Snehal Sherkarआपण मुक्त, अनिर्बंध जगण सोडून देऊन नीटनेटके, आखीवरेखीव, व्यवस्थित जगणं पत्करलंय. त्याला बुद्धिमत्तेची जोड देऊन टाकली आहे. क्षमता, बौद्धिक पात्रता यांचीही.
DAINIK LOKSATTA 23-07-2017चिरंतन प्रेमाचे यथार्थ चित्रण...
अधुऱ्या प्रेमकथा कधी कधी अत्यंत विलोभनीय वाटतात. ‘अद्वैत’ हा ‘ब्रिजेस ऑफ मॅडिसन काऊंटी’ आणि ‘अ थाऊजंड कंट्री रोड्स’ या कादंबऱ्यांचा एकत्रित अनुवाद आहे. १९६५ साली रॉबर्ट किनसेड आणि फ्रान्सेस्का जॉन्सन यांची भेट होते. अमेरिकेतील आयोवा राज्यात विंटरसेट या गावात छप्पर असणारा वैशिष्टय़पूर्ण पूल आहे. या पुलाचे फोटो काढण्यासाठी रॉबर्ट येतो. रॉबर्ट ‘नॅशनल जिओग्राफिक’ मासिकासाठी हे काम करतो आहे. फ्रान्सेस्का ही शिक्षिका आहे. तिने त्या काळाच्या रुढीप्रमाणे स्वत:ला नवरा, मुलं आणि घराला समर्पित केले आहे. या दोघांमध्ये अवघ्या चार दिवसांत उमलणारे प्रेम दोघांचे संपूर्ण आयुष्य एकीकडे उद्ध्वस्त करून टाकते आणि दुसरीकडे समृद्धही करून टाकते. हे विधान विरोधात्मक असले तरी प्रेमाच्या बाबतीत सगळे काही शक्य असते.
‘ब्रिजेस ऑफ मॅडिसन काऊंटी’ हे पुस्तक फ्रान्सेस्काच्या निधनानंतर तिच्या दोन्ही मुलांच्या प्रयत्नांतून निर्माण झाले. मुलांनी आईचे हे विवाहबाहय़ प्रेमप्रकरण समजून घेणे, तिचा त्याग, तिची तडफड समजून घेणे हे विलक्षणच म्हणायला हवे. हे अस्सल अमेरिकन वैशिष्टय़ वाटते. रॉबर्ट जेम्स वॉलर यांनी हे पुस्तक लिहिले. त्यासाठी फ्रान्सेस्काने लिहिलेल्या डायऱ्यांचा त्यांनी वापर केला. त्यांनी स्वत:हून रॉबर्ट किनसेडवर भरपूर संशोधन केले. रॉबर्टचे विलक्षण व्यक्तिमत्त्व त्यांनी शब्दांत पुरेपूर उतरविले आहे. रॉबर्टची फोटोग्राफी श्रेष्ठ कलेच्या पातळीवरची होती. रॉबर्ट ‘टेकिंग’ फोटो असे न म्हणता ‘मेकिंग’ फोटो असे म्हणतो.
फोटोग्राफीसारख्या क्राफ्ट वरचढ ठरणाऱ्या कलेत हे करणे कठीण असते. फ्रान्सेस्का रॉबर्टला ‘चित्ता’ म्हणते. तिच्यासाठी तो एक निखळ पौरुष आहे. रॉबर्टने फ्रान्सेस्कातली मनस्विनी, उन्मुक्त स्त्री जागृत केली. अवघ्या चार दिवसांच्या सहवासातच ते एकमेकांशी पूर्णपणे एकरूप झाले. नंतर रॉबर्ट फ्रान्सेस्काला स्वत:सोबत येण्यासाठी विनवतो खरा; परंतु तिच्यावर कुठलाही दबाव मात्र टाकत नाही. फ्रान्सेस्कासाठी तिच्या सामान्य नवऱ्याला आणि पौगंडावस्थेतील दोन मुलांना वाऱ्यावर सोडून येणे अशक्य असते. रॉबर्टसारख्या भटक्या, कलंदर माणसावर स्वत:ची कायमची सोबत लादणे हा अन्याय होईल, ही शक्यताही तिला वाटते. रॉबर्ट आणि फ्रान्सेस्काचे प्रेम चिरकालीन वेदनेसारखे ठसठसत राहते.
