- राजश्री गायकवाड साळगे
डाॅ. उमा कुलकर्णी यांची अनेक अनुवादित पुस्तके वाचल्यानंतर त्यांचे `संवादु अनुवादु` हे आत्मकथन वाचण्याची तीव्र इच्छा होती. पुस्तक हातात पडले नि मुखपृष्ठावरील लेखिकेच्या निरागस चेहऱ्याप्रमाणेच त्यांच्या मनाची निरागसता पुस्तकभर जाणवत राहिली. अतिशय समर्पक शीर्षक असलेल्या या आत्मकथनात प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे लेखिकेला असलेली साहित्याविषयीची उपजत जाण व प्रेम . म्हणूनच कदाचित त्यांचे जीवन साहित्यमय होऊन गेले असावे. `संवादु अनुवादु` या आत्मकथनाचे वैशिष्ट्य म्हणजे लेखिकेची संयतशैली. दुसऱ्याला सहज मोठेपण देणाऱ्या या अनुवादिकेला मूळ लेखकांइतकीच लोकप्रियता लाभली. जवळपास पंचावन्नपेक्षा जास्त पुस्तकांचा अनुवाद करून सलग साडेतीन दशके त्या सर्जनशील अशा अनुवाद क्षेत्रात रमल्या. बेळगावातील परंपरावादी घरात उमा कुलकर्णी यांचे बालपण गेले. बालपणापासूनच कला, संगीत व वाचनाची त्यांना मनस्वी आवड. लग्नानंतर पती विरूपाक्ष कुलकर्णी यांच्या नोकरीनिमित्त त्यांच्यासोबत त्या पुण्यात आल्या. पुण्याच्या शहरी वातावरणात त्यांच्या सहजीवनाला सुरुवात झाली. रोज संध्याकाळी फिरायला जाण्याच्या नेमातून झालेल्या गप्पांमधून त्यांना एकमेकांच्या साहित्यप्रेमाची कुणकुण लागली. विरूपाक्ष यांना कन्नड साहित्य वाचण्याची विशेष आवड. कोणतेही पुस्तक वाचले की त्यातील कथानक पत्नीला रंगवून सांगणे हा त्यांचा शिरस्ता. उमा कुलकर्णी यांच्या अनुवाद लेखनाची सुरुवातही काहीशी गंमतीशीरच झाली. प्रसिद्ध कन्नड साहित्यिक डाॅ. शिवराम कारंत यांच्या `मुकज्जीची स्वप्ने` या ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कादंबरीविषयी विरूपाक्ष सांगत असताना उमा यांनी त्यांना कादंबरी वाचून दाखवायचा आग्रह धरला व स्वतःला समजावी यासाठी त्या ती मराठीत लिहू लागल्या. अशाप्रकारे त्यांचा पहिला अनुवाद लिहून झाला! स्वतःला समजावे यासाठी कन्नड कादंबरीचा केलेला मराठी अनुवाद, त्यानंतर ती कादंबरी इतरांपर्यंत पोचवण्यासाठी केलेला अनुवाद व पुढे जीवनाचा अविभाज्य व अपरिहार्य भाग म्हणून केलेला अनुवाद, असा त्यांचा अनुवादलेखनाचा विलक्षण असा प्रवास! विरूपाक्ष कुलकर्णी मराठी भाषेतील उत्तमोत्तम साहित्याचे कन्नडमध्ये तर उमा कुलकर्णी कन्नडमधील साहित्य मराठीत अनुवादित करीत असत. दोघेही अनुवादाच्या दुनियेत इतके रममाण झाले की साहित्य व अनुवाद हा त्यांच्या सहजीवनाचा जणू साथीदार झाला. अनुवादलेखन करत असताना पत्नीच्या नावाने कन्नड लेखकांशी पत्रव्यवहार करणे, त्यांना कानडी भाषा येत नसल्यामुळे रोज पुस्तकाची काही पाने वाचून दाखवणे, ते रेकॉर्ड करून ठेवणे, एखादवेळी एखादा कन्नड शब्द अडला तर तो शब्दकोशात बघून त्याचा अर्थ शोधून ठेवणे या गोष्टी विरूपाक्ष आवडीने करीत. जीवनाच्या जोडीदाराच्या वयाचे मोठेपण मान्य केल्यावर त्यांनीही वयाने लहान असलेल्या आपल्या पत्नीचे लाड पुरवणे (दोघांमध्ये दहा- साडेदहा वर्षांचे अंतर) हे त्यांच्या समंजस सहजीवनाचे गुपित. संध्याकाळी नित्यनियमाने फिरायला जाणे, साहित्यिक कार्यक्रमांना आवर्जून हजेरी लावणे व समाजकारण, राजकारण यांसारख्या विषयांवर मोकळेपणानेे गप्पा मारणे यातून त्यांच्यातील वैचारिक वीण घट्ट होत गेली. कधी कधी या गप्पांमधूनच लेखकाच्या वाक्यांमधला दडलेला अर्थही त्यांना उमगत गेला. दिवसातील जास्तीत जास्त वेळ लिखाणात घालवणे हा या लेखक दाम्पत्याचा आवडता छंद. लिखाणाला पुरेसा वेळ मिळावा म्हणून विरुपाक्ष यांनी नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेणे ही बाब अजबच. निवृत्तीनंतर सकाळच्या चहा व नाश्त्याची जबाबदारी त्यांनी घेतल्यामुळे रात्रीच्या शांत झोपेनंतर लेखिकेला सर्जनशील लेखनासाठी सकाळचा मिळालेला वेळ महत्वाचा ठरत असे. डाॅ. शिवराम कारंत यांच्या कांदबरीपासून सुरू झालेला अनुवादलेखनाचा प्रवास एस. एल. भैरप्पा, यु.आर.अनंतमूर्ती, पूर्णचंद्र तेजस्वी, गिरीश कर्नाड, सुधा मूर्ती आणि अगदी अलीकडच्या काळातील वैदेही यांच्यापर्यंत अगदी सहजतेने झाला. कोणत्याही कलाकृतीचा अनुवाद करत असताना अनुवादिका, `त्या लेखकाच्या विचारधारेचे बोट धरून काही पावले पुढे गेलो की नाही`, एवढाच विचार करतात. एक उत्तम वाचक या नात्याने त्या वाचकांच्या बाजूच्या अनुवादिका आहेत. अनुवादात्मक लेखनातून आनंद मिळवणे हेच या लेखकद्वयीचे जीवनध्येय. म्हणूनच सलग साडेतीन दशके लेखिका अनुवादासारख्या वेगळ्या क्षेत्रात रमू शकल्या. पतीच्या आग्रहाखातर त्या कन्नड भाषा शिकल्या. सुरुवातीला वाटणारी धाकधूक आणि नंतर हळूहळू मनातील भीती जाऊन जिभेवर रूळलेली कानडी भाषा त्यांना अनुवादासाठी उपयुक्त ठरली. या लेखनाच्या निमित्ताने कन्नड साहित्यिकांसह मराठीतील प्रसिद्ध साहित्यिक व विचारवंत यांच्याशीही त्यांचे स्नेहबंध जुळले. सुधाकर देशपांडे, डाॅ. द. दि. पुंडे, पु. ल. देशपांडे, कमल देसाई, अनिल अवचट, कविता महाजन यांचा साहित्यिक व कौटुंबिक सहवास त्यांना लाभला. या आत्मकथनात आत्मप्रौढी, कटुता वा दुराग्रह नाही. उलट अतिशय नितळपणा, मोकळेपणा व पारदर्शकता आहे. मिळालेल्या पुरस्काराने झालेला आनंद उमा कुलकर्णी अगदी निरागसतेने व्यक्त करतात. पण त्याचवेळी मूळ लेखकापेक्षा अनुवादकाला दिले जाणारे दुय्यम स्थान व समीक्षकांनी `अनुवाद` या साहित्य प्रकाराकडे केलेले जाणीवपूर्वक दुर्लक्ष, ही खंत मात्र त्या व्यक्त करतात. त्यांच्या मते `अनुवादकाला साहित्याची जाण असणं आवश्यक आहे. त्याला वेगळ्या प्रकारची साहित्यिक दृष्टी असणं गरजेचं आहे. ही दृष्टी समीक्षकापेक्षा वेगळी असली पाहिजे. त्यात कलाकृतीविषयीचं ममत्व आवश्यक आहे.` याच ममत्वाने त्या लिहीत राहिल्या. त्यामुळेच कदाचित लेखकाला वा त्याच्या कलाकृतीला त्यांनी कोणतेही प्रश्न विचारले नाहीत. म्हणूनच देव- धर्माची कल्पना, सामाजिक विकृतीसंदर्भातील भाष्य, स्त्री सामर्थ्याबाबत प्रश्नचिन्ह वा सामाजिक क्लिष्टता यासंदर्भातील संबंधित लेखकांच्या मतमतांतरांमुळे लेखिकेची मते कठोर वा कडवट झाली नाहीत. उलट निःपक्षपातीपणे ती त्या मांडत राहिल्या आणि एका वेगळ्या प्रकारचा सर्जनात्मक आनंद स्वतःबरोबर वाचकांनाही मिळवून देत गेल्या. आत्मकथन वाचताना एक उणीव जाणवते ती म्हणजे अनेक प्रसिद्ध साहित्यिकांच्या अनुभव कथनासोबत प्रसंगानुरूप त्यांची काही छायाचित्रे पुस्तकात असती तर वाचकांसाठी ती पर्वणी ठरली असती. उमा कुलकर्णी या स्वतः उत्तम चित्रकारही आहेत. या सर्जनशील छंदाविषयी व त्यातील निर्मितीच्या अनुभवाविषयी त्यांनी थोडे सविस्तर लिहिले असते तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील आणखी एका विलोभनीय पैलूची वाचकांना ओळख झाली असती. साध्या, सरळ निवेदन शैलीतील या आत्मकथनातून त्यांनी अनुवादकलेचे अनेक पैलू वाचकांपुढे उलगडले आहेत. सुधा मूर्ती यांच्या कलाकृतीचा अनुवाद करताना त्या म्हणतात की, `स्त्रियांचे लेखन हा चिंतेचा नसून चिंतनाचा विषय आहे.` हे चिंतन समजून घेण्यासाठी व पुन्हा एकदा स्वतःशी आंतरिक संवाद साधण्यासाठी सर्वांनीच जरूर वाचावे, असे हे कथन आहे. धन्यवाद.
- विद्या मक्तल
स्त्रियांची आत्मचरित्रे मराठी साहित्याचा अनमोल ठेवा आहे. प्रसिद्ध अनुवादक उमा कुलकर्णी त्यांनी `संवादु - अनुवादु` हे आत्मकथन लिहून त्यात मोलाची भर घातली आहे. परत एकदा लक्ष्मीबाई टिळकांच्या `स्मृतिचरित्रे` ची आठवण करून देणारे प्रांजळ, प्रामाणिक, पारदर्शी, प्रवाही, असे पुस्तक आहे.
पंचधाराच्या वाचकांसाठी उमा कुलकर्णी हे नाव नवीन नाही. ह्यापूर्वी के. पी. पूर्णचंद्र तेज ह्या कन्नड लेखकांची उमाताईंनी अनुवादित केलेली `कार्वालो` ही कादंबरी पंचधारातून प्रकाशित झाली होती. विशेष म्हणजे कै. द. प. जोशींनीच त्यांना हि कादंबरी अनुवादासाठी पाठवली होती. पुढे गिरीश कार्नाडांशी त्यांचा परिचय होण्यासाठी कै. द. प. जोशीच कारणीभूत झाले होते. उमाताईंचे पती श्री. विरुपाक्ष कुलकर्णी ह्यांनीही ज्ञानपीठ विजेते श्री. शिवराम कारंथ ह्यांची कानडी मुलाखात मराठीत अनुवाद करून पंचधारासाठी उपलब्ध करून दिली होती. एवढेच नाही तर हॆद्राबाद मराठी साहित्य परिषदेने आयोजित केलेल्या `अनुवादा` वर आधारित एका चर्चासत्रासाठी उमाताईंच्या पर्व आणि `कार्वालो` ह्या दोन अनुवादित कादंबऱ्यांवर चर्चा झाली होती आणि ह्या सर्व गोष्टींचा उल्लेख उमाताईंनी ह्या पुस्तकात आवर्जून केला आहे.
उमाताईंनी पुस्तकाच्या मनोगतात म्हटले आहे की, "माझ्या अनुवादांपासून माझे जीवन मला वेगळे करता येणार नाही." आणि खरोखरच हे पुस्तक म्हणजे त्यांच्या फक्त कौटुंबिक जीवन प्रवासाचे कथन नाही तर त्यांनी केलेल्या समृद्ध, संपन्न विपुल अशा `अनुवादांच्या` प्रवासाचे पण कथन आहे. त्यांचे सुविद्य पती श्री. विरुपाक्ष कुलकर्णी ह्यांच्या प्रेरणेने व मदतीने उमाताईंनी वाङमयाच्या क्षेत्रातील अनुवादांची वाटचाल केली. त्या उभय पतीपत्नींनी एकमेकांच्या ज्ञानाचा, मतांचा व आवडीनिवडीचा विचार व आदर ठेवून केलेला शांत, सुखी, समाधानी संसार आणि कौटुंबिक जीवन प्रवास ह्या दोन्हींचे लालित्यपूर्ण शैलीत केलेले आत्मकथनपर लेखन म्हणजे `संवादु-अनुवादु` हे पुस्तक होय.
सुरुवातीला बेळगावातील बालपण ते लग्नापर्यंतचा काळ म्हणजे रम्य ते बालपण म्हणावे असेच दिवस होते. आईवडिलांची प्रेमळ शिस्त व सुसंसार बहीण -भावंडांशी घट्ट नाते,आत्या, मावशी, काका, काकू व इतर नातेवाईकांचा सुखद सहवास, मैत्रिणींची निखळ मैत्री, शाळा-कॉलेजमधील रम्य दिवस ह्या सर्वांच्या संस्मरणीय आठवणी आहेत. त्या बरोबरच बेळगावचा परिसर - ठळकवाडी, राहते घर, आजूबाजूचा परिसर, प्रसंगानुसार घटना, लोकांची मनोवृत्ती वगैरेचे मनोज्ञ चित्रण केले आहे. आई वडिलांसह सहवासात आलेल्या अनेक व्यक्तींची सुंदर छोटी छोटी शब्दचित्रे त्यांनी रेखाटली आहेत.
लग्नानंतर उमाताई पती बरोबर पुण्यात आल्या व पुढे काही वर्षातच त्यांच्या वाङमयीन कारकिर्दीला सुरुवात झाली. त्यांचा हा वाङमयीन प्रवास वाचकाला गुंगवून ठाकणार आहे. कानडी साहित्य विश्वातील प्रतिभावंत अशा दिग्गज लेखकांची पुस्तके मराठीत अनुवादित करून त्यांनी मराठीतील अनुवादित साहित्याचे दालन समृद्ध केले. ज्ञानपीठ विजेते शिवराम कारंथ, भैरप्पा, अनंतमुर्ति, कार्नाड, वैदेही, तेजस्वी, सुद्धा मूर्ती वगैरे नामवंत कन्नड लेखकांच्या जवळ जवळ पन्नास ते साठ साहित्यकृती त्यांनी मराठीत अनुवादित केल्या आहेत. लेखनातील ही विपुलता व सातत्य थक्क करणारे आहे. ह्या अनुवादाच्या निमित्ताने झालेल्या ह्या मान्यवर लेखकांच्या भेटी, त्याचा लाभलेला मौलिक सहवास, जुळत गेलेले जिव्हाळयाचे, आत्मयितेचे नाते बऱ्याच साहित्यिक कार्यक्रमासाठी केलेला कानडी मुलुखाचा भरपूर प्रवास, प्रवासातील गमती - जमती, ह्या सर्वांचे रोचक निवेदन केले आहे. कारंथ, भैरप्पा अनेक वेळा त्यांच्या पुण्याच्या घरी येऊन राहिलेले आहेत. भैरप्पांना मराठी वाचकांत लोकप्रिय करण्याचे श्रेय उमाताईंनाच जाते. उमाताईंनाचा स्वभाव शांत, सोज्वळ, समाधानी व अजिबात दुराग्रही नसणारा असल्यामुळे त्यांचा लोकसंग्रही भरपूर आहे. अनुवादाच्या कामगिरीमुळे त्यांचे मराठीत मान्यवर साहित्यिकांशी स्नेहबंध जुळले आहेत. पु.ल. पती-पत्नी, पाध्ये पती-पत्नी, अनिल अवचट, कमल देसाई, माधवी देसाई व अशा अनेकांशी त्यांच्या गाठीभेटी होत.
काही जणांशी तर वारंवार भेटी होऊन त्यांच्याशी स्नेहबंध अधिक दृढ झाले. घरातल्या कामवालीशीही त्या आत्मयितेने वागतात. त्यांच्याही आयुष्यात अडचणी आल्या, सुख-दुःखाचे प्रसंग तर प्रत्येकाच्याच जीवनात येत असतात. त्यांनाही मनाविरुद्ध घडणाऱ्या छोट्या-मोठ्या प्रसंगांना तोंड द्यावे लागेल, पण त्यामुळे कुणाविषयीही कटुता नाही किंवा आकस मानत नाही. एकदा एक लेखिकेने त्यांच्या एका अनुवादित पुस्तकावर खूप कठोर टीका केली. उमाताई अस्वस्थ झाल्या. त्यांनी सुनीताबाईंना सांगितले. सुनीताबाईंनी त्याकडे लक्ष न देण्यास समजावले. पु.ल. हसत म्हणाले, ` अहो दगड यायला लागेल कि आपले आंबे पिकायला आले समजावे.` उमाताईंचे समाधान झाले. अशा छान, भावमधुर अनेक आठवणी त्यांनी कथन केल्या आहेत.
मधल्या काळात त्यांनी एम.ए. पीएचडी. डी. हि केले. एम.ए. ला त्यांनी त्यांचा आवडता `चित्रकारी` विषय निवडला व पीएचडी. डी. साठी मंदिरावरील शिल्पकलेसंबंधीचा विषय घेतला. त्यांच्या अभ्यासू स्वभावानुसार त्यांनी दोन्हीतही प्राविण्य मिळविले. आपल्या चित्रांची प्रदर्शने भरवली. शिल्पकला पाहण्यासाठी त्यांनी भारतभर भ्रमण करून अनेक मंदिरांना भेटी दिल्या. या कलांमधील मातब्बर लोकांना भेटण्याची संधी मिळाली. त्या संबंधीच्या अनुभवांचेही सरस वर्णन आहे. त्यांच्या अनुवादित कादंबऱ्यांवर टी. व्ही. मालिका व चित्रपट मराठी व कानडी दोन्ही भाषेत काढले आहेत. त्यापैकी `सोनियाचा उंबरठा` हि मालिका खूप प्रसिद्ध झाली. त्यामुळे त्यांचा टी. व्ही. चित्रपट क्षेत्रातील दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ ह्या सर्वांशी जवळून संबंध यायचा. अनेकांची ओळख झाली. शूटिंग, तेथील वातावरण, कधी त्यांच्या बरोबर प्रवास, वगैरे तेव्हा आलेल्या अनुभवांनाही त्यांनी रंजकतेने मांडले आहे.
