प्रसाद फाटक २०१४ पासून अचानक देशात भयंकर असहिष्णुता पसरली आहे !! अल्पसंख्याकांवर अत्याचार होत आहेत. एवढंच काय तर इतिहासाचे भगवेकरण करून सगळा इतिहास बदलला जात आहे !!! यापूर्वी असे अत्याचार आणि असे खोटे इतिहासलेखन फक्त १९९८ ते २००४ दरम्यान झाले होते, नाही का ? काय कारण आहे बरं ?? सोप्पं आहे... त्या काळात आम्हाला हवी तशी इतिहास आणि संस्कृतीची मांडणी करणारे सरकार सत्तेत नव्हते. आपला देश कसा सगळ्या धर्माच्या लोकांना घेऊन गुण्यागोविंदाने नांदत होता, मुघल राजांनी कला, साहित्य यांच्या माध्यमातून हा देश सांस्कृतिकदृष्ट्या कसा समृद्ध केला, हिंदू धर्मात फक्त आणि फक्त विषमताच कशी होती या गोष्टी या दोन्ही कालखंडातली सरकारे सांगतच नाहीयेत हो ! मग काय करायचं ? चला पुरस्कार परत करूया !! आता उठवू सारे रान !!!...” हा आहे अनेक ‘विचारवंत’, ‘इतिहासकार’ यांचा गेल्या ३ वर्षांतला पवित्रा. ही मंडळी नक्की आहेत कोण, त्यांची विचारपद्धती कशी आहे याबद्दल तपशिलात जाणून घेतलं तरच त्यांच्या वक्तव्यांमागचा हेतू स्पष्ट होऊ शकतो. अशा ख्यातनाम इतिहासकारांच्या उद्योगांचा, पद्धतशीरपणे विणलेल्या जाळ्यांच्या लेखाजोखा म्हणजे ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक अरुण शौरी यांचं ख्यातनाम इतिहासकार हे पुस्तक.
*इस्लामी राजवटीतील अत्याचारांकडे कानाडोळा आणि पण हिंदू जातीसंघर्षावर टीका*
स्वतंत्र भारतात Indian Counsel For Historical Research (ICHR) या संस्थेवर कायमच डाव्या इतिहासकारांचे वर्चस्व राहिले आहे. त्यांनी त्यांच्या ग्रंथांमधून विशिष्ट विचारांची भलावण केलीच पण त्याहून वाईट गोष्ट म्हणजे त्यांनी इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांमधूनही रेटून सोयीस्कर इतिहास मांडला, कारण पाठयपुस्तक मंडळातही त्याच विचारसरणीच्या लोकांचा भरणा होता. ‘आपापसात भांडणं होतील, संघर्ष होईल अशा ऐतिहासिक तपशिलांना पाठ्यपुस्तकांमधून वगळण्याचे’ डाव्या इतिहासकारांचे धोरण राहिले आहे. त्याचीच परिणती म्हणून मुस्लीम राजसत्तांच्या कार्यकाळात काळात झालेल्या सांस्कृतिक आणि धार्मिक आक्रमणांचे उल्लेखच पाठ्यपुस्तकांमधून काढून टाकण्यात आले. पुस्तकातल्या ‘एक परिपत्रक’ या प्रकरणात अशा कारनाम्यांचे धक्कादायक तपशील दिले गेले आहेत. पश्चिम बंगालच्या कम्युनिस्ट सरकारच्या कार्यकाळात ‘माध्यमिक शिक्षण मंडळाने एक परिपत्रक १९८९ साली काढले होते.
त्याद्वारे काय काय फेरबदल करण्यात आले बघा हे उदाहरणादाखल पहा:
१) भारतवर्षे इतिहास या डॉ नरेंद्रनाथ भट्टाचार्य यांच्या पुस्तकातून ‘सुलतान महमुदाने मोठ्या प्रमाणावर खून, लुटालूट, विध्वंस व धर्मांतर करण्यासाठी बाळाचा वापर केला’ या वाक्यातील ‘हत्या आणि धर्मांतर’ हे वगळणे.
२) ‘त्याने सोमनाथ मंदिरातील २ कोटी दिरहाम जवाहिरांची लुटालूट केली आणि गझनीतील मशिदीकडे जाणाऱ्या मार्गावर शिवलिंगाची पायरी बनवली’ यातील ‘शिवलिंगाची पायरी बनवली’ हे गाळून टाकणे.
अशी २५-३० उदाहरणं इथे दिली आहेत
‘संघर्ष टाळण्यासाठी हे केले’ हे धोरण म्हणून ऐकायला उदात्त वाटते. पण इतिहासाच्या दुसऱ्या अंगाबद्दल जेव्हा लिहिले जाते तेव्हा मात्र डाव्या इतिहासकारांकडून एक चलाखी केली जाते. मुस्लीम आक्रमकांच्या अत्याचारांवर जाणीवपूर्वक पांघरुण घालणारे हे ख्यातनाम इतिहासकार भारतातील जातिव्यवस्थेमुळे गतकाळात जो परस्पर संघर्ष झाला त्याबद्दल मात्र अगदी तपशीलवार वर्णनं पाठ्यपुस्तकामधून अगदी जोरकसपणे देत असतात. जातीपातीमुळे हिंदू धर्म कसा वाईट होता हे बिंबवले की त्या तुलनेत इस्लाम हा धर्म कसा उजवा ठरतो (कारण त्यात म्हणे जातीभेद नाहीत !) हेही बेमालूमपणे सांगितले जाते. शिवाय एकदा का उच्चवर्णीय विरुद्ध दीनदलित दुबळे यांच्यातला संघर्ष ठळकपणे मांडला की तेच मनावर बिंबवल्या गेलेल्या तरुण मंडळींना हळूहळू हा मार्क्सने मांडलेल्या ‘शोषक विरुद्ध शोषित’ अशा वर्गविभागणीकडे, त्यांच्या आपापसातल्या संघर्षाकडे आणि अंतिमतः ‘न्याय्य हक्कासाठी हिंसाचार क्षम्य असतो’ या लाडक्या तत्वज्ञानाकडे नेणे सोपे असते. यातूनच मग ‘रशिया झारशाहीच्या तावडीतून कसा मुक्त झाला, आणि या क्रांतीने सामाजिक न्यायाची प्रस्थापना कशी झाली याचेही romantic चित्र उभं करायचं, पण याच डाव्या हुकुमशहांच्या राज्यात लाखो लोक कसे बळी गेले याबद्दल चकार शब्द काढायचा नाही, इतकंच काय पण भारतातल्या कम्युनिस्ट सरकार असलेल्या राज्यांमधल्या पक्षपुरस्कृत हिंसाचाराबद्दल मिठाची गुळणी धरायची हा ढोंगीपणा ख्यातनाम डाव्या इतिहासकारांनी वर्षानुवर्षे चालवला आहे.
