Prasad Kulkarni"सेक्स"..मानवी जीवनातील एक अविभाज्य घटक.
जर ह हळुवारपणे असेल तर तो जीवन खुलवतो, जर तो रांगडा असेल तर जीवन नासवतो. परस्परांशी शारीरिक पातळीवर एकरूप होऊन केलेला संवाद म्हणजे सेक्स, असे म्हणता येईल.
सेक्सच्या विविध छटा "फिफ्टी शेड्स फ्रिड" या ई. एल. जेम्स यांच्या पुस्तकात दिसतात. किंबहुना, "काम" हाच या पुस्तकाचा आत्मा आहे. याच पुस्तकावर आधारित "फिफ्टी शेड्स फ्रिड", हा सिनेमा ही प्रदर्शित झाला आहे.
माझ्या मते, यामध्ये प्रामुख्याने सेक्स ला मानवी पातळीवर ठेवण्यात आले आहे. 624 पानांची ही कादंबरी, मला कुठेही, रटाळ, सेक्स चे विकृत वर्णन असलेली आढळली नाही. याचे सारे श्रेय, हे अनुवादक डॉ. शुचिता नांदपूरकर- फडके, यांना दिले पाहिजे, त्यांनी ह्यातील क्लिष्टता टाळून सोप्या , आणि ओघवत्या भाषेत याचा अनुवाद केला आहे.
Maharashtra Times Samwad 1-9-2019खळबळजनक प्रेमकथा… महाविद्यालयीन तरुणी अॅनास्टॅशिया स्टील आणि उद्योजक ख्रिश्चन ग्रे यांच्यातील अनोखी प्रेमकहाणी `फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे` या कादंबरीतून लेखिका ई. एल. जेम्स यांनी मांडली आहे. ही कादंबरी अल्पावधीतच प्रचंड लोकप्रिय झाली. विशेषतः महिलांनी ती डोक्यावर घेतली. अॅना आणि ख्रिश्चन यांच्या प्रेमकथेत असं नेमकं काय होतं, या उत्सुकतेपोटी जे-जे कादंबरी वाचवतात, तेव्हा कथाविषय धक्का देऊन जातो. आपल्या जोडीदाराला शारीरिक इजा पोहचवून, प्रसंगी अवमानजनक वेदना देत लैंगिक सुखाचा आनंद घेऊ इच्छिणारा ख्रिश्चन या कादंबरीचा नायक आहे. तर त्याच्यावरील प्रेमाखातर या संबंधांचा स्वीकार करणारी अॅना ही नायिका. ही कादंबरी जून २०१५मध्ये पहिल्यांदा प्रसिद्ध झाली. आजपर्यंत जवळपास बारा कोटींचा खपाचा आकडा गाठलाय. जगातील सर्वाधिक वेगाने विकली गेलेली कादंबरी म्हणून तिचा लौकिक आहे. शिवाय ५२ भाषांमध्ये तिचे अनुवाद केले गेलेत. दुसरा भाग `फिफ्टी शेड्स डार्कर` आणि तिसरा भाग `फिफ्टी शेड्स फ्रीड` नावाने प्रसिद्ध झालेत. पण त्याचबरोबर जगभरात ही कादंबरी आणि त्यावरून काढलेल्या चित्रपटाला बंदीचा सामनाही करावा लागला आहे. एकवीस वर्षांची अॅना तिची मैत्रिणी केट हिच्यासाठी ख्रिश्चन ग्रे या तरुण उद्योजकाची मुलाखत घेण्यासाठी जाते. पाहता क्षणी ती त्याच्या प्रेमात पडते. तोही तिच्यावर भाळतो. दोघं एकमेकांकडे आकृष्ट होत ही प्रेमकथा पुढे सरकत असतानाच, ख्रिश्चन तिला स्वतःविषयी एक धक्कादायक माहिती देतो. ते म्हणजे शारीरिक संबंध ठेवायचे असतील तर तिला एका करारावर सही करावी लागेल. एखाद्या मुलीला आकर्षण वाटावं, अशा सगळ्या गोष्टी ख्रिश्चनकडे असतात. मात्र शारीरिक