उमाताईंनी `अनुवाद` या साहित्य प्रकाराला व अनुवादकांना मान-सन्मान मिळवून दिला आहे. साहित्य अकादमी दिल्लीचा पुरस्कार, महाराष्ट्र गौरव पुरस्कार व याशिवाय इतर अनेक कानडी व मराठी भाषेतील पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. अनुवादाला दुय्यम दर्जा देणाऱ्यांना किंवा दुय्य्यम मानणाऱ्या मानसिकतेला त्या छान समजवतात . त्या लिहितात, "अशावेळी उस्ताद झाकीर हुसेन यांच्या तबल्याची आठवण येते. बहुतेक वेळा साथीसाठी असलेलं तबला हे वाद्य आहे ;पण झाकीर हुसेन किंवा इतर अनेक प्रतिभावान तबलानवाज वाजवायला बसले की, बघता बघता तबला हेच मैफिलींच प्रमुख वाद्य बनून जातं." आणि खरचं आहे, अनुवादक जेव्हा आपल्या कामाविषयी आस्था बाळगतो व निष्ठेने आपले काम करतो तेव्हा त्यांची मानसिकता उत्तमच बनते व तो अधिक जास्त काम करत राहतो. विपुल लेखन करणाऱ्या उमाताई त्याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे. अनुवादाविषयी असणारी तळमळ, निष्ठा आणि त्यांच्या अभ्यासू वृत्तीचे आणि मेहनतीचे दर्शन वाचकाला या पुस्तकात प्रकर्षाने होते.
अनुवादाच्या या प्रवासात उमाताईंचे पती विरुपाक्ष ह्यांची त्यांना मिळालेली साथ खूप मोलाची आहे आणि हे उमाताईही मानतात. हे दोघे पती-पत्नी एकमेकांना मदत करण्यास सदैव तयार आहेत. कुठेही अहं नाही की तक्रार नाही. सुनीता देशपांडे ह्यांच्या `आहे मनोहर तरी` चा अनुवाद श्री. विरुपाक्ष यांनी कानडीत केला, पण प्रकाशकाने ते उमाताईंच्या नावावर छापण्याची अट घातली. त्यांनी ती पटकन मान्य केली व सुनीताताईंच्या कानावर घातले. त्यांनीही मान्यता दिली. उमाताईंनी हे सर्व प्रांजळपणे पुस्तकात लिहिले आहे. पुस्तकात कुठेही आत्मप्रौढीचा सूर नाही की एकमेकांची उणीदुणी काढणारी भावना नाही. दिसते ते फक्त त्या उभयतांचे एकमेकांवरील निर्व्याज प्रेम ! एवढेच नाही तर जगाकडे त्याच प्रेम भावनेतून पाहण्याची निर्मळ वृत्ती ! पुस्तकाची अर्पणपत्रिकाही हृद्य आहे. मुलंबाळं नसल्यामुळे आपण एवढं लेखन करू शकलो असेही त्या सहजपणे लिहितात.
लेखनात अनेक ठिकाणी त्यांची चिंतनशीलता दिसते. अगदी गंभीर भाष्य करण्यातही त्यांची सहजता जाणवते. स्वभावातील मिस्किलपणाची झलकही पुस्तकात पाहायला मिळते. एकूणच अनुवादाच्या भरीव कामगिरीमुळे विस्तारित झालेल्या आपल्या सुखद अनुभवविश्वाचे अतिशय प्रामाणिकपणे उमाताईंनी कथन केले आहे. अतिशय रंजकपणे व लालित्यपूर्ण शैलीत लिहिलेले `संवादु-अनुवादु` हे उमाताईंचे पुस्तक एकदा हातात घेतले की खिळवून ठेवणारे आहे. पूर्ण होईपर्यंत खाली ठेवावे वाटत नाही; इतकेच नाही तर दीर्घकाळ मनात रेंगाळत राहते. प्रत्येकाने वाचावे असे हे वाचनीय व लक्षणीय पुस्तक आहे..
- Poornima Deshpande
उमा कुलकर्णी यांचे आत्मकथन संवादु अनुवादु वाचन करत आहे. पुस्तक अतिशय सुंदर, मिश्कील विनोदी वाचकांना अंतर्मुख करते.
- Rajeshree Salage
अनुवादाशी आंतरिक संवाद
डाॅ. उमा कुलकर्णी यांची अनेक अनुवादित पुस्तके वाचल्यानंतर त्यांचे `संवादु अनुवादु` हे आत्मकथन वाचण्याची तीव्र इच्छा होती. पुस्तक हातात पडले नि मुखपृष्ठावरील लेखिकेच्या निरागस चेहऱ्याप्रमाणेच त्यांच्या मनाची निरागसता पुस्तकभर जाणवत राहिली. अतिशय समर्पक शीर्षक असलेल्या या आत्मकथनात प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे लेखिकेला असलेली साहित्याविषयीची उपजत जाण व प्रेम . म्हणूनच कदाचित त्यांचे जीवन साहित्यमय होऊन गेले असावे.
`संवादु अनुवादु` या आत्मकथनाचे वैशिष्ट्य म्हणजे लेखिकेची संयतशैली. दुसऱ्याला सहज मोठेपण देणाऱ्या या अनुवादिकेला मूळ लेखकांइतकीच लोकप्रियता लाभली. जवळपास पंचावन्नपेक्षा जास्त पुस्तकांचा अनुवाद करून सलग साडेतीन दशके त्या सर्जनशील अशा अनुवाद क्षेत्रात रमल्या.
बेळगावातील परंपरावादी घरात उमा कुलकर्णी यांचे बालपण गेले. बालपणापासूनच कला, संगीत व वाचनाची त्यांना मनस्वी आवड. लग्नानंतर पती विरूपाक्ष कुलकर्णी यांच्या नोकरीनिमित्त त्यांच्यासोबत त्या पुण्यात आल्या. पुण्याच्या शहरी वातावरणात त्यांच्या सहजीवनाला सुरुवात झाली. रोज संध्याकाळी फिरायला जाण्याच्या नेमातून झालेल्या गप्पांमधून त्यांना एकमेकांच्या साहित्यप्रेमाची कुणकुण लागली. विरूपाक्ष यांना कन्नड साहित्य वाचण्याची विशेष आवड. कोणतेही पुस्तक वाचले की त्यातील कथानक पत्नीला
रंगवून सांगणे हा त्यांचा शिरस्ता.
उमा कुलकर्णी यांच्या अनुवाद लेखनाची सुरुवातही काहीशी गंमतीशीर झाली. प्रसिद्ध कन्नड साहित्यिक डाॅ. शिवराम कारंत यांच्या `मुक्कजीची स्वप्ने` या ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कादंबरीविषयी विरूपाक्ष सांगत असताना उमा यांनी त्यांना कादंबरी वाचून दाखवायचा आग्रह धरला व स्वतःला समजावी यासाठी त्या ती मराठीत लिहू लागल्या. अशाप्रकारे त्यांचा पहिला अनुवाद लिहून झाला! स्वतःला समजावे यासाठी कन्नड कादंबरीचा केलेला मराठी अनुवाद, त्यानंतर ती कादंबरी इतरांपर्यंत पोचवण्यासाठी केलेला अनुवाद व पुढे जीवनाचा अविभाज्य व अपरिहार्य भाग म्हणून केलेला अनुवाद, असा त्यांचा अनुवादलेखनाचा विलक्षण असा प्रवास!! विरूपाक्ष कुलकर्णी मराठी भाषेतील उत्तमोत्तम साहित्याचे कन्नडमध्ये तर उमा कुलकर्णी कन्नडमधील साहित्य मराठीत अनुवादित करीत असत. दोघेही अनुवादाच्या दुनियेत इतके रममाण झाले की साहित्य व अनुवाद हा त्यांच्या सहजीवनाचा जणू साथीदार झाला.
अनुवादलेखन करत असताना पत्नीच्या नावाने कन्नड लेखकांशी पत्रव्यवहार करणे, त्यांना कानडी भाषा येत नसल्यामुळे रोज पुस्तकाची काही पाने वाचून दाखवणे, ते रेकॉर्ड करून ठेवणे, एखादवेळी एखादा कन्नड शब्द अडला तर तो शब्दकोशात बघून त्याचा अर्थ शोधून ठेवणे या गोष्टी विरूपाक्ष आवडीने करीत. जीवनाच्या जोडीदाराच्या वयाचे मोठेपण मान्य केल्यावर त्यांनीही वयाने लहान असलेल्या आपल्या पत्नीचे लाड पुरवणे (दोघांमध्ये दहा- साडेदहा वर्षांचे अंतर) हे त्यांच्या समंजस सहजीवनाचे गुपित. संध्याकाळी नित्यनियमाने फिरायला जाणे, साहित्यिक कार्यक्रमांना आवर्जून हजेरी लावणे व समाजकारण, राजकारण यांसारख्या विषयांवर मोकळेपणानेे गप्पा मारणे यातून त्यांच्यातील वैचारिक वीण घट्ट होत गेली. कधी कधी या गप्पांमधूनच लेखकाच्या वाक्यांमधला दडलेला अर्थही त्यांच्या समोर येत गेला. दिवसातील जास्तीत जास्त वेळ लिखाणात घालवणे हा या लेखक दाम्पत्याचा आवडता छंद. लिखाणाला पुरेसा वेळ मिळावा म्हणून विरुपाक्ष यांनी नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेणे ही बाब अजबच. निवृत्तीनंतर सकाळच्या चहा व नाश्त्याची जबाबदारी त्यांनी घेतल्यामुळे रात्रीच्या शांत झोपेनंतर लेखिकेला सर्जनशील लेखनासाठी मिळालेला तो वेळ महत्वाचा ठरत असे.
डाॅ. शिवराम कारंत यांच्या कांदबरीपासून सुरू झालेला अनुवादलेखनाचा प्रवास एस. एल. भैरप्पा, यु.आर.अनंतमूर्ती, पूर्णचंद्र तेजस्वी, गिरीश कर्नाड, सुधा मूर्ती आणि अगदी अलीकडच्या काळातील वैदेही यांच्यापर्यंत अगदी सहजतेने झाला. कोणत्याही कलाकृतीचा अनुवाद करत असताना अनुवादिका, `त्या लेखकाच्या विचारधारेचे बोट धरून काही पावले पुढे गेलो की नाही`, एवढाच विचार करतात. एक उत्तम वाचक या नात्याने त्या वाचकांच्या बाजूच्या अनुवादिका आहेत.
अनुवादात्मक लेखनातून आनंद मिळवणे हेच या लेखकद्वयीचे जीवनध्येय. म्हणूनच सलग साडेतीन दशके लेखिका अनुवादासारख्या वेगळ्या क्षेत्रात रमू शकल्या. पतीच्या आग्रहाखातर त्या कन्नड भाषा शिकल्या. सुरुवातीला वाटणारी धाकधूक आणि नंतर हळूहळू मनातील भीती जाऊन जिभेवर रूळलेली कानडी भाषा त्यांना अनुवादासाठी उपयुक्त ठरली. या लेखनाच्या निमित्ताने कन्नड साहित्यिकांसह मराठीतील प्रसिद्ध साहित्यिक व विचारवंत यांच्याशीही त्यांचे स्नेहबंध जुळले. सुधाकर देशपांडे, डाॅ. द. दि. पुंडे, पु. ल. देशपांडे, कमल देसाई, अनिल अवचट, कविता महाजन यांचा साहित्यिक व कौटुंबिक सहवास त्यांना लाभला.
या आत्मकथनात आत्मप्रौढी, कटुता वा दुराग्रह नाही. उलट अतिशय नितळपणा, मोकळेपणा व पारदर्शकता आहे. मिळालेल्या पुरस्काराने झालेला आनंद उमा कुलकर्णी अगदी निरागसतेने व्यक्त करतात. पण त्याचवेळी मूळ लेखकापेक्षा अनुवादकाला दिले जाणारे दुय्यम स्थान व समीक्षकांनी `अनुवाद` या साहित्य प्रकाराकडे केलेले जाणीवपूर्वक दुर्लक्ष, ही खंत मात्र त्या व्यक्त करतात. त्यांच्या मते `अनुवादकाला साहित्याची जाण असणं आवश्यक आहे. त्याला वेगळ्या प्रकारची साहित्यिक दृष्टी असणं गरजेचं आहे. ही दृष्टी समीक्षकापेक्षा वेगळी असली पाहिजे. त्यात कलाकृतीविषयीचं ममत्व आवश्यक आहे.` याच ममत्वाने त्या लिहीत राहिल्या. त्यामुळेच कदाचित लेखकाला वा त्याच्या कलाकृतीला त्यांनी कोणतेही प्रश्न विचारले नाहीत. म्हणूनच देव- धर्माची कल्पना, सामाजिक विकृतीसंदर्भातील भाष्य, स्त्री सामर्थ्याबाबत प्रश्नचिन्ह वा सामाजिक क्लिष्टता यासंदर्भातील संबंधित लेखकांच्या मतमतांतरांमुळे लेखिकेची मते कठोर वा कडवट झाली नाहीत. उलट निःपक्षपातीपणे त्या ती मांडत राहिल्या आणि एका वेगळ्या प्रकारचा सर्जनात्मक आनंद स्वतःबरोबर वाचकांनाही मिळवून देत गेल्या.
आत्मकथन वाचताना एक उणीव जाणवते ती म्हणजे अनेक प्रसिद्ध साहित्यिकांच्या अनुभव कथनासोबत
प्रसंगानुरूप त्यांची काही छायाचित्रे पुस्तकात असती तर वाचकांसाठी ती पर्वणी ठरली असती. उमा कुलकर्णी या स्वतः उत्तम चित्रकारही आहेत. या सर्जनशील छंदाविषयी व त्यातील निर्मितीच्या अनुभवाविषयी त्यांनी थोडे सविस्तर लिहिले असते तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील आणखी एका विलोभनीय पैलूची वाचकांना ओळख झाली असती.
साध्या, सरळ निवेदन शैलीतील या आत्मकथनातून त्यांनी अनुवादकलेचे अनेक पैलू वाचकांपुढे उलगडले आहेत. सुधा मूर्ती यांच्या कलाकृतीचा अनुवाद करताना त्या म्हणतात की, `स्त्रियांचे लेखन हा चिंतेचा नसून चिंतनाचा विषय आहे.` हे चिंतन समजून घेण्यासाठी व पुन्हा एकदा स्वतःशी आंतरिक संवाद साधण्यासाठी सर्वांनीच जरूर वाचावे, असे हे कथन आहे.
- Balkrishna Kavthekar
समवादुअनुवादु हे विख्यात अनुवादक उमा कुलकर्णी यांचे आत्मकथन आज पुनः एकदा वाचले.एक साधी गृहिणी इच्छाशक्ती आणि प्रयत्न यांच्या द्वारा उत्तम अनुवादक कशी होते,याचे दर्शन येथे घडते.अनुवादक किती परिश्रम करत असतो हेही लक्षात येते.कन्नड सहित्याला मराठीत आणण्याचे महनीय काम उमा कुलकर्णी यांनी केले यबददल आपण त्यान्चे सदैव ऋणी .राहिले पहले.
- Govind Kulkarni
एक वस्तुपाठ आत्मकथनाचा : "संवादू अनुवादु ". लेखिका:डॉक्टर उमा कुलकर्णी.
मित्रहो नमस्कार,
आजच आजच डॉक्टर उमा कुलकर्णी ह्यांच आत्मकथन `संवादु अनुवादु` हे वाचून झालं. काय सांगावं?अत्यंत प्रामाणिक व अभ्यासपूर्ण पणे लिहिलेलं आत्मकथन.
त्यांच्या बेळगावच्या बालपणापासून तर आत्ताच्या जीवन प्रवासाबद्दल आत्मीयतेने लिहिलेलं आहे. माझ्याकडे जवळपास २५ आत्मकथेची चरित्र आहेत पण ह्या पुस्तकाने कांही वेगळंच शिकवलं आहे मला. असो.
त्यांचे बालपणीचे संस्कार,कोठल्याही प्रकारची सक्ती नाही आणि त्यात त्यांनी स्वतःच निवडलेली व आत्मसात केलेली अनेक गोष्टी.
चित्रकला हा विषय अभ्यासून शिकणे आणि आयुष्याला "अनुवादक" ह्या शब्दाला प्रतिष्ठा प्राप्त करून देणे हा सर्व प्रवास थक्क करणारच आहे.
एकदा पुस्तक हातांत घेतल्यावर त्यांचं प्रवाही लेखन आपल्याला वाचनातच गुंतवून टाकतं आणि ही बौद्धिक गुंतवणूक वाचकाच्या कायमस्वरूपी लक्षांत राहते.
त्यांच्या ह्या संपूर्ण प्रवासात त्यांचे इंजिनिअर पति आदरणीय विरुपाक्षजी ह्यांची सुद्धा साथ तितकीच मोलाची आहे आणि त्याचा उल्लेख सुद्धा आपल्याला वाचतांना येत राहतो.
उमा कुलकर्णीनीं ५५ पेक्षा उत्तोमोमत्तम कन्नड पुस्तकांचे मराठीत अनुवाद केले आहेत तसेच ई टीव्हीवर त्यावेळी येणारी `सोनियाचा उंबरठा ही मराठी मालिका सुद्धा लिहिली आहे.
त्यांच्या लिहिण्यात मला त्यांचं मला भावलेलं त्यांचं सखोल चिंतन खूप आवडलं. मग ते परिस्थिती निहाय, व्यक्ती निहाय किंवा प्रसंग निहाय असुद्या ते चिंतन आपल्याला मानसिकतेच्या वेगळ्याच प्रवाहाच दर्शन घडवतं. मग तो त्यांच्या `वॉचमन वाचन संस्कृतीचा बळी`असुद्या किंवा वरणगावाला असतांना सहकारी वर्गाशी झालेला विशिष्ट संवाद असुद्या.
त्यांचा संबंध अनेक प्रतिष्ठित व्यक्तींशी आलेला आहे. तो मग कधी संवाद रूपाने,कधी सरळ सरळ अनुवादक म्हणून.उदा. ज्ञानपीठ पारितोषिक प्राप्त शिवराम कारंथ,अनंतमूर्ती,सौ.व श्री.पु.ल. देशपांडे, डॉक्टर अनिल अवचट,सरस्वती सन्मानप्राप्त श्री. भैरप्पा, गिरीश कार्नाड, पूर्णचंद्र तेजस्वी असें अनेकजण.
त्यांच्या लिखाणातून कधी कधी अनुवादकाला मिळणारी दुय्यम वागणूक सतावून जाते.पण तितक्यापुरतच. असो.
मला वाटतं `वादक` आणि `अनुवादक` हे त्यांच्यापरीने श्रेष्ठच असतात. कारण वादक सुरांना न्याय देतो तर...
