हेमंत सांबरेगेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होता . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा!
Mandar Paranjape*सार्थ - एका अमृतमंथनाची गोष्ट*
भारताचा पूर्व-मध्ययुगीन इतिहास म्हणजे साधारण इसवीसनाच्या आठव्या ते दहाव्या शतकातला इतिहास मोठा रोचक आहे. जुनी वैदीक संस्कृती, नव्याने उसळणारे बौद्ध-जैन विचारधारणांचे प्रवाह, आणि वायव्य सीमेवर धडका मारणारा म्लेंच्छ धर्म! या पार्श्वभूमी वरील भैरप्पा यांची "सार्थ" ही कादंबरी नुकतीच वाचली. भारतीय संस्कृती विषयी आस्था असलेल्या प्रत्येकाने आवर्जून वाचावी अशी ही कादंबरी आहे. उमा कुलकर्णी (पती विरुपाक्ष यांच्या मदतीने) यांनी या कादंबरीचा तरल अनुवाद मराठीत केला आहे हे ओघाने आलेच, वेगळे सांगायला नको!
कर्मकांडांना सर्वाधिक महत्त्व ज्यात आहे अशी वैदिक संस्कृती आणि कर्मकांडांना नाकारून केवळ मानसिक पातळीवरील प्रयत्नांनी बौद्धत्व प्राप्त करून घेता येते असे सांगणारे बौद्धमत यातील संघर्ष मानसिक/वैचारिक पातळीवरचा होता. वादविवाद करायचा, जो वादविवादात पराभूत होईल त्याने जेत्याचे मत मान्य करायचे असा साधा अहिंसक, बहुजन समाजाची घडी न विस्कटणारा प्रकार घडत होता. राजमान्यताही सहिष्णू होती. सम्राट अशोकाच्या कालखंडांत सुरू झालेली बौद्ध क्रांती देशभर व्याप्त होत होती.
त्याचवेळी वायव्येच्या सीमेवर एक हातात तलवार आणि दुसऱ्या हातात कुराण घेऊन अरबी धर्म वावटळ बनून तुटून पडला. गांधार (कंधार), मूलस्थान (मुलतान) येथील वैदिक आणि बौद्धमत वादळात कोसळणाऱ्या वृक्षांप्रमाणे उन्मळून पडले. एतद्देशीय प्रजेच्या श्रद्धास्थानांवर घणाचे घाव घालून त्यांच्या श्रद्धा नामोहरम करण्याचा म्लेंच्छांचा डाव इराणातील अग्निपूजकांविरुद्ध यशस्वी झाला होता, तोच गांधार, मूलस्थानात वापरला गेला. धर्मकारणापाठोपाठ अर्थकारण ताब्यात घ्यायचे आणि समग्र समाजजीवनात स्वतःचा एकेश्वर धर्म बलपूर्वक लादायचा म्लेंच्छांचा डाव होता.
याला अहिंसक प्रतिछेद देण्याची एकांडी क्रांती श्रीमद शंकराचार्यांनी घडवून आणली असे अप्रत्यक्ष प्रतिपादन कादंबरीत केले आहे, त्यातील ऐतिहासिक तथ्य तपासून पाहावे लागेल, मात्र वैचारिक पातळीवर ते सिद्ध करण्यात भैरप्पा पूर्णपणे यशस्वी झाले आहेत. कोणत्याही कर्मकांडांच्या पलीकडचे केवळ अध्यात्मिक पातळीवरचे अद्वैत तत्त्वज्ञान मोठ्या वेगाने आसेतुहिमाचल भारतवर्षात प्रस्थापित करण्यात आचार्य यशस्वी ठरले. मंदिरे, स्तूप, विद्यापीठे, बौद्धविहार या भौतिक गोष्टी नष्ट करण्यात म्लेंच्छ यशस्वी झाले, तरी, आचार्यांनी रुजविलेला अद्वैत विचार त्यांना समूळ नष्ट करता आला नाही. तेव्हढी म्लेंच्छ लोकांची बौद्धिक पात्रताच नव्हती. आज आपण हिंदू आहोत ते आचार्यांमुळे ही भावना मनात रुजविण्यात कादंबरी सफल ठरते, हेच तिचे सर्वात मोठे यश आहे. इस्रायल, इराण म्लेंच्छांनी पादाक्रांत केले, इंडोनेशिया, मलेशिया जिंकला, भारतवर्ष त्यांना जिंकता आले नाही, कारण, कदाचित आचार्य श्रीमद शंकराचार्यांनी ती लढाई अशा प्रतलावर नेऊन ठेवली होती की तिथे म्लेंच्छ पोहोचूच शकले नाहीत.
