- Vijay Pawar
#मराठ्यांचं_स्वातंत्र्ययुद्ध
लेखक- डॉ.जयसिंगराव पवार
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाळात महाराष्ट्राने स्वराज्य स्थापनेचा सुवर्णकाळ अनुभवला , शुन्यातून सुरुवात करुन जगभरातील इतिहासकारांना दखल घ्यायला भाग पाडणार्या दैदिप्यमान स्वराज्याचा गाडा डौलाने चालत होता पण अचानक नजर लागावी त्याप्रमाणे शिवाजी महाराज गेले आणि स्वराज्य पोरकं झालं , पण म्हणतात ना कार्यकर्तृत्वाचा वारसा हा एका पिढीतून दुसर्या पिढीत आपोआप जातो त्याप्रमाणेच थोरल्या महाराजानंतर एका वादळाच्या हाती स्वराज्याची कमान आली , एक कुटुंबप्रमुख , एक राज्यकर्ता , एक पालक म्हणून रयतेचा सांभाळ करणारे स्वराज्याचे दुसरे छत्रपती शंभुराजांनी अलौकिक कारकिर्दीने स्वराज्याला सर्वोच्च स्थानी पोचवलं , महाराजानंतर स्वराज्य तेवढ्याच ताकदीनं सांभाळलं , वाढवलं ! पण अवघ्या काही वर्षातच महाराष्ट्राला पुन्हा ग्रहण लागलं छत्रपती संभाजीराजांचा फितुरांनी घात केला आणि औरंगजेबाने महाराजांना कैद करुन अनन्वित छळ करत मृत्युलाही लाजवेल अशा दुर्दैवी पद्धतीने स्वराज्याच्या धाकल्या धन्याचा खून केला, शंभुराजांच्या वादळी कारकिर्दीत इतिहासाच्या पानापानांना अमरत्व बहाल केलं .
छत्रपती संभाजी राजांच्या दुर्दैवी मृत्यूपासून ते औरंगजेबाच्या अंतापर्यंतच्या धगधगत्या अग्नीकुंडाची पुराव्यानिशी केलेली उकल म्हणजे डॉ.जयसिंगराव पवारांचं #मराठ्यांचं_स्वातंत्र्ययुद्ध` हे पुस्तक !
शंभुराजांच्या बलिदानानंतर महाराष्ट्रात माजलेली अनागोंदी मोडीत काढत महाराणी येसूबाई बाईसाहेबांनी अमोल त्याग करत स्वराज्याचा अमृतकलश राजाराम महाराजांच्या हाती सोपवला , त्यावेळी झालेली `मराठ्यांची मसलत` लेखकाने पुराव्यानिशी मांडली आहे. सुर्याजी पिसाळाची अतुलनीय अशी गद्दारी रायगडाने अनुभवली , लेखकाने हा प्रसंग जिताजागता उभा केला आहे. सुर्याजी पिसाळाची पुराव्यानिशी चिकीत्सा यापूर्वी निश्चीतच कधी झाली नसेल .
