- DAINIK LOKMAT 12-05-2019
आर्थिक आलेखाचा लेखसंग्रह...
मागील दोन दशकांत भारतात झालेल्या उदारीकरणाने अतिशय वेगाने आर्थिक आणि सामाजिक बदल घडले. त्याचे पडसाद सामान्य माणसाच्या जीवनावर पडून त्याच्या जीवनशैलीतही फरक पडला. डॉ. गिरीश वालावलकर यांचे ‘सी.ई.ओ.च्या केबिनमधून’ हे पुस्तक नेमके काय बाबींवर भाष्य करत आर्थिक विकासाचे सामान्य माणसांच्या जीवनावरील परिणाम स्पष्ट करते. एवढंच नाही तर बदलत्या परिस्थितीला प्रसन्नतेने स्वीकारून जीवनशैली उंचावण्यासाठी मार्गदर्शनही करते. यातील विविध विषयांवरील लिहिलेल्या एकोणपन्नास लेखांतून खूप माहितीपूर्ण ऐवज खुमासदार शैलीत वाचायला मिळतो. लेखकाने स्वत: नावाजलेल्या कंपन्यामध्ये ‘सीईओ’ पदावर काम केले असल्याने त्याच्या अनुभवी नजरेने न्याहाळलेल्या निरीक्षणांनी पुस्तकाची खोली वाढली आहे.
- DAINIK SAMANA 03-02-2019
भौतिक जगताचा लेखाजोखा...
आपल्या आसपासचं जग झपाट्याने बदलत आहे. बदलणाऱ्या जगाचा परिणाम माणसांच्या दैनंदिन आयुष्यावरसुद्धा होत आहे. या स्पर्धात्मक जगात अनेक उदयोन्मुख कंपन्या स्वत:चं अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड करत आहेत. कुठलीही परिस्थिती असो या कंपन्यांची वार्षिक उलाढाल काही कोटींच्या घरात असते. आपल्या भोवतालच्या या जगावर डॉक्टर गिरीश वालावलकर यांनी ‘सी.ई.ओ.च्या केबिनमधून या पुस्तकाद्वारे क्ष-किरण टाकला आहे.
डॉक्टर गिरीश वालावलकर यांनी मोठमोठ्या कंपन्यांमध्ये उच्च पदावर काम केले आहे. त्यांनी आसपासच्या जगाचं सूचक पद्धतीने निरीक्षण करून त्यासंदर्भात अनेक वर्तमानपत्रांमध्ये लेख लिहिले. ते लेख एकत्रितरीत्या या पुस्तकात समाविष्ट आहेत. या पुस्तकातल्या बऱ्याच गोष्टींचा समावेश आपल्या दैनंदिन जीवनात असतो. परंतु त्यावर सखोल आणि संशोधनात्मक लेखन वाचून आपल्याला या गोष्टींची नव्याने माहिती मिळते.
सध्या ऑनलाइन विश्वात धुमाकूळ घालणाऱ्या वेबसीरिजचं विश्व त्यांनी आपल्या लेखातून मांडलं आहे. त्याचबरोबर आजही लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या ‘अमूल’ कंपनीची वाटचाल त्यांनी आपल्या लेखातून स्पष्ट केली आहे. तसेच व्हिडिओ गेम्सची वेगळी दुनिया आणि या क्षेत्रातली व्यावसायिकता त्यांनी उलगडली आहे.
त्याचबरोबर ओला, उबरसारख्या टॅक्सी क्षेत्रातल्या कंपनीची व्यवसाय उलाढाल स्पष्ट केली आहे. तसेच हिंदुस्थानी चित्रपटसृष्टीचं त्यांनी डोळसपणे निरीक्षण केलं आहे. राजकारणामध्ये असलेला उद्योगसमूहांचा प्रभाव यांनी स्पष्ट केला आहे आणि हिंदुस्थानी ग्राहकांच्या बदलत्या मानसिकतेवर त्यांनी भाष्य केलं आहे.
या पुस्तकातील लेख वाचून लेखकांची आसपासच्या जगाकडे पाहण्याची अभ्यासू मनोवृत्ती दिसून येते. लेखकांनी प्रत्येक गोष्टीमधील सूक्ष्म घटकांचा अभ्यास करून त्यावर आपलं मत मांडलं आहे. ही मतं मांडतांना त्यांनी विशिष्ट कंपनीच्या इतिहासाचा संदर्भ घेऊन त्या कंपनीच्या सध्याच्या नफा-तोट्यांवर सोप्या भाषेत आकडेवारीच्या आधाराने लेखन केलेले आहे. त्यामुळे हे लेखन वरवरचं न वाटता या लेखांना एक विश्वासर्हता प्राप्त होते.
