Pawan Chandak`हरवलेल्या मंदिराचे रहस्य` वाचकांच्या नजरेतून उलगडणारी कादंबरी
सुधा मूर्ती लिखित व लीना सोहोनी अनुवादित रहस्यमय पण तितकीच मनाला भावणारी, अत्यंत सोप्या शब्दात मांडलेली इतकेच नाही तर लहान मुलांना जरी वाचून दाखवली तर एका बैठकीत समजणारी अशी अप्रतिम कादंबरी आज एका बैठकीत वाचून झाली.
ही कादंबरी वाचतांना माझे लहान होऊन लहानपणी च्या दिवसांत जाऊन सुधा आज्जी मला ही गोष्ट सांगत आहे आणि मी देखील आज वयाच्या चाळिसाव्या वर्षी तितक्याच आवडीने ऐकतोय असं वाटत होतं.
एका आटपाट नगरात सोमनायक नावाचा दानशूर राजा एका शिल्पकाराच्या मदतीने पायऱ्यांची विहीर, सात शिवमंदिर, शिल्प, खांब असे सुंदर मंदिर व अमृतमय पाण्याचा झरा असलेली विहीर तयार करतो. व स्वतः पाहरेकरी ठेऊन ती विहीर प्रदूषित होण्यापासून रक्षण करतो.
पण तो तीर्थयात्रेला गेल्यावर त्याचा पुत्र हा नियम मोडून मित्रांसोबत जलविहार करून लावलेले सर्व नियम मोडून हे पाणी प्रदूषित करतो ज्यामुळे प्रजेला दूषित पाण्यामुळे आजार व पुढे परक्रीय आक्रमण आदींमुळे हे विहिर पूर्ण बुजवण्यात येते. ही झाली सोमहळी गावविषयी दंतकथा.
तर मित्रानो अनुष्का तिच्या आजोळी सुटयात जाते तिथे तिची मैत्री अमित, मेधा, आनंद आणि महादेव यांच्याशी होते. आणि ते गावातील ग्रामीण जीवन, पर्यटन, शेती, गावातील नदी, टेकडी, बगीचा, जंगल, गाय गोठा, वन्यजीव, पक्षी आदी निसर्गमय वातावरणात रमतात.
या सर्व गावातील जीवनाचा आनंद घेत असताना एकदा त्यांची आज्जी आजोबा वर लिहिलेली हरवलेल्या मंदिर व विहीर ची गोष्ट त्यांना सांगते.
एकदा वळवाचा पावसानंतर नदी काठचे सौंदर्य पाहण्यासाठी अनुष्का आणि तिचे 4 मित्र भटकंती साठी निघतात तेंव्हा अनुष्का चा पाय चिखलात खोलवर रुतल्यावर त्यांना रहस्यमय खड्डा आहे की विहीर आहे की गुफा याचा शोध लागतो.
पुढे पडणारे प्रश्न आज्जी आजोबांना ही गोष्ट सांगायची का की आपण एकट्याने खोद काम करायचे ?
गावातील लोकांना कळल्यावर ते काय म्हणतील की मदत करतील ?
पुरातत्व विभागाची यावर काय भूमिका राहील ? शासकीय वेळकाढू वृत्तीमुळे खोदकाम होईल का ?
त्या खड्यात खरच आज्जीने सांगितल्या दंत कथे नुसार नक्कीच विहीर , सात शिवमंदिर, पाण्याचा अमृतमय झरा असेल का ?