*प्राचीन काळातील भारतीय कर्तृत्वाला श्रेय नाही*
मुळात आपल्याइथले डावे इतिहासकार मार्क्सच्या वर्गसंघर्षाच्या चष्म्यातूनच प्रत्येक गोष्टीकडे पाहत असल्यामुळे इथला संघर्ष ते कायमच ठळकपणे मांडतात पण हिंदू संस्कृतीतून उदयास आलेले साहित्य, वैज्ञानिक शोध इ. सकारात्मक बाबींविषयी मात्र कुचकुचत लिहितात. उदा. या पुस्तकातले "कदाचित , बहुतेककरून, संभाव्यपणे... म्हणून" या नावाचे प्रकरण पूर्णपणे याच विषयाला वाहिलेले आहे. इतिहासकार डी. एन. झा यांच्या ‘Ancient India, an introductory outline’ या पुस्तकातल्या खोडसाळबद्दल आपल्याला विस्ताराने कळते. जिथे काही ऐतिहासिक तथ्ये नाकारणे अशक्यच आहे तिथे ते मान्य करायचे पण त्याचे इथल्या विचारपद्धतीला श्रेय मात्र द्यायचे नाही हा भारतातल्या डाव्यांचा खाक्या, म्हणूनच आर्यभट्टाने मूलभूत सिद्धांत मांडले असे कबूल करायचे पण लगेच "ते इथल्या तोपर्यंतच्या विचाराच्या विरुद्ध होते" असे म्हणायचे किंवा कालिदासाच्या साहित्याबद्दल “त्याने जे मांडले तो आधीच्याच शैलीचा विकास होता” अशी मखलाशी करून कालिदासाचीसुद्धा `ऑल्सो रॅन` गटात गणती करून टाकायची. थोडक्यात काय तर इथे असलेल्या चांगल्या गोष्टी कुठल्यातरी दुसऱ्याच कारणांमुळे घडल्या असं म्हणायचं आणि वाईट गोष्टींना मात्र धर्माचे अधिष्ठान कसे होते हेच उच्चरवाने सांगायचं. तीच गोष्ट अन्य धर्मियांच्या राजवटीत घडली असेल तर तिची रंग सफेदी करून टाकायची (उदा. `मौर्य काळात जमा होणाऱ्या करातून करवसुली करणाऱ्यांना पोसले जायचे` असे म्हणायचे पण `औरंगजेबाचा जिझिया कर मात्र हिंदूंना सुरक्षितपणे जगण्यासाठी होता` असे म्हणून भलावण करायची) असे उद्योग इथे निर्लज्जपणे चालले. (विशेष म्हणजे डाव्या इतिहासकारांच्या सर्व निष्ठा ज्या रशियाच्या चरणी वाहिल्या होत्या त्या देशातल्या The History of India या पुस्तकात मात्र प्राचीन काळातल्या भारताच्या अनेक क्षेत्रातल्या प्रगतीबद्दल मोकळेपणाने कबुली दिली आहे, असे अरुण शौरी नमूद करतात. याचाच अर्थ भारताच्या इतिहासाच्या सोयीस्कर मांडणीत भारतातल्या डाव्या इतिहासकारांचे वैयक्तिक हितसंबंध देखील गुंतले असले पाहिजेत)
डाव्या इतिहासकारांनी उकळलेले आर्थिक फायदे
याच वैयक्तिक हितसंबंधांबद्दल पुस्तकाच्या `ते इतिहासकार` या पहिल्या विभागात विस्ताराने लिहिले आहे. एकमेकांची तळी उचलून धरत आपल्याच गोटातल्या इतिहासकारांची वर्णी लावण्याचे काम अनेक डाव्या इतिहासकारांनी केले. शिवाय मोठ्या संशोधन प्रकल्पांवर नेमले गेल्यावर त्यात कसा वेळकाढूपणा केला गेला "मानधन घेत नाही" अशा वल्गना करून प्रत्यक्षात मात्र अनुदान पदरात पडून घेतले, सरकारी खर्चाने परदेश दौरे पदरात पडून घेतले, (एवढे करूनही काही प्रकल्प पूर्ण झाले नाहीतच !) याबद्दल साधार विवेचन अरुण शौरी यांनी या विभागात केले आहे. वैचारिक आणि आर्थिक दोन्ही स्वरूपाचा भ्रष्टाचार करण्याची हिम्मत करणारे ख्यातनाम इतिहासकार अनेक महत्वाच्या पदांवर सरकारी कृपेने राहिले हे आपल्या देशाचे दुर्दैव. रोमिला थापर, इरफान हबीब, सतीशचंद्र, के. एन. पणिक्कर इ. मंडळींनी फेरफार केलेल्या इतिहासाचे देशाच्या काही पिढ्यांवर संस्कार केले आहेत. त्याच मुशीतुन घडलेले आजचे अनेक `विचारवंत` आणि `इतिहासकार` आज `इतिहासात होणाऱ्या ढवळाढवळी`बद्दल सरकारवर आरोप करतात तेव्हा त्या खोटारडेपणाला सीमा नसते. उदारमतवादाच्या मुखवट्याआडचे त्यांचे चेहरे जाणून घेण्याच्या दृष्टीने अरुण शौरींच्या या पुस्तकाला अनन्यसाधारण महत्व आहे.
DAINIK TARUN BHARAT 10-02-2002ख्यातनाम इतिहासकारांचं सत्य!...
गेल्या दोन-तीन महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने ‘इतिहासाचे भगवेकरण’ होत नसल्याचा स्पष्ट निर्वाळा देत याविरुद्ध यायिका दाखल करणाऱ्यांची बोलती बंद केली. कित्येक दिवसांच्या वादावर अखेर पडदा पडला.
