Shubhada Borseनुकतेच सुधा मूर्ती यांच परीघ हे पुस्तक वाचलं. खूप छान कादंबरी आहे. ही कादंबरी मृदुला या पात्रांभोवती फिरते जी समाजातील एक सर्वसामान्य तत्वनिष्ठ तसेच कुठलीही भौतिक सुख गौन मानते. कादंबरीत सुधा ताईंनी समाजातील वेगवेगळ्या घटकांचे प्रतिनिधित्व करणारी पात्रे रेखाटली आहेत .त्यामुळे हे कथानक आपल्या आजूबाजूलाच कुठेतरी घडलं आहे असं वाटतं. वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत डॉक्टर संजय, प्रत्येक गोष्टीत केवळ व्यवहार बघणाऱ्या रत्नम्मा, श्रीमंतीचं ढोंग करणारी लक्ष्मी व शंकर, सरकारी कार्यालयातील बाबुंच प्रतिनिधित्व करणारे चिकनांजप्पा इत्यादी पात्र कथेला वास्तव बनवतात.
सुधारणा इंची खूप सुंदर व वाचनीय कलाकृती.
Chaitali Bandisodeनमस्कार,
नुकतेच सुधा मूर्ती यांचे परीघ हे पुस्तक वाचले . अंतर मनाला स्पर्श करणारी कथा आहे. या कथेतिल प्रमुख पात्र मृदुला आणि संजय जणू आपल्याच परिचयाची आहेत असा भास होतो. पैसा आणि अधिकार आल्यावर व्यक्ती कशी बदलत जाते हे खुप सुंदररित्या लिहले आहे. या पुस्तकातून शिकण्यासारखे खूप काही आहे. आपण आपल्या जवळ च्या माणसांनाबद्दल् आपल्या मनात एक मत तयार केलेले असते आणि आपण त्यावर विश्वास ठेवून एका वर्तुलात् (circle) फ़िरत असतो. पण जेव्हा आपल्या विश्वासाला तडा जातो तेव्हा आपण त्याच वर्तुलात् अडकले जातो व आपली घुसमट होते. पण हे सगळे सहन न करता आपण स्वतःसाठी मोकळा श्वास घेणे देखील आवश्यक असते. स्वतभोवतिचे परीघ ओलांडून स्वतःला संधी देणे सुद्धा गरजेचे आहे. हेच पुस्तकच्या मुखपृष्ठातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे असे मला वाटते.
नक्की वाचा.
Pankaj Datare
पैसा आला की, माणूस का बदलतो? पैसा आला की, माणसाच्या अंतर्यामी दडलेले गुण-अवगुण बाहेर येतात. पैसा नसताना दडलेले अवगुण; पैसा आला की, बाहेर येतात... पैसा हा एखाद्या रावकाचेसारखा असतो. म्हणूनच कंजूस माणूस श्रीमंत झाला की, लोभी बनतो. अधाशी माणूस जमीनजुमला खरेदी करतो. स्वार्थी माणूस विलासी बनतो. उदार माणूस दानी बनतो.ज्यांना पैशाचा मोह नाही, त्यांना जवळ पैसा असला काय किंवा नसला काय; काहीच फरक पडत नाही.’ पैशामुळे खऱ्याखुऱ्या मानवी संबंधांचं दर्शन घडतं.
पैसा असताना आणि नसताना मानवी स्वभावाच्या दोन टोकांचं दर्शन बहुतांश वेळा घडतं. मानवी संबंधांमध्ये पैशाला महत्त्व नाही अशी माणसं क्वचितच आढळतात. पैसा आला की माणूस बदलताना दिसतो, त्याचे पूर्वी न पाहिलेले रंगढंग दिसायला लागतात. पैशामुळे खर्याखुर्या मानवी संबंधांचं दर्शन घडतं. हेच परीघ कादंबरीमध्ये सुधा मूर्ती यांनी मांडलं आहे.
Atharva Sangita Rajendra Khamkarसुधा मूर्ती यांची जीवनशैली जितकी साधी आहे तोच साधेपणा त्यांच्या प्रत्येक साहित्यामध्ये उतरलेला दिसतो. आपल्या समाजामध्ये असणाऱ्या विविध प्रवृत्तीच्या माणसांचे चित्रण त्यांच्या लेखनातून प्रकर्षाने जाणवते . त्याच पठडीतले सुधा मूर्तींचे एक पुस्तक म्हणजे परीघ !