तर वाचक मित्रांनो एकदा नक्कीच वाचून पहा आणि आपल्या मुलांना देखील वाचून दाखवा त्यांना देखील आवडेल
डॉ पवन चांडक एक वाचक
Pankaj Datare*📖हरवलेल्या मंदिराचे रहस्य*📖
ही कादंबरी म्हणजे अनुष्का या बारा वर्षांच्या मुलीची साहसकथा आहे. शहरात वाढलेली अनुष्का सुट्टीत आपल्या आजी-आजोबांच्या गावी जाते. गावातील जीवन शहरापेक्षा वेगळे असल्याचे तिच्या लक्षात येते. पण तिला ते हळूहळू आवडू लागते. तिथल्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये ती सहभागी होऊ लागते. पापड बनवणं, वरदा नदीच्या काठी सहलीला जाणं, सायकल चालवणे, नवे मित्र-मैत्रिणी या सर्वात तिची सुट्टी छान चाललेली असते. यात आणखी एक गंमत म्हणजे आजीकडून गोष्टी ऐकणे. अशीच आजीने तिला गावातील एका जुन्या पायऱ्या असलेल्या विहिरीची गोष्ट सांगितलेली असते. एक दिवस ती गावाजवळच्या रानात आपल्या मित्रमंडळींबरोबर सहलीला गेलेली असताना तिला त्याच जुन्या, पायऱ्या असलेल्या विहिरीचा शोध लागतो. पुढे या विहिरीत काय काय सापडते, हे जाणून घेण्यासाठी ही साहसकथा वाचायलाच हवी. गावातील जीवन, तिथले लोक यांची ओळख होत होत पुढे एका गुपिताच्या शोधापर्यंतचा अनुष्काचा प्रवास कसा होत जातो, हे वाचणे हा नक्कीच एक आनंददायी अनुभव आहे. पुस्तकात निरनिराळ्या प्रसंगांसाठी चित्रांचाही समावेश करण्यात आला आहे. एका गुपिताच्या शोधाची ही कहाणी सांगताना मूर्ती यांनी ग्रामीण जीवनातील साधेपणाचे, निसर्गाशी येणाऱ्या सहवासाचे तसेच तिथल्या सकारात्मक परंपरांचेही वर्णन अतिशय प्रांजळपणे केले आहे. त्यामुळे लहानांबरोबरच मोठय़ांनीही वाचावी अशी ही साहसकथा आहे.
Trupti Kulkarniपुस्तक वाचण्याची आवड असलेला माणुस कोणतंही पुस्तक वाचतो मग ते बालवाङ्मय का असेना. उलट त्यामुळं प्रसंगी लहान-मोठं होण्यातली मजाही तो अनुभवू शकतो. मला अशीच मजा अनुभवायला मिळाली ती सुधा मूर्तींच्या "हरवलेल्या मंदिराचे रहस्य" या अनुवादीत पुस्तकामुळं. मेहता पब्लिशिंगचं हे पुस्तक येत्या उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांनी आर्वजून वाचावं असं आहे. यातल्या अनुष्काच्या करामती वाचताना आपण आपल्या लहानपणी वाचलेल्या "चिंगी" ची आठवण होते. क्वचित प्रसंगी ही आधुनिक चिंगीच आहे की काय असंही वाटून जातं. त्यामुळं आपल्या मनात बालपण जपून असलेल्या प्रत्येकानं हे पुस्तक वाचायला हरकत नाही. किंबहुना ज्यांच्या लहानपणीच्या सुट्टया आजोळी गेल्या आहेत त्यांना तर ते बालपणीचे दिवस नक्की आठवतील.
याशिवायही या पुस्तकात अजुन खुप गमती जमती आहेत, काही उल्लेखनीय गोष्टीही आहेत. पुस्तकाची उल्लेखनीय बाब म्हणजे त्याची प्रस्तावना. फारच सुंदर आणि योग्य शब्दांत त्यांनी लिहली आहे. शिवाय हे पुस्तक सुधा मूर्तींनी त्यांच्या नातीला म्हणजेच अनुष्काला अर्पण केलं आहे. तर अशा या धाडसी अनुष्काच्या करामती सांगणाऱ्या एकुण तेरा कथा आहेत. या कथाप्रकांरांच वैशिष्ट्य म्हणजे त्या म्हणल्या तर प्रत्येक स्वतंत्र कथा आहेत आणि म्हणलं तर ती एक छोट्यांची छोटीशी कादंबरिकाही आहे.
बंगळूर सारख्या शहरात सीबीएसर्इ बोर्डाच्या शाळेत शिकणारी अनुष्का सुट्टी निमित्त "सोमनहळ्ळी" सारख्या लहानशा खेड्यात आपल्या आजीआजोबांकडे रहायला येते. तीचे आर्इवडील कामानिमित्त परगावीच राहतात. आणि मग अनुष्काच्या आयुष्यात ज्या ज्या धमाल गोष्टी घडतात त्या वाचताना आपण रंगुन जातो. तिला निर्सगाची अद्भुत रहस्यं, चमत्कार पहायला आणि अनुभवायला मिळतात. अशीच एकदा आजी आजोबांकडुन ऐकलेल्या कथति गोष्टीच्या रहस्यानं अनुष्का भारावलेली असते आणि तिच्याही नकळत त्या रहस्यमय गोष्टीचा ती एक मोठा भाग होते. म्हणजे नक्की काय घडतं? ते जाणण्यासाठी हे पुस्तक वाचायला हवं.
