Dakasha Mokashiबऱ्याच दिवसानंतर गेल्या महिन्यात लायब्ररीत जाणे झाले.सध्या कोरोना मुळे तिथे मेम्बर्स ना पुस्तक हाताळायला देत नाहीत, रॅक वरची पुस्तके तिथल्या ग्रंथ सेवकाकडे पहायला मागू शकता किंवा एक यादी ठेवली आहे त्यातला क्रमांक सांगून ते पुस्तक मागून घेऊ शकता.मला लांबून चं हे पुस्तक दिसलं, नावं च इतकं इंटरेस्टिंग वाटलं की मी हेच पुस्तक वाचायचं ठरवून लगेच मागून घेतलं.
"मैत्री अशी आणि तशी" मूळ जँन येगर या इंग्रजी लेखिकेने लिहिलेल्या "when friendship hurts" या इंग्रजी पुस्तकाचा श्रीम. सुप्रिया वकील यांनी लिहिलेला हा अनुवाद.जँन येगर या गेली 20 वर्ष नात्यांचा अभ्यास करत आहेत.त्यात "मैत्री" हा त्यांचा विशेष संशोधनाचा विषय आहे.नातेसबंधावर लेखन करणाऱ्या आणि व्याख्याता म्हणून त्या जगभर प्रसिध्द आहेत
मैत्री हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक हवा हवासा असा रेशीम बंध , आवडते विसाव्याचे, विरंगुळ्याचे असे ठिकाण. आजवर एकही मित्र किंवा मैत्रीण नाही किंवा कधी कुणाशी मैत्री करावी अस वाटलं च नाही असा माणूस सापडणं तस विरळाच.अशा या मैत्री च्या नात्याचं महत्व ओळखून लेखिकेने दीर्घ संशोधन करून हा विषय या पुस्तकात मांडला आहे.
कोरोना मुळे झालेल्या लॉक डाऊन मुळे का होईना आपल्या सर्वांना च अचानक खूप वेळ हातात आला तो आपण जसा कुटूंबासाठी दिला तसा त्या निमित्ताने का होईना मैत्री साठी ही दिला rather कुटुंब सारखाच मैत्री मुळे ही हा काळ सुखावह झाला असे ही म्हणायला हरकत नाही मग ती सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहण्याने झालेली मैत्री असो किंवा जुन्या मित्र मैत्रिणी नची फोन, व्हिडीओ कॉल यातून पुन्हा नव्याने बहरलेली मैत्री असो,अशा या मैत्री चे खरं तर खूप महत्वाचे स्थान असते आपल्या आयुष्यात. अशी ही मैत्री आपली कायम सोबत करते , आपल्या ला आधार देते , धीर देते , वेळप्रसंगी आपल्या पाठीशी उभी राहते आणि याच मैत्री ची वीण जर उसवत गेली तर हीच मैत्री आयुष्य वैराण ही करू शकते.
हेच मैत्री च नातं जोडण्यासाठी, ते टिकवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे.ज्यातून आपले आयुष्य अधिक सुंदर ,सुखावह होईल तसेच अपायकारक लोक आधीच कसे ओळखता येतील आणि अशा लोकांशी कसे डील करावे यासाठी नकारात्मक मित्रांचे/मैत्रिणी चे 21 प्रकार या पुस्तकात लेखिकेने दिलेले आहेत.शिवाय मैत्री चे ही काही अलिखित नियम असतात ते कोणते , ते का पाळले गेले पाहिजेत या सगळ्या गोष्टी एक हजार लोकांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण आणि मुलाखती घेऊन लेखिकेने यात मांडलेल्या आहेत.
आपल्या बाकीच्या जबाबदाऱ्या तुन वेळ मिळाला तर मैत्री असे नसून , मैत्री ही खास वेळ काढून आनंद मिळवण्याची गोष्ट आहे.मैत्री ही नुसतीच मानसिक नाही तर आपले शारीरिक स्वास्थ्य ही कसे उत्तम ठेवते याबद्दल ही लेखिकेने यात मार्गदर्शन केलेले आहे.अशी ही मैत्री जोडण्यासाठी, टिकवण्यासाठी आणि त्यातला आनंद मिळवण्यासाठी तसेच मैत्री तुन उदभवणारे संघर्ष टाळण्यासाठी, नकारात्मक मैत्री वर मात करण्यासाठी हे पुस्तक आवर्जून वाचावे असेच आहे.
© ऍड.सौ.दक्षा मोकाशी.
