MAHARASHTRA TIMES 24-02-2019स्त्री गुप्तहेराची रोमांचक कथा...
आपल्या वकिलीच्या व्यवसायासह मुक्तपत्रकारिता करताना विविध प्रकारचे लेखन करणाऱ्या ‘रेई किमुरा’ यांनी सत्य घटनांना कल्पकतेची जोड देऊन कथा या कादंबरीचे लेखनही केले आहे. त्यांच्या ‘जापनीज पिओनी’ या इंग्रजी कादंबरीचा मराठी अनुवाद वासंती घोसपूरकर यांनी केला असून ही कादंबरी ‘वादळफूल’ या शीर्षकाने नुकतीच प्रकाशित झाली आहे.
मंचुरियाची ‘आयसिन गिओरो’ आणि राजकुमार ‘स्यु’ यांची कन्या ‘योशिको कावाशिमा’ ही या कादंबरीची मुख्य पात्र आहे. योशिको ही राजकन्या लहानपणीच आपल्या वडिलांची अनैतिक कृत्ये आणि समाजातील वाईट प्रवृत्ती पाहते. या सर्वाचा तिच्या मनावर वाईट परिणाम होतो आणि ती आपले आयुष्य वेगळ्या पद्धतीने, अर्थात स्वैरपणे जगण्याचे ठरवते. तिच्या या बंडखोर वृत्तीमुळे तिचे वडील तिची रवानगी जपानला करतात. यामुळे योशिकोच्या जीवनात तिच्या वयाच्या अवघ्या आठव्या वर्षापासूनच संघर्ष निर्माण होतो. हा संघर्ष अखेरपर्यंत सुरू राहिलेला आहे.
या कादंबरीतून, योशिकोचे जपानमधील दत्तकपित्याच्या घरचे वास्तव्य, मंगोलियाच्या राजकुमाराशी तिचा झालेला विवाह, तेथून तिने केलेले पलायन, जहाजावरून केलेल्या प्रवासात तिला भेटलेली एक विधवा स्त्री, त्या स्त्रीच्या घरातील तिचे वास्तव्य, त्यानंतर तिला गुप्तहेर विभागात मिळालेली नोकरी, गुप्तहेर पदावर तिने मिळविलेला नावलौकिक, नंतर पुढे चीन व जपान यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर तिला राजद्रोही ठरवून झालेली अटक आणि तिने करून घेतलेली सुटका अशा तिच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटनांचा एक सलग कथापट साकारला आहे.
योशिकाला बालपणापासूनच चांगली समज आलेली दिसते. माणुसकीविरहित रूढी पाळणाऱ्या देशात स्त्रीला फक्त उपभोगाची वस्तू मानली जाते या भावनेतून तिची बंडखोर वृत्ती बळावते आणि ती जीवनाचा आनंद स्वैरपणे लुटण्याचे मनोमन ठरवते. त्यामुळे स्वत:च्या मातेच्या ममतेला वंचित होऊन जपानला जातानाही ती स्वत:च्या मनाला आवर घालते. पुढे अठराव्या वर्षी तिचा विवाह झाला तरी पतीपत्नीचे मनोमिलन न झाल्याने ती तेथून पळून जाते. यावेळी जहाजावरील प्रवासात तामुरा नामक एका विधवा स्त्रीशी तिचा परिचय होतो. ती तामुराकडेच आसरा घेते. योशिका राजकुमारी असल्यामुळे समाजातील उच्चभ्रू, श्रीमंत, उच्चपदस्थ आणि लब्धप्रतिष्ठित माणसांचा गोतावळा तिच्याभोवती जमतो, तामुरा निघून गेल्यावर ती एकाकी पडते. परंतु याच दरम्यान तिला गुप्तहेर विभागात नोकरी करण्याची संधी चालून येते. गुप्तहेराचे कर्तव्य पार पाडताना तिच्या साहसाच्या, धोक्याच्या आणि व्यभिचाराच्या अंतहीन भूकेमुळे भविष्याचा विचार तिने केलेला दिसत नाही. यामुळे चीन हा जन्मदेश आणि तिला दत्तक घेतले तो जपान या दोन्ही देशांत ती एक कुख्यात स्त्री असल्याची नोंद होते.