लेखक स्वत: सी.ई.ओ. म्हणून अनेक वर्षे काम करत असल्याने कामानिमित्त त्यांनी अनेक देशांना भेटी दिल्या. त्यामुळे या अनुभवांचा आणि कामाचा पूरेपूर वापर त्यांनी आपल्या लेखांमधून केलेला आहे. त्यांनी अनेक बाबतीत मांडलेली मते विचार करण्यास भाग पाडतात. एका गोष्टीचा अनेक अंगांनी आणि विविध बाजूंनी त्यांनी विचार केला आहे.
सारस्वत बँकेचे चेअरमन गौतम ठाकूर यांची प्रस्तावना या पुस्तकाला लाभली आहे. तसेच प्रसिद्ध उद्योजक डॉक्टर विठ्ठल कामत यांचे शुभाशीर्वाद या पुस्तकाला मिळाले आहेत. आपण रोज जगत असलेल्या जगातील अनेक अज्ञात गोष्टी या पुस्तकामुळे कळून येतात. त्यामुळे ज्यांना या व्यावसायिक क्षेत्रात स्वत:चं अस्तित्व निर्माण करायचं आहे त्यांनी हे पुस्तक आवर्जून संग्रही बाळगण्यासारखं आहे.
– देवेंद्र जाधव
- Vinay V Nandurdikar
आज वाचून पूर्ण...या पुस्तकामुळे निश्चितच महत्त्वाच्या विषयांची ओळख होते, विषयाचे महत्त्व आणि गांभीर्य लक्षात येते.
- लोकप्रभा, 30 मार्च २०१८
‘सी.ई.ओ.च्या केबिनमधून’ या डॉ. गिरीश वालावलकर लिखित पुस्तकातून कॉर्पोरेट जगाची एक वेगळी झलक पाहायला मिळते. एकूण ४३ प्रकरणे असणाऱ्या या पुस्तकात आपल्या आजूबाजूला घडणारे आर्थिक बदल, त्यातून निर्माण होणाऱ्या विकासाच्या संधी आणि त्याचे देशातल्या प्रत्येक स्तरातल्या नागरिकांच्या जीवनशैलीवर होणारे परिणाम याचे ओघवत्या भाषेत वर्णन करण्यात आले आहे. लेखकाला अनेक बहुराष्ट्रीय कंपन्याच्या सी.ई.ओ. आणि संचालक पदांवर काम करण्याचा अनुभव असल्याने हे पुस्तक अतिशय अभ्यासपूर्ण झालंय.
पुस्तकातल्या लेखांच्या विषयांमध्ये वैविध्य आहे. ‘उद्योगी श्रीमंती’ या लेखाची स्वतःची नीतिमूल्यं जपूनसुद्धा संपत्ती कमावता येते, हे विविध उद्योगपती आणि त्यांनी आपली औद्योगिक साम्राज्ये उभी करण्यासाठी वापरलेले मार्ग यांची उदाहरणे देऊन विशद केलं आहे. ‘स्विस बँकांची वादग्रस्त व्यावसायिकता’ या लेखात स्विस बँकांची व्यवसाय करण्याची पद्धती आणि त्यांच्या ग्राहकांचं जगभर पसरलेलं जाळं याविषयी सविस्तर चर्चा केली आहे. ‘इंग्लिश बिझनेस’ या लेखामध्ये ब्रिटिश लोकांच्या मानसिकतेवर प्रकाशझोत टाकला आहे.
आज आपल्या देशात अनेक संधी उपलब्ध होत आहेत. आपल्या तरुणांजवळ एखादी नवी कल्पना असेल आणि प्रामाणिकपणे कष्ट करण्याची तयारी असेल, तर ते शेकडो कोटी रुपयांची उलाढाल करणारी कंपनी उभी करू शकतात हे ‘नावीन्यपूर्ण कल्पनेवर आधारलेली उद्योजकता’ या लेखात व्हाट्सअॅप आणि फेसबुकचे उदाहरण देऊन लेखकाने स्पष्ट केले आहे. कॉर्पोरेट क्षेत्रात सर्वोच्च पदापर्यंत पोहोचण्यासाठी कोणत्या प्रकारची मानसिकता जोपासावी लागते, त्याचा उहापोह ‘शिखरापर्यंतच्या वाटचालीसाठी’ या लेखात केले आहे.