VYAPARI MITRA - MAY 2017‘‘व्हेन फेंडशिप हार्ट्स’’ या इंगजी पुस्तकाच्या लेखिका जॅन येगर म्हणतात, या पुस्तकासाठी संशोधन व लेखन करण्याच्या निमित्तानं मला अपूर्व व मौल्यवान संधी मिळाली. या पुस्तकामध्ये मैत्रीच्या व्याख्येपासून ते समाजशास्त्रीयदृष्ट्या ‘मैत्री’ या विषयाबद्दल सर्व नमूद केले आहे. मैत्री कशी जुळते, ती कशी जपली जाते, तिची अखेर कशी होते, आयुष्याच्या विविध टप्प्यांवरील मैत्रीबद्दल लिहिले आहे. मैत्री एक महत्त्वाचे नाते आहे ते जपण्यासाठी वेळ काढण्याचीही गरज आहे.
पुस्तकाची मांडणी एकूण ५ भागात केली असून भाग १ : मैत्री - मुलभूत बाबी; भाग २ - मित्रच मित्रांना का दुखावतात; भाग ३ - यशस्वी लढा; भाग ४ - बिझनेस, काम आणि मित्र-मैत्रिणी आणि भाग ५ - नव्याने सुरुवात करा. तसेच सुरुवातीला ‘जेव्हा मैत्री अपकारक वळणावर येते.’ त्याबाबत उहापोह केला आहे.
या पुस्तकातून तुम्ही संघर्ष मिटविण्याची जी कौशल्ये शिकाल. त्यांच्या मदतीने तुम्ही तुमचे अडचणीत सापडलेले मैत्रीचे नात वाचवू शकाल. तसेच मुळात मैत्री कुणाशी करावी, तसेच नकारात्मक मित्र / मैत्रिणीला कसे तोंड द्यावे. ज्यायोगे तुम्ही मैत्रीची अखेर करू शकल ती सुद्धा सुत्र-सूत्र सुरू होण्याची शक्यता कमी करून याबद्दल मार्गदर्शन मिळेल.
मैत्री हा आयुष्यातील एक सुरेख रेशीमबंध असतो जो आयुष्यातील चढ-उतारात आपली सोबत करतो, उमेद वाढवितो. या नात्याची वीण उसवत गेली तर माणसाचे आयुष्य वैराण होऊ शकते. अशा या मैत्री या नात्याचे महत्त्व ओळखून ‘जॅन येगर’ या लेखिकेने यामध्ये या विषयाची सविस्तर मांडणी केली आहे.
पुस्तकाची मराठी भाषा सोपी असून पुस्तक वाचायला घेतल्यावर नकळत आपण ते सर्व वाचून काढल्याशिवाय ठेऊच शकत नाही.‘मैत्री’ संबंधी ज्या कोणाला इत्थंभूत माहिती मार्गदर्शन पाहिजे असेल त्या प्रत्येकाने हे पुस्तक वाचलेच पाहिजे असे आहे.
LOKPRABHA - MAY 2017इंग्रजी लेखिका जॅन येगर यांच्या ‘व्हेन फ्रेंण्डशिप हर्ट्स’या पुस्तकाचा सुप्रिया वकील यांनी केलेला अनुवाद म्हणजे ‘मैत्री अशी आणि तशी’ हे पुस्तक.
‘यह दोस्ती हम नही तोंडेगे’ ‘यारी है ईमान मेरा’अशी बॉलीवुडी गाणी सतत आपल्या यारी-दोस्तीतल्या इमानाची, सच्चाईची, ताकदीची आठवण करून देतात. मैत्री ही सगळ्यांच्याच आयुष्यातली महत्त्वाची गोष्ट असते. एकसुद्धा मित्र किंवा मैत्रीण नाही, अशी एकही व्यक्ती समजात सापडणार नाही. कारण मैत्रीमधली सोबत, शेअरिंग हे एखाद्या टॉनिकसारखं असतं. ‘जीवन सुंदर आहे, कारण तुमच्यासारखे मित्र सोबत आहेत’ वगैरे प्रकारचे गोड गोड संदेशही समाजमाध्यांमध्ये फिरत असतात. असे सगळ्या प्रकारे दोस्तीचे गोडवे गात असतानाच जेव्हा ‘मैत्री अशी आणि तशी’ हे पुस्तक समोर येतं तेव्हा मैत्रीची नेमकी व्याख्या काय? मैत्रीचे प्रकार कोणते? याबरोबरच मैत्रीत होणारी बेइमानी, त्याच्या बदलत जाणाऱ्या पातळ्या अशा काही कटू सत्यांचं भानही येतं.
