Pawan Chandakसुधा मूर्ती लिखित बकुळा ही कादंबरी वाचली
श्रीमती आणि श्रीकांत यांच्या प्रेमावर आधारित अशी कादंबरी मी पहिल्यांदाच वाचत आहे
सामाजिक विषयावर अत्यंत संवेदनशील व परखडपणे आपल्या लेखणीतून विचार मांडणाऱ्या आदरणीय सुधा मूर्ती यांनी श्रीमती व श्रीकांत या दोन्ही पात्रावर लिहिलेली अशी ही कादंबरी एक वाचक म्हणून वाचतांना पुढे काय होणार ही उत्कंठा शेवटपर्यंत दाटून राहते.
सामान्यतः शालेय जीवनातील प्रेम बकुळीच्या झाडाखाली व साक्षीने बहरणारी प्रेम हे सर्वसाधारणपणे आजवर आपण वाचत आलेल्या कथा किंवा सिनेमा प्रमाणे या जोडप्यांचे विवाह पर्यंत पोहोचते इथपर्यंत कॉमन आहे. पण खरी कथा विवाहानंतर सुरू होते. कारण या कथेत श्रीकांतच्या यशामागे सदैव श्रीमतीची त्याला मिळालेली साथ् तिने दिलेल्या त्याग व त्यांचे प्रेम बकुळीच्या साथीने बहरत त्यांचे महाविद्यालयीन जीवन पुढे सरकत जाते.
पुढे विवाहानंतर पती तसेच पतीचे कुटुंब, सासर च्या व्यक्ती, पतीचे करिअर आणि पतीचा उत्कर्ष आणि प्रगती हेच सर्वस्वी मानून त्याचे यश त्याची भरभराटी त्याची कीर्ती हेच लक्ष ठेवत स्वतःच्या आशा-आकांक्षा, महत्त्वाकांक्षा स्वतःचे इतिहासावरील प्रेम, याला तिलांजली देत सर्वस्वी अर्पण करणाऱ्या श्रीमती ला तिच्या स्वः ची जाणीव होईल का ?
बोर्डाच्या परीक्षेत संपूर्ण राज्यात पहिली येणारी श्रीमती, महाविद्यालयीन जीवनात इतिहासातील महान तज्ञ यांची आवडति विद्यार्थीनी इतकेच नव्हे तर प्रसिद्ध इतिहासतज्ज्ञ कोलिन्स यांची देखील ती आदर्श विद्यार्थीनी होती.
तिला पीएचडीसाठी अमेरिकेत अमेरिकेत स्कॉलरशिप ची संधी मिळाली होती ती पुन्हा स्वीकारेल का ?
जरी ही संधी पुन्हा मिळाली तरी एक पत्नी म्हणून श्रीमती ही आपला पती श्रीकांत चे वैभव, ऐश्वर्य सोडून इतिहासावर डॉक्टरेट साठी अभ्यास करण्यासाठी अमेरिकेत जाईल का ?
यावर श्रीकांत त्याची प्रतिक्रिया त्या दोघांमध्ये भावनिक संवाद एकदा वाचा.
एका बैठकीतच वाचण्यासाठी ही कादंबरी आहे. जी वाचतांना कळत-नकळत आपण आजवर गाजवत आलेल्या पुरुषार्थ यावर स्वतः प्रश्नचिन्ह निर्माण करतो.
इतकेच नाही तर खरेच आपण आपल्या जीवनातली श्रीमतीला तिने आजवर आपल्या उत्कर्षासाठी केलेला त्याग आपल्याला प्रत्येक क्षणाला बरोबरीने दिलेली साथ या सर्व विषयी आपल्या मनात नक्कीच भावना दाटून येतील.
धन्यवाद सुधा ताई
Archana Gore"बकुळा"
सुधा मूर्तींची प्रेम कथा, श्रीकांत आणि श्रीमती ची. साधी सरळ समजण्यासाठी सोपी वाचकाला खेळवून ठेवणारी. प्रेम तर आहेच पण संघर्ष देखील आहे त्या दोघांचा. यशाच्या मागे धावता धावता श्रीकांत खूप पुढे निघून जातो आणि श्रीमती मात्र तिथेच राहते मनाने. कथेचा शेवट अगदी चटका लावून जातो मनाला, स्तब्ध करून जातो, कारण श्रीमतीने घेतलेला एक निर्णय जो सहजा सहजी कोणीच घेणार नाही. श्रीकांत ने बकुळीची फुले जपली पण सुगंध नाही जपता आला त्याला.....
©अर्चना गोरे..
Shreya Shirgaonkarती आपल्या प्रत्येक पत्राच्या घडीत एक नाजूक बकुळीचं फूल त्याला आठवणीनं पाठवायची, तीचं पत्र आलं की , श्रीकांतच्या हृदयात एक अनामिक हुरहुर दाटून यायची...😍🌸 वाढदिवसाची भेट म्हणून मिळालेलं हे बकुळी इतकं सुंदर पुस्तक वाचून झालं आज... खूप सुंदर आणि खूप काही शिकवणार असं हे पुस्तक... सुधा मूर्ती म्हणलं की त्यांच प्रत्येक पुस्तक संवेदनशील, नवीन गोष्टी शिकवणार असतचं, हे ही अगदी तसंच ! प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे खंबीर पणे उभी राहणारी एक स्री असते हे वाचलेलं वाक्य या पुस्तकातल्या श्रीमतीने अधोरेखित केलंय.