या सर्व प्रवासात योशिकोला अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागले आहे. प्रत्येक टप्प्यावर संघर्ष केलेला आहे. परंतु ती हतबल झालेली दिसत नाही. मृत्यूदंडाची शिक्षा सुनावल्यानंतर मात्र ती हवालदिल झाली आहे. तुरुंगसेवकाने आखलेल्या योजनेनुसार सुटका झाल्यावर मात्र तिने नवी उभारी घेतली आहे. ती आणखी काही वर्षे स्वच्छंदी जीवन जगली आहे असे इथे दाखविले आहे.
योशिकाचे संपूर्ण जीवन संघर्षपूर्ण असले, तरी संधी मिळाली तेव्हा तिने नेहमीच विषयलोलुपतेला प्राधान्य दिले. भूतलावरची सर्व भौतिक सुखे तिने उपभोगलीत. लहानपणापासूनच स्वैर व स्वतंत्र विचारांची असलेल्या योशिकोचे तडफदार व आशावादी असे व्यक्तिचित्र येथे ठळकपणे साकारले आहे. तसेच तिची आई, तिच्या बहिणी, तिची आया ‘जेड’, तामुरा, तिच्या पतीची मैत्रीण ‘मायी’ आणि तिची बहीण बनून तुरुंगात आलेली एक तरुणी अशा अनेक स्त्रियांची व्यक्तिचित्रे येथे रंगविली आहेत. याशिवाय तिचे वडील, दत्तकपिता, तिचा पती, तिचे मित्र, अशा अनेक व्यक्तींची व्यक्तिचित्रेही येथे साकार केली आहेत.
ही कादंबरी म्हणजे ‘योशिको’ नामक एका राजकन्येच्या जीवनातील संघर्षाची कहाणी असली तरी यामधुन चीन व जपान या दोन देशांतील सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, भौगोलिक व राजकीय आणि विशेषत: गुप्तहेर विभागातील कार्यप्रणालीची माहिती मिळत जाते.
– कमलाकर राऊत
DAINIK TARUN BHARAT 10-02-2019एका राजकन्येची अचंबित करणारी कहाणी...
रेई किमुरा हे नाव अपरिचित नाही. किमुरांच्या कादंबऱ्या अतिशय वाचकप्रिय आहे. The Princess and The Spy मेहता प्रकाशनाने ‘वादळफूल’ या शीर्षकाने वाचकांसाठी आणले आहे. अतिशय आकर्षक मुखपृष्ठ आणि अगदी नेमका ब्लर्ब यासह.
मांचुरिया हा विस्मृत चीनचा एक भाग. इथेही राजेशाही होती. वजकुमार स्यू काय किंवा चिनी सम्राट काय सगळे एका माळेचे मणी होते. ‘दी किंग कॅन डू नो राँग’ मानणारे. जनतेची पर्वा नसणारे. उपभोगात रमलेले, कोणाच्या जनान्यात किती भोगस्त्रिया आहेत, यावर मोठेपणा मानणारे, एकप्रकारे सत्तेच्या, भोगाच्या, सुखलोलुपतेच्या कैफात असलेले, मांचुरियाचे राजकुमार स्यू त्याच परंपरेतले.
स्यूंच्या एका ‘जनानी’ची बंडखोर, मनस्वी, संस्कारशून्य मुलगी म्हणजे आयसिन सिओरो. ही सुधारणेच्या पलीकडे आहे हे जाणून राजकुमार स्यू त्यांच्या सावत्र भावाला ही कन्या दत्तक देतो. तिची जपानमध्ये पाठवणी करतो. ‘योशिको कावाशिमा’ या नावाने इथून पुढे ती ओळखली जाते. तिची आत्मकथनात्मक कादंबरी म्हणजे ‘वादळफूल’.
Know thy self ही आज्ञा ती पाळते. ती स्वत:ला पूर्ण ओळखते. साहसी, संकटांनी भरलेले दुहेरी आयुष्य जगणारी. एक निरुपयोगी मुलगी असा वडिलांनी शिक्का मारलेली, खेद-खंत नसलेली, वडिलांवरही हेरगिरी करणारी, मुलांसारखा पोशाख करणारी, अन्नावर तुटून पडणारी, स्त्री-पुरुष संबंध याबद्दल लहान वयात जाण आलेली, त्यात कसलेही पाप न मानणारी, स्वयंकेद्रित, टीकेची पर्वा न करणारी, देहसुख घेण्यात कसलाही टॅबू न मानणारी, मिलिटरी ऑफिसर यमागासह सातआठ मित्र असलेली, अनेकांशी निकटचे संबंध असले तरी एक सैल व स्वैर आयुष्य जगणारी मुलगी.