लेखक सांगलीसारख्या एकेकाळच्या छोट्या गावातून आलेले आहेत. त्यांना स्वतःला शाळेत जाण्यासाठी तीन किलोमीटरची पायपीट करायला लागायची. आज शेकडो कोटी बाजारमूल्य असणाऱ्या वंâपन्यांच्या सी.ई.ओ. आणि संचालकसारख्या मोठ्या पदापर्यंत पोहोचलेल्या लेखकाला मोठ्या कष्टाने मोठे होणे म्हणजे काय असते हे चांगले माहित आहे. हे पुस्तक लेखकाला असणारे फक्त आर्थिक भान दाखवते का? तर नाही. त्यांच्या सामाजिक जाणिवासुद्धा प्रचंड जागरूक असल्याचा प्रत्यय पुस्तक वाचताना येतो. याचे एक उदाहरण येथे देता येईल. ‘उंबऱ्यावरची महागाई’ या प्रकरणात कराडला काही दिवस राहात असताना त्यांच्या घराजवळच्या वस्तीतल्या माथाडी कामगारांशी त्यांची बNयांपैकी ओळख झाली. आपली कुटुंबे खेड्यात सोडून रोजीरोटीसाठी ते कराडमध्ये येऊन राहिले होते. हे कामगार एका तात्पुरत्या उभारलेल्या ताडपत्रीच्या हॉटेलात रात्री जेवायला जायचे. महागाईमुळे हॉटेल मालकाने दर वाढवल्याने त्या कामगारांवर झुणका भाकर खाण्याऐवजी फक्त भाकर मिर्ची खाण्याची वेळ आली. कधी कधी तर त्यांना अर्धपोटीही झोपावे लागायचे. सामान्य माणसावर होणारे महागाईचे परिणाम विशद करताना दिलेले माथाडी कामगारांचे वास्तवादी उदाहरण हे लेखकाचे आर्थिक बाबींवरचे विवेचन उथळ नसून देश आणि नागरिक त्याच्या केंद्रस्थानी असल्याचे दिसून येते.
‘चित्राच्या व्यापाराचे रंग’ या लेखामध्ये आपण केवळ एक कलाकृती म्हणून पाहात असलेल्या पेटिंग्जमागे किती सखोल व्यावसायिक आराखडे असतात ते उत्तम रीतीने समजावून सांगितलं आहे.
जर्मनीमध्ये पहिल्यांदा गेल्यावर लेखक ज्या टॅक्सीत बसतात ती ‘मर्सिडीस बेन्झ’ असते. टॅक्सीचा ड्रायव्हर सांगतो की, जर्मनीमध्ये ‘मर्सिडीझ बेन्झ’ ही दुय्यम दर्जाची गाडी समजली जाते आणि ती टॅक्सी म्हणून वापरली जाते. भारतात अति श्रीमंतांची गाडी म्हणून मान्यता असलेल्या ‘मर्सिडीझ बेन्झ’बद्दलच, ती गाडी जिथे बनते त्या देशातीलच हे स्थानिक मत’ लेखकाप्रमाणेच आपल्यालासुद्धा आश्चर्याचा धक्का देऊन जातं.
‘उद्योग जगतात काटकसर हा फार महत्त्वाचा गुण मानला जातो. कष्ट करून श्रीमंत झालेली माणसं ही कधी अनाठायी खर्च करत नाहीत आणि जी करतात ती श्रीमंत राहात नाहीत. हा अतिशय महत्त्वाचा संदेश ‘उद्योगी श्रीमंती’ या प्रकरणात लेखक देऊन जातात. फक्त कॉर्पोरेट क्षेत्र विंâवा व्यवस्थापकीय शिक्षण घेणाऱ्या विद्याथ्र्यांनीच नाही तर अगदी सामान्य माणसानेही वाचावे आणि त्याला सहजगत्या समजावे असे हे पुस्तक आहे. आज आपल्याभोवतीचे जग विलक्षण वेगाने बदलते आहे. या बदलत्या जगाची गती समजून घेऊन स्वतःची उन्नती करून घेण्यासाठी हे पुस्तक प्रेरणा देते. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या आर्थिक बदलांचे परिणामकारकपणे विवेचन करणाऱ्या पुस्तकाची मराठी साहित्यात असलेली कमतरता डॉ. गिरीश वालावलकर लिखित ‘सी.ई.ओ.च्या केबिनमधून हे पुस्तक नक्कीच भरून काढते.