सुरवातीला लव्ह स्टोरी, मग लग्न , त्या नंतर आयुष्यात झालेला बदल, आणि सगळी कर्तव्य न चुकता पार पाडणारी एक बुद्धीमान, आणि संवेदनशील बायको नंतर गृहीत धरली जाते, स्वतः इतकी बुद्धीमान आणि हुशार असलेली श्रीमती स्वतःचं करिअर ,स्वतःच्या आशा, अपेक्षा, स्वप्न बाजूला ठेवून नवऱ्याच्या स्वप्नांसाठी इतका त्याग करून हि त्याच मात्र तिच्याकडे दूर्लक्ष होतं, पण ते म्हणतात ना, जिद्द माणसाला स्वस्थ बसू देत नाही ती क्रांती करायला पाहतेच, तशी नायिका तीच्या हातून झालेली चूक सुधारून स्वतःच्या स्वप्नांसाठी बंधनमुक्त होतेच,
मी या पुस्तकाकडून शिकलेल्या गोष्टी -
१. नुसती स्वप्न बघून काही होत नाही त्या साठी मेहनत घ्यावी लागते
२. प्रेम हे महत्वाचं पण स्वतःचं अस्त्तित्व टिकून ठेवण्यासाठी काम करत राहण ही महत्त्वाचं..
३. किती हि हूशार, महत्वकांक्षी, यशस्वी असलो तरी कायम पाय जमीनीवर ठेवावे, थोडक्यात down- to -earth असावं
४. आपल्या स्वप्नांचा शोध घ्यावा, आपली आवड जपावी
५.निस्सीम प्रेम, सहनशीलता (थोडी यावी माझ्यात)
अशी सुंदर कल्पना आणि इतिहासाचं वैभव, निस्सीम प्रेम, अश्यानी नटलेलं बकुळा हे पुस्तक सर्वानी एकदा तरी अवश्य वाचावं...
Laxmi Chavan - Book Speakसाधी पण स्त्री मनाचा वेध घेणारी प्रेम कहाणी ....लग्ना नंतर स्त्रीच आयुष्य कस बदलत....तिच्या त्यागाची किंमत खरंच तिला मिळते का ? याच अतिशय मामिर्क विश्लेषण....
श्रावणी सच्चितानंद गायकवाडमाननीय,
साष्टांग नमस्कार,
लीनाताई आपण अनुवादित केलेले ‘बकुळा’ हे पुस्तक मी वाचले आहे व ते मला खूप आवडले आहे.
दोन घरांतील भांडणं कशी मिटतात याचे वर्णन अगदी उत्साहपूर्ण आहे. मी जेव्हा हे पुस्तक वाचण्यास घेतले व वाचण्यास सुरुवात केली. तेव्हा मला हे पुस्तक वाचावेसे वाटत होते. यात मांडलेले विचार माझ्या मनाला भावले.
आमची तीव्र इच्छा आहे, की आपले मार्गदर्शन आम्हास लाभावे. आम्हाला प्रत्यक्षात आपले विचार ऐकायला खूप आवडेल. त्यामुळे आपण आमच्या शाळेत यावे, ही विनंती. मला खात्री आहे, की आपण आपल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कराल.
धन्यवाद!
कळावे,
श्रावणी सच्चितानंद गायकवाड
हरंगुळ, लातूर
नित नितेशबकुळीच्या झाडाखाली अगदी पहाटे, घरच्यांना माहिती न होऊ देता, त्यांचं प्रेम बकुळीच्या फुलासारखं सुगंधित होऊन बहरत गेलं. शिक्षणनिमित्त तो मुंबईला गेला असताना ती आपल्या प्रत्येक पत्रात एक नाजूकसं बकुळीच फुल पाठवत होती. तिच पत्र आलं की त्याच्या हृदयात एक अनामिक हुरहूर दाटून यायची. हातात ते बकुळीच फुल घेऊन तो आठवणीत रमून जायचा.
पुढे घरच्यांचा विरोध असतानाही त्या दोघांनी लग्न केलं. मुंबईला रूझु झाले. अपार मेहनत आणि कामावर निष्ठा ठेऊन त्याने, जे कमी वेळेत अशक्य ते यश संपादन केले. तीनेही पती निष्ठेने अगदी स्वतःच्या सर्वच इच्छांना तिलांजली दिली. नवऱ्याने आपल्यासाठी थोडा वेळ काढावा, थोडे कौतुकाचे शब्द बोलावेत एवढीच तिची माफक इच्छा होती, आपल्याला मूल असावं अशी इच्छा होती. परंतु काही काळानंतर जेव्हा तिला कळून चुकत कि आपल्या या त्यागाला नवऱ्याचा लेखी काही किंमत नाही.
लग्न झाल्यानंतर फक्त रुपया, पद, प्रतिष्ठाच महत्वाची नसते. तर आपल्या जोडीदाराच्या इच्छा अपेक्षांचा विचार करून त्याप्रति आपली भागीदारी, सकारात्मक दृष्टीने निभावून संसार गाडा पुढे घेऊन जाणे तितकेच गरजेचे असते. पण तिच्या पुढे निराशाच आली. शेवटी ती सगळ सोडून आपली स्वप्न पुर्ण करायला कायमची परदेशी जाते. तेव्हा श्री च्या लक्षात येत की, आपल्या हातातलं `बकुळी` च फुल स्वतःच्याच चुकीने निसटून गेलेलं आहे.