आपल्या आजूबाजूला पाहिलं तर आपल्याला दिसतं की काही माणसं भोगवादाला महत्त्व देतात तर काही जण आदर्शवाद पाळतात. ह्याच दोन वृत्तींच्या मधलं द्वंद्व लेखिकेने या पुस्तकात मांडले आहे.
उत्तर कर्नाटकातल्या एका लहान गावातून आलेल्या , छोट्या गोष्टींमध्ये समाधानी असणाऱ्या मृदुलाची आणि तिच्या जीवनात येणाऱ्या हेलकाव्यांची ही गोष्ट ! गोष्टीचं आशय दिसताना अगदी साधा सरळ वाटतो ; पण त्यातला गभितार्थ खूप गहिरा आहे. साधा विषय अत्यंत खोलात जाऊन मांडणे हे सुधा मूर्तींच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे आणि ते ह्या पुस्तकातून प्रकर्षाने जाणवते.
साध्या सरळ स्वभावाची , सगळ्या गोष्टींच्या मध्ये समाधानी असणारी , आदर्श वादाला प्राधान्य देणारी मृदुला , सुरुवातीला तत्व आणि मूल्य यांची पाठराखण करणारा परंतु काळाच्या ओघात आणि पैशाच्या कैफ चढल्याने भोगवादात सुख मानणारा तिचा नवरा संजय , भौतिक गोष्टींच्या हव्यासापायी पैशाची हवी तशी उधळपट्टी करणारे , थोड्याशा आतल्या गाठीची मृदुलाची नणंद लक्ष्मी आणि तिचा नवरा शंकर , काटकसर आणि पैसे साठवण्याच्या सवयीमुळे साध्या खर्चाला ही उधळपट्टी मानणारी तिची सासू , गावाकडे राहणाऱ्या आणि तेवढ्याच साध्या स्वभावाचे मृदुलाचे आईवडील , सुरुवातीला उत्साह आणि उपभोग यांच्यात रमलेली परंतु काही अपघातांच्या मुळे विरक्ती कडे वळलेली मृदूलाची मैत्रीण अनिता , अतीलाडाने बिघडलेला मृदुलाचा मुलगा शिशिर आणि मृदुला च्या आयुष्यात वेळीच येऊन तिला सावरणारे तिचे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. राव यांसारख्या कितीतरी परस्पर विरोधी पात्र , त्यांचे संवाद आणि त्यांची अवस्था वाचताना खरच आपण अंतर्मुख होऊन जातो.
उत्तर कर्नाटक ते बेंगलोर पर्यंत बदलत्या कर्नाटकाच्या विविध छटांचे आरेखन , माणसाच्या आत चाललेल्या द्वंद्वाचे कथन , एकाच समाजात किंबहुना एकाच घरात राहणाऱ्या व्यक्तींच्या विविध मनोवृत्तीचे चित्रण आणि कुठेही अतिशयोक्ती वाटणार नाहीत अश्या प्रसंगांची मांडणी ही ह्या पुस्तकांची वैशिष्ट्ये मानायला हवीत.
कथेचा शेवट जरी सुखांतिके कडे वळणारा असला तरीही हे पुस्तक ठिकठिकाणी आपल्या मनावर प्रभाव पडून जात. वाचताना ठिकठिकाणी आपल्याला दोन गोष्टींच्या मधली एकची निवड करायला भाग पाडत आणि शेवटी एक मोठा इम्पॅक्ट मनावर ठेऊन जात. आयुष्याबद्दल गंभीरपणे विचार करण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचायला हवं !
smita Joshiमाणसाची विशेषत: स्त्रियांची नाती आणि त्यातून दिसणारे स्त्री स्वभावाचे विविध पैलू हे वैशिष्ट्य आहे ह्या कादंबरीचं. सुधा मूर्ती इतकं सविस्तर वर्णन करतात आणि प्रत्येक गोष्ट इतकी उलगडून सांगतात की त्याचा प्रभाव नक्कीच राहतो. तसं बघायला गेलं तर अगदी साधी कथा पण वास्तव दर्शन घडवणारी. "लिहायला माणूस काहीही लिहू शकतो किंवा लेखक वेगळा माणूस वेगळा" असं त्यांच्या बाबतीत बोलणंच नको. कारण उत्तम निरीक्षण आणि मानवी जीवनाचा दांडगा अनुभव आहे.
