- NILESH SHINDE
वाँरेन बफे एक सामान्य पेपर टाकणारा मुलगा
वयाच्या 11 व्या वर्षी पासून गुंतवणूक क्षेत्रात आला
आणि आज वयाच्या नव्वदीत तो अमेरिकेतील नव्हे तर
जगातील सर्वात श्रीमंत गुंतवणूकदार आहे.
आज त्याच्याकडे संपत्ती 6.4 लाख करोड रूपये आणि
त्यातही कितीतरी कंपन्याची मालकी त्याच्याकडे आहे.
त्याच्या बर्कशायर हँथवे हया गुंतवणूक कंपनीचा एक शेअर
2.16 करोड रूपयाला आहे यावरून कळते की त्याच्या गुंतवणूक पद्धतीवर गुंतवणूकदारांचा किती ठाम विश्वास आहे.
त्याच्या यशाची सूत्र आणि गुंतवणूक पद्धत हया पुस्तकात
सांगितली आहेत , हे पुस्तक म्हणजे व्हँल्यू इन्व्हेस्टींग सूत्रांची गुंफलेली सुरेख माळ ....
गुंतवणूकपूर्व सल्ले :
श्रीमंतीचे प्रदर्शन करण्यापेक्षा खरेखुरे श्रीमंत व्हा
आपण कितीही महाग कपडे घेतले,गाडी घेतली तरीही आपण कुणाही श्रीमंतापेक्षा गरिबच वाटणार
कारण हया तुलनेच्या खेळाला अंत नाही
त्यामुळे फक्त गरजांवर खर्च करा अनावश्यक वायफळ खर्च टाळून पैसे वाचवा...आणि आर्थिक असहाय्यतेला नाही म्हणा.....
ज्याचा वाचवलेला पैसा घरात आहे त्यांनी तो बँकेत साठवा
आणि ज्यांचा साठलेला पैसा खात्यात कुजत पडलाय
त्यांनी तो तसाच ठेवण्यापेक्षा गुंतवा.
छोट्या छोट्या गोष्टीत बेपर्वा माणसे मोठमोठ्या गोष्टीमध्ये बेफिकीर आणि बेशिस्त असू शकतात
आणि लोक जितकी बेपर्वाईने वागतील तितकेच आपण स्वतः जबाबदारीने वागले पाहिजे.
माणूस अनुकरणशील प्राणी आहे पण म्हणून इतरांच्या चुकांचे अनुकरण करणे हे पण चुकीचेच होईल
गुंतवणूकदार होण्यापूर्वी :
आपल्या कुटुंबाचा आयुर्विमा ,आरोग्य विमा (क्रिटिकल इलनेस सह) काढलेला असावा
सहा महिन्यांचे उत्पन्न Emergency फंड म्हणून वेगळ्या बँक अकाउंट वर FD सारख्या सुरक्षित पर्यायात गुंतवावेत
जेणेकरुन अडचणीच्या वेळी ते कामाला येतील आणि आपली गुंतवणूक दीर्घकालीन ठेवण्याचे उद्दिष्ट साध्य होईल.
गुंतवणूकदार झाल्यानंतर :
ज्याला वेळेचा आणि ज्ञानाचा अभाव आहे आणि पैशाची सुरक्षितता जास्त महत्त्वाची वाटते त्यांनी कमी नफा असले तरी बाँड किंवा FD मध्ये पैसे गुंतवणूक करावी.
ज्यांची थोडीफार रिस्क घ्यायची तयारी असेल त्यांनी म्युच्युअल फंडात दीर्घकालीन गुंतवणूक करावी
ज्यांना शेअरबाजाराचे जुजबी ज्ञान आहे त्यांनी इंडेक्स फंडात पैसे गुंतवावेत ज्यात सेन्सेक्स निफ्टी लिस्टेड कंपन्याचे शेअर्सच्या प्रमाणानुसार गुंतवणूक केली जाते
ज्यांना अकाउंटसचे आणि शेअर बाजार कसा चालतो याचे मूलभूत ज्ञान आहे त्यांनी इक्विटी शेअर्स मधे गुंतवणूक करावी.
तसेच शेअर बाजारात यशस्वी होण्यासाठी अतिबुद्धिवान किंवा गणितज्ञ असण्याची कुठलीही गरज नाही ब्ल्यूचिप कंपन्यात गुंतवणूक करूनही उत्तम परतावा मिळवता येतो.
