CA Priya Kulkarniलेखिके बद्दल: सुधा मुतीॅ या एक सामाजिक कार्यकर्त्या असून त्या इन्फोसिस या प्रसिध्द संस्थेचे सहसंचालक एन.आर.नारायण मुतीॅ यांच्या पत्नी आहेत.
आपण सगळेच जण आपल्या दैनंदीन जीवनात खूप बरे वाईट अनुभव घेतच असतो आणी यातूनच आपण वेगवेगळ्या माणसांबद्दल, जागांबद्दल, विषयांबद्दल आपली मत बनवतो.
सौ. सुधा मुतीॅ हे आपणा सगळ्यांच्या परिचयाच नाव आहे.
इन्फोसिस फौंडेशेन या नावाने काम करत असताना त्यांना आलेले अनुभव या पुस्तकात आहेत. वाचताना जाणवतं की एखाद्या गोष्टी बद्दल आपली मत किती साचेबध्द असतात आणी वास्तवात गोष्टी किती वेगळ्या असतात.
मोलमजूरी करून आपल्या पाच मुलांचा सांभाळ करणारी एक स्त्री जेव्हा परत एका बाळाला जन्म देते तेव्हा तिच्याकडे एक प्रस्ताव येतो ते बाळ एका मुलबाळ नसलेल्या श्रीमंत दांपत्याला दत्तक देण्याचा. बाळाच्या बदल्यात मिळणारे खूप पैसे तिचे आयुष्य सुलभ करणारे असतात पण जेव्हा ते दांपत्य ते बाळ घेऊन जाण्यास येतात तेव्हा पाच मुलं असून सुद्ध तिचं मन कातरतं आणी ती बाळाला अंतर देऊ शकत नाही.
तर एकीकडे अशाच एका गरीब घरातली मुलगी वारंवार आपल्या आई बाबांना सांगत असते की मला डोळ्याला अंधुक दिसतं, पण अशिक्षीत आई वडील याकडे सतत कानाडोळा करत असतात. शेवटी एकदा ते तिला डाॅक्टरकडे घेऊन जातात. डाॅक्टर तिचे ॲापरेशन करावे असा सल्ला देतात, पण खर्चाचा आकडा खूप असतो. मग आई वडील तिला दवाखान्यातून बस स्टॅडवर घेऊन जातात. आई वडील आपापसात चर्चा करतात व मुलीच्या हातात एक बिस्कीटचा पुडा देऊन सांगतात, तू हे बिस्कीट खा, आम्ही पाच मिनिटांत येतो. बिस्कीटं संपतात, असाह्य, घाबरलेली मुलगी हाका मारू लागते...पण तिच्या हाकेला ओ देणारे कोणी येतच नाही!
आता मी कधीकधी विचार करते...मातृत्व म्हणजे काय?
खोट्या कॅन्सर ची माहिती सांगून आथिॅक मदत मिळवणारी एक व्यक्ती, तर दुसरीकडे मिळाळेल्या आथिॅक मदतीपेक्षा कमी खर्चात उपचार झाले म्हणून उरलेले पैसे फोैंडेशनला परत करणारे कुटंब...
या आणी अशा अनेक अनुभवांची सफर आहे..पुण्यभूमी भारत!
शितल सुधाकर मुळेआदरणीय लीनाजी,
स.न.वि.वि.
मी इयत्ता आठवीत शिकणारी विद्यार्थीनी आहे. मी तुम्ही अनुवाद केलेले ‘पुण्यभुमी भारत’ हे पुस्तक वाचून खूप आनंद झाला. मला मातृत्व ही गोष्ट खूप आवडली. या वेगवेगळ्या गोष्टीतून मला खूप काही शिकायला मिळालं.
मला या पुस्तकातून खूप प्रेरणा मिळाली. या गोष्टीतून काहीना काही शिकण्यासारखं आहे आणि ते मी माझ्या अंगात सगळे गुण घेतले. हे पुस्तक मला खूप आवडलं आणि तुम्हाला पत्र पाठवण्याची इच्छा झाली. मी तुम्ही अनुवाद केलेली खूप पुस्तके वाचली आणि ती सगळी पुस्तके मला खूप आवडली.
मला तुम्हाला आमच्या शाळेत वार्षिकउत्सव या कार्यक्रमात उपस्थित राहून आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. तुम्हाला हे पत्र पोहचले की आमच्या शाळेला फोन करा अशी माझी खूप इच्छा आहे. आणि आमच्या शाळेत येऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे, हीच विनंती.
कळावे,
आपली विश्वासू,
शितल सुधाकर मुळे
हरंगुळ, लातूर
DAINIK LOKSATTA 18-11-2007अनुभवांचा इंद्रधनुषी शब्द आलेख...
