joy nuthnice
महाराष्ट्र टाइम्स, ऑक्टोंबर १९९९ कै. वसंत सबनीसतुझे ‘रेशीमगाठी’ वाचले. आनंद वाटला. व्यक्तिचित्रे लिहिणे आणि ती आकर्षकपणे लिहिणे ही अवघड गोष्ट आहे. ज्यांचे आपले जवळचे संबंध असतात त्यांच्याकडे दुरून पाहणे कठीण असते. तसेच आपल्याशी जवळीक नसणाऱ्या माणसाकडे जवळून पाहणे ही अवघड असते. तू ही किमया करून दाखविली आहेस. याबद्दल तुझे मन:पूर्वक अभिनंदन!
ता. क. श्री. वासुदेव कामत यांची रेखाचित्रे फारच छान आहेत. त्यामुळे पुस्तकाचा दर्जा वाढला आहे. त्यांना ही अभिनंदन कळव.
नासिक सकाळ, फेब्रुवारी २००० मंगेश कुलकर्णीउत्तुंग व्यक्तिमत्त्वांचे विलोभनीय दर्शन…
हे पुस्तक म्हणजे १६ व्यक्तिचित्रांचा संग्रह आहे. त्यातील वैशिष्ट्यपूर्ण चित्रण आहे ते जयप्रभा स्टुडिओचं. आजही अनेक चित्रपट कलावंत या स्टुडिओकडे मंदिर म्हणून पाहतात. इतक्या त्या वास्तुचा दबदबा होता.
पुस्काची बांधणी आकर्षक आहे. रेशमाच्या गाठी दाखवणारे अर्थपूर्ण मुखपृष्ठ चंद्रमोहन कुलकर्णी यांचे आहे. पुस्तकासाठी वापरलेला कागद पांढरा स्वच्छ आहे. प्रत्येक व्यक्तिचित्रणात वासुदेव कामत यांनी चित्रे रेखाटली आहेत. ही या पुस्तकाची तांत्रिक वैशिष्ट्ये आहेत. ही व्यक्तिचित्रे वाचल्यानंतर वाचकांचाही त्यांच्यावर स्नेह जडेल.
दैनिक पुढारी (कोल्हापूर), डिसेंबर १९९९निर्मळ भावबंधाच्या रेशीमगाठी…
एकूणच ही व्यक्तिचित्रे मोठ्या माणसांची असली तरी कांचनतार्इंची ती सर्वजवळची माणसं असल्याने त्यांचा आपल्याला कौटुंबिक किंवा घरगुती पद्धतीनं परिचय होतो. या पुस्तकातील सुंदर रेखाचित्रे वासुदेव कामत यांची आहेत. पुस्तकाचे मुखपृष्ठ सुंदर आहे.
पुणे सकाळ, डिसेंबर १९९९ सुजाता पेंडसेमुलायम आठवणींची अक्षरचित्रे…
सर्वच लेख त्यातील भाषेची सुबोधता, आशयाची सुसंगत मांडणी आणि शब्दबद्ध केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण घटना यामुळे वाचनीय झाले आहेत. सर्वच लेखन हृद्य आहे. या पुस्तकातील प्रत्येक लेखाच्या आरंभी रेखाटलेली रेखाचित्रे अत्यंत बोलकी असून त्यांच्या केवळ दर्शनानेच या लेखांमध्ये शब्दांकित झालेल्या व्यक्ती (आणि वास्तू) आपल्या डोळ्यांसमोर उभ्या राहतात.