इथे केवळ वादावरच पडदा पडला असे पर्यायाने म्हटले आहे. याचा अर्थ इतिहासावर पडदा पडला असे नाही. इतिहासाची सत्यकथित पाने प्रत्येक विवेकावाद्याला सदोदीत उघडावीच लागतात. कटू सत्याचा स्वीकार पर्यायाने करावाच लागतो. तशी भारतीय इतिहासाला अनेकविध रूपे आहेत. त्यांचे स्वरूप प्रत्येक कालखंडात परिस्थिती सापेक्ष असेल, पण काहीतरी शिकवण या इतिहासातून पुढील समाजाला मिळत गेली. अर्थात त्या त्या समाजाने आपल्या इतिहासाकडून काय घेतले, काम नाकारले ही गोष्ट वेगळी. इतिहासकारांनी आपल्या प्राचीन तसेच अर्वाचीन इतिहासाचे दर्शन प्रत्येक समाजाला घडविले. पण या इतिहासाचे पुनरावलोकन करताना आधुनिक समाजाने काय स्वीकारले, काय नाकारले, याचा साकल्याने विचार करणे महत्त्वाचे आहे. ते दर्शन घडविणाऱ्या इतिहासकारांनी कोणत्या सत्यनिष्ठ आणि तर्कनिष्ठ तत्त्वावर इतिहासाचे मूल्यमापन केले याचे भान येणेही तितकेच क्रमप्राप्त ठरेल.
याच मूल्यमापनाचा लेखन प्रपंच सध्याचे निर्गुतवणूक मंत्री, राजकीय भाष्यकार, अर्थशास्त्रज्ञ, संपादक अरुण शौरी यांनी मांडला आहे. आपल्या ‘ख्यातनाम इतिहासकार’ या पुस्तकात तथाकथित इतिहासाची दुरूस्तीवजा चिरफाड केलेली आहे. मूळ इंग्रजीतील पुस्तकाचा अनुवाद सुधा नरवणे यांनी मराठीत केला आहे. त्यांचे प्रयत्न तडीस गेले आहेत.
इतिहास हा नेहमी सत्य असावा, अशी समाजातील बुद्धिप्रामण्यवादी लोकांची अपेक्षा असते. मुळात इतिहास घडताना सत्याच्या जगात घडत असतो. मग ते चांगले घडो अथवा वाईट. ती गोष्ट स्वीकारार्ह असते. ती नाकारून अथवा लपवून चालत नाही.
नेमक्या याच लपविण्याच्या महान कृत्यांवर शैरी यांनी या पुस्तकात झगझगीत प्रकाश टाकला आहे. ‘इंडियन कौन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च’ यामध्ये इतिहास संशोधनाच्या आघाडीवर असलेल्या ‘ख्यातनाम इतिहासकारांनी’ संशोधनाच्या नावाखाली केंद्र सरकारचे कोट्यवधी रुपये निरर्थक घालविले याची कैक उदाहरणे या पुस्तकात आहेत. मार्क्सवादी विचारसणीचे इतिहासकारच बुद्धिनिष्ठ आणि शास्त्रशुद्ध इतिहास लिहू शकतात. हिंदुत्व अथवा मूलगामी विचारांच्या दावणीला बांधलेले संकुचित इतिहासकारांचे हे काम नव्हे असा सरळसोट दावा खउक्ठ मधल्या इतिहासकारांनी केला आहे. अर्थात यात प्रसारमाध्यमांनी ‘सनसनाटी’ बातमीसाठी इतिहासाला ‘केशरी रंग चढविण्याचा मुद्दाही अधिक चघळला आहे. विशेषकरून डाव्या विचारसणीच्या वृत्तपत्र तसेच साप्ताहिकांनी त्या इतिहासकारांचे म्हणणे अत्यंत खुबीने मांडले आहे.
शौरींनी रोमिला थापर, आर. एस. शर्मा, सूजभान, अथरअल्ली, इरफान हबीब, के. एम. श्रीमाळी, सुमीत सरकार, ग्यानेंद्र पांडे, के. एन. पाणीक्कर या इतिहासकारांनी मानव संसाधन मंत्रालयाकडून पैशांचा ओघ सतत चालू ठेवून प्रकल्पांची कशी ऐशीतैशी केलेली आहे. याचा तालिकाबद्ध पुरावा समोर उभा केला आहे. उदा. १९०७-१९०९ सुमित सरकार १२ हजार. लेखन सुपूर्त नाही. दुसरे के. एन. पणीक्कर मदतनीसासह संशोधन एकूण खर्च ४ लाख ५६ हजार ६१७ रुपये प्रकल्पाच्या ठावठिकाणा नाही अशी दहा बारा उदाहरणे आहेत. अजूनपर्यंत लाखो रुपये खर्च होऊनही एकसुद्धा प्रकल्प मंत्रालयाकडे सादर नाही.
इतिहासाचे जातीयवादी रंगाचे पुनर्लेखन होत आहे असा आरोप या ख्यातनाम इतिहासकारांनी केला आहे. पण शौरींना याला आपल्या सखोल संशोधनाचे छेद दिला आहे. धर्माच्या बाबतीत असणारी त्यांची अतिरेकी मते, हिंदू धर्म हाच बौद्ध धर्माचा संहारक अशी हाकाटी हिंदू ब्राह्मणवादी राज्यकर्त्यांनी मुस्लिमांची तसेच इतर धर्मियांची मंदिरे पाडली, याबाबत शौरी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद, अरविंद यांचे धर्मविषयक सखोल तत्त्वज्ञान प्रकट केले आहे. यांचे म्हणणे खोटे ठरविण्याचा चंग या इतिहासकारांनी बांधला आहे असे शौरी यांनी आपल्या लेखनातून स्पष्ट केले आहे. काहीकाही वेळा शौरी यांनी धर्माच्या अनाठायी आग्रहाचा प्रत्यय येथे आणून दिला आहे.
‘इतिहासाचा विपर्यास करणाऱ्या व सत्य दडपून टाकणाऱ्या व्यक्तींच्या हातात आता खउक्ठ संस्था जात असल्याने मी तिच्या कार्याविषयी साशंक होत आहे.’ या श्रीमाळ यांच्या विधानाला डझनभर पुराव्यानिशी धादांत खोटे ठरविले आहे. आपल्या एकूण २१ प्रकरणाच्या पुस्तकात डाव्या विचारसरणीतील इतिहासकारांची तत्त्वज्ञांची विपर्यस्त कृती दाखवून देवून त्यावर उपाहासात्मक भाष्य केले आहे.
