- DAINIK SAMANA 12-12-2004
किरण बेदींचे चिंतनशील अनुभव...
डॉ. किरण बेदी या हिंदुस्थानी पोलीस सेवेतील सर्वोच्च पदावर पोहोचलेल्या पहिल्या स्त्री अधिकारी आहेत. देशाच्या विविध भागांत विविध पदांवर जबाबदारीने समर्थपणे पोलीस कार्य केल्याचा ३० वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. लोकाभिमुख पोलीस कार्ये ही त्यांची विशेषत: आहे. स्त्रियांच्या प्रश्नांवर, तुरुंग सुधारणांबद्दल, अमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम, त्यांची तस्करी रोखणे यावरती अमेरिकेत, युरोपीय देशांत, आशियाई देशात आणि संयुक्त राष्ट्रसंघात भरलेल्या परिषदांमध्ये त्यांनी हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व केलेले आहे. त्यांना अनेक राष्ट्रीय तसेच रॅमन मॅगसेसे पुरस्कारासारखे आंतरराष्ट्रीय पुरस्कार लाभले आहेत. आपल्या पोलीस सेवेतील अनुभवांवर आधारित त्यांचे दोन स्तंभ ‘द ट्रिब्युन’ आणि ‘पंजाब केसरी’मध्ये सुरू झाले आणि त्यांना मोठा प्रतिसाद मिळाला. आपल्या लेखनाविषयी त्यांच्या भावनाही बोलक्या होत्या. ‘‘मी जे पाहते, ऐकते, वाचते, बारकाईने निरखते त्याचे काय करावे असा प्रश्न मला पडतो. मी ते सर्व विसरून जाऊ शकते, दुर्लक्षू शकते, पण तसे न करता त्यावर लिहून शब्दांतून माझी अस्वस्थत: प्रकट करणे ही मला माझी एक गरज वाटते. म्हणून मी लिहिते आणि लिहित राहीन.’’ किरण बेदी यांनी आपल्या ओघवत्या, सोप्या, ताज्या आणि टवटवीत शैलीत आपण अनुभवलेल्या छोट्यामोठ्या घटनांवर, मुद्द्यांवर ‘अॅ आय सी...’ या आपल्या इंग्रजी पुस्तकातील शंभर स्फूट लेखांत आपली मते व्यक्त केली आहेत. या पुस्तकाचा अतिशय सुबोध आणि प्रवाही अनुवाद माधुरी शानभाग यांनी केला आहे.
या लिखाणातून वाचकांना सजग करायचे त्यांचे प्रामाणिक प्रयत्न सहज जाणवतात. ज्या घटनांचा ऊहापेह त्या या लेखातून करतात त्यांना समजून घेतल्याने वाचक आणखी मानवी होण्याच्या दिशेने प्रवास करतील असा विश्वास त्यांना वाटतो. ‘अॅज आय सी...’ यामध्ये लेखिका जसे पाहते तसे तुम्हीही पाहा असे आवाहन त्या वाचकांना करतात. त्यांनी समाजातील जी कुरूप चित्रे पाहिली ती सर्वांनी मिळून सुंदर करायचा प्रयत्न करण्यासाठी या लेखनातून त्या जणू वाचकांना मन:पूर्वक विनंती करतात.