आदर्श ठेवावा असे आयुष्य आहे त्यांचे.
कथेची नायिका मृदुला सर्वसामान्य स्त्रीचे प्रतिनिधित्व करते. खेडेगावात राहणाऱ्या, सरकारी शाळेची शिक्षिका असणाऱ्या, ह्या सुंदर तरुणीचं लग्न संजय नावाच्या एका हातात व्यंग असलेल्या डॉक्टरशी होतं आणि पुढे त्यांचा संसार कसा सगळी संकटं पार करून बहरतो हे तर प्रत्येक घराचं चित्र, पण प्रत्येकाची केस वेगळी कारण प्रत्येकाची तत्व, आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा. प्रत्येक दाम्पत्याची एकमेकांशी जुळवून घेण्याची पद्धत वेगळी.
वेगळेपण हे आहे कथानकाच की एके काळी आनंदी , उत्साही आणि समरसून संसार करणारी मृदुला, मनोविकाराने त्रस्त होते. कारण तिचा साधा , सरळ स्वभाव ह्या व्यवहारी जगात बावळटपणा ठरतो. कुणावरही पटकन विश्वास ठेवणं, मनमोकळ बोलण हे तिचे दुर्गुण आहेत की काय, असं वाटायला लावणारे अनुभव तिला येतात. एकीकडे माझा संसार, माझा नवरा, मुलगा अशी गुंतलेली मृदुला ज्यावेळी त्यांच्यातले बदल अनुभवते त्यावेळी पार कोलमडून जाते. संजय ने तिच्या अपरोक्ष केलेले पैशांचे व्यवहार तिच्या समोर येतात आणि तिच्या विश्वासाला तडा जातो परिणामी तिला डिप्रेशन येतं. त्या परिस्थितीत सुध्दा एका प्रथितयश डॉक्टरची बायको दुसऱ्या डॉक्टरकडे मानसोपचार घेते आहे हे बरं दिसणार नाही म्हणून एकटीच कुणालाही न सांगता उपचार घेते नवऱ्याचा विचार तिथे सुध्दा. तरीही प्रयत्नांती तिचा आत्मविश्वास तिला परत मिळतो.
संजय तिच्याकडे दुर्लक्ष का करतो? तर तिचा आदर्शवाद त्याला पटत नाही. त्याला सुंदर , गृहकृत्यदक्ष बायकोपेक्षा ती सुध्दा डॉक्टर असती तर.. असं वाटायला लागतं आणि तिथे त्यांच्यात दुरावा निर्माण होतो. हा विचार करताना तो तिच्याच शाळेच्या कमाईमळे एक हॉस्पिटल सुरू करण्याचा निर्णय घेऊ शकला, कर्जाची रिस्क घेऊ शकला हे मात्र सोयीस्करपणे विसरून जातो. संवेदनशील मन असल्यामुळे तिला लोकांना मदत करायची इच्छा असते, व्यवहारातील अफरा तफर तिला सहन होत नाही. तरुण मुलगा सुध्दा स्वतः चे निर्णय स्वतः घेतो.
थोडक्यात तिच्या भावविश्वात काय घडलय ह्याची कुणालाही पर्वा नसते. पण मानसोपचार घेऊन स्वतः ची सकारात्मक विचार शक्ती आणि मन:शांती परत मिळवलेली मृदुला घर सोडून गावी जाण्याचा धाडसी निर्णय घेते. पुन्हा आपल्या गावी बदली करून घेते आणि जाण्याआधी संजयला सांगून निघून जाते, अशा ठिकाणी जिथे ती एकटी असली तरी तिला मनोरुग्ण म्हणणार कुणी नसत. तिची ती स्वतंत्र, आनंदी जीवन जगणार असते. खूप शांतता, खूप उत्साह कारण मोठ्या कष्टाने तिने हा आत्मविश्वास परत मिळवलेला असतो.
