श्री . अनिल कावणेकर २४/११/२०२०मा. श्री. डॉ. अनिल गांधी
सप्रेम नमस्कार ...
आपण लिहिलेलं अफलातून मेंदू
हे पुस्तक वाचले अतिशय अप्रतिम
हे पुस्तक आहे. मेंदू या विषयावरील प्रथमच
इतकी सखोल माहिती माझ्या वाचनात
आली आहे. अतिशय अभ्यासपूर्ण असे हे
पुस्तक आहे पुढील लेखनास शुभेच्छा नमस्कार...
Dainik DivyaMarathi 7-7-15माणसाचं हृदय काेमल की कठाेर अशी चर्चा असते; पण, दाेन्हींचा संबंध मेंदूशीच असताे, हृदयाशी नाही. मेंदू जिवंत ताेपर्यंत मनाचेही अस्तित्व असते. काेणाच्याही मनाचा थांग लागत नाही, असा अाजपर्यंतचा समजही शासकीय संशाेधनाने फाेल ठरवला अाहे. अाता मनुष्याच्या मेंदूत डाेकावणे शक्य झाले अाहे. इतकेच नव्हे, तर दुसऱ्याच्या मेंदूतील विचार समजून घेऊन त्यात बदल करण्याचीही किमया साधली अाहे. अशा प्रकारे खऱ्या अर्थाने ब्रेन वाॅशिंग शक्य झाले अाहे. या पुस्तकात मेंदूची रचना, कार्य याखेरीज मनाचे विकार, मेंदूचे अाजार याविषयी ऊहापाेह केला अाहे. तसेच ते टाळण्यासाठी किंवा लांबवण्यासाठी व्यायाम, अाहार याविषयी माहिती दिली अाहे. मेंदू अाणि मज्जारज्जूंचे अॅनन केफॅली, हायड्राेकेफॅलस, एन केफॅलाेसील, मनिंगाेसील असे विकृती निर्माण करणारे किंवा अर्भकाचा अंत करणारे भयाण अाजार अगदी साध्या उपायाने बहुतांशी टाळता येतात. मातृत्व स्वीकारण्याचा निर्णय हाेताच त्या स्त्रीस फॉलिक अॅसिडची एक गाेळी राेज घेणे हा ताे साधा उपाय अाहे. हे सांगणे हा या पुस्तकाचा प्रमुख हेतू अाहे.
विश्वाचा शाेध घेणे जितके कठीण, तितकेच कठीण या मेंदूत शिरणे. पण, वैज्ञानिक मुख्यत: मेंदूवर संशाेधन करणाऱ्या शास्त्रज्ञांनी वरवर लहान दिसणाऱ्या या मेंदूचा अनेक पद्धतींनी वेध घेतला. अचपळ मन माझे-नावरे अावरिता या अाेळीचा प्रत्यय जसा माणसाला येताे, तसाच या शाेधवैमानिकांना येऊ लागला. त्या अगाध मेंदूचा हा डाॅ. अनिल गांधींनी घेतलेला वेध अाणि शाेध. अर्थातच जगभर हे हजाराे शास्त्रज्ञ या शाेधात सामील झाले अाहेत. त्यांच्या शाेधांचे हे विलक्षण वाचनीय असे विवेचन! निसर्गाच्या या अथांग मन:शक्तीचा, मेंदूचा हा अभ्यास वाचकाला विनम्र अाणि विचक्षकही करताे.
DAINIK SAKAL (SAPTARANG) 23-04-2017अफलातून मेंदूची रंजक माहिती...