लेखकाची भाषाशैली साधी आणि सरळ आहे. त्यामुळे ती थेट मनाला भिडते. स्वतःचे काही अनुभव लेखकाने मिश्किल आणि मनोरंजक शब्दात सांगितेले आहेत. ते वाचताना वाचकाला खेळकर प्रसन्नता जाणवत राहते.
- LOKPRABHA - 09-03-2018
‘सी.ई.ओ.च्या केबिनमधून’ हे पुस्तक बदलत्या परिस्थितीला सकारात्मकरीत्या स्वीकारून आपली जीवनशैली उंचावण्यासाठी मार्गदर्शन करतं. गेल्या काही वर्षांत संपूर्ण जगात विशेषत: प्रचंड वेगाने आर्थिक आणि सामाजिक बदल होत आहेत. त्याचे परिणाम प्रत्यक्षपणे सामान्य माणसाच्या जीवनावर होत आहेत. त्याची जीवनशैली, संवेदनशीलता, सुख आणि यशाबद्दलच्या संकल्पना यामध्येही फरक पडू लागला आहे. अशा वेळी अधिकाधिक व्यवहारी आणि भौतिकतावादी बनू लागलेल्या जगात दीर्घकाळ टिकणारे मानसिक समाधान मिळवणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी आपल्या नैतिक मूल्यांची जोपासना करण्याची गरज ‘सी.ई.ओ.च्या केबिनमधून’ हे पुस्तक उलगडून दाखवतं. सी.ई.ओ. असणाऱ्या आणि बनू पाहणाऱ्यांसाठी हे पुस्तक वाचनीय आहे.
- KRISHIVAL 29-10-2017
सी.ई.ओ.च्या केबिनमधून.... हे डॉ. गिरीश वालावलकर यांचे पुस्तक पब्लिशिंग हाऊसने नुकतेच प्रकाशित केले आहे. आजूबाजूला घडत असलेल्या आर्थिक घडामोडी, त्यातून स्वतःची प्रगती करून घेण्यासाठी उपलब्ध होत असलेल्या संधी, त्यामुळे बदलत चाललेली आपली जीवनशैली आणि या सर्वांचे आपल्या एकूण जगण्यावर, जीवनावर होणारे थेट परिणाम यावर अतिशय रंजक शैलीत भाष्य करणारे लेख या पुस्तकात आहेत.
डॉ. गिरीश वालावलकर हे स्वतः कॉर्पोरेट क्षेत्रात सी.ई.ओ या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचले आहेत. आपल्या व्यवसायानिमित्त त्यांनी अनेक देशांना अनेक वेळा भेटी दिल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या लेखनाला अभ्यास आणि निरीक्षणाबरोबरच विविध प्रकारच्या अनुभवांची समृद्धतासुद्धा लाभली आहे.
‘सी.ई.ओ.च्या केबिनमधून....’ या पुस्तकात एकूण त्रेचाळीस लेख आहेत. लेखांच्या विषयांमध्ये वैविध्य आहे. ‘उद्योगी श्रीमंती’ या लेखात स्वतःची नीतीमूल्य जपूनसुद्धा संपत्ती कमावता येते, हे विविध उद्योगपती आणि त्यांनी आपली औद्योगिक साम्राज्ये उभी करण्यासाठी वापरलेले मार्ग यांची उदाहरणे देऊन विशद केलं आहे. ‘स्विस बँकांची वादग्रस्त व्यावसायिकता’ या लेखात स्विस बँकांची व्यवसाय करण्याची पद्धती आणि त्यांच्या ग्राहकांचं जगभर पसरलेलं जाळं याविषयी सविस्तर चर्चा केली आहे. ‘इंग्लिश बिझनेस’ या लेखामध्ये ब्रिटिश लोकांच्या मानसिकतेवर प्रकाशझोत टाकला आहे. आज आपल्या देशात अनेक संधी उपलब्ध होत आहेत.
