Chowkidar Devdutt Kamatअमेरिका हा जगामधला अगदी निर्विवादपणे सगळ्यांत ताकदवान देश असल्यामुळे अमेरिकी राष्ट्रपती या पृथ्वीतलावरचा सगळ्यांत ताकदवान माणूस असणं स्वाभाविकच आहे. दर चार वर्षांनी अमेरिकेमध्ये राष्ट्रपतिपदासाठीची निवडणूक होते. २०१६ मध्ये अमेरिकेचा पंचेचाळिसावा राष्ट्रपती निवडला जाण्यासाठीची निवडणूक होणार आहे. या पाश्र्वभूमीवर आजवरच्या अमेरिकी राष्ट्रपतींच्या कामगिरीचा आणि त्यांच्या आयुष्यांचा आढावा घेणं खूपच महत्त्वाचं आणि रंजकसुद्धा आहे. लेखकाच्या अवलोकनानुसार अमेरिकेची दहशतवादाच्या संदर्भातली भूमिका सातत्यानं दुटप्पी आहे. इस्राईल, पाकिस्तान, निकारागुआ, अल साल्वादोर अशा अलीकडच्या मित्रांच्या दहशतवादाविषयी अमेरिकेला फारसं दुःख होत नाही; उलट त्यांच्या कृतींचं ती सरळ समर्थनच करते. याउलट अफगाणिस्तान, पॅलेस्टाईन, सीरिया, लीबिया, इराण अशा ठिकाणच्या दहशतवादाला मात्र अमेरिका आपला शत्रू मानते. साहजिकच अमेरिकेच्या या भूमिकेचा जगभरातल्या अनेक देशांमध्ये तीव्र निषेध केला जातो आणि यातून अमेरिका आपल्या शत्रूंची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढवते. म्हणूनच खरा दहशतवादी देश कोण आहे, असा विचार आपण करायला लागलो, की सगळ्या जगाच्या लोकशाहीचा, सुरक्षिततेचा आणि शांततेचा मक्ता आपणच घेतला असल्याच्या थाटात वागणाNया आणि प्रत्यक्षात बरोबर याच्या उलट पावलं टाकणाऱ्या अमेरिकेचा खरा चेहरा समोर येतो. अमेरिकेच्या धोरणांचे पडसाद जगावर खूप मोठ्या प्रमाणावर उमटत असल्यामुळे अमेरिकी राष्ट्रपतींचा इतिहास जाणून घेणं, भविष्यात काय घडू शकतं हे समजून घेण्यासाठी खूपच उपयुक्त ठरेल, यात शंकाच नाही! हाच या पुस्तकाचा गाभा आहे.
DAINIK SAKAL SAPTRANG 11-12-2016जगातली सर्वांत प्रभावशाली व्यक्ती म्हणून वर्णन केल्या जाणाऱ्या अमेरिकी अध्यक्षांविषयी माहिती देणारं पुस्तक अतुल कहाते यांनी लिहिलं आहे. अमेरिकेचे पहिले अध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांच्यापासून ते मावळते अध्यक्ष बराक ओबामा यांच्यापर्यंतच्या सगळ्या अध्यक्षांची ओळख त्यांनी करून दिली आहे. अमेरिकेतल्या जनतेची मानसिकता, तिथलं वातावरण, जगभरातल्या त्या-त्या वेळच्या स्थिती, वेगवेगळी युद्धं अशा अनेक गोष्टी या पुस्तकातून समजतात. प्रत्येक अध्यक्षाचा अल्प परिचय, त्याचं बालपण, जडणघडण, त्याची निवड होण्याची कारणं, त्याचा प्रचार, त्यानं अध्यक्ष म्हणून घेतलेले निर्णय, त्या निर्णयांमुळे झालेले परिणाम, गैरव्यवहार, ऐतिहासिक पायंडे अशा किती तरी गोष्टी कहाते यांनी या पुस्तकात समाविष्ट केल्या आहेत. अमेरिकेच्या मनोवृत्तीवर त्यांनी वेगळी टिप्पणीही केली आहे. सोप्या शब्दांत ओळख करून दिली असल्यामुळे पुस्तक रंजक झालं आहे.