आजच्या स्त्रीबाबत किरण बेदी अतिशय जागरूक आणि आशावादी आहेत. हिंदुस्थानातील बहुसंख्य स्त्रियांची स्थिती परावलंबी असली तरी शिक्षणाने त्या सबल होतील असे त्यांना वाटते. पोलीस खात्यातील नीतीमूल्ये, भष्टाचार, वरिष्ठांचा मनमानीपणा, तरुण अधिकाऱ्यांचा होणारा हिरमोड, राजकीय हस्तक्षेप इत्यादी बाबींवर त्या जबाबदारीने कोरडे ओढून केवळ गप्प बसत नाहीत तर मार्गदर्शनही करतात पोलिसांनी स्वत:कडे अंतर्मुख होऊन पाहिले पाहिजे असे त्यांना वाटते. त्यासाठी तिहार जेलमध्ये त्यांनी तुरुंग कर्मचारी आणि कैद्यांसाठी ‘विपश्यना’ हा ध्यानाचा प्रकार सुरू केला. त्या स्वत:ही त्यात सामील झाल्या. त्याचा फायदा त्यांना स्वत:ला आणि पोलिसांनाही झाला आणि पुढे देशभर अशी शिबिरे सुरू झाली. सर्व व्यवहारांकडे डोळसपणे पाहण्याची, सकारात्मक वृत्ती अंगी बाणविण्याची शिकवण त्यांनी आपल्या कृतीतून पोलिसांना दिली. उदघाटनाअभावी बंद असलेला गोव्याच्या जुआरी नदीवरील पूल कोणत्याही आदेशाची वाट न पाहता सुरू करून देणाऱ्या किरण बेदी. कृतिशीलतेला किती महत्त्व देतात याची खात्री त्या एका उदाहरणावरून पटते. कुटुंबसंस्था, स्वातंत्र्य आणि स्वैराचार, दहशतवाद, हिंसाचार, नवी पिढी, स्त्रीशक्ती, कायदे, शिक्षण यांसारख्या अवतीभोवतीच्या घटनांवर आणि विषयांवर त्या आपली स्पष्ट मते निर्भीडपणे व्यक्त करतात. त्यांचं संवेदनशील मन आणि तितकीच कर्तव्यकठोरता त्यांच्या लेखनातून ठायी ठायी व्यक्त होते. त्यांचे विचार एखाद्या तत्त्ववेत्त्याच्या वचनांचे रूप धारण करतात. प्रचंड अनुभवाशिवाय हे शक्य नाही. कडूगोड अनुभवांच्या मुशीतूनच हे लेखनाचे परिपक्व रसायन बनले आहे. त्यांच्या नजरेतून ते आपण अनुभवण्यात खरी मजा आहे.
-श्रीकांत आंब्रे
- DAINIK LOKSATTA 03-04-2005
रोखठोक वैचारिक मंथन…
डॉ. किरण बेदी! काही आठवले का? हो त्याच त्या भारतीय पोलीस सेवेतील सर्वोच्च पदावर पोहोचलेल्या पहिल्या स्त्री-अधिकारी. रॅमन मॅगसेसेसह अनेक पुरस्कारांनी सन्मानित. विविध समाजोपयोगी कामांतून महत्त्वाचा सहभाग. वेळात वेळ काढून स्तंभलेखन. या आधी काही पुस्तकांचे प्रकाशन. इ. इ. हा बायोडेटा’ सर्वांना माहीत असेलच. तो पुनहा आठवण्याचे कारण त्यांचे ‘अॅज आय सी...’ हे नवीन पुस्तक होय.
‘द ट्रिब्यून’ आणि ‘पंजाब केसरी’मध्ये सातत्याने आलेल्या शंभर लेखांचे संकलन या पुस्तकात करण्यात आले आहे. समाज आणि त्यात घडणाऱ्या असंख्य लहान-मोठ्या घडामोडींवर बेदींचे बारीक लक्ष दिसते. किंबहुंना तो त्यांच्या चिंतनाचा विषय आहे. भारतीय पोलीस सेवेदरम्यान आलेले अनुभव या लेखांतून आधिक्याने जाणवतात. पोलीस, प्रशिक्षण केंद्र, पोलिसांची जीवनशैली, त्यांच्याविषयी वाटणाऱ्या आत्मीयतेसोबतच सेवाकार्याचा वारसा चालावा, सांगण्याची धडपड या लेखांतून दिसते.