अर्थात हे विचार "सार्थ" ही कादंबरी वाचून मनात उठलेले तरंग आहेत. यातून आचार्यांच्या विचारांना आपल्या योग्यतेच्या प्रतलावर समजून घेण्याची प्रेरणा नक्की झाली आहे.
लेखनसीमा.
- मंदार परांजपे
Ashwini Kulkarni-Umbrajkarवाचन सार्थ करणारी ‘सार्थ’ नावाची ‘सार्थ’ कादंबरी...
एस. एल. भैरप्पा यांची ‘आवरण’ हि कादंबरी वाचली आणि या कादंबरीने अशी काही मोहिनी घातली कि जिथून मिळेल तिथून भैरप्पा वाचायायचे असे निश्चित केले. आवरण नंतर हातात आली ती हि ‘सार्थ’ कादंबरी.. पहिल्या पानापासूनच अलगदपणे ७व्या, ८व्या शतकात आपले मन कसे जाते हे समजत नाही..
‘सार्थ’ म्हणजे व्यापाऱ्यांचा तांडा.
पंचविशीत असणाऱ्या नागभट्ट नावाच्या तरुणाची हि कथा. राजाच्या आज्ञेनुसार प्रवासाला निघालेला हा युवक, वाटेतच त्याला पत्नीच्या व्याभिचाराविशय समजते. त्यामुळे घरी न परतता सार्थासोबत वाट मिळेल तिथे आणि नशीब नेईल तिकडे जाण्याचे ठरवतो. या प्रवासामध्ये अनेक व्यक्ती त्याला भेटतात. अनेक मानसिक स्थित्यंतरातून त्याला जावे लागते. हटयोग आणि अघोरी तंत्रविद्या आत्मसात करण्यापायी त्याचे जीवन भरकटले जाते.. त्याचवेळी त्याच्या आयुष्यात चंद्रिका नावाची नाट्य कलाकार येते. हि चंद्रिका त्याला ‘सार्थ’ जगणे शिकवते. नागभट्ट आणि चंद्रिका यांच्यामधील नाते लेखकाने अगदी तरलपणे उलगडले आहे.
या कालखंडामध्ये बौध्द धर्माने बहुतांश भारत व्यापला होता. बौध्द धर्मीय लोक वैदिक लोकांना त्यांच्या धर्माचे महत्व पटवून देत असल्याचा विलक्षण प्रसंग मोठ्या खुबीने या कादंबरीमध्ये लिहिला आहे.
अभावितपणे नागभट्टाची गाठ गुरु कुमारील भट्टांशी पडते. तत्कालीन समाजामध्ये पंडित कुमारील भट्ट हि अतीव आदरणीय अशी व्यक्ती होती. कुमारील भट्टांची वैदिक धर्मावर अपार श्रद्धा असते. तरीही बौध्द धर्म जाणून घेण्यासाठी ते बौद्ध धर्म स्वीकारतात.. धर्मांतरण हि त्या काळी खूप निंदनीय गोष्ट होती.. अशा व्यक्तीला पूर्वीच्या धर्माचा नैतिक अधिकार राहत नाही.. परंतु वैदिक धर्माचरण हा कुमारील भट्टांचा श्वास होता. त्यामुळे सर्वांसमक्ष स्वतः चिता रचून ते आत्मदहन करण्याचे ठरवतात. स्वधर्माची महती जाणून घेण्यासाठी प्रसंगी धर्मांतरणाचे पाप करून, प्रायश्चित्त म्हणून प्राणांचे बलिदान देणारे पंडित कुमारील भट्ट भैरप्पानी ठळक चित्तारले आहेत.
कुमारील भट्टांची धर्मनिष्ठा आणि चंद्रीकेचे निर्व्याज प्रेम या दोन गोष्टींमुळे नागभट्टाच्या भरकटलेल्या आयुष्यात खूप मोठा बदल होतो. सार्थाबरोबरच्या या प्रवासात त्याला जीवनाची सार्थता लाभते..!!
एस. एल. भैराप्पांची ओघवती लेखणी आणि उमा कुलकर्णी यांचा यथोचित अनुवाद यामुळे हि कादंबरी सदैव स्मरणात राहील. सर्वांनी ती आवर्जून वाचावी..
© सौ. अश्विनी कुलकर्णी-उंब्रजकर
Rama Naamjoshiवेळ काढून वाचावे असे काही
`सार्थ`.....
एस् एल् भैरप्पा यांचं पुस्तक ज्याचा अनुवाद
उमा कुलकर्णी यांनी केलाय. ते वाचायला घेतलं आणि
भारल्यासारखी वाचतच गेले.
`सार्थ` या शब्दाचा सामान्य माणसाला अभिप्रेत असलेला अर्थ म्हणजे अर्थासह
पण या कादंबरीत या शब्दाचा अर्थ पूर्णतः वेगळा आहे.