राजाराम महाराजांचा जिंजी प्रवास , रायगडाने दिलेली लढत , महाराणी येसुबाई साहेबांची निर्णयक्षमता , स्वराज्यापुढे वैयक्तिक भावभावनेला दिलेली मूठमाती , बाळ शाहूराजांसह औरंगजेबाच्या कैदेतील काळ , जिवंत उभा केला आहे लेखकाने. अरजोजी गिरजोजी यादवांचा खटला , नागोजी मानेंचा स्वार्थीपणा , धनाजी संताजीच्या सुवर्णीय कारकिर्दीची वाटचाल , राजाराम महाराजांच्या कारकिर्दीतील पडद्याआड राहिलेल्या अमूल्य घटना ,राजकारण सारं काही डोळ्यासमोर घडतंय याचीच अनुभूती लेखकाच्या प्रत्येक वाक्यातून होते. संताजी धनाजींचा वाद , त्यातून स्वार्थी लोकांनी साधलेली वेळ, संताजी आणि राजाराम महाराज यांच्यात आलेले वितुष्ट त्यातूनच राजाराम महाराजाविरुद्ध संताजीने लढलेले युद्ध त्यातील महाराजांचा झालेला पराभव आणि त्यानंतर संताजीची झालेली मनस्थिती तसेच संताजी घोरपड्यांचा दुर्दैवी खून यावर लेखकाने केलेला उहापोह मनाला चटका लावून जातो. जिंजीला सात वर्षे दिलेला झुल्फिकारखानाचा वेढा त्यातून सुटून राजाराम महाराजांनी महाराष्ट्रात केलेला प्रवास आणि सिंहगडावर झालेल्या राजाराम महाराजांच्या अकस्मात मृत्यूनंतर राजा कर्णाच्या कहानीचा केलेला उहापोह वाचकांना नवी दृष्टी देतो. राजारामपुत्र द्वितीय शिवाजीराजे यांना गादीवर बसवून महाराणी ताराबाईसाहेबांचं राजकारण, धगधगती कर्तृत्व शैली , याचकाळात उफाळून आलेल्या तोतया शाहूराजांचा बिमोड , थोरल्या शाहूराजांची सुटका, त्यानंतर झालेली मराठा गादींची शकलं , या घटना पुराव्यानिशी लेखकाने मांडून त्यावेळची महाराष्ट्राची परिस्थिती जिवंत करून दाखवली. भद्रकाली ताराराणींच्या कारकीर्दीत स्वराज्याला मिळालेली नवसंजीवनी प्रत्येक मावळ्याच्या ह्रदयात मशाल पेटवून गेली आणि उभ्या महाराष्ट्राच्या तीन पिढ्यांना नडणार्या औरंग्याला इथंच कबर खोदावी लागली. शिवरायांनी स्थापन केलेल्या आणि वाढवलेल्या स्वराज्याला राजारामकाळात नर्मदेच्या पार पोचवण्यात आणि ताराराणी काळात तापीपार पोचवण्यात मराठा मावळ्यांना यश आले होते. मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध केवळ साम्राज्य वृद्धीसाठी नव्हते तर दीर्घकाळ चाललेली ती एक अस्मितेची लढाई होती. शिवशाही किंवा मराठ्यांचा इतिहास केवळ छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या कारकिर्दीएवढाच नाही तर त्यानंतरच्या इतिहासाची पुराव्यानिशी सांगोपांग चर्चा या पुस्तकाच्या माध्यमातून होते आणि इतिहास वाचकांना पुढच्या घडामोडींची ओळख या पुस्तकाच्या माध्यमातून होते.
- Rahul Kanakdande
छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर मराठा साम्राज्य घशात घालायला आलेल्या औरंगझेबाला 25 वर्ष लढून मराठ्यांनी महाराष्ट्रातच गाडले, आधी राजाराम महाराज,मग त्यांच्या पत्नी ताराराणी यांच्या नेतृत्वात संताजी घोरपडे, धनाजी जाधव , रामचंद्रपंत अमात्य आणि बाकी सर्व सरदार कसे लढले त्या काळातील उपलब्ध पत्रांच्या आधारे डॉ जयसिंगराव पवार यांचे `मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध` हे पुस्तक नक्की वाचा
- Prashant Patil
मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध
- डॉ जयसिंगराव पवार
शिवछत्रपतींच्या निधनानंतर आलमगीर बादशहा आपल्या अवाढव्य सेना सामर्थ्यानिशी हिंदवी स्वराज्य कायमचे उखडून टाकण्यासाठी दख्खनेत उतरला. या प्रचंड अशा मोगली वावटळी मध्ये कुतुबशाही आणि आदिलशाही पालापाचोळा सारख्या उडाल्या. पण मराठ्यांनी मात्र शिवरायांनी स्थापलेल्या स्वराज्याच्या रक्षणासाठी प्रयत्नांची शर्थ केली. छत्रपती शंभुराजे, छत्रपती राजाराम व ताराबाई साहेब यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी तब्बल पंचवीस वर्ष लढा देऊन मोगल साम्राज्य खिळखिळे केले. औरंगजेबाला चिरविश्रांती घेण्यासाठी इथल्याच मातीत जागा शोधावी लागली.