धर्म ही अफूची गोळी आहे. असे म्हणणाऱ्या मार्क्सच्या विधानाचा स्वत:च्या कृतीत इतिहासकारांनी अवलंब केला आहे. हे शौरींच्या इतिहासाच्या बाबतीत तसेच धार्मिक विवेचनाच्या बाबतीत दिसून येते. हिंदू धर्माने बौद्ध धर्माच्या वासलात लावली, असे या इतिहासकारांचे म्हणणे आहे. पण इतिहास काही वेगळेच सत्य सांगतं. येथे शौंरीनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे धर्मविषयक तत्त्वज्ञान स्पष्टीकरणार्थ मांडले आहे.
या इतिहासाकारांच्या तात्त्विक मतभिन्नतेबाबत तसेच युक्तीवादाबाबत सडेतोड विवेचन केले आहे. त्यामुळे इतिहासाचे नेमके स्वरूप वाचकाच्या समोर आले आहे. इतिहासाचे नेमके स्वरूप वाचकाच्या समोर आले आहे. इतिहासाचे पुनर्लेखन स्वच्छ आणि सत्याच्या आधारावर करणे पर्यायाने अपरिहार्य ठरते अशी ठाम भूमिका हे पुस्तक मांडते. इंग्रजी पुस्तकाचा मराठीत अनुवाद करताना करावी लागणारी कसरत सुधा नरवणे यांना चुकलेली नाही. कुठे कुठे इंग्रजीचा प्रभाव दिसून येतो अर्थात वाक्यरचनेच्या संदर्भात इतिहासाची आपलीच बाजू तेवढी सत्य म्हणणाऱ्या ‘ख्यातनाम इतिहासकारांना’ सत्याचं भान आणून देणारे पुस्तक वाचकालाही खचितच डोळस करेल. तथाकथित सत्याचा अंधार दूर होण्याची आशा करता येईल.
-गोविंद डेगवेकर
DAINIK SAMANA 21-10-2001इतिहासाच्या विकृतीकरणाचा सडेतोड समाचार...
‘ओसामा बिन लादेन हा मुळात अतिशय शांत, नम्र व दयाळू असा माणूस होता. मात्र परिस्थितीच अशी निर्माण झाली की, ‘जिहाद पुकारण्यावाचून त्याच्याकडे पर्यायच नव्हता. नाइलाजाने त्याने ‘जिहाद’चे अस्त्र उगारले. इस्लाम विरोधकांनी अत्यंत निष्ठूरपणे मानवी हक्कांची पायमल्ली करीत लादेनवर हल्ला केला...’
२५०० साली इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या एखाद्या व्यक्तीला जर वरील मजकूर आढळला तर त्याची लादेनबाबत काय भावना होईल? साहजिकच त्याची सहानुभूती लादेनला आणि इस्लामला मिळेल. अर्थात ही गोष्ट आहे ५०० वर्षांनंतरची. भविष्यातली. भूतकाळाचे काय? पृथ्वीतलावरील मानवी संस्कृती, हिंदुस्थान यांच्या इतिहासाचे काय? वर दिलेले उदाहरण हे प्रातिनिधिक आहे. इथे व्यक्तीऐवजी एखादी विचारसरणी, इसम याबाबतदेखील असे घडू शकते. एखाद्या विचारसरणीला अगदी झोडपून काढणे किंवा मग त्याची तळी उचलून धरणे हे नामवंत इतिहासकारांना सहजशक्य असते. आणि ‘मी म्हणते तेच सत्य’ असा त्यांचा हेका असतो. आपल्या हिंदुस्थानात वर्षानुवर्षे हेच चालू आहे. हिंदुस्थानच्या खऱ्या इतिहासाला बगल देत त्याचे विकृत रूप सातत्याने मांडले गेले आहे. प्रख्यात पत्रकार अरुण शौरी यांनी आपल्या ‘एमिनंट हिस्टोरियन्स’ या इंग्रजी पुस्तकाद्वारे या प्रकाराचा चांगलाच समाचार घेतला आहे. सुधा नरवणे यांनी केलेला या पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘ख्यातनाम इतिहासकार’ मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केला आहे.
जो माणूस इतिहास विसरतो तो भविष्य घडविण्याची क्षमता गमावून बसतो असे म्हणतात. अर्थातच हा इतिहास सत्य स्वरूपात मांडला जाणे अपेक्षित आहे. आपल्या हिंदुस्थानात इतिहास सत्य स्वरूपात मांडला जातो आहे का, या प्रश्नाचे उत्तर दुर्दैवाने ‘नाही’ असे द्यावे लागेल. ‘द इंडियन कौन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च’ (आय सी एच आर) ही इतिहास संशोधन करणारी बडी संस्था. शालेय अभ्यासक्रमाबाबत मार्गदर्शन तत्त्वांची शिफारस करणाऱ्या एन.सी.ई.आर.टी.वर या संस्थेचा प्रभाव. आर्थिक व मनुष्यबळ याची या संस्थेला मुळीच कमतरता नाही. या संस्थेकडून आपल्या देशाच्या इतिहासाबद्दल जे संशोधन व लेखन होत असते ते अतिशय महत्त्वाचे व ग्राह्य मानले जाते. साहजिकच हे लिखाण नि:पक्षपातीपणे व्हावे अशी कुणाचीही अपेक्षा असेल. मात्र ही अपेक्षा कशी फोल ठरली आहे व ठरते आहे हे शौरी यांनी आपल्या पुस्तकातून दाखवून दिले आहे. पुरोगामित्वाचा, सचोटीचा टेंभा मिरवणारे नामवंत इतिहासकार स्वत:च्या तुंबड्या भरण्यासाठी कशा क्ऌप्त्या करतात, फसवणूक करतात हे सांगत त्यांनी त्यांचे चांगलेच वाभाडे काढले आहेत. आयसीएचआरवर प्रदीर्घ काळापासून डाव्या विचारसरणीच्या मंडळींचा पगडा आहे. एखाद्या व्यक्तीने कुठली विचारसरणी आदर्श मानावी हा त्याचा वैयक्तिक प्रश्न झाला आणि तो त्याच्या वैचारिक स्वातंत्र्याचा भाग आहे. मात्र देशांच्या इतिहासाची मांडणी करताना जर अशा प्रकारच्या कुठल्याही विचारसरणींचा चष्मा लावला गेला तर इतिहास अतिशय विकृत स्वरूपात मांडला जातो. ही बाब अतिशय घातक असून शौरी यांनी या पुस्तकातून त्याची सतत जाणीव करून दिली आहे.