मैत्री हे रक्ताच्या नात्यातूनही वेगळं, छानसं नातं सगळेच मानतात. इतर नात्यांप्रमाणे या नात्यातही अनेकदा समस्या उद्भवता, कठोर निर्णय घ्यावे लागतात. पण दोस्तांशी डील करण्याचे प्रत्येकाचे वैयक्तिक हटके फंडे असतात. फ्रेंण्डशिप कोच ही संकल्पना समोर येताच, काही अंशी तत्त्वांचा आणि भावनांचा कल्लोळ उठतो. मैत्रीमध्ये निर्माण होणारे प्रश्न, उडणारे खटके या संदर्भात एखाद्या फ्रेंण्डशिप कोचचं मार्गदर्शन घ्यावं असा विचार भारतात तरी क्वचितच होत असेल. चित्रपट, कथा-कादंबऱ्यामधून मैत्रीचं कितीही गुणगान गायलं जात असलं, तरी पुस्तकात नमूद केलेले अनेक नकारात्मक प्रसंग आपल्याकडेही घडत असतात. अशा मैत्री संबंधांमधून जीवघेणे प्रसंग ओढवल्याची उदाहरणंही आपण बघतो, पण मैत्री जुळताना, ती दृढ होताना, समोरच्या व्यक्तीमध्ये, नातेसंबंधांमध्ये कशा प्रकारे अपयश येतं, त्याचं मूळ काय? शाळा-कॉलेज, नोकरी व्यवसायांची ठिकाणं, समाजमाध्यमांवरची मैत्री या प्रत्येक ठिकाणी मैत्रीची व्याख्या, व्याप्ती बदलत जाते का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मिळत जातात, आणि मैत्रीतल्या या बाबींचाही इतका खोल विचार केला जातो हे वाचतानाच, त्यातून समाजातील निरिक्षणं, वैयक्तिक अनुभव याबाबत वाचकांच्या मनात आपोआपच तुलनात्मक विचार सुरू होतो.
एखादी विनाशकारी मैत्री कशी तोडायची? विशेषतः ही व्यक्ती जवळची वा अगदी खास असेल तर. जिथं खूप आत्मीय भावना असतात आणि अतिशय खासगी माहितीचं आदान-प्रदान झालेलं असतं अशा ठिकाणी तुमच्या माजी मित्र-मैत्रिणीला तुम्हाला संतप्त करायचं नसतं. बऱ्याचदा तुम्हाला अशा मैत्रीचा नाट्यपूर्ण शेवट होण्याऐवजी ती विरून जावी असं वाटत असतं; थेट तोंडातोंडी होण्यापेक्षा हा मैत्रीबंध हळूहळू विलग व्हावा असं तुम्हाला वाटत असतं. याचं कारण म्हणजे तुम्हाला तुमच्याविरुद्ध सूडसत्र सुरू व्हायला नको असतं. त्याचबरोबर, तुम्हाला नाट्यमय अखेरही टाळायची असते, कारण त्यासाठी भावनांची प्रचंड खळबळ आणि ऊर्जा खर्च होते.
या नात्यासाठी आधीच तुमचे बरेच मौल्यवान साधनस्रोत खर्च झाले आहेत असं तुम्हाला वाटत असतं. जर ‘मजेत जगणं’हा सर्वोत्तम सूड असेल, तर सकारात्मक ‘मैत्री असणं’हा सर्वोत्तम सूड आहे. पुस्तकाच्या मूळ इंग्रजी लेखिका जॅन येगर यांच्या मैत्रीविषयीच्या सखोल अभ्यासातून, संशोधनातून असे अनेक निष्कर्ष या पुस्तकात मांडले आहेत. मैत्रीतील सर्वसाधारण मानसशास्त्रीय, समाजशास्त्रीय तत्त्व, परिस्थितीनुसार, काळानुसार त्यात होत गेलेले बदल, मैत्रीसंबंधीची काही यशस्वी, अयशस्वी उदाहरणं अशा मैत्रीबद्दलचं अथपासून इतिपर्यंत सगळ्या गोष्टी या पुस्तकात वाचता येतात. मैत्रीबद्दलचं हे लिखाण मराठीत वाचताना ते संशोधनपर असूनही त्यात क्लिष्टता, बोजडपणा जाणवत नाही हे सुप्रिया वकील यांच्या अनुवादाचं कौशल्यच आहे.