ही पूर्ण कथा सांगावीशी वाटली कारण पुस्तक वाचाल तेव्हा वाचाल, पण मैत्रिणींनो सुधा मूर्तींचा संदेश तुमच्यापर्यंत पोचवायचा आहे. मृदुला गावी स्वतः च घर विकत घेते, माहेरी रहात नाही, कारण लग्न झाल्यानंतर सासूने दिलेला सल्ला तिने अमलात आणलेला असतो, स्वतः च्या कमाईतून स्वतः साठी दर महिना पैसे बाजूला ठेवते. इतकी वर्ष जमवलेले पैसे तिच्या असे उपयोगी येतात.
काही झालं तरी आर्थिकदृष्ट्या सक्षम रहा, स्वतः च्या सुरक्षेसाठी पैसे राखून ठेवा. माझा संसार म्हणून भाबडेपणाने सगळा खर्च स्वतः करू नका. माणूस कोणत्याही क्षणी बदलू शकतो हे कायम लक्षात असू द्या. व्यवहारी जगात टिकून राहायचं असेल तर कुणावरही विश्वास ठेवून मनातलं सगळ बोलू नका. भावनिक दृष्ट्या सुध्दा स्वावलंबी व्हा , नाहीतर मनाचा आजार तात्कालिक असला तरी लोकं त्याचा फायदा घेऊन तुम्हाला हिणवू शकतात. स्वतः च्याच संसारात सजग रहा, संयम ठेवा, प्रेमाने संसार सांभाळायचा प्रयत्न नक्कीच करा पण अन्याय होत असेल धाडसी निर्णय जरूर घ्या कारण प्रश्न तुमच्या अस्तित्वाचा आहे.
हा सुधा मुर्तींनी दिलेला संदेश आज मैत्री दिना निमित्त माझ्या मैत्रिणींना कळवता आला म्हणून खूप बरं वाटतंय.
Sandesh Taysheteकादंबरीच्या पुर्वार्धात, दोन मनांच्या मिलनासाठी एखाद्या व्यक्तिचे दिसणे फार महत्वाचे नसुन, व्यक्तिचे मन व एकंदरीत वागणे - बोलणे महत्वाचे असते. आणि नाते कालांतर टिकवण्यासाठी त्या नात्यामध्ये विश्वास व पारदर्शकता ठेवणे फार गरजेचे असते हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
पूढे कादंबरीच्या उत्तरार्धात, वाममार्गाने अमाप पैसा कमावल्यामुळे माणसाच्या वागण्यात होणार्या बदलाचे वर्णन केले आहे. अमाप पैसा कमावण्या बरोबरच माणसाने आपली माणुसकी जपणे हे ही तितकेच महत्वाचे आणि कठिण काम असते. हे लेखिका सुधा मूर्ती यांनी "परीघ" या कादंबरीद्वारे समजावण्याचा पुरेपुर प्रयत्न केलेला आहे.
कादंबरी वाचून झाल्यानंतर आपल्या भोवती वावरत असलेल्या अश्याच काही लोकांचा विचार मनात येतोच.
"परीघ" ही कादंबरी, आपण कितीही श्रीमंत झालो तरी "Down to Earth" रहावे हे सांगते. हे समजुन घेण्यासाठी प्रत्येकाने वाचावी अशी कादंबरी आहे.
मराठी पुस्तकप्रेमी.
संदेश तायशेटे.
मुंबई.
Vaibhav Salunkeपैसा असताना आणि नसताना मानवी स्वभावाच्या दोन टोकांचं दर्शन बहुतांश वेळा घडतं. मानवी संबंधांमध्ये पैशाला महत्त्व नाही अशी माणसं क्वचितच आढळतात. पैसा आला की माणूस बदलताना दिसतो, त्याचे पूर्वी न पाहिलेले रंगढंग दिसायला लागतात. पैशामुळे खर्याखुर्या मानवी संबंधांचं दर्शन घडतं. हेच परीघ कादंबरीमध्ये सुधा मूर्ती यांनी मांडलं आहे
Ashutosh Digambar Kulkarniपैसा आला की माणूस का बदलतो?