अनुवादक लेखकाच्या शब्दांना,न्याय तर देतोच पण त्यातच अनुवादकाला सृजनशीलतेला भरपूर वाव असतो.हे बर्याच लेखकांनी कबूल केलं आहे. त्यामुळेच मूळ लेखकाचं म्हणणं वाचकापर्यंत चांगल्या प्रकारे पोहचविले जातं. कारण अनुवादक लेखकाच्या `आशयाशी`अत्यंत प्रामाणिक असतो असं उमा कुलकर्णींच्या अनुवादातून प्रतीत होत जातं. त्यामुळेच अनुवादक ह्या शब्दाला त्यांनी मोठी प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आहे. त्याच अजून एक कारण असू शकेल ते मला वाटतं`प्रत्येक लेखकाच्या शब्दांच्या पोताचं लेखिकेने केलेलं मानसिक विश्लेषण. त्यामुळेच त्यांची पुस्तकं वाचतांना ती आपल्याला आपलीच वाटत राहतातच पण वेगळाच भरपूर वाचन संस्कृतीचा ठेवा आपल्याला मिळाल्याचा आनंद होतो.
मी त्यांची जास्तकरून भैरप्पांची अनुवादित पुस्तकं वाचलीत. मग ते पर्व,आवरण (एका वर्षात ३४ आवृत्या निघाल्यात),वंशवृक्ष, तंतू,पारखा, कांठ वगैरे.
आतां त्यांचं सीताकांड वाचत आहे.असो.
पण संवादु अनुवादु हे आत्मकथन वाचतांना त्यांच्या आयुष्यातील अनेक दालनात आपल्याला मोकळेपणाने वावरायला होतं. आणि आपल्याला त्या पुस्तकाच्या वेगळ्याच आयामाची प्रचिती येते. स्वतःचेच स्वतः त्रयस्थपणे लिहिलेलं आयुष्यात आलेल्या अनेक व्यक्तींची,प्रसंगाची त्यानिमित्तानं पडलेल्या प्रश्नांची उकल खूपच प्रभावित करते.हे सर्व करत असतांना मानसिक त्रास होणारच.पण त्याला सुद्धा वैचारिकतेने समजून घेतलं.
त्यांची सतत शिकण्याची वृत्ती मानसिक बळ देऊन जाते. डॉक्टर अनिल अवचट ह्यांच सतत त्यांच्याकडे अजूनही जाणं येणं आहे. त्यांच्याकडून ओरोगामी शिकणं.
तसंच त्यांच्याकडे मुक्कामाला येणारे शिवराम कारंथ, भैरप्पा, कमल देसाई अजून बरेचजण.
कां कोणास ठाऊक कांही व्यक्तींचं बलस्थान कांही विशेषच असावं तसंच आदरणीय उमा कुलकर्णी व आदरणीय विरुपाक्ष कुलकर्णींच्या सहवासाचं असावं. त्यांच्यासमोर आपलं मन मोकळं करावं असं वाटत असावं. कामवाली बाई अशीच संवाद साधते
विशेष म्हणजे समारोपात त्यांनी आई व वडिलां विषयी लिहिले आहे. त्याच वेगळ्याच प्रकारे विश्लेषण केलेलं आहे.
एवढं सगळं विचार करणारी लेखिका पति विषयी ईतर नातेवाईकांच्या संबंधीसुद्धा तितकंच प्रांजळपणे लिहिते. तुम्हाला वाटेल त्यांत काय असं?पण तसं नाही.त्यांचा आत्तापर्यंतचा प्रवास आणि अनुवादक होण्याची जोरदार भूमिका साकारण्यात, आतां त्याला भूमिका सुध्दा म्हणता येणार नाही. कारण विशेष कार्य संपल्यावर `भूमिका` हा शब्द तात्पुरता वाटतो..
पण लेखिकेच्या बाबतीत त्यांचा स्थायीभाव वाटतो.
माझ्यासारख्या वाचकाला नेहमीच `स्फूर्तिदायी किंवा प्रेरणा` ह्याच शब्दांचं बलस्थान ठरलेला आहे. मला पक्की खात्री आहे ज्यांना असं अनुवादित साहित्य आपल्या मराठीत वाचावं वाटतं त्यांनी हे जरूर वाचावं. कारण...
हा एक नुसता अनुवादकाचा प्रवास नाही किंवा आत्मकथन नाही तर "अनुवाद" ही प्रक्रिया कशी जन्मते आणि आपल्यासारख्या पर्यंत पोहचते त्याचा एक आदर्श वस्तुपाठच आहे.
त्यांनी अनुवाद करतांना त्या त्या साहित्य कृतीचा अभ्यास करतांनाच आपल्यापुढे जीवनाचं एक वेगळंच मनोगत म्हणा आशय मांडला आहे.
ते आपल्याला आपलं मन मोकळेपणाने स्वीकारतं.
आणि हो मागे पुण्याला गेलो असतांना आम्हांलाही त्यांचा सत्संग लाभला.
असो आतां थोडंस थांबण्याचा प्रयत्न करतो.
आपला स्नेही,💐🙏😊
गोविंद कुलकर्णी.
बेंगलोर.
०८-०४-२०२०.
- Eknath Marathe
काही दिवसापूर्वी या पुस्तकाची किंडल आवृत्ती फक्त 29 रूपयात उपलब्ध होती. लगेच घेवून टाकली व गेले चार दिवस लोकल प्रवासात हे पुस्तक सलग वाचून काढले.
पुस्तकाचे नाव एवढे समर्पक आहे की काही काळ या नावातच मी गुंतलो होतो ! एवढे समर्पक नाव या पुस्तकाला उमा ताईंना कसे बरे सुचले असेल ?
मराठी संस्कारात वाढलेल्या उमा ताई व त्यांचा कानडी भ्रतार यांचे सह-अनुवाद जीवन यात मस्त उलगडत जाते. लहानपण, लग्न, पुण्याला स्थायिक होणे, अनुवाद करू लागणे, या विषयातले अनेक पैलू उलगडत जाणे, मोठ्या कन्नड व मराठी साहित्यीक लोकांचा लाभलेला सहवास, जोडलेले मैत्र, मिळालेले पुरस्कार.. व या सर्वात त्यांचे पती, विरूपाक्ष यांची त्यांना लाभलेली तेवढीच तोलामोलाची साथ .. (कन्नड पुस्तक ते उमा ताईना वाचून दाखवितात व मग त्या त्याचा मराठीत अनुवाद करतात व नेमकी उलट प्रक्रिया मराठी ते कन्नड असा अनुवाद करताना होते हे वाचून खूप मस्त वाटले व मजा सुद्धा आली !)
हे सर्व सर्व या आत्मकथनात एका लयीत आले आहे. अनुवादक कोण याचा उल्लेख अनेकदा अनुल्लेखाने मारला जातो पण अनेक उत्तमोत्तम साहित्य या लोकांच्या खडतर मेहनतीमुळे आपण वाचू शकतो , इतकेच नव्हे तर त्याचा " या मनीचे त्या मनी" असा आस्वाद घेवु शकतो, आपल्या जाणीवा विस्तारू शकतो. हे खरेच प्रचंड मोलाचे कार्य आहे.
अनुवादकाला सुद्धा साहित्य चळवळीत मानाचे स्थान मिळायला हवे.
उमा ताई एक सुंदर आत्मकथन मराठी वाचकाला दिल्याबद्दल आभार !
- PORNIMA DESHPANDE
उमा कुलकर्णी यांचे आत्मकथन संवादु अनुवादु वाचन करत आहे. पुस्तक अतिशय सुंदर, मिश्कील विनोदी वाचकांना अंतर्मुख करते.
- DAINIK SAMANA 26-08-2018
हृद्य संवादाचे बंध...
संवादु अनुवादु हे प्रसिद्ध अनुवादक उमा कुलकर्णी यांचे आत्मकथन. उमा कुलकर्णी या कन्नड भाषेतून मराठीमध्ये अनुवाद करणाऱ्या प्रसिद्ध अनुवादक. गेली ३०-३५ वर्षे सातत्याने त्यांचे हे अनुवादाचे काम सुरू आहे. पन्नासहून अधिक पुस्तके त्यांनी अनुवादित केली आहेत. मेहता पब्लिशिंग हाऊसतर्फे प्रकाशित हे प्रांजळ आत्मकथन अतिशय देखणे व वाचनीय झाले आहे. मुखपृष्ठावर त्यांचे छायाचित्र आहे, पण आत काहीच छायाचित्रे नाहीत. ती असती तर आणखीन मजा आली असती. मात्र आत्मचरित्र अगदी मोकळेपणाने मांडले आहे.
उमा कुलकर्णी त्यांच्या बेळगाव ठळकवाडी येथील लहानपणीच्या दिवसापासून सुरुवात करतात. प्रकाश संताच्या पुस्तकातील बेळगावमधील लंपनच्या भावजीवनाचे जे वर्णन आले त्याच्याशी त्या त्यांचे लहानपणाच्या दिवसांचे नाते जोडतात. पुढे विरुपाक्ष यांच्याबरोबर विवाह होतो. विरुपाक्ष यांचे कुटुब म्हणजे कर्मठ कन्नड वैष्णव माध्व संप्रदायी. त्यांना आलेल्या अनुभवांचे आणि जुळवून घेतानाचे कष्ट यांचे त्यांनी वर्णन केले आहे. अर्थात कन्नड आणि मराठी दोन्ही भाषा मी जाणत असल्याने उत्सुकता होती ती त्यांनी अनुवाद करायला कशी सुरुवात केली हे जाणून घेण्याची. उमा कुलकर्णी आणि विरुपाक्ष कुलकर्णी यांचा विवाह होऊन ८-९ वर्षे झाली होती. त्याच सुमारास कारंतांच्या ‘मुक्कजीय कानसुगळू’ या कादंबरीस साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. विरुपाक्ष यांनी ते पुस्तक वाचायला म्हणून घरी आणले आणि उमा कुलकर्णी यांनी ते समजावून घेता नकळत मराठीत अनुवादित केले. पण ते पुस्तक बाहेर आले नाही कारण मीना वांगीकर यांना कारंत यांनी आधीच अनुवादाचे हक्क दिले होते. मग दुसरे पुस्तक कन्नड लेखिका त्रिवेणी यांचे ‘बेक्कीन कण्णु’’ हे पुस्तक अनुवादित केले. पण अनुवाद हक्काविषयी काही गैरसमजुतीमुळे तेही बाहेर आले नाही. अखेर शिवराम कारंत यांचे ‘मै मनगळ सुळीयल्ली’ हे पुस्तक त्यांनी अनुवादित केले आणि ते प्रकाशित झाले. अशी त्यांची अनुवाद कारकीर्दीची सुरुवात झाली.
त्यानंतर शिवराम कारंत, भैरप्पा, प्रभाकर पाध्ये, कमल देसाई यांच्याशी कसे त्यांचे या ना त्या कारणाने ऋणानुबंध जुळले. घरोबा झाला यांचे साद्यंत वर्णन वाचनीय आहे.
१९८४च्या सुमारास त्यांची प्रसिद्ध लेखिका आणि इन्फोसिसच्या सुधा मूर्ती यांच्याशी ओळख झाली. ती कशी झाली हे ही वाचणं मजेशीर आहे. शिवराम कारंत यांचेच ‘बेट्टद जीव’ यांचे भाषांतर करून ते पोस्टात कारंत यांना पोहोचते करण्यासाठी थांबल्या असता त्यांची आणि सुधा मूर्ती यांची ओळख झाली. अर्थातच पुढे त्यांची परिणीती सुधा मूर्ती यांची काही पुस्तके अनुवादित करण्यात आली. सुधा मूर्ती यांनी भैरप्पा यांच्या ‘वंशवृक्ष’ या कादंबरीची ओळख उमा कुलकर्णी यांनी करून दिली. आणि त्यांनी त्याचा अनुवाद सुरू केला. त्या ओघाने भैरप्पा यांची ओळख झाली.
उमा कुलकर्णी यांचे पती खडकी येथील भारत सरकारच्या High Explosives Factory येथे तंत्रज्ञ म्हणून काम करत. त्यांची बदली खान्देशात भुसावळ जवळ वरणगाव येथील कारखान्यात झाली. आत्मचरित्रात तेथील वास्तव्याचे, अनुभवाचे वर्णन आहे. तेथे असतानाच त्यांना वंशवृक्षच्या अनुवादासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला, त्यानंतर विरुपाक्ष यांनी स्वेच्छानिवृत्ती पत्करून अनुवादासाठी उरलेले आयुष्य व्यतीत करायचे ठरवले. या उपभयतांच्या धाडसी निर्णयाबद्दल देखील अगदी मनमोकळेपणाने लिहिले आहे.
दरम्यानच्या काळात त्यांनी मराठी कन्नड स्नेहवर्धन ही संस्था स्थापन केली आणि त्यातर्फे विविध कार्यक्रम करत राहिले. कन्नड मराठी भाषेतील विविध अंगांनी होणारी देवाण घेवाण या निमित्ताने सुरू राहिली. पुढे उमा कुलकर्णी यांनी पूर्णचंद्र तेजस्वी यांची कार्वलो ही लघुकादंबरी अनुवादित केली. तेजस्वी हे कर्नाटकातील पहिले ज्ञानपीठ विजेते कुवेंपू यांचे पूत्र. त्यात कर्नाटकातील मलनाड या डोंगराळ, जंगली भागात असलेल्या संस्कृतीची झलक मिळते. वेलदोड्याची शेती हा प्रमुख विषय त्यात होता. त्या सर्वांच्या अनुवादाच्या निमित्ताने आलेल्या अडचणी. प्रश्न याबद्दल या आत्मकथनात लिहिले आहे. पूर्णचंद्र तेजस्वी यांच्यामुळे जंगलतज्ज्ञ मारुती चितमपल्ली यांच्याशी झालेली ओळख. अनिल अवचट आणि त्यांची पत्नी सुनंदा (ऊर्फ अनिता) अवचट यांच्याशी जडलेला स्नेह. पुढे अनंतमूर्ती यांच्या कथा-कादंबऱ्या. गिरीश कार्नाड यांच्या पुस्तकांचे, नाटकांचा अनुवाद हा सारा प्रवास यात मांडला आहे.
पाचव्या आणि शेवटच्या प्रकरणात त्यांनी दक्षिण कन्नड जिल्ह्यातील मूडबिदरी येथे भरलेल्या Alva`s Vishwa Noodisari Virasat या साहित्य, संस्कृती संमेलनाचे अनुभव कथन केले आहे. केतकरवहिनी या त्यांच्या स्वतंत्र कादंबरीच्या लेखन प्रक्रियेचा प्रवास, वंशवृक्ष कादंबरीचे आकाशवाणी रूपांतर होतानाचा अनुभव व पुढे दूरचित्रवाणी वाहिन्यांसाठी केलेले अनुवादाचे काम. त्या कामात रमताना आलेले अनुभव कथन छोट्या छोट्या प्रसंगांतून त्यांनी मांडलं आहे. लेखनाच्या ओघात त्या कितीतरी गोष्टींबद्दल सांगतात. जसे की त्यांच्याकडील कामवालीबाई लक्ष्मी, वरणगाव येथून स्कूटरवरून पुण्याला येतानाचे अनुभव, त्यांच्या घराशी (शशिप्रभा) निगडित अनेक आठवणी. देव आहे की नाही याची चर्चा, जे कृष्णमूर्ती यांचे तत्त्वज्ञान, बाबा आमटे यांचे चरित्र कन्नडमध्ये अनुवादित करताना त्यांची आनंदवन भेट इत्यादी अनेक संदर्भ आपल्यासमोर उभे राहतात. एक दृश्यात्मकतेचा परिणाम या कथनातून नक्कीच जाणवतो.
लेखिकेची खरी ओळख ही अनुवादक आहे आणि या कारणासहच अतिशय समृद्ध जीवन त्या जगत आहेत याची प्रचीती येत राहते. चरित्र वाचल्यानंतर सर्वांत महत्त्वाचे जाणवते ते म्हणजे त्यांचे कन्नड-मराठी या भाषा भगिनींबद्दल असलेले प्रेम, इतिहास, चित्रकला, संस्कृती, विरुपाक्ष यांना असलेली हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताबद्दल आस्था, जाण, वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तीची ओळख यामुळे समृद्ध करणारे आलेल अनुभव त्यामुळे चाकोरीत राहूनदेखील चाकोरीबाहेरचे जग हे दोघे जगले आहेत हे समजते. चरित्राच्या शेवटी त्यांना मिळाले पुरस्कार. त्यांच्या आणि विरुपाक्ष यांच्या पुस्तकांची यादी इत्यादी दिली असती तर बरे झाले असते. त्यांनी आत्मकथनात असे मांडले आहे, की तत्त्व म्हणून अनुवादित पुस्तकांना अर्पणपत्रिका नसावी असे स्वीकारले. त्या नादात त्यांनी आपल्या स्वतंत्र कलाकृती असलेल्या केतकरवहिनी याला त्या अर्पणपत्रिकादेण्यास विसरल्या असे ते नमूद करतात. पण या आत्मचरित्राला अर्पणपत्रिका आहे आणि ती खूप हृद्य आहे ती वाचायलाच हवी.
– प्रशांत कुलकर्णी
- MAHARASHTRA TIMES १९-८-१८
अनुवादाने समृद्ध केलेले सहजीवन…
उत्तमोत्तम कन्नड साहित्याचा मराठीत अनुवाद करणाऱ्या डॉ. उमा कुलकर्णी यांचं `संवादु अनुवादु` हे आत्मकथन अलीकडेच प्रसिद्ध झालं आहे. सर्जनशील व्यक्तीविषयी, त्याच्या कलाकृतीमागच्या प्रक्रियेविषयी वाचकांना नेहमीच कुतूहल असतं. स्वतंत्र लेखनाइतकंच, किंबहुना काकणभर अधिक अवघड आणि तेवढ्याच सर्जनशील असणाऱ्या अनुवादाच्या क्षेत्रात गेली जवळजवळ साडेतीन दशकं काम करणाऱ्या उमाताईंनी अनुवादाच्या हातात हात घालून घडलेला आपल्या सहजीवनाचा प्रवास या आत्मकथनात मांडला आहे. त्यामुळेच अनुवादाच्या क्षेत्रात आपलं वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण करणाऱ्या, भाषेइतक्याच माणसांमध्येही रमणाऱ्या, त्यांच्यात जीव गुंतवणाऱ्या एका कुटुंबवत्सल स्त्रीचं समाधानी आयुष्यही या पुस्तकातून समोर आलेलं दिसतं.
बेळगावात मध्यमवर्गीय कुटुंबात गेलेलं बालपण, पाच भाऊ आणि एक बहीण यांच्या सोबतीनं अनुभवलेलं बेळगावातलं शांत आयुष्य, देशस्थी नात्यांचा मोठा गोतावळा, विविध भाषा बोलणारे शेजारीपाजारी, जवळच्या मैत्रिणी, घरातून मनात रुजलेली संगीत आणि वाचनाची आवड, याविषयी उमाताईंनी समरसून लिहिलं आहे. लग्न होऊन विरुपाक्ष कुलकर्णींच्या कानडी, कडक सोवळं-ओवळं पाळणाऱ्या कुटुंबात उमाताई गेल्या. अर्थात इंजिनीअर असलेल्या विरुपाक्षांच्या नोकरीमुळे त्या पुण्यात भाड्याच्या घरात स्थायिक झाल्या. या घरी सतत असणारा सासर-माहेरच्या माणसांचा राबता, कानडी बोलायला शिकण्यासाठी विरुपाक्षांनी केलेला आग्रह, याचा सुरुवातीला वाटणारा धाक आणि हळूहळू मनातली भीती जाऊन जिभेवर रुळलेली कानडी भाषा, आसपासच्या कुटुंबांशी झालेली जवळीक, दररोज संध्याकाळी विरूपाक्षांसह चालायला जाण्याचा नेम, राजकीय भाषणं, साहित्यिक कार्यक्रम आणि सांगीतिक मैफलींना आवर्जून जाण्याचा दोघांचा छंद, येता-जाता होणाऱ्या गप्पा आणि यातून फुलत गेलेलं नातं, या सगळ्याविषयी उमाताईंनी अतिशय प्रांजळपणे आणि साध्या-सरळ शैलीत निवेदन केलं आहे.