Profit loss, Financial Statement विश्लेषण करता येणे पुरेसे आहे. पण तेवढ्यासाठी पण आपण कुणावर तरी विसंबून राहत असू तर एवढेच लक्षात ठेवा
"जो दुसऱ्या वर विसंबला त्याचा कार्यभार संपला"
शेअर बाजार खूप अवघड क्लिष्ट आहे असा काही तज्ञ आणि ट्रेनिंग सेंटरने त्यांच्या स्वतःच्या पोटापाण्यासाठी निर्माण केलेला भ्रम आहे
आणि टीव्ही ,न्यूजपेपर , मासिक यांनी तो भ्रम आणखी जास्त बळकट केला आहे. त्यामुळे माणसाने स्वतःचा नजरिया बदलावा
गुंतवणूक कशी करावी:
दरमहा गुंतवणूकीसाठी रक्कम बाजूला काढायची सवय लावावी
गुंतवणूक करण्यासाठी बाजूला काढलेली रक्कम ही आयुष्यभर फक्त गुंतवणूकीसाठीच वापरावी.
शक्यतो लवकरात लवकर गुंतवणुकीला सुरुवात करावी
जेणेकरून चक्रवाढीचा फायदा आपल्याला भेटेल.
ज्या कंपन्या सातत्याने उत्तम नफा कमावतात. अश्या केवळ 8-10 कंपन्यात दीर्घकाळ म्हणजेच दहा आणि त्यापेक्षा जास्त वर्षासाठी गुंतवणूक करावी आणि निश्चिंत राहावे
हयात काहीच थ्रिल नाही म्हणून इन्स्टंट पैसा कमवायच्या
(Trading , FO, Commodity )मागे धावू नये.
हाव भीती आणि मूर्खपणा हे माणसाचे अवगुण असतात त्यामुळे आपल्या अवगुणांवर मात करायची आणि दुसऱ्याच्या हयाच अवगुणांचा फायदा घ्यायचा
तसाच मत्सर हा ही माणसाचा मोठा दुर्गुण आहे जो माणसाला कायम असमाधानी बनवतो. त्यावर मात करा
आपल्याला कळत नसलेल्या व्यवसायात गुंतवणूक करू नये.
लक्षात ठेवा इथे सबुरीने वागणा-या माणसाला सतत कार्यरत माणसे संपत्ती मिळवून देतात.
जे सेक्टर कायम चालतात आणि भविष्यात ज्यांची मागणी राहील
अशा सेक्टर टाँप कंपन्याची गुंतवणुकीसाठी निवड करावी.
गुंतवणूक करताना Lumpsum रक्कम एकदाच गुंतवू शकता ते पण ज्यावेळी मार्केट करेक्शन मोड वर असेल किंवा ज्यावेळी मार्केट भयभीत असेल आणि डिस्काउंटचे बोर्ड झळकत असतील
किंवा गुंतवणूकीसाठी SIP पद्धतीचा वापर करू शकता ज्यात महिन्याच्या ठराविक तारखेला ठराविक रक्कम ठराविक शेअर्स खरेदीसाठी वापरली जाते.
लक्षात ठेवा गुंतवणूक विषयीचे अज्ञान आणि कर्ज एकत्रितपणे माणसाला डुबवू शकतात त्यामुळे कर्ज काढून गुंतवणूक करू नये
गुंतवणूकीचे निर्णय विचारपूर्वक सर्व पर्याय पडताळून, योग्य सल्लागारांच्या मार्गदर्शनाने करावी.
कारण अविचाराने केलेली खरेदी आपल्याला निश्चिंत झोप देऊ शकत नाही.
सल्लागार निवडताना खूप काळजीपूर्वक निवडावा जो स्वतःच्या कमिशन साठी काम न करता आपल्या हिताला प्राधान्य देईल आणि जेणेकरुन आपले कुठेही नुकसान होणार नाही.
आपले वर्तन हे गुंतवणूकदारापेक्षा उद्योजकाप्रमाणे हवे
वायफळ खर्च टाळणारा ,नियमांचे पालन करणारा,यशाने हुरळून न जाणारा आणि अपयशाने खचूनही न जाता ध्येयाकडे सतत मार्गक्रमण करणारा उद्योजक व्हावे
शेअर मार्केट मध्ये भाकिते करणारे कायम तोंडावर पडतात
100% खात्रीशीर भाकीत कुणीच मांडू शकत नाही.
भाकीत मांडणारे कदाचित आपल्या उतावीळपणाचा फायदा घ्यायला टपले असतीलही
भविष्यातील निरनिराळ्या शक्यताविषयी कुठलेच अंदाज बांधू नये आणि त्यावर आधारित गुंतवणूक ही नकोच. उदा. EV, AI
सार्वमत हे आपल्या विचारांना पर्याय ठरत नाही त्यामुळे सगळेजण एखादा शेअर्स विकताना दिसतात म्हणून आपणही तसेच करू नये.