सर्वच प्रकरणं अशी नसतात पण करियरच्या मागे धावणाऱ्या काही जोडप्यांच्या डोळ्यांत अंजन घालणार पुस्तकं आहे.
LAXMI HARI SMRUTI NYASA LIBRARY MAGAZINEकौटुंबिक जिव्हाळ्याच्या परंतु स्त्रियांच्या प्रश्नावर आधारित कथा, कादंबऱ्या लिहून सुधा मूर्ती यांनी बरेच मोठे कार्य केले आहे. त्यांचे सर्व साहित्य कर्नाटक राज्यातील स्त्रियांच्या प्रश्नावर अधोरेखित असते. अजूनही त्या भागात तेथील ज्येष्ठ स्त्रियांच्या मनावर जुन्या गोष्टींचा पगडा आहे. बकुळा ही कादंबरी पण त्याच पठडीतील आहे. मात्र दोन घराण्यांतील वैर दीर्घकाळ जपणाऱ्या अशिक्षित स्त्रियांचा विचार करताना त्याच दोन घराण्यातील वैर असलेली मुले भरपूर शिक्षण घेऊन घरच्या लोकांच्या मनाविरूद्ध प्रेम विवाह करतात. या दोन उच्चशिक्षित तरुण-तरुणीची कथा सुधातार्इंनी अतिशय उत्तम रितीने रंगविली आहे. अर्थात यामध्ये अनुवादिका लीना सोहोनी यांचे श्रेय आहे. अनुवादीत कादंबरी न वाटता स्वतंत्र मराठी कादंबरी वाटते. इतकी छान भट्टी जमली आहे.
कादंबरीचा नायक श्रीकांत व नायिका श्रीमती एकाच वयाची आहेत. एस.एस.सी. परीक्षेत बोर्डात श्रीमती पहिली येते तर श्रीकांत दुसरा येतो. प्रथम एकमेकांस प्रतिस्पर्धी मानणारे हे एकमेकांच्या प्रेमात पडतात. घरच्या लोकांच्या विरोधातही ते विवाह करतात. नंतर दोघेही नोकरी करतात. श्रीमती घरासाठी खूप कष्ट घेते. कुटंबाचे कर्ज फेडण्यास मदत करते. तरीही तिच्या सासूबाई व नणंद तिला स्वीकारत नाहीत. पुढे श्री मोठा होतो. पण पत्नीच्या त्यागाकडे दुर्लक्ष होते. अखेर आपली महत्त्वकांक्षा पूर्ण करण्यासाठी ती बाहेर पडल्यावर श्री च्या लक्षात येते. हे सर्व कथानक अतिशय उत्तम शब्दात व हृदयस्पर्शी आहे.
काल्पनिक कथेतही वास्तवता आणण्याचा लेखिकेचा प्रयत्न यशस्वी होतो. ज्या वाचकांना कादंबरी वाचनाची आवड आहे त्यांना ही कादंबरी नक्की आवडेल.
DAINIK EKJOOT 24-11-2009‘इन्फोसिस’सारख्या विश्वप्रसिद्ध संस्थेच्या उभारणीत मोलाचा वाटा असणाऱ्या सुधा मूर्ती यांच्या ‘बकुळा’ ही कादंबरीचा लीना सोहोनी यांनी केलेला अनुवाद प्रसिद्ध झाला आहे. अत्यंत बुद्धिमान असणाऱ्या श्रीमती आणि श्रीकांत या दांपत्याची ही प्रेमकहाणी आहे. या दोघांचं प्रेम शालेय वयापासूनच उमलत जातं. दोघांच्या कुटुंबियांमध्ये पूर्वापार वैर चालत आलेलं आहे. मात्र ते दोघे हळव्या प्रेमसंबंधांनी परस्परांशी बांधले जातात. दोघांच्या घरामध्ये असणारं बकुळीचं झाड त्यांच्या पे्रमाची साक्ष ठरतं. पुढे श्रीकांत आणि श्रीमती यांचा विवाह होतो. श्रीकांत उच्च शिक्षण घेऊन एका कंपनीच्या संचालकपदापर्यंत मजल मारतो. श्रीमती मात्र अत्यंत बुद्धिमान असूनही श्रीकांतच्या प्रेमाखातर स्वतःचं आयुष्य त्यालाच समर्पण करते. यामध्ये तिचं करिअर, स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व श्रीकांतच्या महत्त्वाकांक्षेपायी विरून जातं. व्यवहारी मनाच्या श्रीकांतला पैसा, सत्ता, पदं हेच महत्त्वाचं वाटतं.