अपायकारक मैत्री, नकारात्मक मैत्री टिकवण्यासंदर्भात किंवा तिला पूर्णविराम देण्यासंदर्भातली प्रश्नावली आणि टिप्स, मैत्री करण्यापूर्वी माणसं कशी ओळखावीत? ब्रेक के बाद मैत्री जोडताना करायची पडताळणी, प्रश्नावली समाविष्ट असलेलं हे पुस्तक म्हणजे एक मैत्री ही वैश्विक संकल्पना असली, तरी संस्कृती, परंपरा, सामाजिक, आर्थिक, वैचारिक परिस्थितीनुसार तिचे कंगोरे बदलत जातात. त्यामुळे शालेय परीक्षांसाठी विविध विषयाच्या मार्गदर्शक पुस्तकांचा जसा आधार घेतला जातो, तसाच आधार या मार्गदर्शकाचा घेता येऊ शकतो, शालेय पातळीवरील विषयांचं मार्गदर्शक उत्तरं लिहून गुण मिळविण्यासाठी निश्चितच उपयोगी असतं, तसंच हे मार्गदर्शक मैत्री जोडण्या-तोडण्यासाठी उपयुक्त ठरेल. पण कृत्रिमपणे.... कारण अर्थातच, मूळ विषयाचं ‘मैत्रीचं’आकलन हे ज्याच्या त्याच्या कुवतीनुसार होणार.
मैत्रीच्या विविध पैलूंना स्पर्श करत हे पुस्तक आत्मपरीक्षण करायला प्रवृत्त करतं, अगदी मुखपृष्ठापासून, मनगटावरचे रंगीबेरंगी बॅण्ड्स कितीही आकर्षक असले तरी तुमच्या मैत्रीचे बंध किती दृढ आहेत हे त्यावरून ठरू शकत नाही. त्यासाठी एकमेकांत गुंतणं नाही, तर त्या एकमेकात गुंफलेल्या हातांसारखं गुंफलं जाणं आवश्यक असतं. म्हणूनच मुखपृष्ठावरच सांगितलं आहे, की विश्वासघात करणाऱ्या, नातं तोडणाऱ्या किंवा मनावर घाव घालणाऱ्या मित्रांशी पुन्हा मैत्री करा.
DAINIK LOKMAT 09-04-2017आयुष्यात रक्ताच्या नात्याइतकीच महत्त्वाची असते मैत्री. प्रत्येक चढउतारात मित्रमैत्रिणी सुरेख साथ देतात. आधार देतात. उमेद जागवतात. उत्साह वाढवतात; पण हेच जर मैत्रीचे नाते बिघडले, तर मात्र होत्याचे नव्हते होऊन बसते. जिवाला जीव देणारे हे मित्र जिवावर उठलेले आपण पाहतो. त्यात आता हे नाते अधिक संवेदनशील बनत चाललेले आहे. लेखिका जॅन येगर यांनी या एकूणच विषयाची संशोधनपर मांडणी केली आहे. ही मैत्री अधिक चांगली कशी टिकवून ठेवता येईल, हे नात अधिक चांगल्या रीतीने कसे फुलवता येईल, याचे मार्गदर्शन केले आहे.
Dainik Divya Marathi 7/4/17मैत्री`हा अायुष्यातील एक सुरेख रेशीमबंध असताे, जाे अायुष्यातील चढ-उतारात अापली साेबत करताे, अाधार देताे, अापली उमेद टिकवून ठेवताे, पण जर या सुंदर नात्याची वीण उसवत गेली, तर माणसाचं अायुष्य वैराण हाेऊ शकतं, त्याचे दूरगामी परिणाम घडू शकतात. वैयक्तिक अायुष्य, करिअर, इतर नातेसंबंध यावरही ठळक दुष्परिणाम घडू शकतात. अशा या मैत्रीच्या नात्याचं महत्त्व अाेळखून लेखिका जॅन येगर यांनी दीर्घ संशाेधनातून या विषयाची सविस्तर मांडणी केली अाहे. मैत्रीचं नातं जाेडण्यासाठी, ते टिकवण्यासाठी, त्यामुळे अायुष्य अधिक अानंदी सुखकर बनण्यासाठी काय करता येईल, तसंच नकारात्मक मैत्री, मैत्रीत उद्भवणारे संघर्ष यावर कशी मात करता येईल अशा अनेक पैलूंना तपशीलवार स्पर्श करत हे पुस्तक `मैत्री`विषयक मार्गदर्शन करतानाच अात्मपरीक्षणास प्रवृत्त करते. जॅन येगर या नातेबंधांविषयी लेखन करणाऱ्या व्याख्याता म्हणून अांतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध अाहेत. गेली २० वर्षे त्या नात्यांचा विस्तृत अभ्यास करत अाहेत. त्यात मैत्री हा त्यांचा विशेष संशाेधनाचा विषय अाहे. त्यांची काही पुस्तके जगभरातील भाषांत अनुवादित हाेत अाहेत. त्यांच्या मुलाखती मुद्रित दृकश्राव्य माध्यमातून वरचेवर प्रसिद्ध हाेत असतात. १९८० पासून लेखिकेने मैत्री या विषयावर जे काही संशाेधन केले अाहे ते बऱ्याचअंशी या पुस्तकात उतरलेले अाहे. शिवाय गेल्या पाच वर्षांत पुढे अालेल्या काही नवीन मुद्द्यांचा अभ्यासही यात अालेला अाहे. हा सगळा अभ्यास सुमारे १८० मैत्री सर्वेक्षणांच्या प्रतिसादकांवर अाधारित अाहे. यासाठी लेखिकेने एका वेबसाइटद्वारे पाेस्ट केलेल्या प्रश्नावलीला मिळालेल्या प्रतिसादाचा अाणि काही निवडक दूरध्वनीवरील सविस्तर संभाेरे व्यक्तिश: मुलाखती यांचाही या अभ्यासात समावेश अाहे. यात ४१ पुरुष, १३९ स्त्रियांनी १८० प्रश्नावली भरून दिल्या अाहेत. हे सगळे १३ ते ७२ या वयाेगटातील हाेते. तुमची मैत्री अल्पकालीन असाे वा कायमची, ती अापल्या अायुष्यातील अनमाेल बंधच असते. विशेषत: ती सकारात्मक मैत्री असते, तेव्हा तर हा भावबंध अमूल्यच असताे. समजा एखादी मैत्री कायम राखता अाली नाही, तरी अापण या नात्यातून स्वत:बद्दल अाणि एकूण मैत्री या विषयाबद्दल बरंच जाणून घेऊ शकताे. अपयशी मैत्रीच्या नैराश्याशी कसा सामना करावा अाणि स्वत:ला तुमच्या त्या मित्र-मैत्रिणीला माफ कसं करावं, हे तुम्हाला या पुस्तकातून करता येईल.
DAINIK LOKMAT 14-03-2017आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचं आणि जिव्हाळ्याचं नातं कोणतं असेल, तर ते ‘मैत्री’चं. प्रत्येकाची मैत्रीची परिभाषा वेगळी असू शकते; पण त्यातून निर्माण होणारा भावनिक ओलावा आणि गुंतागुंतीत फारसा फरक नसतो, ही मैत्री काहींचे सर्वंस्व व्यापून टाकते. मैत्रीमधून झालेला विश्वासघात, ती दीर्घ काळ टिकण्यासाठी चाललेली धडपड या गोष्टी वरकरणी कॉमन वाटतात. ‘मैत्री’ या विषयावर जँन येगर यांनी संशोधन करून ‘व्हेन फ्रेंडशिप हर्ट्स’ हे इंग्रजी पुस्तक लिहिलं. या मूळ इंग्रजी कादंबरीचा मराठी अनुवाद सुप्रिया वकील यांनी वाचकांना उपलब्ध करून दिला आहे. विश्वासघात करणाऱ्या, नातं तोडणाऱ्या किंवा मनावर घाव घालणाऱ्या मित्रांशी पुन्हा मैत्री कशी करावी? याचे मार्गदर्शन पुस्तकात करण्यात आले आहे.
SAKAL SAPTRANG 26-2-2017मैत्री हे अतिशय हळुवार असं नातं. अनेकदा किरकोळ किंवा गंभीर कारणांमुळे ही मैत्री अपायकारक वळणावर येते आणि ते नातं जवळजवळ तुटतंच. तेच नातं पुन्हा कसं जोडायचं, विचार कसा करायचा, मूळ कसं शोधायचं आदींविषयी या पुस्तकात ऊहापोह करण्यात आला आहे. मैत्री या विषयावर संशोधन करणाऱ्या जॅन येगर यांनी लिहिलेल्या ‘व्हेन फ्रेंडशिप हर्टस’ या पुस्तकाचा हा मराठी अनुवाद. सुप्रिया वकील यांनी तो केला आहे. मित्र म्हणजे नक्की काय, मैत्री जोडण्यापूर्वी अपायकारक लोक कसे ओळखायचे, मित्रच मित्रांना का दुखावतात, मैत्री वाचवता येऊ शकते का, नव्यानं सुरुवात कशी करायची, तडे गेलेली मैत्री पुढे कशी निभवायची अशा अनेक गोष्टींवर पुस्तकात मार्गदर्शन करण्यात आलं आहे.