इतर लोकांची मतानुसार नव्हे तर आपल्या उद्दिष्टानुसार आणि आपल्या अभ्यासानुसार शेअर्स बाबत आपले वर्तन असावे
त्यामुळे एकदा गुंतवणूक केली तीन वर्षानंतरच पोर्टफोलिओत डोकवायचे, त्यातही सर्व गोष्टी योग्य असतील तर गुंतवणूक दीर्घकाळ तशीच ठेवावी.
इथेच रंकाचा राव आणि रावाचा रंक होतो
त्यामुळे फूकटचा माज बाळगू नका
शेअर मार्केट पेक्षा कुणीही मोठे नाही
शेअर्सची किंमत ही कामगिरीनुसार बदलते
ट्रेडिंग मुळे वाढलेली किंमत कधीही खालीही येऊ शकते
बाजारात अधूनमधून वेगवेगळ्या बूम येतात ,पण लक्षात ठेवा हे जास्त काळ टिकत नाही
त्यामुळे दीर्घकाळ टिकणार्या कंपन्या निवडा.
खराब कंपनीचे (Fraud Case) व्यवस्थापन बदलले तरीसुद्धा तिच्याकडे दुर्लक्ष करा.
तेजीच्या काळात सगळ्या चांगल्या वाईट कंपन्या तरून जातात
कंपनी आणि शेअरहोल्डरची खरी कसोटी बाजार भीतीच्या सावटाखाली असताना लागते.
शेअर्स खरेदीचे निर्णय घेण्यापूर्वी कंपनीच्या कामगिरीचा विचार करा. नुसत्या कोरड्या आकडेवारीने किंवा अपूर्ण माहितीने फक्त दिखाव्याला भुलून गुंतवणूक करु नये.
ज्या उद्योगांना सतत भांडवलाची आणि कर्जाची गरज लागते अश्या उद्योगातून परतावा नेहमी कमी मिळतो.
तसेच काही क्षेत्राला वारंवार अडचणी (कच्च्या माल तुटवडा,आर्थिक घोटाळे ) येतात त्या कंपन्या गुंतवून पडू नका.
नफा जरूर कमावयचा पण त्यासाठी अनाठायी धोका पत्करून आपली रात्रीची झोप मात्र गमवायची नाही
घिसाडघाईने चुकीचे गुंतवणूक निर्णय घेउन अडचणीत स्वतःला पाडू नका
शेअर्स विक्रीचे निर्णय घेण्यापूर्वी कंपनीचे भवितव्य आणि कामगिरी याचाच विचार करा. शेअर्स चे भाव कोसळले म्हणून विकू नका. तसेच दीर्घकाळ आपल्या जवळ शेअर्स बाळगले म्हणून घसरणीमुळे नुकसानही सहन करु नका
शेअर बाजारात काय किंवा एकूणच काय ह्रदयापेक्षा मनाला आणि भावनेपेक्षा व्यवहाराला जास्त महत्त्व द्या. कारण बाजार पैशापेक्षा मानसिकतेवर चालतो.
- Dr Ketan Talmale
Now I am reading वॉरन बफेच्या यशाचे ५० मंत्र in which you present his thoughts and principles in innovative way, simple language. THANK YOU SO MUCH SIR🙏🙏👍👍
- Rohit Pawar
खूप छान पुस्तक आहे .अतिशय कमी शब्दात बफे यांच्या संपूर्ण जीवनाची मांडणी केली आहे आणि खास करून त्यांनी दिलेली सोपी आणि स्पष्ट अशी गुंतवणुकीची सूत्रे आपण ह्या पुस्तकात दिलेली आहेत .
- DAINIK LOKMAT 23-07-2017
वॉरन बफे हे नाव माहीत नाही, असा कोणी नसेल. विशेषत: गुंतवणुकीच्या क्षेत्रातला हा बादशहा. सर्वश्रेष्ठ गुंतवणूकदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. कुठलीही नोकरी वा कुठलाही व्यवसाय न करता न्याय्य मार्गाने अब्जाधीश होण्याची कमाल त्याने करून दाखवली. त्याच्याकडून गुंतवणुकीचे मार्ग खरोखर शिकायला हवेत. या विषयावरच आधारित माहिती या पुस्तकात देण्यात आलेली आहे. विलक्षण बुद्धिमत्तेची झलक यातून निश्चितपणे मिळते.