‘स्त्री’ हा किरण बेदीचा दुसरा जिव्हाळ्याचा विषय मानता येईल. स्त्री शिक्षण, सबलीकरण, अनिष्ट प्रथावृत्तींच्या विरोधात ठामपणे उभे राहणे, स्त्री-शक्तीची जाणीव करून देणे असे कार्य या लेखाद्वारे होताना दिसते. देशाचे भावी नागरिक कसे हवेत, त्यांचे शिक्षण, त्यांच्यावर होणारे संस्कार, त्यांचा सर्वांगीण विकास यादृष्टीने मुलांच्या भवितव्याचा विचार बेदी या लेखात करताना दिसतात. सैनिकांचे बलिदान, देशाभिमान, आपल्या उपयुक्त आर्दर्श ठरणाऱ्या परंपरा त्या वाचकांपुढे ठेवतात. तशाच समाजात चालणारे गैरव्यवहार, साध्या साध्या वाटणाऱ्या प्रश्नांनी घेतलेले भयनाक स्वरूप आणि या साऱ्यांतूनही आशेचा किरण दिसू शकतो, ही भावना यातून व्यक्त होते.
परदेशातील कायदा-सुव्यवस्था, ‘इथे-तिथे’ मधला जाणवणारा फरक, तिथल्या चांगल्या-वाईट, आदर्श गोष्टी, दाखले किरण बेदी देतात. स्वत: उत्तम खेळाडू असल्याने खेळ-आरोग्याची महती त्या गातात. काही निवडक लोकांची पत्रे दाखवत त्यावर भाष्य करतात. कधी एखाद्या ठिकाणी आपण केलेले भाषणच ओघवते लिहून जातात. या साऱ्यांतून त्यांचे चतुरस्त्र व्यक्तिमत्व जाणवून जाते.
‘‘मी जे पाहते, ऐकते, वाचते, बारकाईने निरखते त्याचे काय करावे असा प्रश्न मला पडतो. मी ते सर्व विसरून जाऊ शकते, दुर्लक्षू शकते. त्याबद्दल तक्रारी करू शकते वा पुढे बघू म्हणून हात झटकू शकते. पण तसे न करता त्यावर लिहून शब्दांतून माझी अस्वस्थता प्रकट करणे ही मला माझी एक गरज वाटते. म्हणून मी लिहिते आणि लिहित राहीन.’’ या किरण बेदींच्या उद्गारातून त्यांची भूमिका सहज स्पष्ट होऊ शकते.
यथार्थ शीर्षके आणि रोखठोक कथन असलेले हे अनुभव बेदींची चीड, प्रेरणा, चित्तवेधक गोष्टी, वैचारिकता असे कंगोरे दाखवतात. समाज वास्तवाच्या असंख्या छटा रंगवून त्यांचे दर्शन वाचकांना घडवायचा त्यांचा मानस आहे. ओघवती भाषा, सुबोध आणि नेमका आशय थोडक्या शब्दांत पोचवणारी शैली बेदींनी आत्मसात केलेली दिसते. वाचकांशी संवाद साधत, सजग करत, त्यांना ‘माणूस’ बनवण्याचे बेदींचे प्रयत्न प्रामाणिक वाटतात. समाज सर्वार्थाने सुंदर व्हावा, असे किरण बेदींना वाटते. त्यासाठी अर्थातच प्रत्येकाने झटायला हवे. म्हणूनच ‘अॅज आय सी...’ असे म्हणताना तुम्हीही पाहा, असे मन:पूर्वक त्या वाचकांना सांगतात.
-राधिका कुंटे
- DAINIK DESHDOOT 19-7-2009
‘अॅज आय सी’ (भारतीय पोलीस सेवा) यामधून किरण बेदींचे कार्यक्षेत्र असलेले भारतीय पोलीस दल, त्याबद्दलच्या वंदता, वस्तुस्थिती, या दलाचे प्रामाणिक प्रयत्न तसेच या दलासमोर असलेल्या अडचणी या सगळ्या विषयांवरच्या लेखांची एकत्र गुंफण वाचताना वाचक खिळून राहतो. किरण बेदींच्या मते कर्तव्य बजावणारा अधिकारी हा प्रकाशाचा स्त्रोत असतो. तेव्हा काळोखाला घाबरून चालत नाही. त्यांच्या मते वेळ कधीच टळलेली नसते. आपण आहोत तिथून बदलायला सुरुवात केली तरी चालते. कुणाही व्यक्तीपेक्षा कायद्याची अन् घटनेची बांधिलकी जास्त महत्त्वाची आहे. किरण बेदींनी पोलिसांनाही सामान्य माणसासारखी प्रेमाची भूक असते हे जनतेने लक्षात घ्यावे, असे सुचवले आहे. एकत्र येऊन ठरवले तर सामान्य जनतासुद्धा मोठमोठे निर्णय घेण्यास सरकारला भाग पाडते त्याचपद्धतीने न्यायव्यवस्थेवर अंकुश ठेवला तर गुन्हेगारांना शासन होईल अन् बळी पडलेल्यांना न्याय मिळेल. अपवादात्मक प्रसंगात पोलिसांना कठोर व्हावेच लागते. सतत मानवतावादी भूमिका घेऊन चालत नाही. अन्यथा पंजाबमधला हिंसाचार अजूनही सुरू राहिला असता, असं सांगितलं आहे.