उमाताईंनी केलेले कन्नड-मराठी अनुवाद आणि विरुपक्षांनी केलेले मराठी-कन्नड अनुवाद यामुळे या दोघांच्या सहजीवनाला आणखी एक रेशमी पदर मिळाला आणि त्यानं या दोघांना परस्परांमध्ये अधिक गुंतवलं, हे खरंच. पण मुळातही एकमेकांपर्यंत पोचण्यासाठी दोघांनी समजुतीचे धागे अगदी सहज विणले होते, असं उमाताईंच्या लेखनातून जाणवत राहतं. त्यांनी म्हटलंय, "आमच्या वयात दहा-साडे दहा वर्षांचं अंतर असल्यामुळे मी यांचं `मोठेपण` मान्य करून टाकलं होतं आणि माझं `लहानपण` यांनाही ठाऊक असल्यामुळे चुका करायचा मला जणू परवानाच मिळाला होता. मनातलं बोलून टाकायचा स्वभाव असल्यामुळे मनात काही ठेवायचं नाही, ही मानसिकता कायमचीच राहिल्यामुळे संसारात `तू-तू, मैं-मैं `चे प्रसंग कधीच आले नाहीत. आम्ही दोघांनी नेहमीच आपला `मोठेपणा`चा आणि `लहानपणा`चा हट्ट कायम सांभाळला." पुढे सतत अनुभवाला येत गेलेलं विरुपाक्षांचं हे मोठेपण उमाताईंनी अतिशयोक्तीचा दोष बाजूला ठेवून आत्मकथनात अतिशय प्रांजळपणे पुनःपुन्हा नोंदवलं आहे. डॉ. शिवराम कारंत यांच्या `मुकज्जीची स्वप्ने` या कादंबरीला मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्काराची बातमी वाचून ती समजून घेण्याची तीव्र इच्छा झाल्यावर विरुपाक्षांनी धारवाडच्या मित्राकरवी ती मागवणं, कानडी बोलता येत असलं तरी वाचता येत नसल्यामुळे, उमाताईंना कादंबरी वाचून दाखवणं, पुढच्या कादंबऱ्यांच्या अनुवादासाठी उमाताईंच्या नावानं कानडी लेखकांना पत्रं पाठवणं, ऑफिसमधून आल्यावर दररोज संध्याकाळी पुस्तक वाचून उमाताईंसाठी रेकॉर्ड करून ठेवणं आणि हा नेम तीन-साडे तीन दशकं चालू ठेवणं इथपासून ते सुरुवातीच्या दिवसात माहेरच्या आठवणीने रडणाऱ्या उमाताईंना दुसऱ्याच दिवशी बसमध्ये बसवून देणं, स्वयंपाकाची आणि बँक, पोस्ट यांसारख्या बाहेरच्या कामांची ओळख नसणाऱ्या उमाताईंना निरनिराळे पदार्थ आणि व्यवहार शिकवणं, त्यांना अनुवादाला पुरेसा वेळ मिळावा म्हणून निवृत्तीनंतर सकाळच्या नाश्त्याची जबाबदारी घेणं, अपत्यहीनतेच्या उणिवेचा बाऊ न करणं आणि उमाताईंनाही या दुःखाला गोंजारु न देणं हे सगळे प्रसंग दोघांच्या समंजस सहजीवनाची वाटचाल स्पष्ट करणारे आहेत.
उमाताईंच्या आत्मकथनाचं वैशिष्ट्य म्हणजे, त्यांची संयत शैली. टीका, कडवटपणा, अहंकार यांचा तिला पुसटसाही स्पर्श नाही. कुठलाही अभिनिवेश न बाळगता, कुठलेही दोषारोप किंवा न्यायनिवाडा न करता त्यांनी आपलं जगणं वाचकांसमोर ठेवलं आहे. सुरुवातीला अनुवादाच्या प्रकाशनासाठी आलेले नकार किंवा अनुवादकाला दुय्यम लेखणारी मानसिकता यांचा उल्लेखही त्यांनी वस्तुनिष्ठपणे केला आहे. समीक्षकांनी अनुवाद या साहित्यप्रकाराची पुरेशी दखल घेतली नसल्याची खंत बोलून दाखवतानाच मूळ लेखकापेक्षाही अनुवादकाच्या वाट्याला येणाऱ्या भाग्याचा उच्चारही त्यांनी केला आहे. पुरस्कारांमुळे झालेला आनंद जसा त्यांनी निरागसपणे सांगितला आहे, त्याच साधेपणाने काही क्लेशकारक प्रसंगांचा उल्लेख केला आहे.
अनुवादामुळे मिळालेला नावलौकिक आणि पुरस्कार यांच्याइतकीच कारंत, भैरप्पा, अनंतमूर्ती, गिरीश कार्नाड, पूर्णचंद्र तेजस्वी, वैदेही यांच्यासारखे प्रख्यात कन्नड साहित्यिक आणि अनेक मराठी लेखक आणि विद्वान मंडळींचा सहवास ही उमाताईंसाठी मोठी मिळकत असल्याचं त्यांच्या लेखनातून जाणवत राहतं. थोरामोठ्यांच्या सहवासानं आपलं आयुष्य उजळून निघाल्याची भावना उमाताईंनी पुनःपुन्हा व्यक्त केली आहे. सर्जनशील माणसासाठी असणारं या समृद्धीचं मोल त्यांच्या आत्मकथनानं अधोरेखित केलं आहे.
आपल्या सहजीवनाच्या बरोबरीनं उमाताईंनी स्वतःच्या वैचारिक वाटचालीचा एक धागाही आत्मकथनात पुढे नेला आहे. देव आणि धर्म या संकल्पना असोत, स्त्री-पुरुष संबंध असोत, स्त्रियांची आंतरिक ताकद असो, किंवा नातेसंबंध आणि त्यातली गुंतागुंत असो, किंवा जगण्यातली क्लिष्टता असो, अनुवादाचं बोट धरून जगताना या सगळ्याच बाबतीतली समजूत कशी गाढ होत गेली, हे उमाताईंनी आत्मकथनात सांगितलं आहे. मूळ लेखक कोणत्याही राजकीय विचारधारेचा असला तरी त्याच्या कथा-कादंबरीचा अनुवाद करताना, आपण स्वतः आहे त्या जागेवरून आणखी पुढे गेलो की नाही, हे तपासत राहिल्यामुळे आपली मतं कठोर-कडवट राहिली नाहीत, असंही उमाताईंनी स्पष्ट केलं आहे. मुख्य म्हणजे, अनुवादामुळे आपल्या आकलनाचा, समजुतीचा आणि संवेदनशीलतेचा परीघ विस्तारला आणि एकूण मानवतेची जाणीवच व्यापक होत गेल्याचं त्यांनी सांगितलं आहे. उत्तम अनुवादक हा आधी संवेदनशील वाचक असतो, याची प्रचिती उमाताईंचं आत्मकथन वाचताना येत राहते.
कादंबरी समजून घ्यावी म्हणून निर्हेतुकपणे केलेला अनुवाद, मग इतरांपर्यंत ती पोचवावी म्हणून केलेला अनुवाद आणि नंतर जगण्याचा एक आवश्यक आणि अपरिहार्य भाग झालेला अनुवाद, असा प्रदीर्घ प्रवास मांडताना त्याच प्रवाहात मिसळून गेलेलं आपलं कौटुंबिक आयुष्य उलगडणारं उमाताईंचं आत्मकथन मराठी वाचकांना तर आवडेलच, पण स्त्रियांना स्वतःमध्ये डोकावून आपल्या आंतरिक सामर्थ्याची ओळख करून घेण्यासाठी प्रेरितही करू शकेल!
...
- Abhay Bang
‘संवादु-अनुवादु’ वाचले. पुस्तक सुंदर आहे. तुमची शैली सरळ, सोपी, जीवनाची गोष्ट सांगितल्यासारखी आहे. सोडवत नाही.
तुमच्या एका आत्मकथनात दोन आत्मकथनं आहेत, (एक झाड-दोन पक्षी!) एका बाईचं आत्मकथन व एका अनुवादिकेचं आत्मकथन. लहानपणाची व पुढे संसारिक जीवनाची, भेटलेल्या माणसांची बारकाईने व जिव्हाळ्याने केलेली वर्णनं – हा स्त्रीचा गुण. तो नि:संकोच प्रकट केल्याने आत्मकथन ऑथेन्टीक आहे. कृत्रिम वैचारिक, साहित्यिक नाही. खरखुरे वाटते. तुमच्या व विरुपाक्षांच्या एकत्रिक पण स्वतंत्र व्यक्तीत्वांचं व सहप्रवासाचं कौतुक वाटते. घट्ट बांधलेली दोन स्वतंत्र व्यक्तीत्वं आणि तरी एवढा समजूतदारपणा विरळा.
अनुवादक म्हणून कन्नड साहित्य व साहित्यिक यांचा महाराष्ट्राला परिचय करून देण्याचं तुमचं कार्य अद्वितीयच आहे. घरात साध्या गाऊनमध्ये आपल्याला चहा-नाश्ता देणाऱ्या उमताईंच एकूण कार्य किती मोठं आहे हे लक्षात येऊन दडपण आलं.
उत्तम आत्मकथनासाठी मन:पूर्वक अभिनंदन.
सस्नेह
अभय बंग.
- DAINIK TARUN BHARAT 15-07-2018
अनुवादाच्या जगातील सफर...
उमा कुलकर्णी यांचे प्रांजल, अनलंकृत आत्मकथन. नेमाडे त्यांना म्हणाले, ‘अनुवाद क्षेत्रात आता तुम्ही विचार मांडण्याची वेळ आली आहे.’ त्याचे फलित म्हणजे हे आत्मकथन. केव्हा, काय व कसे घडले, या संदर्भातील स्मरणे!
या लेखनामागे नैतिक अधिकार. आजपर्यंत त्यांचे पन्नासच्या वर अनुवाद प्रसिद्ध झालेत. गेली ३७ वर्षे उमा अनुवादक्षेत्रात कार्यरत आहेत. अजून काही अनुवाद संकल्प त्यांच्या मनात आहेत. भारतीय दर्जाचे कादंबरीकार भैरप्पा, पूर्णचंद्र तेजस्वी, साक्षात गिरीश कर्नाड अशा दिग्गजांचे साहित्य त्यांनी मराठीत आणले आहे. अनुवादाच्या ‘वेल बिगन इज हाफ डन’प्रमाणे त्यांनी डॉ. शिवराम कारंथ यांचे ‘तनमनाच्या भोवऱ्यात’ हे पुस्तक प्रथम अनुवादित केले, क्वॉलिटेटिव्ह आणि क्वॉन्टिटेटिव्ह या दोन्ही दृष्टीनी त्याचे अनुवाद लेखन गुणवंत ठरते, एखाददुसरा राज्यपुरस्कार मिळाला की, ‘जितं मया’ म्हणत ‘कोई है?’ ची गर्जना करण्याच्या आणि बनचुके होण्याच्या जमान्यात त्यांच्या ‘वंशवृक्ष, पर्व, पारख, सह अनेक अनुवादांना ‘आ पारितोषात् विदुषाम्’ प्रशस्ती मिळाली असूनही आधल्या लेखनांच्या संदर्भात अजूनही ‘न साधुमन्येहं’ ही त्यांची भूमिका आहे. त्यांची ‘नागमंडल’ कार कार्नाड वगैरे कन्नड साहित्यिक अनुवाद. केंद्र साहित्य अकादमीने उत्कृष्ट अनुवादाचाही गौरव आपण करायला हवा. ही सुयोग्य भूमिका घेतल्यानंतरचा १९८९ मध्ये त्यांना अकादमीने पहिला पुरस्कार देऊन अनुवाद क्षेत्र हेही साहित्य निर्मितीच्या दर्जाचे आहे हे प्रकट केले. उमाची अनुवादक्षेत्राला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली ही घटना विशेष लक्षवेधी ठरते.
नेमाडेंच्या सूचनेचा अर्थ आता तुम्ही आत्मकथन लिहायला हवे असाही होतो. पण उमा या सुगृहिणी, विनयवती पत्नी, नातेवाइकांशी अनेक नातेसंबंधांनी जोडल्या गेलेल्या, आतिथ्यशील, विद्याप्रेमी वाचक. आपल्याला जे आस्वाद्य वाटते त्यात इतरांना सहभागी करून घ्यायला हवे या दृष्टिकोनातून त्या अनुवादाकडे वळल्या. उमा आणि विरुपाक्ष यांच्या आस्थेचे विषय म्हणजे लेखक, त्यांची पुस्तके, कलावंत आणि ते ते कलाक्षेत्र, सभा आणि संमेलने, वक्ते आणि त्यांची भाषणे, त्यांचे जीवन हीच एक कलानंद व जीवनानंद यांची मैफिल. तेव्हा स्वत:ला अलग करून आपल्या लेखन प्रपंचाला वेगळेपणाने कसं पाहायचं, कसं विचारात घ्यायचं हा प्रश्न होता. मनाने बहुधा त्यांना कौल दिला. आत्तापर्यंत तू जशी ज्यासाठी ज्यामुळे जगलीस ते आहे तसं सांग ना. त्यात त्यामुळे ‘होलियर दॅन दाऊ’ असा अभिनिवेष नाही, उपदेश किंवा मार्गदर्शन नाही, टीकाटिपणी नाही.
साधेपणा हे उमांच्या जगण्याचे वैशिष्ट्य जे या आत्मकथनात उतरतं.
विरुपाक्ष हे उच्च विद्याविभूषित वाचक रसपूर्ण जीवन जगणारे... त्यांचा एक विशेष गुण उमांपुरता मर्यादित राहिला. ते गानप्रेमी आहेत आणि नि:संकोची बाथरुमसिंगर आहेत. स्नान करतांना गायचं. नि:संकोच मन:पूत. त्यात नाट्यगीते, भावगीते, क्लासिकल काहीही असेल. ताल, ठेका, लय, पट्टी, गाण्याची संहिता यांचंही बंधन नाही. एकदा पहिला तांब्या डोक्यावर घेताना त्यांना (बहुधा) परवशता पाश दैवे ज्यांच्या गळा लागला हे गाणं म्हणावसं वाटलं. शब्दांची जरा गफलत होती, पण ते अडणारे नाहीत. त्यांनी मन:पूत आवाज लावला. ‘परवताच्या पायथ्याशी त्याचा गळा दाबला’ अगदी मीटरमध्ये, चालीत बसणारे गाणे.
उमा घाबऱ्याघुबऱ्या झाल्या. बाथरुमचे दार ठोकत ओरडल्या, अहो, काय गाताय हे?’
उमाच्या आत्मकथनात हेही क्षण येतात आणि नात्यातील भाबडेपणा जपण्याचे. ‘इट्स ए मॅड, मॅड, मॅड वर्ल्ड’सारखा सिनेमा पाहिल्याचे, अनिल अवचटांसारख्या समाजवेध घेणाऱ्या लेखकाशी झालेल्या गप्पांचे क्षण येतात. सत्कार आणि पुरस्कार प्रदान झाल्याचे सुखद क्षण येतात. कन्नड साहित्यात कुवेंपू यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला ही राष्ट्रीय स्तरावरची घटना होती. त्यानंतर डॉ. शिवराम कारंथ, डॉ. द. रा. बेंद्रे असे कन्नड साहित्यिकांना पुरस्कार मिळत गेले. पुरस्कारात श्रेणी असतात. तळातले पुरस्कार म्हणजे संस्था व व्यक्तीचे. नंतर राज्यपुरस्कार. नंतर सरस्वती सन्मान, उच्च म्हणजे साहित्य अकादमी दिल्ली, ज्ञानपीठ हा सर्वोच्च हा मिळाला की तुमच्या भाषेचा / साहित्याचा अत्युच्च गौरव होतो. मग अर्थातच कारंथाची, ‘मुकाज्जेय कनसगळू’ ही कादंबरी विरुपक्षांनी उमांना वाचून दाखवली. ‘मुकज्जीची स्वप्ने’ हा उमांनी अनुवाद केला. हा केवळ स्वत:साठी होता. नंतर लेखिका त्रिवेणी यांची ‘बेक्कीन कण्णू’. विरुपक्षांनी ही कादंबरी वाचली. टेप केली. उमांनी त्याचा अनुवादही केला. पण कॉपीराईटचा काही घोळ झाल्यामुळे अनुवाद प्रसिद्ध झाला नाही. पण एव्हांना विरुपाक्ष-उमा टीम तयार झाली होती. कन्नड मराठी शब्दकोशही विकत घेऊन झाला. त्यानंतर उमांनी ‘तनमनाच्या भोवऱ्यात’ (कारंथकृत) कादंबरीचा अनुवाद तयार केला. तो तोरणा प्रकाशनने प्रसिद्ध केला. इथून पुढे विरुपाक्ष-उमा टीमने मागे पाहिले नाही. त्यांचे अनुवाद येत राहिले. मराठी वाचक प्रतिसाद देत राहिले. अनुवादाच्या जगात उमांची नाममुद्रा झाली. मेहता प्रकाशनाने त्यांना अधिक लिहिते केले.
असा आत्तापर्यंत ५५ अनुवादांचा प्रपंच झाला. अजून या जोडीपुढे नववर्ष संकल्प आहेत.
अनुवादाच्या क्षेत्रातले काही खास प्रश्न असतात. त्या त्या प्रादेशिक काही रुढी-चौकटी-टॅबूज-तांत्रिक नावे असतात. शब्दप्रयोग, म्हणी, वाक्प्रचार असतात. शब्दश: भाषांतराचा इथे उपयोग नसतो. मग ते भावार्थाने घ्यावे लागते. ‘दहा जणांनी तुडवलेल्या जमिनीत पेरलेलं बी उगवत नाही.’ याचा अर्थ प्रत्येक कन्नड वाचकाला कळतो. नॉनकन्नड वाचकाला तो अर्थ चटकन कळणार नाही. सैल कासोट्याच्या स्त्रीचा उल्लेख इथे सूचित आहे. हे समजावून सांगावे लागते. भिन्न देश संस्कृती, जीवनरीती अनुवादात आणताना प्रयास पाडतात. गुड अर्थ मराठीत ‘धरित्री’मध्ये आणतांना सातोस्करांना किती प्रयास पडले असतील. यातले एक उदाहरण देतो. मोठ्या वाड्यातल्या मालकिणीला आपले पहिले अपत्य वाँग लुंगने ओ-लॅनसह नेले. परत येत असताना वाँग लुंगला पहिल्या अपत्याचा खूप अभिमान वाटत होता. त्या क्षणी तो दचकून म्हणतो, ‘या मुलीचा नसता त्रास होऊन बसलाय. देवीच्या व्रणांनी भयाण झालेल्या चेहेऱ्याच्या मुलीसाठी इथे कोणी नवस केला होता? ती मेली तर आमची सुटका तरी होईल.
