मार्ग असायला हवा.
अनुक्रमणिका जर विस्तारानं दिली तर ही अडचण दूर होऊ शकेल असं मला वाटतं.
प्रत्येक पुस्तकाला अनुक्रमणिका असते. तशी ती याही पुस्तकाला आहे पण ती त्या मानानं त्रोटक आहे. अनुक्रमणिका जर विस्तारानं दिली तर ही अड्चण दूर होऊ शकेल. म्हणजे मग आपल्याला हव्या त्या ’ठिकाणी’, शोधाशोध न करता पोहोचता यईल!
“कहाणी पहिल्या आगीनगाडीची” असं पुस्तकाचं नाव असलं तरी त्यापेक्शा बरीच अधिक आणि रोचक माहिती पुस्तकात आहे. राजेंद्र आकलेकरांचं पुस्त्क ईंग्लिश आहे आणो रोहन टिल्लू यांनी त्याचं अगदी सफाईदार भाषांतर केलेलं आहे. ते परभाषेतून भाषांतर केलेलं आहे असं कुठेही वाटत नाही.
मुखपृष्ठावरील आगगाडी अगदी झुकझुकगाडी दिसते आणि पुस्तकाला आकर्षक करते. रेल्वेविषयक माहितीचा एक खजिनाच यात आहे. यात बरीच छायाचित्रंही आहेत. त्यांपैकी बरीच काळपट आहेत. जुन्या छायाचित्रण तंत्रामुळे कदाचित तसं झालं असावं. काही चित्रं मात्र बरीच सुस्पष्ट आहेत.
मुंबई बेटांचा आणि मुंबईतल्या रेल्वेचाही नकाशा पुस्तकात आहे. एकंदरीत रेल्वेप्रेमींनी जरूर संग्रही ठेवावं असं हे पुस्तक आहे.