पूर्वी आपल्यावर जीवापाड प्रेम करणारा श्रीकांत असा बदलला कसा असा प्रश्न श्रीमतीला पडतो. अखेर एका निर्णायक क्षणी श्रीमती एका निर्णयाप्रत येते. पूर्वायुष्यात मागे राहिलेला इतिहासाचा अभ्यास पूर्ण करण्याचा ती निर्धार करते. ते करण्यासाठी श्रीकांतला सोडून ती परदेशी निघून जाते. यामुळे श्रीकांत क्षणभर कोलमोडतो, पण दुसऱ्याच क्षणी सावरतो. लीना सोहोनी यांनी अत्यंत ओघवत्या भाषेत या पुस्तकाचा अनुवाद केला आहे. १४० पानांचे हे पुस्तक १२० रुपयांना उपलब्ध आहे.
SAPTAHIK SAKAL 1-5-2010सुधा मूर्ती हे नाव संगणक विशेषज्ञ, कन्नड आणि इंग्रजी भाषेत विपूल लेखन करणाऱ्या लेखिका, लोकप्रिय यशस्वी कादंबरीकार, ‘इन्फोसिस टेक्नॉलॉजीज’ या कंपनीतील त्यांचा महत्त्वाचा सहभाग, संवेदनशील सामाजिक जाण असणारी व्यक्ती म्हणून सर्वांना ठाऊक आहे. ‘बकुळा’ ही सुधा मूर्ती यांची कादंबरी लीना सोहोनी यांनी अनुवादित केली आहे. श्रीमती आणि श्रीकांत यांच्या प्रेमाची साक्ष हे या छोट्याशा कादंबरीचे वैशिष्ट्ये आहे. शाळकरी वयात रूजलेलं श्रीमती आणि श्रीकांत यांचं प्रेम. त्यातला कोवळा, अल्लड भाव, नंतरची तारूण्यातील उत्कटता, गोड हुरहूर प्रेमविवाहातील साथसंगत, परस्परांसाठी केलेला त्याग, समजुतदारपणा, दुसऱ्याच्या उत्कर्षामध्ये आनंद-समाधान शोधणे, हे सर्व प्रेमभावनेचे पैलू ‘बकुळा’ या कादंबरीत व्यक्त झाले आहेत. परस्परांच्या सहवासात, समजूतदार साथसंगत असूनही दोन व्यक्तींच्या भावविश्वं अलग होत जातात. त्याची किंवा तिची साथसंगत आपल्याला जन्मभर पुरणार आहे, या उमेदीला आणि विश्वासाला तडा जातो. साथसोबत असताना तिला आणि त्यालाही स्वत:चं स्वतंत्र, स्वायत्त विश्व असणं ही जगण्याची गरज होऊन बसते. परस्परसामंजस्य, संवाद आणि एकमेकांचे स्वातंत्र्य मानण्याची जपण्याची प्रगल्भ जाण नसेल, तर नात्यामध्ये दुरावा, तुटलेपणा, एकटेपणा येणं अटळ असतं, हे सुधा मूर्ती यांच्या ‘बकुळा’ या कादंबरीतून सूचित होतं. स्वत:चं ‘स्वायत्त जग’ शोधताना, उभं करताना व्यक्ती आत्मकेंद्रित, स्वार्थी होते. हे आजच्या जीवघेण्या स्पर्धेच्या, यश आणि पैसा महत्त्वाच मानण्याऱ्या जगातलं कटुसत्य ‘बकुळा’मधून अधोरेखित होतं. लोकप्रिय कादंबरीमध्ये अनुभवाच्या आधारे शोध घेण्याची प्रक्रिया जाणवत नाही. परिणामी, टक्केटोणपे खात स्वत:च्या जगण्याच्या अर्थ शोधणं, अर्थ लावणं, तो शोधताना त्या-त्या प्रसंगी येणारी व्याकुळता, वेदनादायक जाणीव लोकप्रिय साहित्यातील व्यक्तिरेखांमधून, आशयातून व्यक्त होत नाही. ‘संथ वाहते कृष्णामाई’ या न्यायाने संथ, सरळ रेषेत व्यक्तिरेखेचा आणि कथानकाचा प्रवास ही वैशिष्ट्ये लोकप्रिय कादंबरीत दिसून येतात. ही सारी वैशिष्ट्ये सुधा मुर्ती यांच्या ‘बकुळा’ या अनुवादित कादंबरीत आलेली आहेत. म्हणून तिला लोकप्रिय कादंबरीत दिसून येतात. ही सारी वैशिष्ट्ये सुधा मूर्ती यांच्या ‘बकुळा’ या अनुवादित कादंबरीत आलेली आहेत. म्हणून तिला लोकप्रिय लघुकादंबरी म्हणता येते.
परस्परसामंजस्य, संवाद आणि एकमेकांचे स्वातंत्र्य मानण्याची–जपण्याची प्रगल्भ जाण नसेल, तर नात्यामध्ये दुरावा, तुटलेपणा, एकटेपणा येणं अटळ असतं, हे सुधा मुर्ती यांच्या ‘बकुळा’ या कादंबरीतून सूचित होतं. स्वत:चं ‘स्वायत्त जग’ शोधताना, उभं करताना व्यक्ती आत्मकेंद्रित, स्वार्थी होते, हे आजच्या जीवघेण्या स्पर्धेच्या यश आणि पैसा महत्त्वाच्या मानणाऱ्या जगातलं कटुसत्य ‘बकुळा’ मधून अधोरेखित होतं.