आपल्या शरीरातील सर्वांत कार्यक्षम अवयव कोणता, तसंच सर्वांत गूढ अवयव कोणता, या दोन्ही प्रश्नांचं उत्तर मेंदू असंच द्यावं लागेल. माणसाच्या साऱ्या भाव-भावना मेंदूतच निर्माण होतात. बुद्धी आणि प्रज्ञाच नव्हे तर जाणीव आणि नेणीव जिथं निर्माण होते तो म्हणजे मेंदू. सखोल विचार करायला सुरुवात केली, तर मेंदूची कार्य पाहिली, की चक्रावून जायला होतं. अजूनही मेंदूबद्दल संपूर्ण माहिती आपल्याला नाही. जी आहे तीही मेंदूलाच मुंग्या आणणारी; पण त्याबाबत उत्सुकता-आकर्षण वाढवणारी आहे. आपल्याला अगदी लहानपणीच्या अनेक गोष्टी आठवतात; पण काल-परवा घडलेल्या घटना अनेकदा आठवत नाहीत. काही वेळा तर अगदी १०-१५ मिनिटांपूर्वी घडलेली घटनाही लक्षात राहत नाही. स्मरण आणि विस्मरणाचं केंद्रही आहे आपला मेंदूच! विश्वनिर्मितीच्या शोधाचं आव्हान जेवढं अवघड, तेवढंच अवघड मेंदूच्या मुळाशी जाणं आहे.
मेंदूच्या विविध कार्याची ओळख ‘अफलातून मेंदू’ या पुस्तकातून डॉ. अनिल गांधी यांनी करून दिली आहे. मेंदू व मनाची रचना, कार्य, विकार यांची सविस्तर चर्चा डॉ. गांधी यांनी आपल्या पुस्तकातून केली आहे. मेंदू हे बुद्धिमत्तेचं केंद्र आहे; पण बुद्धिमत्ता म्हणजे काय, याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न गेल्या अनेक शतकांपासून सुरू आहे. आधुनिक जगातला सर्वांत बुद्धिमान माणूस म्हणून प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाइन यांचं नाव घेतलं जातं, त्यांच्या प्रचंड बुद्धिमत्तेचा अभ्यास करण्यासाठी त्यांच्या मेंदूचे तुकडे करून जतनही करण्यात आले आहेत. त्यांचा अभ्यास अजूनही शास्त्रज्ञ करत आहेत. ‘सुसंगतपणे विचार करण्याची, योजना आखण्याची, समस्या सोडवण्याची, अमूर्त पातळीवर विचार करण्याची, जटिल समस्या समजून घेण्याची, नवीन गोष्टी पटकन आत्मसात करण्याची, अनुभवातून शिकण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता’ अशी व्याख्या या क्षेत्रात काम करणाऱ्या सुमारे ५२ शास्त्रज्ञांनी १९९७मध्ये केली. काहींनी यात स्मरणशक्तीचा अंतर्भाव केला. बुद्धिमत्तेचं प्रमुख नऊ प्रकारही करण्यात आले. या सगळ्याचा हेतू मेंदू समजून घेणं असाच होता. एवढ्या सगळ्या प्रयत्नांनंतरही मेंदूचं आपल्याला संपूर्ण आकलन झाल्याचं म्हणता येत नाही. मेंदूचा विकास वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत होतो. तोपर्यंत झालेल्या ‘संस्कारा’च्या शिदोरीवर मेंदू आयुष्यभर काम करतो, असा दावाही संशोधकांनी आता केला आहे.
संगणकासह सर्व शास्त्रीय शोधांचा जनक हा मानवी मेंदूच आहे. मानवी मेंदूतली ‘न्यूरल नेटवर्क’सारखी रचना अत्याधुनिक संगणकात केल्यानं त्याचा वेग आणि कार्यक्षमता प्रचंड वाढली आहे. भाव-भावना, अनुभवाधारित निर्णयक्षमता संगणकाला साध्य होऊ शकत नाहीत. कृत्रिम बुद्धिमत्ता संगणकात निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू असले, तरी माणसाची सर त्याला येणार नाही. मानवी मेंदूचं कार्य समजून घेण्यासाठी ‘रिव्हर्स इंजिनिअिंरग’च्या पद्धतीनुसार मेंदूचा अभ्यास सुरू आहे; पण हा अभ्यासही अत्यंत प्राथमिक स्तरावर आहे, खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. आपलं शरीर हे एका वाद्यवृंदासारखं आहे, असं गृहीत धरलं, तर त्याचा संचालक मेंदू आहे. संचालकाकडून चुकीच्या सूचना गेल्या किंवा संचालकाचा तोल गेला, की संपूर्ण शरीराचा तोल ढासळणारच. शारीरिक क्रियांखेरीज सर्व क्षमता, बुद्धीचे सर्व आविष्कार, विचार, भावभावना, स्मरणशक्ती, भाषा या सर्वांचा कर्ताकरविता मेंदूच आहे.