ही कादंबरी साधारणपणे आठव्या शतकातील आहे.
ज्या काळात सार्थ हा शब्द व्यापार्यांचा तांडा या नावाने प्रसिद्ध होता.
नागभट्ट हा कथेचा मुळ नायक आहे जो मंडनमिश्रांच्या गुरुकुलात वेदाध्ययन केलेला आहे. नव्याने राज्याभिषेक झालेल्या अमरुक राजाचा तो परममित्र आहे.
म्हणूनच राजा एक महत्वाची कामगिरी विश्वासाने आपला मित्र असलेल्या नागभट्टावर सोपवितो.
इथूनच कथानकाची सुरुवात होते.
अशाच एका सार्थात नागभट्ट सामिल होतो. व्यापारातील अनेक खाचाखोचा समजून घेण्यासाठी.
हा सार्थ म्हणजे सामान्य माणूस कल्पनाही करू शकणार नाही असं प्रकरण असतं. हा तांडा थोडाथोडका नाही तर व्यापार्यांसाठी आवश्यक असलेले सामान लादलेले पंच्याहत्तर घोडे, दोनशे बैलगाड्या,
शंभर गाढवं, दररोजच्या आहारासाठी लागणारं धान्य, इतर सामान, गाड्यांची, चाकाची धाव सुटली तर बसवायला सुतार,लोहार इतका प्रचंड काफिला
ज्यात बहुतेक माणसं अशी ज्यांना तलवार चालवता येते आणि स्वतःच्या व इतरांच्याही जीवाचं तसंच मौल्यवान वस्तूंचं संरक्षण करता येतं.
अशा सार्थात सहभागी होऊन मार्गक्रमण करणारा नागभट्ट या मोहीमेतून नेमकं काय शिकतो.
हा वरवर दिसणारा भौगोलिक प्रदेशातील प्रवास करत असताना त्याच्या अंतरंगातही एक अविरत प्रवास चालू आहेच.
अनेक धर्म- पंथातल्या तात्विक मतभेदालाही त्याला सामोरं जावं लागतं आहे.
मध्ययुगीन कालखंडातील अनेक सत्य आणि कल्पित घटनांद्वारे ही कादंबरी उलगडत जाते.
नालंदा विद्यापीठ, पूर्वेचं
सूर्यमंदिर ही ऐतिहासिक स्थळं कादंबरीचा प्रवाह सखोल करत जातात.
नागभट्टाचा अनुभव कथन होतं असताना
रसिक वाचकही त्यात खेचला जातो.
मध्ययुगीन कालखंडातील अनेक उलटसुलट अनुभव नागभट्टाला परिणामी वाचकालाही येतात.
आयुष्यातला नेमका धागा कोणता यावर विचार करायला वाचकाला भाग पाडतात.
नागभट्टाची होणारी तगमग, सगळीकडे त्याला येणारा अपूर्णत्वाचा अनुभव आणि तरीही त्याचा सतत नेमक्या सत्याचा शोध घेत राहाणं यांनीच या कादंबरीचा पट घट्ट होत जातो.
आणि त्याला अंतिमतः झालेल्या सत्याच्या शोधाशी वाचक सहज स्वाभाविकपणे जोडला जातो.
माणसाच्या अंतरंगातील प्रवास, त्याची सत्य शोधण्याची चिकाटी, आणि तीही आयुष्याच्या प्रवासाचं प्रतिबिंब असलेल्या `सार्थ` च्या पार्श्वभूमीवर.
या सार्या अनुभवांसाठी
आवर्जून वाचावं असं पुस्तक
धन्यवाद,
सौ. रमा नामजोशी
🌹🍃🌹
Mahesh Hande`व्यासंग-व्याप्ती` आणि `व्यासंगाची तीक्ष्णता` ह्या भैरपांच्या कादंबरीच्या वैशिष्ट्यांना `सार्थ` सुद्धा अपवाद नाहीच.
आठव्या शतकाच्या पार्श्वभूमीचा आधार घेऊन बुद्धीला आकलन न होणारे सूक्ष्म भाव व त्यामागील तत्वज्ञान त्यांनी भैरप्पा शैलीत मांडले आहे.
कादंबरीचा नायक नागभट्ट आपल्या राजाच्या आदेशाने सार्थ ची कार्यपद्धती जवळून समजून घेण्यासाठी व व्यापारातील बारकावे जाणण्यासाठी सार्थबरोबर निघतो आणि मग त्यानंतर सुरू होते द्वंद्व....-वैदीक विरुद्ध बौद्ध...
- गृहस्थाश्रम की संन्यास...