संबंधांबाबत मात्र तो वेगळा असतो. आपल्या जोडीदाराला पीडा देण्यातूनच त्याला लैंगिक सुख लाभतं. हे जेव्हा तो अॅनाला सांगतो. तेव्हा अॅना हे स्वीकारायला तयार होत नाही. मात्र ख्रिश्चनवरच्या प्रेमापायी अखेर त्या करारावर सही करते. आजवरच्या कित्येक प्रेमकथांतून वेगवेगळे विषय हाताळले गेले असतील, पण परपीडनातून सुख मिळवण्यासाठी करार करणाऱ्या प्रेमीयुगुलाची कथा प्रथमच लिहिली गेली. त्यामुळे या कादंबरीविषयी चर्चा झाली. कादंबरीत ख्रिश्चनला अशी लैंगिक इच्छा होण्यामागे एक उपकथानक आहे. पण मुळात ख्रिशनची ही अट मान्य होणं, आणि त्यासाठी स्वतःहून तयार होणं, हे वाचकांना धक्का देणारं ठरलं. लैंगिक संबंध आणि त्याभोवती फिरणारी प्रेमकथा असं काहीच स्वरूप असल्यामुळे आणि परपीडन ही गोष्ट अनेकांसाठी औत्सुक्याचा विषय असू शकते. त्यामुळे अनेकांना या कांदबरीत नेमकं काय हे जाणून उत्सुकतेचं वाटलं. कादंबरीचा निम्मा भाग हा परपीडनातून लैंगिक सुख कसं मिळवलं जातं, याविषयीच्या औत्सुक्याचा परिचय करून देणारं असल्यानेच कदाचित त्याची चर्चा झाली. शिवाय ठरावीक पानानंतर शारीरिक संबंधांचं वर्णन हेही वाचकांना गुंगवून ठेवणारं आहे. ग्रे यांच्या या लैंगिक सुखाविषयीच्या इच्छा, त्यामागचा भूतकाळ, त्याची प्रेमकथा ते लग्न असा प्रवास या तीन कादंबरींतून मांडला गेला आहे. अर्थात त्यातला पहिला भाग धक्कादायक आहे तो त्यातल्या लैंगिक संबंधातील त्याच्या अनैसर्गिक इच्छांच्या पूर्ततेच्या वर्णनामुळे. अशा कादंबरी केवळ कामूक साहित्य म्हणून सोडून दिलं गेलं नाही, हेच या कादंबरीचं यश आहे. लैंगिकता या गोष्टींपाशी नुसतंच न रेंगाळता, त्याचा तपशीलवार वर्णनातही ही कथा अडकलेली नाही. तर ख्रिश्चन ग्रेच्या आयुष्यातील घटना आणि त्याचा त्याच्या लैंगिकतेवर झालेला परिणाम हेही यात आहे. मात्र तरीही दुर्दैवाने ही कादंबरी केवळ परपीडनात आनंद मानणाऱ्या प्रेमीयुगुलाची कथा म्हणून वाचली गेलीय. ही कादंबरी मराठीत आणताना काही शब्द जसेच्या तसे ठेवण्यात आले आहेत. त्यात खटकण्यासारखं काही नाही. पण भाषेत आणखी सहजता आली असती, तर ते अधिक नैसर्गिक वाटलं असतं. मुळात या कादंबरीत असलेले अनेक दोष अनुवाद करताना बाजूला सारणं तसं कठीणच आहे. अॅना आणि ग्रे यांच्यातील संवाद हे या कादंबरीचा प्राण आहेत. यू हॅव टू किस अ लॉट फ्रॉग्ज बिफोर यू फाइंड युवर प्रिन्स, अशा सारख्या वाक्यांना मराठीत आणणं कठीणच! -अपर्णा पाटील
KIRAN BORKARई. एल. जेम्सच्या फिफ्टी शेड्सच्या सिरीजमधील हे कदाचित तिसरे पुस्तक . जगभरात विक्रीचे उच्चांक गाठलेल्या फिफ्टी शेड्सचा सरळ सोपा अनुवाद . अतिशय सरळ मार्गाने जाणारे हे पुस्तक.