पैसा आला की, माणसाच्या अंतर्यामी दडलेले गुण-अवगुण बाहेर येतात.
पैसा नसताना दडलेले अवगुण; पैसा आला की बाहेर येतात....
पैसा हा एखाद्या रावकाचेसारखा असतो. म्हणूनच कंजूस माणूस श्रीमंत झाला की लोभी बनतो.
अधाशी माणूस जमीन जुमला खरेदी करतो. स्वार्थी माणूस विलासी बनतो.
उदार माणूस दानी बनतो. ज्यांना पैशाचा मोह नाही, त्यांना पैसा असला काय नसला काय; काहीच फरक पडत नाही.
पैशामुळे खऱ्याखुऱ्या मानवी संबंधांचं दर्शन घडतं.
LOKPRABHA - 06-05-2016पैसा आणि मानवी संबंधाचं दर्शन...
पैसा असताना आणि नसताना मानवी स्वभावाच्या दोन टोकांचं दर्शन बहुतांश वेळा घडतं. मानवी संबंधांमध्ये पैशाला महत्त्व नाही अशी माणसं क्वचितच आढळतात. पैसा आला की माणूस बदलताना दिसतो, त्याचे पूर्वी न पाहिलेले रंगढंग दिसायला लागतात. पैशामुळे खऱ्याखुऱ्या मानवी संबंधांचे दर्शन घडतं. हेच ‘परीघ’ कादंबरीमध्ये सुधा मूर्ती यांनी मांडलं आहे.
कर्नाटकातल्या हुबळी शहराजवळ असणाऱ्या आळद हळ्ळी या गावची मुलगी मृदुला. गावच्या निरागसतेने आणि सौंदर्याने नटलेली जीवनाबद्दल अतीव उत्साह आणि प्रत्येक बाबतीत पराकोटीची आसक्ती असणारी मृदुला. वैद्यकीय शिक्षण घेण्याची आर्थिक आणि बौद्धिक कुवत असूनही केवळ शिकवायला आवडतं म्हणून ती शिक्षिका झाली होती.
मैत्रिणीच्या लग्नात तिचा ओळख कर्नाटकातच शिकून मुंबईला नोकरी करत असलेल्या डॉक्टर संजयशी होते. संजयला मृदुला आवडते पण तो काही आपल्या भावनांना समजू शकत नाही. शिवाय सगळ्याचं दृष्टीने त्याच्यापेक्षा वरचढ असणारी मृदुला आपला स्वीकार का करेल असे विचार त्याच्या मनात येतात. योगायोगानं मृदुलाचं मुंबईला जाणं होतं आणि तिथे तिची गाठ पुन्हा संजयशी पडते. इथे मात्र दोघांना परस्परांविषयी आपल्या भावना नक्की काय आहेत हे समजतं. पुढं त्यांचं लग्न होतं आणि ते बंगळुरला स्थायिक होतात. सुरुवातीपासून दोघांचे स्वभाव एकमेकांना पूरक आहेत हे जाणवतं. दोघांची कष्ट करण्याची तयारी असते. संजयला उच्च शिक्षण घेताना, त्याच्या सगळ्याच महत्त्वाकांक्षेत मृदुला समरसून साहाय्य करत असते.
सरकारी नोकरी करत असताना संजयला पदोपदी त्याच्या प्रामाणिकपणाचं ‘फळ’ मिळत असतं. त्याने तो दिवसेंदिवस हताश होत जातो. अशातच नोकरी सोडून काहीतरी वेगळं करण्याचा निर्णय तो घेतो. मृदुला कायम त्याच्या पाठीशी असते. तिचं एकचं म्हणणं असतं, ‘तुम्ही न्यायाने, नैतिकतेने आणि सरळ मार्गाने पैसा मिळवत असाल, तर मी नेहमीच तुमच्या सोबत असेन. मी केवळ नीतीच्या मार्गाने मिळवलेल्या पैशासाठी कितीही कष्ट घ्यायला तयार आहे.’ तिचा संजयवर पूर्ण विश्वास असतो की तो आजपर्यंत ज्याप्रमाणे न्यायाने वागत आला आहे तसाच तो पुढेही वागेल. मात्र, पैसा हाती येऊ लागताच संजय बदलत जातो. ज्याप्रमाणे त्याचे गुण पैशांमुळे समोर यायला लागतात त्याचप्रमाणे त्याचे अवगुणही समोर यायला लागतात. त्यात तो मृदुलाची फसवणुक करायला लागतो. मृदुलेच्या तत्त्वांची त्याला चीड यायला लागते. तो सतत तिची तुलना दुसऱ्यांशी करून तिची अवहेलना करू लागतो. आपली फसवणूक झाल्याचं सरळमार्गी मृदुलाला समजतं तेव्हा मात्र ती कोलमडून पडते. संजच्या वागण्याने मनोमन होरपळून जाते.