-जीवन की मृत्यू...असे एक ना अनेक
`माणसानं पुरुषार्थाच्या आधारे नेहमी कर्मनिष्ठ राहिलं पाहिजे, नाहीतर जीवन अर्थभ्रष्ट होऊन जाईल. ही अर्थभ्रष्टताच मनाला खिन्नता जाणून रुचिहीनता निर्माण करते`.हे खिन्न मन व जीवनातील रुचीहीनता याच गमक तर आपल्याला विचारमग्न करायला लावत आणि त्यामागील सत्यता ही पटते.
संपर्क पुस्तकभर प्रेम-प्रणय परस्परभाव,कलावंतांचे अंतर्यामी भाव,वेदविद्या, कर्मनिष्टा, इंद्रियानुभवाच क्षणिकत्व, ध्यानधारणा, बुद्धतत्वे यांचीच सखोलता जाणवत राहते.
`मृत्यू हा दुःखाचा लेप नसलेला आनंदानुभव आहे` पुस्तकाचा हा शेवट आपली एक नवी सुरुवात ठरते...
...सुरुवात क्षणिकत्वाला शाश्वत मानण्याची;
...सुरुवात अंतर्मनातील भावप्रकाशात सौन्दर्य शोधण्याची;
...सुरुवात बुध्दिकल्पनेच्या पलीकडील वस्तुस्थिती स्वीकारण्याची;
...सुरुवात तर्काच्या तंतूला बुद्धीचा आधार देण्याची;
...सुरुवात पारमार्थिक दृष्टी घेऊन लौकिक समस्यांतून मार्ग शोधण्याची;
...सुरूवात जीवनाकडे मृत्यूच्या नजरेतून पाहण्याची.
Dnyanesh Deshpandeभैरप्पांची पुस्तके भारतीय संस्कृती, तत्त्वज्ञान यावर विचार करायला खाद्य पुरवणारी असतात. आत्ताच "सार्थ" वाचून झाले. किंडल वर पुस्तक वाचण्याची तशी पहिलीच वेळ. त्यातही सार्थ सारखं पुस्तक मिळाल्याने किंडल सत्कारणी लागलं...
एका वेदशास्त्र शिकलेल्या ब्राह्मणाला, नागभट्टला, तारावती नगरीचा राजा सार्थाचा, म्हणजे व्यापारी तांड्यांचा, अभ्यास करण्यासाठी एका तांड्यांसोबत पाठवतो. पण मूळ हेतू नागभट्टच्या बायकोला मिळवणे हा असतो. नागभट्ट जेव्हा घरापासून दूर असतो तेव्हा त्याला हे कळतं आणि पुढे त्याचा शांती मिळवण्याचा प्रवास सुरू होतो. सुरुवातीला तो एका नाटक कंपनीत काम करतो, त्यातील नटी चंद्रिका उत्तम अभिनेत्री, गायिका असते. ती योगिनी असते. दोघांचाही एकमेकांवर जीव जडतो पण चंद्रिका योगिनी असल्याने यम नियमांत बांधलेली असते आणि ती संबंध नाकारते. तिथून पुढे नागभट्ट सुद्धा बाहेर पडतो आणि प्रथम योगी बनण्याचा प्रयत्न करतो. त्यात बायको आणि मित्र राजा यांवरील राग कमी होत नाही. मग पुढे तो वाममार्गी-तांत्रिक होतो, योनीपूजेच्या विधीसाठी चंद्रिकेला तयार करतो. मात्र पूजेनंतर ती त्याला स्वतःच्या घरी ठेऊन घेते आणि त्यातून तो पुन्हा बाहेर पडतो. मग नालंदा विद्यापीठात बौद्ध तत्त्वज्ञान शिकायला जातो, तिथे त्रिपिटक व अन्य बौद्ध पुस्तकांसोबत त्याला बौद्ध तांत्रिक मार्गही दिसतो. पुढे बोधगयेला जातो. पण तरीही आंतरिक शांती मिळत नाही.
नालंदेत जाऊन, तिथे सांगून पुन्हा नवीन शोधण्यासाठी तो तिथे पोहोचतो पण तेव्हा त्याला कळतं की सर्वात वयोवृद्ध विद्यार्थी हे कुमारील भट्ट होते, त्याचे गुरू माहिष्मतीचे मंडनमिश्र यांचे गुरू व गुरुपत्नी भारतीदेवीचे वडीलबंधू. तो त्यांच्या मागे त्यांच्या गावी पोहोचतो. तिथे त्याला प्रथम शंकराचार्यांचे दर्शन होते. शंकराचार्य तिथे वादविवाद करण्यासाठी आलेले असतात. पण कुमारील भट्ट गुरूला फसवले आणि काही दिवस तरी वेद नाकारले म्हणून भाताच्या काड्यात स्वतःला जाळून घेणार असतात. त्यामुळे ते वादविवाद नाकारतात आणि गुर्जर प्रतिहार राजाच्या अश्वमेध यज्ञाचे प्रमुखपदही नाकारतात. दोन्हीसाठी ते मंडन मिश्र यांच्याकडे पाठवतात.