डॉ. गांधी यांनी पुस्तकाची सुरुवात ‘मेंदूवर घाला’ या विषयापासून केली आहे. आधुनिक साधनांद्वारे मेंदू ‘हॅक’ करता येऊ शकतो का, हा याचा मध्यवर्ती विषय. त्यानंतर मेंदूची रचना, एकपेशीय जिवाणूंपासून वनस्पती, प्राणी व मनुष्य यांच्या मज्जासंस्थेची उत्क्रांती, अर्भकाच्या मेंदूची वाढ अशा सर्व विषयांचा ऊहापोह पुस्तकात केला आहे. माणसाच्या अथांग मनाचा थांग घेण्याचा प्रयत्नही त्यांनी केला आहे. त्यात लेखकानं शिक्षण, स्मरणशक्ती, नैपुण्यं आणि क्षमता या पैलूंवर प्रकाश टाकला आहे. ‘वेदना सखी तू, नसे वैरिणी’, अशा विचारांतून वेदना असली, तरी ती एक संवेदना आहे, हे उत्तमरितीनं समजावून सांगितलं आहे. मेंदूच्या आजार आणि विकारांवरही सविस्तर चर्चा केली आहे. गंभीर आजारांची माहिती देत असतानाही ती कुठंही फक्त शास्त्रीय न ठेवता सर्वसामान्यांना समजू शकेल, अशा भाषेत लिहिली आहे. धर्माची निर्मिती, उत्क्रांती, मोक्ष यांच्या चर्चेबरोबरच प्रत्यक्ष मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्यांचे अनुभव; बौद्ध भिक्खूंच्या मेंदूचा आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे केलेला अभ्यासाची माहिती देतानाच धर्म आणि शास्त्र यांची सांगड कशी घालता येते, यावर डॉ. गांधी यांनी भाष्य केले आहे.
शास्त्रीय अचूक माहिती देताना ती कंटाळवाणी होणार नाही, याची दक्षता लेखकाने घेतली आहे. प्रत्येकाला आपल्या मेंदूची किमान माहिती असली पाहिजे. ती मिळविण्यासाठी हे पुस्तक वाचलंच पाहिजे. वैद्यकिय सामान्यज्ञान आणि माहितीचा संगम पुस्तकात आहे. सकारात्मक जीवनशैलीसाठी अंतर्दृष्टी या पुस्तकाद्वारे जागृत व्हावी, ही अपेक्षा!
-सुरेंद्र पाटसकर
DAINIK SAKAL (SAPTARANG) 09-04-2017मेंदू हा शरीरातला सर्वांत महत्त्वाचा भाग. या मेंदूचं अंतरंग ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. अनिल गांधी यांनी उलगडून दाखवलं आहे. अगदी गुंतागुंतीची माहितीही त्यांनी सोप्या पद्धतीनं समजावून सांगितली आहे. मेंदूची रचना, त्याचं कार्य, मज्जासंस्थेची उत्क्रांती, त्याचा एकूण शरीराशी, मनाशी संबंध, विस्मरण, स्मरणशक्ती, नैपुण्यं आणि क्षमता, झोप, बुद्धी अशा अनेक गोष्टींमागची गुंतागुंत डॉ. गांधी यांनी उलगडून दाखवली आहे. मनोविकार, मेंदूचे आजार, त्यांची लक्षणं, मज्जासंस्थेचे आजार यांच्याविषयीही त्यांनी विस्तारानं लिहिलं आहे. मेंदूशी संबंधित आजार अगदी साध्यासुध्या उपयांनी कसे टाळता येऊ शकतात, हेही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
Deepak Shikarpur डॉ. अनिल गांधी हे एक प्रथितयश सर्जन आहेत. `अफलातून मेंदू` या नावाने त्यांनी मेंदूविषयी छान पुस्तक लिहिले आहे.