फर्स्ट बॉर्न तोही सोन्यासारखा मुलगा. वातावरणात संचार करणाऱ्या भूतपिशाच्यांची दृष्टी या मुलावर पडू नये म्हणून असं बोलायचं.
भाषा संगम, संस्कृती संगम, त्या त्या राज्याची वैशिष्ट्ये लक्षात घेत अनुवाद करणे हे एकाअर्थी अनुसर्जन आहे. ते शब्दश: भाषांतर नव्हे. ती एकाअर्थी नवनिर्मिती आहे. राम पटवर्धनांच्या ‘दि यर्लिंग’च्या ‘पाडस’सारखी. शिवाय आपण अनुवाद वाचत आहोत या दृष्टीने वाचकही सुजाण होत जातो. जाणून घेण्याच्या त्याच्या कक्षा वाढत जातात. अनुवाद करणाऱ्याने मूळ कलाकृतीशी इमान ठेवायचे असते. तळटीपा देऊन लेखकाचे मुद्दे सोडण्यासाठी अनुवाद नसतो. अनुवादकाने अनुवाद तिसऱ्याच कोणाला अर्पण करणे उमांना अयोग्य वाटते. अनुवाद केला ही तुमच्या स्वत:ची निर्मिती नसते.
उमांच्या प्रसंगाप्रसंगाने निशिकांत क्षोत्री, स. शि. भावे, कमल देसाई, वि. म. कुलकर्णी, प्रभाकर व कमल पाध्ये, डॉ. द. दि. पुंडे, मृणालिनी जोगळेकर, गंगाधर गाडगीळ, विद्याधर पुंडलिक वगैरे लेखक मंडळीशी परिचय होत गेला. शिवराम कारंथ तर उमा विरुपाक्षांच्या घरी एका रात्रीसाठी आले आणि येतच राहिले. भैरप्पा त्यांच्या घरातले बनले. मग विरुपाक्ष मराठी साहित्य कन्नडमध्ये नेऊ लागले. नाही म्हटलं तरी विरुपाक्षांच्या लेखांचे संदर्भही दिले जात असत. बघता बघता उमाविरुपाक्षांच्या संसाराचे सहजीवन झाले. या घराला शब्दांचे वेड लागले. शब्द, सूर, रंग, यांचं वेड फार वाईट असते. अवघं जीवन नादमय होतं. जे जे उन्नत, उदात्त, उत्कट ते ते आपल्या भाषेत आणावं असा ध्यास निर्माण होतो.
‘तिळा उघड’ हा मंत्र उमा-विरुपाक्षांना मिळून गेला आहे. मेहता पब्लिशिंग हाऊसला अभिमान वाटावा असं हे पुस्तक आहे.
– अनंत मनोहर
- SHABDAMALHAR - JUNE 2018
समृद्ध आत्मकथन...
वाचनाच्या धुंदीत अनेक पुस्तकं हातात येत राहतात. आपण पुस्तकांना शोधतो; तसेच पुस्तकेही आपल्याला शोधत असतात. वाचनाला शिस्त असावी असे सगळेच पट्टीचे वाचक सांगत राहतात; पण ती प्रत्येक वेळी अंमलात येतेच असे नाही. गेल्यावर्षी आशय परिवारच्या नितीन वैद्यांनी ठरवून, संकल्प करून वर्षभरात शंभर पुस्तके वाचून त्यांच्या नीट नोंदीही ठेवल्या. असे कधीतरी आपल्याला ही जमेल, जमावे ही इच्छा मनात आहे.
तर पुस्तकांचा ओघ सतत सुरू असतो. यावेळी उमा वि. कुलकर्णी यांचे ‘संवादु-अनुवादु’ पुस्तक हाताशी लागले. खूप दिवसांनी झपाटून वाचावे, असे पुस्तक हाताशी लागले. एका झटक्यात वाचून हातावेगळे केले. कन्नडमधील कारंत / कार्नाड / कंबर / भैरप्पा / कटपाडी / वैदेही तेजस्वी अशा नामवंत लेखकांची ओळख माझ्यासारख्या तमाम मराठी वाचकांना उमातार्इंमुळेच झाली. त्यातही भैरप्पासारखे लेखक मलाही खूप आवडले. त्यांची इतकी मोठाली पुस्तके अनुवादित होऊन आपली कधी झाली ते कळलेच नाही. मग त्यांना त्यांचे पती विरुपाक्ष पुस्तके कानडीत ऐकवतात आणि त्यानंतर त्याचा अनुवाद होतो हे ही त्यांच्या कुठल्यातरी लेखातून कळत गेले. खरे तर अनुवादाचा हाच उत्तम मार्ग; कारण त्यात भाषेचा लहेजा टिकवून ठेवता येतो.
अनुवाद करणाऱ्या लेखकांना साहित्याच्या मुख्य धारेत पुरेसा सन्मान मिळत नाही, ही बाब संपूर्ण पुस्तकातून उमा वि. कुलकर्णी यांनी वारंवार मांडली आहे; पण यातून त्या बाहेर आल्याचंही आपल्याला त्यांच्या लिखाणातून जाणवतं. मुख्य म्हणजे या सगळ्या प्रकाराकडे बघताना कुठलाही रडका, तक्रारीचा सूर पुस्तकातल्या कुठल्याही पानावर उमटताना दिसत नाही हे या पुस्तकाचं सर्वांत मोठं यश. उमाताई आत्मचरित्र लिहीत आहेत, हे कळल्यावर मुंबईतल्या एका कुणीतरी लेखक - लेखिकेनं हिच्याकडे काय आहे लिहिण्यासाखं असंही म्हणाल्याचं मध्यंतरी कानावर आलं होतं. खुशवंत सिंग यांच्याकडे अमृता प्रीतम जेव्हा अगदी ठरवून वेळ मागून स्वत:च्या आयुष्याचा दु:खद पट मांडत होत्या तेव्हा खुशवंत सिंग म्हणाले होते, म्हणे की, अगं तुझी कहाणी बसच्या तिकिटावरदेखील अर्ध्या भागात मावेल. त्यांनी त्यांच्या आत्मचरित्राचं नाव ‘रसिदी टिकट’च ठेवलं होतं.
साधारण आत्मचरित्र म्हणजे नवऱ्याने केलेला मानसिक छळ, समाजाचा बहिष्कार, हवं ते करू न देणारे आई-बाप, भावंडांशी मांडलेला उभा दावा असेच साधारण चित्र असते. स्वत:च्या समृद्ध, जाणते होण्याचा प्रवास मांडण्याची संधी लेखक बऱ्याचदा गमावतो. यात हेच नेमकेपणे आलंय. कुठेही आक्रस्ताळेपणा नाही, कुणाच्याबद्दल निरगाठ नाही, निराश, हताश होणे नाही. खरे तर मूल न होण्याचे दु:ख आपल्यापेक्षा इतरांनाच जास्त होण्याच्या काळात लेखिकेने या दु:खावरदेखील हसत हसत मान केलेली जाणवते. (आजकाल भोवतालात ठरवून मूल होऊ न देणारी जोडपी सर्रास दिसतात!) विजापूरकडची भाषा आणि बंगळुरुच्या परिसरातील भाषा यात जमीन-आसमानचा फरक आहे. कन्नड भाषेत तब्बल ८ ज्ञानपीठ मिळवणारे लेखक आहेत आणि त्यांनी भाषेचं सौष्ठव वाढवलंय, त्याचा थांगपत्ता आम्हा मराठी वाचकांना उमातार्इंमुळेच लागला. तब्बल पन्नास एक पुस्तके उमातार्इंनी आजतागायत अनुवादित केली आहेत. हे करतानाच त्यांचा चित्रपट, दूरदर्शन, नाटक या सगळ्या पूरक कलांच्या निर्मितीशी अगदी जवळचा संबंध आला. हा सगळा पैसा त्यांनी या पुस्तकात रेखीवपणे मांडला आहे. अनुवाद करताना आलेले अनुभव, त्यातल्या अडचणी, एकंदरच अनुवादाकडे इतरांचा बघण्याचा दृष्टिकोन यावर त्यांनी विवेचकपणे लिहिलं आहे.
सुरुवातीचा लहानपणीचा काळ, त्यातल्या जडणघडणीच्या शक्यता त्यांनी नेमकेपणाने टिपल्या आहेत. ‘कानडी मराठी’ संसार आणि मोठी कुटुंबं त्या काळात सर्रास दिसायची. अशा कुटुंबात दोन मुली, पाच मुलं असा संसार आईनं कसा नेकीनं केला हे त्यांनी फारच हळवेपणानं लिहिलं आहे. आईशी असलेल्या संबंधांबद्दल त्यांनी फारच उत्कटपणे लिहिलं आहे. आईशी वेळी-अवेळी केलेली फोनवरची चर्चा आणि त्यानंतर त्यांचा झालेला मृत्यू मनाला फारच चटका लावून जातो.
लहानपणी रात्री-अपरात्रीसुद्धा पाहुणे आले की, काहीतरी गरम जेवण करून वाढणारी आई त्यांच्या कुशीतल्या बाळाला उमातार्इंच्या मांडीवर देऊन चटकन स्वयंपाकाला लागायची. अशावेळी अर्धवट झोपेत लहान भावाला मांडीवर झोपवत, थोपटत राहावे लागे. या ठिकाणी शं. ना. नवरेंची एक कथा आठवत राहिली. लेखक रात्री-अपरात्री कार्यक्रम करून ओळखीच्या माणसाकडे मुक्काम करायचे. एकदा कोकणात अशाच त्यांच्या ओळखीच्या माणसांकडे अपरात्री पोहोचल्यावर घरातील यजमानीण पटकन चुलीवर पिठलं भात टाकायला उठली. तेव्हा घरात इतस्तत: गाढ झोपलेल्या मुलांना दरादरा ओढत, जागे करत त्या पुरुषाने लेखकासाठी जागा केली. तेव्हा लेखक संकोचून जातो. मग जेवण ताटात वाढू की केळीच्या पानावर या प्रश्नावर लेखक विचार करून केळीच्या पानाची तयारी दाखवतो. जेणे करून माऊलीला एक ताट कमी घासावे लागेल. कर्ता पुरुष चटकन आत जातो. हातात अक्षता घेऊन बाहेर येतो. केळीच्या पानावर अक्षता टाकतो आणि एक झकास पान काढून लेखकाला जेवण वाढतो. याला राहवत नाही. तो विचारतो, या अक्षतांचं काय प्रयोजन. मालक म्हणतो, ‘केळ झोपलेली असते ना! तिला जागी केली. मग पान कापून आणले.’
उमातार्इंना अनेक कानडी तसेच मराठी लेखकांचा सहवास लाभला. त्याचा त्यांनी यथोचित उल्लेख केला आहे. अवचट / पु.ल. / सुनीताबाई यांच्याबरोबरच्या अगदी बारीकसारीक आठवणी त्यांनी मांडल्या आहेत. कानडीतील प्रसिद्ध तेजस्वी या लेखकाबरोबर जेव्हा उमाताई अवचटांचा उल्लेख करतात तेव्हा विरुपाक्षांचे परखड मत आपल्यालाही पटते. तेजस्वी या निसर्ग विज्ञानाची आस्था असलेल्या लेखकाबद्दल मारुती चितमपल्लीदेखील खूप आदर करतात.
लग्नानंतरच्या मोठ्या कानडी कुटुंबातला प्रवेश उमातार्इंना बरेच काही शिकवून गेलेला दिसतो. पहिले सहा महिने पाहुणे कोण आणि आपले कोण? याचा त्यांना थांगपत्ताच लागत नव्हता. त्यांच्या रंगाचा उल्लेख करताना सासूबाई म्हणायच्या की तुमच्या आईने तुमच्याकडून जुईची फुलं देवावर वाहिल्यामुळे तुम्हाला गोरे नवरे मिळाले. (विरुपाक्ष रूपाने गोरे!) बऱ्याचदा हेच ऐकल्यावर एके दिवशी तुम्ही पण तुमच्या मुलांना जुईची फुलं वाहायला लावायची, म्हणजे त्यांनाही गोऱ्या बायका मिळाल्या असत्या, हे बाणेदार उत्तर देणाऱ्या उमाताई पुस्तकातून सतत डोकावत राहतात. त्यांच्या घराचा किस्सा तुकड्या तुकड्यातून उत्कंठा वाढवत राहतो. त्यांना घराचा ताबा मिळाल्यावर वाचकही नि:श्वास टाकतो. बाकी फार कुठला टोकाचा संघर्ष करावा लागल्याचा कुठलाही उल्लेख नाही; कारण नवरा समजूतदार, लेखनाला वेळ देणारा मिळाला. हे त्यांनी मनापासून मान्य केलं आहे. सहजीवनाचा संपूर्ण आनंद घेत त्यांचे जगणे सुरू आहे.
अनुवादामुळे अनेकांशी संपर्क आला. कर्नाटकातल्या अति दुर्गम भागात फिरता आले. हा सगळा भाग अतिशय रोमांचकपणे उतरला आहे. अनेक सन्मान-सत्कार उमातार्इंना मिळाले. त्या त्यावेळी त्यांच्या भावना त्यांनी संयतपणे मांडल्या आहेत.
खरे तर मेहता प्रकाशनाची अनुवादामध्ये मातब्बरी आहे. उमातार्इंच्या अनेक अनुवादांचे प्रकाशक मेहताच आहेत; एकंदरच एक उत्तम सोज्वळ, सात्त्विक आत्मचरित्र वाचल्याचे समाधान या पुस्तकाने लाभले.
- गणेश कुलकर्णी
- DAINIK LOKSATTA (LOKRANG) 03-06-2018
अनुवादकार्यातील अनुभवकथन...
ज्येष्ठ अनुवादिका उमा वि. कुलकर्णी यांचे ‘संवादु अनुवादु’ हे एक प्रांजळ आत्मकथन आहे. आपल्या लेखनाला उमा कुलकर्णी यांनी ‘आत्मचरित्र’ न म्हणता ‘आत्मकथन’ म्हणणे लेखनाचे एकूण स्वरूप पाहता अधिक सयुक्तिक व अर्थपूर्ण वाटते. एक तर आत्मचरित्रात जाणता-अजाणता येणारा आत्मसमर्थनापासून आत्मशोधापर्यंतचा सूर या लेखनात लेखिकेला अभिप्रत नाही. ‘कथन’ म्हणजे सांगणे. इथे सांगण्याला महत्त्व आहे. या सांगण्यात घटना, प्रसंग, व्यक्ती आणि घडामोडी जरूर आहेत; पण त्यांना पुरोभागी आणण्याचा अट्टहास नाही की त्यांचे विश्लेषण करण्याकडे त्यांचा कल नाही. अगदी आपल्या अनुभवकथनात निष्कर्ष काढण्याचीदेखील त्यांना घाई दिसत नाही. त्याऐवजी या कथनात सांगण्यातला सहजपणा आणि अनौपचारिकपणा आहे. ओघाओघात जे सांगायचंय ते सांगितलेलं आहे आणि हेच या लेखनाचं सौंदर्य आहे. ‘अनुवाद’ या आपल्या अंगीकृत कार्याच्या अनुषंगाने केलेली आणि अजूनही चालू असलेली वाटचाल लेखिकेने यात विस्ताराने सांगितलेली आहे. लेखिका अनुवादकार्याकडे योगायोगानेच वळली आणि पुढे तेच तिच्यासाठी प्रेयस आणि श्रेयस झाले. त्यातून जगण्याला एक अर्थपूर्णता प्राप्त झाली याचे भान आणि समाधान लेखिकेच्या शब्दाशब्दांतून व्यक्त झालेले आहे.
या लेखनाचा मुख्य भर हा अन्यभाषिक साहित्याचा मराठीत अनुवाद करताना आलेल्या अनुभवांवर आहे. या क्षेत्रातला उमा कुलकर्णी यांचा अनुभव आणि कार्य प्रदीर्घ आहे. कन्नड साहित्यातील शिवराम कारंथ, कृष्णमूर्ती पुराणिक, पूर्णचंद्र तेजस्वी, यू. आर. अनंतमूर्ती, पुटाप्पा, फकीर महंमद, गिरीश कर्नाड, सुधा मूर्ती ते आताच्या वैदेहीपर्यंत आणि मुख्यत: भैरप्पा अशा भिन्न-भिन्न प्रकृतींच्या नामवंत प्रतिभावंतांच्या साहित्यकृतींचे अनुवाद त्यांनी केलेले आहेत. आणि हे अनुवाद मराठीत लोकप्रियही झालेले आहेत. हे अनुवाद करताना आलेले अनुभव उमा कुलकर्णी यांनी या पुस्तकात सांगितलेले आहेत आणि ते निश्चितच वाचनीय आहेत. अनुवादकार्याच्या प्रदीर्घ वाटचालीत साहित्याच्या अनुवादासंबंधीची त्यांची काही मते तयार झालेली आहेत. त्यापैकी वानगीदाखल काही : ‘अनुवादक हा निव्वळ भारवाही नाही. अनुवादात सर्जनशीलता हवी’, ‘अनुवादकाला एक वेगळ्या प्रकारची साहित्यिक दृष्टी असणं आवश्यक आहे. ही दृष्टी समीक्षकापेक्षा वेगळी हवी. त्यात कलाकृतीविषयी ममत्व अत्यावश्यक आहे’, ‘अनुवादकानं प्रत्येक शब्दापेक्षा त्यातील आशयाशी प्रामाणिक राहायला पाहिजे. भाषिक कसरतीपेक्षा पात्रांच्या मानसिकतेवर भर दिला पाहिजे’, ‘अनुवाद ‘आज्ञाधारक’ असावा, ‘सांगकाम्या’ नको...’ इत्यादी.
अनुवादासाठी कानडीतील कुठले साहित्य त्या निवडतात, यासंबंधी उमा कुलकर्णी सांगतात, की मराठीमध्ये ज्या पद्धतीचे लेखन आहे, त्या प्रकारचेच कानडी साहित्य निवडण्यापेक्षा जे मराठीत नाहीये त्या प्रकारचे साहित्य देण्यात त्यांना रस वाटतो.
उमा कुलकर्णी यांनी आपल्या कौटुंबिक जीवनाविषयी लिहिले आहे. लहानपणीचे बेळगावमधले दिवस, कुटुंबातील नातेसंबंध, बेळगावचा परिसर, मित्र-मैत्रिणी, बेळगावच्या अवतीभवतीची बेडकीहाळ, हक्केरी, हनगंडी, एकसंबा आदी सीमावर्ती गावे, बेळगावचा पावसाळा, कर्नाटकातील ब्राह्मणी कुटुंबांतले रीतिरिवाज, चालीरीती, सणवार, वंशवृक्ष सांगणारे ‘हेळवे’, सनातनी पद्धती, लग्नविधी, संस्कार, खाणेपिणे आदींमधून त्यांनी कर्नाटकातील ब्राह्मण समाजाच्या विशिष्ट संस्कृतीचे चित्रमय दर्शन यात घडवले आहे.