सुधा म्हणजे मध. मूर्ती म्हणजे प्रकट झालेले. जीवनातील मधासमान दृष्टी आणि अनुभव एकत्र होऊन शब्दरूपाने प्रकट होतात तेव्हा सुधा मूर्तीचे लेख जन्म घेतात. सुधा मूर्तींनी समाजात वावरताना आलेल्या अनुभवांचे, मधमाशीच्या मध गोळा करण्याच्या वृत्तीने संकलन केले आहे. हे करताना त्या चांगल्या गोष्टींचे भरभरून कौतुक करतात तर चांगल्या गोष्टी दाखवून देताना त्यांच्यातील अनुकंपा आणि दया यांचे दर्शन होते. प्रत्येक लेखाला मानवी स्वभावाच्या विश्लेषणाचे अस्तर आहे. हे विश्लेषण कोरडे आणि शुष्क नाही; त्याला दयार्द्र दृष्टीचा ओलावा आहे. लेखिकेला आलेल्या अनुभवांचे चित्रण सर्वच्या सर्व खरंखुरं आहे... प्रामाणिकपणे जसंच्या तसं लिहिलं आहे... काही लोकांना त्यामुळे ते भावलं आहे... असं सुधा मूर्ती मनमोकळेपणानं सांगतात.
मातृत्व, वात्सल्य, संतानप्रेम हे एकाच भावनेचे अनेक पैलू. निरनिराळ्या अनुभवातून त्याचे वेगवेगळे कंगोरे दिसून येतात. कधी आनंदाने मन उचंबळून येतं. तर कधी विदारक अनुभव वाचताना मन विषण्ण होतं. मानवी मनोव्यापाराचे विश्लेषण हेच या सबंध पुस्तकाचे मूलसूत्र आहे.
नोकरी ही कहाणी अशीच आहे. मुलाखतीतून निरनिराळ्या उमेदवारांची मनोवृत्ती कळते. एक हुशार, सधन घरातली मुलगी, ‘मला स्वतंत्रपणे रहायचे आहे, कार ठेवायची आहे, तेव्हा जास्त पगार हवा’ असे सांगते, तर दुसरा हुशार, श्रीमंत डॉक्टरचा मुलगा मात्र ‘मला याच गावात दुसरं देखील काम होतं, मी आत्याच्या घरी उरतलो होतो’ असे कारण सांगून प्रवासभत्ता घेण्याचे नाकारतो. या संदर्भात ‘वाइज अॅण्ड अदरवाइज’ या सुधा मूर्तींच्या दुसऱ्या पुस्तकांतील एका हुशार पण बढाईखोर सॉफ्टवेअर इंजिनीयरची आठवण होते. धारवाडच्या इंजिनीअरींग कॉलेजात सुवर्णपदक मिळाल्याचे खोटंच सांगणाऱ्यांची मनोवृत्ती लेखिकेला आणि वाचकांनासुद्धा कोड्यात टाकते.
परस्पर विरोधी घटना समोरासमोर उभ्या करून जणू वाचकांपुढे सुधा मूर्ती प्रश्न उभा करतात. त्या प्रतिपादनात कुठेही समस्या सोडविण्याचा अभिनिवेश असतं नाही पण वाचकांच्या मनात खळबळ मात्र जरूर निर्माण होते. हुशार दत्तक मुलीच्या शिक्षणासाठी स्वत:च्या सोन्याच्या बांगड्या गहाण टाकायला निघालेली लीलाम्मा बघून आनंद होतो. त्याच लेखात अमानुष रामप्पा या बापाचे वर्णन येते. रामप्पा स्वत:च्या लहान मुलाच्या कॅन्सरचे भांडवल करतो, लाखो रुपये चंदा गोळा करतो. मुलाच्या इलाजासाठी एक पैसाही खर्च करीत नाही. घर-वाहन विकत घेऊन मौज करतो हे वाचून मन खिन्न होते. फाटके कपडे घालून फुकट वैद्यकीय सेवेसाठी दोन गाड्यांची श्रीमंत मालकीण त्या पाहतात. गरीब वस्तीत ब्लँकेट वाटताना परत मागण्यासाठी पण श्रीमंतांची क्षुद्र वृत्ती आणि मनाची गरीबी त्यांना जास्त दु:ख देते.
एका पाकिस्तान भेटीच्या वेळी, तेथील लोक, हिंदी सिनेमाच्या गाण्याची धून गुणगुणारा टॅक्सी ड्रायव्हर, मेजवानीतील चना-भटुरा, आलू पराठा, जिलेबी, सगळं सगळं कसं घरच्यासारखं वाटत होतं. त्या तक्षशीला येथे म्युझियम पाहायला जातात. तिथे परदेशी पाहुण्यांसाठी तिकीट जास्त आहे. आपण जणू भारतातच आहे असं समजून त्या विचारतात, ‘माझ्याकडून दोनशे का घेतले?’ तेव्हा ‘तुम्ही भारतीय म्हणजे परदेशी’ हे उत्तर त्यांना वास्तवाची जाणीव करून देते. दुसऱ्या एका भेटीच्या वेळी चेन्नईच्या मिसेस कपूर त्यांच्याबरोबर असतात. मिसेस कपूरचं बाळपण, खेळणं बागडणं सुरुवातीचं शिक्षण, फाळणीपूर्व पंजाबात झालं. त्यांची जन्मस्थानाला - पिंडीला भेट देण्याची अनावर ओढ, ते घर आता तिथे नसल्यामुळे व्यथित झालेल्या मिसेस कपूर, शेजारी डॉ. सलीम यांचे अगत्यशील वागणं, हे सगळं सुधा मूर्ती अत्यंत भावूकपणे वर्णन करतात.