PRIYA DANDGEअमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष हा जगातील सर्वांत प्रभावशाली व्यक्ती समजला जातो, त्याचबरोबर हा मुकुट काटेरी आहे, याची जाणीव लोकांना असतेच असे नाही. भारतीय लोकशाही पद्धती आणि अमेरिकेतील लोकशाही यात फरक आहे. अमेरिकेतील लोक स्वातंत्र्याचे जितके भोक्ते आहेत तेवढेच शिस्तशीरही आहेत. आपल्या अध्यक्षाकडून अमेरिकेतील जनतेच्या अपेक्षाही पुष्कळ असतात. जनतेच्या अपेक्षांना उतरणे ही अमेरिकी राष्ट्रपतीसाठी परीक्षा असते. अलीकडेच झालेल्या अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीत पूर्ण जगाने ही निवडणूकप्रक्रिया पाहिली. या पार्श्वभूमीवर मेहता पब्लिशिंग हाऊसने अतुल कहाते यांचे ‘अमेरिकी राष्ट्रपती’ हे पुस्तक प्रसिद्ध केले आहे. अमेरिकेच्या पहिल्या अध्यक्षापासून ते मावळते अध्यक्ष बराक ओबामा यांच्यापर्यंत एकूण चव्वेचाळीस अध्यक्षांच्या कारकिर्दीचा आढावा या पुस्तकात घेण्यात आला आहे, अभ्यासपूर्ण तरीही रंजक शैलीमध्ये हे पुस्तक अमेरिकी राष्ट्रपतींच्या जीवनाचा प्रवास मांडते.
या पुस्तकाची प्रस्तावना विशेष अभ्यासण्यासारखी आहे. अमेरिकेची निवडणूक पद्धती थोडी किचकट आहे. केंद्रासोबत विविध राज्यांचे वेगळे कायदे, अधिकार आहेत. अमेरिकेचा नागरिक कशा पद्धतीने मतदान करतो, त्याचे राजकीय अधिकार कोणते याचं विस्तृत विवेचन प्रस्तावनेमध्ये आलेलं आहे. रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक हे दोन पक्ष, आपला अध्यक्षीय उमदेवार कसा निवडतात याची माहिती आहे. भारतीयांना हे समजणे थोडे अवघड आहे. अतुल कहाते यांनी भारतीय संसदीय लोकशाही व निवडणूक प्रक्रिया याची उदाहरणे देत अमेरिकेतील लोकशाही व निवडणूक प्रक्रिया समजावून सांगितली आहे. त्यातील बारकावे, खाचाखोचा सांगितल्या आहेत. मुळात अमेरिका हा देश कसा निर्माण झाला, या देशाचा राजकीय इतिहास वाचकांना माहीत करून देण्यासाठी अशा विस्तृत प्रस्तावनेची आवश्यकता ओळखून लेखकाने अमेरिकी लोकशाहीचा इतिहास सोपा करून लिहिला आहे, त्यामुळे अमेरिकी राष्ट्रपतींविषयी वाचताना, मनात एक पार्श्वभूमी तयार झालेली असते.