बहुतांश लोकांना मेंदूच्या नेमक्या कार्याची फारच थोडी माहिती असते. खरे सांगायचे, तर तज्ज्ञ लोकांतही मेंदूविषयी मतमतांतरे आहेतच. मेंदूविषयी समज व मते अनेक आहेत. त्यांपैकी काही लक्षवेधी आहेत. काही धर्मवेत्ते, संभाषणचतुर वक्ते यांनी जे विचार व्यक्त व वितरित केले, त्यांना दिव्यज्ञान म्हटले जाते; पण अशा गोष्टींकडे त्रयस्थपणे व शास्त्राच्या कसोट्यांवर तपासून पाहणे योग्य होईल.
डॉ. अनिल गांधी यांनी या गुंतागुंतीच्या विषयावर जो शास्त्रीय दृष्टिकोन ठेवलेला आहे, त्याला मी दाद देतो. मेंदूची रचना, स्मरणशक्तीचे पैलू, मनाचे व मेंदूचे विकार, त्याबद्दलची जागरुकता या विषयांवर मंथन केलेले आहे. धर्म आणि शास्त्र यांच्या संगमाबद्दलचे प्रकरण लक्षवेधी आहे.
या पुस्तकात मांडलेले विचार सर्व स्तरांवर व सर्वदूर पसरावेत म्हणून त्याचे विविध भाषांमध्ये रूपांतर करावे, असे मी डॉ. अनिल गांधी यांना सुचवू इच्छितो. या पुस्तकासाठी माझ्या शुभेच्छा !
Dr.Ulhas Luktukeएका प्रसिद्ध तत्त्ववेत्त्याने आपली काठी जमिनीवर जोराने आपटली आणि तो आपल्या शिष्यास उद्देशून गरजला.
`बायजीद तू इथंच आहेस ना!`
शिष्य नम्रपणे म्हणाला, ‘होय गुरुजी, मी इथंच आहे.’ साधीच गोष्ट; पण त्याचे अनेक गुंतागुंतीचे पैलू होते.
हा बायजीद नेमका कोण... त्याला कसे माहीत की गुरूला नेमके काय म्हणायचे आहे... जाणीव, नेणीव म्हणजे काय... ही जाणीव, नेणीव, मन नेमकी कुठे असतात... मेंदूत? मनाचे आqस्तत्व खरेच आहे का... मेंदू आणि मन यांचे कार्य भिन्न आहे का परस्परावलंबी आहे... आपण विचार करतो तो कसा... स्मरण-विस्मरण गूढ काय आहे... आपण झोपतो किंवा जागे असतो त्याचे रहस्य काय... आपण जांभई देतो, शिंकतोकिंवा घोरतो ते का... एखादी व्यक्ती वेडपट किंवा मूर्ख; तर दुसरी शहाणी किंवा बुद्धिमान याची कारणमीमांसा कशी करायची... या व अशा अनेक शब्दांचा नेमका अर्थ काय? पॅरालिसिस, विस्मरण, अल्झायमर्स यांसारख्या मेंदूच्या व मनाच्या आजाराचे स्वरूप, प्रतिबंध व उपाय यांचा मागोवा घेण्याचे प्रत्येकाला कुतूहल व आवश्यकता आहे.
मेंदूचा काही भाग काम करेनासा झाला तरी मनुष्य जगू शकतो का... मेंदू पूर्णपणे निकामी झाला तर जगणे शक्य आहे का... अशा अनेक प्रश्नांची उत्तरे माणसाच्या मेंदूलाच हवी असतात. आणि ती उत्तरे शोधायची असतील तर
डॉ. अनिल गांधी यांचे `अफलातून मेंदू` हे पुस्तक वाचणे इष्ट होईल.
डॉ. अनिल गांधी यांची यापूर्वीही पाच पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांना वाचकांचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे. या पुस्तकासही तसाच प्रतिसाद लाभेल याबद्दल मला शंका नाही. हे पुस्तक वाचकांच्या मनाची चांगलीच पकड घेते. मेंदूविषयी उत्सुकता असणा-या कुठल्याही वाचकाला ते नक्कीच आवडेल.