किरण बेदी खूपच आशावादी आहेत. पोलीस खात्यातील नवी पिढी भारतीय पोलीससेवा नवा चेहरा आहे. पोलीससेवा अधिकाधिक लोकाभिमुख आणि नीतिमान कशी होईल यावर आपल्या कुशल कारकीर्दीचे अनुभव उधृत करून किरण बेदींनी अधिकाधिक तरुणांनी पोलीससेवेत यावे असे आवाहनही केले आहे. महिलांनी तर खास करून पोलीससेवेत शिरकाव करावा. त्यायोगे पोलीस दलाला अजून मानवीय चेहरा प्राप्त होईल. अन् नागरिक व समाजाचे हितसंबंध निकोप व सुदृढ होतील असे मत व्यक्त केले आहे.
- DAILY TARUN BHARAT 3-5-2009
किरण बेदी यांनी वेळोवेळी वेगवेगळ्या प्रश्नांवर लिहिलेल्या लेखांचे हे संकलन, वाचकांना स्त्रीप्रश्नांबद्दल संवेदनशील करेल आणि प्रतिसाद द्यायला, कृती करायला उद्युक्त करेल. या पुस्तकाच्या प्रयोजनाविषयी लिहिले आहे की, स्त्री असणे ही एक मौल्यवान गोष्ट आणि जबाबदारी आहे. ती स्वत:ला कसे घडवते यावर या दोन्हींपैकी एक असणे ठरते. जेव्हा ती स्वयंनिभर्र, स्वावलंबी असते तेव्हा अत्यंत मौल्यवान असते. आपण कुणावर अवलंबुन रहायचे की नाही हा निर्णय तिचा असतो. ती जेव्हा शिकलेली नसते, आर्थिकदृष्ट्या दुसऱ्यावर अवलंबून असते तेव्हा जबाबदारी असते. त्यात जर ती मानसिक दृष्ट्या दुसNयावर अवलंबून असेल तर परिस्थिती आणखी वाईट असते. तिला सर्वथा गुलामाचे आयुष्य जगावे लागते. कसे याचे विवेचन एक्कावन्न वेगवेगळ्या लेखातून केले गेले आहे. लेख छोटे असले तरी प्रत्येकातून एक महत्त्वपूर्ण विचार व्यक्त होतो.