उमा कुलकर्णी यांनी आपल्या आणि पती विरुपाक्ष कुलकर्णी यांच्या सहजीवनासंबंधीही सविस्तर लिहिले आहे. हे सहजीवन परस्परपूरक आहे, समंजस आहे. एकमेकांना मनापासून समजून घेणारे आहे. कौटुंबिक कर्तव्ये व जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडणारे आहे. परस्परांना आदर व प्रेम देणारे आहे. परंपरा आणि नवतेची बूज राखणारे आहे. मैत्रभाव जपणारे आहे. आयुष्याच्या वाटचालीत भेटलेल्या स्नेहीजनांचे चित्रणही त्यांनी अत्यंत आपुलकीने या पुस्तकात केले आहे.
उमा कुलकर्णी यांनी भरपूर प्रवास केला आहे आणि त्याविषयीची त्यांची निरीक्षणेही त्यांनी मार्मिकपणे शब्दबद्ध केली आहेत. मुडबिद्रीसारख्या एका छोट्या गावात एका व्यक्तीने कुठल्याही सरकारी मदतीशिवाय आयोजित केलेल्या महासाहित्य संमेलनासंबंधी त्यांनी सविस्तर लिहिले आहे. या चार दिवसीय संमेलनाचे प्रवेश शुल्क (राहणे, नाश्ता, जेवण) फक्त १०० रुपये! २० पानी संमेलनपत्रिका, स्वखर्चाने आलेले हजारो साहित्यप्रेमी, भरगच्च कार्यक्रम, कविसंमेलन असे खूप काही या संमेलनात होते. खंत ही की, आपल्या महाराष्ट्रातील साहित्य संमेलनांमध्ये असे अभूतपूर्व दृश्य का दिसत नाही? असो!
कानडी भाषेतील भैरप्पांचे साहित्य मराठीभाषक वाचकांमध्येही अत्यंत लोकप्रिय आहे, आणि त्याचे श्रेय उमा कुलकर्णी यांच्या सुंदर अनुवादांना निश्चितच आहे. परंतु मराठी अभ्यासू जाणकारांमध्ये भैरप्पांच्या साहित्याबद्दल व त्यामागच्या त्यांच्या जीवनदृष्टीबद्दल काहीएक शंका आहेत. त्या उमा कुलकर्णींना निश्चितच माहीत असणार. भैरप्पांची यासंदर्भातली भूमिका नेमकी काय आहे, हेही त्यांना माहीत असणार. त्यासंबंधी त्यांनी या आत्मकथनात लिहायला हवे होते असे वाटते. यू. आर. अनंतमूर्तीच्या शेवटच्या काळात त्यांनी वेदमंत्रांची कॅसेट ऐकणे आणि मृत्यूनंतर माध्व ब्राह्मणांनी मंत्रघोष करणे हा उल्लेख आहे. तो अनुचित वाटतो. या एका घटनेमुळे अनंतमूर्तींनी आयुष्यभर जपलेल्या पुरोगामी मूल्यांना बाधा येते असे बिलकूल वाटत नाही. परंतु ही घटना खरी आहे असे मानले तर उमा कुलकर्णींना प्रिय असणाऱ्या स्नेहीजनांमध्येही असे कितीतरी अंतर्विरोध आहेत हेसुद्धा दाखवता येईल. ते त्यांना दिसले नाहीत किंवा दिसले असतील तर त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले असे म्हणायचे का? गौतम बुद्ध हा उपनिषदकालीन ऋषी होता, असे भैरप्पा म्हणतात असा उल्लेख आहे. त्याचा पुरावा काय, असे त्यांना का विचारावेसे वाटले नाही? पु. ल. देशपांडे यांच्यासारख्या लोकप्रिय मराठी लेखकाच्या साहित्याचा अनुवाद कानडीमध्ये मात्र लोकप्रिय झाला नाही. असे का घडले, याची चिकित्साही केली गेलेली नाही. ती केली असती तर तेथील सांस्कृतिक अभिरुचीवर प्रकाश पडला असता असे वाटते.
उमा कुलकर्णी या चित्रकारही आहेत. या सर्जनशील छंदाविषयी व त्यातल्या निर्मितीच्या अनुभवांविषयी त्यांनी सविस्तर लिहिले असते तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक विलोभनीय पैलू यात दिसला असता. अर्थात या आत्मकथनामध्ये आत्मप्रौढी नाही, कटुता नाही, दुराग्रह नाही. उलट नितळपणा, मोकळेपणा व पारदर्शकता आहे आणि ‘जे घडले तेचि पसंत’ असा सूर आहे. मराठी आणि कानडीचा प्राचीन काळापासून चालत आलेला ऋणानुबंध आजच्या काळात अनुवादकार्यातून पुढे नेणाऱ्या उमा कुलकर्णी यांचे ‘संवादु अनुवादु’ हे आत्मकथन उत्तरोत्तर अधिक वाचनीय आणि माहितीपूर्ण होत गेले आहे.
– अविनाश सप्रे
- अक्षय चोरगे
अनुवादाच्या क्षेत्रात उमातार्इंचा अनुभव खूपच दांडगा आहे. लग्नापर्यंतचा काळ बेळगावात गेल्याने कन्नड भाषा कळत होती, मात्र ती त्यांची बोली भाषा नव्हती. पती विरुपाक्ष मात्र कन्नड बोलणारेच होते. त्यांच्या नोकरीमुळे लग्नानंतर पुण्याच्या वास्तव्यात मित्र परिवारात सकाळ -संध्याकाळ फिरणे, बाहेर जेवणखाण आणि आपसात भरपूर गप्पा, हाच उद्योग होता. या वेळी एकमेकांच्या साहित्यप्रेमाची ओळख पटली. त्याच वेळी कन्नड साहित्यातील शिवराम कारंतांच्या कादंबरीला तिसरा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. मराठी साहित्यापेक्षा कन्नड भाषेत निराळे काय आहे, याविषयी त्यांना औत्सुक्य होते. विरुपाक्षांनी कारंतांची ही कादंबरी वाचण्यासाठी मागवून घेतली, व त्यातील आशय जमेल तसा उमातार्इंना ते सांगू लागले. सहजच उमाताई त्याचं भाषांकन मराठीत कागदावर उतरवू लागल्या आणि हाच त्यांच्याकडून घडलेला पहिला अनुवाद. लहानपणच्या बेळगावातील वास्तव्याविषयी, तसेच नातेसंबंध, सामाजिक घडामोडी, याविषयीच्या अनुभवाविषयीचे कथन येते. आजूबाजूचा परिसर, मित्रमंडळी यांच्या प्रेमळ आठवणी, थोर साहित्यिकांच्या सहवासाचा, त्यांच्या स्वभावाचा समृद्ध करणारा अनुभवही कधी मिस्कीलतेने, कधी गंभीर भाष्य करून त्या सांगतात. आयुष्यात त्यांना भेटलेल्या विविध व्यक्तिरेखांच्या सवयी, स्वभाव बारकाईने सांगून त्यांची आपल्याशीही सहज भेट घडवतात. यात साहित्यिक लेखन, खाद्य पदार्थांची देवाणघेवाण, त्यांचा चित्रकलेचा छंद, नवीन गोष्ट शिकणे या सगळ्याची ओळख होते. नेहमीच्याच ओघवत्या शैलीतील हे वर्णन कन्नड संस्कृतीशी जोडून घेणारे, वाचकांना पुस्तकाशी गट्टी करायला लावणारे आहे. लेखिकेने आयुष्याच्या पूर्वार्धातील बेळगावातील वास्तव्याविषयी, नातेसंबंधांविषयी, सामाजिक घडामोडींविषयीचे कथन; तसेच, आजूबाजूचा परिसर, मित्रमंडळी यांच्या प्रेमळ आठवणी, थोर साहित्यिकांच्या सहवासाचा, त्यांच्या स्वभावाच्या समृद्ध करणाऱ्या अनुभवाविषयी केलेले मिस्कील, तर कधी गंभीरही भाष्य.
- SAHITYA SUCHI, MARCH 2018
अनुवादकाच्या मनातला संवाद...
एखाद्या भाषेची ओळख असणं वेगळं आणि थोड्याशा परिचित असलेल्या भाषेचा जाणीवपूर्वक पाठलाग करून ती भाषा आपलीशी करणं हे आणखीनच वेगळं! उमा कुलकर्णी यांच्या बाबतीत हा प्रवास झाल्याचं आपल्याला दिसतं. त्यांचा हा सगळा प्रवास ‘संवादु अनुवादु’ या आत्मकथनातून वाचकांसमोर आला आहे.
उमा कुलकर्णी यांचा जन्म बेळगावचा. घरात तसं मराठी वातावरण. विरुपाक्ष कुलकर्णी यांच्याशी लग्न झालं आणि कन्नड या भाषेशी परिचय वाढवला. उमा कुलकर्णी यांना कन्नड समजायचं, या भाषेतले विनोदही समजायचे पण बोलता यायचं नाही. त्यामुळं त्यांच्या घरात ‘सीमावाद’ रेंगाळत होता. त्याचं वर्णनही या पुस्तकात वाचायला मिळतं. ‘घरात कन्नड बोललो नाही, तर आपल्याला अनायसे येणारी एक भाषा आपसूक मरून जाईल,’ असं म्हणत विरुपाक्ष यांनी त्यांना कन्नड शिकण्यासाठी प्रोत्साहन दिलं आणि लग्नानंतर सुमारे दीड वर्षांनी कर्नाटक महाराष्ट्राचा भाषिक सीमाप्रश्न सुटल्याचं त्या सांगतात.
डॉ. शिवराम कारंत यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आणि त्यांच्या साहित्याबद्दल उमा कुलकर्णी यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली. शिवराम कारंतांचं साहित्य अधिक समजावं म्हणून त्याचं मराठीकरण कुलकर्णी यांनी केलं आणि त्यांच्या अनुवादाचा प्रवास सुरू झाला. कारंत यांचं ‘तनामनाच्या भोवऱ्यात’ हे पुस्तक प्रकाशित झालं. पुढं कन्नड साहित्यिक डॉ. एस. एल. भैरप्पा यांच्या ‘वंशवृक्ष’, ‘पर्व’, ‘मंद्र’, ‘जा ओलांडुनी’, ‘काठ’, ‘परिशोध’, ‘तंतु’ अशा पुस्तकांचा अनुवाद उमातार्इंनी केला. गिरीश कार्नाड यांच्या ‘नागमंडल’, ‘तेलदण्ड’ या पुस्तकांचाही अनुवाद केला.
अनुवादक म्हणून उमा कुलकर्णी यांचा हा सगळाच प्रवास आपल्याला वाचक म्हणून परिचित आहे पण अनुवादक म्हणून त्या घडत असतानाची प्रक्रिया नेमकी काय होती? त्यांच्या आयुष्यात कोणत्या जिवाभावाच्या व्यक्ती आल्या? कोणत्या सुहृदांनी त्यांचा जीवनपट समृद्ध केला. पुस्तकांच्या या जगानं त्यांचं आयुष्य कसं बहरून गेलं या आणि अशा अनेक गोष्टी ‘संवादु अनुवादु’ मध्ये वाचायला मिळतात. ‘अनुवाद ही स्वतंत्र कलाकृतीच असते.’ हे वाक्य आपण वारंवार ऐकलेलं असतं पण ही ‘स्वतंत्र कलाकृती’ घडण्यासाठी अनुवादकाला जी धडपड करावी लागते, ती अगदी तटस्थपणे उमा कुलकर्णी आपल्यासमोर ठेवतात. स्वत:च स्वत:शी गप्पा माराव्यात आणि आपल्या त्या कानावर पडाव्यात, इतक्या सहजशैलीत हे पुस्तक लिहिलं गेलं आहे आणि तेच त्याचं वैशिष्ट्य आहे. उमा कुलकर्णी यांच्यातल्या अनुवादकाच्या मनातला संवाद जाणून घेण्यासाठी हे आत्मकथन आवर्जून वाचायला हवं.
- Mrunmayee Ranade
Just finished Samvadu-Anuvadu by Uma Kulkarni. उमा कुलकर्णीलिखित संवादु अनुवादु. Kulkarni has been translating Kannada literature into Marathi for many decades now. She has brought many famous and reputed authors like Bhairappa, Tejasvi, Kuvempu, Karnad, etc to Marathi, which is a big big favour to the Marathi reader. This book is autobiographical. She begins in Belgavi, where she was born. And it ends in Pune, which has been her home after marriage to Virupaksh Kulkarni. She writes about the simple lifestyle then in Belgavi, her family, etc. She gets married at 20 or 21 and comes to Pune. Both are avid readers. But, Virupaksh can`t read Marathi, and Uma, Kannada; though both can understand the other language well. Virupaksh reads her a Kannada story and she casually writes it down in Marathi. Once it is over, she realises she has translated it. This sequence continues even now, all the books or stories that she has translated are read to her by Virupaksh. The only difference now is he records it and she can play at her time. An interesting point is Virupaksh makes breakfast every day, so that Uma is free to write in the fresh morning time.
The book tells us about the bond that developed between The Kulkarnis and the Kannada authors over the years. We get to know the human being behind the powerful author.
Uma`s style is simple, it flows uninterrupted. I took 3 days to read only because I get time to read only at night.
Another thing that left a mark on my mind is the अर्पणपत्रिका. She has dedicated the book to the child that she couldn`t have. The couple accepted early in life that they won`t be able to have a child. There is a mention of the tests that they did. There is also an incident where Virupaksha`s mami arranges a ritual called Guggul which involves a procession through the village. I could only imagine what both of them must have gone through then, but Uma writes about it as if it has happened with someone else. Without any grudge, any anger. She believes that she could translate so many books, because she didn`t have a child and she could give her undivided attention to books. She doesn`t mean that married persons can`t work, there are lakhs of them doing it, she feels that for herself.
This was a book I read after a long long time, i have been reading much online, mainly articles - long and short. I was happy my mother sent this to me.
Uma is an independent author as well as a painter. She has her doctorate in the temples of South India.
A must read for translators. She writes about the process quite well.
- Mohini Pitke, Marathi Pustak Premi
परदेशी भाषांतील बऱ्याच सामान्य , असामान्य कलाकृतींचे अनुवाद प्रसिद्ध होताहेत ! अगदी भाराभर!
अशा सगळ्या व्यावहारिक गुंतागुंतीच्या वातावरणात आपल्या गुणवत्तेने वाचकांच्या विचारविश्वाशी आणि भावविश्वाशी जिव्हाळ्याचे नाते जोडणारे कन्नड- मराठी अनुवाद आणि त्यांच्या समर्थ लेखिका
उमा कुलकर्णी
पंचावन्नपेक्षा अधिक उत्तमोत्तम कन्नड पुस्तकांचे अनुवाद उमाताईंनी अगदी प्रत्ययकारी पध्दतीने केले आहे .
या साऱ्या विलक्षण, आत्मसंवादी अनुभवांचे आत्मकथन म्हणजे नुकतेच प्रसिद्ध झालेले त्यांचे पुस्तक
` संवादु- अनुवादु `
आधीच सर्जक लेखन म्हणजे लेखकाचा विषयाशी, स्वतःशी आणि वाचकांशी चाललेला असतो . या संवादातून कितीतरी गहन गूढ गोष्टी उलगडत जातात .
त्या लिहितात,
अनुवाद हेही एक सर्जक प्रक्रिया आहे . दोन भाषांमधल्या वैशिष्ट्यांचे भान ठेवणे, प्रत्येक भाषेचा डौल , ढब सांभाळणे , शब्दश: अर्थापेक्षा त्यांचा आंतरिक भाव शब्दात उतरविणे अतिशय महत्त्वाचे आहे `
या आत्मकथनात उमाताईंनी बालपणापासूनच्या आयुष्यातील विविधरंगी अनुभव अतिशय प्रामाणिकपणे, संयमाने आणि तरलपणे कथन केले आहेत
विवाहोत्तर मिळालेली पतीची भक्कम साथ , प्रोत्साहन यामुळे त्यांचे मनोबल वाढत गेले .
उत्तम शिक्षक , मार्गदर्शक , स्नेहीजन यामुळे त्यांची उमेदही वाढली .
माणसांचे कडू- गोड अनुभवही आले . पण लेखिकेच्या मनात कटुता नाही . अपयश, उपेक्षा , अवमान यांचेही धनी व्हावे लागले .
डॉ . कारंत , भैरप्पा, पूर्णचंद्र तेजस्वी अशा दिग्गजांचा सहवास मिळाला .
पुण्यातही अनिल अवचट, कमल देसाई, डॉ . द . दि . आणि शकुंतला पुंडे ,पु . ल . सुनीताबाई अशा श्रेष्ठ सर्जनशील कलाकारांचा सहवास आणि मार्गदर्शन मिळाले .
अनुवादाच्या प्रक्रियेविषयीचे त्यांचे चिंतन परिपक्व आहे . त्यांचे अनुवाद सर्जक कलाकृतीच आहेत .
त्यांच्या आठवणी अंतर्मुख करणाऱ्या आहेत त्यावर नर्म विनोदाचा शिडकावा आहे .
त्यांच्या मते एखादी कादंबरी समजून घेणे आणि ती वाचकांपर्यंत नेण्याची निकड भासणे फार महत्वाचे आहे .
उमाताई म्हणतात
माझी अनुवादात रमण्याची कारणं भाषेपेक्षा त्यातील आशयाशी निगडित आहेत .
` संवादु- अनुवादु असे पारदर्शक आत्मकथन आहे . अनुवादाकडे एक नवे ` सर्जन` म्हणून पाहणाऱ्या एका प्रगल्भ लेखिकेचा वैचारिक समृद्धीकडे चाललेला प्रवास आहे .
- डॉ राजेंद्र माने
अनुवादाचा समृद्ध प्रवास सांगणारं आत्मकथन
आताच संवादुअनुवादु हे उमा कुलकर्णी यांचे आत्मकथन वाचून संपवले.
आयुष्याचा आलेख खुप सुंदर पध्दतीने मांडलाय.कुठंही अहंभावाचा स्पर्श न होता किंवा कुठल्याही नात्यावर ओरखडा न येता लिहिले आहे.
अनुवादाचा प्रवास सांगताना भैरप्पा, अनंतमुर्ती, वैदेही, तेजस्वी, कर्नाड या आपल्या सहवासात आलेल्या लेखकांचा एक माणूस म्हणूनही परिचय यातून वाचकाना होतो. त्यांच्या सहवासातील भोवताल, निसर्ग, प्रादेशिकता, लोकसंस्कृती याचं प्रतिबिंब त्यांच्या कथा कादंबऱ्यात कशा पद्धतीने येतं यावर या पुस्तकात चांगला प्रकाश टाकला गेला आहे. त्या अर्थानं हे आत्मचरीत्र महत्वाचं ठरेल.