इथून पुढे ऐतिहासिक वादविवाद आणि मंडन मिश्र यांचे संन्यस्त होणे हा भाग येतो.
नागभट्ट यानंतर गुर्जर प्रतिहार राजाच्या स्नेही असलेल्या जयसिंहांच्या सोबत परत मथुरेला येतो. तिथे बातमी येते की मुस्लिम आक्रमकांनी मूलस्थानवर (मुलतान) कब्जा केला असून तिथून पुढे भारतीय व्यापाऱ्यांना माल ते सांगतील तसा व त्या भावात अरबांनी विकावा लागतोय. गुर्जर राजे मूलस्थान पुन्हा मिळवावे यासाठी कृष्ण नाटक तिथे करायचे आणि जनतेला उठाव करण्यास प्रवृत्त करायचे असा बेत आखातात आणि नाटकात नागभट्ट आणि चंद्रिका यांची प्रमुख भूमिका ठरते. आता नाटक केवळ नाटक राहिलेले नसते तर देशाप्रती कर्तव्य झालेले असते. जीवाचा धोका असूनही सगळे उत्तम नाटक करतात. पण तरीही राष्ट्रकूटांनी दक्षिणेकडून केलेला हल्ला आणि स्थानिकांकडून न मिळालेली मदत यामुळे योजना पूर्ण होत नाही. चंद्रिका आणि नागभट्ट मुस्लिम आक्रमकांच्या ताब्यात जातात. चंद्रिकेवर बलात्कार होतात आणि नागभट्टावर अमानुष अत्याचार. शेवटी ते सुटतात आणि चंद्रिकेच्या गुरूंना भेटायला जातात. नागभट्ट चंद्रिकेला पुनःपुन्हा लग्नाची मागणी घालत असतो पण यम नियम आणि आता बलात्कारामुळे असलेला गर्भ यामुळे ती नाकारत राहते. गुरू त्यांच्या मृत्यूपश्चात विवाहाचा आदेश देतात. नागभट्ट आणि चंद्रिका विवाह करतात आणि कथा संपते.
यात नागभट्ट आणि मुस्लिम सरदार यांच्यात काही संवाद आहेत. ते जसेच्या तसे इथे देत आहे. भारतीय संस्कृतीमध्ये असलेली धर्म (Religion या अर्थी) ही संकल्पना यातून खूप छान अधोरेखित होते. काहींना जी समृद्ध अडगळ वाटते तीच व्यवस्था कशी होती हे यातून समजते.
‘‘कोणता उपाय?’’ मी विचारलं.
‘‘क्षमेची याचना करायची. पश्चात्ताप झाल्याची खूण म्हणून आमच्या धर्मात प्रवेश करायचा. संपूर्ण क्षमा कदाचित त्यानंतरही मिळणार नाही, पण मृत्युदंड खचित चुकेल. चार-दोन वर्षं कारागृहात काढायची. त्यानंतर तुझी वागणूक बघून उरलेली शिक्षाही रद्द होर्इल. बऱ्यापैकी जगण्यासाठी एखादं कामही मिळेल. तू आमचाच होऊन जाशील ना!’’ त्याच्या चेहऱ्यावर मंद हास्य होतं.
‘‘धर्म बदलायचा? एवढ्या क्षुल्लक कारणासाठी?’’
‘‘जीव वाचतोय, ही क्षुल्लक गोष्ट आहे?’’
‘‘जीव जातो की राहतो, हा मोठ्या चर्चेचा विषय आहे. आमच्याकडेही धर्मपरिवर्तन होत असतं. दोन जिज्ञासू विद्वान शेकडो विद्धानांसमोर एकमेकांसमोर बसून तात्त्विक वादविवाद करतात. जो हरेल, त्यानं जिंकलेल्याचा धर्म स्वीकारणं बंधनकारक असतं. तुमच्यापैकी एखाद्या जिज्ञासू विद्वानाला सर्वांसमोर माझ्याशी वादविवाद घालण्यासाठी बसवा, दोघंही तर्कशुद्ध पद्धतीनं वाद घालू. मी हरलो, तर तुमच्या धर्मात येर्इल आणि जिंकलो, तर त्यानं माझ्या धर्मात यावं.’’
‘‘धर्मालाच पणाला लावून चर्चा करायची?’’ त्यानं भुवया उंचावल्या.
‘‘आमच्याकडे सगळे असंच करतात. केवळ यासाठी विद्वान मंडळी गावोगाव फिरत असतात. एखाद्याची वाद-भिक्षा नाकारणं अत्यंत अपमानास्पद मानलं जातं.’’