‘आयसीएचआर’चे एक उद्देशपत्र आहे. संस्थेच्या कामाचा नेमका उद्देश त्यात उद्धृत केला आहे. १९७८ पासून त्यात काडीचाही बदल करण्यात आलेला नाही. मात्र वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील आघाडी केंद्रात सत्तेवर आल्यानंतर या उद्देशपत्रात बदल करण्यात आल्याचा कांगावा डाव्या विचारवंतांनी सुरू केला. ‘शिक्षणाचे भगवेकरण’ होत आहे, असा आरोप करण्यास त्यांनी सुरुवात केली. पण सत्य परिस्थिती काय आहे हे विशद करून सांगताना शौरी यांनी डाव्यांच्या या ऊरबडवेगिरीचा चांगलाच समाचार या पुस्तकातून घेतला आहे.
‘आय सी एच आर’तर्फे इतिहास संशोधनाचे व त्यावरील ग्रंथ प्रकाशनाचे अनेक प्रकल्प हाती घेतले जातात. हे काम डाव्या गोतावळ्यातील मंडळींनाच दिले जाते. त्यात प्रचंड गैरव्यवहार चालतात. कामाला हातदेखील लावला जात नाही. न केलेल्या कामाचे पैसे खिशात घातले जातात. याबाबतची विस्तृत आकडेवारी देत शौरी यांनी जी माहिती दिली आहे ती वाचून धक्का बसल्याखेरीज राहत नाही. पुरोगामित्व, धर्मनिरपेक्षता यावर केवळ आपलीच मक्तेदारी आहे, अशा तोऱ्यात वावरणारी ही मंडळी कोंडीत सापडली की कशी वागतात, सत्य स्वीकारण्याची त्यांची तयारी कशी नसते, त्यांचा कांगावखोरपणा कसा उफाळून येतो याचे उत्तम वर्णन काही प्रकरणांत आहे.
पश्चिम बंगालमध्ये प्रदीर्घ काळ डाव्यांची सत्ता आहे. आपले ‘डावे’पण सिद्ध करण्यासाठी ही मंडळी इतिहासालादेखील कसे वेठीस धरतात याची माहिती शौरी यांनी दिली आहे. मुस्लीम राज्यकर्त्यांनी हिंदुस्थानात असंख्य देवळांचा विदध्वंस केला हे जगजाहीर आहे. असे असताना प. बंगाल माध्यमिक शिक्षण मंडळाने १९८९ मध्ये एक आदेश काढला व त्याद्वारे शालेय पुस्तकातील अशा प्रकारचा देवळांच्या विदध्वंसाचा उल्लेख गाळण्याच्या सूचना दिल्या! हिंदुस्थानची संस्कृती-परंपरा याबाबत टिकात्मक, तुच्छतापूर्व बोलायचे आणि हिंदुस्तानवर टीका करीत इस्लामचे गोडवे गायचे हा या मंडळींचा आवडता उद्योग. शौरींनी या पुस्तकात डाव्यांच्या या उद्योगांवर टीकेचे आसूड ओढले आहेत.
सोव्हिएत युनियन कोसळल्यानंतर डाव्यांचा आवाज काहीसा कमी झालेला असला तरी शैक्षणिक क्षेत्रावर अद्यापही त्यांचे नियंत्रण आहे. प्रसारमाध्यमातील मोठा भाग त्यांच्या नियंत्रणाखाली आहे, याचा उल्लेख गौरी करतात. या लोकांनी आतापर्यंत जे असत्य लेखन लोकांच्या माथी मारले आहे त्याचा व आय सी एच आरमधील गैरव्यवहारांचा जाब त्यांना विचारलाच पाहिजे, असेही मत ते पुढे मांडतात. पुरोगामित्वाचा टेंभा मिरविणाऱ्या मंडळींचा बुरखा शौरी यांनी या पुस्तकाद्वारे अक्षरश: फाडला आहे. आपल्या इतिहासाविषयी आस्था असणाऱ्या प्रत्येकाने अवश्य वाचावे असे हे पुस्तक आहे. सुधा नरवणे यांच्या अनुवादात क्वचित ठिकाणी त्रुटी जाणवून रसभंग होतो. या त्रुटी दूर करायला हव्यात. डाव्या नामवंत इतिहासकारांची सत्याकडे कानाडोळा करण्याची जी मनोवृत्ती आहे त्याचे यथार्थ दर्शन घडविणारे असे पुस्तकाचे मुखपृष्ठ आहे. मुखपृष्ठकाराच्या नावाचा उल्लेख केलेला नाही. तो केल्यास चांगले.
-राजीव काळे
DAINIK SAKAL (YUVA) 15-10-2002ख्यातनाम इतिहासकारांचं सत्य!...
गेल्या दोन-तीन महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने ‘इतिहासाचे भगवेकरण’ होत नसल्याचा स्पष्ट निर्वाळा देत याविरुद्ध याचिका दाखल करणाऱ्यांची बोलती बंद केली. कित्येक दिवसांच्या वादावर अखेर पडदा पडला.
इथे केवळ वादावरच पडदा पडला असे पर्यायाने म्हटले आहे. याचा अर्थ इतिहासावर पडदा पडला असे नाही. इतिहासाची सत्यकथित पाने प्रत्येक विवेकवाद्याला सदोदित उघडावीच लागतात. कटू सत्याचा स्वीकार पर्यायाने करावाच लागतो. तशी भारतीय इतिहासाला अनेकविध रूपे आहेत. त्यांचे स्वरूप प्रत्येक कालखंडात परिस्थिती सापेक्ष असेल, पण काहीतरी शिकवण या इतिहासातून पुढील समाजाला मिळत गेली. अर्थात त्या त्या समाजाने आपल्या इतिहासाकडून काय घेतले, काम नाकारले ही गोष्ट वेगळी. इतिहासकारांनी आपल्या प्राचीन तसेच अर्वाचीन इतिहासाचे दर्शन प्रत्येक समाजाला घडविले. पण या इतिहासाचे पुनरावलोकन करताना आधुनिक समाजाने काय स्वीकारले, काय नाकारले, याचा साकल्याने विचार करणे महत्त्वाचे आहे. ते दर्शन घडविणाऱ्या इतिहासकारांनी कोणत्या सत्यनिष्ठ आणि तर्कनिष्ठ तत्त्वावर इतिहासाचे मूल्यमापन केले याचे भान येणेही तितकेच क्रमप्राप्त ठरेल.