आता ही कथा वाचताना मला जाणवलेली आणखी एक गोष्ट म्हणजे एखाद्या गावाच्या किंवा शहराच्या बाबतीतही काही लोककथा असतात. ज्याला कोणी सांगोवांगीच्या गोष्टी म्हणतो तर कोणी कपोलकल्पित कथा म्हणतं. तशीच त्या गावच्या हजारो वर्षांपुर्वीच्या सोमनायक नावाच्या सद्शील राजाची कथा सगळ्यांना ऐकीव माहित असते. पण तीच कथा सांगण्याची आजीची पद्धत निराळी, आजोबांची निराळी, शिवाय गावातले इतर गावकरीही ती निराळ्या पद्धतीनं सांगत असतात. इथं कानगोष्टीच्या खेळाची आठवण आल्यावाचुन रहात नाही. आणि शेवटी घडतंही तसंच अगदी कानगोष्टी सारखं. मुळ कथा काही वेगळीच असते. पण एक मात्र आहे ती सत्यकथा असते. आणि त्या गोष्टीची सत्यता पडताळण्यासाठी, रहस्यांचा शोध लावण्यासाठी सगळे गावकरी एकत्र येऊन जे सहकार्य करतात ते तर वाखाणण्याजोगं आहे. या सगळ्या धमालीत अजुनही काही गोष्टी आवर्जून जाणवतात. ते म्हणजे आजीआजोबा आणि नातवंड यांच्यातलं नातं, दोन पिढ्यातलं अंतर, शहरी आणि ग्रामिण जीवनातला फरक. शिक्षण पद्धतीतला फरक. मुलांच्या नैसर्गिक क्षमतांचा वापर कसा होऊ शकतो याची जाणीव. अशा अनेक लपलेल्या वाटा सापडतात.
खरंतर हे पुस्तक केवळ मुद्रित माध्यमापुरतंच मर्यादित न राहता याचं दृकश्राव्य माध्यमात माध्यमांतर झालं तर अधिक चांगल्या प्रकारे त्याचा आस्वाद घेता येर्इल आणि ते अधिकाधिक परिणामकारक ठरेल.
तृप्ती कुलकर्णी
MAHARASHTRA TIMES 05-02-2017लहान मुलांचे जग हे एक निराळेच विश्व असते. लेखिका सुधा मूर्ती यांनी हे विश्व संवेदनशील नजरेने अनुभवले आहे. अनुष्का ही शहरात राहणारी मुलगी. सुटीसाठी ती आजी-आजोबांकडे गावाला जाते आणि तिथल्या जगात रमते. अनेक नव्या गोष्टी शिकते. पापड बनवणे, सहलीला जाणे, सायकल चालवायला शिकणे याबरोबरच तिला नवी मित्रमंडळीही मिळतात. एक दिवस ती गावाजवळच्या रानात आपल्या मित्रमंडळींबरोबर सहलीला जाते. तेव्हा तिला पायऱ्या असलेल्या एका जुन्या विहिरीचा शोध लागतो. या विहिरीची दंतकथा तिने आपल्या आजीकडून ऐकलेली असते. अनुष्काची शाळेची सुटी संपते आणि ती शहरात परत जाते. तिथपर्यंत हा कथाभाग आहे.
Loksatta 16.10.16सुधा मूर्ती यांच्या लेखनातून सहज शैलीचा प्रत्यय येतो. या शैलीमुळेच त्यांच्या पुस्तकांना वाचकप्रियता मिळाली आहे. त्यांच्या कथा लहानांना जशा आवडतात, तशाच त्या प्रौढ वाचकांनाही अंतर्मुख करतात. मूल्य, संस्कार बिंबवण्याचा कोणताही आव न आणता अतिशय साधेपणाने लिहिल्या गेलेल्या त्यांच्या कथा वाचकांच्या चांगुलपणाला आवाहन करतात. त्यामुळेच त्यांच्या कथा वाचनाचा आनंद तर देतातच, पण त्याबरोबरच सकारात्मक विचारही रुजवतात. त्याचाच प्रत्यय देणारी `हरवलेल्या मंदिराचे रहस्य` ही त्यांची नवी कादंबरी.
एका गुपिताच्या शोधाची ही कहाणी सांगताना मूर्ती यांनी ग्रामीण जीवनातील साधेपणाचे, निसर्गाशी येणाऱ्या सहवासाचे तसेच तिथल्या सकारात्मक परंपरेचेही वर्णन अतिशय प्रांजळपणे केले आहे. त्यामुळेच लहानांबरोबरच मोठ्यांनीही वाचावी अशी ही साहसकथा आहे.