जर आपल्या तरुणांजवळ एखादी नवीन कल्पना असेल आणि प्रामाणिकपणे कष्ट करण्याची तयारी असेल, तर ते शेकडो कोटी रुपयांची उलाढाल करणारी कंपनी उभे करू शकतात हे ‘नाविन्यपूर्ण कल्पनेवर आधारलेली उद्योजकता’ या लेखात दाखवून दिलं आहे. कार्पोरेट क्षेत्रात सर्वोच्च पदापर्यंत पोहोचण्यासाठी कोणत्या प्रकारची मानसिकता जोपासावी लागते, त्याचा ऊहापोह ‘शिखरापर्यंतच्या वाटचालीसाठी’ या लेखात केला आहे. ‘औद्योगिक समूह आणि राजकीय पक्ष यांच्यातील परस्परसंबंधां’चे यांचे सविस्तर विवेचन ‘औद्योगिक समूहांचे राजकीय पक्षांवर मोहजाल’ या लेखात केले आहे.
या पुस्तकात डॉ. गिरीश वालावलकर यांनी गंभीर विचारमंथन आणि सखोल विश्लेषणाबरोबरच आपल्याला आलेल्या खुमासदार अनुभवांचं खुशखुशीत शैलीत आणि प्रवाही भाषेत चित्रण केलं आहे.
तामिळनाडूमधल्या तिरूपूर या एका छोट्या खेड्यात सर्व सुखसोयींनीयुक्त जागतिक दर्जांचं पंचतारांकित हॉटेल आहे. त्याचवेळी गावामध्ये मात्र पिण्याच्या पाण्याची वानवा आहे. हॉटेलमध्ये लेखकाला आंघोळीसाठी हव्या त्या तापमानाचे हवे तितके पाणी मिळतं. परंतु, हॉटेलच्या बाहेर, गावात स्त्रिया आणि लहान मुलांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी हातात बदल्या आणि घागरी घेऊन तीन तीन मैल चालत जावं लागतं. हे बघून लेखक अस्वस्थ होतो. जर्मनीमध्ये पहिल्यांदाच गेल्यावर तो ज्या टॅक्सीत बसतो. ती ‘मर्सिडीझबेंझ’ असते. टॅक्सीचा ड्रायव्हर सांगतो की, जर्मनीमध्ये ‘मर्सिडीझबेंझ’ ही दुय्यम दर्जाची गाडी समजली जाते आणि ती ट्रॅक्सी म्हणून वापरली जाते. भारतात अति श्रीमंतांची गाडी म्हणून मान्यता असलेल्या ‘मर्सिडीझबेंझ’चं हे वास्तव लेखकाला अचंबित करतं. लेखकाची भाषा सोपी, सरळ आणि मनाला भिडणारी आहे. अतिशय महत्त्वाचे विचार सोप्या भाषेत आणि खेळकरपणे सांगण्याचं कसब लेखकाला अवगत आहे. ‘चैनीचा व्यवहार’ या लेखात आजच्या जीवन शैलीमध्ये साधेपणा आणि त्यामधून मिळणारी मानसिक शांती व समाधान हीच सर्वात महागडी चैन आहे. ती परवडू शकण्याइतकी क्षमता फारच कमी लोकांकडे उरली आहे.
या एका वाक्यात ते आजच्या समाजाच्या परिस्थितीचं अत्यंत समर्पक वर्णन करतात. मिश्कील शैली आणि निर्मळ विनोदाच्या पखरणीमुळे पुस्तकाचं वाचन मन प्रसन्न करतं. आज आपल्याभोवतीचं जग विलक्षण वेगाने बदलते आहे. या बदलत्या जगाची गती समजून घेऊन तरुणांना स्वतःची उन्नती करून घेण्यासाठी हे पुस्तक प्रेरणा देतं. त्याचबरोबर या बदलत्या जगात समाधानाने जगण्यासाठी आपली नैतिक मूल्यं सांभाळण्याची गरज दाखवून देतं. मराठी वाङ्मयामध्ये अशा प्रकारच्या पुस्तकाची गरज होती. डॉ. गिरीश वालावलकर यांच्या ‘सी.ई.ओ.च्या केबिनमधून....’ या पुस्तकाने ती गरज पूर्ण केली आहे. चोखंदळ वाचकांनी आवर्जून वाचावं आणि आपल्या संग्रही ठेवावं अशा प्रकारचं हे पुस्तक आहे.
- DR. MANOJ BHIDE (DIRECTOR SIAC, MUMBAI)
GOOD INSIGHT PROVIDED KEEPING IN VIEW CONTEMPORARY TIMES. I FEEL READERS OF ALL AGES WILL BE INTERESTED IN IT. BEST WISHES.