इन्फोसिस ही कॉम्प्युटर क्षेत्रातील फक्त भारतातील नव्हे तर जगातील अग्रगण्य व श्रीमंत कंपनी आहे. इन्फोसिस फौंडेशन ही त्या कंपनीची समाजिक आणि धर्मादाय कार्य करणारी संस्था आहे. या संस्थेच्या प्रमुख या नात्याने सुधा मूर्तींचा विविध क्षेत्रातील संस्थांचा आणि व्यक्तींचा संबंध येतो. हिरालाल जैन हे व्यावसायिक नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर फौंडेशनला मदत पाठवित असतात. त्यांच्यानंतर दुसरी पिढी व्यवसायाची धुरा सांभाळते. नवीन व्यवस्थापन इन्फोसिस फौंडेशनला विचारते, आम्हाला या मदतीमुळे काय प्रसिद्धी मिळेल? बदलत्या व्यक्तिगत, सामाजिक आणि व्यावसायिक मूल्यांची चुणूक या लेखाद्वारे आपणास कळून येते.
या पुस्तकातील प्रत्येक लेख एक आरसा आहे. प्रत्येकात वेगवेगळे प्रतिबिंब आहे. पण प्रत्येकात माणसांच्या वृत्ती प्रवृत्तींच्या वेगवेगळ्या रंगाचे दर्शन आहे, जणू भारत दर्शन आहे. या साऱ्या गोष्टी मनाला स्पर्शून जातात; सरळ सच्चेपणा भावतो. सगळ्याच लेखांचा परिचय देणे शब्दमर्यादेत बसत नाही. पण ‘तू शंभर मुलांची आई हो!’ हा त्यांच्या आजीचा आशीर्वाद त्यांनी वेगळ्या संदर्भात अनेकांना मदत करून सार्थ केला असे वाटते. कर्मठ आणि प्रगत विचारसरणी एकत्र नांदू शकतात याचा सुधा मूर्तींच्या आजीमध्ये सुंदर संगम आढळतो.
असा आहे सुधा मूर्तींच्या अनुभवांचा इंद्रधनुषी शब्द आलेख! द ओल्ड मॅन अॅण्ड हिज गॉड (डिस्कव्हरींग द स्पिरीट ऑफ इंडिया) या मूळ इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद लीना सोहोनी यांनी सरसरित्या केला आहे. तळमळीने लिहिलेले अनुभव आणि ओघवती भाषा यामुळे हाती घेतलेले पुस्तक केव्हा संपते ते कळतच नाही. उगाच नाही एकवीस भाषात भाषांतर झालं!
कॉम्प्युटर युग माणसाला समाजापासून अलग करते आहे असं म्हणतात पण ही बाई तर पूर्णपणे समाजमय झाली आहे. लेखनाचे मानधन सुधा मूर्ती सामाजिक कार्याला अर्पण करतात.
-मधुसूदन आदवाणीकर
DAINIK SAMANA 13-05-2007समाजमनाची गमतीदार निरीक्षणे...
सुधा मूर्ती या मूळच्या सुधा कुलकर्णी. म्हणजे मराठी नव्हे; कानडी भाषिक. इन्फोसिस या आंतरराष्ट्रीय ख्यातनाम संगणक कंपनीचे जनक नारायणमूर्ती यांच्या त्या पत्नी. आपण मराठी माणसं जरासं दक्षिणी वळणाचं नाव दिसलं की ‘मद्रासी’ किंवा ‘साऊथ इंडियन’ असा एक शेरा मारून मोकळे होतो. प्रत्यक्षात दक्षिण हिंदुस्थानात कर्नाटक, तामीळनाडू, आंध्र आणि केरळ असे चार प्रांत आहेत. तिथल्या भाषा वेगवेगळ्या आहेत. किंबहुना कोटेकोरपणे बोलायचं तर आपला महाराष्ट्रही दक्षिण हिंदुस्थानातच मोडतो ही सगळी वस्तुस्थिती आपल्या गावीही नसते.
तर सुधा मूर्ती या कन्नड भाषिक असून स्वत: अव्वल दर्जाच्या सॉफ्टवेअर इंजिनीयर आहेत. इन्फोसिसच्या उत्तुंग यशात आपल्या पतीइतकाच त्यांचाही वाटा आहे. अलीकडे त्या समाजकार्य आणि लेखनाकडे वळल्या आहेत. वेगवेगळ्या इंग्रजी नियतकालिकांमधून त्यांचे स्तंभ नियमितपणे प्रसिद्ध होत असतात. त्यांचे लेखन लोकप्रिय आहे.