फसवणूकीमुळे मृदुला सर्व बाजूंनी सगळ्या घटनांचा विचार करते तेव्हा तिला पैसा माणसाला कसा बदलायला लावतो याचं दर्शन घडतं. तिच्यावर उपचार करणारे डॉक्टर तिला समजावताना म्हणतात, ‘पैसा आला की तुमच्यामधले गुण आणि अवगुण दोन्ही बाहेर येतात. पैसा नसताना दडपलेले अवगुण पैसा आल्यावर बाहेर येतात. त्याअर्थी पैसा हा आपल्याला बदलवतो. म्हणूनच कंजूस माणूस श्रीमंत झाला की लोभी होतो. तो आणखी आणखी जमीनजुमल्याची खरेदी करतो. स्वार्थी माणूस विलासी होतो. उदार माणूस दानी होतो. ज्यांना पैशाचा मोहच नाही, त्यांना पैसा आहे आणि नाही, यात काहीही फरक दिसत नाही. पैशांमुळे खऱ्याखुऱ्या मानवी संबंधांचं दर्शन घडत.’ जे मृदुलेला घडलेलं असतं. त्यातूनच मृदुला एक ठाम निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करते.
सुधा मूर्ती यांच्या एकूणच सगळ्या पुस्तकात मानवी स्वभावाच्या कंगोऱ्याचं दर्शन होत असतं असं असलं ती त्यांच्या पुस्तकामध्ये मानवी स्वभावातल्या नकारात्मकतेवर सकारात्मकता नेहमीच विज मिळवताना आढळते. आयुष्यात कितीही वादळांना तोंड द्यावं लागलं तरी शेवट नेहमी चांगलाच होत असतो, असा संदेश त्यांच्या पुस्तकांमध्ये पाहायला मिळतो. त्यामुळेच याही कादंबरीचा शेवट गोडच आहे.
पैशांमुळे संजयमधील बदल पाहिला की आपल्या आजूबाजूला असणारी अनेक उदाहरणं डोळ्यासमोर यायला लागतात. एकंदरीत वैद्यकीय व्यवसायातलं सत्य लक्षात येतं. सुधा मूर्ती यांनी वैद्यकीय व्यवसायासह आपल्याकडील बदलत जाणारी परिस्थिती इतक्या नेटक्या शब्दांत मांडली आहे की त्यातील दाहकता जाणवल्याशिवाय राहत नाही. लक्ष्मी दर्शनापूर्वी त्या गोष्टींचा माणसाला तिटकारा असतो त्याच गोष्टी तो लक्ष्मीप्राप्तीनंतर किती सहजतेनं करतो याचं दर्शन उत्तम रीतीने घडवलं आहे. कादंबरीत मृदुलाचे आई-वडील, भाऊ-बहीण, अलेक्स-अनिता, संजयची आई, तिचे विचार, त्याची बहीण तिचा नवरा त्याचप्रमाणे त्यांचे नातेवाईक यांचं स्वभाव दर्शन घडतं. ही माणसं आणि त्यांचे स्वभाव म्हणजे समाजाचे काळे पांढरे अन् करडे रंग समोर येतात. त्या रंगांची पार्श्वभूमी आणि बदलत्या रंगांची कारणं आपल्याला लेखिकेनं नकळत समजावून दिली आहेत.
‘परीघ’ कादंबरीचा अनुवाद उमा कुलकर्णी यांनी केला आहे. आपण अनुवाद वाचतो आहे असं कुठेही जाणवत नाही. पुस्तकातून मिळतो तो उत्तम भाषा वाचनाचा आनंद.