- MAHARASHTRA TIMES 01-09-2019
खळबळजनक प्रेमकथा…
महाविद्यालयीन तरुणी अॅनास्टॅशिया स्टील आणि उद्योजक ख्रिश्चन ग्रे यांच्यातील अनोखी प्रेमकहाणी `फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे` या कादंबरीतून लेखिका ई. एल. जेम्स यांनी मांडली आहे. ही कादंबरी अल्पावधीतच प्रचंड लोकप्रिय झाली. विशेषतः महिलांनी ती डोक्यावर घेतली. अॅना आणि ख्रिश्चन यांच्या प्रेमकथेत असं नेमकं काय होतं, या उत्सुकतेपोटी जे-जे कादंबरी वाचवतात, तेव्हा कथाविषय धक्का देऊन जातो. आपल्या जोडीदाराला शारीरिक इजा पोहचवून, प्रसंगी अवमानजनक वेदना देत लैंगिक सुखाचा आनंद घेऊ इच्छिणारा ख्रिश्चन या कादंबरीचा नायक आहे. तर त्याच्यावरील प्रेमाखातर या संबंधांचा स्वीकार करणारी अॅना ही नायिका.
ही कादंबरी जून २०१५मध्ये पहिल्यांदा प्रसिद्ध झाली. आजपर्यंत जवळपास बारा कोटींचा खपाचा आकडा गाठलाय. जगातील सर्वाधिक वेगाने विकली गेलेली कादंबरी म्हणून तिचा लौकिक आहे. शिवाय ५२ भाषांमध्ये तिचे अनुवाद केले गेलेत. दुसरा भाग `फिफ्टी शेड्स डार्कर` आणि तिसरा भाग `फिफ्टी शेड्स फ्रीड` नावाने प्रसिद्ध झालेत. पण त्याचबरोबर जगभरात ही कादंबरी आणि त्यावरून काढलेल्या चित्रपटाला बंदीचा सामनाही करावा लागला आहे.
एकवीस वर्षांची अॅना तिची मैत्रिणी केट हिच्यासाठी ख्रिश्चन ग्रे या तरुण उद्योजकाची मुलाखत घेण्यासाठी जाते. पाहता क्षणी ती त्याच्या प्रेमात पडते. तोही तिच्यावर भाळतो. दोघं एकमेकांकडे आकृष्ट होत ही प्रेमकथा पुढे सरकत असतानाच, ख्रिश्चन तिला स्वतःविषयी एक धक्कादायक माहिती देतो. ते म्हणजे शारीरिक संबंध ठेवायचे असतील तर तिला एका करारावर सही करावी लागेल. एखाद्या मुलीला आकर्षण वाटावं, अशा सगळ्या गोष्टी ख्रिश्चनकडे असतात. मात्र शारीरिक संबंधांबाबत मात्र तो वेगळा असतो. आपल्या जोडीदाराला पीडा देण्यातूनच त्याला लैंगिक सुख लाभतं. हे जेव्हा तो अॅनाला सांगतो. तेव्हा अॅना हे स्वीकारायला तयार होत नाही. मात्र ख्रिश्चनवरच्या प्रेमापायी अखेर त्या करारावर सही करते. आजवरच्या कित्येक प्रेमकथांतून वेगवेगळे विषय हाताळले गेले असतील, पण परपीडनातून सुख मिळवण्यासाठी करार करणाऱ्या प्रेमीयुगुलाची कथा प्रथमच लिहिली गेली. त्यामुळे या कादंबरीविषयी चर्चा झाली. कादंबरीत ख्रिश्चनला अशी लैंगिक इच्छा होण्यामागे एक उपकथानक आहे. पण मुळात ख्रिशनची ही अट मान्य होणं, आणि त्यासाठी स्वतःहून तयार होणं, हे वाचकांना धक्का देणारं ठरलं.
लैंगिक संबंध आणि त्याभोवती फिरणारी प्रेमकथा असं काहीच स्वरूप असल्यामुळे आणि परपीडन ही गोष्ट अनेकांसाठी औत्सुक्याचा विषय असू शकते. त्यामुळे अनेकांना या कांदबरीत नेमकं काय हे जाणून उत्सुकतेचं वाटलं. कादंबरीचा निम्मा भाग हा परपीडनातून लैंगिक सुख कसं मिळवलं जातं, याविषयीच्या औत्सुक्याचा परिचय करून देणारं असल्यानेच कदाचित त्याची चर्चा झाली. शिवाय ठरावीक पानानंतर शारीरिक संबंधांचं वर्णन हेही वाचकांना गुंगवून ठेवणारं आहे. ग्रे यांच्या या लैंगिक सुखाविषयीच्या इच्छा, त्यामागचा भूतकाळ, त्याची प्रेमकथा ते लग्न असा प्रवास या तीन कादंबरींतून मांडला गेला आहे. अर्थात त्यातला पहिला भाग धक्कादायक आहे तो त्यातल्या लैंगिक संबंधातील त्याच्या अनैसर्गिक इच्छांच्या पूर्ततेच्या वर्णनामुळे. अशा कादंबरी केवळ कामूक साहित्य म्हणून सोडून दिलं गेलं नाही, हेच या कादंबरीचं यश आहे. लैंगिकता या गोष्टींपाशी नुसतंच न रेंगाळता, त्याचा तपशीलवार वर्णनातही ही कथा अडकलेली नाही. तर ख्रिश्चन ग्रेच्या आयुष्यातील घटना आणि त्याचा त्याच्या लैंगिकतेवर झालेला परिणाम हेही यात आहे. मात्र तरीही दुर्दैवाने ही कादंबरी केवळ परपीडनात आनंद मानणाऱ्या प्रेमीयुगुलाची कथा म्हणून वाचली गेलीय.