‘अ थाऊजंड कंट्री रोड्स’मध्ये फ्रान्सेस्काशी झालेल्या ताटातुटीनंतर रॉबर्टच्या विरहाच्या आयुष्याचे आणि रॉबर्टच्या अनौरस मुलाने त्याच्या घेतलेल्या शोधाचे वर्णन आहे. बऱ्याच वर्षांनी रॉबर्ट त्याच रोझमन ब्रिजला परत एकदा शेवटची भेट देऊन येतो, त्यावेळी फ्रान्सेस्का आणि रॉबर्टची चुकामूक होते. ही कादंबरी वाचताना ‘ब्रिजेस ऑफ मॅडिसन काऊंटी’ हा मेरील स्ट्रीप आणि क्लिंट ईस्टवूड यांच्या अभिनयाने सजलेला चित्रपट एकीकडे आठवत राहतो.
‘ब्रिजेस ऑफ मॅडिसन काऊंटी’ ही एका वेगळय़ाच काळातील प्रेमकहाणी आहे. संपर्कसाधनांचा विस्फोट झाल्याच्या आजच्या काळात तर ही प्रेमकथा एक चमत्कारच वाटते. अधुरी राहिल्याने ही प्रेमकथा दिव्यत्वाची पातळी गाठते असेही वाटते. कदाचित प्रेमाच्या चिरंतनतेसाठी दोघांमध्ये अंतर राहणे आवश्यक असेल. त्यातूनच ही कथा चिरंतन प्रेमाचं यथार्थ चित्रण ठरते.
-जुई कुलकर्णी
तेजस कराडेगुड
SUDARSHAN ATHAVALE 29.11.16अद्वैत ही कादंबरी वाचली. अत्यंत अवघड अशा शैलीतील लिखाणाच्या आपण समर्थपणे केलेल्या भाषांतराचे मनापासून कौतुक !
PRITI APTE-UMA NIJSUREरॉबर्ट जेम्स वॉलर यांनी १९९२ साली लिहिलेली `द ब्रिजेस ऑफ मॅडिसन काऊंटी` हि पहिलीच कादंबरी इतकी गाजली कि तिच्या लाखो प्रति संपल्या .
हि प्रेमकहाणी आहे फोटोग्राफर असलेल्या रॉबर्ट किनसेड व एका खेडेगावातील शेतकऱ्याची बायको असलेल्या फ्रान्सेस्का जॉन्सन यांची . पन्नाशी ओलांडलेला तरीही कणखर शरीरयष्टी असलेला, उंचनिंच, गडद निळ्या डोळ्यांचा, कलंदर, फोटोग्राफीसाठी जगभर फिरलेला असा हा रॉबर्ट किनसेड मॅडिसन काउंटी या गावात असलेल्या ब्रिजेस चे फोटो काढायला म्हणून येतो . पत्ता विचारण्याच्या निमित्ताने त्याची तिथे भेट होते फ्रान्सेस्का जॉन्सन या गृहिणीशी . तिचा नवरा आणि २ मुलं आठवडाभरासाठी परगावी गेलेली असतात आणि हि घरात एकटीच असते. एकमेकांकडे पाहताक्षणीच एक अनामिक हुरहूर लागते आणि दोघेही एकमेकांकडे अक्षरशः ओढले जातात . ती त्याला ब्रिज दाखवायला घेऊन जाते. नंतर चहाला घरी बोलवते . दिव्याच्या मंद प्रकाशात सिगरेट , आईस टी घेत गप्पा गोष्टी होतात . ती त्याच्या समोर आपले मन मोकळे करते . फक्त चार दिवसांचा सहवास पण दोघे तनामनाने एकत्र येतात. इतक्या अद्वितीय प्रेमाचा अनुभव घेतात कि दोघं कायमची एकमेकांची होऊन जातात. त्या चार दिवसानंतर ती दोघेही परत कधीही भेटत नाहीत पण एकमेकांना विसरूही शकत नाहीत .
पुढे अनेक वर्षांनी जेव्हा फ्रान्सेस्काच्या मृत्यूनंतर तिची पत्रे आणि डायऱ्या तिच्या मुलांना मिळतात आणि ते वाचून झाल्यानंतर मुलांना जाणवतं कि आपल्या आईच्या आयुष्यात अवचित आलेल्या एका परपुरुषावर तिचं किती जीवापाड प्रेम जडून गेलं पण मुलांच्या व नवर्याच्या प्रेमापोटी तिनं आपल्या सुखाला तिलांजली दिली . तिची हि कहाणी जगासमोर आणण्याचा विचार मुलं करतात आणि त्या डायऱ्या व पत्रे लेखकाकडे आणून देतात . त्यांच्या विनंतीला मान देऊन लेखक हि गोष्ट लिहायला सुरवात करतो .