श्रीमंताच्या बायकांना वेळ घालवण्यासाठी समाजकार्य करणं आणि इंग्रजीतून(च) लेखन करणं यात नवीन काहीच नाही. हा ब्रिटिश मडमांचा वारसा आहे. आपल्याकडे त्यांची ‘अतिविशाल महिला मंडळ’ म्हणून टिंगल होत असते.
पण सुधा मूर्तीचे काम आणि लेखन या दोहोंची जातकुळी वेगळी आहे. एकतर त्या श्रीमंत नवऱ्याची कर्तृत्वशून्य बायको नाहीत. उलट प्रचंड गुणवत्ता आणि प्रचंड कर्तबगारी गाजवून आता त्या सामाजिक कार्यात उतरल्या आहेत. अशा लोकांचं लक्ष बहुधा कायम युरोप-अमेरिकेकडे लागलेलं असतं. तिथलं ते सगळं चांगलं नि इथलं ते सगळं टाकाऊ अशी त्यांची धारणा असते. सुधा मूर्तींची इथल्या समाजासाठी काहीतरी काम करण्याची भावना, तळमळ अस्सल आहे. त्या कामाला त्यांनी पाश्चिमात्त्य पद्धतीच्या शिस्तीची योजनाबद्धतेची उत्तम जोड दिल्यामुळे सोन्याला सुगंध लाभला आहे.
या सामाजिक कार्यात सतत येणाऱ्या कडू-गोड गमतीदार अनुभवांवरच त्या सतत लिहित असतात. प्रस्तुत ‘पुण्यभूमी भारत’ हे अशाच अनुभवकथांचं अतिशय वाचनीय पुस्तक आहे.
हिंदुस्थानला जगाचं लघुरूप (मिनिएचर ऑफ दि वर्ल्ड) म्हटलं जातं. जगातल्या सर्व प्रकारच्या वृत्ती-प्रवृत्ती इथे आढळतात. टोकाची बदमाशगिरी आणि टोकाचा प्रामाणिकपणा, आत्यंतिक श्रीमंती आणि आत्यंतिक दारिद्र्य, अस्सल साधू आणि पक्के भोंदू असे सर्व मानवी नमुने इथे सापडतात. सुधाबार्इंच्या अनुभवकथांमधून त्यांच्या स्वत:च्या सुंदर भाष्यासह ते आपल्यासमोर येतात. त्या भाष्यामधून आपल्या हेही लक्षात येतं की, लेखिकेची काही चिरंतन अशा मानवी मूल्यांवर दाट श्रद्धा आहे आणि काळ कितीही बदलला तरी ही मूल्यं अचल, अढळ, शाश्वत अशीच राहणार आहेत. ती मूल्यंच चांगलं जीवन जगू पाहणाऱ्यांना आत्मबळ देणार आहेत. हिंदुस्थान ही पुण्यभूमी असल्याचा हाच तर निकष आहे.
-मल्हार कृष्ण गोखले
DAINIK AIKYA 27-05-2007संवेदलशील मनाची प्रचिती...
‘पुण्यभूमी भारत’मध्ये सुधा मूर्ती यांनी वेगवेगळे अनुभव सांगणाऱ्या ३१ लेखांचे संकलन केले आहे. त्या इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्ष आहेत आणि विश्ववस्तनिधीद्वारे अनेक समाजोपयोगी कार्यांना सक्रिय मदत देत असतात. कर्नाटकात लहान लहान खेडेगावातही फाउंडेशनद्वारे त्यांनी ‘गाव तेथे ग्रंथालय’ हा उपक्रम व्यापक प्रमाणावर राबवला आहे. गरजू विद्यार्थ्यांना मदत, आपत्तिग्रस्तांना मदत, वसतिगृहांना मदत, परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, वृद्धाश्रमांना सहाय्य, रुग्णालयांना इमारती व उपकरणे यासाठी अनुदान अशा निरनिराळ्या मार्गांनी समाजाकडून जे मिळते ते समाजाला परत देण्याचा धर्म त्या निभावत आहेत. मात्र हे दान सत्पात्री असावे यावर त्यांचा कटाक्ष असतो. त्या वेगवेगळ्या सामाजिक कार्यामध्ये सहभागी होतात; सेवाभावी व्यक्ती आणि संस्था यांच्या कामाची प्रत्यक्ष माहिती घेतात; चांगल्या कामासाठी योग्य ती मदत करतात. कुठल्याही प्रकारची बडिवार न माजवता, प्रसिद्धीची अपेक्षा न धरता त्या मदतीसाठी तत्पर असतात. सुधा मूर्ती यांचे अनुभव रेखाटणारे तीन-चार पृष्ठांचे लेख. पण ते वाचकांच्या हृदयाला भिडतात. त्यामुळेच त्यांच्या या पुस्तकांचे अनुवाद वीस-बावीस भारतीय भाषांमध्ये अल्पावधीतच झाले. सुधा