DAINIK DESHDOOT 10-1-2010सुधामूर्तींना आज कोण ओळखत नाही? त्यांनी मनापासून समाज कार्याला वाहून घेतले. कर्नाटकमधल्या सर्व सरकारी शाळांनी संगणक आणि ग्रंथालय सुविधा उपलब्ध करून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. राजलक्ष्मी पुरस्कारप्राप्त सुधा मूर्ती उत्तम लेखिकाही आहेत. पद्मश्री सुधा मूर्तींना माणसं पुस्तकासारखी वाचता येतात असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. ‘बकुळा’ या त्यांच्या अनुवादित कादंबरीचं वाचन वाचकाला विचार करायला प्रवृत्त करतं. सुधा मूर्तींच्या ‘बकुळाचं’ अनुवादित कादंबरीत लीना सोहनींनी रूपांतरण केलं आहे. अतिशय सोपी, रसाळ, नेमक्या शब्दांची ओघवती शैली यामुळे ‘बकुळा’ एकदा वाचायला घेतल्यावर खाली ठेववत नाही. श्रीमती आणि श्रीकांत यांच्या प्रेमाची ही गोष्ट आहे. प्रेम म्हणजे देणं, समर्पण कुठल्याही अपेक्षा न करता साथ देणं. यासाठी फार मोठी तडजोड करावी लागते आणि ती तडजोड म्हणजे ‘त्याग’. बकुळामध्ये श्रीमतीने असाच श्रीकांतच्या प्रेमासाठी त्याग केला. एका लहान गावातून आलेली श्रीमती खूप हुशार, समजदार आणि सौम्य होती. श्रीकांतच्या प्रत्येक निर्णयाला, आवडीला पाठिंबा देणारी, स्वत:च्या आवडीनिवडी अपेक्षा दूर ठेवून श्रीकांतच्या यशात सुख मानणारी अर्धांगिनी. वेगवेगळे मान, अपमान पचवून स्वाभिमानाने रहाणारी श्रीमती नंतर नंतर बेचैन होते. स्वत:च्या जगण्याचा उद्देश काय? शिक्षणासारखं सुदर क्षेत्र सोडून संसार, पाहुणे, हिशोब व्यवहार सांभाळणे हे असं काय करत बसलोय आपण? म्हणून अटीतटीला येते. श्रीकांतला श्रीमतीसाठी कधीच मोकळा वेळ मिळालेला नसतो. वर्षानुवर्षे साचलेल्या भवनांचा शेवटी उद्रेक होतो आणि श्रीमती तरीही संयमाने श्रीकांतचाच विचार करून काही निर्णय घेते. हे सगळं वाचताना आपल्याला श्रीकांत, श्रीमती आपल्या समोरच असल्याचा भास होतो. इतका हा अनुवाद जिवंतपणे शब्दबध्द झालाय. स्त्रीचे व्यक्ती स्वातंत्र्य, तिच्या इच्छा आकांक्षा या बद्दल एका स्त्रीचे मनोगत वाचून वाचक मनातून हेलावेल यात शंका नाही.
APLA MAHANAGAR 2-5-2010ती आपल्या प्रत्येक पत्राच्या घडीत एक नाजुकसं बकुळीचं फूल त्याला आठवणीनं पाठवायची. तिचं पत्र आलं की, श्रीकांतच्या हृदयात एक अनामिक हुरहूर दाटून यायची. प्रत्येक पत्र त्याच्याकरता एक नवी उमेद घेऊन यायचं. या बकुळीच्या फुलाची साथसंगत आपल्याला जन्मभर असणार आहे, ही उमेद होती!... सुधा मूर्ती यांच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीतील हा भावपूर्ण आविष्कार आहे.
PUNYANAGARI 15-11-2009इन्फोसिसच्या उभारणीत मोलाचा वाटा असणाऱ्या सुधा मूर्ती यांची ‘बकुळा’ ही कादंबरी प्रकाशित झाली असून लीना सोहोनी यांनी या कादंबरीचा अनुवाद केला आहे. अत्यंत बुद्धिमान असणाऱ्या श्रीमती आणि श्रीकांत या दांपत्याची ही प्रेमकहाणी आहे. या दोघांचं प्रेम शालेय वयापासूनच उमलत जातं. दोघांच्या कुटुंबियांमध्ये पूर्वापार वैर चालत आलेलं आहे. मात्र ते दोघे हळव्या प्रेमसंबंधांनी परस्परांशी बांधले जातात. दोघांच्या घरामध्ये असणारं बकुळीचं झाड त्यांच्या प्रेमाची साक्ष ठरतं. पुढे श्रीकांत आणि श्रीमती यांचा विवाह होतो. श्रीकांत उच्च शिक्षण घेऊन एका कंपनीच्या संचालकपदापर्यंत मजल मारतो. श्रीमती मात्र अत्यंत बुद्धिमान असूनही श्रीकांतच्या प्रेमाखातर स्वतःचं आयुष्य त्यालाच समर्पण करते, यामध्ये तिचं करिअर, स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व हे सर्वच श्रीकांतच्या महत्त्वाकांक्षेपायी विरून जातं. व्यवहारी मनाच्या श्रीकांतला पैसा, सत्ता, पदं हेच महत्त्वाचं वाटतं. पूर्वी आपल्यावर जीवापाड प्रेम करणारा श्रीकांत असा बदलला कसा असा प्रश्न श्रीमतीला पडतो. अखेर एका निर्णायक क्षणी श्रीमती एका निर्णयाप्रत येते. आपलं इतिहासाचा राहिलेला अभ्यास पूर्ण करण्याचा ती निर्धार करते. ते करण्यासाठी श्रीकांतला सोडून ती परदेशी निघून जाते. यामुळे श्रीकांत क्षणभर कोलमोडतो, पण दुसऱ्याच क्षणी सावरतो. लीना सोहोनी यांनी अत्यंत ओघवत्या भाषेत या पुस्तकाचा अनुवाद केला आहे. मेहता पब्लिशिंग हाऊसने हे पुस्तक प्रकाशित केलं आहे.