तुमच्या हृदयाचा ठाव घेणारी अत्यंत नाजूक तरल अशी हि प्रेमकहाणी आहे. जी आपल्याला अस्वस्थ करून सोडते इतकी कि वाचताना डोळ्यातून पाणी आणि घशाशी आवंढा येतोच. रॉबर्ट आणि फ्रान्सेस्का यांची ताटातूट आपल्या काळजाला चटका लावून जाते .
A Thousand Country Roads - द ब्रिजेस ऑफ ...... च्या यशानंतर दहा वर्षांनी रॉबर्ट जेम्स वॉलर यांनी हि कादंबरी लिहिली. रॉबर्ट आणि फ्रान्सेस्का या दोघांचे पुढे काय झाले ? ते एकमेकांना पुन्हा भेटले का ? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे लेखकाने या कादंबरीत देण्याचा प्रयत्न केलाय .
रॉबर्ट किनसेड आता वयस्कर झालाय. त्याच्या जवळ आता हायवे नावाचा कुत्रा आहे. अजूनही जमेल तशी फोटोग्राफीची कामे तो करतोय. इथे परत रॉबर्ट च्या मागील आयुष्यात लेखक जातो. वयाच्या तिशी बत्तिशीत रॉबर्ट चा संबंध विन मॅकमिलन या तरुणीशी येतो. त्यातून कार्लिस्ले नावाचा मुलगा जन्माला येतो. पुढे तो आपल्या आईला वडिलांबद्दल विचारतो. तिला जास्त काही सांगता येत नाही पण जी काही माहिती तिच्याकडून मिळते त्या जोरावर तो आपल्या वडिलांचा शोध घायला सुरवात करतो. पुढे रॉबर्ट आणि विनची भेट होते. नंतर रॉबर्ट आणि कार्लिस्ले एकमेकांना भेटतात. दोघे भरपूर गप्पा मारतात. एकमेकांना पत्रं पाठवतात. रॉबर्ट स्वतःच्या तब्बेतीची काळजी घेण्याचं ठरवतो. कारण आता आपण एकटे नाही हि भावना त्याच्या मनात जागी होते. पुढे विन, रॉबर्ट, कार्लिस्ले एकत्र येतात का ?
इकडे फ्रान्सेस्का चा नवरा रिचर्ड मरण पावतो, मुलं मोठी होऊन स्वतंत्र आयुष्य जगू लागतात. फ्रान्सेस्का मात्र आपल्या घरातून नाही. न जाणो रॉबर्ट परत आला तर या आशेवर ती जगात राहते. रात्रीच्या एकाकी वेळेत ते चार दिवस आणि चार रात्री ती जे वेगळंच जीवन जगते, विलक्षण उत्कटतेने प्रेम करते त्याची आठवण काढत राहते. शेवटी रॉबर्ट कडे जाण्याचा ती निर्णय घेते. रॉबर्टचे फ्रान्सेस्का चे पुढे काय होते हे मी सांगत नाही. वाचकांनीच ते जाणून घ्यावे.
लीना सोहोनी यांनी इतका सुंदर अनुवाद केलाय कि आपण मूळ पुस्तकच वाचत आहोत असं वाटतं. द ब्रिजेस ऑफ ... वर चित्रपटही निघालाय. त्याच्या काही clips youtube वर पहिल्या. सिनेमा नक्कीच चांगला असणार असं वाटतंय.
SAKAL 16.10.16रॉबर्ट जेम्स वॉलर या लेखकानं लिहिलेल्या आणि जगभर गाजलेल्या ‘द ब्रिजेस ऑफ मॅडिसन कौंटी’ आणि ‘अ थाउजंड कंट्री रोड्स’ या दोन कादंबऱ्याचां हा अनुवाद. फोटोग्राफर रॉबर्ट किनसेड आणि फ्रान्सेस्का यांची ही प्रेमकहाणी. परिपक्वं प्रेमानें चित्रण करणाऱ्या या कादंबऱ्या आहेत.