- DAINIK AIKYA 17-04-2005
सोप्या भाषेतील विज्ञानबोध...
विज्ञानप्रपंच या पुस्तकातील लेखांच्या वैज्ञानिक गप्पांमधून अनेक विषयांवर प्रकाश पडतो. आपल्या चाळीशीतल्या मावस बहिणीचं मिसकॅरेज झाल्यामुळं उद्विग्न झालेल्या वहिनीला भावजी अपत्य संभवाची शास्त्रीय माहिती सांगतात.
या विज्ञानप्रपंचात चर्चेसाठी घेतलेले विषयही विविध आहेत. त्यांची ही वानगी बघा.
कोकिळा आपली अंडी स्वत: न उबवता दुसऱ्याच कोणत्या तरी पक्ष्याच्या घरट्यात ठेवून देतात आणि ती उबवण्याचं काम त्या दुसऱ्या पक्ष्याकडून आयतं करून घेतात. युरोपातल्या कोकिळा अकरा निरनिराळ्या पक्ष्यांच्या प्रजातीचा यासाठी वापर करतात. आपल्या अंड्याचा आकार, घाट, रंग, कवचाचा टणकपणा हा त्या दुसऱ्या पक्ष्याच्या अंड्याशी बेमालूम मिळताजुळता असावा याची दक्षता कोकिळा घेते. याला ‘एग मिमिक्री’ म्हणतात. त्यासाठी कोकिळा आपल्यासारखीच अंडी घालणाऱ्या पक्ष्याच्या घरट्यांचा शोध घेत असतात. एखाद्या गायडेड मिसाईलसारखे ते पक्षी बरोबर पोहोचतात.
- DAINIK SAMANA 30-07-2006
विज्ञानाची भूक भागवणारं पुस्तक...
डॉ. फोंडकेंची भाषाही अत्यंत समृद्ध आहे. व्यसनाची तलफमधल्या ‘रासायनिक कातऱ्या’ असोत किंवा ‘दाटी आणि कोंडी’ मधला ‘वायुसारखे मनमौजी’ हा शब्दप्रयोग असो, फोंडके प्रत्येक गोष्ट अगदी नेमक्या शब्दात पकडतात. उदाहरणेसुद्धा इतकी छान की मुद्दा पटकन कळावा, झटकन पाहावा. ‘अनमान धपका’, ‘वाण’ यांसारखे थोडेसे मागे पडलेले शब्दही त्यांनी अनेकदा वापरले आहेत.
पुस्तकाचं मुखपृष्ठही पुस्तकाचं नेमकं स्वरूप उलगडून सांगणारं आहे. मेहता पब्लिशिंग हाऊसने ते सुरेख छापले आहे. त्यांचे पूर्ण मार्क अनुक्रमे चंद्रमोहन कुलकर्णी व सुनील मेहता यांना द्यायलाच हवेत.
एकंदरीत हे पुस्तक इतकं सुरेख जमलं आहे की विज्ञानावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक वाचकाने ते वाचावं, संग्रही ठेवावं आणि आपली विज्ञान जिज्ञासा पुरी केल्याबद्दल डॉ. बाळ फोंडकेंना धन्यवाद द्यावेत.
-डॉ. सतीश नाईक
- DAINIK SAKAL 17-07-2005
वैज्ञानिक शंकांचे निरसन...
डॉ. फोंडके यांनी आपल्या रोजच्या जिव्हाळ्याच्या अनेक प्रश्नांना स्पर्श केलेला असून, पुस्तक वाचताना वाचकाला कुठेही कंटाळा येणार नाही, अशा तऱ्हेने अनेक नाजूक आणि अवघड विषयसुद्धा सहजतेने हाताळले आहेत. पुस्तकाचे मुखपृष्ठही आकर्षक असून, ते पुस्तकातील विषयांचा आशय स्पष्ट करते. याबद्दल चित्रकार चंद्रमोहन कुलकणी अभिनंदनास पात्र आहेत.
-निरंजन घाटे
- DAINIK TARUN BHARAT 20-03-2005
हसत खेळत विज्ञान गप्पा...
डॉ. बाळ फोंडके यांच्या ‘विज्ञान प्रपंच’ या पुस्तकात विविध विज्ञान विषयांचा प्रत्ययकारी अनुभव प्रत्येक श्रुतिका वाचताना सहजपणे होतो. विज्ञानाच्या नित्यनूतन आविष्कारांचा प्रभाव आपल्या दैनंदिन जीवनावर पडू लागला. विज्ञान म्हणजे दूर कोट्यवधी कोस दूर अंतराळात असलेल्या ग्रहगोलांवर घडणाऱ्या घटनांचं क्लिष्ट विश्लेषण किंवा शक्तिमान सूक्ष्मदर्शकांची मदत मिळूनही न दिसणाऱ्या अणुरेणूंच्या अंतरंगात उठणाऱ्या तरंगांची तेवढीच किचकट चिकित्सा असं न राहता विज्ञान म्हणजे आपल्यावर प्रभाव टाकणारे अनेक प्रश्न निर्माण करणारे व त्याच्याच अंगाने त्या प्रश्नांची उकल करणारे असे विज्ञान झाले आहे. मनुष्य विज्ञानाचा असाही अर्थ काढतो आणि हाच धागा डॉ. बाळ फोंडके यांनी प्रत्येक श्रुतिकेचे लेखन करताना लक्षात घेतला आहे.
-एकनाथ आव्हाड
- MADHURA 20-04-2005
विज्ञानाच्या घोडदौडीपायी जीवनाच्या साऱ्या अंगांचंच रूपडं पार पालटून गेलं. आपल्या रोजम्र्ह्याच्या आयुष्यातल्या अनेक पैलूंवर प्रभाव टाकणारे आणि तरीही अनाकलनीय वाटणारे अनेक विज्ञान प्रवाहांचे पडसाद आपल्या जीवनात उमटू लागले. त्या अनुषंगाने येणारे विविध प्रश्न मनात पिंगा घालू लागले. म्हणूनच टेकाडेभावजी या पात्राने त्या विविध प्रश्नांचा उकल विज्ञानाच्या अंगाने गप्पा मारता मारता ‘विज्ञान प्रपंच’ या पुस्तकातील प्रत्येक श्रुतिकेतून केला. प्रत्येक श्रुतिकेतील दिलखुलास कौटुंबिक चर्चा अगदी खरी वाटते. घरातली वाटते. विविध विज्ञान विषयांचा मार्मिक, प्रत्ययकारी अनुभव सहजतेने करून देण्याचा लेखक डॉ. बाळ फोंडके यांचा हा प्रयास चांगलाच जमून आलेला आहे, हे विशेष.
-एकनाथ आव्हाड, चेंबूर