`पालकत्व ही माणसाची सर्वात मोठी जबाबदारी आहे. त्यासाठी प्रशिक्षण नाही, मार्गदर्शन नाही, कायदे नाहीत, पालकांची कर्तव्ये कोणती हेही कुठे लिहिलेले नाही.` वॅâप्टन थापर सारख्या शूरवीराची, मानवजात असेपर्यंत देशाच्या इतिहासात आठवण काढली जाईल, असे शूरवीर घडण्यासाठी पालकांनी, शिक्षकांनी त्यांच्यापुढे ध्येयवादी, आदर्श वागणूक ठेवायला हवी. त्यासाठी हवी ती विंâमत मोजायला हवी.` `उत्कृष्ट बनणे म्हणजे आपले आचार, विचार, कृती योजनाबद्ध रीतीने शिस्तित पार पाडणे. तुमचे अग्रक्रम स्पष्ट हवेत. विद्यार्थी दशेत असताना अभ्यास हा तुमचा पहिला अग्रक्रम असेल. `कुटुंबसंस्था, मुलांची काळजी घेण्यासाठी स्वत:चे सारे काही दुय्यम मानणे ही भारतीय परंपरा या गोष्टी सर्व जगाने अनुकरण कराव्यार, अशा आहेत. हा आपला सांस्कृतिक वारसा आपण बळकट करायला हवा. कारण निकोप, घट्ट विणलेली कुटुंबसंस्था ही आपली राष्ट्रीय संपत्ती आहे.`
वरील विचारमोती सर्व लेखांमध्ये विखुरले आहेत. हे वैचारिक धन वाचकाला प्रेरणा देते. विचार करण्यास प्रवृत्त करते. ज्या प्रमाणे वेश्या व्यवसायाने आपला पत्ता बदलला आहे. लाल बत्तीचा विभाग म्हणून पूर्वी नागरी वस्तीपासून असा भाग सहजपणे वेगळा करता येत असे. आता मोबाइल फोनच्या जमान्यात हा व्यवसाय उच्चभ्रू पॉश समजल्या जाणाऱ्या वस्तीपर्यंत पसरला आहे. मसाज वेंâद्र, आरोग्यवेंâद्र आणि एंटरटेनमेंट सेंटर, हॉटेल, विश्रामगृहे गावाबाहेर शेतांवर बांधलेली फार्म हाऊस अशा नावाच्या जागा वापरून वैश्या व्यवसायामध्ये नवे नियम येत आहेत.` फक्त महिला दिनाचे कार्यक्रम करून आणि त्याला हजेरी लावून समाजाची स्त्रियांप्रती असलेली जबाबदारी राज्यकत्र्यांना झटकता येणार नाही. स्त्रियांचे हक्क जपणे हे समाजाचे कर्तव्य आहे. आरोग्यपूर्ण सुशिक्षित स्त्री ही राष्ट्रीय संपत्ती आहे. `वाचन, खेळ, एन.सी.सी. आणि एसक्यू हे चार पैलू विद्याथ्र्याला अष्टपैलू चौपेâर व्यक्तिमत्त्वाचे असे विकसित करतात. `सौंदर्य या शब्दाला अनेक पर्यायी शब्द सापडले. गोड रूप, देखणेपणा, मर्दानी, दुखऱ्या डोळ्यांना समाधान देणारे, सुरेख, अवाक करणारे अत्युत्कृष्ट कलाकृती, बाहुली, नटरंगी स्त्री, भूल घालणारी, खानदानी, जादू करणारी, सौंदर्यवती वगैरे शब्द. त्या शब्दांशी निगडीेत असलेले शब्द रंगरंगोटी, सौंदर्यप्रसाधने, पावडर, ओष्ठशलाका, नखांचे रंग, शांपू, डौलदार बांधा, सुंदर चेहरा वगैरे अशी न संपणारी यादी. पण `ब्यूटी` या शब्दाशी कोशकाराने बुद्धी, हुशारी, कौशल्य या शब्दांचा धागा जोडलेला दिसला नाही. `भारतामध्ये स्त्रीला अजूनही स्वतंत्र्य ओळख मिळालेली नाही. कोणतीही स्त्री इथे आधी मुलगी, पत्नी, आई, बहीण, सून वा सासू असते. स्वतंत्रपणे स्वत:ची ओळख असलेल्या स्त्रिया अगदीच नाहीत, असे नाही. पण त्यांची संख्या अगदी कमी आहे.`
लेखांबद्दल लेखिका लिहिते, सतत शिकणे अन मिळालेले ज्ञान वाटून घेणे यावर माझा पूर्ण विश्वास आहे. मी जे पाहते, ऐकते, वाचते त्यातील जे मला अस्वस्थ करते, त्याबद्दल लिहिणे हे माझे कर्तव्य आहे, असे मला वाटते. विशेषत: स्त्री आणि तरुण यांच्या सक्षमीकरणासाठी सर्वांनी सजग राहून कृती करायची गरज आहे. लेखणीची ताकद वापरून, सामान्यांचा आवाज जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी हाती निशाण धरायचे काम मी यापुढेही करत राहीन.`
आणि अनुवादाबद्दल काय लिहावे? ह्या प्रकारात हातखंडा असलेल्या माधुरी शानभाग यांनी पुस्तकाचा सुरेख अनुवाद केला आहे. अगदी स्वतंत्र रचना असावी, वाटावी इतपत.