मूर्ती यांचे हे बरेचसे अनुभव इन्फोसिस फाउंडेशनच्या निमित्ताने भेटणाऱ्या व्यक्तींबद्दलचे आहेत आणि त्याद्वारे मानवी स्वभाववृत्तीच्या वेगवेगळ्या पैलूंचे जे दर्शन त्यांना घडते; ते कधी त्यांना विस्मयचकित करणारे ठरले तर कधी उद्विग्न करणारे वाटले; आपल्याला जाणवलेले. हे भलेबुरे अनुभव लिहून काढण्यात आणि सांगण्यात त्यांना स्वारस्य वाटते. ते अनुभव आपल्या वाचकांना वा सुद्धा कथाकथन करण्यात, शेअर करण्यात त्यांना आनंद वाटतो. आपल्याला आले तसेच अनुभव इतरांनाही येत असणार आणि त्यायोगे त्यांनाही मानवी स्वभाववृत्तीतील चांगुलपणा किंवा उथळपणा, नि:स्वार्थीपणा किंवा आपमतलबीपणा, आत्मियता किंवा तुटकपणा जाणवला असणार... त्यावरून योग्य तो बोध घेणे, सावधगिरी घेणे आणि वाईट अनुभव आले तरी त्यामुळे आपले चांगुलपण न विसरता काम करीत राहणे; नकारात्मक अनुभवांमुळे मानवतेवरचा विश्वास डळमळीत होऊ न देणे... या दृष्टीने त्या वाचकांचे मनोबलही जणू परिपुष्ट करतात. खूप माणसे बघितल्याने प्रामाणिक माणूस कोण आणि ढोंगी माणूस कोण हे सहजपणे ओळखता येते आणि ढोंगी माणसाला ‘एक्स्पोझ’ करण्याची संधीही त्या वाया दवडत नाहीत.
तिबेटच्या ल्हासा शहरातील जोखांग मंदिरात गेल्यावर तेथील मठाधिकारी सुधा मूर्तींशी हस्तांदोलन करून एक पांढरा स्कार्फ त्यांच्या खांद्यावर ठेवतात; तर तेथे दर्शनाला आलेली एक वृद्ध स्त्री त्यांचा हात हाती घेऊन त्याचे चुंबन घेऊन काहीतरी पुटपुटते; आणि तिचा नातू इंग्लिशमध्ये सांगतो, ‘माझ्या आजीचं वागणं मनावर घेऊ नका. ते विचित्र वाटेल तुम्हाला... पण ती तुमचे आभार मानते. तुमच्या देशाने आमच्या दलाई लामांना सन्मानपूर्वक आश्रय दिला आहे. आम्ही दलाई लामांना साक्षात परमेश्वर मानतो. माझी आजी त्यांची नि:स्सीम भक्त आहे. ती तुम्हाला ‘भारत ही पुण्यभूमी आहे’ असे सांगत होती. इन्फोसिस फाउंडेशनच्या कामाच्या निमित्ताने भेटणाऱ्या व्यक्ती, देणगीच्या नावाने फसवणूक करणाऱ्या व्यक्ती, खोटे कारण सांगून मदत मिळवणाऱ्या व्यक्ती, मदतीच्या कार्यात अडथळा आणणारे महाभाग, चांगल्या कामाला मदत देण्याची संधी असूनही त्याबाबत अनुत्साह वा तिटकारा दाखवणाऱ्या व्यक्ती, सवलतीत वा मोफत उपचार मिळविण्यासाठी फाटके कपडे घालून येणाऱ्या सुखवस्तू कुटुंबातील व्यक्ती, एकापेक्षा अधिक वेळा रांगेत उभे राहून ब्लँकेट्स वगैरे दोन-दोनदा घेऊ पाहणाऱ्या व्यक्ती यांचे किस्से या लेखांमध्ये आले आहेत. आपल्या मुलाला– सोमनाथाला कॅन्सर झाला आहे, उपचारासाठी पैसे हवेत म्हणून मदत घेऊन जाणारा त्याचा बाप रामप्पा सुधा मूर्ती यांजकडून मिळालेल्या मदतीच्या आधारे इतरांकडूनही पैसे गोळा करतो आणि सोमनाथवर उपचार न करता स्वत:चं घर बांधतो; सोमनाथ मरणारच आहे तर त्यावर उपचारापोटी उगाच खर्च कशाला करा, असा रामप्पाचा युक्तिवाद असतो.’ (वात्सल्य) चार हप्त्यात पैसे परत करीन असे आश्वासन देऊन गणपती हा इन्फोसिसकडून एक लाख रुपये गावातील पाणपोईसाठी नेतो. इमारतीचे उद्घाटन सुधा मूर्तींच्या हस्ते होते. त्यावेळी इन्फोसिसच्या ‘मदतीचा चेक’ म्हणून दहा हजार रुपये देतो व उरलेल्या ९५ हजार मध्ये पाणपोईचे काम झाले असे सांगतो. मात्र तेथील संगमरवरी शिलेवर ‘गावच्या प्रेमासाठी गणपतीकडून भेट’ असा मजकूर असतो. पैसा इन्फोसिसचा, श्रेय स्वत:ला असा प्रकार (देणगी). इन्फोसिस फाउंडेशनमुळे सुधा मूर्ती यांना सेलिब्रेटी स्टेट्स लाभलेली आहे. लोक सुधा मूर्ती यांना कार्यक्रमांना बोलावतात, फोटो वगैरे काढून घेतात; पण कधीकधी साध्या चहाचे वा जेवणाचेही आतिथ्य करायचे विसरतात. याचेही काही मजेदार नमुने ‘दुधारी सुरी’ मध्ये आले आहेत. सुधा मूर्ती यांच्या अनेक जुन्या-नव्या मैत्रिणींचे किस्सेही या पुस्तकात येतात. बोलकी राधा व अबोल शांत रोहिणी या त्यांच्या विद्यार्थिनी म्हणून हाताखालून गेल्यावर काही काळाने भेटतात, तेव्हा त्यातील रोहिणीमध्ये न्यूनगंडाची भावना प्रबळ दिसते; त्याबद्दलची कारणमिमांसा ‘निवडीचं’ स्वातंत्र्यामध्ये आलेली आहे. संपन्न ‘राधा, रोहिणीच्या मुलांसाठी भारी भेटी आणते तेव्हा ती आपल्याला हिणवते आहे, असे रोहिणीला वाटत राहते. सुधा मूर्ती तिला सल्ला देतात, ‘भेटीमागची भावना लक्षात घे. उगाच न्यूनगंड बाळगू नकोस. त्यामुळे तुझ्यात वा राधामध्ये दुरावा निर्माण होईल. सावित्री ही कॉलेजमधील सहकारी प्राध्यापिका. ती दुसऱ्याबद्दल कायम टीकात्मक बोलत असते. अफवा पसरवत असते. तेव्हा लेखिका तिला एकदा सांगते, ‘अशा अफवांमुळे कितीतरी कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. एखाद्या व्यक्तीच्या पाठीमागे तिच्याविषयी बोलणं, अफवा पसरवणं ही वाईट गोष्ट आहे. अशा व्यक्तींपासून लोक नेहमी चार हात दूर राहणं पसंत करतात. (गॉसिप)
आपली आजी अंबाबाई... अंबाक्का... हिनं गावात शंभरावर बाळंतपणं केली. त्यामुळे तिला लोक शंभर मुलांची माता म्हणत. आजी एकदा लेखिकेला म्हणते, ‘मला फक्त दहा मुलं झाली; पण या दोन हातांनी मी गावातल्या शंभरावर मुलांना जनम दिला आहे. अक्का, तू तुझ्या आयुष्यात तुझ्या पोटच्या कितीही मुलांना जन्म दे. पण तरीही तू सुद्धा शंभर मुलांची आई हो.’ या पुस्तकातील काही लेख हे पाकिस्तान, तिबेट, दक्षिण आफ्रिका, ब्लॅक फॉरेस्ट येथील भेटीच्या संदर्भातील आहेत. पाकिस्तानात अगदी भारतात असल्यासारखे वाटते. पण तेथील म्युझियमच्या प्रवेशासाठी शुल्क मात्र ‘परदेशी’ म्हणून भरमसाट घेतले जाते असा अनुभव त्या नमूद करतात.
सुधा मूर्ती यांच्या व्यक्तिमत्वातील प्रांजल, निरपेक्ष पैलूंमुळे त्यांच्या या अनुंभवांमध्ये वाचकांनाही सहजपणे सहभागी होता येते. त्यांच्या मैत्रिणी, त्यांचे प्रवास, त्यांचे इन्फोसिसमार्फत चाललेले कार्य, त्यांची समाजसेवा याबद्दल जाणून घेता आल्याने त्यांच्याबद्दलची जवळीक वाटते. त्यांच्या या लेखात अनेक सुविचार, सुभाषिते विखुरलेली आहेत. ती लक्ष वेधून घेतात. जो माणूस स्वत: असमाधानी असतो तो दुसऱ्याला कधीच आनंद देऊ शकत नाही. तुमचा दृष्टिकोन जर चांगला असेल तर तुम्ही स्वत:भोवती स्वर्ग निर्माण करू शकता... तुम्ही कुठेही असलात तरी!
माणसाचं सौंदर्य त्याच्या चेहऱ्यावर जे तेज असतं त्यातच असतं. ते काही दागिन्यांमध्ये नसतं. पैसा, संपत्ती या गोष्टी काळानुसार येतात, जातात. पण खरी घट्ट धरून ठेवायची असते ती मात्र मैत्री.
निरागसपणा हा माणसाच्या ठायी असणारा विश्वास आणि श्रद्धा यामुळे आलेला असतो. लहान मूल हे नेहमीच निरागस असतं. आपण मोठी माणसं अज्ञानी असलो तरी निरागस नसतो.