अमेरिकी राष्ट्रपतींचा अल्प परिचय, प्राथमिक ओळख, जडणघडण, आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडी, राजकीय कारकीर्द, राष्ट्रपती म्हणून निवड आणि कारकीर्द अशा मथळ्यांखाली प्रत्येक राष्ट्रपतींविषयी माहिती येते. अमेरिकेचे पाहिले राष्ट्रपती जॉर्ज वॉशिंग्टन (१७८९-९७) यांनी स्वतंत्र अमेरिकेचं राष्ट्रपतीपद भूषविलं. जागतिक पातळीवरचा सगळ्यात महत्त्वाचा आणि ताकदवान माणूस अशी अमेरिकी राष्ट्रपतीची प्रतिमा तयार होण्यामध्ये वॉशिंग्टन यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांची कारकीर्द अतिशय महत्त्वपूर्ण आहे; कारण अमेरिकेची एक शक्तिशाली राष्ट्र म्हणून झालेली उभारणी, त्याचा पाया वॉशिंग्टनने घातलेला आहे. त्यानंतर पदावर आलेले जॉन अॅडम्स यांनीही राष्ट्रपती म्हणून भरीव कामगिरी केली; परंतु त्यांचं कर्तृत्व जॉर्ज वॉशिंग्टनच्या प्रभावामुळे थोडंसं कमी नावाजलं गेलं. थॉमस जेफरसन, जेम्स मॅडिसन, जेम्स मन्रो, जॉन क्विन्सी अॅडम्स, अॅन्ड्र्यू जॅक्सन, मार्टिन व्हॅन ब्युरेन, विल्यम हेन्री हॅरीसन, जॉन टायलर या पहिल्या दहा राष्ट्रपतींविषयीची माहिती विस्तृतपणे येते. अमेरिका बलाढ्य महासत्ता होण्याची बीजे या सुरुवातीच्या राष्ट्रपतींनी पेरली. राज्यघटना, स्वातंत्र्याचा जाहीरनामा, कायदे करणं, अमेरिकेची वाटचाल मजबूत राष्ट्र म्हणून होईल याचा विचार करून धोरणं तयार करणं, अशी महत्त्वाची कामगिरी पहिल्या दहा राष्ट्रपतींनी केली. जेम्स पोक या अकराव्या अमेरिकी राष्ट्रपतीनें आपल्या कार्यकाळात खूप काही करून दाखवलं. व्हाइट हाऊसमध्ये त्याने दारूबंदी, पत्तेबंदी, नृत्यबंदी केली. अमेरिकेच्या सीमा वाढवल्या. चतुरस्त्र राजकारणी म्हणून तो प्रसिद्ध झाला; परंतु दुसरी टर्म त्याला नको होती. राष्ट्रपती म्हणून निवृत्त झाल्यावर अवघ्या तीन महिन्यांतच कॉलऱ्यामुळे तो मरण पावला. बारावा राष्ट्रपती सॅक टेलर पराक्रमी लष्करी अधिकारी होता, त्याचा कार्यकाल एकच वर्षाचा ठरला. त्याचे अकाली निधन झाले. त्यानंतर पदावर आलेले मिलार्ड फिलमोर, फ्रँकलिन पियर्स, जेम्स बुकनॅन हे राष्ट्रपती आपल्या कामाचा फारसा प्रभाव पाडू शकले नाहीत. त्यांची कारकीर्द फारशी समाधानकारक ठरली नाही. सोळावा राष्ट्रपती बनलेले अब्राहम लिंकन यांना अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात महान राष्ट्रपती म्हणून ओळखले जाते. गुलामगिरी बंद करणारा मानवतावादी नेता म्हणून जगाने त्यांचा गौरव केला आहे. दुसऱयांदा राष्ट्रपती म्हणून निवडून आल्यावर पाचच दिवसांनी लिंकन कुटुंबीयांसह नाटक पहात असताना त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यानंतर सत्तेवर आलेले उपराष्ट्रपती अॅन्ड्र्यू जॅक्सन यांची कारकीर्द फुटीरतावाद्यांशी लढण्यात गेली. युलिसिस ग्रँट या राष्ट्रपतीने १८६५ सालच्या एप्रिल महिन्यात फुटीरतावाद्यांना शरणागती पत्करायला भाग पाडलं. लष्करी बळ वापरून, नव्या धाडसी मोहिमा आखून त्याने फुटीरतावाद्यांना जेरीस आणलं होतं. साहजिकच तो अमेरिकी जनतेचा ‘हिरो’ ठरला. त्याची लोकप्रियता कायम राहिली आणि त्याच्या निधनानंतर अंत्ययात्रेला अलोट गर्दी झाली होती. प्रत्येक राष्ट्रपतीची कारकीर्द, त्यातील चढ-उतार, यश-अपयशाची तपशीलवार माहिती लेखकाने दिल्यामुळे अमेरिकेचा इतिहास समजण्यास मदत होते.