कन्नड मराठी अनुबंध यातुन उत्तम रितीनं सामोरा येतो.
अनुवाद करताना करणाऱ्याची एक वेगळी मानसिक अवस्था असते, शब्दशोध असतो, त्या संस्कृतीची ओळख करून इतराना करून देणे असतं. ते सर्व संवादुअनुवादु मधून समजून घेता येतं.
कन्नड संस्कृतीत वावरताना सासर माहेर मधील प्रसंग, माणसे, घटना संवाद याचे चित्रणही यात आहे.
मराठी मालिका लेखन करतानाचे अनुभव.केतकर वहिनी सारखं स्वतंत्र लेखन करतानाचे अनुभव यात आहेत.
अनिल अवचट, कमल देसाई, वगैरे अनेकांचे सहवासातले घटना प्रसंग अनुभव यात आलेने याला वेग आणि महत्व येते.
उमाताईंनी अनुवाद क्षेत्रात दिलेले मोठे योगदान त्यांना मिळालेले पुरस्कार. त्यांचे पती विरूपाक्ष कुलकर्णी यांची झालेली मदत हे सगळं हे वाचून वाचकापर्यंत पोहोचतं
या आत्मकथनात कुठच तक्रारीचा सूर नाही उलट समाधानाचा शिडकावा आहे. तृप्तता आहे. स्वतःचा जीवानुभव सांगताना कन्नड मराठी भाषेचा नातेबंध सांगणारे हे आत्मकथन आहे.
अनुवादा भोवती असणारा आयुष्याचा समृध्द फेर यातून सामोरा येतो. वाचकाना अंतर्मुख करतो. पुन्हा ही अनुवादित पुस्तके वाचायला प्रवृत्त करतो.
आवर्जुन वाचावं असं हे आत्मकथन आहे.
- Divya Marathi Madhurima 13-3-18
कानडी लिहिता वाचता येऊ लागल्याने माझी कानडी-मराठी अशी धडपड सुरू होती. त्या निमित्ताने उमाताईंजवळ अनेकदा फोनवर बोलणं होत होतं. त्या कानडी भाषा शिकलेल्या नाहीत आणि त्यांचे यजमान त्यांना कानडी पुस्तकं वाचून दाखवतात व ते ऐकून त्या त्याचा मराठीत अनुवाद करतात, हेही कानावर आलेलं होतं. अशा पद्धतीने त्या इतके अनुवाद कशा काय करू शकतात, हा प्रश्न माझ्यापुढे कायमच असायचा. त्यामुळे त्यांचं आत्मकथन येतंय हे कळल्यावर मी कमालीची उत्सुक होते. ४२६ पानांचं हे पुस्तक हातात आल्यावर तिसऱ्या दिवशी पूर्ण वाचूनच खाली ठेवलं. एकदा वाचून समाधान झालं नाही म्हणून परत वाचून काढलं. सुंदर सोप्या भाषेत लिहिलेलं पुस्तक. विशेष म्हणजे त्यात कुठे `मी`चं अस्तित्वच जाणवत नाही. सनसनाटी मजकूर नाही, कुठली तक्रार नाही, प्रौढी नाही. जीवन समोर आलं तसं स्वीकारल्याचा आनंद आणि त्याविषयीचे असंख्य अनुभव. आपल्यातलीच वाटावी अशी एक सामान्य गृहिणी आपल्याजवळ गप्पा मारत आहे, आपले अनुभव शेअर करत आहे, असा सगळा मामला.
आत्मचरित्र म्हटलं की, त्यात कौटुंबिक भाग असणं अनिवार्यच. पण उमाताई त्यात जास्त रेंगाळलेल्या दिसत नाहीत. या पुस्तकात फक्त सत्तर-ऐशी पानांमध्ये हा कौटुंबिक भाग आलेला आहे. माहेर बेळगाव. या माहेरच्या सुषमा कुलकर्णी. शिस्तशीर वडील व उत्तम गृहिणी असलेली आई यांच्या छत्रछायेखाली या सात भावंडांचं मजेत, सुखात गेलेलं बालपण. घरकामाबरोबरच सायकलिंग, पोहणं, वाचन याचे बालपणीच झालेले संस्कार. बेळगावमधील त्या काळातल्या खूप आठवणी आपल्याला इथे वाचायला मिळतात. सासर गावातलंच, पण कानडी. त्या घरात सगळी कानडी बोलत असत. परंतु त्यांचे यजमान विरूपाक्ष यांना मराठी येत असल्याने उमाताईंना फारसं कठीण गेलं नाही. तसं त्यांनाही थोडंफार कानडी समजत होतं पण बोलता येत नव्हतं. काहीशा कर्मठ असलेल्या या भल्यामोठ्या कुटुंबाची ओळख उमाताई अगदी मोकळेपणी करून देतात. तेथील सोवळंओवळं, देवपूजा, व्रतवैकल्ये याविषयी वाचताना सत्तरच्या दशकातील कर्नाटकातील कानडी कुटुंब डोळ्यासमोर उभं राहतं. ही ओळख तशी थोडक्यात असली तरी त्यांचे कुटुंबीय पुस्तकात प्रसंगानुरूप आपल्याला पुन्हा पुन्हा भेटत राहतात.
लग्नानंतर त्या पुण्याला बिऱ्हाडात येतात व त्यांच्या आयुष्यातील नवीन पर्व सुरू होतं. याच काळातली एक गंमत. एके दिवशी विरूपाक्ष सांगून टाकतात, `आजपासून आपल्या घरातली भाषा कानडी असेल.` त्यानंतर उमाताई प्रयत्नपूर्वक छान कानडी बोलायला शिकतात. एका बाजूला बीएची परीक्षा, नंतर चित्रकला विषय घेऊन एमए, त्यानंतर पीएचडीसाठी भटकंती असं सगळं सुरू असतानाच, साहित्याची आवड असणाऱ्या विरूपाक्षांबरोबर कानडी-मराठी साहित्यावर भरपूर गप्पा होत असत. एकमेकांची साहित्याची आवड परस्परांकडून जोपासली गेली हे त्या मनापासून सांगतात.
एवढा कौटुंबिक भाग सोडला तर उरलेल्या संपूर्ण पुस्तकात त्यांनी केलेले विविध पुस्तकांचे अनुवाद, त्या अनुषंगाने होणाऱ्या लेखकांच्या, साहित्यिकांच्या गाठीभेटी, कर्नाटकातील विविध स्थळांना दिलेल्या भेटी आणि त्या त्या वेळेचे अनुभव व किस्से वाचायला मिळतात.
अनुवादित केलेल्या काही कादंबऱ्यांची त्यांनी या पुस्तकात ओळख करून दिली आहे. काही कथानकं, काही कादंबऱ्यांची पार्श्वभूमी सांगितली आहे. `तनामनाच्या भोवऱ्यात` या त्यांच्या पहिल्या पुस्तकरूपात आलेल्या अनुवादित कादंबरीची पार्श्वभूमी थरारक वाटते. घरात नातेवाईक, साहित्यिक, मित्रमैत्रिणी अशा पाहुण्यांची अखंड वर्दळ असते. अशा वेळी गृहिणीपणाचा आब राखून, दुसरीकडे त्यांचं अखंड लेखन चालू असतं. यावरून अनुवादाच्या कामात त्यांनी किती झोकून देलं आहे, याची कल्पना करता येते.
आज सर्वोत्तम अनुवादक अशी ओळख असलेल्या उमाताईंच्या हातून पहिला अनुवाद कसा घडला याचा मजेशीर किस्सा आहे. ७८-७९ मध्ये कन्नड लेखक शिवराम कारंथ यांच्या कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला. त्या कादंबरीत एवढं काय असावं, ही उत्सुकता उमाताईंना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यांना स्वतःला तर कानडी वाचता येत नव्हतं. अखेर विरूपाक्षांनी त्यांना ती कादंबरी थोडी थोडी वाचून दाखवली, व ती ऐकता ऐकता उमाताईंनी ती मराठीत लिहून काढली. नंतर त्यांच्या लक्षात आलं की, आपल्या हातून एका कानडी कादंबरीचा मराठीत अनुवाद केला गेलाय. अनुवाद कार्याचं बीज असं इथे रुजलं.
कानडीतील अनेक नामवंत लेखकांच्या उत्तमोत्तम कलाकृती त्यांनी मराठीत आणल्या आहेत. कथा-कादंबऱ्यांबरोबर काही नाटकं व थोडंफार काव्यही त्यांनी अनुवादित केलं आहे. अर्थात वैचारिक साहित्यापेक्षा सृजनात्मक साहित्यामध्ये त्या जास्त रमतात, असं दिसून येतं. अनुवादाविषयी इतके अनुभव व किस्से त्यांनी आपल्यापुढे ठेवले आहेत की, अनुवादकांसाठी हे पुस्तक एक उत्तम मार्गदर्शकच आहे. परंतु हे मार्गदर्शन करताना त्यांनी कुठेही शिक्षकाची भूमिका घेतलेली नाही. फक्त अनुभव सांगितले आहेत. अनुवादाला सुरुवात करण्यापूर्वी मूळ लेखकाची परवानगी कशी आवश्यक आहे, अनुवादित पुस्तकाच्या नावालाही किती महत्त्व असतं, पुस्तक प्रकाशनातही कशा अडचणी येतात हे त्या वेगवेगळे किस्से सांगत आपल्यापुढे मांडतात.
त्यांची अनुवादाची एक पद्धत आहे. पुस्तक हातात आल्या आल्या त्या अनुवादाला सुरुवात करत नाहीत. पुस्तक संपूर्ण वाचून, समजून घेऊन, विरूपाक्षांबरोबर चर्चा करून अनुवाद करावा का ते ठरवतात. त्याबरोबरच लेखकाजवळ संपर्क साधून, शंकानिरसन झाल्यावरच अनुवादाला सुरुवात होते. लेखकाचं व्यक्तिमत्त्व परिचित झाल्यावर त्याचं साहित्य कळायला सोपं जातं असं त्यांना वाटतं.
या साहित्यसेवेच्या प्रवासात विविध टप्प्यांवर त्यांना अनेक माणसं भेटत गेली. अनिल अवचट, कमल देसाई, पु.ल. व सुनीताबाई, सुमित्रा भावे, गिरीश कर्नाड आणि अशी अनेक ज्यांच्यामुळे त्यांचं अनुभवविश्व समृद्ध होत गेलं. ही सगळी माणसं आपल्याला वेळोवेळी पुस्तकात भेटत राहतात.
`सोनियाचा उंबरा` या दूरदर्शन मालिकेचं लेखन त्यांनी केलं होतं. त्या मालिकेच्या दरम्यानचे अनेक अनुभव त्यांनी दिले आहेत. गाजलेल्या कन्नड मालिकेवर आधारित असलेली ही मालिका मराठीतही प्रचंड लोकप्रिय झाली होती. आकाशवाणीसाठीही त्यांनी लेखन केलेलं आहे. केतकर वाहिनी ही त्यांची स्वतःची कादंबरी. त्या चित्रकार आहेत. त्यांच्या चित्रांची प्रदर्शनं भरतात. त्या उत्तम फोटोग्राफर आहेत. पण यांपैकी एकही गोष्ट त्यांनी ठळकपणे पुस्तकात संगितलेली नाही.
भैरप्पा, कारंथ, तेजस्वी हे त्यांचे आवडते लेखक. त्यांच्याबरोबरचे अनुभव पुस्तकात विस्ताराने आले आहेत. कर्नाटकात सासर-माहेर असल्याने व अनेक साहित्यविषयक समारंभांच्या निमित्ताने उमाताई अनेक वेळा कर्नाटकात जातात. पुस्तक वाचता वाचता लक्षात येतं की, उमाताईंनी आपलं बोट धरून कर्नाटकातील अनेक ठिकाणी आपल्याला फिरवून आणलं आहे.
अनेक वर्षांपूर्वी गावाकडच्या गुग्गुळ नावाच्या पारंपरिक विधीला या दांपत्याला सामोरं जावं लागलं होतं. हा कुलदैवतेच्या पूजेचा गावासमोर करण्यात येणारा विधी, यांना न विचारताच मामीने ठरवलेला असतो. सगळं अवघड असतं. पण हा प्रसंग लिहिताना न चिडता, न संतापता उमाताई लिहितात, `मी त्यांच्या भावनाचा अव्हेर नाही करू शकले.` इतकंच. असे चटका लावणारे प्रसंग वाचताना अस्वस्थ व्हायला होतं व अंतर्मुखही.
त्यांना मिळालेल्या अनेक पुरस्कारांपैकी साहित्य अकादमीचा पुरस्कार हा अत्यंत महत्त्वाचा. पण तो जेव्हा जाहीर झाला त्या आठवड्यातील गोंधळाचे किस्से वाचताना आपणही गडबडून जातो. कारंथ आपल्याकडे मुक्कामाला येत आहेत हे कळल्यावर या दांपत्याची उडलेली गडबड, विरूपक्षांची वरणगावला झालेली बदली, घरमालककडून आलेली नोटीस, असे अनेक किस्से. सुधा मूर्तींची पोस्टाच्या रांगेत उभं असताना झालेली पहिली ओळख व नंतर त्यांच्या काही पुस्तकांचे उमाताईनी केले अनुवाद, असे अनेक प्रकारचे अनुभव. काही बरेवाईट प्रसंग, पण ते आपल्यापर्यंत पोचतात ते अगदी सहज, ओघात सांगितल्याप्रमाणे. कुठेही कटुता नाही, उद्वेग नाही की फुशारकी नाही. आजच्या भाषेत खरं तर त्या सेलिब्रिटी आहेत. मात्र हा सेलिब्रिटीपणा त्यांच्या आसपासही फिरकलेला दिसत नाही.
उमाताईंना त्यांच्या कामात विरूपाक्षांची भक्कम साथ आहे. त्यांचंही मराठीतून कन्नड असं अनुवादाचं काम अव्याहत चालू आहे. विरूपाक्षांना आलेले त्याविषयीचे बरेवाईट अनुभवही उमाताईंनी आपल्यासमोर ठेवले आहेत. उमाताईंच्या घरात कन्नड आणि मराठी या दोन्ही भाषा हातात हात घालून साहित्यसेवा करत आहेत व त्याचं विलोभनीय चित्र `संवादु अनुवादु` या आत्मकथनातून त्यांनी आपल्यासमोर मांडलं आहे. अनुवाद हा विषय केंद्रस्थानी ठेवून वाचकांजवळ मारलेल्या त्या गप्पा आहेत. त्यात आपणही सहभागी व्हायलाच हवं.
- Shabdruchee January 2018
माणसं आत्मकथन का लिहितात, याची ढोबळ मानाने दोन कारणं सांगता येतील. एक म्हणजे आपला जीवनप्रवास, त्यातील संघर्ष लोकांसमोर आणायचा असतो आणि दुसरं म्हणजे विवक्षित क्षेत्रातील अनुभव इतरांना सांगायचे असतात. अर्थात या दोन्ही कारणांची सरमिसळही आत्मकथनात असते; पण प्राधान्य कोणत्या गोष्टीला द्यायचं, हे आत्मकथन लिहिणाऱ्यावर अवलंबून असतं (आणि प्रत्यक्ष आत्मकथन लिहायला बसल्यावर प्रत्यक्षात वैयक्तिक जीवन आणि व्यावसायिक जीवन असे जीवनाचे दोन कप्पे करता येतात का, हा प्रश्नच आहे.) यातील दुसऱ्या कारणासाठी, म्हणजे आपले अनुवाद करतानाचे (आणि केल्यानंतरचेही) अनुभव शब्दबद्ध करण्यासाठी उमा कुलकर्णी यांनी आत्मकथन लिहायचं ठरवलं आणि ‘संवादु अनुवादु’ हे आत्मकथन शब्दबद्ध केलं.
अनुवाद करतानाचे अनुभव वाचकांना सांगताना त्या आपल्या वैयक्तिक जीवनाबद्दलही निवेदन करतात. त्यांच्या बालपणापासून बहुभाषिक लोकांमध्ये राहण्याचा योग आला. बेळगावमधील ठळकवाडी या उपनगरात त्यांचं बालपण गेलं. बेळगावसारख्या सीमाभागात मराठी-कन्नडखेरीज अन्यही भाषा त्यांच्या कानावर पडत. त्यांचं बालपणचं घर, घरातील आणि आजूबाजूची माणसं, परिसर याबद्दल त्यांनी लिहिलं आहे.
त्यांचं शिक्षण, त्यांच्या मैत्रिणी, विरूपाक्ष कुलकर्णी यांच्याशी झालेला विवाह, विरूपाक्ष यांचं कुटुंब, त्यांचं आजोळ, उमातार्इंचे स्वत:चे नातेवाईक यांच्याबद्दल उमाताई मोकळेपणानं लिहितात. त्यांचं पुण्यातील घर, त्या घरात राहत असताना त्यांना लाभलेले शेजारी, विरूपाक्ष यांची वरणगावला झालेली बदली, तिथले अनुभव, त्यांच्या भाड्याच्या घराबाबत कोर्टात उभी राहिलेली केस इ. तपशील निवेदनाच्या ओघात येत राहतात.
अनुवादाचा प्रवास कसा सुरू झाला आणि तो कसा समृद्ध होत गेला याविषयीचं उमातार्इंचं निवेदन म्हणजे या पुस्तकाचा आत्मा आहे. अनुवादाच्या या प्रवासामुळे शिवराम कारंत, एस. एल. भैरप्पा यांच्यासारख्या ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या कन्नड लेखकांचा, तसेच गिरीश कार्नाड, वैदेही यांचाही सहवास त्यांना लाभला. शिवराम कारंतांचा तर दीर्घ सहवास त्यांना लाभला. या लेखकांशी चर्चा करण्याचं भाग्य मिळालं. तसंच या अनुवादांदरम्यानचे उमातार्इंचे अनुभव वाचकाला उच्च प्रतीचा आनंद देऊन जातात. उमातार्इंची मूळ साहित्यकृतीशी झालेली समरसता आणि त्याच वेळी त्यातील एखाद्या उल्लेखाचा साक्षेपाने विचार करणं, या दोन्ही गोष्टी मनाला भावतात.
बी. ए. झाल्यानंतर अकरा वर्षांनी उमातार्इंनी एम. ए. (चित्रकला)ला प्रवेश घेतला. एम. ए. च्या दुसऱ्या वर्षात त्यांची शकुंतला पुंडे यांच्याशी ओळख झाली. त्यांच्यामुळे डॉ. द. दि. पुंडे यांच्याशीही ओळख झाली आणि या ओळखीचं गाढ स्नेहात रूपांतर झालं. अनुवाद करताना पुंडे दांपत्याचं त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन लाभलं. त्याचबरोबर प्रभाकर पाध्ये, कमल पाध्ये, पु.ल. देशपांडे आणि सुनीताबाई देशपांडे या दांपत्यांशी त्यांचे स्नेहबंध दृढ झाले. त्याचबरोबर माधवी देसाई, शांता शेळके यांच्याशी त्यांचा परिचय झाला. सुधा मूर्ती यांच्याशीही त्यांची मैत्री झाली. त्याव्यतिरिक्त अनुवादाच्या निमित्ताने अनेक लोक त्यांच्या संपर्कात आले.