याच मूल्यमापनाचा लेखन प्रपंच सध्याचे निर्गुंवणुक मंत्री, राजकीय भाष्यकार, अर्थशास्त्रज्ञ, संपादक अरुण शैरी यांनी मांडला आहे. आपल्या ‘ख्यातनाम इतिहासकार’ या पुस्तकात तथाकथित इतिहासाची दुरूस्तीवजा चिरफाड केलेली आहे. मूळ इंग्रजीतील पुस्तकाचा अनुवाद सुधा नरवणे यांनी मराठीत केला आहे. त्यांचे प्रयत्न तडीस गेले आहेत.
इतिहास हा नेहमी सत्य असावा, अशी समाजातील बुद्धिप्रामाण्यवादी लोकांची अपेक्षा असते. मुळात इतिहास घडताना सत्याच्या अंगाने घडत असतो. मग ते चांगले घडो अथवा वाईट. ती गोष्ट स्वीकारार्ह असते. ती नकारून अथवा लपवून चालत नाही.
नेमक्या याच लपविण्याच्या महान कृत्यांवर शौरी यांनी या पुस्तकात झगझगीत प्रकाश टाकला आहे. ‘इंडियन कौन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च’ यामध्ये इतिहास संशोधनाच्या आघाडीवर असलेल्या ‘ख्यातनाम इतिहासकारांनी’ संशोधनाच्या नावाखाली केंद्र सरकारचे कोट्यवधी रुपये निरर्थक घालविले याची कैक उदाहरणे या पुस्तकात आहेत. मार्क्सवादी विचारसरणीचे इतिहासकारच बुद्धिनिष्ठ आणि शास्त्रशुद्ध इतिहास लिहू शकतात. हिंदुत्व अथवा मूलगामी विचारांच्या दावणीला बांधलेले संकुचित इतिहासकरांचे हे काम नव्हे असा सरळसोट दावा ICHR मधल्या इतिहासकारांनी केला आहे, अर्थात यात प्रसारमाध्यमांनी ‘सनसनाटी’ बातमीसाठी इतिहासाला ‘केशरी रंग चढविण्याचा मुद्दाही अधिक चघळला आहे. विशषकरून डाव्या विचारसणीच्या वृत्तपत्र तसेच साप्ताहिकांनी त्या इतिहासकारांचे म्हणणे अत्यंत खुबीने मांडले आहे.
शौरींनी रोमिला थापर, आर. एस. शर्मा, सूजरभान, अथरअल्ली, इरफान हबीब, के. एम. श्रीमाळी, सुमीत सरकार, ग्यानेंद्र पांडे, के. एन. पाणीक्कर या इतिहासकारांनी मानव संसाधन मंत्रालयाकडून पैशांचा ओघ सतत चालू ठेवून प्रकल्पांची कशी ऐशीतैशी केलेली आहे याचा तालिकाबद्ध पुरावा समोर उभा केला आहे. उदा. १९०७-१९९०९ सुमित सरकार. १२ हजार लेखन सुपूर्त नाही. दुसरे के. एन. पणीक्कर मदतनीसासह संशोधन एकूण खर्च ४ लाचा ५६ हजार ६१७ रुपये. प्रकल्पाचा ठावठिकाणा नाही अशी दहा बारा उदाहरणे आहेत. अजूनपर्यंत लाखो रुपये खर्च होऊनही एकसुद्धा प्रकल्प मंत्रालयाकडे सादर नाही.
इतिहासाचे जातीयवादी रंगाचे पुनर्लेखन होत आहे असा आरोप या ख्यातनाम इतिहासकारांनी केला आहे. पण शौरींना याला आपल्या सखोल संशोधनाने छेद दिला आहे. धर्माच्या बाबतीत असणारी त्यांची अतिरेकी मते, हिंदू धर्म हाच बौद्ध धर्माचा संहारक अशी हाकाटी, हिंदू ब्राह्मणवादी राज्यकत्र्यांनी मुस्लिमांची तसेच इतर धर्मियांची मंदिरे पाडली, याबाबत शौरी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद, अरविंद यांचे धर्मविषयक सखोल तत्त्वज्ञान प्रकट केले आहे. यांचे म्हणणे खोटे ठरविण्याचा चंग या इतिहासकारांनी बांधला आहे असे शौरी यांनी आपल्या लेखनातून स्पष्ट केले आहे. काहीकाही वेळा शौरी यांनी धर्माच्या अनाठायी आग्रहाचा प्रत्यय येथे आणून दिला आहे.
‘इतिहासाचा विपर्यास करणाऱ्या व सत्य दडपून टाकणाऱ्या व्यक्तींच्या हातात आता ICHR संस्था जात असल्याने मी तिच्या कार्याविषयी साशंक होत आहे.’ या श्रीमाळी यांच्या विधानाला डझनभर पुराव्यानिशी धादांत खोटे ठरविले आहे. आपल्या एकूण २१ प्रकरणाच्या पुस्तकात डाव्या विचारसरणीतील इतिहासकारांची तत्त्वज्ञांची विपर्यस्त कृती दाखवून देवून त्यावर उपहासात्मक भाष्य केले आहे.
धर्म ही अफुची गोळी आहे, असे म्हणणाऱ्या मार्क्सच्या विधानांचा स्वत:च्या कृतीत या इतिहासकारांनी अवलंब केला आहे. हे शौरींच्या इतिहासाच्या बाबतीत तसेच धार्मिक विवेचनाच्या बाबतीत दिसून येते. हिंदू धर्माने बौद्ध धर्माची वासलात लावली, असे या इतिहासकारांचे म्हणणे आहे. पण इतिहास काही वेगळेच सत्य सांगतो. येथे शौरींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे धर्मविषयक तत्त्वज्ञान स्पष्टीकरणार्थ मांडले आहे.