वासंती घोसपूरकर यांनी हा अनुवाद एवढा चांगला केला आहे, की हा अनुवाद वाटत नाही. आपण मराठीतून रेई किमुरा यांनी कादंबरी लिहिली व मेहता प्रकाशनाने ती प्रसिद्ध केली याचे समाधान देणारा हा छान अनुवाद आहे. ज्यांना दुसऱ्या महायुद्धात, त्यातल्या जपानी सहभागात व गुन्हेगारी विश्वात रस आहे. त्यानी ‘वादळफूल’ वाचायलाच हवे, एवढ्या तोलामोलाचे हे पुस्तक आहे.
–अनंत मनोहर
Divya Marathi 1-12-17येशिकाे कावाशिमा अर्थात मंचुरियाची अायसिन गिअाेराे अाणि राजकुमार स्यू यांची मुलगी; काेणी तिला जपानी पिअाेनी या नावानेही अाेळखत असत. येशिकाेचे वैवाहिक जीवन किंबहुना तिचे सारे अायुष्यच जपानी पिअाेनी या फुलासारखे रंगीत अाणि त्याच्या दुहेरी गच्च पाकळ्यांप्रमाणे साहसी अाणि संकटांनी भरलेले हाेते. लहानपणापासून राजकन्या येशिकाे बंडखाेर अाणि संयमी वृत्तीची, स्वतंत्र खरेतर स्वैर विचारांची हाेती. पुढे तरुणपणी ती जपानची गुप्तहेर बनली. अापले इप्सित साध्य हाेण्यासाठी `वाट्टेल ते` करण्यास ती तयार असे. कारस्थाने, लबाडी, खाेटेपणा यावर तिचा अधिक भर असल्याने अापाेअाप ती दाेन परस्परविराेधी देशांच्या जाळ्यात अडकली अाणि तिची तुरुंगात रवानगी झाली. तिला मृत्युदंडाची शिक्षा ठाेठावण्यात अाली. अर्थात त्यातूनही तिने अापली सुटका करून घेतली अाणि पुढे ती सुमारे ३९ वर्षे जगली; मात्र येशिकाेचा तुरुंगातून पळाल्यानंतरचा जीवनप्रवास अज्ञातच राहिला. येशिकाेचं असं जगणं `वादळफूल` या पुस्तकात रेई किमुरा यांनी शब्दबद्ध केलं अाहे. तर त्याचा अत्यंत सुंदर असा अनुवाद वासंती घाेसपूरकर यांनी केला अाहे.
जीवनाचा संघर्षच या कादंबरीतून वाचकांना अनुभवायला मिळताे. काही काही प्रसंग तर अंगावर राेमांच उभे करतात. रेई किमुरा यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य म्हणजे वास्तव घटना, प्रसंग अाणि व्यक्तिमत्त्वांना अापल्या लेखणीतून जिवंत करणे. अगदी तसेच त्यांनी येशिकाला वाचकांपुढे उभे केले अाहे. सातत्याने सत्याचा शाेध घेणारे, अाव्हानांना सामाेरे जाणारे अाणि पूर्णत्वासाठी प्रयत्नशील असणारे असे अापले लेखन असावे या विचारानेच त्यांची अनेक पुस्तके गाजली अाहेत. त्यापैकीच एक म्हणजे वादळफूल अर्थात `japanese peony : the princess and the say`.
Shabdruchee Diwali Ank 2017मंचुरियाची ‘आयसिन गिओरो’ अर्थात ‘योशिको कावाशिमा’ हिची ही जीवनकहाणी आहे. आयसिन ही मंचुरियाचा राजकुमार स्यू याची मुलगी; राजकुमार स्यू हा एक कामांध पुरुष असतो. कामासक्त आणि मानसिकदृष्ट्या दूषित वातावरणात वाढणा-या आयसिनच्या मनात कामांधता, खोटेपणा, विश्वासघात अशा नकारात्मक भावनांची बीजं लहानपणीच पेरली जातात.