DAINIK LOUKIK 6-12-2009सुधा मूर्ती या मूळच्या मराठी भाषिक. महाराष्ट्र, कर्नाटक सीमा भागातील त्या रहिवासी. त्यांचे बरेच वर्षे वास्तव्य पुण्यात होते. पुण्याच्या टेल्कोत दाखल झालेल्या त्या पहिल्या महिला अभियंता. पुढे नारायण मूर्तींनी इन्फोसिसची स्थापना केली आणि त्या वास्तव्यासाठी बंगलोरला गेल्या. सुधा मूर्ती या नुसत्याच संगणक तज्ज्ञ नाहीत तर त्या एक चांगल्या लेखिका आहेत. त्या मराठी इंग्रजी आणि कन्नड अशा तीन भाषेतून लेखन करू शकतात. त्यांची अनेक पुस्तके गाजली आहेत. विशेषतः वाइन अँड आदर वाइज, पुण्यभूती भारत, थैलीभर गोष्टी, सुकेशिनी, महाश्वेता, डॉलर बहू आदी पुस्तकांचा उल्लेख करता येईल. बकुळा ही त्याच परंपरेतील एक कादंबरी आहे.
सुधा मूर्ती या जन्माने मध्यमवर्गीय असल्या तरी आज त्या ज्या जगात वावरतात ते एक कॉर्पारेट जग आहे. या जगाचे सर्व नियम जगण्याचे संकेत वेगळे आहेत. बकुळा ही याच परंपरेतील एक चांगली कथा आहे. तशी ही कथा श्रीमंत आणि श्रीमती यांच्यात घडलेली आहे. हे एक मध्यमवर्गीयाचे शैक्षणिक विश्व आहे. या कथेत प्रोफेसर राव आहेत. तत्कालीन इतिहास आहे. बदामी या शहरावर पुलकेशी घराण्याचे राज्य होते. त्याचा संदर्भ या कथेत येतो. मुळात प्रेमकथा असलेली ही कथा सर्वांगाने फुलत जाते. हे या कथेचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
पुस्तकाला बकुळा हे नाव दिले आहे. त्याचे कारण म्हणजे श्रीमती आपल्या श्रीमंतला पाठवलेल्या पत्रात बकुळाचे एक फूल पाठवत असे आणि त्या फुलाच्या संगतीने तो दिवस काढायचा. लौकिक अर्थाने ही एक कोणाच्या आयुष्यात घडू शकते अशी कथा आहे. फक्त कथेतील घटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. माणसाच्या मनावर बालपणी झालेले संस्कार कायम टिकतात असे सांगितले जाते. वय झाल्यानंतर माणसाने लेखन करायचे ठरवले तर त्या लेखनात बालपणीचे संस्कार त्यावेळी पाहिलेले जग हमखास येत असते. बालपणातले अनुभवही कायम मनात घर करून राहिलेले असतात. अशा आठवणी जपणारेच लोक चांगल्या पद्धतीचे लेखन करू शकतात. सुधा मूर्ती यांचे हे पुस्तक वाचताना त्याची जाणीव या पुस्तकात जागोजागी जाणवते.
पार्श्वभूमी आणि वातावरण हुबळी, बेळगाव, धारवाड भागातील आहे. या भागात आजही मराठी माणसे मोठ्या संख्येने राहतात. त्यामुळे ही कथा मराठी माणसाला निश्चितच आवडेल. मेहता पब्लिशिंग हाऊससारख्या मोठ्या प्रकाशकाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. मेहताची पुस्तके चांगलीच असतात. शिवाय लेखिकेच्या नावाला आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वलय आहे. अशी माणसे काय लिहितात त्याबद्दलही लोकांना मोठ्या प्रमाणात उत्सुकता असू शकते आणि या पुस्तकात सर्वसामान्यांचीही उत्सुकता बऱ्याच प्रमाणात पूर्ण होते असे म्हणावे लागेल.
या कादंबरीची पृष्ठसंख्या १४० आहे. मुखपृष्ठ कथेला साजेसे आहे. मुद्रण अतिशय उत्तम आहे. तांत्रिकदृष्ट्या पुस्तक उत्कृष्ट असेच आहे. या पुस्तकाची किंमत अत्यल्प म्हणजे १२० रुपये आहे. लेखिकेच्या नावावरच पुस्तक हातोहात जाणार या बद्दल शंका नाही.