रदरफर्ड हेज ते विल्यम मॅकिन्लि या राष्ट्रपतींनी फारसा ठसा उमटवला नाही. त्यानंतर सव्विसावा राष्ट्रपती बनलेल्या थिओडोर रुझवेल्टची कारकीर्द गाजली. तरुण, उत्साही, धाडसी क्रीडा प्रकारात रमणाऱ्या रुझवेल्टने विपुल लिखाण केलं. जवळ जवळ तीस पुस्तकं, हजारो पत्रं लिहिली. ‘टेडी बेअर’ या लहान मुलांच्या आवडत्या खेळण्याचा तो जन्मदाता ठरला. असे राष्ट्रपती विषयीचे गमतीदार किस्से, हकिकती या पुस्तकात येतात. कौटुंबिक जीवन, पत्नी, मुले यांच्याविषयीची माहिती लेखकाने सहजतेने दिलेली आहे. त्यामुळे पुस्तक कुठेही कंटाळवाणं होत नाही. वाचकांचे औत्सुक्य उलट वाढत राहते.
वुल्ड्रो विल्सन, फ्रँकलिन रुझवेल्ट, हॅरी ट्रूमन, जॉन केनेडी, रिचर्ड निक्सन, जिमी कार्टर, रोनाल्ड रीगन, जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश, बिल क्लिंटन, जॉर्ज डब्ल्यू. बुश या जागतिक पातळीवर प्रसिद्धीस पावलेल्या अमेरिकी राष्ट्रपतींच्या कारकिर्दीचे तपशीलही अत्यंत मुद्देसूदपणे, नेमकेपणाने ‘अमेरिकी राष्ट्रपती’मध्ये येतात. अत्यंत महत्त्वाच्या पदावर काम करणाऱ्या या व्यक्ती कशा होत्या, त्यांनी अमेरिकेसाठी कोणत्या प्रकारचं योगदान दिलं, कोणत्या चुका केल्या, कुठल्या मुद्द्यावर त्यांना विरोध झाला, कुठे अपयश मिळालं असे तपशील लेखकाने मांडले आहेत. पुस्तक वाचताना माहितीचा मारा न करता अभ्यासपूर्ण तरीही सहज सोप्या शैलीत आपण अमेरिकी राष्ट्रपतींची चरित्रे वाचत आहोत असे वाटते. अमेरिकेचा समग्र इतिहास सांगणारं सोपं पुस्तक असंच या पुस्तकाला म्हणावं लागेल.
प्रत्येक राष्ट्रपतीचे चित्र सुरवातीला दिले आहे. त्यातून राष्ट्रपतीचे बाह्य व्यक्तित्व समजण्यास मदत होते. पुस्तकाच्या समारोपामध्ये लेखकाने सर्वच राष्ट्रपतींच्या कारकिर्दीचा आढावा घेतला आहे, जो एकत्रितपणे ‘अमेरिका’ समजून घेण्यास मदत करतो. सगळ्या जगावर हुकूमत गाजवण्याची अमेरिकेची महत्त्वाकांक्षा आता लपून राहिलेली नाही.
तिचे परिणाम संपूर्ण जग भोगत आहे. हे सारं खोलात जाऊन समजून घ्यायचं असेल तर ‘अमेरिकी राष्ट्रपती’ हे पुस्तक आपल्याला निश्चितपणे मदत करतं.