- DAINIK AIKYA, SATARA 14-6-2009
भारतातील पहिल्या महिला पोलीस अधिकारी म्हणून किरण बेदी यांना भारतात मानाचे स्थान आहे. पुरूषप्रधान प्रणालीत एका महिलेने आपले कर्तृत्व दाखवण्याचा प्रयत्न करणे हे तितकेसे सहजसाध्य नाही याची कल्पना त्यांना आपल्या नव्या जबाबदारीच्या आरंभीच आली, तरीही न डगमगता विंâवा नाउमेद न होता त्यांनी जी जी ड्यूटी मिळेल ती कौशल्यपूर्ण रितीने पार पाडून, कारभारात नवनव्या सुधारणा करून, पोलीस यंत्रणेला मानवी चेहेरा देऊन जनसामान्यांची वाहवा मिळवली.
या पुस्तकातील लेख हे सदर म्हणून वेळोवेळी लिहिले गेलेले आहेत. त्यामुळे त्यात विषयांची विविधता, प्रासंगिकता आढळते. त्याचबरोबर एकुणच पोलीस यंत्रणेच्या कारभाराच्या संदर्भात मूलगामी चिंतनही दिसून येते. एखाद्या पाठ्यपुस्तकासारखी विषयाची सूत्रबद्ध मांडणी करण्याचा प्रयत्न येथे नाही. काही ताज्या घटनांच्या तपशिलाचे विश्लेषण करता करता, त्याबद्दल उपाययोजनाही त्या सहजपणे सुचवतात. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था या संबंधातील अनेक बाबी स्पष्ट होतात. त्या लक्षात घेऊन योग्य ती पावले उचलणे वा धोरण ठरवणे जनहिताचे ठरू शकेल.
पोलीस यंत्रणेचे स्वरूप, पोलीस कार्यातील नीतीमूल्ये, भ्रष्टाचार, सेवेतील दिरंगाई, न्यायव्यवस्थेतील दिरंगाई आणि त्रुटी, पोलिसांवर येणारी राजकीय दडपणे, दहशतवादाचे आव्हान, कर्तव्याची जाणीव, कायद्याचे राज्य, कायद्याची अंमलबजावणी करण्यातील पक्षपातीपणा, पोलिसांची कुचंबणा, पोलीस सेवेत शिरणाऱ्या महिलांच्या समस्या, पोलिसांच्या बायकांची दुरवस्था, तुरुंगांची व्यवस्था, पोलीस सेवा लोकाभिमुख होण्याची गरज... असे अनेक विषय या लेखांमध्ये चर्चेला घेतलेले आहेत.
भारतात आज दहा लाखांच्या वर पोलीस आहेत. दरवर्षी हजारेक पोलीस आपले कर्तव्य करताना मृत्युमुखी पडतात. जनतेच्या जीवीताचे, मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी अनेक पोलीस आपले आयुष्य धोक्यात घालतात. तरीही पोलिसांबद्दल समाजात प्रेमाची, आपुलकीची, आदराची भावना दिसत नाही. पोलीस वर्ग हा समाजापासून काहीसा एकाकी, दुर्लक्षित, वंचित दिसतो. त्यांच्यावर सतत टीकेचा मारा होत असतो. २१ ऑक्टोबर हा दिवस पोलीस कृतज्ञता दिवस म्हणून साजरा केला जातो. परंतु त्यावेळी जनसामान्यांना सहभाग त्यात नसतो याची खंत किरण बेदींना वाटते. या दिनाची दखल न घेण्याची प्रसारमाध्यमांची वृत्तीही त्यांना खटकते. देशभरातील उत्तम दर्जाच्या पोलीस कार्याची गरज वाढत आहे, अशा वेळी त्यांची अशी अपेक्षा करणे देशाला महागात पडेल असा इशारा त्या देतात. तीस वर्षात चौदा पोलीस कमिशनरांचे काम पाहिलेल्या किरण बेदी एकुणच त्यांच्या योगदानाचे विश्लेषण नेमकेपणाने करतात.