आपण स्वत: संकटांशी झुंजत असताना दुसऱ्याचा विचार करणारी माणसं या जगात विरळाच! इथे तुमचे शिक्षण, भाषा, जातपात, धर्म या कशाकशाचा संबंध नसतो. त्यासाठी हृदयात अपार करुणा असावी लागते. ही सर्व निरीक्षणे आपल्याला अंतर्मुख लागते. ही सर्व निरीक्षणे आपल्याला अंतर्मुख करतील, आपल्याला विशिष्ट कसोटीच्या वेळी मार्गदर्शन करतील. ‘पुण्यभूमी भारत’ मधील लेखांमुळे जीवनाच्या विविध पैलूंवर प्रकाश पडतो. सुधा मूर्ती यांच्या अनुभवविश्वात सहज प्रवेश मिळवून देणारे हे पुस्तक आहे.
संवेदलशील मनाची प्रचिती
MAHARASHTRA TIMES 26-11-2006सुधा मूर्ती यांची एकच एक ओळख नाही. इन्फोसिस फाऊंडेशनच्या माध्यमातून त्या समाजकार्य करतात, त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या आवडीने वाचल्या जातात, आता तर त्या मालिकांमध्येही काम करू लागल्या आहेत! त्यांचं मूळ लेखन इंग्रजीत असलं तरी त्याच्या अनुवादित पुस्तकांनाही वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळतो. अशाच त्यांच्या एका पुस्तकासंदर्भात...
अनुभवाची शिदोरी …
‘पुण्यभूमी भारत’ या पुस्तकात सुधा मूर्ती यांनी ‘इन्फोसिस’च्या माध्यमातून तसंच भटकंती करताना आलेल्या अनुभवांविषयी लिहिलं आहे. वेगवेगळ्या घटना आणि प्रसंग एका समान धाग्यात बांधले आहेत. इन्फोसिस फाऊंडेशनच्या निमित्ताने त्यांनी समाजातल्या वेगवेगळ्या स्तरातल्या लोकांशी संवाद साधला. त्यांच्यासाठी काम करताना अनेक चांगलेवाईट अनुभव त्यांच्या वाट्याला आले. त्यातले अनेक प्रसंग आपल्याला व्यथित तर कधी चकीत करतात.
मूर्ती यांच्या लेखनाचं वेगळेपण म्हणजे त्यांनी आपल्या अनुभवांचा बडेजाव न बाळगता ते स्पष्टपणे मांडलं आहे. कधी कधी वाईट अनुभवांमुळे त्या व्यथितही होतात, तर काही ठिकाणी तडजोड करतात. अशी तडजोड करणं ही गरजच होती, हेही त्या मान्य करतात. कदाचित त्यामुळेच या पुस्तकातले छोटे-छोटे प्रसंगही अत्यंत परिणामकारक ठरतात.
त्सुनामीग्रस्ताना मदत करणाऱ्या घटनांतून जगात काही चांगली आणि काही पोकळ डौल मिरवणारी माणंस आहेत, हे दिसून येतं. तर गरीब, झोपड्यांमध्ये राहणाऱ्यांची आभाळाएवढी मनं पाहायला मिळतात. तर श्रीमंतीत वाढणारी काही विचारी तर समाजाशी काही देणंघेणं नसलेली. माणसंही त्यांनी मांडलेल्या प्रसंगातून दिसून येतात. अगदी आपल्या मैत्रिणींच्या स्वभावातले गुणदोषही त्या एखाद्या घटनेच्या निमित्ताने लिहून जातात. त्यातून त्यांना, असंही वागणारी माणसं असतात बरं का, असंच जणू सांगायचं असतं. किंबहुना लोकांच्या अशा वागण्याला आपल्याकडे काहीच उत्तर नाही, त्यामुळे आपण आपलं काम करत जायला हवं, वेळप्रसंगी आपल्याला त्यांच्या विरोधात जावं लागलं तरी चालेल, असा पवित्रा त्या प्रत्येक प्रसंगातून मांडतात. काहींना हे प्रेरणादायी वाटेल तर काहींना आपल्याच मैत्रिणींचा केलेला उद्धारही वाटू शकेल. मूर्ती यांच्या पुस्तकातली पात्रं केवळ खरीच नाही तर वैशिष्ट्यपूर्ण आहेत. शिवाय अधूनमधून त्यांच्या अध्यात्मिक मतांना थोडक्यात वाट करून दिली आहे. केवळ कोणाच्या तरी भजनी लागण्यापेक्षा आपल्या देशवासियांची जमेल तशी सेवा करण्याचा मंत्र मात्र कोणी घेईल का, हाच प्रश्न आहे. अनुवादक लीना सोहोनी यांनी पुस्तकातल्या भाषेचा साधेपणा कायम ठेवला आहे, ही दखल घ्यावी अशी बाब आहे.