ही कादंबरी मराठीत आणताना काही शब्द जसेच्या तसे ठेवण्यात आले आहेत. त्यात खटकण्यासारखं काही नाही. पण भाषेत आणखी सहजता आली असती, तर ते अधिक नैसर्गिक वाटलं असतं. मुळात या कादंबरीत असलेले अनेक दोष अनुवाद करताना बाजूला सारणं तसं कठीणच आहे. अॅना आणि ग्रे यांच्यातील संवाद हे या कादंबरीचा प्राण आहेत. यू हॅव टू किस अ लॉट फ्रॉग्ज बिफोर यू फाइंड युवर प्रिन्स, अशा सारख्या वाक्यांना मराठीत आणणं कठीणच!
-अपर्णा पाटील
- Kiran Borkar
फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे ....ई. एल. जेम्स
अनुवाद.....शोभना शिकनीस
मेहता पब्लिशिंग हाऊस
पदवीधर होणारी ऍनास्टाशिया स्टील कॉलेजच्या मासिकासाठी प्रसिद्ध तरुण उद्योगपती ख्रिश्चन ग्रे याच्या ऑफिसमध्ये शिरते आणि ख्रिश्चन तिच्या प्रेमात पडतो . दोघेही एकमेकांकडे आकर्षिले जातात . पण ख्रिश्चनच्या शारीरिक संबंधविषयी काही अटी आहेत . तो या अटीबाबत आग्रही आहे आणि या अटी पूर्ण करण्यासाठी त्याने एक करारनामा ही तयार केलाय . आपल्याला शारीरिक संबंध ठेवायचे असतील तर या करारावर सह्या कराव्या लागतील असे तो ऍनाला सांगतो . तिच्यावर भारी पडून वेदना देऊन सुख मिळवणे हेच ख्रिश्चनसाठी सुख असते .. तिला त्याला गमवायचे ही नाही आणि या अटी स्वीकाराच्या का ?? अश्या पेचात ती अडकते . ती त्यासंबंधी अजून जाणून घेण्यासाठी वेळ घेते .पण पुढे काय घडते .....??
स्त्री पुरुष शारीरिक संबंधाचे अतिरंजित वर्णन केलेले हे पुस्तक आहे . पुरुषांचे संभोगसंबंधी कल्पनाविश्वच यापुस्तकाद्वारे उघड करते. कथा नेहमीच्या प्रेमप्रकरणासारखी पुढे सरकते . अतिश्रीमंत नायक आणि गरीब नायिका . पण त्यांचे संबंध खूपच विस्ताराने आणि रंजकपणे लिहिले आहेत . हीच या पुस्तकाची खरी ओळख आहे . ख्रिश्चनचे खास शयनगृह त्यात असलेली विविध साधने ,त्याचा त्याने केलेला वापर वाचून आपण उद्दीपित होतो .
- वाचक
एका अतिशय नितांत सुंदर पुस्तकाची निरस अनुवाद करून माती कशी करावी याचे सुंदर(?) उदाहरण म्हणून हा पहिला भाग वाचावा. काही ठिकाणी वाचताना लेखिकेने कुठलातरी "सुलभ इंग्लिश इंटू मराठी" वगैरे शब्दकोश डोळ्यांसमोर ठेवून अनुवाद केलाय असा स्पष्टपणे जाणवतं.
पुढच्या दोन भागांचा अनुवाद डॉ. सुचिता नंदापूरकर-फडके यांच्याकडून करून घेतल्याबद्दल मेहता पब्लिशिंग चे मनापासून आभार. आणि हि विनंती कि त्यांनी या पहिल्या भागाची पुढील आवृत्ती डॉ सुचिता यांच्याकडून अनुवादित करून पुनः प्रकाशित करावी.
- DAINIK LOKMAT 13-01-2019
प्रेमातील रंग चितारणारी कादंबरी...
ब्रिटिश लेखिका ई. एल. झेम्स यांनी ‘फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे’, ‘फिफ्टी शेड्स डार्कर’ आणि ‘फिफ्टी शेड्स फ्रीड’ ही ट्रायोलॉजी लिहिली असून, या प्रचंड खपाच्या कादंबऱ्या ठरल्या आहेत. एवढंच नाही तर या कादंबऱ्यांवर चित्रपटही निघाले आहेत. या तीनही कादंबऱ्यांचा मराठी अनुवाद नुकताच मेहता पब्लिशिंग हाऊसतर्फे प्रकाशित झाला आहे. त्यातील ‘फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे’ ही कादंबरी एका अनोख्या प्रेमकहाणींचे दर्शन घडवते. कादंबरीची नायिका अॅनास्टॅशिया स्टील ही तरुणी अत्यंत श्रीमंत, बुद्धिमान आणि देखण्या तरुण सीईओची – खिश्चन ग्रेची मुलाखत घ्यायला जाते आणि पाहताक्षणीच त्याच्या प्रेमात पडते. खिश्चनदेखील तिच्या व्यक्तिमत्त्वावर भाळतो. दोघेही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या नकळत एकमेकांकडे आकर्षिले जातात. प्रेमाच्या पडद्यावर लहरत राहणाऱ्या या अक्षरलहरी वाचताना वाचक गुंग होतो.
- विकास महामुनी
खूपच प्रणय प्रसंगांनी ओतप्रोत भरलेले असे पुस्तक आहे. एका पुरुषाचे स्त्री कडून सुख मिळवण्याचे किती विविध प्रकार असू शकतात याचे खूप सविस्तर असे वर्णन लेखिका बाईंनीं केलेले आहे. ज्यांना अशा प्रकारच्या प्रणय प्रसंगांमध्ये रुची असेल त्यांनी जरूर वाचावे असे पुस्तक.