गावठी दारुचा व्यवसाय पोलिसांच्या आशीर्वाद आणि स्थानिक नेतृत्वाच्या वरदहस्ताने चालतो, पैसा आणि सत्ता यांचा प्रभाव त्यावर दिसतो, सत्ता सरंक्षण देते व पैसा माणसांना विकत घेतो, स्वस्त गावठी दारु पिणारे त्याची किंमत आपल्या जिवानिशी देतात असे किरण बेदी म्हणतात.
पोलीस खात्यातील स्त्रियावर दुय्यम दर्जाची कामे सोपवली जातात. त्यांच्या दर्जाची कामे सोपवली जातात. त्यांच्या आंतरिक क्षमतांचा वापर फार कमी केला जातो. पोलीस खात्यात नोकरी मिळाली तरी त्यांच्या गृहिणीच्या भूमिकेत बदल होत नाही. वैयक्तिक अपुरेपणाची भावना स्त्रियांना सतावत राहते, असे एका अहवालाचे निष्कर्ष सांगून पोलीस खात्यातील वरिष्ठांनी अधिक संवेदनशीलता आणि जबाबदारीची जाणीव दाखवायला हवी असा इशारा त्या देतात. पोलीस यंत्रणा माफियांच्या वा गुंडांच्या आहारी जातात; अनिष्ट प्रवृत्तींना जोपासत राहतात हे वास्तव असले तरी पोलीस उपनिरीक्षक जी शपथ घेतात, तिचे पावित्र्य राखण्याबाबत आग्रह हवा, त्यासाठी तिचे पावित्र्य राखण्याबाबत आग्रह हवा, त्यासाठी पोलीस प्रमुखांच्या नियुक्तीमध्ये राजकीय हस्तक्षेप होऊ नये असे त्यांना वाटते.
पोलीस सेवेत येणाऱ्यांना किरण बेदी यांनी १७ प्रश्न विचारून त्यांची अपेक्षित उत्तरेही दिली आहेत. ‘माझे बक्षीस’ या लेखात त्यांनी स्पष्ट म्हटले आहे. ‘जनहित हे तुमचे ध्येय असले पाहिजे. दुसरे कोणतेही उद्दिष्ट असेल तर तुमचा रस्ता चुकीचा आहे.’ दहशतवाद्यांना जिहादी मानणे हे चुकीचे आहे. त्यांना दहशतवादी, अतिरेकीच मानायला हवे आणि दहशतवाद हा निंद्यच होय असे त्या म्हणतात. दहशतवाद हा मानवतेला काळीमा आणणारा प्रकार आहे. दहशतवादी हे मानवतेचे गुन्हेगार आहेत. ते विशिष्ट देशाचे विंâवा गटाचे नाहीत. आपल्या देशात दहशतवादी कायदे आधिक कडक करण्याची गरज आहे. असेही मत त्या नि:संदिग्धपणे नोंदवतात. दहशतवादाशी मुकाबला करण्यासाठी भारताने पोटासारखे कडक कायदे आधिक कडक करायला हवेत. पोलिसांना अत्याधुनिक शस्त्रे पुरवायला हवीत, कायदा, सुव्यवस्था व गुप्तहेर यंत्रणा स्वतंत्र हव्या, पोलीस प्रमुखांची पदे, राजकीय प्रभावापासून मुक्त हवीत, कार्यक्षम अधिकाNयांना विशिष्ट कालानुक्रमे पदोन्नती मिळायला हवी. भ्रष्टाचार करणाऱ्याला दयामाया दाखवली जाऊ नये... या अस्थिर काळात पोलीस यंत्रणा सक्षम असणे अपरिहार्य आहे.
अशी कितीतरी ध्येयधोरणविषयक सूत्रे किरण बेदी आपल्या या पुस्तकातील लेखांद्वारे प्रकट करतात. ती सूत्रे सर्वसामान्य नागरिकांनाही अंतर्मुख करतात.