Avinash Dharmadhikari
वयाच्या १६ व्या वर्षापासूनच मी मानवी मेंदूच्या प्रेमात पडलो. आजही ते टिकून आहे ते का व कसे? डॉ. अनिल गांधी यांच्या `अफलातून मेंदू` या पुस्तकाने हे मेंदूविषयीचे आकर्षण अधिकच वाढले. एकप्रकारे त्या मेंदूविषयी विलक्षण आकर्षण, तर दुसरीकडे त्यातील बदलामुळे होणारे चढ-उतार यांची चिंताही डोकावते. रसिक वाचकांना हे पुस्तक मार्गदर्शक वाटावे.
Dr.H.V.Sardesai संभाषण, विचार, भावना आणि कृती यांच्या आधारे आपण मेंदूच्या कार्याचे मूल्यमापन करण्याचा प्रयत्न करतो. या सर्व गोष्टी मेंदूच्या एकत्रित कार्याचे फलित आहे. हालचाल, श्वसन, पचन, रक्ताभिसरण, प्रजनन, दृष्टी, श्रवण आणि माझे ‘मीपण’ सर्वच मेंदूची कार्ये आहेत. मेंदूच्या भिन्न वेंâद्रांमध्ये जरी या विविध कार्यांची विभागणी झाली असली तरी मेंदू आणि मन एकसंध पद्धतीने सर्व कार्य करतो. यांतील प्रत्येक वेंâद्र जरी विशिष्ट जबाबदारी पार पाडत असले तरी सर्वांमध्ये कमालीचा समन्वयही असतो. मन आणि मेंदू यांचे परस्परांच्या कार्यावर व संपूर्ण शरीरावर कमालीचे परस्परावलंबित्व आढळते. खरे सांगायचे तर मेंदू आणि मन एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, अविभाज्य अंगे आहेत. शरीराचे कार्य समजून घ्यायचे तर मनाचाही कानोसा घ्यावा लागतो. मनाचा थांग लावायचा तर मेंदूच्या कार्याचे ज्ञान आवश्यक आहे.
`अफलातून मेंदू` या पुस्तकात डॉ. अनिल गांधी यांनी मेंदू आणि मन यांच्या कार्याचा चांगला उलगडा करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात मेंदूची व मनाची रचना, कार्य, विकार यांच्याविषयी सांगोपांग चर्चा केली आहे. पुस्तकाची भाषा सामान्य वाचकांना समजावी अशी ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्नही केला आहे.
Achyut Godbole डॉ. अनिल गांधी यांनी आणखी एक झकास पुस्तक लिहिले आहे. या वेळी त्यांनी मेंदू हा विषय निवडला आहे. ‘अफलातून मेंदू’ हे शीर्षकच प्रथम वाचकांचे लक्ष वेधून घेते. मेंदूची रचना, कार्य, मेंदूच्या संशोधनासाठी उपयुक्त तंत्रज्ञान, इ.इ.जी., सी.टी., एम.आर.आय., ब्रेनस्पायवेअर कृत्रिम बुद्धिमत्ता यांबद्दल सोप्या भाषेत विवेचन केले आहे. उत्क्रांतीच्या तत्त्वाच्या आधारे प्राण्यांपासून मानवाच्या मेंदूचा विकास कसा झाला, यावर प्रकाश टाकला आहे. मेंदूच्या विकासासाठी व प्रगल्भ कार्यात आहार आणि व्यायामाचे महत्त्व पटवून दिले आहे.
या पुस्तकात मेंदूबरोबरच मनावर भाष्य करताना त्यांचे अद्बैत दाखवले आहे. मनाच्या अफाट वेगाबरोबरच त्याच्या विविध पैलूंवर चर्चा केली आहे. मनाची अमर्याद भरारी, भावभावना, मनाचे रंग, भास, आभास व मनाचे खेळ या सर्वांचा यथायोग्य समाचार घेतला आहे. तसेच पुढील भागात मेंदूच्या व मनाच्या आजारांबद्दल सामान्य वाचकाला समजेल अशा भाषेत माहिती दिली आहे.