‘‘आम्ही धर्माला वादामध्ये ओढत नाही.’’
‘‘पण तुम्ही धर्माला तलवारीच्या पात्यावर पेलता. खरंय हे?’’
‘‘नि:संशय! ते जाऊ दे. तुमच्यामध्ये किती जाती-पंथ आहेत?’’
‘‘ते कसं सांगता येर्इल? एकेका धर्म-पंथाच्या अनेक शाखा-उपशाखा आहेत. मुख्य वैदिक धर्मच घ्या. त्यात पूर्व मीमांसक, उत्तर मीमांसक, नैयायिक, वैशेषिक, सांख्य, योगी! बौद्धांमध्ये हीनयान, महायान, हीनयानामध्ये वैभाषिक, सौतांत्रिक; महायानींमध्ये योगाचार्य, माध्यमिक; जैनांमध्ये दिगंबर-श्वेतांबर, यांशिवाय प्रत्येक जातींमध्ये तांत्रिक, पाशुपत्य –’’
त्याच्या चेहऱ्यावर गोंधळ उमटला. ‘‘असं असेल, तर तुमचा एक देश नाहीच.’’
‘‘का?’’
‘‘एवढे मत-धर्म आहेत म्हणतोस, कुठला राजा स्वत:च्या धर्मापेक्षा इतर धर्माला वाव देर्इल?’’
‘‘आमच्याकडे सगळे राजे सगळ्या मत-पंथांना वाव देतात. प्रत्येकाच्या वैयक्तिक मताचा तो प्रश्न आहे. मी म्हणजे बुद्धी. बुद्धीचं गृहीत म्हणजे मत. जगात जितकी माणसं आहेत, तितकी गृहीतं आहेत. तेवढी मतं असतात.’’
‘‘शुद्ध अव्यवस्था ही!’’ तो गोंधळून म्हणाला.
‘‘अंहं – तीच व्यवस्था आहे! पाहिजे, तर याविषयी मी वाद घालू शकेन.’’
‘‘मला वाटतं, तू तुझ्या देशातल्या सगळ्या धर्म-पंथांचा अर्क प्यायलेला विद्वान आहेस. बरं, ते जाऊ दे. तुमच्या सगळ्या धर्म-पंथातला समान अंश कोणता?’’
‘‘धर्म!’’
‘‘धर्म म्हणजे काय? देव ना?’’
‘‘देवाला धर्माची गरज नाही. देव ही माणसाची गरज आहे. शिवाय आमच्याकडचे सगळे पंथ देवाला मानत नाहीत. जैन, बौद्ध आणि सांख्य हे तर देवाचा तिरस्कार करतात. पूर्व-मीमांसक देवाचा पुरस्कार करत असले, तरी त्यांनी देवाला मर्यादित अधिकार दिले आहेत. माणसाच्या धर्माचरणासाठी देवाची गरजही नाही, त्याच्यावर विश्वास ठेवायचीही गरज नाही, असं बरेच धर्म-पंथ सांगतात.’’
- ज्ञानेश
लोकप्रभा २ मार्च २०१८ भारतीय कीर्तीचे सिद्धहस्त लेखक डॉक्टर एस.एल.भैरप्पा यांच्या लेखणीतून उतरलेली ‘सार्थ’ ही कादंबरी आपल्यापुढे येते ती विविधरंगी अनुभवचक्राचं लेणं लेऊन .
‘सार्थ’ म्हणजे व्यापाऱ्यांचा तांडा. ज्या काळात सार्थ हा शब्द प्रचलित होता, त्या सातव्या –आठव्या शतकात ही कादंबरी आपल्याला नेते. पहिल्या पानापासूनच कथानकाविषयी उत्सुकता निर्माण करणारे संवाद ,हितवचनांची पेरणी,कथानकचा काहीएक अंदाज बांधायला घ्यायला फारशी उसंत न देणारी अशी कथेची मांडणी जवळपास कादंबरीभर उमटलेली दिसते ती तेराव्या शेवटच्या प्रकरणापर्यंत कायम राहाते. नागाभट्ट अमरूक राजाच्या सांगण्यावरून व्यापारातील सूत्र, त्यातील व्यवहारज्ञान जाणून घेण्यासाठी बाहेर पडतो आणि या नंतरच कथानकाला विलक्षण वेग येतो. पुढं काय होईल ही उत्कंठा वाढत जाते. भूतकाळ, वर्तमान आणि अधूनमधून डोकावून जाणारी भविष्यकाळाची झलक टप्याटप्यानं ही उत्कंठता शमवते. नागाभट्टांच कौटुंबिक जीवन, त्याचं राजाशी असणारं मैत्र आणि त्यामुळं त्याचं सार्थात सामील होणं हे केवळ निमित्तमात्र ठरतं आणि काळाचा ,इतिहासाचा ,तत्वज्ञान,धर्म ,ज्ञान, परमार्थ, अध्यात्माचा एक भलामोठा अवकाश आपल्यापुढं शब्दांतून साकार होतो, जो कादंबरी वाचून संपल्यावरही मनात काही काळ रेंगाळतो .