DAINIK KRUSHIVAL 31-1-2010आपल्या समाजसेवेच्या कार्यासाठी इन्फोसिस फौंडेशनच्या अध्यक्ष सुधा मूर्ती यांना जी सतत भटकंती करावी लागली त्यामधून त्यांचे जीवन विविध प्रकारच्या अनुभवांनी समृद्ध झाले हे अनुभव त्यांनी विविध वाङ्मय प्रकारांच्या माध्यमातून वाचकांसमोर मांडले आहे. सुधा मूर्ती यांनी लिहिलेल्या विविध पुस्तकांना वाचकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. त्यांच्या समाजकार्याबद्दल त्यांना पद्मश्री आणि अन्य पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ‘बकुळा’ ही त्यांची अनुवादित कादंबरी पुण्याच्या ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’ने नुकतीच प्रकाशित केली आहे. लीना सोहोनी यांनी मराठी अनुवाद केला असून पुस्तकांचे रंगीत, साधे पण साजेसे मुखपृष्ठ चंद्रमोहन कुलकर्णी यांचे आहे.
‘बकुळा’ कादंबरी ही श्रीमती आणि श्रीकांत देशपांडे या उत्तर कर्नाटकात राहणाऱ्या देशपांडे कुटुंबाची आहे. हुबळी शहारातील जमिनदारी पार्श्वभूमी असलेल्या देशपांडे या एकाच आडनावाच्या, परस्परांशी पिढीजात वेमनस्य असलेल्या पण शेजारी राहणाऱ्या घरांमध्ये श्रीमती आणि श्रीकांत लहानाचे मोठे झाले. श्रीमती आणि श्रीकांत एकाच वर्गात शिकत होते. त्यांच्यामध्ये सतत स्पर्धा होती. निबंध स्पर्धेप्रमाणेच श्रीमती बोर्डाच्या परीक्षेतही प्रथम क्रमांक प्राप्त करते तर देखण्या श्रीकांत दुसरा क्रमांक मिळवितो. पुढे प्रवासामध्ये त्यांची परस्परांशी चांगली ओळख होते, गप्पा होतात. परस्परांविषयी परस्परांविषयी वाटणारे आकर्षण त्यांना पहाटेच्या वेळी बकुळीच्या झाडाखाली एकत्र आणते. श्रीमती आर्ट्सला जाते. तर श्रीकांत विज्ञान शाखेकडे. पुढे श्रीकांत मुंबईच्या आय.आय.टी.मध्ये संगणकशास्त्र शिकण्यासाठी आपले गाव सोडतो. श्रीमती आणि श्रीकांत परस्परांना पत्ररूपाने नियमितपणे भेटतात. श्रीमती प्रत्येक पत्रात बकुळीची फुलेही ठेवत. घरचा विरोध असूनही श्रीकांत-श्रीमती विवाहबद्ध होतात आणि मुंबईला स्वतंत्र संसार थाटतात. श्रीकांतला उत्तम नोकरी मिळते. दिवस-रात्र कष्ट करून श्रीकांत सर्वोच्च पद प्राप्त करतो. त्याच्या कष्टांना श्रीमतीची सतत साथ मिळते. परंतु हळूहळू श्रीकांताचे संसाराकडे व श्रीमतीकडे दुर्लक्ष होऊ लागते. श्रीमतीच्या जीवनातील एकाकीपणा वाढू लागतो. श्रीकांतच्या घरातील अन्य व्यक्ती श्रीमतीचा आपलेपणाने स्वीकारही करीत नाहीत. विवाहापूर्वी श्रीमती इतिहासामध्ये संशोधन करण्याची तीव्र इच्छा बाळगून होती. परंतु श्रीकांतची पाठराखण करताना श्रीमतीला आपल्या आवडींकडे सतत दुर्लक्ष करावे लागते. अमेरिकेतील प्रोफेसर कॉलिन्स यांची आणि तिची पुन्हा भेट होते. ते तिचे दुःख नेमकेपणे ओळखतात आणि संशोधन कार्यासाठी तिला अमेरिकेतील एका विद्यापीठात येण्याचे निमंत्रण देतात. दहा वर्षांच्या वैवाहिक, संपन्न परंतु एकाकीपणाने भरलेल्या जीवनाचा त्याग करून अमेरिकेला जाण्याचा निर्णय श्रीमती श्रीकांतला सांगते आणि अंमलातही आणते.
‘बकुळा’ या छोट्याशा कादंबरीत सुधा मूर्ती यांनी एक वेगळेच विश्व वाचकांसमोर उभे केले आहे. श्रीमती आणि श्रीकांत या प्रमुख पात्रांभोवतीच ही कादंबरी गुंफलेली आहे. अन्य पात्रे गौण आहेत. प्रोफेसर कॉलिन्स, श्रीकांतची आई व सासू, श्रीकांतचे काही मित्र यांची व्यक्तिचित्रे उत्तमप्रकारे रेखाटली आहेत. श्रीकांत-श्रीमती यांचे परस्परांवर अपार प्रेम आहे, परंतु श्रीकांत कामापेक्षा अधिक महत्त्वाचे काही मानत नाही. परिणामी त्यांच्यातील दुरावा, एकाकीपणा वाढत जातो. सुधा मूर्तींनी हे उत्तम प्रकारे शब्दांद्वारे चित्रित केले आहे. लीना सोहोनी यांनी अनुवाद चांगला केला आहे. ‘बकुळा’ ही कादंबरी अतिशय वाचनीय झाली आहे. श्रीमती ही अतिशय बुद्धिमान आणि उच्च शिक्षित आहे तरी देखील ती आपल्या आई-आजीप्रमाणेच कुटुंबामध्ये दुय्यम भूमिका बजावताना दिसते. त्यामुळेच श्रीमतीप्रमाणेच वाचकही अस्वस्थ होतो. मुखपृष्ठावर ‘श्रीमती आणि श्रीकांत यांच्या प्रेमाची साक्ष बकुळा’ असा उल्लेख आहे. बकुळीचे झाड आणि बकुळ फुले श्रीकांत आणि श्रीमती यांना एकत्र आणतात त्यामुळे ‘बकुळा’ हे कादंबरीचे शीर्षक बरोबर वाटत नाही. काही सदोष शब्दही खटकतात. ‘बकुळा’ वाचून वाचक भारावून जातो.