मुंबई तरुण भारत, नोव्हेंबर १९९९ मेघना आपटेहे बंध रेशमाचे…
व्यक्तिचित्रे रंगवताना त्या त्या व्यक्ती स्वत:च्या आयुष्याशी निगडीत असल्यामुळे नकळतच स्वत: लेखकाचे ही दर्शन या व्यक्तिचित्रणातून घडत असते. ‘रेशीमगाठी’ मधून कांचन घाणेकरांचे ही एक असेच विलोभनीय रूप आपल्या दृष्टीस पडते. जिव्हाळ्याच्या, प्रेमाच्या नात्यांनी गुंफलेल्या या व्यक्तींच्या उणीवा दाखवणे त्यांच्या मनाला पटत नसावे. दोष जाणवले तरी त्यामागील त्यामुळेच या व्यक्तिचित्र संग्रहाला मिळालेले ‘रेशीमगाठी’ हे शिर्षकही अत्यंत समर्पक आहे. प्रतिभावंतांची प्रतिभा आणि कलावंताची कला याच्याशी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी गल्लत केली जाते. त्यांना ही सर्वसामान्य माणसाचे गुणधर्म असतात, हे कुणीच का लक्षात घेत नाही? ही भूमिका कांचन घाणेकर यांची आहे. या दृष्टिकोनातूनच त्यांनी या व्यक्तीरेखांकडे पाहिले आहे. पडद्यावर प्रसिद्धीचे वलय लाभलेल्या आणि त्यामुळेच रसिकांना काहीशा परक्या वाटणाऱ्या या व्यक्तिरेखा ‘रेशीमगाठी’ मधून घरगुती स्वरुपात अवतरतात आणि रसिकांच्या मनात घर करतात.
सुजाता जोग डिसेंबर १९९९वाचकाला गुंतवून टाकणाऱ्या रेशीमगाठी…
भाषेचे कोणतेही अवडंबर न माजवता, त्या त्या व्यक्तीच्या मोठेपणाने दिपून जाऊन त्यांची अवास्तव स्तुति न करता त्या व्यक्ती जशा भावल्या तशा अत्यंत सहजतेने चितारल्या गेल्याने लेखनाला सच्चेपणा प्राप्त झाला आहे. या सगळ्याच व्यक्तींनी लेखिकेच्या जीवनावर प्रभाव टाकला असून, तिने एका कृतज्ञतेच्या भावनेतून हे लेख केले आहे. कांचन घाणेकर यांच्या ‘रेशीमगाठी’त वाचक सहज गुंतत जावा असेच हे पुस्तक आहे.
लोकसत्ता 2002बारकाव्यांनी नटलेली नेटकी-शब्दचित्रं…
या शब्दचित्रांतून कोणा व्यक्तीचा इतिहास/चरित्र सांगण्याचा सोस कुठेही नाही. लेखिकेला या व्यक्ती कशा दिसल्या एवढाच भाग येतो. ही शब्दचित्रं आटोपशीर नि वाचनीय झाली आहेत. अशा लेखांचं पुस्तक करताना फार बारकाईनं त्यांचं संपादन करण्याची आवश्यकता असते. सामान्यत: पूर्णपणे दुर्लक्षित राहणाऱ्या या संपादनाकडे ‘रेशीमगाठी’त मात्र अजिबात दुर्लक्ष झालेलं नाही; त्यामुळे वाचताना कुठेही जुनाटपणा जाणवत नाही किंवा रसभंग होत नाही. या पुस्तकाची एकूण निर्मिती अतिशय चांगली आहे. चंद्रमोहन कुलकर्णींनी केलेलं मुखपृष्ठही चांगलं आहे. या पुस्तकाचं सुंदर अंग म्हणजे त्यातील वासुदेव कामत यांनी काढलेली रेखाचित्रं. मुद्दामहून उल्लेख करावा इतकी अप्रतिम आहेत. पुस्तकाचा तो सर्वांत अविभाज्य भाग झाला आहे. छायाचित्रांनी होणार नाही असा परिणाम या चित्रांनी साधला आहे. कामतांच्या चित्रांमुळे पुस्तक देखणं झालं आहे. या पुस्तकाच्या यशात त्यांचा वाटा मोठा आहे.
अविनाश बिनीवाले