या पुस्तकातील राजकुुमार स्यूच्या घरातील वातावरण आणि तेथील स्त्रियांची अवस्था वाचल्यावर अंगावर शहारे येतात. चीन-जपान यांच्यातील तत्कालीन संबंधही या कादंबरीतून अधोरेखित होतात. वासंती घोसपूरकर यांचा अनुवादही उत्तम. नाट्यमय वळणांनी पुढे सरकणारी योशिकोची ही जीवनकहाणी मुळातून वाचण्यासारखी आहे.
DAINIK SAKAL 29-10-2017‘जपानी पिओनी’ या नावानं ओळखल्या जाणाऱ्या योशिको कावाशिमाची ही कहाणी. ती मंचुरियाची राजकन्या. लहानपणापासून खोडकर, अतिचौकस आणि संशयी असल्यामुळं तिचे वडील तिला जपानमध्ये पाठवतात. जपानमध्ये मोठी होत जाताना ती अनेक भावनांचे अनुभव घेत जाते. प्रेम, विवाह या गोष्टी पार पडतापडता पुढं ती जपानची गुप्तहेर बनते. इप्सित साध्य होण्यासाठी वाटेत ते करण्यासाठी तयारी असणारी योशिका कारस्थानं, लबाडी, खोटेपणा यातही अडकते आणि दोन परस्परविरोधी देशांच्या जाळ्यात अडकल्यानं तिला मृत्युदंडाची शिक्षा होते. त्यातूनही ती स्वत:ची सुटका करून घेते. तिचं हे सगळं जगावेगळं आयुष्य सांगणारी आणि तत्कालीन जपानचं चित्रण करणारी ही कादंबरी रेई किमुरा यांनी लिहिली आहे. वासंती घोसपूरकर यांनी अनुवाद केला आहे.
News Paper reviewएका उच्छृंखल स्त्रीची नाट्यमय कहाणी ... कोणत्याही काळामध्ये स्त्रीचं जगणं हा नेहमीच एक चर्चेचा विषय असतो. कोणत्याही समाजात तिला कशी वागणूक मिळते, ती विशिष्ट समाजातील चालीरीतींप्रमाणे वागते की नाही, या गोष्टी स्त्रीसाठी महत्त्वाच्या असतात. जेव्हा एखादी स्त्री चालीरीतींच्या विरोधात जाते किंवा समाजविपरीत वर्तन करते, तेव्हा ती चर्चेचा विषय बनते. अशाच चर्चेचा विषय बनलेल्या आयसिन गिओरो अर्थात योशिको कावाशिमाची जीवनकहाणी वाचायला मिळते ‘वादळफूल’ या कादंबरीतून. रेई कुमुरा लिखित मूळ इंग्रजी कादंबरी ‘जॅपनीज पिओनी – द प्रिन्सेस अँड द स्पाय’चा मराठीत अनुवाद केला आहे वासंती घोसपूरकर यांनी.
मंचुरियाची ‘आयसिन गिओरो’ अर्थात ‘योशिको कावाशिमा’ हिची ही जीवनकहाणी आहे. आयसिन ही मंचुरियाचा राजकुमार स्यू याची मुलगी; राजकुमार स्यू हा एक कामांध पुरुष असतो. कामासक्त आणि मानसिकदृष्ट्या दूषित वातावरणात वाढणाऱ्या आयसिनच्या मनात कामांधता, खोटेपणा, विश्वासघात अशा नकारात्मक भावनांची बीजं लहानपणीच पेरली जातात. या सगळ्या नकारात्मक भावनांचं समर्थन करण्याचं धाडस आणि तिच्या मनाविरुद्ध घडलेल्या गोष्टींविरुद्ध पेटून उठण्याचा बंडखोरपणाही तिच्यात असतो. आयसिनवर तिच्या आईचं जिवापाड प्रेम असतं आणि आयसिनचंही आईवर असतं; पण एके दिवशी आयसिनच्या बेमुर्वतखोर वागण्याला कंटाळून स्यू तिला त्याचा दत्तक भाऊ नानीवा कावाशिमाकडे जपानला पाठवण्याचं ठरवतो आणि त्याची अंमलबजावणीही करतो. त्यामुळे आठ वर्षांची असतानाच आयसिनची आणि तिच्या आईची ताटातूट होते. जपानला जाताना तिच्याबरोबर तिची दाई जेड असते.