छत्रपती शिवरायांची स्वराज्य स्थापना व शंभूराजांचे बलिदान या तेजस्वी इतिहास समोर मराठ्यांचा हा लढा तसा झाकोळून जातो. प्रस्तुत पुस्तक हे याच कालखंडावर प्रकाश टाकते. पुस्तकात या लढ्याचा समग्र व सलग इतिहास मांडला नसून यातील महत्त्वाच्या घटनांवरचे स्फुट लेख आहेत.
राजधानी रायगडचा पाडाव व त्यात सूर्याजी पिसाळ ची भूमिका; छत्रपती राजारामांचा जिंजी पर्यंतचा रोमहर्षक प्रवास; संताजी, धनाजी, रामचंद्रपंत व शंकराजी नारायण यांनी एकत्र येऊन केलेला सर्जाखानाचा दारुण पराभव; संताजी घोरपडे यांची शोकांतिका; मराठ्यांची दिल्ली जिंकण्याची महत्त्वाकांक्षा इत्यादी बऱ्याच विषयावरती रोचक माहिती या पुस्तकात वाचावयास मिळते.
साधारण दोनशे पानांचे हे पुस्तक इतिहासप्रेमींना एका महत्त्वाच्या कालखंडाचा परिचय करून देते.
- Chetan Jivarak
हे पुस्तक आज वाचून झालं खूप छान डॉ. जयसिंगराव पवार यांनी हे पुस्तक लिहल आहॆ.
या पुस्तकात छत्रपती राजाराम महाराज , महाराणी ताराबाई यांनी दिलेला मोगलांशी लढा याच सविस्तर वर्णन केले आहॆ
छत्रपती संभाजी महाराजचा हत्या नंतर 26 ते 27 वर्ष या भूमीत औरंगजेब ला गनिमी काव्याचा युद्ध नीती ने छत्रपती राजाराम महाराज व महाराणी ताराबाई यांनी लढा देत राहिला.
छत्रपती राजाराम महाराज यांची
पहिली राणी जानकीबाई (सरसेनापती प्रतापराव गुजर याची कन्या)
दुसरा राणी ताराबाई (सरसेनापती हंबीरराव मोहिते याची कन्या)
तिसरी राणी राजसबाई
व संभाजी महाराज राणी येसूबाई व मुलगा शाहू महाराज हे रायगड वर होते जेव्हा संभाजी महाराज कैद केली व पुढे बादशाही कैदेतच हत्या केली . दरम्यान, रायगडवर राणी येसूबाई यांनी राजाराम महाराज यांना सिंहासनारुड केले व स्वराज्यचे नवे छत्रपती घोषित केले .
रायगड ला मोगलांनी वेढा दिला या वेढ्यातून राजाराम महाराज व ते त्याचा सहकार्ऱ्यानीशी गुप्तपणे बाहेर पडले त्यांचा बरोबर त्याचा पत्नी ताराबाई व राजसबाई या दोघी रायगडाबाहेर पडला .
राजाराम महाराज पन्हाळा गडावरून जिजीकडे पलायन केले
व पुढील 8 वर्ष स्वराज्यची राजधानी जिजी होती
रायगडच्या पाडावानंतर राणी येसूबाई व मुलगा शाहू आणि राजाराम महाराज पहिली राणी जानकीबाई हे मोगलांच्या कैदी बनुन बादशाही छावणीत गेल्या .