-अपर्णा पाटील
CHATRA PRABODHAN ANK MARCH 2008कु. आसावरी भूषण बापट
माणसाचं आयुष्य विविधरंगी, विविध पैलूंनी नटलेलं असतं. त्यात त्याला अनेक तिखट, गोड, कडू अनुभव येत असतात. त्यातले काही ‘just leave it’ या स्वरूपातले, तर काही मात्र बरंच काही शिकवून जाणारे. खरंतर जीवन ही एक शाळा आहे; तर नियती तिथली शिक्षिका!
सुधा मूर्ती हे नाव घेताच सगळ्यात आधी आठवतं ते ‘इन्फोसिस फाऊंडेशन’; पण जाणकार वाचक असेल तर मात्र या व्यक्तिमत्त्वाला हा एवढाच पैलू नाही हे लक्षात येतं. एक उत्कृष्ट - आई, शिक्षिका, गृहिणी, समाजसेविका, तसंच एक उत्तम लेखिका म्हणूनसुद्धा अनेक बरे-वाईट जे अनुभव आले ते अनुभवच त्यांनी या पुस्तकात संकलित केले आहेत. एवढ्या मोठ्या व्यक्तिलासुद्धा काय काय अनुभव येऊ शकतात ते खरेच वाचण्यासारखेच आहेत.
सत्य हे कल्पितापेक्षा किती चमत्कारिक असू शकतं? गरिबीमुळे अंध मुलीचं पालनपोषण करता न येणाऱ्या अगतिक मातेचं या कथेतील दर्शन वाचकासमोर अनेक प्रश्नं उभे करतं. केवळ जीवनाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन आपल्या आपण बदलला, तरी सभोवताली असलेल्या वातावरणात भरपूर फरक पडू शकतो. आपल्या असंतुष्ट वृत्तीमुळे आपल्याभोवती तसंच वातावरण निर्माण होतं. तर सकारात्मक दृष्टिकोनाने आपल्याभोवती स्वर्ग उभा राहू शकतो; हे ‘स्वर्गाची निर्मिती’ ही कथा वाचून नक्कीच पटेल. या पुस्तकाला प्रत्येक अनुभव खरा आहे. हे अनुभव म्हणजे नुसतं पुस्तकी तत्त्वज्ञान नाहीत. हे तर सुखी जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या उत्तम विचारांचं गाठोडंच !
‘इन्फोसिस फाऊंडेशन’ ही त्सुनामी, भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमध्ये मदत करणारी एक नावाजलेली संस्था म्हणून सुपरिचित आहे. ‘कोणालाही १००³ मदत करू नये. माणसाला आयुष्यात संघर्ष करण्यासाठी थोडी जागा ठेवावी.’ ही सुधा मूर्तीची आणि पर्यायाने या ट्रस्टची काही तत्त्वे. चांगली परिस्थिती असतानासुद्धा, आपलं काम फुकटात व्हावं म्हणून एखादा मनुष्य किती खालच्या पातळीला जाऊ शकतो, तसंच रोजी-रोटी कमवताना सुद्धा ज्याला अपार कष्ट पडतात असा मनुष्य काय काय करून या ट्रस्टला मदत करतो हे जाणून घ्यायचं असेल तर, ‘देणगी’ ही कथा वाचलीच पाहिजे.
बायकोच्या ऑपरेशनसाठी ५० हजार रुपयांची गरज असतानासुद्धा सुधा मूर्तींच्या ओळखीचा फायदा न घेता, ती रक्कम आपल्यापेक्षाही गरीब माणसाला मिळावी अशी इच्छा करणारा शेख आपल्याला ‘सलाम नमस्ते’ या कथेतनं भेटतो तर, स्वत:च्या नवऱ्याला लठ्ठ पगाराची नोकरी असतानासुद्धा आपल्या घरच्या मोलकरणीला ट्रस्टने मदत करावी अशा विचारांची ‘कोमला’ आपल्याला ‘निरागस’ या कथेतनं भेटते. यासारख्या कथा वाचताना मन खरोखरच हेलावून जातं ! एक समाजसेविका, लेखिका म्हणून समाजात वावरताना लेखिकेला अनेक माणसं भेटतात. या माणसांचा जीवनसंघर्ष, त्यांच्या आयुष्यात आलेले खडतर प्रसंग, त्यावर त्यांनी केलेली मात, कधी मानलेली हार... या सगळ्याचं प्रभावी चित्रण या पुस्तकात आहे.
एकूणच काय तर मानवी स्वभाव, त्याचे विविध रंग या पुस्तकातून प्रतिबिंबित झाले आहेत. दैनंदिन जीवनात येणाऱ्या अनुभवातून तर आपण शिकतच असतो; पण भगवंताने आपल्याला खूपच मर्यादित आयुष्य दिलंय. सगळेच अनुभव तर आपण घेऊ शकत नाही, तेव्हा निदान ‘पुण्यभूमी भारत’ हे पुस्तक वाचून तरी आपण आपल्या अनुभवांचं गाठोडं समृद्ध करूयात !