या इतिहासकारांच्या तात्त्विक मतभिन्नतेबाबत तसेच युक्तीवादाबाबत सडेतोड विवेचन केले आहे. त्यामुळे इतिहासाचे नेमके स्वरूप वाचकाच्या समोर आले आहे. इतिहासाचे पुनर्लेखन स्वच्छ आणि सत्याच्या आधारावर करणे पर्यायाने अपरिहार्य ठरते अशी ठाम भूमिका हे पुस्तक मांडते. इंग्रजी पुस्तकाचा मराठीत अनुवाद करताना करावी लागणारी कसरत सुधा नरवणे यांना चुकलेली नाही. कुठेकुठे इंग्रजीचा प्रभाव दिसून येतो अर्थात वाक्यरचनेच्या संदर्भात.
इतिहासाची आपलीच बाजू तेवढी त्य म्हणणाऱ्या ‘ख्यातनाम इतिहासकारांना’ सत्याचे भान आणून देणारे पुस्तक वाचकालाही खचितच डोळस करेल. तथाकथित सत्याचा अंधार दूर होण्याची आशा करता येईल.
-गोविंद डेगवेकर
DAINIK LOKSATTAसाम्यवादी विचारशैलीवर शरसंधान…
सातत्याने लेखन करून जनमानसावर आपला विशिष्ट ठसा उमटविणारे पत्रकार म्हणून अरुण शौरींच नाव आहे. देशातील ज्वलंत प्रश्न आणि राजकीय घडामोडी हा त्यांच्या लेखणीचा प्रेरणास्रोत. आजवर एकूण चौदा पुस्तकं इंग्रजीत त्यांच्या नावावर प्रकाशित झाली आहेत. Eminent Historians हे त्यांचं अलिकडच्या काळात प्रसिद्ध झालेलं पुस्तक. सुधा नरवणे यांनी ‘ख्यातनाम इतिहासकार’ या नावाने प्रस्तुत पुस्तकाचा मराठी अनुवाद केला आहे.
नवी दिली येथील भारतीय ‘इतिहास संशोधन अनुसंधान’ (The Indian Council of Historical Research) या संस्थेत सरकारने राममंदिर समर्थकांचाच भरणा करून ठेवला आहे. त्यामुळे संस्थेच्या ध्येयधोरणाचं स्वरूप खोडसाळपणे बदललं गेलं आहे. असा प्रक्षोभक आरोप पुरागामी मंडळींनी केल्यामुळे या संदर्भात लेखकाला अधिक तपशीलात जाऊन अभ्यास करावा असं वाटलं, प्रस्तुत आरोप करण्यामागे कोणता उद्देश असावा याचा शोध घेण्यास अरुण शौरी प्रवृत्त झाले. त्या संदर्भातील वाचन-चिंतनातून Eminent Historians लेखन झालं.
‘ते इतिहासकार’, ‘त्यांची विचारपद्धती’ आणि ‘संदर्भ आणि परिणाम’ अशा तीन विभागांच्या अंतर्गत एकूण २१ प्रकरणांतून ‘ख्यातनाम इतिहासकार’ या पुस्तकाचा आशय विभागला गेला आहे. ‘भारतीय इतिहास संशोधन अनुसंधान’ म्हणजेच ‘ICHR’ या संस्थेवर विरोधकांकडून तीन आरोप करण्यात आले. एक ‘ICHR’ चं उद्देशपत्र बदलण्यात आलं, दोन ठरावात Rational शब्दांऐवजी National शब्द घुसडण्यात आला आणि तील मूळ उद्देशपात्रात पाच उद्दिष्टे असताना तीन उद्दिष्टे बदलण्यात आली. हे तिन्ही आरोप केवळ असत्यच नाहीत, तर ते जाणूनबुजून जनतेची दिशाभूल करण्याच्या हेतूने केले आहेत. या संदर्भात अरुण शौरींनी केलेलं विवेचन हा पहिल्या प्रकरणाचा गाभा म्हणावा लागेल. आपल्या प्रतिपादनाला पुष्टी मिळावी यासाठी त्यांनी ‘हिंदू’, ‘पीपल्स डेमॉक्रसी’, ‘आउटलुक’ इ. वृत्तपत्रातील बातम्या व लेख, दूरचित्रवाणीवरील मुलाखत, पुरोगामी मंडळीचे लेखन प्रकल्प, निेवेदने, राज्यसभेत विचारले गेलेले प्रश्न इ. चा उपयोग केला आहे. याच प्रकरणात पुरोगामी मंडळींच्या हाती ‘ICHR’ असताना त्यांनी घेतलेले प्रकल्प कशा पद्धतीने हाताळले गेले, त्यात शासकीय निधीचा कसा गैरव्यवहार झाला, इतिहासलेखन कसे पक्षपाती होते, ‘आपल्या माणसांची हुद्याच्या जागी कशी वर्णी लावली गेली इ. गोष्टींवर शौरींनी खास शैलीत केलेलं भाष्य मुळातूनच वाचायला हवं.
‘त्यांची विचारपद्धती’ हे प्रकरण शौरींच्या आक्रमक शैलीचा मासला म्हणून वाचकांच्या लक्षात राहिल. बंगाल माध्यमिक शिक्षण मंडळाचे (१९८९) आदेश आणि त्या अनुषंगाने लिहिली गेलेली पाठ्यपुस्तके हा या प्रकरणाचा चर्चाविषय. यासाठी ‘आउटलुक’मधील बातमीचा आधार लेखकाने घेतला आहे. ‘मुस्लिम कारर्कीर्दीवर कोणत्याही प्रकारची टीका नसावी. मुस्लिम राज्यकर्ते व आक्रमकांनी मंदिरे उद्ध्वस्त केल्याचा उल्लेख नसावा’ असा आदेश बंगाल माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे परिपत्रकांद्वारे प्रस्तुत करण्यात आला. या संदर्भात काही बंगाली शिक्षकांकडून लेखकाचं वस्तुस्थितीकडे लक्ष वेधण्यात आलं. या गंभीर गोष्टीची दखल घेऊन अरुण शौरी यांनी संबंधित परिपत्रकान्वये लिहिली गेलेली पाठ्यपुस्तकं काळजीपूर्वक वाचून त्यातील त्यांना आक्षेपार्ह वाटणाऱ्या मजुकराचा आधार घेऊन साम्यवादी विचारांच्या मंडळींच्या कार्यशैलीचा खरपूस समाचार घेणारं बोचऱ्या शैलीतील हे प्रकरण वादग्रस्त ठरावं असं आहे.