तत्कालीन सत्य आणि कल्पित घटनांद्वारे मांडल्या गेलेल्या या कादंबरीतल्या लहान-मोठया व्यक्तिरेखा,तत्कालीन जीवनशैलेीची वर्णनं यांची शैली ओघवती आहे.अनुवादक उमा कुलकर्णी यांनी प्रास्ताविक लिहिलं आहे .चंद्रमोहन कुलकर्णी यांनी अतिशय समर्पक असं मुखपृष्ठ तयार केललं आहे.आकाश आणि समुद्राचा निळसर रंग हा दृढविश्वास,आत्मविश्वास ,सत्य, हुशारी, सखोलता ,निष्ठा , स्थैर्य आणि ज्ञान आदी गुणाचे प्रतिक ठरतो.भगव्या रंगातलं कादंबरीचं नाव ,वृक्ष आणि त्याखाली बसलेला संन्यासी ,चंद्रबिंब ही सारी प्रतीकं कादंबरीचं सारच सांगतात. मनुष्स्वभावाचे पैलू उलगडणारी ही कथा आजचा आपल्या आयुष्याचंही प्रतिक ठरेल का? त्यातला वारंवार उमटणारा शून्य्भाव आजही मनोव्यापी आहे का? हाही एक अभ्यासाचा विषय ठरावा .
SHABD RUCHI, AUGUST 2017नव्या जाणिवांची ओळख घडविणारा सार्थाचा विलक्षण प्रवास...
डॉ.एस.एल.भैरप्पा म्हणजे कर्नाटकी साहित्यातलं व्यासंगी नाव. आपल्या समग्र साहित्यात समाजजीवन आणि धार्मिकतेचे निरनिराळे कंगोरे डॉ.भैरप्पा स्पष्ट करतात. त्यांच्या लेखन अनुभूतीतून वाचकांना जीवन-आकलनाचं नवं भान मिळतं. त्यांची सार्थ ही कादंबरीबी असचं नवं भान देणारी आहे.
प्रस्तुत कादंबरीसाठी डॉ. एस. एल. भैरप्पा यांनी आठव्या शतकाची पार्श्वभूमी निवडली आहे. वैयक्तिक कारणासाठी नागभट्ट आपल्या गावाबाहेर पडतो आणि एका ‘सार्था’मध्ये सहभागी होऊन प्रवास करू लागतो. त्या निमित्ताने त्या काळचा भारतवर्ष अनेक धार्मिक आणि सामाजिक प्रश्न घेऊन त्याला सामोरा येतो. अनेक धर्म-पंथांमधले तात्त्विक मतभेदही त्याला सामोरे येतात. काही त्याच्या प्रश्नांमध्ये भर टाकतात, तर काही प्रश्नांची उकलही होते. हिंदू धर्मग्रंथातील अनेक संदर्भ नव्याने या पुस्तकात भेटीस येतात. स्त्री-पुरुष संबंधालाही वेगळंच परिमाण लाभल्याचा तो अनुभव घेतो.
‘सार्थ’ म्हणजे व्यापाऱ्यांचा तांडा. ज्या काळात या अर्थाने ‘सार्थ’ हा शब्द भारतात प्रचलित होता, त्या सातव्या-आठव्या शतकात ही कादंबरी आपल्याला नेते. तारावती या नगरातला नागभट्ट हा मंडनमिश्रांच्या गुरुकुलात वेदाध्ययन केलेला, समवयस्क अमरूक नावाच्या राजाच्या विश्वासातला, नुकतीच पंचविशी ओलांडलेला. राजा अमरूक नागभट्टावर काही कामगिरी सोपवून त्याला एका ‘सार्था’ बरोबर देशांतराला पाठवतो अन् तिथूनच विविधरंगी अनुभवचक्रात नागभट्ट गोवला जातो.