नायक ख्रिश्चन ग्रे आणि नायिका ऍना स्टील यांचे लग्न होऊन ते हनिमूनला गेले.येथून ही कथा चालू होते . नायक ग्रे हा प्रचंड श्रीमंत असल्यामुळे त्याचा हनिमूनही तितकाच श्रीमंत आणि राजेशाही आहे .हनिमूनवरून आल्यावर नवविवाहितांचा संसार चालू होतो .त्यामध्ये येणारी छोटी मोठी वादळे .....उडणारे खटके ... ग्रे फॅमिलीचे शत्रू ....त्यांच्यावर केलेली मात...आणि शेवटी मूल होऊन चाललेला सुखी संसार यातच पुस्तक संपते.
मग पुस्तकात असे काय आहे ........??? यात आहेत ग्रे पतीपत्नींच्या वेगवेगळ्या मूड आणि घटनेनुसार होणाऱ्या प्रणयक्रिडा आणि त्याची वर्णने .संपूर्ण पुस्तकात ख्रिश्चन आणि ऍनाच्या वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या वेगवेगळ्या पद्धतीने केलेल्या प्रणयक्रीडांची वर्णने सहज सोप्या पद्धतीने लिहिली आहेत . त्यात कुठेही किळसवाणे अश्लील वाटत नाही . कथेत आपसूक येणारी वर्णने आहेत असेच वाटत रहाते आणि त्या क्रिया नायकाच्या व्यक्तिमत्वाची बाजू उघड करतात ....आणि हेच पुस्तकाचे मोठे वैशिष्टय आहे . पुस्तक वाचताना ते कुठेही ओंगळवाणे वाटत नाही उलट पुढे काय होईल याची उत्सुकता वाढत जाते .लेखिका ई एल जेम्सची फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे आणि फिफ्टी शेड्स ऑफ डार्कर अशी दोन पुस्तके आहेत बहुतेक ती या आधीची असावीत.
DAINIK LOKMAT (MANTHAN) 10-02-2019शृंगाराच्या वळणांची प्रणयकथा...
ब्रिटिश लेखिका ई. एल. झेम्स यांनी ‘फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे’, ‘फिफ्टी शेड्स डार्कर’ आणि ‘फिफ्टी शेड्स फ्रीड’ ही ट्रायोलॉजी लिहिली असून, या प्रचंड खपाच्या कादंबऱ्या ठरल्या आहेत. एवढंच नाही तर या कादंबऱ्यांवर चित्रपटही निघाले आहेत. या तीनही कादंबऱ्यांचा मराठी अनुवाद नुकताच मेहता पब्लिशिंग हाऊसतर्फे प्रकाशित झाला आहे. त्यातील ‘फिफ्टी शेड्स फ्रीड’ या दुसऱ्या कादंबरीतही अॅनास्टॅशिया स्टील आणि खिश्चन ग्रे यांच्या अनोख्या प्रेमकहाणीचे दर्शन घडते.
अॅना आणि खिश्चन विवाहबद्ध झाल्यानंतर त्यांच्या प्रणयाला उधाण येतं. खिश्चनचे काही बाबतीतले वागणे पाहून अॅना मधूनच संभ्रमित होत असते. त्यातच एका स्त्रीने त्याला लिहिलेले पत्र तिच्या हातात पडते आणि तिच्या पायाखालची जमीन सरकते. त्यानंतर ही शृंगारकथा अनेक प्रवाहांनी वाचकाला खिळवून ठेवत वाहत राहते.
Suhas Birhadeअखेर उत्सुकता संपली!.
फिफ्टी शेड्स..मराठीत
टिनएजर्स मुली आपल्या पालकांसमोर हक्काने वाचू शकत होत्या असं एकमेव शृंगारिक पुस्तक
"फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे" या जगात गाजलेल्या पुस्तकाचे तीनही भाग मराठीत…एक शृंगारिक पण खिळवून ठेवणाऱ्या गाजलेल्या इ एल जेम्स यांच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद मेहताने प्रसिद्ध केलाय.
"फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे", "फिफ्टी शेड्स डार्क" आणि "फिफ्टी शेड्स फ्रिड" असे तीन भाग आहेत.
यावर सिनेमा आलाय ( जो आपल्याकडे अधिकृत बॅन आहे). ज्यांनी हे पुस्तक इंग्रजीत वाचलं नसेल, सिनेमा पहिला नसेल, त्यांना ही चांगली संधी आहे.