चित्रपट, श्रद्धा-अंधश्रद्धा इ. विषयांवर त्या निवेदनाच्या ओघात भाष्य करतात. पीएच.डी.च्या निमित्ताने त्यांनी विविध देवालयांना दिलेल्या भेटींचा, त्यांनी केलेल्या पर्यटनाचा उल्लेखही यात त्यांनी केला आहे. पु.लं.च्या पुस्तकाच्या कन्नडमध्ये केल्या गेलेल्या अनुवादाविषयी त्यांनी लिहिलं आहे. विरूपाक्ष यांनी वेळोवेळी केलेल्या मराठी-कन्नड अनुवादांविषयी त्यांनी सांगितलं आहे. कर्नाटकातील संस्कृती, परिसर, स्त्रीजीवन, पदार्थ या विषयी या पुस्तकातून माहिती मिळते. ‘मराठी-कन्नड स्नेहवर्धन’ ही संस्थाही त्यांनी स्थापन केली आहे.
तर एका अनुवादकाचा हा संपन्न प्रवास आहे. अनुवादक म्हणून उमाताई कशा घडत गेल्या आणि समृद्ध होत गेल्या, याचं मनोज्ञ दर्शन ‘संवादु अनुवादु’मधून घडतंच; पण एक माणूस म्हणूनही उमातार्इंचा साधेपणा वाचकांना भावतो. सासर-माहेरच्या मंडळींना, शेजारपाजाऱ्याना सामावून घेणाऱ्या, त्यांच्या सुख-दु:खाशी एकरूप होणाऱ्या आणि प्रसंगी त्यांच्या मदतीला धावणाऱ्या उमाताई वाचकांना जवळच्या वाटतात. त्यांचं आणि विरूपाक्ष यांच्या समृद्ध सहजीवनाचं प्रसन्न दर्शन या आत्मकथनातून घडतं. कोणत्याही भौतिक सुखाची अपेक्षा न करता साहित्य, कलास्वाद आणि माणसांमध्ये रमलेलं हे दांपत्य आहे.
अनुवाद करताना येणाऱ्या अडचणीं, त्यांचं निराकरण कसं करावं, अनुवाद कसा करावा इ. गोष्टींचं मार्गदर्शन या पुस्तकातून सोदाहरण घडतं. अनुवाद करणं म्हणजे केवळ एका भाषेतील साहित्य दुसऱ्या भाषेत नेणं नव्हे, तर मूळ साहित्यकृतीतील गाभ्याला, आशयाला भिडणं, मूळ प्रांतातील संस्कृती समजून घेणं, मूळ साहित्यकृती ज्या काळात निर्माण झाली त्या काळाचे संदर्भ समजावून घेणं आणि मूळ भाषेबरोबरच आपल्या भाषेतील कंगोरे समजून घेणं आवश्यक आहे, हे उमातार्इंच्या अुभवांतून समजतं. म्हणून अनुवादाच्या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यासाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरावं आणि अनुवाद प्रक्रियेला दुय्यम समजणाऱ्यानाही अनुवादाचं महत्त्व समजावं.
तेव्हा अनुवाद हा उमातार्इंचा ध्यास आहे आणि ‘संवादु अनुवादु’च्या निमित्ताने त्या ‘ध्यासपर्वा’चा अनुभव त्यांनी वाचकांना देऊ केला आहे. तेव्हा सगळ्यांनी तो अनुभव अवश्य घ्यावा.
-अंजली पटवर्धन
- Divya Marathi Ahmadnagar, 5-1-18
पंचावन्नपेक्षा जास्त उत्तमाेत्तम कन्नड पुस्तकांचे अनुवाद करून मराठी साहित्याचे दालन समृद्ध केलेल्या उमाताईंच्या जीवनसंचिताचे सार म्हणजे `संवादु-अनुवादु` हे अात्मकथन. बालपणापासून त्या वर्तमानकाळापर्यंतचा त्यांच्या लेखनाचा अनुवादाचा गुंगवून टाकणारा प्रवास त्या वाचकांपुढे सादर करतात. या कत्मकथनात विपुल अनुभव अाहेत, विविध वळणे अाहेत, अनुवादकलेचे असंख्य पदर अाहेत, जिवाभावाच्या व्यक्ती अाहेत, अनेक थाेर साहित्यिक अाहेत अाणि या सर्वांकडे सम्यक नजरेने पाहत स्वत:ला समृद्ध करणारी लेखिका अाणि अनुवादिका अाहे. ती कधी चटका लावणाऱ्या अाठवणी सांगते, कधी गंभीर भाष्य करून चिंतनाला प्रवृत्त करते तर कधी निर्व्याज मिस्कीलतेने विनाेदाचा शिडकावा करते. या अात्मकथनात तक्रारीचा सूर नाही, ठसठसणाऱ्या जखमा नाहीत, माझे तेच खरे असा दुराग्रह नाही. तर शांत नितळ समजुतीने जीवनाला भिडण्याची ताकद त्याच्या पानापानांत अाहे. हे अात्मकथन उमाताईंच्या जीवनानुभवापाशी थांबत नाही, तर ते वाचकांना अंतर्मुख करते, नातेसंबंधांच्या जपणुकीवर नवा प्रकाश टाकते अाणि संपन्न जीवनदृष्टी वाचकांनाही समृद्ध करते. पुस्तकाच्याा सुरुवातीलाच त्या म्हणतात की, `अामचे अनुवाद अाणि अामचं जीवन इतकं एकमेकांत मिसळून गेलंय की ते वेगळं काढणं मला तरी शक्य नाही` अशा अनेक बाबी या पुस्तकांत वाचालयला मिळतात, अगदी बालपणाच्या अाठवणींपासून ते अाता-अातापर्यंतचे काही त्यात टिपलेले असल्याने वाचकही त्या अायुष्याशी समरस हाेऊन जाताे.
- -प्रा. हरी नरके
"संवादु अनुवादु" एक विलक्षण प्रांजळ, प्रवाही, पारदर्शी आत्मकथन--
त्यांनी भैरप्पा, कारंत, कार्नाड, अनंतमूर्ती, तेजस्वी, वैदेही अशा श्रेष्ठ कन्नड लेखकांच्या उत्तमोत्तम अशा सुमारे 60 साहित्यकृती मराठीत आणल्या. त्यातून मराठीची ज्यांनी समृद्धी आणि श्रीमंती वाढवली, मराठी वाचकांच्या जगण्याची इयत्ता उंचावली त्या उमा विरूपाक्ष कुलकर्णी या गेल्या अर्धशतकातल्या आणि आजच्या घडीच्या सर्वोत्तम अनुवादक आहेत. त्यांचे आत्मकथन हे 426+6 पृष्ठांचे असूनही एकदा हातात घेतले की वाचून पुर्ण केल्याशिवाय खाली ठेववत नाही.
जणू उमा कुलकर्णी या ज्ञानपीठ विजेत्या कन्नड साहित्यिकेच्या आत्मकथनाचा हा उमा कुलकर्णी कृत मराठी अनुवादच मी वाचतोय इतका वेगवान आणि सच्चा अनुभव हे आत्मकथन देते. वाचनीयता, समंजस जगणं आणि दिव्य अंतर्दृष्टी यांचा संगम असलेलं लक्ष्मीबाई टिळक यांच्या पुढचं मराठी आत्मचरित्र म्हणजे हे पुस्तक.
बहुधा हे मराठीतले पहिलेच असे आत्मकथन असावे की ज्यात जीवन जसे समोर आले तसे ते स्विकारले आणि जसे जगले तसे कोणताही आडपडदा न ठेवता लिहीले. बालपणापासून आजपर्यंतचा त्यांचा जीवनप्रवास यात येतो. त्यांनी ज्या ग्रंथांचे अनुवाद केले त्या कलाकृती, ते साहित्यकार, त्यांचा परिसर, आणि त्यांचे समग्र अनुभवविश्व यांची सफर उमाताई वाचकाला घडवून आणतात. पुस्तक संपतं पण जीवनानुभवाची चव रेंगाळत राहते. सोबत करते.
यात अनिल अवचट, कमल देसाई, सुमित्रा भावे, भैरप्पा, कारंत, वैदेही अशा असंख्य जिवलगांच्या विपुल आठवणी आहेत. त्या अर्थानं ते उमाताई, विरूदा, शशीप्रभा, मॉडेल कॉलनी आणि या सार्यांचच आत्मकथन आहे. तेही इथे पुन्हापुन्हा आणि कडकडून भेटत राहतात. पुस्तकभर साथ करतातच पण नंतरही मनात शिल्लक राहतात.
गंभीर भाष्य करतानाची उमाताईंची सहजता, आयुष्याकडे सम्यकपणे बघण्याची वृत्ती, चटका लावणारे असंख्य प्रसंग टिपतानाची त्यातली त्यांची रसिकता सारेच पकड घेणारे. वयाची साठी पार केल्यानंतरही त्यांनी काळजाच्या गाभ्याशी कायम जपलेला मिस्किलपणा, जगाकडे बघण्याची निर्व्याजवृत्ती आणि चिंतनशीलता मुळातूनच अनुभवावी अशा तोडीची.
या आत्मकथनात तक्रार म्हणून सूरच नाही हे विलक्षणाय. भडकपणा, चढा सूर, दुराग्रह, रडगाणं, आत्मप्रौढी यांचा मागमूसही यात नाही.
ते त्यांनी अर्पण केलंय- "आमच्या न जन्मलेल्या अपत्यांस- कृतज्ञतापुर्वक." एक सुन्न करणारी, काळीज हलवणारी अर्पणपत्रिका.
सुमारे 50 वर्षांच्या सहजीवनात आपल्या नवर्याबद्दल, विरूपाक्ष कुलकर्णींबद्दल एकही तक्रार नसलेले मराठीतलेच काय बहुधा भारतीय साहित्यातले हे पहिले आणि एकमेव आत्मकथन असावे. नितळ. खोल. दृष्टी विस्तारणारं.
उमाताई आपल्या सोयर्यांबद्दल, नात्यागोत्याबद्दल समरसून लिहितात.
उमाताई आपल्या मोलकरणीबद्दलही इतक्या आपुलकीनं लिहितात, तिचं जगणं ठसठशीतपणे पकडतात की ते वाचून मी असं मराठीतलं दुसरं पुस्तक आठवू लागलो पण मला तरी ते सापडलं नाही. हा मैत्रीभाव, ही माणुसकीची ओल काही आगळीच. ऎशी कळवळ्याची जाती, करी लाभाविन प्रिती. बरं म्हणजे हे काही आध्यात्मिक पुस्तक नाही बरं का. हे एका गृहीणीचं, लेखिकेचं मध्यमवर्गीय जगणं आरपारपणे चित्रित करत वाचकाचं बोट धरून वाहतं, निर्मळ जगणं चिमटीत पकडणारं आत्मकथनाय.
जगण्याचं बळ वाढवणारं, अंतर्मुख करणारं, वाचकाला संपन्न जीवनदृष्टी देणारं हे पुस्तक प्रत्येकानं वाचायलाच हवं.
- दैनिक शिवनातीर औरंगाबाद २ डिसेंबर २०१७
अनुवादाच्या वाटेवरचा मार्गदर्शक आणि हृद्य संवाद...
माणसं आत्मकथन का लिहितात, याची ढोबळ मानाने दोन कारणं सांगता येतील. एक म्हणजे आपला जीवनप्रवास, त्यातील संघर्ष लोकांसमोर आणायचा असतो आणि दुसरं म्हणजे विवक्षित क्षेत्रातील अनुभव इतरांना सांगायचे असतात. अर्थात या दोन्ही कारणांची सरमिसळही आत्मकथनात असते; पण प्राधान्य कोणत्या गोष्टीला द्यायचं, हे आत्मकथन लिहिणाऱ्यावर अवलंबून असतं (आणि प्रत्यक्ष आत्मकथन लिहायला बसल्यावर प्रत्यक्षात वैयक्तिक जीवन आणि व्यावसायिक जीवन असे जीवनाचे दोन कप्पे करता येतात का, हा प्रश्नच आहे.) यातील दुसऱ्या कारणासाठी, म्हणजे आपले अनुवाद करतानाचे (आणि केल्यानंतरचेही) अनुभव शब्दबद्ध करण्यासाठी उमा कुलकर्णी यांनी आत्मकथन लिहायचं ठरवलं आणि ‘संवादु अनुवादु’ हे आत्मकथन शब्दबद्ध केलं.
अनुवाद करतानाचे अनुभव वाचकांना सांगताना त्या आपल्या वैयक्तिक जीवनाबद्दलही निवेदन करतात. त्यांच्या बालपणापासून बहुभाषिक लोकांमध्ये राहण्याचा योग आला. बेळगावमधील ठळकवाडी या उपनगरात त्यांचं बालपण गेलं. बेळगावसारख्या सीमाभागात मराठी-कन्नडखेरीज अन्यही भाषा त्यांच्या कानावर पडत. त्यांचं बालपणचं घर, घरातील आणि आजूबाजूची माणसं, परिसर याबद्दल त्यांनी लिहिलं आहे.
त्यांचं शिक्षण, त्यांच्या मैत्रिणी, विरूपाक्ष कुलकर्णी यांच्याशी झालेला विवाह, विरूपाक्ष यांचं कुटुंब, त्यांचं आजोळ, उमातार्इंचे स्वत:चे नातेवाईक यांच्याबद्दल उमाताई मोकळेपणानं लिहितात. त्यांचं पुण्यातील घर, त्या घरात राहत असताना त्यांना लाभलेले शेजारी, विरूपाक्ष यांची वरणगावला झालेली बदली, तिथले अनुभव, त्यांच्या भाड्याच्या घराबाबत कोर्टात उभी राहिलेली केस इ. तपशील निवेदनाच्या ओघात येत राहतात.
अनुवादाचा प्रवास कसा सुरू झाला आणि तो कसा समृद्ध होत गेला याविषयीचं उमातार्इंचं निवेदन म्हणजे या पुस्तकाचा आत्मा आहे. अनुवादाच्या या प्रवासामुळे शिवराम कारंत, एस. एल. भैरप्पा यांच्यासारख्या ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या कन्नड लेखकांचा, तसेच गिरीश कार्नाड, वैदेही यांचाही सहवास त्यांना लाभला. शिवराम कारंतांचा तर दीर्घ सहवास त्यांना लाभला. या लेखकांशी चर्चा करण्याचं भाग्य मिळालं. तसंच या अनुवादांदरम्यानचे उमातार्इंचे अनुभव वाचकाला उच्च प्रतीचा आनंद देऊन जातात. उमातार्इंची मूळ साहित्यकृतीशी झालेली समरसता आणि त्याच वेळी त्यातील एखाद्या उल्लेखाचा साक्षेपाने विचार करणं, या दोन्ही गोष्टी मनाला भावतात.
बी. ए. झाल्यानंतर अकरा वर्षांनी उमातार्इंनी एम. ए. (चित्रकला)ला प्रवेश घेतला. एम. ए. च्या दुसऱ्या वर्षात त्यांची शकुंतला पुंडे यांच्याशी ओळख झाली. त्यांच्यामुळे डॉ. द. दि. पुंडे यांच्याशीही ओळख झाली आणि या ओळखीचं गाढ स्नेहात रूपांतर झालं. अनुवाद करताना पुंडे दांपत्याचं त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन लाभलं. त्याचबरोबर प्रभाकर पाध्ये, कमल पाध्ये, पु.ल. देशपांडे आणि सुनीताबाई देशपांडे या दांपत्यांशी त्यांचे स्नेहबंध दृढ झाले. त्याचबरोबर माधवी देसाई, शांता शेळके यांच्याशी त्यांचा परिचय झाला. सुधा मूर्ती यांच्याशीही त्यांची मैत्री झाली. त्याव्यतिरिक्त अनुवादाच्या निमित्ताने अनेक लोक त्यांच्या संपर्कात आले.
चित्रपट, श्रद्धा-अंधश्रद्धा इ. विषयांवर त्या निवेदनाच्या ओघात भाष्य करतात. पीएच.डी.च्या निमित्ताने त्यांनी विविध देवालयांना दिलेल्या भेटींचा, त्यांनी केलेल्या पर्यटनाचा उल्लेखही यात त्यांनी केला आहे. पु.लं.च्या पुस्तकाच्या कन्नडमध्ये केल्या गेलेल्या अनुवादाविषयी त्यांनी लिहिलं आहे. विरूपाक्ष यांनी वेळोवेळी केलेल्या मराठी-कन्नड अनुवादांविषयी त्यांनी सांगितलं आहे. कर्नाटकातील संस्कृती, परिसर, स्त्रीजीवन, पदार्थ या विषयी या पुस्तकातून माहिती मिळते. ‘मराठी-कन्नड स्नेहवर्धन’ ही संस्थाही त्यांनी स्थापन केली आहे.
तर एका अनुवादकाचा हा संपन्न प्रवास आहे. अनुवादक म्हणून उमाताई कशा घडत गेल्या आणि समृद्ध होत गेल्या, याचं मनोज्ञ दर्शन ‘संवादु अनुवादु’मधून घडतंच; पण एक माणूस म्हणूनही उमातार्इंचा साधेपणा वाचकांना भावतो. सासर-माहेरच्या मंडळींना, शेजारपाजाऱ्याना सामावून घेणाऱ्या, त्यांच्या सुख-दु:खाशी एकरूप होणाऱ्या आणि प्रसंगी त्यांच्या मदतीला धावणाऱ्या उमाताई वाचकांना जवळच्या वाटतात. त्यांचं आणि विरूपाक्ष यांच्या समृद्ध सहजीवनाचं प्रसन्न दर्शन या आत्मकथनातून घडतं. कोणत्याही भौतिक सुखाची अपेक्षा न करता साहित्य, कलास्वाद आणि माणसांमध्ये रमलेलं हे दांपत्य आहे.
अनुवाद करताना येणाऱ्या अडचणीं, त्यांचं निराकरण कसं करावं, अनुवाद कसा करावा इ. गोष्टींचं मार्गदर्शन या पुस्तकातून सोदाहरण घडतं. अनुवाद करणं म्हणजे केवळ एका भाषेतील साहित्य दुसऱ्या भाषेत नेणं नव्हे, तर मूळ साहित्यकृतीतील गाभ्याला, आशयाला भिडणं, मूळ प्रांतातील संस्कृती समजून घेणं, मूळ साहित्यकृती ज्या काळात निर्माण झाली त्या काळाचे संदर्भ समजावून घेणं आणि मूळ भाषेबरोबरच आपल्या भाषेतील कंगोरे समजून घेणं आवश्यक आहे, हे उमातार्इंच्या अुभवांतून समजतं. म्हणून अनुवादाच्या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यासाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरावं आणि अनुवाद प्रक्रियेला दुय्यम समजणाऱ्यानाही अनुवादाचं महत्त्व समजावं.
तेव्हा अनुवाद हा उमातार्इंचा ध्यास आहे आणि ‘संवादु अनुवादु’च्या निमित्ताने त्या ‘ध्यासपर्वा’चा अनुभव त्यांनी वाचकांना देऊ केला आहे. तेव्हा सगळ्यांनी तो अनुभव अवश्य घ्यावा.