- Vyapari Mitra -April 2017
वॉरन बफे या जगप्रसिद्ध गुंतवणूकदाराने गुंतवणुकीच्या संदर्भातल्या अत्यंत मार्मिक विधानांचा-मार्गदर्शनाचा लाभ सर्वसामान्य माणसाने घेऊन त्यातून अनेक गोष्टी शिकाव्यात अशी मनोहारी विधाने केली आहेत. त्यातील निवडक व महत्त्वाची अशी ५० विधाने व त्यावरील भाष्य या पुस्तकात अत्यंत नेमकेपणाने मांडले आहे.
या विधानाची पुढील ५ भागांत मांडणी केली आहे: १) गुंतवणुकीविषयी २) उद्योग आणि उद्योजक ३) गुंतवणूक सल्लागार तज्ज्ञ ४) गुंतवणुकीविषयी विविध मते ५) अनुभवाचे बोल. प्रत्येक विभागात १० मंत्र व भाष्य दिले आहे.
वॉरन बफे ही जगातली श्रीमंत व्यक्ती असून प्रत्येक माणसाला त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. घरबसल्या गुंतवणूक करून कमाई करण्याची आशा बाळगणा-या माणसापासून निरनिराळ्या व्यावसायिक-नोकरदारांपर्यंत प्रत्येकाला बफे यांच्या विलक्षण बुद्धिमत्तेची आणि जगावेगळ्या दृष्टिकोनाची ओळख करून देण्यासाठी हे पुस्तक निश्चितच उपयुक्त आहे. त्यांच्या गाजलेल्या ५० विधानांची सोप्या मराठी भाषेत ओळख करून देण्याचा हा प्रयत्न वाचकांना निश्चितच आवडेल.
पुस्तकाचे लेखक अतुल कहाते एमबीए असून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात त्यांना १६ वर्षे अनुभव आहे. टाटा मॅकग्रॉ हिल आणि पियरसनतर्फे भारतात आणि जगभरातही वापरली जाणारी कॉम्प्युटरविषयीची २० पाठ्यपुस्तके, क्रिकेट विषयी वयाच्या १२व्या वर्षापासून लेखन, विविध मराठी वृत्तपत्रे/मासिकातून ४००० पेक्षा जास्त लेख प्रकाशित तसेच विविध टीव्ही चॅनेल्सवर तंत्रज्ञानविषयी अनेक कार्यक्रम तसेच मराठीत ५ पुस्तके प्रकाशित केली आहेत. अशा या अभ्यासू लेखकाने लिहिलेले वरील पुस्तक निश्चितच वाचकांना आवडेल.
- DAINIK LOKMAT 5-3-2017
लेखक अतुल कहाते यांनी ‘वॉरन बफे’ या जगप्रसिद्ध गुंतवणूकदाराने मिळविलेल्या अफाट यशाची आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्याची ओळख त्याच्या व्यक्तिचरित्रातून मराठी वाचकांना करुन दिली आहे. बफेच्या चरित्राचे आणखी वेगळे पैलू ‘वॉरन बफेच्या यशाचे ५० मंत्र’ पुस्तकातून वाचकांना उमजतील. एक-दोन वाक्यांमध्ये त्याने आपल्या गुंतवणुकीच्या यशाचे सार अनेकदा सांगितले आहे. तसेच सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी शेअरबाजाराचे गूढ सहजपणे उलगडून त्यात मोठी झेप कशी घ्यायची, यासाठीचे मार्गदर्शनही केले आहे. प्रत्येक विधानामध्ये दडलेला बफेचा विचार आणि काही वेळा खोडसाळपणा उलगडून दाखविण्याचा प्रयत्न पुस्तकात करण्यात आलेला आहे.
- DAINIK SAKAL SAPTRANG 19-2-2017
वॉरन बफे या जगातल्या सर्वश्रेष्ठ गुंतवणूकदाराविषयी सगळ्यांच्याच मनात खूप कुतूहल आहे. बफे यांनी अब्जावधी रुपयांची संपत्ती कशी कमावली हे जाणून घेण्यात सगळ्यांना रस आहे. बफे यांनी गुंतवणूक करताना जे मंत्र जपले, ते अतुल कहाते यांनी उलगडून दाखवले आहेत. बफे यांनी वेळोवेळी केलेली ही पन्नास विधानं प्रत्येकानं लक्षात ठेवली, तर अनेक मार्ग सुकर होऊ शकतील. त्याची ही विधानं खूप विचार करून केलेली, त्याच्या अनुभवाचं सार असलेली आणि त्याच वेळी खूप मजेशीरसुद्धा आहेत. त्यांचं मर्मसुद्धा कहाते यांनी उलगडून दाखवलं आहे.