जिजीवरून महाराजांनी स्वराज्याची कामे 8ते 9 वर्ष बघितली
त्यानंतर राजाराम महाराज पुन्हा स्वराज्यात आले पन्हाळा - विशाळगडास आले
राजाराम महाराज स्वराज्यात आल्यावर राजधानी ही सातारा झाली
साताऱ्याच्या तुलनेने विशाळगड हा फार सुरक्षित होता महाराजांनी आपला कुटुंब ला विशाळगड वर हलवले
राजाराम महाराजाचा अकाली मृत्यू झाला त्यावेळेस त्याचे वय अवघे 30 वर्ष चे होते
आता परत स्वराज्याची दशा ना छत्रपती ना राजा झाली होती त्यात वैधव्याचे दुःख बाजूस ठेवून ताराबाईंनी मराठ्यांच्या गादीवर आपला पुत्र शिवाजीराजे यास बसविले
व लष्करी मोहिमेची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली
महाराणी ताराबाई ने पुढे मोगलांशी 7/8 वर्ष आपल्या नेतृत्वाखाली संघर्षं देत राहिला
महाराणी ताराबाई च्या कालखंडात मराठे नर्मदा ओलांडून मावळव्यात स्वारी करून खंडण्या वसूल लागले
औरंगजेब 27 वर्ष स्वराज्यात लढ्यात राहिला पण त्याला हे स्वराज काबीज करता आलं नाही कारण हे स्वराज्य कोणी राजाच नव्हत हे स्वराज्य या रयतेचा होत
27 वर्ष चा युद्धाचा कालखंडात मराठ्यांचा राज्यात अशा तीन कारकिर्दी झाला :1 संभाजी कारकीर्द 2 राजाराम कारकीर्द 3 ताराबाई कारकीर्द यांनी औरंगजेब सघे युद्ध केले पण त्याला स्वराज्य पूर्ण काबीज करू दिले नाही
ताराबाई चा नेतृत्वाखाली मराठ्याने माळवा ,गुजरात,कर्नाटक इ सुभ्यावर राजरोस प्रहार चालू ठेवला
दिल्लीपती औरंगजेब बादशाह शेवटी याच महाराष्ट्रचा मातीत त्याने जगाचा निरोप घेतला
- Sandeep Chavan
१६८१ ते १७०७ या कालखंडात घडलेल्या मराठा-मोगल संघर्षातील महत्वाच्या घटनांचा ज्येष्ठ इतिहाससंशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी घेतलेला शोध म्हणजे ‘मराठयांचे स्वातंत्र्ययुद्ध’ हा ऐतिहासिक ग्रंथ होय.
या ग्रंथात आपण वाचाल...
१)रायगडाचा पाडाव : एक दु:खद संकट पर्व
२)सूर्याजी पिसाळ आणि वाईची देशमुखी
३)राजाराम महाराजांचा जिंजीचा प्रवास
४)सन १६८९ची मराठ्यांची मसलत आणि मनुची‚ मार्टिन व बेंद्रे
५)मराठ्यांची जंगी मोहीम : सर्जाखानाचा पाडाव
६) दिल्ली जिंकण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणारा मराठा राजा छत्रपती
७)राजाराम ताराबाई-राजसबाई जिंजीस केव्हा पोहोचल्या?
८)सेनापती संताजी घोरपड्याचा खून : मराठेशाहीतील एक शोकान्तिका
९)संताजीच्या शोकांतिकेस जबाबदार कोण?
१०)राजा कर्ण छत्रपतींच्या गादीवर बसला काय?
११)औरंगजेबाचा सज्जनगडाचा वेढा आणि महाराणी ताराबाईंचे एक अप्रकाशित पत्र
१२)स्वातंत्र्ययुद्धाच्या कालखंडातील सरदार पाटणकर घराण्याची तेजस्वी कामगिरी
१३)ताराबाई रामराणी । भद्रकाली कोपली!
१४)मराठ्यांच्या स्वातंत्र्ययुद्धाचा शोध आणि बोध
एकूण चौदा प्रकरणात विभागलेला व शिवरायांच्या निधनानंतर ते औरंगजेबाच्या अंतापर्यंतच्या महत्वाच्या घटनांवर पुराव्यानिशी प्रकाश टाकणारा हा ग्रंथ आहे. इतिहास प्रेमींनी आणि ज्यांना ज्यांना छत्रपती संभाजीराजांच्या हत्येनंतर घडलेले ‘महाराष्ट्राचे महाभारत’ जाणून घ्यायचे आहे अशा सर्वांनी संग्रही ठेवण्यासारखा असणारा हा ग्रंथ एकदातरी नक्कीच वाचावा.
- Sagar Sawant
Great book written by jaysingrao pawar, important topics covered which gives clear information about. , "what happened after death of shri chatrapti Sambhaji maharaj "
"How maratha swarajya never defeted by Aurangzeb "