माणसाच्या मेंदूची उत्क्रांती झाल्यानंतर तो मोठ्या समूहाने एकत्र राहू लागला तेव्हा सामाजिक जडणघडणीसाठी आदश, पूजनीय अशा देवांची, तर नीतिमत्तेच्या भावनेपोटी आचारसंहिता म्हणजेच धर्म या संकल्पनांना मेंदूनेच जन्म दिला. सूर्याला सूर्य तर देवांना विविध नावे माणसानेच दिली. मृत्यूच्या भयापोटी आत्मा, मुक्ती, विदेह मुक्ती आणि पुनर्जन्म या संकल्पनाही माणसाच्या सुपीक मेंदूतून जन्मल्या. या विषयांवर डॉ. गांधींनी आपली मते मांडली आहेत. मेंदूविषयी अशी सर्वंकष माहिती एकत्र मिळण्यासाठी आबालवृद्धांनी वाचावे असे हे पुस्तक आहे.
Kumar Ketkar आपल्याला काही गोष्टी आठवतात– अगदी लहानपणच्यासुद्धा. पण अनेक अगदी काल-परवाच्या घटनाही स्मरणातून लुप्त होतात. अगदी ५-१० मिनिटांपूर्वी चश्मा, किल्ल्या किंवा पैसे कुठे ठेवले हेसुद्धा लक्षात राहत नाही. डिमोन्शिया झालेल्या माणसाला तर ध्यान आणि भान, दोन्ही राहत नाही आणि अल्झायमर झालेला माणूस या जगात असून नसल्यासारखा असतो.
स्मरण आणि विस्मरणाच्या या हिंदोळ्यावर आपण का असतो? काही जण अतिशय उत्तम आणि प्रगल्भ अशा कविता करतात. काही जण उत्तम चित्र काढतात. काही जण वैज्ञानिक संशोधन करून आपल्या ज्ञानशाखा रुंदावतात, काही अचाट साहस करतात, तर काही जण तरबेज क्रीडापटू होतात. काही माणसांकडे प्रकट किंवा अप्रकट अशी सर्जनशीलता असतेच. परंतु ही सर्जनशीलता कुठून येते?
काही माणसांना कशाबद्दलच आत्मविश्वास वाटत नाही. काहींना अनामिक भयाने ग्रासलेले असते. काही जण वेडे होतात (म्हणजे आपण त्यांना वेडे म्हणतो!) बहुतेक जण थोडा फार भ्रमिष्टपणा करतात; परंतु प्रत्येक माणसाची मानसिक प्रकृती अशी वेगवेगळी का? आपण ज्याला मन म्हणतो ते नक्की कुठे असते? आपल्या काळजात प्रेम असते. मग राग-लोभ कुठे असतो? प्रेम आणि मत्सर, स्नेह आणि विद्वेष, स्वार्थ आणि परमार्थ– ही सर्व त्याच मनाची विविध प्रतििंबबे! म्हणूनच या मनाचा शोध वैज्ञानिकांनी सुरू केला. त्या शोधयात्रेत त्यांना मनाचे बहुतेक सर्व खेळ आणि तरंग, अंतर्विरोध आणि समतोल वृत्ती, सामंजस्य आणि सूडभावना– असे अनेक पैलू माणसाच्या मेंदूत दिसू लागले.
विश्वाचा शोध घेणे जितके कठीण, तितकेच कठीण व दुर्गम या मेंदूत शिरणे. पण वैज्ञानिक व मुख्यतः मेंदूवर संशोधन करणा-या शास्त्रज्ञांनी वरवर लहान दिसणा-या या मेंदूचा (म्हणजे लहान व मोठ्या मेंदूचा) अनेक पद्धतांrनी वेध घेतला. `अचपळ मन माझे - नावरे आवरिता` या ओळीचा प्रत्यय जसा प्रत्येक माणसाला येतो, तसाच या शोधवैज्ञानिकांना येऊ लागला.
त्या अथांग आणि अगाध मेंदूचा हा डॉ. अनिल गांधींनी घेतलेला वेध आणि शोध. अर्थातच जगभर हे हजारो शास्त्रज्ञ या साहसी शोधात सामील झाले आहेत. त्यांच्या शोधांचे हे विलक्षण वाचनीय असे विवेचन! निसर्गाच्या या अथांग मनःशक्तीचा, मेंदूचा हा अभ्यास वाचकाला विनम्र करील आणि विचक्षकही!