सभ्यतर इतिहास हिस्टरी ऑफ सिविलिझेशन , हिस्टरीज, ऑफ वर्ल्ड सिविलिझेन, इतिहास-ओ-भूगोल प्रथम भाग इ. बंगालमधील पाठ्यपुस्तके इतिहासाचा, पर्यायाने सत्याचा विपर्यास करून लिहिली गेली असून त्यांत हिंदू समाजाची अवहेलना करून इस्लाम, खिश्चन धर्म आणि साम्यवाद यांची भलामण करण्यात आली आहे, असं लेखकाचं म्हणणं. आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ शौरी यांनी ‘सभ्यतर इतिहास’, ‘हिस्टरी ऑफ सिविलिझेन’, ‘इतिहास-ओ-भूगोल’ इ. पाठ्यपुस्तकांतील माहिती व विधानांचा उल्लेश केला आहे. जेव्हा जेव्हा केरळात मार्क्सवाद्यांचे प्राबल्य होतं, तेव्हा तेव्हा तिथेही असेच प्रयत्न झाल्याचं शौरी एस. एन. झा. , आर.एस. शर्मा, सतीशचंद्र इ. लेखकांच्या पाठपुस्तकाचा संदर्भ देऊन सांगतात.
‘संदर्भ आणि परिणाम’ या प्रकरणात लेखकानं विद्यमान घटना प्रसंगांवर केलेलं भाष्य मूळ प्रतिपादनाला पोषक असंच आहे. अस्पृश्यता निर्मूलन हा विषय गांधींच्या कार्यात नव्हताच हे काशीराम यांनी संसदेत केलेलं विधान, मायावतीनं शंभर कोटी खर्चून बनविलेलं उद्यान, मायावतीचा दलितांना बंदुकीचे परवाना देण्यासंबंधीचा आदेश इ. च्या संदर्भात ‘मौन संमतिलक्षणम्’ या न्यायानं बुद्धिवंतांनी चूप बसणं अरुण शौरी यांना खटकतं आणि त्यामागील हेतू शोधून आपली प्रखर प्रतिक्रिया व्यक्त करतात. सर्व प्रसारमाध्यमांत ‘बुद्धिवंत’ माणसं पेरलेली आहेत, गेल्या काही वर्षात अनेक व्यवसाय व संस्थावर त्यांचा कब्जा आहे. आपल्या आधिपत्याखालील या क्षेत्रातून कळत नकळत आपल्याला अभिप्रेत विचारसणीचा प्रचार-प्रसार करणं हा या मंडळीचा अंतस्थ हेतू आहे हा मुद्दा ते उपसंहाराच्या या प्रकरणात ठासून सांगतात.
धर्माधिष्ठीत वैदिक परंपरा आणि जडवादावर आधारित मार्क्सवादी विचारधारा या दोन परस्परभिन्न जीवनशैली आहेत. या विचारसंघर्षात वैदिक परंपरेशी निष्ठा असलेला लेखक प्रतिपक्षावर शरसंधान करतो आहे असंच चित्र ‘ख्यातनाम इतिहासकार’मधून उभं राहातं.
-नेताजी पाटील
MANTHANख्यातनाम पत्रकार, स्तंभलेखक, संपादक, विचारवंत अन् राजकारणी श्री अरुण शौरी यांच्या राजकीय लेखांचा मराठीतील अनुवाद म्हणजे ख्यातनाम इतिहासकार हे पुस्तक होय.
अरुण शौरीचं स्वत:च एक व्यक्तिमत्व आहे. त्याचा व्यासंग, आपल्या लिखाणातून त्यानी निर्माण केलेली सनसनाटी सर्वाविदीत आहे. किंबहुना अलीकडच्या काळात राजसत्ता खिळखिळी करून प्रेसच निर्णाक महत्त्व सिद्ध होणाऱ्या कालखंडात (तहलका ही आजची घटना धरून) अरुण शौरीचा रोल महत्त्वाचा होता...!
प्रस्तुत ग्रंथाचा विषय प्रामुख्यानं स्वयंघोषित इतिहासकारांचा बुरखा फाडून त्याचे खरे स्वरूप उघड करून दाखविणे हा आहे.
गेल्या काही वर्षात आपल्याकडील राजकारणात पुरोगामित्व, धर्मनिरपेक्षता, जातीयवादी या पोपटपंचीला भलतेच महत्व आले आहे. या शब्दांच्या शिया चढून भल्याभल्या ‘गध्यानी’, ‘खीर’ खालली हा ताजा इतिहास आहे. अशा मतलबी अन् ढोंगी लोकांविषयीची अतोनात चीड शौरींच्या उपहासात्मक लिखाणातून जागोजागी जाणवते. खरं म्हणजे आपलं राजकारण, संसदीय परंपरा आजच्या रसातळाच्या अवस्थेला याच लोकांनी पोचविली आहे. मात्र अरुण शौरी या मनोवृत्तीचा खूप खोलवर अभ्यास करतात... त्याच्या मुळाशी जातात. अभ्यासपूर्णतेने ते या लबाडाचे ढोंग उघडे करतात. त्याच्या मुळाशी जातात अभ्यासपूर्णतेने ते या लबाडांचे ढोंग उघडे पाडतात. साहजिकच त्यांचे लिखाण परिणामकारक ठरते... त्यांच्या प्रतिपादनातील काहीशी क्लिष्टता वगळूनही...!
म्हणूनच ‘जाळले जाण्याचा’ बहुमान त्यांच्याही ग्रंथांना मिळाला आहे. हजारो वर्षांची महान परंपरा, पराक्रमी इतिहास अन् उर्वरित जगाच्या थोबाडात हाणेल अशी संस्कृती असलेल्या या राष्ट्राचा इतिहास तोडमोड करण्यावरचं या तथाकथित इतिहासकारांचा भर राहिला आहे. याबाबतच उदाहरणासहात विवेचन शौरीने केले आहे.
अरुण शौरी यांच्या या मूळ इंग्रजी लिखाणचा मराठी अनुवाद सुधा नरवणे यांनी केला आहे. मेहता पब्लिशिंग हाऊस पुणे यांनी मार्च २००१ मध्ये प्रसिद्ध केलेल्या या ग्रंथाची पृष्ठसंख्या दोनशे सोळा असून त्याचे मूल्य आहे एकशे पन्नास रूपये.