SAKAL 4-4-2010‘बकुळा’ डॉ. सुधा मूर्ती यांची श्रीमती व श्रीकांत यांच्या उत्कट प्रेमाची कथा सांगणारी हृदयस्पर्शी कादंबरी! सुधातार्इंच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेली कादंबरी! अनुवादित कादंबरी!
कादंबरीतील कथा तशी सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील. श्रीमती आणि श्रीकांत कर्नाटकातील हुबळी या शहरातील बुद्धिमान, लहानपणापासून एकाच शाळेतील, एकाच वर्गातील मित्र. श्रीमतीला इतिहासाची आवड नि श्रीकांतला विज्ञानाची. शालेय जीवनात श्रीमती नेहमीच श्रीकांतपेक्षा हुशार म्हणून परिचित. दोघांची घरे समोरासमोर, पण दोन्ही घरांत सख्य नव्हते. श्रीमती व श्रीकांत शालांत परीक्षेत अनुक्रमे पहिले व दुसरे येतात. पुढील शिक्षणासाठी श्रीमती कला शाखेत प्रवेश घेते. तर श्रीकांत विज्ञान शाखेत. दोघांनाही एकमेकांबद्दल ओढ वाटत असते. त्याचे रूपांतर प्रेमात होते. दोघांच्या घराच्या मध्यभागी मोठे बकुळीच्या फुलांचे झाड असते. त्याच्या साक्षीने दोघांचे प्रेम फुलत जाते. पुढे श्रीकांत आयआयटी पवई येथे शिक्षणसाठी जातो. श्रीमतीही पुढे एम. ए. करते. श्रीकांतला पत्रातून आठवणीने बकुळीची फुले पाठविते. तो ती एका पिशवीत जपून ठेवतो. पुढे शिक्षण पूर्ण झाल्यावर घरचा विरोध न मानता दोघेही लग्न करतात. श्रीकांतला मुंबईला नोकरी मिळते. त्याच्या ध्येयवादी स्वभावामुळे तो खूप प्रगती साधतो. त्याला श्रीमती साथ देते. श्रीकांत ध्येयाने झपाटलेला असल्यामुळे त्याला श्रीमतीच्या मनाचा विचार करायला वेळच नसतो. यातून दोघांच्यात भावनिक संघर्ष सुरू होतो. दहा वर्षांत त्यांना पत्रसुखही मिळत नाही. श्रीमतीला श्रीकांतच्या कामात सर्व प्रकारची मदत करावी लागत असल्यामुळे तिचे पीएचडी. डी. होण्याचे स्वप्न अपुरे राहते. हा दोघांमधील वाद विकोपाला जातो. श्रीमती कॉलेजमध्ये असताना प्रो. कॉलिन्स यांची ओळख होते. ते इतिहासाचे गाढे व्यासंगी असतात. त्यांना श्रीमतीची हुशारी फार आवडते. ते तिला अमेरिकेला शिकायला येण्यास सुचवतात, पण तेव्हा लग्न ठरल्यामुळे ती जाऊ शकत नाही. आता दहा वर्षांनी तिला त्या शिक्षणाची ओढ वाटू लागते व अखेर ती श्रीकांतपासून मनात प्रेमतंतू जपत दूर अमेरिकेला जाते. कायमची!
अशी ही कथा गुंफत सुधातार्इंनी मानवी मनातील नाजूक भावभावनांना मूर्त रूप देत ‘बकुळा’ सादर केली आहे. लेखिकेची विद्वत्ता, अमोघ भाषाशैली व हृदयस्पर्शी गुंफण यांचा सुरेख संगम म्हणजे ‘बकुळा’! स्वतंत्र अस्तित्वासाठी आसुसलेली श्रीमती रेखाटताना तिच्या भावनांचे सूक्ष्म कंगोरे सुधातार्इंनी स्पष्ट केले आहेत. कादंबरी वाचताना आपण भान हरपून जातो नि कादंबरी वाचून पूर्ण झाल्यावरच थांबतो. वाचकांच्या हृदयाचा ठाव घेणारी ही कादंबरी सर्वांनी एकदा तरी वाचावीच! या सुंदर कादंबरीचा मराठीत अनुवाद लीना सोहोनी यांनी केला आहे. मूळ कादंबरीचा बाज तसाच ठेवून मराठी भाषकांनाही मराठीच कादंबरी वाटावी असा हा अनुवाद आहे.