मध्ययुगातील अनेक सत्य अन् कल्पित घटनांद्वारे या कादंबरीचा पट घट्ट होत जातो. कुमारिलभट्ट, मंडनमिश्र, त्यांची पत्नी भारतीदेवी, शंकराचार्य आदी व्यक्तींच्या विंâवा नालंदा विद्यापीठ, पूर्वेचे सूर्यमंदिर इत्यादी स्थलांच्या कथा येथे गुफुन घेतलेल्या आहेत. या निरनिराळ्या ऐतिहासिक कथा या कादंबरीचा प्रवाह सखोल करीत राहतात व कथानकाचा भावकल्लोळही तीव्र करतात. यातूनच कादंबरीचा वाचक मध्ययुगीन जीवनशैलीच्या अद्भुत, विस्तीर्ण अनुभवसागरात थेट खेचला जातो. भारतीय कीर्तीचे सिद्धहस्त कन्नड लेखक डॉ. भैरप्पा यांच्या इतर कादंबऱ्यांप्रमाणे ‘सार्थ’ ही कादंबरीही वाचकांना एका अजस्र, महाकाय अनुभवाला सामोरे जाण्यास भाग पाडते. ती धार्मिकतेवर भाष्य करताना मानवी प्रवृत्तींवरप्रकाश टाकते . नागभट्टचे गुरु सांगतात ,
‘‘भरतखंडामध्ये सगळे देवालयं बांधतील. वैदिक-बौद्ध-जैन सगळ्या जाती-उपजातीतले लोक देवळं बांधत राहतील. पण तिकडून येणारे एक-एक करून त्या देवळांचा नाश करत राहतील. तू पाहिलेलं कुठलंही देवालय राहणार नाही. मंदिरं-चैत्य-स्तूप काहीही राहणार नाही. पण बांधायची प्रवृत्ती नाश पावणार नाही.’’
नागभट्टच्या या प्रवासात डॉ.भैरप्पा आयुष्यातल्या अनेक समस्यांची अध्यात्मिक मांडणी करतात. एका सार्थाचा प्रवास भारतातल्या अनेक धर्मांच्या विचारधारांवरही प्रकाश टाकतो. त्या विचारधारांकडे चिकित्सक पद्धतीने पाहणारी आणि त्यातून आयुष्याचे मोजमाप करणारी माणसं या कादंबरीत भेटतात. त्यांच्या अनेक विधानातून, संवादातून धर्मविषयक नवे पैलू उलगडले जातात . जसे ‘‘देवाला धर्माची गरज नाही. देव ही माणसाची गरज आहे. शिवाय आमच्याकडचे सगळे पंथ देवाला मानत नाहीत. जैन, बौद्ध आणि सांख्य हे तर देवाचा तिरस्कार करतात. पूर्व-मीमांसक देवाचा पुरस्कार करत असले, तरी त्यांनी देवाला मर्यादित अधिकार दिले आहेत. माणसाच्या धर्माचरणासाठी देवाची गरजही नाही, त्याच्यावर विश्वास ठेवायचीही गरज नाही, असं बरेच धर्म-पंथ सांगतात.’’ अशी वाक्यं सर्व धार्मिक संकल्पनांच नेमकं विश्लेषण मांडतात .
डॉ.भैरप्पा यांचं जगण्याचं तत्त्वज्ञान उमा कुलकर्णी सहजसोप्या शब्दात मराठी वाचकांपर्यंत पोचवतात. सर्जनशीलतेची कास न सोडता आठव्या शतकातले ऐतिहासिक संदर्भ घेत भैरप्पांनी ही कादंबरी लिहिली आहे. त्यामुळे येथे तत्कालीन घटना आणि पात्र यांबरोबरच भैरप्पांनी निर्माण केलेली पात्रंही भेटत राहतात. ही पात्रे अनुवादातही तितकीच सक्षमपणे उतरतात. यात अनुवादकाच्या भाषाशैलीचा महत्त्वाचा वाटा आहे. मेहता पब्लिशिंग हाऊसने या कादंबरीच्या निमित्ताने डॉ.भैरप्पा यांच्या महत्त्वपूर्ण कादंबरीला मराठी वाचकांसमोर आणले आहे. डॉ.भैरप्पा यांच्या साहित्य प्रवासातील महत्त्वाचा दुवा म्हणजे ही कादंबरी आहे.
DAINIK SAKAL - SAPTRANG - 26-3-2017ज्येष्ठ कन्नड साहित्यिक एस.एल. भैरप्पा यांच्या ‘सार्थ’ याच नावाच्या कादंबरीचा हा अनुवाद. उमा कुलकर्णी यांनी तो केला आहे. या कादंबरीसाठी आठव्या शतकाची पार्श्वभूमी भैरप्पा यांनी निवडली आहे. तारावती या नगरातला नागभट्ट वैयक्तिक कारणांसाठी आपल्या गावाबाहेर पडतो आणि एका ‘सार्था’मध्ये म्हणजे व्यापारी तांड्यामध्ये सहभागी होऊन प्रवास करु लागतो. त्यानिमित्तानं त्याला पडलेले प्रश्न, झालेलं आकलन अशा अनेक गोष्टी कवेत घेत कथा पुढे सरकते. मध्ययुगातल्या अनेक सत्य आणि कल्पित घटनांद्वारे या कादंबरीचा पट घट्ट होत जातो.