जपानला आल्यावर आयसिन गिओरोची योशिको कावाशिमा होते. नानीवा आणि त्याची बायको नाटुस्कोही योशिकोवर प्रेम करत नाहीत. नानीवाही स्त्रीलंपट असतो. योशिकोचा बंडखोरपणा वाढतच जातो. ती पुरुषी पेहरावात वावरायला लागते. जेड तिला वाईट वागण्यापासून परावृत्त करू पाहते; पण योशिकोमध्ये फरक पडत नाही; मात्र जेडवर तिचं मनापासून प्रेम असतं.
कंजरजॅब नावाच्या मंगोलियन राजकुमाराशी लग्न होऊन ती मंगोलियाला जाते. मायी ही कंजरजॅबची रखेली असते; पण ती योशिकोवर खूप प्रेम करते. योशिकोलाही ती आवडते; पण बंडखोर योशिकोला मंगोलियातील वातावरण रुचत नाही आणि ती तिथून पलायन करते. मंगोलियातून जपानला जातानाच्या प्रवासात तिची भेट तामुरा नावाच्या उत्साही आणि स्वतंत्र वृत्तीच्या स्त्रीशी होते. तामुरा योशिकोला तिच्या स्वभावानुसार एक व्यवसाय सुरू करून देते आणि त्यामुळे योशिको आर्थिकदृष्ट्या स्थिरस्थावर होते; मात्र तामुरा नंतर न्यूयॉर्कला रवाना होते. योशिकोलाही ती बरोबर येण्याचा आग्रह करते; पण योशिको तिच्याबरोबर जाण्यास नकार देते.
तनाका नावाच्या जपानी लष्करी अधिकाऱ्याशी तिची ओळख होते. तो गुप्तहेर असतो; त्याच्या सांगण्यावरून ती जपानच्या गुप्तहेर खात्यात दाखल होते आणि चीनच्या विरोधात काम करायला लागते. तनाका आणि ती एकत्र राहायला लागतात. तो तिची खूप काळजी घेत असतो. त्यानंतर जपानसाठी गुप्तहेर म्हणून ती बरंच काम करते; पण शेवटी चीन तिला जेरबंद करून कोठडीत टाकतो आणि कोणत्याही क्षणी तिला मृत्यूच्या खाईत लोटलं जाण्याची शक्यता असते; पण योशिको तिथूनही पलायन करते; पण त्यानंतरचं तिचं ३९ वर्षांचं जीवन अज्ञातवासात जातं.
योशिकोचं हे जीवन विविध नाट्यमय वळणांनी भरलेलं आहे. योशिको ही व्यक्तिरेखा अतिशय व्यामिश्रतेने साकारली गेली आहे. वडिलांचं कामांध जीवन आणि त्यांच्याकडून मिळालेली नकारात्मक वागणूक, तिच्या आईची अगतिकता या सगळ्यामुळे तिचं स्त्रीत्व लहानपणीच करपून जातं आणि ती नकारात्मक वृत्तीची बनते. कावाशिमा कुटुंबाकडूनही तिला प्रेम मिळत नाही. तिच्या जीवनात आलेला पहिला पुरुष यमागाही तिला लाथाडतो आणि ती अधिकाधिक बंडखोर होत जाते; तिच्यावर मनापासून प्रेम करणारे पुरुषही नंतर तिला भेटतात; पण ती कायमची त्यांची होऊ शकत नाही. काही वेळा तिच्यातील सद्सदविवेक जागा होऊ पाहतो; पण तिच्यातील नकारात्मकता त्यावर मात करते. तिच्या आईपासून तिची झालेली ताटातूट डोळ्यांत पाणी आणते. जेड, मायी, तनाका यांच्या रूपाने तिच्या जीवनात हिरवळ येते; पण ती क्षणभंगुर ठरते.
योशिकोची ही केवळ जीवनकहाणी नाही, तर तिच्या भावांदोलनांचा तो उत्कट प्रवास आहे. या पुस्तकातील राजकुमार स्यूच्या घरातील वातावरण आणि तेथील स्त्रियांची अवस्था वाचल्यावर अंगावर शहारे येतात. चीन-जपान यांच्यातील तत्कालीन संबंधही या कादंबरीतून अधोरेखित होतात.
नाट्यमय वळणांनी पुढे सरकणारी योशिकोची ही जीवनकहाणी मुळातून वाचण्यासारखी आहे.